मिशनच्या स्थापनेनंतर वातावरणातील बदल

डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केल्यानंतर अस्पृश्यतानिवारणकार्यास वेगाने चालना देण्याच्या दृष्टीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू केले. अस्पृश्यता नष्ट करण्याचा आणि अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्याचा प्रश्न अखिल भारतीय पातळीवरी महत्त्वाचा प्रश्न आहे, हे ध्यानात घेऊन महाराष्ट्रात त्याचप्रमाणे अन्य प्रांतांतही ह्या कार्याचा प्रचार करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजना आखली. ह्या कामाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या वेळेस अस्पृश्यतानिवारक परिषदेचे अधिवेशनही डिसेंबर १९०७च्या सुरत येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनापासून सुरू केले. त्यांच्या ह्या धोरणामुळे देशभरातील नेत्यांना अस्पृश्यतानिवारणकार्याची निकड जाणून देण्याचे कार्य घडू लागले. त्यांनी आयोजित केलेल्या ह्या परिषदांचे आरंभीचे अध्यक्ष सत्येंद्रनाथ टागोर (सुरत, १९०७), रावबहादूर मुधोळकर (बांकीपूर, १९०८), गोपाळ कृष्ण गोखले (मद्रास, १९१०), लाला लजपतराय (कराची, १९१२), सयाजीराव गायकवाड (मुंबई, १९१८), म. गांधी (नागपूर, १९२०) ह्यांसारख्या मान्यवर व्यक्ती होत्या. शिंदे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळेच लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. अँनी बेझंट, म. गांधी इत्यादी अखिल भारतीय पातळीवरील नेत्यांचे लक्ष ह्या कामाकडे आकृष्ट करून घेऊन त्यांची सहानुभूती संपादन करता आली.

मिशनच्या स्थापनेनंतर अगदी दोन-तीन अस्पृश्यांच्या प्रश्नाबाबत वेगाने लोकमत जागृत होऊ लागले. ह्या कामाबद्दल योग्य अशा प्रकारचा दृष्टिकोण निर्माण होऊ लागला, याचा पडताळा मिळू लागला. अस्पृश्य मानलेल्या जातीच्या उन्नतीसंबंधी लाला लजपतराय यांनी त्यांच्या पंजाबी पत्राच्या ६ मे १९०९च्या अंकात एक लेख लिहिला व या लोकांना सांप्रत अन्यायाने व निदर्यपणे वागविण्यात येते हे गैर असून देशाचा एक भाग लंगडा-पांगळा ठेवणे हे देशोन्नतीस विघातक असल्याचे बजावले. अस्पृश्यता टिकवून ठेवणे हे राजकीयदृष्ट्या तर हानिकारक आहेच. परंतु राष्ट्र या नात्याने आपला सुरक्षितपणा अस्पृश्यतेच्या प्रश्नावर अवलंबून आहे;  राष्ट्राची प्रगती खालपासून वरपर्यंत झाली पाहिजे असे प्रतिपादन करून किरकोळ राजकीय फायद्यापेक्षा राष्ट्रउभारणीच्या दृष्टीने अस्पृश्यता नाहीशी करणे निकडीचे आहे, असे लाला लजपराय यांनी प्रतिपादन केले. अखिल भारतीय पातळीवर नेत्यांची भूमिका कोणत्या प्रकारची बनत चालली होती, याची कल्पना लजपतराय यांच्या लेखातून प्रकट होते.१ ऑक्टोबर १९०९च्या तिस-या आठवड्यात मुंबई येथे टाऊन हॉलमध्ये अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. ह्या सभेमध्ये न्या. चंगावरकर, ना. गोखले यांची भाषणे झाली. दोघांनीही आपल्या भाषणात अंत्यजांचा मानलेला अस्पृश्यपणा हीच अस्पृश्याविषयक प्रश्नाबाबत जाचक बाब आहे, असे सांगून अस्पृश्यांचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उदार धर्मतत्त्वाचा आधार घेतला पाहिजे असे या भाषणात प्रतिपादन केले. ही गोष्टही विशेष महत्त्वाची म्हटली पाहिजे, कारण ना. गोखले आपली भूमिका सामान्यतः धर्मनिरपेक्ष भूमिकेवरून मांडीत असत, ते म्हणाले, “….त्यांचा समाजातील दर्जा वाढवून, त्यांस शिक्षण देऊन त्यांच्या भौतिक उन्नतीची तजवीज झाली म्हणजे संस्कृत झालेल्या बुद्धीस योग्य अशी उदार धर्मतत्त्वे त्यांस शिकविली पाहिजेत आणि अशी तत्त्वे प्रार्थनासमाजाच्या धर्मात आहेत.” मिशनच्या कार्याला साहाय्य करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “हा उत्कट देशप्रीतीचा व उदार मनेवृत्तीचा प्रश्न आहे. आपल्या मायभूमीवर ज्याचे खरे प्रेम असेल व सर्वत्र न्याय व्हावा, अशी इच्छा असण्याइतकी ज्यांची उदारबुद्धी असेल, त्यांस या कामी होईल तेवढे साहाय्य करावे असे वाटल्यावाचून राहणार नाही आणि तेस वाटणा-या प्रत्येक मनुष्यास थोडेबहुत साहाय्य करता येईल. रा. शिंदे यांच्या गरजा पुष्कळ व नानाप्रकारच्या आहेत. या कामी आपले सर्व आयुष्य वेचणारे असे प्रथम आस्थेवाईक मिशनरी मिळाले पाहिजेत. नंतर समाजाकडून पैशाची चांगली मदत व्हावयास पाहिजे.... माझे स्वतःचे मत असे आहे की, आपल्या समाजाच्या विवेकबद्धीस खरोखरीच चेतना मिळाली आहे. पूर्वीची रात्र संपून नवीन अरुणोदयाची प्रथमची छटा आपणास दिसावयास लागली आहे.”२ ना. गोखले यांना प्रस्तुत भाषणात मिशनच्या कार्याला साहाय्य करावे असे कळकळीचे आवाहन केले. मिशनने सुरू केलेले कार्या शिंदे यांचेच कार्य होय असे त्यांनी ओघाने नमूद केले. अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी जे साहाय्य आरंभापासून केले आहे त्याबद्दलही त्यांना धन्यवाद दिले. लाला लजपतराय, ना. गोखले, अँनी बेझंट, श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्या नेत्यांचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणकार्याच्या संदर्भात यशस्वीपणे साहाय्य मिळविले.

अस्पृश्यतानिवारणकार्याबद्दल सरकारचे-पर्यायाने सरकारी अधिका-यांचेही-साहाय्य व सहानुभूती मिळणे शिंदे यांना महत्त्वाचे वाटत होते. इंग्रज अधिका-यांचे साहाय्य मिळाल्याचा परिणाम समाजातील उच्च स्तरांवरील लोकस अधिकारीवर्ग तसेच संस्थानिक यांवर मोठ्या प्रमाणावर पडू शकतो हे शिंदे यांनी अजमावले होते. सरकारी पातळीवरून ह्याबाबतीत प्रयत्न करावयाचा झाल्यास कलेक्टर, कमिशनर ह्यांसारख्या वरिष्ठ इंग्रज अधिका-यांची सहानुभूती असणे उपयोगाचे ठरणार होते, स्वतः शिंदे यांनी इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेतले होते. ख्रिश्चन धर्माची उदार शिकवण कशी आहे, हेही त्यांना माहीत होते. ख्रिश्चन धर्मातील उदार मानवतावादी संस्कारामुळे इंग्रज अधिका-यांची अस्पृश्यताविषयक प्रश्नाला सहानुभूती मिळविणे शिंदे यांना शक्य होत असे. मिशनरी म्हणून शिंदे यांच्याबद्दल इंग्रज अधिका-यांना आदरबुद्धी वाटणे स्वाभाविक होते. शिंदे यांनी ह्या कामाचा प्रसार करताना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन इंग्रज कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली स्थानिक प्रतिष्ठित मंडळींची कमिटी ह्या कामासाठी स्थापन करण्याची पद्धती सुरू केली. केवळ कलेक्टरच्याच पातळीवर नव्हे, तर गर्व्हनरशीसुद्धा शिंदे यांनी ह्या कामासाठी संबंध स्थापित केले व सर जॉर्ज क्लार्क यांसारख्या गव्हर्नरची ह्या कामी सहानुभूती संपादन केली. सर क्लार्क यांनी ह्या कामाचे महत्त्व ओळखून आपल्या कन्येला मिशनला आर्थिक साहाय्य करता यावे यासाठी गाण्याचा जलसा आयोजित करण्याला परवानगी दिली, हा भाग आपण पाहिलेला आहेच.

मिशनच्या वेगवेगळ्या शाखांना कलेक्टर, इंग्रज अधिकारी हे भेट देऊन साहाय्य करीत व उत्तेजन देत. इगतपुरी येथील मिशनच्या शाळेला १ मे १९०९ रोजी नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन यांनी भेट दिली. गणेश आकाजी गवई यांनी शाळेबद्दलची माहिती इंग्रजीमध्ये भाषण करून सांगितली. कलेक्टर मि. जॅक्सन यांनी सरकारकडून शाळेला मदत मिळेल असे आश्वासन देऊन शाळेच्या खर्चासाठी दहा रुपये देणगी दिली.३ मुंबई येथे २४ मे १९०९ रोजी प्रो. देवल यांनी आपल्या सर्कशीच्या एका दिवशीच्या प्रयोगाचे उत्पन्न मिशनला देण्याचे मान्य केले. पोलीस कमिशनर मि. एडवर्डस् व सर भालचंद हे प्रयोगाच्या वेळी उपस्थित राहिले. दापोली येथील मिशनच्या शाळेला फेब्रुवारी १९०९ मध्ये दक्षिण भाग कमिशनर मि. एस. सी. गिब यांनी सपत्नीक भेट दिली व संस्थेला दहा रुपयांची देणगी दिली. कलेक्टर ए. एफ. मेकॉनिकी यांनीही या शाळेस भेट देऊन रुपयांची देणगी देऊन आपली सहानुभूती प्रकट केली.४ धारवाड येथेही कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थानिक प्रतिष्ठितांची कमिटी स्थापन केली.

मिशनच्या कार्याला प्रारंभ झाल्यानंतर सामाजिक सुधारणेला अनुकूल असणा-या उदारमनस्क स्त्री-पुरुषांची सहानुभूती ह्या कामी प्रकट होऊ लागली. पुण्यास प्रारंभिक काळातच कॅम्पामध्ये दिवसाची शाळा, कॅम्पातील मोफत वाचनालय, गंजपेठ व मंगळवार पेठ येथील रात्रशाळा ह्या मिशनच्या वतीने सुरू झाल्या होत्या. १९०९ सालीच कॅम्पातील दिवसाच्या शाळातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या १२७ झाली. ह्या सर्वंच शाळांमधून होणा-या उपक्रमांना शहरातील प्रतिष्ठित स्त्री-पुरुष उपस्थित राहत असत व समयोचि स्वरूपाची भाषणे करीत असत. अशा प्रतिष्ठित व्यक्तिंमध्ये रा. ब. का. बा. मराठे, श्रीमती रमाबाई रानडे, प्रो. धोंडो केशव कर्वे, प्रिन्सिपॉल परांजपे, प्रो. केशवराव कानिटकर, प्रो. वा. ब. पटवर्धन इत्यादी मंडळींचा समावेश होतो. ह्या मंडळींनी भेटी दिल्या व देणग्यांच्या रूपाने अर्थसाहाय्य दिले. मुलांसमोर उपदेशपर भाषणे केली. १९०९च्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, या तीन महिन्यांतच मिशनला सहाशे साडेअठ्ठावन रुपये आर्थिक साहाय्य म्हणून मिळाले. पुणे शहर हे तर परंपरानिष्ठांचे मुख्य ठाणेच. वर नमूद केलेल्या उदारमनस्क व्यक्तींनी मिशनला साहाय्य करणे हे स्वाभाविकच होते. परंतु परंपनिष्ठ समजल्या जाणा-या व्यक्तीही आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून अस्पृश्यवर्गीयांशी प्रेमाने व बरोबरीच्या नात्याने वागू लागले, असे चित्रही दिसू लागले होते. ८ ऑगस्ट १९०९च्या सुबोधपत्रिकेत ‘भारतपुत्र’ या टोपणनावाने लिहिलेले एक पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये रा. किसन फागुजी बनसोडे पाटील व रा. गणेश आकाजी गवई हे पुणे येथे आले, तेव्हा केसरी ऑफिस, भालाकार व मुमुक्षूकार रा. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांची घरी भेट घेतली. त्या वेळी त्यांनी स्पर्शास्पर्शाचे भेद न दाखविता इतर हिंदूंप्रमाणे व प्रेमाने वागविले असे कळते. २८ जुलै १९०९ रोजी रा. नरसिंह चिंतामण केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यात ‘अंत्यज जातीची उन्नती’ या विषयावर रा. बनसोडे व रा. गवई यांची भाषणे झाली. या प्रसंगी अध्यक्ष केळकर यांनी हिंदूंनी तुम्हा लोकांना अस्पृश व नीच मानले ते योग्य नाही अशा आशयाचे भाषण केले व भालाकार भोपटकरांनी अध्यक्षांचे आभार मानले.५

पुण्यातील ल. रा. पांगारकर यांच्यासारख्या कर्मठ, सनातनी गृहस्थाच्या वृत्तीतही बदल झाला ही स्पृहणीय गोष्ट म्हणावी लागेल. ल. रा. पांगारकर यांच्या १८९७च्या रोजनिशीतील एक नोंद खालीलप्रमाणे आहे. “तारीख २७/२/९७. मातोश्री आईस सडकून ताप आल्याकारणाने मोठ्या हिकमतीने तांग्यात घालून बसती केल्यासारखे करून तांगा भऱदिवशी पुण्याबाहेर हाकलला. तांगेवाल्याला ५ रु. बक्षीस दिले. रँडची धामधूम चालू. लोक भयभीत झालेले. महार-मांगांचे हात आईच्या देहाला आता लागणार नाहीत असे वाटून अत्यंत समाधान झाले. आईला सुखरूप घेऊन पौडास आलो.”६ अशा प्रकारची कर्मठ मनोवृत्ती असणा-या पांगारकरांच्या मनोभूमिकेत झालेल्या एवढा बदल अत्यंत स्पृहणीय म्हणावा लागेल.

अस्पृश्यतानिवारणकार्याच्या जोडीनेच आनुंषागिक स्वरूपाच्या दुस-या एका कामाला शिंदे यांनी आरंभ केला होता. हे कार्या म्हणजे मुरळी सोडण्याच्या प्रथेला प्रतिबंध बसावा, यासाठी सरकारचे साहाय्य घेऊन स्थापन केलेली ‘पश्चिम हिंदुस्थानातील मुलांचे रक्षण करणारी संस्था.’ ह्या संस्थेचे उद्देश व कार्य लक्षात घेऊन ह्या अनीतिमूलक प्रथेच्या विरुद्ध सरकारने कायदाही केला. शिंदे यांनी १९०७ साली सुरू केलेल्या या चळवळीस चांगले यश मिळत चालले. मुरळी सोडलेल्या मुलींना समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळावे यासाठी अशा मुलींची लग्ने लावून समाजात पुनःस्थापित करण्याच्या दृष्टीनेही शिंदे यांनी प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ केला होता. १८ एप्रिल १९०९ रोजी खडकी येथे गणपतराव हणमंतराव गायकवाड या सधन तरुणाचा शिवूबाई या नावाच्या मुरळीबरोबर विवाह लावण्यात विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. अस्पृश्य समाजातील विविध जातींतील मुली प्रधान्याने मुरळी म्हणून या देवाला वाहिल्या जात असत, म्हणून विविध अस्पृश्य समाजातील विविध जातींतील मुली प्राधान्याने मुरळी म्हणून या देवाला वाहिल्या जात असत, म्हणून विविध अस्पृश्य जातींतील लोकांचे या प्रथेविरुद्ध लोकमत संघटित करणे व मुरळी सोडलेल्या मुलींची लग्ने लावून समाजात त्यांना पुन्हा प्रतिष्ठेचे जीवन जगण्यास मदत करणे हे विठ्ठल रामजी शिंदे यांना आवश्यक वाटत होते. त्या दृष्टीने अस्पृश्यवर्गीयांचे लोकमत जागृत करण्याचा प्रयत्नही केला जात होता. ५ जून १९०९ रोजी कोल्हापूर येथे ‘मिस् व्हायोलेट क्लार्क निराश्रित वसतिगृहा’च्या आवारात विठ्ठल रामजी शिंदे यांचे गोविंदराव सासने यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान झाले. ह्या सभेत सर्वानुमते पुढील ठराव मंजूर करण्यात आला. “ता. १८/४/१९०९ रोजी खकडी येथे रा. रा. गणपतराव गायकवाड यांचा शिवूबाई नावाच्या मुरळीबरोबर जो विवाह झाला तो कोल्हापूच्या अस्पृश्य मानलेल्या म्हणजे   महार, मांग, ढोर, चांभार वगैरे जातींच्या लोकांस पसंत असून त्यांची संमती आहे.” हा ठराव चोख नरसिंग महार यांनी मांडला व सखाराम राणेजी मांग यांनी त्यास अनुमोदन दिले. पुष्टी देणा-यांत चांभार व अन्य जातींचे लोकही होते. या सभेबद्दलची माहिती गणपत कृष्णाजी कदम यांनी पत्र लिहून सुबोधपत्रिकेतून प्रसिद्ध केली.७

महार जातीचे पुढारी श्री. शिवराम जानबा कांबले यांनीही या प्रश्नामध्ये गंभीरपणे लक्ष घातले. जेजुरी येथे खंडोबाच्या देवळात दरवर्षी जत्रेच्या वेळी मुरळी सोडण्यात येत असत. ह्या प्रथेविरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठी कांबळे यांनी १९०९ साली जेजुरी येथे महार लोकांची एक मोठी परिषद भरवून लोकांनी आपल्या मुरळ्या करू नयेत आणि जे लोक मुरळ्यांबरोबर लग्न करण्यास प्रवृत्त होतील त्यांना जातीकडून अडथळा होऊ नये असा सर्व गावच्या महारांकडून ठराव पास केला. मुरळी प्रथेविरुद्ध जे लोकमत जागृत होत होते, त्याचा परिणाम जेजुरी येथील खंडोबाच्या यात्रेच्या वेळी पास केला. वर्षीच दिसून आला. त्या वर्षी एकही मुरळी सोडण्यात आली नाही.८ मात्र अशी प्रथा बंद करण्याच्या सुधारणेला निरपवादपणे सार्वत्रिक मान्यता मिळणे ही गोष्टही कठीणच होती. शिवबाई या मुरळीचे लग्न गणतपराव गायकवाड यांच्याशी लावण्यात आल्याने येसूबीन काशीराम बटलर महार गोसावी हा गृहस्थ संतप्त झाला. गायकवाडांच्या घरी तो गेला. शिवुबाईला ओढून त्याने रस्त्यावर आणले व गायकवाड बायकोला सोडविण्यास आले असता त्यांनाही मारहाण केली. येसूबीन काशीरामवर गुन्हा शाबीत होऊन खडकी कँटोंबन्मेंट मॅजिस्ट्रटने त्याला दीड महिना सक्तमजुरीची शिक्षा दिली ही गोष्ट अलाहिदा.९

पारंपरिक रूढीच्या विरोधात केलेल्या सुधारणांविरुद्ध येसबीन काशीरामसारखे केवळ अस्पृश्यवर्गातच पुरुष होते असे नव्हे. शिंदे यांनी सुरू केलेल्या अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीस सुशिक्षितवर्गातून व विशेषतः ब्राह्मणवर्गातून पाठिंबा मिळत असला तरी अस्पृश्यवर्गाबद्दल पारंपारिक तुच्छतेची भावना टिकवून धरणारे प्रतिगामी वृत्तीचे लोक समाजामध्ये होते. सातारा येथे निराश्रितांच्या उन्नतीसंबंधात रा. सीतारामपंत जव्हेरे यांनी कळकळीने कार्य सुरू केले होते. अस्पृश्यवर्गीयांच्या उन्नतीचा विचार करण्यासाठी नोव्हेंबर १९०९ मध्ये भरलेल्या एका सभेत लो. टिळकांचे सहकारी, सुप्रसिद्ध पुढारी श्री. दादासाहेब करंदीकर यांनी भाषण केले. त्यांच्या भाषणातून ब्राह्मण्याबद्दलचा अहंकार व अस्पृश्यवर्गीयांबद्दलचा तुच्छताभाव तीव्रपणे प्रकट होत होता. ते म्हणाले, “आम्ही जातीने ब्राह्मण, आम्ही श्रेष्ठ, तेव्हा आम्ही ब्राह्मण तुम्हाला (निराश्रितांना) मिठ्या मारू लागू असे काही होणे नाही. तुम्हाला शिकविणे, तुमच्या उन्नतीचा खल करणे हे ठीक आहे. आणखी असे की, रा. जव्हेरे हे बोलूनचालून पडले ब्राह्मणेतर. त्यांची जात सोनार आहे, हे तुम्हाला माहीत नसल्यास सांगून ठेवतो. त्यांच्यासारख्यांनी तुमच्या संबंधाने स्पर्शास्पर्शाचा भेद राखला नाही, तर त्यांची गोष्ट निराळी व आम्हा ब्राह्मणांची गोष्ट निराळी.”१०

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीविषयक चळवळीसंबंधी धूर्तपणाने गैरसमज होईल अशा प्रकारची कृतीही काही परंपरानिष्ठ मंडळी करीत होती असे दिसते. १९१० साली खुद्द पुणे शहरातच अस्पृश्यतानिवारणकार्याचा पुष्कळ बोलबाला होऊ लागला होता. १९०५ सालीच विठ्ठल रामजी शिंदे यांच्या रीतसर शाखा पुण्यास स्थापन झाली व श्री. ए. के. मुदलियार ह्यांच्या कळकळीच्या प्रयत्नामुळे पुण्यातील कामाला जोराची चालना मिळाली. १९०९ साली श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मिशनचा बक्षीस समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. प्रो. धोंडो केशव कर्वे, प्रो. वा. ब. पटवर्धन, रँ. र. पु. परांजपे वगैरेंसारखा प्रतिष्ठित मंडळींनी अस्पृश्यतानिवारण चळवळीला जोरदार व सक्रिय पाठिंबा देण्यास सुरुवात केली. अशा त-हेने अस्पृश्यतानिवारणकार्याचा प्रभाव पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात पडला होता. त्याची दखल न घेणे हे परंपरानिष्ठांनाही अशक्य होऊन बसले. परंतु मनातून ही चळवळ नापसंत असलेले लोक ह्या चळवळीबद्दल समाजमनाचा प्रतिकूल ग्रह व्हावा अशाप्रकारे धूर्तपणाचे वर्तन करीत होते, असे दिसते. ज्ञानप्रकाशने लिहिलेल्या स्फुटामध्ये वक्तृत्वोत्तेजक सभेने ह्या संबंधात जो एक विषय दिला आहे, त्याचा समाचार घेतला आहे. स्फुटात म्हटलेले आहे की, “यंदाच्या पुण्याच्या वक्तृत्वोत्तेजक सभेमध्ये निराश्रितासंबंधीचा एक विषय आहे, पण त्याची योजना करताना पुणेकरांची सावधगिरी व धूर्तता प्रत्यक्षपणे अनुभवास येते. पुढली वाक्ये पहा. “निष्कृष्ट जाती असे ज्यास वक्तृत्वोत्तेजक सभेमध्ये म्हटले त्यांच्याशी एकदम व्यवहार सुरू करा असा आज कोणाचा आग्रह आहे? असे कोणी प्रतिपादिले आहे? असे जर कोणी प्रतिपादित नाही, तर लोकांना घाबरविण्यात हशील ते काय? दुसरे असे की, ठिकठिकाणच्या वरिष्ठ जातींमधील बरीच सुशिक्षित मंडळी आज ह्म चळवळीस आपली सहानुभूती दाखवीत आहेत. निदान प्रस्तुत चळवळीचे आपण हितचिंतक नाहीत असे तरी म्हणवीत नाहीत. अशी वेळी ह्म उद्धाराच्या चळवळीचा दुरुपयोग होण्याचा संभव आहे, असा एकदा लोकांचा खरा-खोटा समज झाला की, तो टाळण्याचा उपाय कोणी करत बसणार नाही. ह्या सावधगिरीने चालत्या गाड्यास अनायासे खीळ बसणार आहे आणि दुदैवाने असा जर परिणान झाला तर त्याचे सर्व श्रेय पुणेकरांस बिनबोभाट मिळणार आहे.”११

अस्पृश्यतानिवारणकार्यास सुशिक्षितवर्गाचा पुणे-सातारा यांसारख्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असला तरी ह्या चवळवळीबद्दल अहंकारबुद्धीने उघडपणे नापसंती प्रकट करणारे दादासाहेब करंदकरांसारखे प्रतिष्ठित लोकही समाजात होते, तर ह्या चळवळीबद्दल गैरसमज उत्पन्न होऊन तिच्या कार्याला खीळ बसेल अशा प्रकारची कारवाई छुपेपणाने करणारी वक्तृत्वोत्तेजक सभेतील बुद्धिमंत होते. समाधानाची गोष्ट एवढीच की, ह्या कार्यास उघडपणे वा छुपेपणाने विरोध करणा-या मंडळींची संख्या मात्र सुदैवाने अल्प प्रमाणात होती. एकंदरीत भारतीय निराश्रित मंडळीने आपल्या कार्याला आरंभ केल्यापासून तीन-चार वर्षांतच सांस्कृतिक वातावरण फार मोठ्या प्रमाणात ढवळून निघाले. अस्पृश्यतानिवारणासंबंधीच्या विचाराला, अस्पृश्यवर्गीयांच्यात शिक्षणप्रसार वाढविण्याच्या कार्याला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली व अस्पृश्यवर्गीयांबद्दलच्या आत्मीयतेच्या भावनेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, १६ मे १९०९.
२.    तत्रैव, २४ ऑक्टोबर १९०९.
३.    तत्रैव, १६ मे १९०९.
४.    तत्रैव, २३ मे १९०९.
५.    तत्रैव, ८ ऑगस्ट १९०९.
६.    ल. रा. पांगारकर, चरित्रचंद्र, नाशिक, १९३८, पृ. ९६.
७.    सुबोधपत्रिका, १३ जून १९०९.
८.    ज्ञानप्रकाश, ५ मे १९१०.
९.    तत्रैव.
१०.    सुबोधपत्रिका, १४ नोव्हेंबर १९०९.
११.    ज्ञानप्रकाश, २७ एप्रिल १९१०.

मिशनच्या स्थापनेचा संकल्प

विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) हि संस्था अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यतानिवारणाचे आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची उन्नती करण्याचे कार्य करण्यासाठी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी स्थापन केली. या संस्थेची स्थापना ही केवळ अस्पृश्यवर्गाच्या दृष्टीनेच नव्हे तर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची घटना होती. ही संस्था स्थापन करण्याच्या दृष्टीने शिंदे यांची पूर्वतयारी कसकशी होत गेली व अखेर त्यांच्या ठिकाणी ही प्रेरणा कशी निर्माण झाली ते पाहू.

घरच्या उदारमतवादी वातावरणाचे संस्कार तर विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर बालपणीच झाले होते. मॅट्रिकच्या वर्गात आणि कॉलेजमध्ये गेल्यावर ह्या संस्कारांना बुद्धीवादी विचाराची जोड मिळाली. परंतु विठ्ठल रामजी हे केवळ विचाराच्या पातळीवर थांबणारे व्यक्तिमत्त्व नव्हते. विचार आचरणात आणण्याचा सच्चेपणा आणि धडाडी त्यांच्या ठिकाणी होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या सुधारणेची पहिली कृती त्यांच्याकडून १८९३ मध्ये घडली. विठ्ठलराव फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रीव्हियसच्या वर्गात शिकत असताना मे महिन्याच्या सुटीत जमखंडीला आले. त्या वेळी त्यांना एक अस्पृश्य जातीची पाच-सात वर्षांची मुलगी देवाला मुरळी म्हणून वाहिलेली आढळली. मुरळी म्हणून तिचे आयुष्य नासले जाऊ नये, तिला माणुसकीचे जिणे जगता यावे यासाठी त्यांनी कळकळीचे प्रयत्न करावयाचे ठरविले. त्यांनी तिला शाळेत घालण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळी अस्पृश्य मुलीस जमखंडीसारख्या संस्थानातील शाळेत प्रवेश मिळणे शक्य नव्हते. म्हणून ते तिला आपल्या घरीच शिकवीत असत. विठ्ठलरावांच्या आईनेही त्या मुलीला प्रेमळपणे वागविले. नंतर ही मुलगी जमखंडी येथील अस्पृश्य मुलींच्या शाळेत शिक्षिका झाली.१ अस्पृश्यवर्गीयांबद्दल शिंदे यांनी पहिले कार्य केले ते हे.

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबाबत आपण काहीएक कार्य करावे ही जाणीव त्यांच्या मनात उद्भूत झाली होती. बारामतीचे रा. कळसकर यांची आणि विठ्ठलरावांची भेट झाली, याचा वृत्तान्त त्यांनी २२ मे १८९८ या तारखेस रोजनिशीमध्ये लिहिला आहे. ह्या नोंदीवरून महार, मांग या अंत्यज समजल्या जाणा-या जातींबद्दल त्यांना वाटणारी कळकळ किती उत्कट स्वरूपाची होती व या लोकांच्या उन्नतीसाठी आपण काहीएक करावयास पाहिजे याबद्दलची जाणीव कशी तीव्र स्वरूपाची होती याची कल्पना येऊ शकते.२

इंग्लंडमधील दोन वर्षांच्या वास्तव्यात युनिटेरियन धर्ममताच्या मंडळींनी चालविलेल्या डोमेस्टिक मिशनसारख्या संस्था ह्या लंडन, मँचेस्टर वगैरे औद्योगिक शहरात दीन, दुबळे अपंग, बाल आणि वृद्ध इत्यादिकांसाठी परोपकराची कामे करतात व दीन-दुबळ्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतात ह्याचे त्यांनी जवळून निरीक्षण केले होते. अशा प्रकारची मिशन चालविणारी मंडळी ही कामे जीव ओतून समर्पणशील वृत्तीने करतात म्हणूनच ह्या प्रकारच्या मिशनची कामे सातत्याने व सफळपणाने चालू शकतात हेही त्यांच्या अनुभवास आले होते. दीन-दुबळ्यांची सेवा करणे हे धर्मकार्यच आहे, अशी ह्या मंडळींची धारणा ह्या कामाच्या मुळाशी होती.

इंग्लंडमध्ये बघितलेल्या मिशनचा विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला.३ अशा प्रकारच्या कामाची गरज सगळ्यात अधिक कुणाला असेल तर ती अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाला असेच त्यांच्या डोळ्यांसमोर आले असणार. शिंदे १९०१च्या डिसेंबरमध्ये नाताळची सुटी लंडनमध्ये घालविण्यासाठी गेले होते. त्या वेळी २२ तारखेस पोर्टलंड स्ट्रीटमधील युनिटेरियन देवळात रेव्ह. पेरिसचे आफ्रिकेतील लढाईसंबंधी जोरदार प्रतिकूल मत प्रकट करणारे व्याख्यान ऐकले होते. रेव्ह. पेरिसची भूमिका त्यांच्या मनाला एकदम पटली. व्याख्यानात त्यांनी म्हटले होते, “धर्म जर व्यवहारात येत नसेल, अगर कोणताही नीतीचा अथवा न्यायाचा व्यवहार धर्मात गणला जात नसेल तर मी आजच प्रचारकपदाचा राजीनामा देईन.”४

विठ्ठल रामजी शिंदे हिंदुस्थानात परत आले ते तेथील मिशनच्या कामाचे निरीक्षण करून. लोकोपयोगी काम कृतज्ञतेची भावना आणि धर्मकार्य यांची एकरूपताही त्यांच्या मनाला पटली होती. हिंदुस्थानात परत आल्यानंतर बडोद्यास गेले असता अस्पृश्यवर्गाच्या शाळांची तपासणी त्यांनी केली होती. श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी चालविलेले हे कार्य किती उच्च दर्जाचे आहे हे त्यांच्या मनाला भावलेच. मात्र महाराजांच्या या उदात्त कार्याला रूढीमुळे पडलेली मर्यादाही त्यांच्या ध्यानात आली. ही मुले मराठी पाचवी किंवा इंग्रजी दुसरी-तिसरीनंतर शाळा सोडून देतात. कारण त्यांनी परिश्रमपूर्वक विद्या संपादन केली तरी त्यांना तिचे फळ पुढे मिळण्याची कोणतीच सोय असत नाही. “हिंदू समाज त्यांना आपल्यातील एक म्हणून स्वीकारीत नाही. नोकरीच्या बाबतीत इतरांबरोबर समान संधी देत नाहीत म्हणून महाराजांची राजसत्ता आणि अमर्याद सहानुभूतीचा ओघ असूनदेखील हिंदू समाजाच्या सहानुभूतीच्या अभावी ह्या शाळांची फारशी प्रगती होऊ शकत नाही,”५ असा आपला अभिप्राय त्यांनी कथन केला.

बडोत्यात सयाजीरावमहाराजांनी चालविलेले अस्पृश्यांच्या शिक्षणाचे हे कार्य पाहून विठ्ठल रामजी शिंदे प्रभावित झाले. ह्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याची गरज आहे हे त्यांना तीव्रपणाने जाणवले. येथील शाळांत शिकणारी मुले भविष्यकालीन संधीच्या अभावी वैफल्याने शिक्षण अर्ध्यावरच सोडून देतात व अशोभनीय असा पारंपरिक धंदा करण्याकडे प्रवृत्ती न राहिल्याने ते आळशीपणा जास्त प्रतिष्ठेचा मानू लागतात असे त्यांच्या पाहण्यात आले. ह्याच वेळी त्यांनी आपल्या मनामध्ये अशी खूणगाठ बांधली असेल की, ह्या मुलांना केवळ शालेय शिक्षण देणे पुरेस ठरणार नाही. जोडीला औद्योगिक शिक्षण देण्याचीही गरज आहे.

ह्या सा-या निरीक्षणामुळे, अनुभवामुळे व अस्पृश्य मानलेल्या वर्गाबद्दल त्यांच्या ठिकाणी असणा-या आंतरिक कळकळीमुळे ह्या लोकांच्या सुधारणेसाठी आपण काहीएक करावे अशी प्रबळ ऊर्मी शिंदे यांच्या मनामध्ये निर्माण झाली. ह्याच सुमाराला म्हणजे १९०३च्या अखेरीस नागपूरजवळील मोहपा या गावचे महार तरुण श्री. किसन फागुजी बनसोडे हे त्यांच्या सहवासात आले. एका मराठा तरुणाच्या प्रेरणेने त्यांनी मोहपा येथे सोमवंशीय हितचिंतक मंडळी ही संस्था स्थापन केली.६ तेव्हापासून व्याख्याने, चर्चा आणि पंधरवड्यातून धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आणि भजन करण्यासाठी होणा-या बैठका अशा प्रकारच्या प्रयत्नातून या संस्थेने स्वोद्धाराचे काम चालविले आहे. मोहपा येथील अंत्यज लोकांनी स्वोद्धाराच्या प्रेरणेने स्थापन केलेली ही संस्था एकत्रितपणे कार्यरत होती. ह्या संस्थेचे सेक्रेटरी किसन फागुजी बनसोडे यांचा पोस्ट मिशनच्या द्वारा मुंबई प्रार्थनासमाजाशी संबंध आला होता. प्रार्थनासमाजाच्या वार्षिकोत्सवाला त्यांना प्रतिनिधी म्हणूनही निमंत्रित केले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी २४ डिसेंबर १९०५ रोजी सुबोधपत्रिकेमध्ये लिहिलेल्या लेखात एका मराठा सद्गृहस्थाच्या प्रेरणेने मोहपा येथील ही संस्था सुरू झाल्याचे सेक्रेटरीकडून कळते असे लिहिलेले आहे. हे मराठा गृहस्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द विठ्ठल रामजी शिंदे हेच असावेत. प्रेरणा देणारे गृहस्थ त्यांच्याशिवाय अन्य कोणी असते तर मात्र शिंदे यांनी त्या व्यक्तीचे नाव यथायोग्य श्रेय देण्याच्या हेतूने निश्चित दिले असते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये पाहता हे मत मांडावेसे वाटते.

धर्मकार्य आणि अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे कार्य ह्यांच्यामध्ये शिंदे यांनी एकरूपता मानली होती. प्रार्थनासमाजाच्या कार्याचा दौरा करीत असताना धर्मप्रचाराच्या जोडीने गोरगरिबांसाठी काय करता येईल व अस्पृश्यवर्गासाठी काय करता येईल याबद्दल त्यांचा विचार व प्रयत्न सतत चालू असत. १९०५ सालच्या प्रारंभी पुण्यात प्रार्थनासमाजाचे काम करीत असताना त्यांनी मीठगंज पेठेत अस्पृश्यांसाठी रामनवमीच्या दिवशी एक शाळा उघडली. पुढील काळात धर्मप्रचार कार्यासाठी केलेल्या दौ-यातही अस्पृश्यवर्गासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसतात.

ज्या काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनात अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी व अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्यासंबंधी कळकळीचे विचार होत होते व त्या दृष्टीने त्यांच्याकडून काहीएक प्रयत्न होण्यास सुरुवात झाली होती त्या काळात जातिभेदाचे आणि उच्चनीचपणाचे कडक निर्बंध समाजातील सगळ्याच थरांमध्ये पाळले जात असत. जातिभेदविषयक हे निर्बंध केवळ खेडवळ वा अशिक्षित लोकांतच पाळले जात असत असे नव्हे, तर इंग्रजी शिक्षण घेतलेले, राष्ट्रकार्य करावयास प्रवृत्त झालेले राष्ट्रसभेतील ब्राह्मण पुढारीही हे निर्बंध काटेकोरपणाने पाळावेत याबद्दल दक्ष असत. “राष्ट्रसभेच्या अधिवेशनात सहभागी होणारे प्रतिनिधी आपल्याबरोबर खाण्यापिण्याचे जिन्नस घेऊन येत वा स्वतःचा वेगळा स्वयंपाक करीत आणि आपल्या सहप्रतिनिधींची अशुभ दृष्ट लागू नये म्हणून दरवाजा लावून जेवण उरकीत.”७ काही सधन मंडळी तर आपल्यासाठी ब्राह्मण स्वयंपाक्याची व्यवस्था केली जावी, इतकीच मागणी करून थांबत नसत, तर स्वयंपाकी विवक्षित उपजातीचा असला पाहिजे असाही आग्रह धरीत. अलाहाबाद काँग्रेसच्या आधी ११ एप्रिल १९०८ रोजी आर. सप्रू यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना लिहिले आहे, "आपण फार तर ब्राह्मण स्वयंपाकी पुरविण्याची व्यवस्था करावी, पण एखाद्या विवक्षित उपजातीचा ब्राह्मण स्वयंपाकी हवा, असा ज्यांचा आग्रह असेल त्यांनी आपल्याबरोबर स्वतःचा स्वयंपाकी आणावा असे आपण ठरविले तर बरे होईल.”८ सप्रू यांनी गोखल्यांना केलेल्या या सूचनेत सुधारणेचा टप्पासुद्धा किती मर्यादित होता याची कल्पना येऊ शकेल. अशा या काळात सवर्णातील जातिभेद ओलांडण्याचा प्रश्न नव्हे तर हजारो वर्षांपासून ज्या जातीच्या लोकांना अस्पृश्य मानण्याचा निर्बंध शेकडो वर्षांपासून चालत आलेला होता ते मोडून त्यांच्याशी केवळ स्पर्शाचा व्यवहार नव्हे तर त्यांच्यासमवेत भोजनादिक व्यवहार करणे केवढे धाडसाचे म्हणावे लागेल. ह्या जातीच्या सुधारणेसाठी शाळा सुरू करणे ह्यासारखे उपक्रम तर त्यांनी सुरू केले होतेच. पण व्यक्तिगत पातळीवर अस्पृश्यता न पाळता ह्या मंडळींशी भोजनादिक व्यवहार स्वतःच्या घरामध्ये अत्यंत स्वाभाविकपणे सुरू केला होता. बडोद्याचे जागृतीकार भ. ब. पाळेकर यांनी लिहिले आहे, “१९०५ साली प्रसिद्ध अस्पृश्योद्धारक विठ्ठल रामजी शिंदे त्या वेळी प्रार्थनासमाजाच्या राममोहन आश्रमात राहत होते. त्यांचा माझा परिचय झाला. एके वेळी त्यांचेकडे नागपूरचे अस्पृश्य समाजातील मुख्य कार्यकर्ते रा. किसन फागुजी बनसोडे, गणेश आकाजी गवई वगैरे मंडळी जेवावयास होती. श्रीयुत शिंदे यांनी मला व माझ्या पत्नीलाही जेवणाचे आमंत्रण दिले. १९०६ सालची ही गोष्ट. माझ्या पत्नीला इतक्या जुन्या काळी अस्पृश्य जातीच्या पंक्तीला जेवण्यास आपण अधर्माचरण करीत आहोत असे वाटले नाही. खुद्द शिंदे यांनाही आम्हा दोघांविषयी आदर वाटला.”९ राष्ट्रसभेतील उच्चवर्णीय प्रतिनिधींपेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची वृत्ती आणि आचरण किती पुढारलेले होते याची कल्पना ह्या प्रसंगावरून येऊ शकते.

राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनाच्या वेळी भरविल्या जावयाच्या धर्मपरिषदेच्या कामानिमित्त विठ्ठल रामजी शिंदे यांचा १९०३ डिसेंबरपासून भारताच्या ह्या ना त्या प्रांतात सदैव प्रवास चाललेलाच होता. भारताच्या विविध प्रांतांमध्ये अस्पृश्यता किती काटेकोरपणाने पाळली जाते व अस्पृश्य मानलेल्या या लोकांवर किती भयंकर अन्याय केला जातो याचे विदारक चित्र त्यांना पाहावयाला व ऐकावयाला मिळत होते. जुन्या मलबार प्रांतात अस्पृश्यवर्गीयांना साक्षात पशूचे अथवा गुलामाचे जिणे जगावे लागत असे हे शिंदे यांनी पाहिले होते. तेथील शेतावर प्रत्यक्ष देह झिजवून कष्ट करणारे चेरुमा जातीचे लोक हे वंशपरंपरेने त्या जमिनीवरच झोपड्या बांधून राहत असत. एखाद्या जमिनीची विक्री झाली म्हणजे जमिनीवरील झाडे, माती जशी नवीन मालकाच्या ताब्यात कायदेशीरपणे जात असे त्याचप्रमाणे ह्या चेरुमांचीही मालकी नवीन शेतमालकामकडे जात असे. शेतावरची ही कुळे जनावराप्रमाणेच इतरांना भाड्यानेसुद्धा दिली जात असत. एवढेच नव्हे तर अशा गुलामांची रीतसर खरेदी विक्री होत असे व यासंबंधीचे खटलेही कोर्टात जात असत. कर्नल अल्कॉट यांनी आपल्या पुअर पारिया ह्या पुस्तकात २२ मे १९००चा एक कर्जरोख्याचा उतारा दिलेला आहे. ह्या कर्जरोख्यात कुटुंबकर्ता, त्याची बायको व मुले कर्जापोटी स्वतःला गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढीत असे नमूद केल्याचे पाहावयास मिळते.१० धर्मांतर केल्यानेही ह्या लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला नव्हता. ते पूर्वीच्याच हीन दशेत होते असे त्यांना दिसून आले. त्रिचनापल्ली या शहरात एक भयंकर दृश्य त्यांना दिसले. ते पूर्वीच्याच हीन दशेत होते असे त्यांना दिसून आले. त्रिचनापल्ली या शहरात एक भयंकर दृश्य त्यांना दिसले. एके दिवशी ते मोठ्या रस्त्याने चालले असताना समोरून म्युनिसिपालटीचा अवजड केराचा छकडा रखडत येताना दिसला. त्यास एकीकडे एक म्हातारा रेडा जुंपला होता व दुस-या बाजूस एका तरुण मजुरानेच आपली मान लावली होती. मोठ्या करुणेने शिंदे यांनी त्याची जात विचारली तेव्हा त्याने मोठ्या आढ्यतेने आपण रोमन कॅथॉलिक(ख्रिस्ती) असे सांगितले. त्यांनी अत्यंत सहानुभूतीने त्याची पूर्वाश्रमीची जात विचारली तेव्हा त्याने पारिया असे सांगितले. केरळ अथवा मलबार प्रांतात धर्मांतरित पारियांची अवस्था साक्षात पशूचीच असल्याचे त्यांना दिसून आले.११

काठेवाडातील आगगाडीमध्ये धेडांना डबा राखून ठेवीत असत. त्यांना इतरांच्या डब्यात प्रवेश करता येत नसे हे शिंदे यांनी स्वतः पाहिले होते.

गुजराथ येथील नवसारी प्रांतातील जंगलामध्ये असलेल्या सोनगड या गावी विठ्ठल रामजी शिंदे १९०५ साली गेले होते. ढाणके या जंगली जातीतील मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी वसतिगृहे श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी स्थापन केली होती. ह्या वसतिगृहाचे सुपरिटेंडेंट फत्तेखाँ नावाचे मुसलमान गृहस्थ प्रार्थनासमाजीय होते. त्यांनी ह्या लोकांबाबत एक मनोरंजक हकिकत सांगितली. श्रीमंत सयाजीरावमहाराज हे ह्या लोकांची परिस्थिती स्वतः बघण्यासाठी जंगली प्रदेशात आले असता तेथे त्यांना कोणीच माणसे दिसेनात. हे गूढ काय आहे याचा तपास केल्यावर पुरुष व बायकामुले ही सर्व झाडावर उंच चढून बसलेली दिसली. महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला पाहून या लोकांची सुधारणा अवश्य केली पाहिजे असा महाराजांनी निश्चय केला. मानवी संस्कृतीपासून कितीतरी योजने अशा प्रकारचे लोक दूर आहेत हे या हकिकतीवरून शिंदे यांना जाणवले.

हिंदुस्थानच्या विविध प्रांतांत अस्पृश्यवर्गाची होणारी दुर्दशा पाहून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मनाची तळमळ वाढत चालली होती. ह्या वर्गातील लोकांची स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी त्यांच्या मनाला ओढ लागून राहिली. मनाच्या या अवस्थेत त्यांच्या जीवितकार्याची दिशा निश्चित करणारा एक प्रसंग घडला. २८ ऑक्टोबर १९०५च्या अमावस्येच्या रात्री ते अहमदनगरच्या मुक्कामी असताना भिंगार गावची अस्पृश्य मंडळी त्यांना भेटावयास आली व सभेला येण्याबद्दल त्यांना विनंती केली. ह्या प्रसंगी सभेला गेल्यानंतर भाषण करीत असताना आपले सगळे आयुष्य ह्या लोकांच्या उन्नतीसाठी क्षणाचाही वेळ न दवडता समर्पित करावे अशी त्यांना अंतःप्रेरणा होऊन त्यांनी त्याच रात्री तसा संकल्प केला. ह्या प्रसंगाचे वर्णन पुस्तकाच्या प्रारंभी केले आहे. भिंगारच्या ह्या सभेनंतर प्रार्थनासमाजाचे कार्य करीत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती कशी होईल ह्याचा ध्यास घेतला. ता. १७, २४ व ३१ डिसेंबर १९०५च्या सुबोधपत्रिकेच्या अंकामधून त्यांनी ‘अस्पृश्य मानलेल्या वर्गाची उन्नती’ ह्या विषयावर इंग्रजीमधून एक विस्तृत लेख लिहिला. ह्या लेखामध्ये त्यांनी अंत्यजवर्गाच्या उन्नतीच्या प्रश्नाचा आणि प्रयत्नाचा अनेक अंगांनी सखोल ऊहापोह केला. ख्रिस्ती मिशन-यांनी ह्या जातीकरिता जे कार्य केले ते बरेच आणि उदात्त स्वरूपाचे आहे हे त्यांनी मोकळेपणाने मान्य केलेले आहे. मात्र त्यांचा परकीपणा आणि धर्मांतराचा हेतू हे ह्या कामामधील दोन मोठे अडथळे ठरतात असेही नमूद केले. ब्रिटिश सरकारने मात्र कधी काळी जो अलिप्तपणाचा सोपा मार्ग अथवा सात्त्विक निष्क्रियतेचा दृष्टिकोण पत्करला होता त्यालाच ते अजूनही चिकटून आहेत व सरकारचा हा दृष्टिकोण अधिकाधिक बिघडत चालला आहे अशी परखड टीका त्यांनी केली आहे. (इतर प्रार्थनासमाजीयांपेक्षा विठ्ठल रामजी शिंदे यांची ख्रिस्ती मिशनरी व इंग्रज सरकार ह्या दोहोंबद्दलची मते काहीशी भिन्न व विरुद्ध स्वरूपाची होती. ख्रिस्ती मिशन-यांबद्दल सातत्याने सुबोधपत्रिकेमधून तीव्र स्वरूपाचा विरोधाचा सूर लावलेला आढळतो. त्यांच्या चांगल्या कामाबद्दल कधीही उल्लेख केलेला दिसून येत नाही. इंग्रज सरकारबद्दल मात्र टीकेचा सूर प्रार्थनासमाजीयांकडून काढलेला फारसा आढळत नाही. जिथे विरोध प्रकट करणे योग्य वाटते त्या ठिकाणीही प्रार्थनासमाजीय मौन बाळगतात असेच दिसते. या दोहोंबाबत शिंदे यांचा दृष्टीकोण अन्य प्रार्थनासमाजीय मंडळींपेक्षा कसा वेगळा हे अस्पृश्यांबाबतच्या प्रश्नाबाबत त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून दिसून येते.)

ह्या लोकांचे भले होण्यासाठी दोन महत्त्वाचे प्रयत्न म्हणून सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा व प्रार्थनासमाजाकडून होणा-या प्रयत्नाचा त्यांनी निर्देश केला आहे. अस्पृश्यवर्गात जी जागृतीची चिन्हे दिसू लागली होती तीही त्यांना महत्त्वाची वाटली. ख्रिस्ती मिशनरी, इंग्रज मालक आणि थोडेफार शिक्षण ज्यांच्या वाट्याला आले होते त्याचा परिणाम त्या वर्गातील तरुण पिढीवर दिसून येत होता व काही म्हातारी आणि जुन्या वळणाची माणसे तरुण पिढीशी सहकार्य करीत होती. हे लोक आपल्या नव्या आकांक्षांशी जुळणा-या जुन्या धार्मिक प्रथांशी संबंध ठेवीत होते.

ह्या लेखाच्या शेवटी त्यांनी असे प्रतिपादले की, “परोपकारी व्यक्तिंकडून ह्या निराश्रित लोकांच्या सुधारणेसाठी होणारे प्रयत्न व खुद्द त्या वर्गातील मंडळींकडून स्वोद्धारासाठी होणारे प्रयत्न हे हल्लीच्याप्रमाणे अलग चालू राहिले तर ते थकून बंद पडतील. म्हणून मुंबईची ‘सोशल रिफॉर्म असोसिएशन’ आणि ‘प्रार्थनासमाज’ ह्या दोन्ही संस्था एकत्र येऊन विचारविनिमय करून या दोन्ही प्रयत्नामध्ये सहकार्य निर्माण होईल अशी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.”१२

विठ्ठल रामजी शिंदे यांची अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीबद्दलची तळमळ लक्षात घेऊन मुंबई येथील सामाजिक मंडळाचे (बाँम्बे प्रेसिडन्सी सोशल रिफॉर्म असोसिएशनचे) अध्यक्ष सर नारायण चंदावरकर यांनी मंडळापुढे त्यांचे ह्या विषयावर व्याख्यान करविले. या व्याख्यानात त्यांनी हिंदुस्थानातील बहिष्कृतवर्गाची प्रांतवार संख्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या निवारणार्थ वरिष्ठवर्गाकडून होणारे निरनिराळे प्रयत्न आणि स्वतः त्या लोकांकडून होणारे स्वोद्धाराचे प्रयत्न ह्यांची प्रथमच व्यवस्थेशीर मांडणी केली. दक्षिण कानडामधील त्यांच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सांगितले की, तेथील पंचम जातीची स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. दिवसभर मजुरी करूनही त्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळते व दुपारची भूक त्यांना ताडी पिऊन भागवावी लागते. युरोपियन अधिकारी हे ह्या वर्गातील माणसाला नोकरीत नेमून आपल्या हाताखालच्या हिंदूंचा असंतोष कशाल ओढवून घ्या, म्हणून खालच्या दर्जाचीही नोकरी त्यांना देत नाहीत.

ह्या निबंधात त्यांनी पुढे म्हटले आहे की, “शतकानुशतके अशा प्रकारच्या दुःस्थितीत हे लोक राहात असूनही देशाचा उद्धार करायला निघालेले राजकारणी त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देताना आढळत नाहीत. अशा प्रकारे परिस्थितीचे बळी असणा-या या व्यक्ती थोड्याथोडक्या आहेत असे नव्हे. खानेसुमारीच्या आकड्यांवरून या लोकांची संख्या किती प्रचंड आहे याची कल्पना येऊ शकते. १९०१ सालच्या खानेसुमारीतील अस्पृश्य गणलेल्या चांभार, मोची, डोंब, भंगी, होलिया, मांग, महार, पारिया इत्यादी प्रमुख अस्पृश्य जातींची लोकसंख्या चार कोटी छप्पन लाख नव्याण्णव हजार दोनशे साठ एवढी आहे. हिंदुस्थानच्या एकंदर २९, ४३, ६१, ०५६ लोकसंख्येपैकी ह्या वर्गांची लोकसंख्या साडेचार कोटींपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ प्रत्येक सात हिंदुस्थानी माणसांमध्ये एक दुर्दैवी अस्पृश्य मानला गेलेला प्राणी असतो. तो सवर्ण हिंदूच्या बोलण्याइतक्या अंतराजवळ जाऊ शकत नाही. एकंदर लोकसंख्येत ब्राह्मण शेकडा ४.७ आहेत. तर अंत्यजांची संख्या १५% आहे. एकूण हिंदू १९, ०४,३३,६९६ एवढे आहेत. ह्या दुर्दैवी बहिष्कृत जातीच्या लोकसंख्येइतकी इतर कोणत्याही जातीची संख्या नाही. जगातील ह्या मोठ्या देशातील एकसप्तमांश लोकांना निष्कृष्ट ठरवून बहिष्कृत केले आहे. ह्या खंडप्राय देशात परकीय स्वा-या, राजकीय क्रांत्या, धार्मिक सुधारणा आणि सामाजिक उत्क्रांत्या होऊन गेल्या तरी विसाव्या शतकातील आजमितीला हे साडेचार कोटी लोक अस्पृश्य मानून त्यांच्यास्पर्शाने माणूस दूषित होतो असे समजावे याला काय अर्थ? इतिहासकाळापासून चालत आलेल्या ह्या राष्ट्रीय पापाची आणि राष्ट्रीय दुष्कृत्याची व्याप्ती आणि खोली किती भयंकर आहे याची आपणाला कल्पना येऊ शकते.”

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रस्तुत लेखात हिंदुस्थानातील अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची एकूण लोकसंख्या किती आहे हे दाखवून देऊन तिची व्याप्ती किती मोठी आहे हे पहिल्यांदाच मनावर ठसविले गेले. देशाचा उद्धार करायला प्रवृत्त झालेले राजकारणी ह्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत अशी परखडपणे त्यांनी तक्रार केलेली आहे. ह्या अस्पृश्यतेचा उल्लेख त्यांनी ‘राष्ट्रीय पाप’ आणि ‘राष्ट्रीय दुष्कृत्य’ अशा भेदक शब्दांनी केलेला आहे.
 
ह्या लेखामध्ये ख्रिस्ती मिशनांनी जे काम केले आहे त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला असला तरी “आपल्या वाढत्या राष्ट्रीय एकात्मतेमध्ये एक अस्वस्थता निर्माण करणारा परकीय घटक असे त्याचे वास्तव स्वरूप ध्यानात घ्यावे लागते” असेही म्हटले आहे.

अस्पृश्य मानलेल्या लोकांची सर्वांगीण उन्नती करावयाची असेल तर ती केवळ त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार केल्याने होण्याजोगी नाही, तर त्यांच्यासाठी देशी मिशनची आवश्यकता आहे असे त्यांना जाणवत होते. प्रस्तुत लेखात त्यांनी पुढे म्हटले आहे, “ह्या लोकांच्या उद्धारासाठी नुसती शिक्षणसंस्था, मग ती कितीही मोठ्या प्रमाणात असो, स्थापून चालावयाचे नाही तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे अशा मिशनची आवश्यकता आहे असो, स्थापून चालावयाचे नाही तर ज्यामध्ये जिवंत व्यक्तिगत पुढाकार आहे अशा मिशनची आवश्यकता आहे आणि दुसरी याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रांती न करता आपला धर्म, परंपरा व सामाजिक जीवन यांमध्ये क्रमशः विकास म्हणजेच उत्क्रांती घडवून आणली पाहिजे.”१३

या लेखाच्या अखेरीस शिंदे यांनी असेही मतप्रदर्शन केले की,  “असे मिशन स्थापन करण्यासाठी मुंबई शहर हे योग्य ठिकाण व मुंबई प्रार्थनासमाज ही असे मिशन चालविण्यास योग्य संस्था आहे. उदारमतवादानुसार कार्यरत असणारी दुसरी संस्था म्हणजे ‘दि प्रेसिडेन्सी सोशल रिफॉर्म असोसिएशन’ ही असून ती प्रार्थनासमाजाला उत्तम सहकार्य करू शकेल.” मिशनचा प्रारंभिक आराखडाही शिंदे यांच्या मनात याच वेळी तयार होता. त्यांनी म्हटले आहे, “दिवसाची एक माध्यमिक शाळा व खेडेगावातून आलेल्या अस्पृश्य मुलांसाठी एक छोटेखानी बोर्डींग हे अशा मिशनचे चांगले केंद्र ठरू शकेल. ह्या शाळेतील शिक्षक अशाच प्रकारे निवडले पाहिजेत व प्रशिक्षित केले पाहिजेत की, जे ह्या मुलांच्या घरी जाऊन कुटुंबांना भेटी देऊन पालकपणाचे काम करतील.” शाळेशिवायच्या इतर वेळी साधारण धर्माची उपासना करणे; नैतिक शिक्षणाच्या हेतूने व सर्वसाधारण विषयावर व्याख्याने घडविणे; जवळपासच्या वस्तीत सभा घेऊन या वर्गाची आत्मिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गोष्टी त्यांच्या मनामध्ये होत्या. अशा प्रकारचे काम प्रार्थनासमाजाने सुरू करावे यासाठी हिंदुस्थानातील परोपकारी व देशप्रेमी नागरिकांनी आर्थिक साहाय्य करावे असे आवाहन त्यांनी या लेखाच्या शेवटी केले.

अशा प्रकारे मिशन स्थापन करण्याचा संकल्प सोडून विठ्ठल रामजी शिंदे यांनी एका कठीणतम कार्याला प्रारंभ करावयाचेच ठरविले असे म्हणावे लागेल.

इंग्लंडमध्ये असताना शिंदे यांनी दीन-दुबळ्यांसाठी काम करणा-या संस्था, मिशने पाहिली होती. परंतु इंग्लंड वगैरे ख्रिस्ती धर्मीयांच्या देशातल्यापेक्षा दीन-दुबळ्यांसाठी येथे काम करणे बिकट होते. तेथील दुबळ्यांचे दैन्य आणि दुःख मुख्यतः आर्थिक परिस्थितीमुळे, भांडवलदारी अर्थव्यवस्थेतील विषमतेमुळे व शोषणामुळे निर्माण होणारे होते. मात्र दुःखितांचे दुःख दूर करावे, त्यांचे अश्रू पुसावे यासाठी ख्रिस्ती शिकवणीला कालोचित कलाटणी देणे हे ख्रिस्ती धर्माच्या मूळ मांडणीला सुसंगत ठरणारे होते. ही  ख्रिस्ती शिकवण साहाय्यभूत ठरणारी होती.

हिंदुस्थानातील स्थिती नेमकी उलट होती. येथील अस्पृश्यवर्गाच्या हीन-दीन स्थितीला, त्यांच्यावरील अस्पृश्यतारूपी बहिष्काराला येथील धर्मच-हिंदू धर्मच-कारणीभूत ठरलेला होता. येथील समाजव्यवस्था धर्माधिष्ठित होती व ती वर्णव्यवस्थेवर आधारलेली होती. वर्णव्यवस्थेला पाठबळ धर्माचे-म्हणजे स्मृतिरूप धर्माचे-व रूढीचे होते व ही धर्माधिष्ठित समाजरचना अपरिवर्तनीय आहे अशीच येथे सार्वत्रिक धारणा होती. म्हणजे अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारावयाची असेल, येथील अस्पृश्यता नष्ट करायची असेल तर धर्माने निर्माण केलेल्या ह्या जाणीवा नष्ट करणे, रूढीमुळे पाळले जाणारे आचार बंद करणे आवश्यक होते. म्हणजेच एक प्रकारे धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या भ्रामक अंधश्रद्धा व आनुषंगिक जाणिवा नष्ट करून लोकांच्या मनामध्ये पालट घडवून आणण्याचे काम येथे करावे लागणार होते आणि स्वाभाविकपणेच हे काम अत्यंत बिकट स्वरूपाचे होते. अशा कामाला हात घालायचा व आपले आयुष्य अस्पृश्यवर्गीयांच्या उन्नतीसाठी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी वाहावयाचे असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले.

संदर्भ
१.    कृ. भा. बाबर, कर्मवीर विद्यार्थी, पुणे, १९३०, पृ. २४.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. २८.
३.    दि ख्रिश्चन लाइफ, लंडन, १० मे १९१३, पृ. २६७.
४.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ८४.
५.    सुबोधपत्रिका, १७ डिसेंबर १९०५.
६.    सुबोधपत्रिका, २४ डिसेंबर १९०५.
७.    बलराम नंदा, गोपाळ कृष्णा गोखले, (अनु.) वसंत पळशीकर, विश्वकर्मा साहित्यालय, पुणे, १९८६, पृ. १३२.
८.    तत्रैव, पृ. १५२.
९.    भ. ब. पाळेकर, जागृतिकार पाळेकर, आत्मवृत्त आणि लेखसंग्रह, बडोदे, १९६१, पृ. २३. समाविष्ट, (संपा.) सदानंद मोरे, जागृतिकार पाळेकर, डॉ. बाबा आढाव, अध्यक्ष, महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, १९९६, पृ. ५५.
१०.    विठ्ठल रामजी शिंदे, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, पृ. १२९-१३२. मूळ संदर्भ, हेन्री एस्. ऑल्कॉट, दि पुअर पारिया, थिऑसॉफिकल सोसायटी, अड्यार, मद्रास, पृ. ५.
११.    तत्रैव, पृ. १३३.
१२.    व्ही. आर्. शिंदे, ‘इलेव्हेनशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस’, सुबोधपत्रिका, १७, २४ व ३१ डिसेंबर १९०५.
१३.    व्ही. आर्. शिंदे, ‘ए मिशन फॉर दि डिप्रेस्ड क्लासेसः ए प्ली’, इंडियन सोशल रिफॉर्मर, २९ जुलै १९०६. प्रस्तुत इंग्रजी लेखात शिंदे यांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या मिशनचे स्वरूप ख्रिस्ती मिशनसारखे असू नये, तर ते देशी असावे असे ठासून म्हटले आहे.
“What is wanted therefore is not merely a machinery of education however grand but a real mission i.e. an organization in which the personal element presides over and energizes the mechanism; and 2ndly, which is still more essential, a mission which is not exotic but indigenous or in other words a mission which is bent upon working an evolution but not a revolution, as Christian Missions are, in the religion, traditions and social life of these people.”
शिंदे यांच्या आत्मचरित्रपर ‘माझ्या आठवणी व अनुभव’ ह्या ग्रंथात शेवटच्या वाक्याचा आशय चुकीमुळे नेमक्या विरुद्ध स्वरूपात आला आहे तो असाः ‘अशा मिशनने ख्रिस्ती मिशन-यांप्रमाणे ह्या लोकांच्या जीवितामध्ये क्रांती व विकास घडवून आणला पाहिजे.’ (माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २१७.). वस्तुतः हे वाक्य ‘अशा मिशनने ख्रिस्ती
मिशन-यांप्रमाणे ह्या लोकांच्या जीवितामध्ये क्रांती नव्हे, तर विकास घडवून आणला पाहिजे.’ असे असावयास पाहिजे होते. शिंदे यांच्या हस्तलिखितात ते दुरुस्त स्वरूपात असेच आहे.

मिशनची स्थापना

अस्पृश्यवर्गीय लोकांची अस्पृश्यता नष्ट करावी व त्यांची स्थिती सुधारावी ह्या हेतूने एक मिशन काढून विठ्ठल रामजी शिंदे हे अस्पृश्यवर्गासाठी अशा प्रकारचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करू इच्छितात ही वार्ता प्रसृत झाली. ह्या कामाला अनुकूल अशा प्रकारचा प्रतिसाद प्रार्थनासमाजाचे उदार उपाध्यक्ष शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांच्याकडून मिळाला. १६ ऑक्टोबर १९०६ रोजी शेठ दामोदरदास ह्यांनी अशा प्रकारची मंडळी स्थापन करण्यासाठी एक हजार रुपयाची देणगी दिली. दोनच दिवसांनी दिवाळी-पाडव्याच्या शुभदिनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी कार्तिक वद्य प्रतिपदेस शिंदे ह्यांनी ह्या कामाला आरंभ करण्याचे ठरविले. सकाळी ९ वाजता मुंबई येथील एल्फिन्स्टन रोडलगतच्या मुरारजी वालजी ह्यांच्या बंगल्यात भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची पहिली शाळा उघडण्याकरिता प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष न्या. चंदावरकर ह्याप्रसंगी रा. ब. नारायण त्रिंबक वैद्य, रा. बाळकृष्ण नारायण भाजेकर वगैरे बरीच समाजाची हिंतचिंतक मंडळी समारंभास आली होती. सुबोधपत्रिकेने ह्याबद्दलची बातमी देताना असे म्हटले आहे, “अस्पृश्य मानलेल्या लोकांकरिता व इतर गरीब लोकांकरिता येथील प्रार्थनासमाजाशी निकट संबंध असलेल्या काही मंडळींनी ही शाळा स्थापन केली.” ह्या शब्दप्रयोगावरूनही शाळा प्रार्थनासमाजाच्या वतीने उघडण्यात आली नसून नव्याने स्थापन होणा-या एका वेगळ्या मंडळीच्या वतीन ही शाळा सुरू होत आहे हे सूचित होते. ह्या बातमीच्या शीर्षकामध्येही ‘नीच मानलेल्या लोकांकरिता नवीन शाळा’ असे म्हटले आहे.१

“समारंभाच्या आरंभी ईशस्तवनाचे एक पद्य म्हटल्यावर रा. ब. काशीनाथ बाळकृष्ण मराठे ह्यांनी ईश्वरप्रार्थना करून प्रसंगास अनुरूप असे उपदेशपर भाषण केले. त्यावर रा. रा. विठ्ठल शिंदे, समाजाचे धर्मप्रचारक ह्यांनी नीच मानिलेल्या जातीविषयी थोडी माहिती सांगितली. देशातील एकंदर प्रजेपैकी एकसप्तमांश प्रजा अशा वर्गातली आहे असे त्यांनी मनुष्यगणतीच्या आधारे ह्याविषयावर एक नुकताच लेख प्रसिद्ध केला आहे, त्याचा उल्लेख करून सांगितले. ह्या लोकांस आम्ही विद्या देऊन शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत पण त्यांना वरच्या पायरीस घेण्यास लोकांनी तयार झाले पाहिजे असे ते म्हणाले.” ह्या प्रसंगी रा. रा. भाजेकर व सदाशिव पांडुरंग केळकर ह्यांचीही भाषणे झाली. शेवटी न्या. चंदावरकर ह्यांनी भाषण केले. त्यात ते म्हणाले की, “ह्या लोकांस खाली ढकललेले लोक (डिप्रेस्ड क्लासेस) असे वारंवार म्हणण्यात येते, पण खरे पाहिले तर आम्ही सर्वजण अशा नीच पदास पोहोचलो आहोत, तेव्हा आम्ही उच्च व तुम्ही नीच असे कोणास म्हणावयास नको. आम्ही सर्वांनीच आपली नीच  झालेली स्थिती सुधारण्याचा यत्न केला पाहिजे.” ह्या प्रसंगी न्या. चंदावरकर ह्यांनी आपल्या भाषणात जे सूत्रवाक्य सांगितले ते फार महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, “ह्या नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वतःला वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना ह्या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंतःकरणात न शिरो आणि आम्हां सर्वांना ह्या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हामध्ये निरंतर जागृत राहो.”२

एकदा कार्याला प्रारंभ केल्यावर शिंदे ह्यांनी मिशनच्या कामाची पद्धतशीर मांडणी केली. एक मध्यवर्ती संस्था ठरवायची व तिचा हेतून आणि रचना ह्यासंबंधी आवश्यक तेवढेच नियम करावयाचे असे त्यांनी धोरण ठरविले. मातृसंस्था मुंबईत स्थापन करण्यात आली. प्राथमिक अथवा दुय्यम शिक्षणाची शाळा, उद्योगशाळा, विद्यार्थिवसतिगृहे, मोफत दवाखाना, धर्मशिक्षणाच्या आणि नीतिशिक्षणाच्या साप्ताहिक शाळा, केवळ सार्वत्रिक धर्माला अनुसरून म्हणजे जातिभेद आणि मूर्तिपूजा ह्यांना फाटा देऊन चालविण्यात येणारी उपासनालये एवढी निदान या मध्यवर्ती संस्थेची अंग असावीत, असे ठरविले. कार्याचा पुढे जसजसा अनुभव येईल त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रांतांतून भाषावार प्रांतिक शाखा आणि त्यांच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय पोटसंस्था स्थापन करण्याचा विचार ठरला. शिंदे ह्यांनी स्थानिक कार्यावर लक्ष केंद्रित करून ते काम पद्धतशीरपणे करणे ह्याला सुवर्णकार पद्धती असे म्हटले आहे व मोठ्या प्रमाणावर सर्व लोकांसाठी जाणीव उत्पन्न करण्याच्या स्वरूपाच्या कामाला मेघवृष्टीची कार्यपद्धती असे म्हटले आहे. मेघवृष्टीचे काम जाहीर व्याख्यानांद्वारे होते. प्रचाराच्या कामाची जबाबदारी स्वतः शिंदे ह्यांनी पत्करली तरी, सुवर्णकार पद्धतीच्या कामासाठी आजीव कार्यावाह मिळविणे आवश्यक होते.

मिशनच्या ह्या कामासाठी माणसे मिळविण्याचा प्रयोग शिंदे ह्यांनी स्वतःच्या घरापासूनच केला. घरच्या लोकांना घेऊन थोडेसे काम करून दाखविल्यावर आपले आध्यात्मिक घर म्हणजे प्रार्थनासमाज येथून आपल्याला माणसे मिळतील अशी त्यांची बळकट श्रद्धा होती. मिशनच्या मध्यवर्ती शाखेतील पदाधिकारी हे प्रार्थनासमाजातील पदाधिकारी होते. अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला, खजीनदार नारायणराव पंडित, सुपरिटेंडेंट डॉ. संतुजी रामजी लाड व मिशनचे जनरल सेक्रेटरी स्वतः शिंदे राहिले. कार्यवाहक म्हणून त्यांनी पनवेल येथे म्युनिसिपालटीच्या मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका असणा-या भगिनी जनाबाई ह्यांना त्यांनी बोलावून घेतले. प्रार्थनासमाजाच्या कामामध्ये उपासनेच्या वेळी भजन करणे, प्रसंगविशेषी गोरगरिबांचा समाचार घेणे वगैरे कामे त्या आधीपासून करीत होत्याच. मिशनच्या अण्णासाहेबांच्या कामात सहभागी होण्याच्या सूचनेवरून जनाबाईंनी पनवेलच्या शाळेतील मुख्याध्यापिकेच्या पदाचा राजीनामा दिला व मिशनच्या कामामध्ये त्या सामील झाल्या. अण्णासाहेबांचे आई-वडीलही आपल्या मुलांच्या पाठीमागे आले व मिशनच्या कामामध्ये शक्य होईल ती मदत त्यांना करू लागले. त्यांच्या घरोब्याचे सय्यद अब्दुल कादर हे मॅट्रिक पास झालेले तरुण मुंबई येथील इस्लामिया स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करीत होते. शिंदे ह्यांच्या प्रभावाने त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली होती. त्यांनीही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व ते मिशनचे आजीव कार्यवाह बनले. मुंबई प्रार्थनासमाजाचे दुसरे निष्ठावंत सभासद श्री. वामनराव सदाशिवराव सोहनी हे विल्सन हायस्कूलमध्ये नावाजलेले शिक्षक होते. प्रार्थनासमाजाच्या कामात व विशेषतः रात्रशाळेच्या कामात ते लक्ष घालीत असत. तेही मिशनच्या कामासाठी शिंदे ह्यांना येऊन मिळाले. ही सर्व मंडळी मिशनच्या कामाला स्वार्थत्यागपूर्वक तयार झालेली पाहून शिंदे ह्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.

मिशनचे हेतू पहिल्यापासूनच पुढीलप्रमाणे ठरविलेः १) हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, पारिया वगैरे (विशेष करून पश्चिम हिंदुस्थानातील) अस्पृश्य समजल्या जाणा-या वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, २) नोक-या मिळवून देणे, ३) सामाजिक अडचणींचे निवारण करणे, ४) सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत शील आणि नागरिकता वगैरे गुणांचा प्रसार ह्या गरीब लोकांमध्ये करणे.

ह्या वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रयत्न काहीएक प्रमाणात स्थानिक पातळीवर केले जात असत. मात्र शेवटचे तीन हेतून केवळ मिशन निघाल्यामुळेच साधणे शक्य होणार होते. मिशनचे काम उदार धर्माच्या पायावर उभारण्यात आले. त्यासाठी दर शनिवारी व्याख्याने आणि कीर्तने होत. रविवारी सकाळी धार्मिक शिक्षणाचे वर्ग आणि सायंकाळी उपासना होत. प्रारंभी हे काम स्वतः शिंदे व त्यांच्या भगिनी जनाबाईही करीत असत. सणाच्या दिवशी सामाजिक मेळे भरविण्यास त्यांनी सुरुवात केली. अस्पृश्यवर्गीय स्त्री-पुरुष, वरिष्ठवर्गातल्या स्त्री-पुरुषांमध्ये समानतेच्या नात्याने भाग घेत. पहिल्या वर्षी ९ जाहीर व्याख्याने, ४ कीर्तने, ५ पुराणवाचने असे कार्यक्रम झाले.

पहिल्या वर्षातच मिशनच्या कामाने जोरात वेग घेतला. मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणून शिंदे ह्यांनी तयार केलेला तिस-या तिमाहीचा अहवाल ९ जुलै १९०७ ह्या तारखेस प्रसिद्ध झाला. तो ‘इंडियन सोशल रिफॉर्मर’ने प्रसिद्ध केला.

मिशनच्या सुरुवातीच्या काही अहवालांमध्ये मिशनचा उद्देश सांगताना काही आकडेवारी देण्यात येत असे. पहिल्या अहवालात दिलेली आकडेवारी खालीलप्रमाणेः
हिंदुस्थानातील एकंदर लोकसंख्याः २९ कोटी ४३ लक्ष ६१ हजार ०५६ पैकी एकूण हिंदूंची संख्या २० कोटी ७१ लक्ष ४७ हजार २० पैकी अस्पृश्य मानलेल्यांची संख्या ५ कोटी ३२ लक्ष ६ हजार ६३२. हे आकडे देऊन पुढे असे म्हटले आहे की, दर ७ हिंदुस्थानी माणसामागे १ दुर्दैवी अस्पृश्यप्राणी आहे की जो बोलण्याच्या अंतराइतका जवळ येऊ शकत नाही.” मुंबई इलाख्यात अस्पृश्य मानलेल्यांची लोकसंख्या हिंदूंच्या १७ टक्क्यांइतकी आहे. मुंबई शहराची लोकसंख्या ९ लाख ८२ हजार एवढी आहे. त्यांपैकी अस्पृश्यवर्गाची लोकसंख्या ८३ हजार १४ एवढी आहे. मात्र शाळेत जाणा-या अस्पृश्य विद्यार्थ्यांची संख्या केवळ ३०० आहे. ह्या आकडेवारीवरून अस्पृश्य मानलेल्या वर्गाची स्थिती सुधारणे किती निकडीचे आहे हे ध्यानात येते, असे नमूद केले आहे. ह्या अहवालासोबत शिंदे ह्यांचा ‘मिशन काढण्याची आवश्यकता’ ह्या विषयावर इंग्रजी लेख प्रसिद्ध केला आहे.

मिशनने पुढील संस्था सुरू केल्याः १) मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशा मोफत दिवसाच्या २ शाळा(मराठी ५वी आणि ३-या वर्गापर्यंत), २) नोकरी करणा-या लोकांसाठी रात्रशाळा, ३) धर्मार्थ दवाखाना, ४) वाचनालय व ग्रंथालय, ५) मुलांसाठी तालीम, ६) महिलांसाठी शिवणवर्ग, प्रार्थना व व्याख्याने.

ह्याच अहवालामध्ये मुलांसाठी माध्यमिक शाळा, मुलींसाठी माध्यमिक शाळा, उद्योगशाळा व ग्रामीण भागांतून आलेल्या गरीब होतकरू मुलांसाठी वसतिगृहे असे नवीन उपक्रम सुरू करण्याचा मनोदय प्रकट केला.

२८ फेब्रुवारी १९०७ ह्या दिवशी परळ येथील ग्लोब मिलजवळील शाळेच्या जागेत होळीच्या निमित्ताने एक समारंभ आयोजित करण्यात आला. ह्या समारंभासाठी शेठ दामोदरदास सुखडवाला, गोकुळदास पारेख, सौ. रमाबाई भांडारकर, काशीताई नवरंगे इत्यादी स्त्री-पुरुष उपस्थित राहिली होती. ह्या प्रसंगी शिंदे ह्यांचे ‘शिमगा सणातील चांगले व वाईट प्रकार’ ह्या विषयावर उद्बोधक भाषण झाले. सायंकाळी ६ वाजता मुख्य पाहुणे सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर हे उपस्थित झाले. शिंदे ह्यांनी स्वागतपर भाषणामध्ये मिशनने केलेल्या कामाचा आढावा घेतला. मिशनमध्ये सध्या दोन पुरुष व दोन स्त्री शिक्षक असून त्यांपैकी शिक्षिका विनावेतन काम करतात अशी माहिती दिली.

फेब्रुवारी १९०७ अखेरपर्यंत दिवसाच्या शाळेत खालीलप्रमाणे विद्यार्थी येत होते.
दिवसाची शाळा : प्रारंभ १८ ऑक्टोबर १९०६
 
विद्यार्थी महार मांग चांभार इतर हिंदू एकंदर विद्यार्थी
मुलगे ७७ २३ ३७ -
मुली १८ -
एकंदर ९५ २७ ४५ १७२

डिसेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने एक रात्रशाळा सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे दर रविवारी सकाळी धार्मिक व नैतिक शिक्षण देण्यासाठी मुलांचे वर्ग भरविण्यात येत. सुमारे २५ मुले हजर असत. ही नीतिशिक्षणाची शाळा १८ ऑक्टोबर १९०६ रोजी सुरू करण्यात आली. २२ नोव्हेंबर १९०६ पासून मिशनच्या वतीने मोफत दवाखाना सुरू करण्यात आला. ४ महिन्यांच्या अवधीत महार, चांभार, इतर हिंदू, मुसलमान व ख्रिश्चनवर्गातील १०९ आजारी व्यक्तींनी औषधोपचाराचा लाभ घेतला. डॉ. संतुजी रामजी लाड हे दररोज सकाळी ठाण्याहून येऊन टार तास रोगी पाहण्याचे काम करीत असत. डॉ. लाड केवळ दवाखान्यातच काम करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत असे नव्हे, तर आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार करीत असत. डॉ. लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस. पी. नाशिककर हेही मिशनच्या दवाखान्याचे काम पाहत असत.

शेठ तुकाराम जावजी, बाबाजी सखाराम आणि कंपनी आणि मनोरंजक प्रसारक ग्रंथ मंडळ ह्यांनी पुस्तकाची मदत केल्यामुळे मिशनच्या वतीने एक ग्रंथालय जानेवारी १९०७ मध्ये उघडण्यात आले. ग्रंथालयात २३२ पुस्तके जमा झाली.

बुकबाइंडिंगचे काम दोन महार विद्यार्थी मिशनमध्ये शिकू लागले होते.

होळीच्या दिवशी होणा-या गैरप्रकाराला आळा बसावा ह्या हेतूने मिशनच्या भायखळा आणि परळ ह्या ३ शाळांच्या ठिकाणी मॅजिक लँटर्नच्या साहाय्याने दारूच्या दुष्परिणामावर व्याख्याने देण्यात आली. तीन रात्री चांदण्याच्या प्रकाशामध्ये मिशनच्या शाळांतील मुले व परिसरातील माणसे स्वदेशी खेळ खेळत होते. ह्या खेळाचे संयोजन प्रार्थनासमाजातील काही तरुणांनी केले.

जनरल सेक्रेटरी शिंदे ह्यांच्या अहवालात नमूद केले आहे की, सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर ह्यांनी मुलामुलींना पारितोषिके दिली व मिशनने चालविलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. इतर ठिकाणी व्यसनात गढून प्रचंड गोंधळ चाललेला असताना ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यसनापासून दूर राहून मुले-माणसे खेळामध्ये भाग घेत आहेत हे चित्र आपल्याला फार आशाजनक वाटले असे त्यांनी सांगितले.

ह्या समारंभानंतर सर भालचंद्र ह्यांनी पायाने फूटबॉल उडवून मैदान क्लबचे उदघाटन केले.

मिशनच्या कामाचा चहूकडे बोलबाला होऊ लागला. ह्या नवीन कार्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल मते वृत्तपत्रकार प्रसिद्ध करू लागले. ह्या काळातच अखिल भारतीय पातळीवरील अन्य संस्था सुरू होऊ लागल्या होत्या. गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली होती. धोंडोंपंत कर्वे ह्यांनी अनाथ महिलाश्रम आधीच स्थापन केले होते. अशा ह्या काळात मिशनचे काम सुरू झाले होते. ह्या सुमारास मुंबईत कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता परोपकारी कृत्ये करणारे दोन दानशूर गृहस्थ होते. एक, मलबारी नावाचे पारसी व दुसरे दयाराम गिडुमल.

एके दिवशी दयाराम गिडुमल ह्यांच्याकडून शिंदे ह्यांना आपल्याला समक्ष भेटून जावे अशाबद्दलची चिठ्ठि आली. शिंदे भेटीला गेल्याबरोबर त्यांना आपलेपणाने कवटाळून डोळ्यांत आसवे आणून विचारले की, हे अपूर्व मिशन काढण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? ह्या कामी अस्पृश्यवर्गातल्या महिलांसाठी तुम्ही काही तजवीज केली आहे काय? त्यावर शिंदे ह्यांनी स्पष्टपणे सांगितले, “ह्या हतभागी भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची स्थिती अत्यंत दुर्बल व केविलवाणी आहे. हे मी जाणून आहे. माझ्याप्रमाणेच माझ्या घरातल्या मंडळींनाही ही जाणीव असल्याने माझी त्यागी बहीण आणि पूज्य माता यांनी पाठबळ दिले आहे.”३ ही वार्ता दयारामजींच्या कानावर अगोदरच आली होती. म्हणूनच त्यांनी शिंदे ह्यांना समक्ष भेटीला बोलावून असे कळकळीचे स्वागत केले. अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी मिशनच्या मध्यवर्ती आश्रमात ‘निराश्रित सेवासदन’ ह्या नावाखाली एक स्वतंत्र शाखा काढण्याची तयारी शिंदे यांनी दाखविली. ह्या कार्यासाठी दयारामजींनी दरमहा १०० रुपयांची मदत देऊ केली आणि त्याप्रमाणे सदन निघाले. मिशनच्या तिस-या तिमाही अहवालात सेवासदन सुरू झाल्याचे वृत्त असून एका दानशूर परोपकारी गृहस्थांनी दरमहा १०० रु. ची मदत ह्या सदनासाठी देऊ केली आहे, असा उल्लेख आढळतो. दयारामजींनी आपले नाव गुप्त ठेवण्याबद्दल शिंदे ह्यांना सांगितले असले पाहिजे.

निराश्रित सेवासदनातील स्त्रीप्रचारकांना विविध प्रकारची कामे करावी लागत. अस्पृश्यवर्गीय मुलांसाठी नुसत्या शाळा काढून उपयोग नव्हता. कारण ह्या मुलांना रोजच्या रोज शाळेत जाण्याची सवय नसे व पालकांना रोजच्या रोज पाठवण्याचे महत्त्व वाटत नसे. शिक्षणाची अभिरुची लावून देण्यासाठी सदनातील स्त्रीप्रचारकांना घरोघरी जाऊन भेटी घ्याव्या लागत असत. हे काम करणा-या स्त्रिया ह्या ख्रिस्ती प्रचारक असल्या पाहिजेत असा अनेकांचा गैरसमज होऊ लागला. तो दूर करण्यासाठी या प्रचारक स्त्रियांनी भारत, भागवत, रामायण अशा हिंदू धर्मग्रंथांचे घरोघरी वाचन सुरू केले. आजा-यांची शुश्रुषा करण्यासाठी आणि बाळंतपणात मदत देण्यासाठी सदनातील स्त्रियांना शिक्षण देऊन तयार करण्यात आले. श्रीमती वेणूबाई, द्वराकाबाई आणि श्रीमती कल्याणीबाई सय्यद ह्या तीन स्त्रिया सदनात राहून ही कामे उत्तम रीतीने करीत असत. सदनातील घरगुती कामे शिंदे यांच्या भगिनी जनाबाई पार पाडीत. बाहेरच्या कामाचा सर्व बोजा सय्यद अब्दुल कादर यांनी उचललेला होता. ह्या कामासाठी निराश्रित महिला समाज ही निराळी संस्थाच जनाबाईंनी काढली. या महिलासमाजाचा पहिला वार्षिकोत्सव सौ. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. ह्यावेळी सौ. कल्याणीबाई सय्यद यांनी वाचलेल्या रिपोर्टात पुढील माहिती आहेः “घरातील वर्ग सुमारे ६ महिने चालले. गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूती करण्यात आली. पुष्कळांना दवाखान्याचा लाभ मिळाला. घरोघरी भेटी देऊन समाचार घेण्याचे काम वर्षभर चालले होते. पोलीस कमिशनरांकडून बेवारशी मुले व बायका मिळून पाच व्यक्ती आल्या, त्यांची निगा ठेवण्यात आली.”४

हया तिस-या तिमाही अहवालात विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा उल्लेख असून सुरू केलेली कामे जोरात चालू असल्याचे नमूद केले आहे. मिशनमध्ये विल्सन हायस्कूलमधील नव्याने राहण्यास आलेल्या गणेश आकाजी गवई ह्या महार विद्यार्थ्याचा निर्देश केला असून सेवासदनामध्ये त्याच्या राहण्याजेवण्याची मोफत सोय करण्यात आली असून होणा-या मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेला बसणार असल्याची माहिती दिली आहे. (सदर विद्यार्थी म्हणजेच पुढे प्रसिद्धीस आलेले मध्यप्रदेश कायदेकौन्सिलचे सदस्य झालेले प्रख्यात महार पुढारी होत.)

अस्पृश्य लोकांकरवीच स्वतःच्या उद्धारार्थ धार्मिक व सामाजिक सुधारणा करवून घेण्याच्या उद्देशाने पुरुषांसाठी सोमवंशीय मित्रसमाज ही संस्था २४ मार्च १९०७ रोजी भायखळा येथे इंप्रूव्हमेंट चाळीमध्ये स्थापन करण्यात आली. प्रारंभी १४ नियमित सदस्य पटावर नोंदले गेले. ही मंडळी दर शनिवारी रात्री मदनपु-यातील दगडी चाळीत भाड्याने घेतलेल्या एका खोलीत आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एकत्र करीत. प्रारंभी भोजन झाल्यानंतर एखाद्या उपयुक्त विषयावर भाषण होई. मिशनचे प्रतिनिधी अधूनमधून तेथे जात असत. देवनार येथील म्युनिसिपल कॉलनीत राणा-या ५०० अंत्यजवर्गीयांसाठी एक दिवसाची व एक रात्रीची शाळा काढण्याची मिशनला गरज वाटू लागली. काही विशेष प्रसंगी ही मंडळी परळ येथील शाळेमध्ये येत असत.

मिशनचा वार्षिक खर्च सुमारे ३ हजार रुपयांइतका झाला. मिशनचे वाढते काम लक्षात घेता श्रीमंत, परोपकारी देशभक्तांनी त्याचप्रमाणे निराश्रित समाजाच्या मित्रवर्गांनी मिशनने चालविलेल्या उदात्त कामासाठी मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन शिंदे ह्यांनी अहवालाच्या अखेरीस केले आहे. इंडियन सोशल रिफॉर्मरने हा संपूर्ण अहवाल छापून धनिकवर्गाने व नागरिकांनी मदत करण्याची आवश्यकता कशी आहे हे अखेरीस नमूद केले.५

स्थापनेपासूनच्या तीन वर्षांच्या अवधीत मिशनने कामाचा मोठाच विस्तार केला.

मिशनचा त्रैवार्षिक अहवाल १७ ऑक्टोबर १९०९ रोजी शिंदे ह्यांनी प्रसिद्ध केला असून त्यामध्ये तीन वर्षांतील कामाचा आढावा घेतला आहे. मुंबईतील मध्यवर्ती शाखेच्या संस्था पुढीलप्रमाणेः

१)    परळ येथील शाळा : मराठी ४थी इयत्ता व इंग्रजी ४थी इयत्ता, शिक्षक ७, पटावरील मुलांची संख्या २७५, पुस्तके बांधणे आणि शिवणकामाचा वर्ग.
२)    देवनार येथील प्राथमिक शाळा : मराठी ४थी इयत्ता, २ शिक्षक, ४७ मुले.
३)    मदनपुरा प्राथमिक शाळा : मराठी ५वी इयत्ता, ४ शिक्षक, १५० विद्यार्थी.
४)    कामाठीपुरा गुजराथी शाळा : ही भंगी लोकांसाठी मुंबई येथील पहिली शाळा होय. शिक्षक मिळणे दुरापास्त होते. तरी एक शिक्षक आणि ५१ विद्यार्थी.
५)    रविवारच्या शाळा : एक परळ येथे व दुसरी मदनपुरा येथे. धर्मशिक्षण आणि नीतिशिक्षण दर रविवारी दिले जाते.
६)    भजनसमाज : एक परळ येथे व दुसरा मदनपुरा येथे. पोक्त मंडळी भजनासाठी आणि उपदेशासाठी जमत आणि उपासना चालवीत.
७)    व्याख्याने : वेळोवेळी उपयुक्त विषयांवर विविध ठिकाणी व्याख्याने होत.
८)    परस्परसहाय्यक चामड्याचा कारखाना : शशिभूषण रथ व दुस-या एका जर्मन तज्ज्ञाच्या नेतृत्वाखाली नवीन त-हेचे बूट करण्याचा कारखाना काढला. सुरुवातीचे भांडवल २ हजार रुपये.
९)    निराश्रित सेवासदन : दोन तरुण गृहस्थ आणि ३ स्त्रिया. ह्या ३ स्त्रिया गरीब लोकांच्या घरी समाचाराला जात. आजा-यांची शुश्रुषा करीत. निराश्रितांना सदनात आणीत व शिवणाचा वर्ग चालवीत. दोन तरुण गृहस्थ सर्व संस्थांची देखरेख करीत. परळ शाखेतील सुमारे १२ मुलांची निवासाची व्यवस्था व चौघांची जेवण्याची व्यवस्था सदनातील कार्यकर्त्यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. प्युरिटी सर्व्हंट ह्या नावाचे मिशनचे मुखपत्र दर महिन्याच्या १५ तारखेला प्रसिद्ध होत असे. त्यामध्ये मिशनची सर्व बातमी प्रसिद्ध होई व मद्यपाननिषेध व इतर सामाजिक विषयांवर लेख येत. मिशनच्या विविध शाखांची त्याचप्रमाणे भारतातील निराश्रितवर्गासंबंधी माहिती येत असे. त्याचे संपादक श्री. वा. स. सोहोनी हे होत.
सेक्रेटरी : वा. स. सोहोनी

मिशनच्या अन्य शाखा
१)    पुणे : दिवसाची एक शाळा, २) रात्रीच्या दोन शाळा, ३) भजनसमाज, ४) चर्चामंडळ. शाळांमधील पटावरील संख्या अनुक्रमे १४९, २५ आणि ३३. भजनसमाज आणि चर्चामंडळ येथील सरासरी उपस्थिती ५०. सेक्रेटरी : ए. के. मुदलियार, बी. ए. रास्ते पेठ.
२)    मनमाड : एक रात्रीची शाळा, विद्यार्थिसंख्या ४५. मद्यपान निषेध मंडळ कार्यरत. वडीलधा-यांनी दारू पिण्यास प्रवृत्त केले तरी आपण दारू घेणार नाही अशी शपथ ह्या मंडळातील सदस्यांनी घेतली होती.
३)    इगतपुरी : एक दिवसाची शाळा, ६८ मुले. दोन महार तरुणांनी सुरू करून मुंबई प्रार्थनासमाजाच्या मार्गदर्शनाखाली चालविली. रविवारचा नीतिशिक्षणाचा वर्ग व भजनसमाजही चालू आहे. सेक्रेटरी : जी. व्ही. भाटवडेकर
४)    इंदूर : एक रात्रशाळा, २० मुले व एक शिक्षक. सेक्रेटरीः आर. जी. मिटबावकर, ब्राह्मसमाज.
५)    अकोला : दोन रात्रीच्या शाळा, ७२ विद्यार्थी, एक भजनसमाज. सेक्रेटरीः एस्. सी. होसल्ली, बार-ऍट-लॉ.
६)    अमरावती : दोन रात्रीच्या शाळा, ५३ विद्यार्थी. सेक्रेटरीः जी. एन. काणे, वकील.
७)    दापोली : एक दिवसाची शाळा, ३७ विद्यार्थी. ही शाखा गरजू मुलांना स्कॉलरशिप, पुस्तके व कपडे पुरविते. सेक्रेटरीः डॉ. वा. अ. वर्टी
८)    मंगळूर : १८९७ सालापासून ब्राह्मसमाजाचे पुढारी के. रंगराव हे पारिया जातीतील लोकांची स्थिती सुधारण्यासाठी एकाकीपणे प्रयत्न करीत आहेत. एक दिवसाची शाळा, ४९ विद्यार्थी, सहा हातमागाची विणकामसंस्था, सात मुले असलेले बोर्डिंग. सर्व विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते. के. रंगराव ह्यांनी २० गरीब पारिया कुटुंबांची मंगळूरजवळच्या सुंदर टेकडीवर वसाहत वसविली आहे. ही मंगळूरची संस्था मिशनशी संलग्न केली आहे. सेक्रेटरीः के. रंगराव
९)    मद्रास : पारिय जातीच्या अस्पृश्यांसाठी दिवसाची एक शाळा, २३ विद्यार्थी व चांभार जातीच्या मुलांसाठी शाळा, विद्यार्थी २९. नीतिशिक्षणाचे वर्ग व भजनवर्ग नियमितपणे भरतात. सेक्रेटरीः व्ही. गोविंदन्.
नवीन शाखा

१०)  महाबळेश्वर : मे १९०९ मध्ये गव्हर्नरच्या बंगल्यावर लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांच्या आश्रयाखाली मिशनच्या हितचिंतकांची सभा भरली. मेजर जेम्सन हे अध्यक्ष होते. पूर्वी जमलेला ९००रु. चा फंड मिशनला देण्यात आला व ही शाखा उघडली. दोरखंड तयार करणे, वेताचे विणकाम करणे ही कामे होतात.
११)  नाशिक : १९०९ च्या सप्टेंबरमध्ये मिशनचे जनरल सेक्रेटरी शिंदे हे इगतपुरी, मनमाड ह्या ठिकाणी पाहणी करून नाशिक येथे गेल्यावर तेथे जाहीर सभा होऊन जिल्ह्याची कमिटी नेमण्यात आली. जिल्ह्याचे कलेक्टर मि. जॅक्सन ह्यांना अध्यक्ष नेमण्यात आले.
अशा प्रकारे तिस-या वर्षाच्या अखेरीस मिशनच्या कामाची झपाट्याने वाढ झाली. मिशनच्या १२ शाखा, १६ दिवसाच्या प्राथमिक शाळा चालू होत्या. त्यातून १०१८ विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. सहा रविवारच्या शाळा, पाच भजनसमाज धर्मशिक्षणाचे व नीतिरक्षणाचे काम करीत होते. चार उद्योगशाळा चालू होत्या. मिशनच्या कामाला वाहून घेतलेले ७ कार्यवाह मिळाले व मिशनचे एक मुखपत्र सुरू झाले. तीन वर्षांच्या अवधीत एवढ्या कामाचा उठाव झाला ही गोष्ट स्वतः शिंदे ह्यांना व त्यांच्या सहका-यांना निश्चित उत्साहवर्धक वाटली. मिशनचे काम प्रत्यक्ष पाहून काही नामांकित व्यक्तींनी ह्या कामाबद्दल प्रोत्साहनपर अभिप्राय प्रकट केला. “धार्मिक आणि परोपकारी मंडळींनी देशामध्ये चालविलेले हे अत्यंत पवित्र कार्य आहे”, असे लाला लजपराय ह्यांनी म्हटले आहे. डॉ. भांडारकर ह्यांनी असे म्हटले आहे की, “विवेकशीलता ही अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह ह्यांच्या प्रांतावर हल्ला करण्याचा जो सांप्रतचा काळ आहे त्याचे निदर्शक म्हणजे ही संपूर्ण संस्था होय.” टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक स्टॅन्ले रीड ह्यांनी म्हटले आहे, “संस्थेच्या वतीने चालविण्यात येणा-या शाळांचे काम हे विशेषत्वाने स्तुत्य आहे. अस्पृश्यवर्ग ह्या शब्दप्रयोगापेक्षा अधिक भयंकर शब्दप्रयोग भाषेमध्ये असू शकत नाही. मिशनने चालविलेले उदात्त कार्य अंतःकरणातील मर्माला स्पर्श करणारे आहे.”

अहवालाच्या अखेरीस जनरल सेक्रेटरी शिंदे ह्यांनी म्हटले आहे की, “मिशनचा एकंदर वार्षिक खर्च १० हजाराइतका असून तो वाढतच आहे. मिशनच्या इमारतीसाठी, प्रशिक्षित शिक्षक व कार्यकर्ते उच्चवर्गातून मिळविण्यासाठी, त्याचप्रमाणे अस्पृश्य समजल्या
जाणा-या वर्गातून हुशार मुले निवडून त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी व त्यांच्यामधून मिशनचे भावी कार्यकर्ते तयार करण्यासाठी मिशनला मोठ्या देणग्यांची आवश्यकता आहे.”

कामाचा अनुभव
निराश्रित सेवासदनाच्या खर्चाची तरतूद दयारामजी गिडुमल यांनी ३ वर्षांपूर्वी केली होती. ह्या काळामध्ये मिशनच्या कार्यकर्त्यांना अशा कामाचा आणि मनुष्यस्वभावाचा जो अनुभव आला तो फार महत्त्वाचा होता. लहान मुले आणि वार्धक्यामुळे अंथरुणाला टेकलेली माणसे ह्यांचे फार हाल होत हे स्वतः शिंदे ह्यांनी पाहिले होते. गिरणीमध्ये १२ तास काम करणा-या माणसाला आपली पोटची मुले आणि वृद्ध आजारी आईबाप ह्यांच्या जोपासनेस वेळ मिळत नसे. म्हणून अशांची सेवा करणे हे सदनाचे मुख्य काम असे. इंग्लंडमधील डोमेस्टिक मिशने अशा प्रकारची कामे करतात हे शिंदे यांनी पाहिले होते. सदन काढल्याबरोबर शिंदे ह्यांचे आईवडील व दोन बहीणी ग्लोब मिलच्या घाणेरड्या चाळीत जाऊन राहिले. मिशनच्या कामाचा पहिल्यापासूनच एक दंडक शिंदे ह्यांनी ठरविला होता की, मिशनमध्ये काम करणा-यांनी ज्या ठिकाणी अस्पृश्य लोक राहतात तेथेच त्यांच्यात मिळूनमिसळून राहावे. काम करणा-यांनी आपल्या कुटुंबासह येऊन राहावे. ह्या उद्देशाला अनुसरून ग्लोब मिल जवळच्या एका चाळीत मिशनने आपले ठाणे घातले व शिंदे ह्यांच्या भगिनी व आईवडील ग्लोब मिलच्या चाळीत जाऊन राहिले.

ह्या कामाच्या बाबतीत आलेले अनुभव शिंदे ह्यांनी नमूद केले आहेत. त्यांपैकी एक अनुभव असाः “मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आमच्यावर विश्वास बसावा म्हणून सदनाच्या ठिकाणी माझ्या आईबाबांकडे मुले आणून ठेवण्याचा प्रयोग करून पाहिला. लष्करातून सेवानिवृत्त झालेल एक महार जमादार समजूतदार गृहस्थ होते. ८ वर्षांची एक मुलगी व ६ वर्षांचा एक मुलगा अशी दोन अपत्ये त्यांना होती. ८-८ दिवस त्या मुलांना आमच्या सदनात ठेवण्यास ते कबूल झाले. अगदी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्यांना ठेवून घेण्यास माझी आईदेखील कबूल झाली. चंद्राबाई नावाची माझी मोठी बहीण नुकतीच वारल्यामुळे विरहाचा मोठा धक्का बिचारीला बसला होता. त्यातून थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून तिने संगोपनाचे कार्य पत्करले. एक दिवशी सदनात गोडधोड झाले होते. म्हणून लहानग्या गंगूने (मुलीचे नाव) नेहमीपेक्षा जरा जास्त खाल्ले. गंगूला आपल्या स्वतःच्या बिछान्यात घेऊन आई निजत असे. असा लळा लावल्याशिवाय मुले घर सोडून राहण्यास तयार होण्यासारखी नव्हती. मध्यरात्रीनंतर गंगूला अंथरुणातच जुलाब होऊ लागले. बिचा-या आईने सर्व अंथरूण धुऊन काढून मुलीला साफसूफ करून, उबदार उपचार करून उजाडण्यापूर्वी नीटनेटके केले होते. मी रागावेन म्हणून घडलेला प्रकार तिने मला कळविला नाही, तरी तो मला कळलाच. मी माझ्या आईचे पाय धरले.

अशा गोष्टींनी ह्या लोकांचा विश्वास आमच्यावर हळूहळू बसू लागला. पुढे लवकरच आमच्या प्राथमिक व दुय्यम शाळा व एक मोठे विद्यार्थी वसतिगृह चांगले नावारूपास आले.”

अण्णासाहेब शिंदे ह्यांची बहीण जनाबाई ह्यांनाही अनेक खडतर अनुभव आले.

१)    एका घरातील एक वृद्ध बाई अंथरुणास खिळली होती. सतत अंथरुणावर पडून राहिल्याने तिच्या पाठीला जखमा झाल्या होत्या. जनाबाई रोज तिची पाठ शेकण्यास जात. पाठीला शेकण्यासाठी पाणी तापविण्यासाठी जनाबाई चुलीकडे जाऊ लागल्या तेव्हा बाई म्हणाली, “बाई, तुमचे फार उपकार आहेत, पण माझ्या चुलीला शिवू नका. तुम्ही ख्रिस्ती लोकांनी चूल बाटविल्यास लोक मला नावे ठेवून वाळीत टाकतील.” जनाबाईंनी आपल्या घरचा स्टोव्ह नेऊन त्यावर पाणी तापवून त्या बाईची पाठ शेकली. ही गोष्ट दुस-या दृष्टीनेही उद्बोधक ठरते. गरीब अस्पृश्यांची सेवा आतापर्यंत जी थोडीफार केली होती ती ख्रिस्ती लोकांनीच. हिंदूंपैकी अशा प्रकारची सेवा करणाचे काम केवळ ह्या मिशनचे कार्यकर्तेच करीत होते.
२)    राही नावाच्या एका वृद्ध बाईला असाध्य जखमा झाल्या होत्या. म्हणून प्रयत्नपूर्वक तिला जे. जे. हॉस्पिटलात पोहोचविण्यात आले. दुस-या दिवशी तिचा समाचार घेण्यासाठी जनाबाई तेथे गेल्या असता वृद्ध राहीबाईच्या मुलाने तिला घरी नेल्याचे समजले. जनाबाई तिच्या घरी समाचाराल गेली असता त्या मुलाकडून त्यांना शिव्यांचा प्रसादही मिळाला. घरी नेऊन मुलाने आपल्या वृद्ध आईच्या थोबाडीत मारल्याचे कळले. मुलगा दारूच्या नशेत होता म्हणून त्याच्याकडून असे घडले होते. तो कामावर गेल्यावर जनाबाई तिला भेटण्यास तिच्या घरी गेल्या. मुलगा रेल्वेमजूर होता. दारूच्या नशेत रेल्वेचा रूळ ओलांडीत असताना दोन डब्यांमध्ये चेंगरून तो जागच्याजागी ठार झाला. तेव्हा त्याची आई, “बाळा, माझ्या तोंडात मारायला तरी पुन्हा ये रे!” असे हंबरडे फोडू लागली. याच शोकात म्हातारीचा त्या रात्री शेवट झाला आणि जनाबाईंचे हे हृदयविदारक कामही संपले.
३)    खालच्या वर्गात मुरळी सोडण्याचा त्या वेळी बराच प्रकार होता. मदनपु-यातील मिशनच्या शाळेत येणा-या एका मुलीला मुरळी सोडणार आहे, असे कळल्यावर सदनातील भगिनी मुलीच्या आईला समजुतीच्या गोष्टी सांगण्यासाठी गेल्या. पण आपल्या धर्मात हात घातल्याबद्दल तिला संताप येऊन त्या भगिनींना पुन्हा पुन्हा आमच्या अंगणात येऊ नका असे त्या मुलीच्या आईने दरडावून सांगितले आणि आपल्या मुलीला शाळेतून काढून घेतले.
४)    मुरळी सोडलेली एक मुलगी पुण्याच्या डॉ. मॅन ह्यांच्याकडून सदनामध्ये पाठविण्यात आली. त्या मुलीला अंगभर वाईट रोग जडला होता. तिची कुठेही व्यवस्था होत नसल्याने निर्वाणीचा उपाय म्हणून डॉ. मॅन यांनी तिला सदनात पाठवले. पण मुलाबाळांनी भरलेल्या सदनात ही मुलगी ठेवणे धोक्याचे होते म्हणून भायखळा येथील शाळेजवळ एक स्वतंत्र खोली घेऊन ह्या मुलीला घेऊन जनाबाई तेथे राहिल्या. ही मुलगी फार आडदांड स्वभावाची होती. बरेच दिवस तिने फार त्रास दिला. तथापि, तिला तसेच शिकवून बरी केल्यावर आणि ती चांगली शिकल्यावर तिचा योग्य स्थळी विवाह करून देण्यात आला. ही मुलगी महार जातीची होती. पुढे ती हैदराबादमध्ये शिक्षिका झाली.
पुष्कळ स्त्रियांना गरोदरपणी व बाळंतपणी नाजूक उपचार करण्याची आवश्यकत असे. मिशनचे हितचिंतक मोठमोठे डॉक्टर होते. ते औषधोपचार सांगत पण शुश्रूषेची कामे सदनातील स्त्रियांवर पडत. एनिमा देणे वगैरे नवीन उपचाराचे काम आल्यास जुन्या मताच्या रोग्याला आवरणे फार कठीण होई. ते अत्यंत बीभत्स शिव्या देऊन निघून जात. अस्पृश्य म्हणून इतर अनाथालयात ज्यांचा शिरकाव होणे अशक्य होई, अशा मुलांना पंढरपूरच्या आश्रमात किंवा दयाराम गिडुमलशेठनी मालाड येथे काढलेल्या आश्रमात पाठविण्यात येई.

अशा प्रकारची दयार्द्रतेची कामे करण्यासाठी स्त्रियांचे सहकार्य मिळविणे आवश्यक होते असे अण्णासाहेब शिंदे ह्यांना जाणवले. मिशनच्या सर्व प्रकारच्या कामात त्यांचे संघटनाकौशल्य दिसून येते. समाजातील सर्वच स्तरांतील वजनदार व्यक्तींचे साहाय्य मिशनच्या कामासाठी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असे व ह्या कामी त्यांना यशही मिळत असे, असे दिसते. स्त्रियांच्या संदर्भात अशा प्रकारची कामे करण्यासाठी १९०८ साली पुढे नमूद केल्याप्रमाणे प्रतिष्ठित स्त्रियांची एक समिती नेमण्यात आली.

लेडी म्यूर मॅकेंझी – अध्यक्ष
लेडी चंदावरकर – उपाध्यक्ष
मिसेस स्टॅनले रीड – चेअरमन
सौ. सीताबाई सुखटणकर आणि सौ. लक्ष्मबाई रानडे – जॉइंट सेक्रेटरी
कु. एस. के. काब्राजी – खजिनदार

ह्यांपैकी डॉ. वासुदेवराव सुखटणकर ह्यांची पत्नी सौ. सीताबाई ह्या मँचेस्टर डोमेस्टिक मिशनचे बिशप ह्यांची कन्या होत्या. ह्यांनी इंग्लंडमध्ये असताना स्वतः मिशनचे काम केले होते व मुंबईत अण्णासाहेब शिंदे ह्यांनी सुरू केलेल्या ह्या मिशनसाठी इंग्लंडमधील युनिटेरियन लोकांची सहानुभूती मिळवून एकंदर ७०० रुपये जमा करून त्यांच्याकडे पाठविले होते. हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी ह्या स्त्रियांच्या कमिटीचे सेक्रेटरीपद पत्करले. परंतु पुढे डॉ. सुखटणकरांवर मुंबई सोडून लाहोरला जावे लागले व ह्या बाईंचा मिशनशी संबंध सुटला. ह्या कमिटीवर असणा-या स्त्रिया मोठमोठ्या घरंदाज कुटुंबातील होत्या व त्यांचे पती अथवा संबंधित पुरुष जबाबदारीच्या मोठमोठ्या हुद्दयावर काम करीत असत. ह्या स्त्रियांच्या अनुकूल मनोभूमिकेमुळे त्यांचे मिशनला मोठेच साहाय्य झाले. त्यांनी व्यक्तिशः वेळोवेळी मिशनची काळजी घेतली आणि मोठमोठे निधी मिशनला जमवून दिले. लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांनी त्यांचे पती काही दिवस ऍक्टिंग गव्हर्नर असताना १९०९ साली महाबळेश्वर येथील शाखा उघडण्यास गव्हर्नरच्या बंगल्यात सभा भरवून प्रत्यक्ष साह्य केले. १९०९ सालच्या सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या शाळेच्या बक्षीस समारंभात अध्यक्षस्थान स्वीकारून लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांनी जोरदार भाषण करून श्रीमंतवर्गाचे मिशनकडे लक्ष वळविले. मलबार हिलवरील आपल्या बंगल्यात स्त्रियांच्या कमिटीची सभा भरविली. निधी मिळविण्यासाठी नाना प्रकारचे उपाय सुचविले. टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक सर स्टॅनले रीड ह्यांच्या पत्नीने १९०९ साली मिशनमध्ये सर्व मुलांचा एक मेळा भरवून त्यांना खाऊ वाटला. न्यायमूर्ती रानडे यांचे बंधू डॉ. श्रीधर यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तर रात्रंदिवस मिशनचे काम करण्यात चूर असत. त्यांच्या ठिकाणी उत्तम प्रकारचा सभाधीटपणा होता. लेडी लक्ष्मीबाई चंदावरकर वरचेवर निराश्रित सदनात येऊन खाऊच्या पाट्याच्या पाट्या भरून विद्यार्थ्यांना वाटीत असत. दादाभाई नौरोजी ह्यांची नात सौ. पी. कॅप्टन (मुंबई येथील असिस्टंट पोस्टमास्तर ह्यांची पत्नी) ह्या प्रसिद्ध देशाभिमानी बाईने सौ. सुखटणकरांनंतर स्त्रियांच्या कमिटेचे  सेक्रेटरीपद पत्करून काम केले. पुढे पुण्याचा शाखा सुरू झाल्यावर तळेगाव-दाभाडे येथे मिशनने रात्रीची आणि दिवसाची शाळा काढली. त्याचा सर्व खर्च ह्या दंपतीने दिला. पुण्यातल्या शाखेला एक शिवणाचे यंत्र व एक हार्मोनियम बक्षीस दिला. मिशनच्या कामात प्रतिष्ठित स्त्रियांनी सहभागी होण्याचा मोठाच लाभ झाला.

ह्या सदनाच्या कार्यात निष्पन्न झालेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे मुंबई शाखेचे परळ येथील वसतिगृह होय. अस्पृश्यवर्गाची उन्नती केवळ मोठमोठ्या शिक्षणसंस्था काढल्याने होणार नाही तर त्यांच्या जीवनामध्ये क्रमशः उत्क्रांती व पालट घडवून आणण्यासाठी जिवंत व्यक्तिगत पुढाकाराची आवश्यकता आहे असे शिंदे ह्यांचे मत होते व ते त्यांनी १९०५ सालच्या ‘मिशन स्थापन करण्याची आवश्यकता’ ह्या निवेदनात मांडले होते. कारण शाळांमध्येही अस्पृश्यवर्गातील मुले दिवसांतून फार तर पाच काम करीत. बाकीचा सर्व काळ आपल्या मागासलेल्या वर्गात घालवितात तोपर्यंत त्यांच्या नैतिक जीवनाचा विकास होणार नाही ही जाणीव शिंदे यांना होती. त्यांच्यासाठी स्वच्छ ऐसपैस जागेत २४ तास राहण्याची सोय व्हावी व ह्या कामात तयार झालेल्या कुलगुरूंच्या वैयक्तिक नजरेखाली दिवसातून चोवीस तास ही सगळी मुले असावीत म्हणून वसतिगृहाची जरुरी होती. परंतु हे उद्दिष्ट सुरुवातीला गाठता येणे कठीण होते. नुसत्या दिवसाच्या शाळेत येण्याची जिथे त्या मुलांची तयारी नव्हती तेथे ते आपल्या गावाला व आईबापांना सोडून मुंबईसारख्या शहरात राहावयास कोठून येणार? पण निराश्रित सदनाचे कार्य तीन-एक वर्ष चालले तेव्हा हे उद्दिष्ट साधण्याची चिन्हे दिसू लागली. मिशनच्या शाळांची वाढ ह्या तीन वर्षांत दुय्यम शाळा म्हणजे चौथी इयत्ता चालविण्यापर्यंत फेब्रुवारी १९०९ मध्ये, शाळांच्या जवळपास ज्यांची घरे होती अशा मुलांसाठी, सदनामध्ये बोर्डिंग सुरू करण्यात आले. जवळपास राहणा-या ह्या निवडक मुलांनी घरी दोनदा फक्त जेवावयास जाऊन बाकीचा वेळ सदनात घालवावा अशी त्यांना सवय करण्यात आली. सदनामध्येच त्यांना कपडेलत्ते पुरवून स्नान घालण्याची व्यवस्था करण्यात आली. खेळाची उपकरणे, अभ्यासाची पुस्तके व प्रशस्त पटांगण इत्यादी गोष्टी करून घरापेक्षा त्यांना शाळाच प्रिय वाटेल असा प्रयत्न करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात मुलांच्या जेवणाखाण्याचीही सोय करण्यात आली व डिसेंबर अखेरीस २१ मुले वसतिगृहात राहत. त्यांपैकी ३ मुली होत्या.

मिशन जरी अस्पृश्यांसाठी काढले होते तरी पटावरील संख्येपैकी निदान एकचतुर्थांश मुले स्पृश्यवर्गातील घेण्याची मुभा ठेवली होती. त्या पाठीमागे शिंदे ह्यांचा उद्देश दुहेरी होता. स्पृश्य मुलांशी मिळूनमिसळून वागावे, त्यांच्याशी अभ्यासात चढाओढ करून, त्यांच्या सवयींचे अनुकरण करून अस्पृश्यवर्गातील मुलांनी आपला फायदा करून घ्यावा; उलटपक्षी अस्पृश्यांविषयी जो तिटकारा स्पृश्यांमध्ये असतो तो निराधार आहे हे त्यांच्यासमवेत राहिल्यानेच स्पृश्य मुलांना कळावे व त्यांचा अस्पृश्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोण बदलावा. केवळ मुलांशी वागण्यातच नव्हे, तर मोठ्या माणसांमध्ये प्रचार करताना, पुढारलेल्या आणि मागासलेल्या समाजाशी वागताना, व्याख्यानपीठावरून बोलताना प्रचारकांना हा दुहेरी हेतू सांभाळावा लागतो असे शिंदे ह्यांनी ध्यानात घेतले होते. इतकेच नव्हे तर अस्पृश्यांपेक्षा स्पृश्यांनाच शिक्षण देण्याचे काम कित्येकवेळा अवघड असते ह्याचाही त्यांना अनुभव येत असे.

वसतिगृहातील मुलांचा दैनिक कार्यक्रम नेहमीसाठी आखलेला होता. सकाळी पाच वाजता उठणे, साडेपाच वाजता प्रार्थना, सहा वाजता त्यांना कांजी देण्यात येई. सकाळी साडेसहापासून एक तास बुकबाइंडिंगचे काम त्यांना देण्यात येई. त्यानंतरचा दहापर्यंतचा वेळ त्यांना शालेतील अभ्यास, स्नान व न्याहारी ह्यासाठी ठेवला होता. सकाळी दहानंतर आणखी एकदा बुकबाइंडिंगचे काम मुलांना देण्यात येई. अकरा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत दिवसाची शाळा असे. त्यामध्ये एक ते दीड असा वेळ भोजनासाठी ठेवलेला असे. शाळा सुटल्यावर पाच ते सहा वेळ त्यांच्या व्यायामासाठी असे. संध्याकाळी सहा वाजता भोजन झाल्यानंतर मुलांनी आपला शाळेतील अभ्यास करावा ही अपेक्षा असे. झोपण्याची वेळ रात्री दहा ही निश्चित केली होती.

ह्याखेरीज रविवार सकाळी मुलांसाठी नैतिक शिक्षणाची सोय केली होती. तिस-या प्रहरी विद्यार्थ्यांचे चर्चामंडळ व सायंकाळी साप्ताहिक उपासना होत असत. स्वयंपाकाकरिता एक बाई ठेवलेली असे. मात्र अन्य घरकामाकरिता एकही नोकर जाणीवपूर्वक ठेवलेला नसे. आपापली कामे करून समान कामाची वाटणी मुले बिनबोभाट करीत. वसतिगृहात अस्पृश्य व स्पृश्य अशा वर्गातील वेगवेगळ्या जातींचे मुले असत. परंतु कोणत्याही प्रसंगी जातिभेद पाळला जात नसे. ह्याबाबतीत कोणी कधी तक्रारही केली नाही. महार-मांग-ढोर इत्यादी अस्पृश्य जातींतही पाळला जाणारा जातिभेद वसतिगृहामध्ये मुलांनी संपुष्टात आणला. अन्न नेहमी शाकाहारी असे आणि ते मुलांना मानवत असे. स्वच्छता आणि नैतिकता ह्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे कसोशीने पाहण्यात येई.

मिशनने मोफत दवाखाना चालविण्याचा प्रयोग १९०६ नोव्हेंबरपासून १९०८ अखेरपर्यंत चालविला. डॉ. संतुजी लाड हे ठाण्याहून येऊन आजारी माणसांवर औषधोपचार करीत ह्याचा उल्लेख ह्या आधी केला आहे. हा दवाखाना सुरू करण्याच्या पाठीमागे मिशनचा संबंध अस्पृश्य मानलेल्या लोकांशी जडावा त्याचप्रमाणे औषधोपचाराची त्यांना सवय लागावी असा होता. सुमारे दोन वर्षांच्या अवधीत १, २३९ रोग्यांनी मिशनच्या ह्या दवाखान्याचा लाभ घेतला. मिशनच्या दवाखान्याचा लाभ घेणा-या ह्या लोकांमध्ये मराठा, महार, मोची, मांग, भंगी, मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू ह्या विविध जातिधर्मांतील पुरुष-स्त्रिया व मुले होती.

मिशनचे दुसरे मुख्य काम म्हणजे शिक्षणाचे. ह्यासाठी शाळाखाते मान्य करील अशा तज्ज्ञाची आवश्यकता होती. निराश्रित सेवासदनाचे काम बघून आणि त्यासाठी मिळालेल्या स्वार्थत्यागी माणसांची तयारी पाहून - विशेषतः शिंदे यांची तळमळ व त्याग पाहून-श्री. वामनराव सोहोनी हे अत्यंत प्रभावित झाले होते. अण्णासाहेबांच्या सूचनेवरून ते आपली विल्सन हायस्कूलमधील शिक्षकाची नोकरी सोडून मिशनमध्ये १९०८ सालच्या आरंभी दाखल झाले व शाळांची जबाबदारी त्यांनी पत्करली. श्री. सोहोनी हे विल्सन हायस्कूलमधील नावाजलेले शिक्षक होते. मिशनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी परळ येथील प्राथमिक शाळेचा दर्जा वाढवून तिचे माध्यमिक शाळेमध्ये रूपांतर घडवून आणले. शाळाखात्याचे सर्व नियम सांभाळून त्यांनी हे काम अत्यंत निष्णातपणे व चोखपणे केले. परळ येथील शाळेत १९०९ साली मराठी विभागात ११४ मुले-मुली होती तर इंग्रजी चौथीपर्यंत २७ मुले होती. देवनार कचरापट्टी येथील रात्रीच्या शाळेत ४० मुले होती. मदनपु-यातील दिवसाच्या शाळेत ९७ मुले, २५ मुली अशी १२२ मुलांची संख्या होती. कामाठीपुरा येथे भंगी लोकांसाठी एक दिवसाची शाळा उघडण्यात आली. ह्या शाळेसाठी जागा मिळण्याची तसेच शिक्षक मिळण्याची मारामार पडली. शेवटी बडोद्यास तयार झालेले एक धेड जातीचे गृहस्थ मिळाले. चौथी इयत्तेपर्यंत येथे शिक्षण दिले जाई व रोजची हजेरी सरासरी ६६ एवढी असे.

मुंबई येथील मिशनने अशा अनेकविध प्रकारच्या कामाला जोरदार सुरुवात केली. त्या कामाचा बोलबाला होऊ लागला. लोकमत हळूहळू बदलू लागले व सामाजिक जीवनामध्ये मनू पालटण्याची चिन्हे लोकांना दिसू लागली.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २८ ऑक्टोबर १९०६.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २२०.
३.    तत्रैव, पृ. २२६.
४.    तत्रैव, पृ. २२७-२२८.
५.    दि थर्ड क्वार्टर्ली रिपोर्ट ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ९ जुलै १९०७.