ब्राह्मधर्मासंबंधी अखिल भारतीय पातळीवर शिंदे ह्यांनी केलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे थीइस्टिक डिरेक्टरी (ब्राह्मधर्मसूची ग्रंथ) ह्या ग्रंथाची रचना होय. मुंबई प्रार्थनासमाजाचे कार्य करावयास लागल्यापासून शिंदे ह्यांना अशा प्रकारच्या ग्रंथाची उणीव जाणवत होती. अशा प्रकारचा ग्रंथ तयार होणे आवश्यक आहे हे शिंदे ह्यांनी इतरांच्या मनावर ठसविले. भारतीय निरनिराळ्या ब्राह्मसमाजांच्या कार्याची आणि प्रगतीची माहिती दरवर्षी जमा करून प्रसिद्ध करण्याचे काम प्रतापचंद्र मुझुमदार ह्यांनी प्रथम १८७२च्या सुमारास सुरू केले. पुढे ७-८ वर्षानंतर मिस् एस्. डी. कॉलेट ह्या उत्साही इंग्रज स्त्रीने १८७६ ते ८७ पर्यंत ब्राह्मो इयर बुक ह्या नावाने हे काम पद्धतशीरपणे चालविले. मात्र एवढ्या झालेल्या कामाने देशांमधील विविध ठिकाणच्या ब्रह्मसमाजाची एकत्रित माहिती मिळू शकत नव्हती. इंग्लंडमध्ये लंडनमधील एसेक्स स्ट्रीटवर असलेल्या युनिटेरियन पंथाच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्व प्रकारची युनिटेरियन पंथाबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकते. त्या मध्यवर्ती संस्थेने अशा प्रकारचे साहित्य प्रसिद्ध केलेले आहे ह्याची शिंदे ह्यांना माहिती होती. ह्या प्रकारच्या कामाची हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशात तर अधिकच आवश्यकता होती. म्हणून १९०५ सालच्या काशी येथील अधिवेशनात ह्या संबंधीचा ठराव संमत झाला. हिंदुस्थानातील ब्राह्म व प्रार्थनासमाजाची माहिती असणारे पुस्तक शिंदे ह्यांनी तयार करावे असा ठराव परिषदेन संमत करून त्या कामाची जबाबदारी शिंदे ह्यांच्यावर सोपविली.
त्या परिषदेनंतरच विविध ब्राह्मसमाजांची माहिती मिळविण्यासाठी शिंदे ह्यांनी बंगाल, आसामची सफर काढली. ह्यासाठी जाहीर परिपत्रके काढली. पत्रव्यवहार केला तरीही समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळे हा प्रयत्न सोडून द्यावा असे त्यांनी दोनदा ठरविले. १९१२ साली पुन्हा त्यांनी जोरदार प्रयत्न केला. ह्या कामाचे महत्त्व ध्यानात घेऊन हे काम तडीस नेणे आवश्यक असल्याचे त्यांना जाणवत होते. काही स्थानिक समाजांची माहिती त्यांना मिळालीही होती. म्हणून ब्राह्मसमाजाचे कार्य करणा-या कार्यकर्त्यांना मिळालेले अपयश हेदेखील उद्बोधक ठरण्यासारखे वाटत होते. परदेशात असलेल्या त्यांच्या परिचितांनी व मित्रांनी महत्त्वी माहिती त्यांच्या त्यांच्या एकेश्वरी धर्मासंबंधी लिहून पाठविली. म्हणून १९१२ साली अखेरचा नेटाचा प्रयत्न करून शिंदे ह्यांनी ३०० पानांचा हा ग्रंथ पूर्णतेस नेला व १९१२च्या डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केला. सर नारायण चंदावरकर ह्यांनी ह्या पुस्तकाला विवेचक अशी महत्त्वपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. तीमध्ये त्यांनी म्हटले आहे, “भारतखंडात ब्राह्म आणि प्रार्थनासमाजांनी चालविलेल्या एकेश्वरी धर्माची एकत्रित माहिती ह्या समजाच्या सभासदांना व हितचिंतकांनाच नव्हे तर ज्या कोणाला ह्या चळवळीकडे चिकित्सक दृष्टीने पाहावयाचे असेल अशा बाहेरच्यांनादेखील अत्यंत उपयोगी ठरेल. आधुनिक सुशिक्षित हिंदू लोक धर्माच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहेत, असा आक्षेप वरचेवर करण्यात येतो, पण तो सर्वांशी खरा नाही. हिंदू महामंडळ, आर्यसमाज, थिऑसफी आणि इतर धर्मांच्या चळवळी यांचे कोणी निरीक्षण केल्यास नवीन चैतन्याची साक्ष सहज पटण्यासारखी आहे. आधुनिक विचारी जगात दोन भिन्न प्रमुख शक्तींचे कार्य चालू आहे. एक धर्मकारण व दुसरे अर्थकारण. ह्या दोन शक्ती सर्व सुधारलेल्या जगास हालवून सोडीत आहेत. नुसत्या अर्थाच्या मागे लागलेला मनुष्य अथवा संस्था असणे शक्य नाही. जसजशी श्रीमंती वाढते तसतसा कंगालपणाही त्याचबरोबर वाढतो आणि त्याच्या मागोमाग युद्ध हे ठरलेले. दुसरे सत्य हे की, मतमतांतरांचा गलबला चालला असता त्यातूनच एक मूलभूत सामान्य तत्त्व बाहेर डोकावते. बंगालकडील राममोहन रॉय, महर्षी देवेंद्रनाथ, ब्रह्मानंद केशवचंद्र आणि आमचेकडील सर रामकृष्णपंत भांडारकर यांनी या सामान्य तत्त्वाचा स्वीकार केला असून त्याचा पुकार ते आधुनिक जगात करीत आहेत. त्यांची जबाबदारी किती मोठी आहे हे हा सूचिग्रंथ दाखवीत आहे. ह्या ग्रंथात वर्णिलेली परिस्थिती वाचून नेहमी आनंदच होईल असे नाही. तथापि, ब्राह्मधर्माचा प्रचार अधिक नेटाने करणे कसे अवश्य आहे हे पटते आणि ब्राह्म धर्मानुयायी होणे हे सुखातले मोठे सुख आणि भाग्यातले मोठे भाग्य आहे याची खात्री पटते.”१
ह्या ग्रंथाचा उद्देश प्रामुख्याने हिंदुस्थानातील वेगवेगळ्या प्रांतांतील स्थानिक ब्राह्मसमाजाची माहिती देणारी सूची करणे असा असला तरी पुस्तकाचे स्वरूप आणखी वाढवून त्याला उपयुक्ततेच्या जोडीने अधिक मौलिकता प्राप्त करून द्यावे असे शिंदे ह्यांना वाटले. म्हणून पुस्तकाच्या एका भागामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील उदार धर्मविषयक विचार व त्यांचे कार्य ह्या संबंधीचे लेख समाविष्ट करावे असे वाटले. म्हणून ह्या ग्रंथाच्या नावातच ‘ब्राह्मधर्मसूची’ ह्या मुख्य नावापुढे ‘आणि सुधारलेल्या जगातील उदार धर्माचे विचार आणि कार्य ह्यांचा आढावा’ असे शीर्षक वाढविण्यात आले. त्यामुळे स्वाभाविकपणे उदार धर्मविषयक भूमिकेचे जागतिक पातळीवरील स्वरूप काय, ह्याचे चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहू शकते. ह्या हेतूनेच शिंदे यांनी ह्या पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात भारतातील आणि जगातील उदार धर्माच्या निरनिराळ्या पंथांचे कार्य ह्या संबंधीचे लेख समाविष्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे भारतामधील ह्या उदार धर्मपंथांनी जी परोपकारी कामे चालविली आहेत त्यासंबंधीचे लेख समाविष्ट केलेले आहेत. ह्या पहिल्या भागातील ब्राह्मसमाजाच्या संबंधीचा लेख पं. शिवनाथशास्त्री ह्यांनी स्वतः लिहिला. जपानमधील उदार धर्म हे प्रकरण शिंदे ह्यांचे मँचेस्टर कॉलेजमधील सहाध्यायी झेनो सुके टोयोसाकी ह्यांनी लिहून पाठविला. पंजाबमधील ब्राह्मसमाज हा लेख लाला रघुनाथ सहानी ह्यांनी, तर दक्षिण भारतातील ब्राह्मसमाज हे टिपण व्ही. पद्मराज नायडू ह्यांनी लिहून पाठविले. मात्र पहिल्या भागातील बरीच मुख्य प्रकरणे स्वतः शिंदे ह्यांनीच लिहिली. पश्चिम हिंदुस्थानातील प्रार्थनासमाजाची चळवळ, एकेश्वरी धर्मपरिषद, भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी, इराणातील बहाई धर्माची चळवळ, युरोपातील व अमेरिकेतील युनिटेरियन आणि युनिव्हर्स्यालिस्ट समाज ही प्रकरणे शिंदे ह्यांनी स्वतः लिहिलेली आहेत. हिंदुस्थानातील आणि जगातील उदार धर्मविषयक चळवळीचा इतिहास डोळ्यांसमोर यावा ह्या हेतूने पहिल्या भागातील प्रकरणे तयार केली आहेत.
प्रस्तुत ग्रंथाच्या दुस-या भागामध्ये प्रत्यक्ष गावोगावी असलेल्या समाजाची माहिती नमूद केली आहे. त्यामध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा ह्या प्रांतांतील एकशे अकरा ब्राह्मसमाज, मद्रास प्रांतातील ३२ ब्राह्मसमाज, मुंबई प्रांतातील १६ प्रार्थनासमाज, पंजाब आणि संयुक्त प्रांतातील १८ ब्राह्मसमाज व त्याशिवाय लंडन येथील रे. चार्ल्स व्हायसे ह्यांचे थीइस्टिक चर्च अशा एकूण १६८ संस्थांची तपशीलवार माहिती आणि सविस्तर इतिहास आला आहे. प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक समाजाच्या सेक्रेटरीचे नाव व पत्ता, सभासदांची संख्या, ह्यांपैकी आनुष्ठानिक किती व हितचिंतक किती ह्यांचा निर्देश; आठवड्यातून सभा कितीवेळा भरते; पोटसंस्थांचा तपशील; स्वतंत्र मंदिर आहे की नाही; मुखपत्र म्हणून वर्तमानपत्रे, मासिके कोणती आहेत; प्रचाराची व्यवस्था कोणती; समाजाच्या वतीने चालविणा-या संस्था कोणत्या, ह्याबद्दलची माहिती अत्यंत कसोशीने गोळा करून ह्या ग्रंथात समाविष्ट केली आहे. एकंदरीत हे पुस्तक समाजाचे प्रचारकार्य करणा-यास, त्याचप्रमाणे अभ्यासकास आणि सामान्य जिज्ञासूस अत्यंत उपयुक्त झालेले आहे.
पुस्तक तयार करण्यासाठी आणि छपाईसाठी आलेला खर्च ब्राह्मो पोस्टल मिशन व बनारस येथील परिषदेच्या शिलकेतून भागविण्यात आला. कोणत्याही स्थानिक समाजावर खर्चाचा भार पडला नाही. एवढ्या परिश्रमाने तयार केलेल्या पुस्तकाबद्दल एक खंत मात्र शिंदे ह्यांच्या मनात कायम राहून गेली. ‘ही पुस्तके ब्राह्मधर्मप्रचारकांना फुकट वाटण्यात येतील, टपालदेखील पडणार नाही. फक्त त्यांनी मागणी करावी’ असे वेळोवेळी जाहीर करूनही कोणा एकाकडूनदेखील मागणी आली नाही. ह्या प्रकारच्या पुस्तकासंबंधी ब्राह्मधर्मप्रचारकांचीच असलेली ही अनास्था शिंदे ह्यांना स्वाभाविकपणेच उद्वेगकारक वाटली. पाश्चात्त्य जगातील कार्यकर्त्यांना मात्र हे पुस्तक फार महत्त्वाचे वाटून त्यांनी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ह्या पुस्तकाच्या शेकडो प्रती मुंबई प्रार्थनासमाजात धूळ खात पडल्या होत्या हे आठवून शिंदे ह्यांनी म्हटले आहे, “ब्राह्मधर्म ही प्रार्थना करणारी संस्था आहे, प्रयत्न करणारी नव्हे, असे केव्हा केव्हा विनोदाने सांगण्यात येते. त्यात सत्याचा अंश बराच आहे, असे हा ग्रंथ जोराने पुकारीत आहे.”२
संदर्भ
१. व्ही. आर. शिंदे, दि थीइस्टिक डिरेक्टरी अँण्ड रिव्हू ऑफ दि लिबरल रिलिजस थॉट अँण्ड वर्क इन दि सिव्हिलाइज्ड वर्ल्ड, मुंबई, १९१२.
२. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २०६.