हायस्कूलचे शिक्षण
विठ्ठल रामजींच्या लहापणीच त्यांच्या घराची सुबत्ता जाऊन ते दुर्धर दारिद्र्याच्या फेर्यात सापडले होते. असे असले तरी ह्या दारिद्र्याचे सावट त्यांच्या बाल्यावर पडले नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे आईचे प्रेमळपणाने ओतप्रोत भरलेले अंतःकरण व तिची स्वाभाविक आनंदी वृत्ती याचा अखंड अनुभव त्यांना मिळत होता. त्याचप्रमाणे, दुसरे कारण म्हणजे दारिद्र्याच्या प्रतिकूल स्थितीतही त्यांच्या वडिलांची टिकून राहिलेली उदार मनोवृत्ती व त्यांनी शाबूत ठेवलेला प्रतिष्ठितपणा. आई-वडिलांच्या प्रेमळ, उदार सहवासात लहानग्या विठूचे बालपण गेले व त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध अंगांचे पोषण झाले.
विठ्ठलाचे वय पाच-सात वर्षांचे असताना त्याचे आजोबा बसवंतराव वारले. तेव्हापासून अकरा वर्षांचे वय होईपर्यंतची म्हणजे इ. स. १८७९ पासनू १८८४ पर्यंतची पाच वर्षे ही त्याच्या प्राथमिक शिक्षणाची होती. वडिलांनी लहानग्या विठूच्या शिक्षणाच्या आरंभाचा एक लहानसा विधी साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एका शुभमुहूर्तावर करविला. त्यासाठी त्यांनी रा. बाळा काणे नावाच्या शिक्षकांना बोलाविले. त्यांनी 'श्रीगणेशाय नमः' हा धडा लहानग्या विठूचा हात धरून गिरविला. प्राथमिक शाळेत लहान वयामुळे स्वाभाविकपणेच त्याचे फारसे लक्ष लागले नाही. मराठी शाळेत चौथीनंतरही पाचवीचे एक वर्ष त्याला घालवावे लागले. त्यामुळे मराठी कवितेत आणि गणितात त्या वेळच्या मानाने त्याची बरीच प्रगती झाली. मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ आणि व्याकरण त्याला चांगले कळत असे. कुणी शाळा पाहावयास आले म्हणजे त्याच्याकडून पंतोजी कविता म्हणून घेत असत व लहानगा विठू त्या चांगल्या सुरावर व ऐटीत म्हणत असे.
विठूच्या आयुष्यातील १८८५ ते १८९१ अखेरची सात वर्षे महत्त्वाची होती. हा त्याच्या हायस्कूल शिक्षणाचा काळ. विठूच्या वृत्तीत फरक पडावा अशी एक घटना १८८५ च्या पावसाळ्याच्या आरंभी घडली. ती म्हणजे त्याचा वडील भाऊ परशुराम ह्याचा अकाली झालेला मृत्यू. त्यामुळे विठूच भावंडांमध्ये वडील झाला आणि त्याचा बालपणाचा हूडपणा कमी होऊन तो गंभीर, विचारी व अभ्यासी बनला. त्या वेळी त्याला नुकतेच अकरावे वर्ष संपून बारावे वर्ष लागले होते.
विठ्ठलाने हायस्कुलात प्रवेश केला त्या वेळी श्री. त्रिंबकराव खांडेकर यांना पुण्याहून हेडमास्तरांच्या जागेवर आणले होते. त्यांचा स्वभाव सुशील, नेमस्त, गंभीर आणि करारी होता. त्यामुळे गावात व दरबारात त्यांचा एक प्रकारचा दबदबा होता. शाळेला हायस्कूलचा पूर्ण दर्जा मिळाल्यानंतर श्री. वासुदेवराव चिरमुले बी.ए. हे पहिले पदवीधर शिक्षक शाळेला लाभले. हायस्कूलमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिले वर्ष विठ्ठलाला जड गेले. दुसर्या वर्षांपासून मात्र इंग्रजी भाषेची व इतर सर्वसामान्य विषयांची त्याला गोडी लागली. शिक्षक सहानुभूतीने शिकविणारे होते. विठ्ठलाची हुशारी पाहून ते त्याचे कौतुक करू लागले. मराठी शाळेहून हायस्कूलमधील वातावरण वेगळे असल्याने व शिक्षकवर्गाकडून कौतुक होत असल्यामुळे त्याचे मन शाळेच्या अभ्यासात आणि वातावरणात चांगलेच रमले.
इंग्रजीच्या अभ्यासामुळे एक नवेच विश्व विठ्ठलाच्या ग्रहणशील मनासमोर खुले झाले. तिसर्या इयत्तेपासून इंग्रजी राहणीचे धडे त्याला वाचायला मिळत. इंग्रजी शेताचे वर्णन, इंग्रजी झाडाझुडपांची नावे, इंग्रजी खेडी, इंग्रजी कुंपणावरील निरनिराळ्या जंगली वेली, फुले वगैरे नवीन देखावे वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्या मनाला देऊ लागले. श्री. आप्पा काळे हे रसिकतेने शिकवीत व विठ्ठल समरसून शिकत असे. इंग्रजी चौथ्या इयत्तेवर त्याचे आवडते शिक्षक श्री. आप्पा काळे हे पुन्हा आले. सँडफर्ड ऍंड मर्टन हे अभ्यासक्रमातील पुस्तक त्यांना फार आवडे. त्यामधील नवीन व उदार विचार, बाळबोध भाषा, इंग्रजी पोशाखाची, राहणीची व वनश्रीची शब्दचित्रे यांमुळे इंग्रजी राहाणीविषयी त्याचे कुतूहल दिवसेंदिवस वाढू लागले. योगायोगाने तरुणपणी विठ्ठल रामजी हे इंग्लंडातील उत्तमोत्तम अशा ऑक्सफर्ड विश्वविद्यालयात दोन वर्षे राहिले. तेव्हा तेथील खेड्यापाड्यांत जाऊन शेतात, कुंपणात फिरून त्यांनी जे देखावे पाहिले त्याची पूर्वस्वप्नेच जणू काय जमखंडीसारख्या खेडवळ शाळेतील क्रमिक पुस्तके वाचत असताना पडत होती. पाचव्या इयत्तेत लँबस् टेल्स या पुस्तकाद्वारा त्यांची कविकुलगुरू शेक्सपियरची भेट झाली. सहाव्या इयत्तेत रीडिंग्ज फ्रॉम द स्पेक्टेक्टर हे पुस्तक श्री. चिरमुले यांनी त्यांना शिकविले; यात ऍडिसनच्या खर्या बाळबोध इंग्रजीचा व ताज्या विचारांचा नमुना त्याला कळाला. अशा तर्हेने ग्रहणशील वयातच त्याच्या हृदयावर इंग्रजी भाषेचाच नव्हे तर इंग्रजी संस्कृतीचा अनुकूल असा परिणाम झाला.
एखादा विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमातून उत्कट स्वरूपाचा आनंद घेऊ शकतो ही गोष्ट दुर्मीळच म्हणावी लागेल. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या ठिकाणी त्या वयातही असणारी तरल संवेदनशीलता व तीव्र ग्रहणशीलता यांमुळे ह्या हायस्कूलमधील अभ्यासक्रमातून ते अपूर्व असा आनंद घेऊ शकत होते. त्यांनीच या अनुभवाचे वर्णन केलेले आहे. ''पाचव्या इयत्तेत संस्कृत, बीजगणित आणि भूमिती आणि सहावीत रसायन, यंत्रशास्त्र, भूगोल, खगोल इत्यादी आधुनिक शास्त्रांची मूलतत्त्वे ह्यांचा उपक्रम झाला. एखाद्या मनोर्यावर चढत असताना प्रत्येक मजल्याभोवतालचे क्षितिज अधिकाधिक विस्तीर्ण होऊन ज्याप्रमाणे जास्त प्रदेश दृष्टीच्या टापूत येतो व आनंद वाटतो त्याप्रमाणे माझा हा हायसकूलमधील अभ्यासक्रम मला फार चित्तवेधक व बोधकारक झाला. त्यामुळे माझ्या घरातील भयानक दारिद्र्याच्या वेदना मला कधीच भासल्या नाहीत, की माझ्या शिशुदशेच्या सहजानंदात कधी खंड म्हणून पडला नाही. ह्या माझ्या सदानंदी उत्साहामुळे माझ्या आईबाबांचे दुःखही हलके झाले.''१
इंग्रजीचा प्रभाव जरी विठ्ठलावर उत्कट स्वरूपात पडला असला तरी तो मराठी भाषेला व संस्कृत साहित्याला मुळीच पारखा झाला नाही. त्याच्या रसिकतेत पक्षपातीपणा नव्हता. उलट व्यापकता होती. रघुनाथ पंडितांच्या नलदमयंती आख्यानाचा आणि नवनीतातील अन्य कवितांचा ठसा त्याच्या मनावर उमटला. त्यामधील कविता तो आपल्या आईला व बहिणींना म्हणून दाखवून मोठ्या रसिकतेने अर्थ सांगे. मराठीवरील अकृत्रिम प्रेम वाढण्यास अधिक साधने घरीच होती असे विठ्ठल रामजी नमूद करतात. श्रीधर, महिपती, तुकाराम, ज्ञानेश्वर वगैरे मराठी कवींच्या आणि संतांच्या ग्रंथांचे पारायण स्वतः त्यांचे बाबा करीत असत. ते वाचून इतरांस पुराणिकांप्रमाणे अर्थ सांगत असत. विठ्ठलही आपल्या वडिलांचे अनुकरण करून हरिविजय-पांडवप्रतापासारखे ग्रंथ चौथ्या-पाचव्या इयत्तेतच वाचून आपल्या वर्गातील मुलांना त्याचा अर्थ सांगत असे.
सहाव्या इयत्तेत संस्कृतचा त्याचा परिचय झाला. श्री. गणेशशास्त्री जोशी या नावाचे जुने शास्त्री त्यांना संस्कृत वाङ्मय शिकवीत असत. अधिक वाचन करण्याच्या हेतूने शास्त्रीबुवांच्या घरी इतर विद्यार्थ्यांसमवेत विठ्ठल जात असे. शास्त्रीबुवा गोठ्यात गाईचे शेण काढीत असताना तोंडात तंबाखूचा बार भरून, त्याच्या मधून मधून पिचकार्या मारीत, इतके तिकडे फिरत या मुलांना रघुवंशातील श्लोक सांगत. बाणभट्टाची कादंबरी आणि अन्य वाङ्मय गणेशशात्र्यांनी अत्यंत रसिकतेने या विद्यार्थ्यांना शिकविले. आपण जातीने मराठी म्हणून शास्त्रीबुवांनी कधीही भेदभाव दाखविला नाही असे विठ्ठल रामजींनी आवर्जून नमूद केले आहे.
हायस्कूलमध्ये विठ्ठल रामजींनी अभ्यासात जी गती दाखविली तिचे श्रेय ते आपल्या रसिकतेला देतात; बुद्धिमत्तेला नव्हे. त्यांनी म्हटले आहे की, ''गणित असो वा शास्त्र असो, भाषा असो वा व्याकरण असो, परकीय इंग्रजी असो वा मृत संस्कृत असो की मातृभाषा चालू मराठी असो, माझी गती सारखीच अकुंठितपणे चाले. सर्व हायस्कूलच्या अभ्यासक्रमात मला अभ्यासाचे श्रम म्हणून कधी भासलेच नाहीत. ह्याचे कारण माझ्या बुद्धीचे तेज नसून (मी बुद्धीने साधारणच आहे) केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हे मला येथे नमूद करावयाचे आहे. ही रसिकता मला शाळेपेक्षा घरातच अधिक, गुरूपेक्षा माझ्या आईबापांकडूनच जास्त मिळाली हे खास. माझ्या घरी जातिभेद नव्हता, तसा माझ्या हृदयात संस्कृतिभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता. सौंदर्य जेथे भेटेल तेथे ऊर्ध्वहस्ताने स्वीकारण्यास मी लहानपणापासूनच एका पायावर तयार आहे. मग ते इंग्लंडातले असो की स्वदेशातले असो, शहरातले असो की खेड्यातले असो, संस्कृत असो की प्राकृत असो, ते सहज व स्वाभाविक असले की पुरे. मी त्याला बिलगलोच म्हणून समजावे.''२
सोबती व खेळ
इंग्रजी पहिल्या इयत्तेत असताना विठ्ठलाचा वडील भाऊ परशुराम हा अकाली मृत्यू पावला हा त्याच्या मनावर मोठाच आघात होता. जोपर्यंत हा वडील भाऊ जिवंत होता तोपर्यंत त्याच्या मागे मागेच दुय्यमाप्रमाणे लहान विठ्ठल वागत असे. आपल्याला सांभाळून घेणारा शांत स्वभावाचा वडील भाऊ परशुराम वारल्यानंतर विठ्ठलाला एकाएकी उघडा पडल्यासारखे वाटले. भाऊ होता तोपर्यंत भावंडे हेच त्याचे मित्रमंडळ होते. दुसर्या इयत्तेत गेल्यानंतर व अभ्यासात प्रगती दिसू लागल्यानंतर, वर्गात कायमचा पहिला नंबर पटकावीत राहिल्यानंतर विठ्ठलाभोवती सोबत्यांचा घोळका कायम जमू लागला. सुरुवातीला त्याच्या मित्रमंडळात मराठा, लिंगायत, न्हावी, मुसलमान अशी मुले असायची. तो वरच्या वर्गात जाऊ लागल्यानंतर ब्राह्मणेतर मित्रमंडळी मागे पडून ब्राह्मण मुलांची मित्रमंडळात संख्या वाढली. विठ्ठल रामजींचा वाडा एकीकडे निवांत होता. अभ्यासाला बसावयाला जागा पुष्कळ होती. पुस्तकांचा साठा भरपूर. अभ्यासात अडचण आली तर सांगायची विठ्ठलाची सदैव तयारी. सोबत्यांवर अकृत्रिम प्रेम करणारे आईबाप, यामुळे विठ्ठलाच्या भोवती सदैव सोबत्यांचा गराडा असायचा. अभ्यास करीत करीत खेळ आणि खेळत खेळत अभ्यास असा ह्या मुलांचा कार्यक्रम असायचा. तिसर्या इयत्तेपासून सातवीअखेर पाच वर्षांपर्यंत त्यांचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार विद्यार्थी वसतिगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना होता असे त्यांनी वर्णन केले आहे. त्यांच्या मित्रमंडळात तिसर्या-चौथ्या इयत्तेत दामू रानडे, सखाराम गोखले, वामन घारे यांची भर पडली. तर पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून विष्णू देशपांडे, हणमंत कुलकर्णी, रामू पाटील, अंतू हनगंडी इत्यादिकांची भर पडली. मुधोळच्या शाळेतून आलेली ही सर्व मुले देशस्थ ब्राह्मणांची होती. त्यांच्या आईबापांनी एका घरी जेवणा-राहण्याची त्यांची सोय करून दिली होती. ती सर्व विठ्ठल रामजींच्या घरी त्यांच्या भावंडांप्रमाणे नेहमी पडून असत. सातव्या इयत्तेत कुंदगोळाहून जनार्दन सखाराम करंदीकर हे जमखंडीच्या शाळेत आले. पुढे ते व विठ्ठल रामजी बी. ए. पर्यंत बरोबर शिकत असत. अखेरपर्यंत ते त्यांचे स्नेही होते. तेरदाळचे विष्णुपंत देशपांडे हे तर विठ्ठल रामजींचे आयुष्यभराचे जिवलग मित्र राहिले. या हायस्कूलच्या काळातच ह्या मित्रमंडळींच्या सहवासात विठ्ठल रामजींच्या ठिकाणी असणारी पुढारपणाची क्षमता दिसून येते. त्यांची अनेकांना बरोबर घेऊन जाण्याची तयारीही याच काळात झाली असे जाणवते.
खेळ
विठ्ठलाचा स्वभाव आणि शील बनण्यात सोबत्यांच्या सहवासाचा त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबरच्या खेळाचा मोठा भाग होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात जमखंडी गाव खेडेवजाच होते. खेळायला मोठमोठी क्रीडांगणे व खेळ शिकविणारे शिक्षकही होते. पण खेड्यांतील संस्कृतीमध्ये साधनांवर अवलंबून असणारे खेळ खेळता येत नसले तरी साधनाशिवायचे खेळ नैसर्गिक वातावरणात मनसोक्त खेळले जात. विठ्ठलाचे बाबा स्वतः फारसे बैठे खेळ खेळत नसले तरी त्यांनी गंजीफा, बुद्धिबळे, सोंगट्यांचे हस्तिदंती फासे वगैरे खेळांची साधने घरी करून ठेवली होती. लहानपणी विठ्ठल बैठा खेळ खेळायचा तो म्हणजे सोंगट्यांचा. त्याचा वडील भाऊ होता तेव्हा दिवाळीच्या सणात सोंगट्यांच्या खेळाची धमाल चालू असे. हा खेळ मोठ्या ईर्षेचा. चिडून भांडल्याशिवाय या खेळाची समाप्ती व्हायची नाही. एका एका बाजूला दहा-बारा गडी बसलेले असायचे. खेळ संध्याकाळी चालू होऊन उजाडेपर्यंत चालायचा. भांडण केव्हा केव्हा हातघाईवरही यावयाचे. त्यांचा आलगूरचा मामा वडील भावापेक्षा एक-दोन वर्षांनी मोठा होता. तो विरुद्ध बाजूला असे. मामा फार विनोदी, रडी खेळणारा, चिडखोरांना अधिक चिडवून मजा बघणारा आणि पट्टीचा पहिलवान, दुसर्याला चिडवून स्वतः मात्र कधीच चिडत नसे. भांडण हातघाईवर आल्यावर गलिव्हरच्या अंगावरील लिलिपुटाप्रमाणे विठ्ठल आणि परशुराम हे दोघे बंधू मामाच्या पाठीवर चढून लाथा-बुक्क्यांचा मारा करीत आणि मामा मात्र खाली वाकून त्यांना अधिकच खिजवीत असे. स्वयंपाकघरातून आई येऊन आपल्या भावालाच नावे ठेवीत हे गमतीचे भांडण सोडवीत असे. मोकळ्या जागेत खेळावयाचे मैदानी खेळ म्हणजे आट्यापाट्या, हुतुतू, खो-खो हे खेळही मुले खेळत असत. त्याशिवाय किर्र नावाचा आडदांडपणाचा खेळही खेळायचे. त्याशिवाय सूरपारंब्या, सूरपाट्या हे खेळ हमखास दुखापती करून देणारे, कपडे फाटणारे खेळ मोठ्या हिरिरीने खेळत असत. ह्या खेळणार्या मुलांच्या टोळीचा मुख्य नायक म्हणजे विठ्ठल. गावचे लोक, विशेषतः शिक्षक मंडळी, ह्या मुलांच्या खेळाचे कौतुक करीत असत. विठ्ठल हा खेळगड्यांचा कंपू घेऊन दरसाल उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कुठेतरी नदीच्या काठी किंवा डोंगराच्या दरीत वनभोजनाला जात असे. त्यांच्यात लिंगायत, मराठे, ब्राह्मण, मुसलमान वगैरे सर्व जातींचे विद्यार्थी असत. जातिभेद त्यांच्या गावी नव्हता. सोवळी पोरे ह्या कंपूच्या वार्यालाही उभी राहत नसत. जनुभाऊ करंदीकर असल्या सोवळ्याचा होता. विठ्ठलाच्या वाड्यात हा कंपू रात्रंदिवस पडलेला असे. मोठ्या अंगणापासून आत स्वयंपाकघरापर्यंत व देवघरापर्यंत त्यांचा धुडगूस चाले. विठ्ठलाच्या दोन बहिणी जनाक्का व तान्याक्का ह्या लहान अल्लड असत. त्याही मुलांच्या धांगडधिंग्यात सामील होत. विठ्ठलाच्या आईला कोणीच भीत नसत. तिला सर्व आपलीच पिले वाटत. कित्येक वेळा स्वयंपाकघरातील खाण्याच्या पदार्थावर हल्ला होई. त्यांचे गरिबीतील शिळे तुकडे तेरदाळचा विष्णू आणि जमखंडीचा सिनू ही श्रीमंतांची मुले मिटक्या मरीत खात. मग विठ्ठलाच्या आईला अपरंपार प्रेम वाटणे स्वाभाविक होते. विठ्ठल रामजींच्या भावी चरित्राची, समाजसुधारणेची ही पूर्वचिन्हेच होती. त्याचे चरित्र असे अंगणातल्या जिवंत धांगडधिंग्यात आणि समानशील सवंगड्यांच्या धसमुसळेपणाच्या जिव्हाळ्यात जन्म पावत होते.
लहान विठ्ठलाच्या वर्तनातील वेगळेपणा, धाडशीपणा व विक्षिप्तपणा त्याच्या लहानसहान खोड्यांतून दिसून येत असे. (जमखंडीचे श्रीमंत अप्पासाहेब यांनी रामतीर्थ ह्या डोंगरावर आपली वस्ती मांडली व बसवन्ना या लिंगायत देवाची यात्रा रामतीर्थ लोकप्रिय करण्यासाठी वर डोंगरात आपल्या राहण्याच्या जागी नेली.). रामतीर्थास जाण्यासाठी एक वरची डोंगराची व दुसरी खालची सपाट, गाड्या वगैरे जाण्यासाठी, अशा दोन वाटा असत. ह्या दोन्ही वाटा सोडून अगदी डोंगराच्या माथ्यावरून मेलगिरी लिंगाप्पाच्या देवळामागून रामेश्वराच्या देवळाला जाण्याची नवी टूम विठ्ठलाने काढली. ह्याचे कारण पावसाळ्यात डोंगरावरची व भोवतालच्या दूरवर मैदानी प्रदेशातील शोभा फार सुंदर दिसत असे.
विठ्ठलाच्या लहानपणीच्या वागण्यात धाडशीपणा आणि अर्कटपणा कधी कधी डोकावत असे. रामतीर्थ डोंगरावर विषारी काळे विंचू अथवा इंगळ्या भरपूर असत. ह्या इंगळ्यांनी नांगी मारली की प्राणांतिक वेदना होत असत. हे विंचू धरून त्यांची लांबलचक माळ करण्याची खोड या मित्रमंडळाला लागली होती. विठ्ठल विंचू धरण्यात धीट आणि पटाईत होता. विंचवाच्या नांगीतले विष काढून त्याला अगदी तळहातावर घेऊन इतर मुलांना चकित करीत असे. विंचू नजरेस पडला तर तो आपली नांगी प्रथम वर करतो. विठ्ठल मोठ्या शिताफीने ती नांगी चिमटीत घट्ट पकडत असे. मग नखावर त्याच्या नांगीचे टोक घासले म्हणजे विषाचा एक बिंदू बाहेर निघे. मग विंचू निस्तेज होऊन आपोआप नांगी खाली टाकी. मग त्याला हातावर घेण्यात कोणताच धोका नसे. तरीही इतर मुले हे धाडस दाखवीत नसत. विठ्ठल मात्र हे धाडस दाखवून हातावर विंचू घेऊन फुशारकी मारीत असे. घरात किंवा शाळेत विंचू निघाला तर तो पकडण्याचे काम विठ्ठलाचे. एखादे वेळी गडबडीत विंचू चावला तरी अभिमानास पेटून विठ्ठल त्या वेदना मुकाट्याने सहन करायचा.
दुखणे आले अथवा जबर इजा झाली तरी विठ्ठल विव्हळत नसे. स्वस्थ घुमेपणाने पडून राही. ''विठ्या, तू काय बेरड आहेस रे'' असे आई उद्गारी. ही स्पार्टन सहिष्णुता आपल्यात जन्मजात नसून ती मानीपणाने आणल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शाळेत शिक्षकाकडून छडी खाण्याचा प्रसंग विठ्ठलावर येत नसे. पण केवळ आपल्या अंगी सहनशीलता बाणावी यासाठी एखाद्या मुलाला आपल्या हातावर जोराने छडी मारावयास तो सांगत असे. तळहात काळा-निळा झाला तरी त्याच्या तोंडातून हूं की चूं निघत नसे. या प्रकारची सहनशीलता त्याने आपल्या ठिकाणी जाणीवपूर्वक बाणवली होती. आपली सहनशीलता अजमावण्यासाठी सहाव्या-सातव्या इयत्तेत असताना विठूने एक भयंकरच प्रकार करून घेतला. अपण किती वेदना सहन करू शकतो हे अजमावण्यासाठी नेहमीचे मित्रमंडळ बसले असता व्यंकू कुलकर्णीला आपल्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागील भागावर एक जळती उदकाडी ठेऊ दिली. विठ्ठलाच्या तोंडातून वेदनेचा एखादा शब्दही उमटला नाही, की चेहर्यावरून अथवा डोळ्यावरून वेदनेचे कोणतेही चिन्ह दिसले नाही. उदकाडीच विझू लागली. विठूच्या आईने इतक्यात अकस्मात येऊन पाहिले. ती खूप रागे भरली. त्यांच्या उजव्या हाताच्या मागे लहानसा व्रण अखेरपर्यंत होता. धाडसाची आणि विक्षिप्तपणाची लकेर त्यांच्या पुढच्या आयुष्यातही अनेकदा चमकून जाताना दिसते. १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना पन्हाळगड, विशाळगडाची सफर त्यांनी केली. तेव्हा किल्ल्याच्या अवघड जागी चढून जाऊन बसणे त्यांना आवडायचे. पुढे इंग्लंडला गेल्यावर लेक डिस्ट्रिक्ट्समधील 'लीथ्स कॉटेज' ह्या प्रो. कार्पेंटर यांच्या घरी इतर सहाध्यायांसमवेत ते सुटी घालविण्यासाठी प्रोफेसरांच्या निमंत्रणावरून गेले होते. सूर्योदय पाहण्यासाठी रात्री उठून डोंगराच्या शिखरावर जावयाचे ठरले होते. भल्या पहाटे अंधाराच्या वेळी डोंगराची काही वाट चढल्यानंतर पाऊस पडला. बाकीची सारी मंडळी परतली. परंतु विठ्ठल रामजी मात्र एकटेच पुढे निघाले. खूप पाऊस आल्यामुळे त्यांना डोंगरातील एका छोट्या गुहेत उजाडेपर्यंत भुतासारखी रात्र काढावी लागली. ह्याच सुटीमध्ये सगळ्या मंडळींसमवेत ते वनभोजनास गेले असता मंडळी स्वच्छंदपणे हिंडत होती. एका उंच झाडावर चढण्याची विठ्ठल रामजींना हुक्की आली व ते पायात बूट असताना कसेतरी चढले; परंतु बूट घसरू लागल्यामुळे उतरणे त्यांना जमेना. मंडळीत बूट कोढणेही अशिष्टपणाचे वाटले. अखेर एका फांदीच्या वर जाऊन ती वाकवून त्यांनी खाली उडी घेतली त्या वेळी तर मिसेस् कार्पेंटरनी किंकाळीच फोडली. पुन्हा असला प्रकार करू नकोस म्हणून त्यांनी गंभीरपणाने त्यांना बजावले. स्कॉटलंडातील सरोवर प्रांतात रोज वीस-पंचवीस मैल चालत जाऊन उंच डोंगराच्या शिखरावर ते एकटेच तासनतास बसत. रॉवरडेनॉन नावाच्या खेड्यात ते एका गरीब कुटुंबात उतरले होते. तेथील लहान मुलांना घेऊन ते लॉख लोमंड सरोवरावर एकदा फिरायला गेले. सरोवरात पोहोण्याची त्यांना लहर आली. कपडे काढून उडी घेतली. जरी उन्हाळ, होता तरी सरोवराचे पाणी इतके थंड होते की पाण्यात पडल्याबरोबर ते गारठले. हातापायांत गोळे येऊ लागले. मोठ्या प्रयासाने ते काठाला लागले. लहान मुले घाबरून गेली. सुदैवाने जिवावरचा हा प्रसंग टळला.
खोडकर स्वभावामुळे जमखंडीस विठ्ठलावर आणि मित्रमंडळावर खोड मोडावी असा एक बिकट प्रसंग आला होता. शिमग्याच्या दिवसात बाबांचा डोळा चुकवून ही मुले उनाडक्या करीत फिरत असत. त्याचा अतिरेक म्हणजे वेश्यांच्या आळीत बदफैली लोकांच्या नावाने शिमग्यातल्या अचकट बिचकट म्हणी म्हणत, अभद्र ध्वनी काढीत मध्यरात्र उलटून जाईपर्यंत हिंडत. एकदा विठ्ठल काही मुलांबरोबर एका वेश्येच्या घराजवळ वाईट गाणी म्हणत, शंखध्वनी करीत गेला व मुलांच्या नादी लागून तिच्या दाराशी दंगामस्ती करू लागला. आतून बाळा काणे नावाचा एक तरुण ब्राह्मण त्रासून आला व त्याने विठ्ठलालाच पकडले. याच शिक्षकाने विठूला शाळेत घालण्याचा प्रथम मुहूर्त करण्याचा धडा घालून दिला होता. हा शिक्षक फार रागीट, दांडगा व शाळेत मुलांना गुरासारखा झोडपणारा होता. संतापून त्याने विठूचे डोके धरले. त्याच्या हातात विठूचा रुमाल राहिला व त्याने सुंबाल्या केला. बाळा काण्यांच्या हातून आपण सुटलो खरे पण रुमालाशिवाय घरात बाबांपुढे कसे जाणार अशी फिकीर त्याला पडली. शेवटी वडील भाऊ परशुराम काण्यांकडे गेला. विठू, परशुराम रामजीबुवांचे मुलगे असे कळल्यावर त्याचीच भीतीने गाळण उडाली. रुमाल परत देऊन झालेली गोष्ट बाबांना कळवू नको अशी विठूच्या भावाचीच तो गयावया करू लागला. व्यक्तिगत आणि सामुदायिक खोड्यांचे आणि व्रात्यपणाचे कितीतरी प्रकार विठ्ठल रामजींनी केले होते. ह्या त्यांच्या खोड्यांतून काहीतरी वेगळे करण्याचा धाडशीपणा दिसून येतो, त्याचप्रमाणे त्यांची विलक्षण सहनशीलताही दिसून येते.