1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

मुंबई येथील मानपत्रास उत्तर

काल मी स्टेशनवर उतरल्यापासून माझा जो सन्मान केला जात आहे, तो सन्मान माझा नसून अस्पृश्यतेच्या कार्याचा, माझ्याबरोबर सहकार्य करणा-यांचा तो गौरव आहे, अशा भावनेनेच मी माझ्या मनाविरुद्ध हे मानपत्र स्वीकारण्याचे कबूल केले. माझ्या ह्या कार्यामध्ये मला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, युरोपियन, पार्शी ह्या सर्वांनी मदत केलेली आहे, पण ती माझ्यावर मेहेरबानी होय असे मी समजत नाही. तर त्यांनी आपले कर्तव्यच बजावले, पूर्वऋण फेडले असे मी म्हणतो. हिंदुस्थानातील अस्पृश्यतेच्या ह्या कलंकाबद्दल व घोर अन्यायाबद्दल सर्व जग, सर्व मानवजात अपराधी आहे, असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. ह्या कार्यास माझ्या भगिनी, आईबाप ह्यांनी रात्रंदिवस झटून मदत केलेली आहे. विरोध तर नाहीच नाही, नुसता आशीर्वादही नव्हे तर ह्या कार्यामध्ये माझे नोकर म्हणून माझ्या आईबापांनी मिशनमध्ये काम केले आहे. ग्लोब मिलच्या आजूबाजूची वस्ती म्हणजे पूर्वी नरकपुरीच होती, त्या ठिकाणी हरिजनांच्या आजारी बायांना आपल्या अंथरुणात निजवून घेऊन माझ्या आईने त्यांची सेवा निरपेक्षबुद्धीने केलेली आहे. महार, मांग, चांभार, धेडही प्रथम आम्हांला शिवून घेत नसत, मी कोणी ख्रिस्ती आहे, किंवा सरकारचा बगलबच्चा आहे, म्हणून ते आमच्याकडे पहात असत. वर्गणी जमविताना शिव्यांची लाखोली ऐकून घ्यावी लागे. कोणा आजा-याचे पथ्यपाणी करण्याकरिता माझ्या भगिनीला घरचा स्टोव्ह घेऊन जावे लागे, कारण आजारी हरिजनाच्या चुलीस शिवण्याची आम्हांस बंदी असे. खरोखरच त्यांच्या चुली पवित्र आहेत म्हणून अस्पृश्यतेच्या कार्याचे पावित्र्य निदर्शनास येत आहे. स्वराज्य मंदिरातील लाकडी दारे मोकळी केल्याने अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा होणार नाही, पण आत्मिक दारेच उघडण्याने ते कार्य होणार आहे. महात्मा गांधी आज येथे आले असते तर त्यांना पूर्वीच्या एका गोष्टीची मी आठवण करून दिली असती. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, ‘गांधीजी मी मोठा देशद्रोही (फूट नोट – २३ एप्रिल १९२५.) (Traitor) आहे, कारण मला तुमचे स्वराज्य नको आहे, स्वराज्याचा नाद सोडून प्रथम तुम्ही महारवाड्यात जाऊन रहा कसे व प्रथम त्यांची अस्पृश्यता नष्ट करा पाहू, नंतर स्वराज्याच्या पाठीमागे लागा !’ महात्माजी त्यावेळी हसले व म्हणाले, ‘मि. शिंदे तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण सध्या तरी मला माझ्या मताप्रमाणे वागू द्या.’

तुम्ही इतका खटाटोप करून प्रेमाचे प्रदर्शन केले. तेव्हा मानपत्र न स्वीकारणे म्हणजे माझ्यावर कृतघ्नपणाचा दोष आला असता म्हणूनच मला मान वाकवावी लागली, पण हे मानपत्ररूपी धन मी एक ट्रस्टी ह्या नात्याने ट्रस्ट म्हणून स्वीकारीत आहे. ह्या मानपत्रामुळे मी तुमचा केव्हाही मिंधा रहाणार नाही. मी जनाचे ऐकेन, पण मनाचेच करीन. प्रेमाच्या आंधळेपणामध्ये एका वक्त्याने मला विष्णू, महाविष्णू म्हटले, पण आईने आपल्या मुलास सोन्या, राजा, रत्ना म्हणण्यासारखेच ते आहे. अस्पृश्यता अजून नष्ट झालेली नाही, व ती नष्ट करण्याचा आपण कसून प्रयत्न कराल ह्या अटीवर मी ह्या मानपत्राचा स्वीकार करीत आहे. प्रथम आम्ही मिशन काढले, हरिजनापासून मदत घ्यावयाची नाही, असा आमचा दंडक असे, पण पंधरा वर्षांनी त्यांचा उद्धार करण्यास ते समर्थ आहेत व तसेच झाले पाहिजे म्हणून सर्व मिशन आम्ही त्यांच्या हवाली केले. ईश्वर करो आणि ही अस्पृश्यता लवकरच नष्ट होवो !

मार्सेय शहर

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड

ता. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मार्सेय जवळची टेकडी दिसू लागली. आगबोट बंदरावर पोचल्यावर काही वेळाने न्याहारी आटपून आम्ही ‘पर्शिया’चा निरोप घेतला आणि ९|| वाजता युरोपच्या किना-यावर पाय ठेविला. ज्यांच्या मार्फत आम्ही तिकीट काढिले होते, त्या कुक कंपनीचे दुभाषे आमची वाट पाहात बंदरावर उभे होतेच. त्यांपैकी एकाने आमचे सर्वही सामान आपल्या ताब्यात घेतले. हिंदुस्थानचे आम्ही पाच विद्यार्थी आणि एक व्यापारी एकत्र होतो व लंडनपर्यंत मिळूनच गेलो. आम्हा सर्वांना लंडनला लवकरच जावयाचे होते म्हणून आम्हांस मार्सेय येथे १२च तास रहावयास सापडले. पण तितक्याच वेळात जेवण वगैरे लवकर आटोपून मार्सेयचा पहावेल तितका भाग पाहिला. आमच्या व्यापारी पारशी सोबत्यास फ्रेंच भाषेत थोडीशी जीभ हालविता येत होती, त्याचा आम्हास अतोनात फायदा झाला. त्याच्याशिवाय आम्ही सर्व कान असलेले बहिरे आणि तोंड असलेले मुके झालो होतो. वरील दुभाष्याने मोठ्या आदबीने आमची सर्व सोय करून ‘हॉटेल डी जि नीव्ही’ नामक खाणावळीच्या एजंटाशी आमची गाठ घालून दिली. दोन-प्रहरच्या फराळास बराच अवकाश होता, म्हणून आम्ही खाणावळीत विना कारण खोलीचे भाडे भरीत न बसता शहर पाहण्यास बाहेर पडलो. मार्सेय हे फ्रान्स देशातील दुस-या प्रतीचे शहर व पहिल्या प्रतीचे मोठे महत्त्वाचे बंदर आहे. आम्ही ज्य धक्क्यावर उतरलो, तो म्हणण्यासारखा सुंदर नव्हता व स्वच्छही नव्हता. फ्रेंच लोकांच्या नख-याविषयी व छानीविषयी माझी जी कल्पना होती, तिच्यामुळे माझी सकृद्दर्शनी थोडी निराशा झाली. पण जसजसा मी शहरात शिरू लागलो, तसतशी ही निराशा कमी होऊ लागली आणि काही भागातील रस्त्यांची शोभा व दुकानांचा थाट पाहून तर ती अजीबात नाहीशी झाली. आणि मुंबईचे उत्तम रस्तेही ग्राम्य वाटू लागले. पण स्वच्छतेच्या मानाने पाहिल्यास मुंबईला तिच्या काही गल्ल्यांची पावसाळ्यातील मासलेवाईक स्थितीची आठवण झाल्याबरोबर ही देखील तुलना करू नये असे वाटले. रस्ते बहुतेक फरसबंदीचे आहेत. काही ठिकाणी अगदी एका नमुन्याच्या घरांची रांग लागते. विजच्या ट्रॅम्स्, घोड्यांच्या ट्रॅम्स, ऑम्नीबसेस आणि घोड्यांच्या व गाढवांच्या लहानमोठ्या गाड्या वगैरेंचा रस्त्यातून एकच घोळका चाललेला असतो.

अशा रस्त्यातून आम्ही चाललो असता रस्त्यातील निदान अर्ध्या तरी लोकांचे डोळे आमच्याकडे लागले. का? तर मी डोक्यावर आपला गुलाबी फेटाच घातला होता म्हणून. एके ठिकाणी गाडी ठरविण्यास आम्ही एकदोन मिनिटे उभे राहिलो, तर आमचेमागे लहान मोठ्या स्त्री-पुरूषांची मोठी गर्दी जमली! माझ्या एका डोक्याशिवाय आम्ही सहाहीजण जरी नखशिखांत साहेब बनलो होतो, तरी हा प्रकार घडू लागला. जर आम्ही सर्व आमचे सगळे निरनिराळे देशी पेहराव करून बाहेर पडलो असतो, तर रस्त्यात काय अनर्थ घडता कोण जाणे. तरी पण माझ्या एका फेट्यामुळे काही कमी खळबळ उडाली नाही. बायका आपल्या लहान मुलांस कडेवर किंवा खांद्यावर घेऊन आम्हांकडे बोट दाखवू लागल्या. तरूण मुली घरात पळत जाऊन इतरांस बाहेर बोलावून आम्हांस पाहात उभ्या राहत. या त्रासामुळे माझे सोबती थोडेसे कुरकुरू लागले व मलाही अडचण वाटू लागली. आगबोटीवरदेखील यासंबंधी बरीच चर्चा झाली. मार्सेय बंदरावर बोटीवरून उतरताना आमच्या बरोबर येणा-या एका सिव्हिलियनाने मजजवळ येऊन मोठ्या आस्थेने विचारले की, कायहो, हे तुमच्या डोक्यावरचे तुम्ही लंडनपर्यंत कायम ठेवणार की काय? लंडनची मुले वात्रट आहेत, ती तुम्हांस त्रास देतील. माझ्या पोशाखाची तो विशेष कळकळ दाखवू लागला, हे पाहून मी त्यास विचारले की, विलायतेस पोलीसची व्यवस्था चांगली आहेना! यानंतर विशेष बोलणे झाले नाही!

फ्रेंच लोक सर्वांपेक्षा अधिक उल्हासी व रंगेल आहेत, शहरातील पुष्कळ लोक घरी जेवणाची दगदग न करिता खाणावळीतच जेवतात, वगैरे गोष्टी मी मागे एका प्रवासवर्णनात वाचल्या होत्या. त्यांपैकी एक प्रकार असा आढळून आला की, मुंबईतल्या इराण्यांच्या दुकानाप्रमाणे येथे खाण्यापिण्याची आरामस्थाने गल्लोगल्ली पुष्कळ आहेत. दुकानासमोर रस्त्याच्या बाजूने मोठे उघडे पटांगण असते. त्यात शेकडो खुर्च्या व टेबले मांडलेली असतात. येथे जेवणारांची गर्दी जमलेली असते. ही ठिकाणे स्वच्छ, सुंदर व भपकेदार असतात. रस्त्यातील गर्दीकडे पहात व चकाट्या पिटीत हे लोक उपहार करीत असतात. दुसरा एक चैनीचा प्रकार असा आढळला की, काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंस उंच व दाट झाडे लाविली आहेत, ही झाडे वर एकात एक इतकी मिसळून गेली आहेत की., भर दोनप्रहरी देखील या रूंद रस्त्यात गर्द छाया असते. अशा ठिकाणास येथे वुलवर्ड असे म्हणतात. जागजागी विश्रांती घेण्यास बाके ठेविली आहेत. ह्या रस्त्यातून गाड्याघोडी जात नाहीत. त्यांच्यकरिता दोन्ही बाजूने वाटा करून दिलेल्या आहेत. मधून रिकामटेकडे हिंडत असतात किंवा बसलेले असतात.

आम्ही ‘नॉटर डेम् द ला गार्ड’ नावाचे देऊळ पाहून परत खाणावळीत जेवणास गेलो व जेवण आटोपल्यावर लगेच पॅलेस डिला शांप नावाचा महाल पाहावयास गेलो. हा महाल एका लहानशा टेकडीच्या बाजूवर बांधला आहे. त्याचे पहिले दोन मजले टेकडीतच कोरले आहेत व बाकीचे मजले त्यावर उभारले आहेत. ही एकंदर इमारत अर्धवर्तुळकार आहे. हिच्यापुढे रस्त्यापर्यंत सारखे उतरते पटांगण विस्तीर्ण पसरले आहे. त्यावर रसरशीत गवताचे आणि नानाविध रंगांच्या कोमल वनस्पतींचे गालिचे अंथरले आहेत. दोहोंबाजूंच्या गालीच्यांची शोभा पाहत पाहत आम्ही चढण चढून वर गेलो. तो एका बाजूस पोस्टाच्य पेटीसारखी एक पेटी ठेवलेली दिसली. आमच्यातील एकाने तिच्या एका फटीतून आत एक पैसा टाकिल्याबरोबर दुस-या एका फटीतून मार्सेयच्या एका सुंदर इमारतीचा फोटो बाहेर पडला. ह्या इमारतीचा समोरचा तळमजला टेकडीच्या खडकात कोरून काढला असून, ह्या ठिकाणी कोरीव लेणे फार पाहण्यासारखे आहे. येथे अर्धवट अंधार आहे. पोखरून काढलेल्या भरभक्कम खांबाभोवती आणि पुतळ्यांच्या आजूबाजूला खडकातून झिरपणा-या झ-याचे पाणी खेळत आहे. शांत समयी हे एकांतस्थळ पाहून असे वाटते की, निसर्ग आणि मानवी कला ह्या जोडप्याचे हे जणू क्रीडास्थानच असावे. महालाच्या ह्या मधल्या भागाच्या दोन्ही बाजूंस अर्धवर्तुलाकार दोन दालने आहेत. एका दालनात अनेक प्रकारच्या जनावरांची व पक्ष्यांच मृत शरीरे व इतर पदार्थ ह्यांचा मोठा संग्रह व्यवस्थेने लावून ठेविला आहे. आणि दुस-या दालनात खालच्या मजल्यात पुतळे व वरच्या मजल्यात चित्रे ह्यांचा संग्रह ठेविला आहे. ह्यांपैकी बहुतेक चित्रे आणि मूर्ती नग्न होत्या. त्यांत विशेषेकरून काही सुंदर तरूण स्त्रियांची चित्रे तर केवळ नग्न आणि नैसर्गिक स्थितीत इतकी हुबेहूब दाखविली होती की, आम्हा पौरस्त्यांस तिकडे पाहिल्याबरोबर पराकाष्ठेची शरम वाटून, चित्रांतील सुंदरींचा जणू अपमान केल्याप्रमाणे खेद वाटे. तसेच यावरून फ्रेंच लोकांच्या सौदर्याभिरूचीचाही मासला कळतो. ही चित्रे सुप्रसिद्ध व सुसंस्कृत चिता-यांच्या मनांतून व हातांतून उतरली असल्यामुळे एकावर चित्त गुंतले, ते येथेच गुरफटून राही. इतक्यात सहज दुसरीकडे नजर गेल्याबरोबर तिकडेच लक्ष लागे. हा देखावा पाहून आम्हांस असे वाटू लागले की, दैवी सौंदर्य आणि मानवी चातुर्य ह्या दोन्हींची आम्हांस ह्यापूर्वी नीटशी कल्पनादेखील नव्हती. काव्य, इतिहास नाटक, पुराण, दंतकथा, प्रवासवर्णन, भूगोल, खगोल आणि दुस-या अनेक शब्दसृष्टींचे प्रतिबिंब ह्या चित्तवेधक चित्रसृष्टीत परावृत्त झाले होते. हाच मासला पुतळ्यांचाही. असो, अशा प्रकारचा हा संग्रह अफाट असून आम्हांला वेळ तर फारच थोडा होता. आणि शहरात अशी ठिकाणे आणखी किती होती कोण जाणे. अशा स्थितीत आमच्या मनाची किती ओढाताण झाली हे सांगताच येत नाही.

मार्सेयमध्ये व पॅरिसमध्येही एक चमत्कार दिसला. तो हा की ४–५ ठिकाणी बायकांच्या ओठावर मिशा दिसल्या! एका वृद्ध बाईला तर अगदी खास वस्त-याची गरज लागत होती, असे दिसले, कारण तिच्या हनुवटीवर गालावर आणि ओठावर करड्या रंगाचे राठ खुंट वाढले होते. एकदोन युवतींच्या ओठांवर कोवळ्या व निळसर केसांच्या दाट पण आखूड मिशा पाहिल्या. ह्या नटव्या फ्रेंच बायकांनी कसली तरी तेले लावून आपले केस कृत्रिम रीतीने वाढविले असल्यास न कळे!

जेवण वगैरे आटपून रात्री ८ वाजता आम्ही स्टेशनावर गेलो. तेथे कुक कंपनीचा दुभाषा आमचे सर्व जड सामान घेऊन आमची वाट पाहत हजर होताच. आमच्यासाठी एक रिझर्व्हड २ –या वर्गाचे कंपार्टमेंट घेऊन त्यात आमची सर्व सोय त्याने लावून दिली, आणि आम्ही ८-४० ला पॅरीसला निघालो. थंडी फार पडली असल्याने आम्ही दारे पक्की बंद करून जवळ असेल तितका गरम कपडा अंगावर घेऊन स्वस्थ गुरफटून निजलो. तो सकाळी ६ वाजता डी जॉन स्टेशनावर जागे झालो. गाडीचा वेग दर तासास ५०-६० मैलपर्यंत होता. डब्यांची रूंदी किंचित जी. आय. पी. पेक्षा जास्त असते. प्रत्येक डब्यात लांबीच्या बाजूने सुमारे ३ फूट रूंदीचा भाग गॅलरीसारखा खुला असतो. ह्या गॅलरीतून गाडीच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत गाडी चालू असतानादेखील जाता येते. आगबोट बंदरावर पोहोचल्याबरोबर जरूरीच्या उतारूस ताबडतोब नेण्यास ‘पी. अँड ओ. स्पेशल’ तयार असते, ती मार्सेयहून जी लगेच निघते ती कॅलेवरच थांबते. त्या गाडीत एक भोजनाचा स्वतंत्र हॉल आणि निजण्याच्याही खोल्या असतात. डी जॉन स्टेशनापासून तो पॅरीसपर्यंत, वाटेत शेते, कालवे, द-या, बोगदे, गावे इ. चा सुंदर देखावा गाडीतून दिसला. पाऊस एकसारखा सपाटून पडत होता. फ्रेंच लोकांची सौंदर्याभिरूची त्यांच्या शेतातूनही दृष्टीस पडते. ह्यांची शेते म्हणजे केवळ बागच! कालव्याच्या काठी झाडे लागली होती, ती जणू कवाइतीलाच उभी आहेत असे वाटे. जागोजाग खेडी लागत, ती खेडी नव्हत, चित्रेच ती! फ्रान्सची शेते सकाळच्या वेळी गाडीतून धावत असताना प्रथमच पाहून एकाद्या नवख्यास, इतर ठिकाणी राजा होण्यापेक्षा, फ्रान्समध्ये शेतकरी होणे बरे, असे वाटल्यास त्यात नवल काय?

मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती-२

काय ते विरक्ति न कळे आम्हां| जाणे एका नामा देवाजीच्या||
नाचेन मी सुखे संतांचिये मेळी| दिंडी टाळ घोळी आनंदीया||
कासया उदास होऊ देहावरी| अमृतसागरी बुडोनिया||
कासया एकांत सेवू तया वना| आनंद या जनामाजी असे|
तुका म्हणे मज आहे हा भरंवसा| विश्वेश सरसा चालतसे||

सभोवतालच्या मनुष्यांविषयी आदरबुद्धी राखिली, म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा आपण कशी संपादन करतो हे मागे सांगितले. आता मनुष्यावर प्रीती केली म्हणजे ईश्वरविषयक भक्ती कशी वाढते हे आपण पाहू.

एकाचा दुस-याशी जो स्नेहसंबंध जुळतो तो केवळ कर्तव्यबुद्धीचा किंवा शासनाच्या किंवा कसल्याही दाबामुळे ओढूनताणून आणलेला नसतो, तर तो एक मनाचा स्वाभाविक ओढा असतो. स्वार्थत्याग करून जगाच्या कल्याणाकरिता स्वत:ची आहुती देणे ह्यापेक्षा खाजगी स्नेहसंबंध वाढविणे हा ईश्वरभक्तीचा सुलभ उपाय आहे. ह्या स्नेहसंबंधामुळेच एक व्यक्ती दुस-या व्यक्तीशी गुंतलेली दिसते. ह्यामुळे जगामध्ये आनंद दृष्टीस पडतो. ह्यांच्या अभावी सर्वत्र अंध:कार दिसेल. ह्याकरिता हा संबंध वाढविण्याची योग्य खबरदारी घेणे हे एक आपले परमार्थाचे दुसरे प्रापंचिक साधन आहे.

ज्या दोन व्यक्तींमध्ये निष्काम स्नेहाचा पवित्र संबंध जडतो, त्या दोघांमध्ये सारखेच गुण असतात असे नाही. दोघांमध्ये भिन्न भिन्न सुंदर गुण असून एकाचे गुण आकर्षण करण्याची चुंबकशक्ती दुस-यामध्ये असते. किंबहुना एकमेकांच्या काही क्षम्य उणेपणामुळेही ही परस्पर चुंबकता जोरावते. ‘व्यतिषजति पदार्थानांतर: कोपिSहेतु:’ ह्या न्यायाने केव्हा केव्हा ह्या आकर्षणास विषय झालेला असा जो काही गुण असतो, तो दोघांसही न कळता, गुणांची छाया-प्रतिछाया, तन्मूलक भावनांचा आघात-प्रत्याघात परस्परांमध्ये होऊन त्या दोघांचेही दोष कमी कमी होत जाऊन गुण वाढत जातात, आणि भिन्न स्वभावाला हळूहळू एकात्मकता येऊ लागते. दोघांच्या भिन्न आदर्शाचे प्रतिबिंब परस्परांच्या मनांमध्ये पडून दोन निरनिराळे स्वभाव नसून ते जणू काय एकच आहे असे होते. योद्धा आणि कवी, मुत्सद्दी आणि तत्त्ववेत्ता, कर्ता पुरूष आणि लेखक, अशा भिन्न गुणांच्या मनुष्यांमध्ये स्नेह जुळून दोघांनाही स्वत:च्या आदर्शाची परिपूर्ती करावयास वाव मिळतो. ह्याप्रमाणे स्नेहाच्या ह्या दोन क्रिया आहेत. एक उणीव भरून काढणे आणि दुसरी आदर्श पूर्ण करणे.

रस्त्यात खेळत असताना लंगोटीयार एक, शाळेतला सोबती दुसरा, तरूणपणी तिसरा आणि वृद्धापकाळी निराला असे स्नेहसंबंध केव्हा केव्हा बदलत जातात, ह्यावरून त्याचे वर दर्शविलेले मूळ स्वरूप अस्थिर आणि खोटे आहे असे होत नाही. रस्त्यातल्यापेक्षा शाळेतला सोबती आपल्या मनाशी अधिक तादात्म्य पावतो. शाळेत स्वत: आपल्या मनाची वाढ आणि भूक वाढल्यामुळे संसारात शिरल्यावर आपल्यास शाळेतल्याहून थोर सोबत्याची जरूरी भासते. आणि वृद्धपणी ह्याहूनही निराळ्या सोबत्याची उणीव भासते. ह्यावरून स्नेहतत्त्वाचा अस्थिरपणा सिद्ध होत नसून ते विकासमान तत्त्व आहे हे दिसून येते. आपल्या स्वभावाची जसजशी वाढ होते तसतसे आपण निरनिराळे मित्र करीत असतो आणि उलटपक्षी जसजसे आम्ही निरनिराळे मित्र करू तसतशी आपली वाढ होत जाते. म्हणजे एका पायरीवरून दुसरीवर, दुसरीवरून तिसरीवर अशी आपण आत्मिक चढण चढत असतो. म्हणून ह्या अपूर्व संसारामध्ये स्नेहसंबंध ही पवित्र बाब आहे आणि तिचे अन्तिम पर्यवसान ईश्वरभक्तीमध्ये होणार असल्यामुळे ती एक आध्यात्मिक शिडीच होय.

प्रसिद्ध इंग्लिश राजकवी टेनिसन ह्याने “In memoriam” ह्या आपल्या काव्यात मित्रवियोगाच्या आपल्या दु:सह वेदनांचे जे काळीज करपून सोडणारे आणि डोळ्याला अंधेरी आणणारे वर्णन केले आहे ते वाचून वाचकांच्या मनाला प्रथम त्याच्या सत्यत्वाबद्दल किंचित शंका येऊ लागते. मरण हे सर्वांनाच येणार म्हणून मातेला कितीही सांगितले तरी ती आपल्या मुलाच्या मरणामुळे आक्रोश करणारच. पत्नी पतीकरिता, बंधू बंधूकरिता शोक करील, पण मित्र मित्राकरिता इतका शोक करील हे खरे वाटत नाही. हे कवीचे लाघव असेल असे वाटते. जात्या भ्याड कवी वीररसात्मक काव्य लिहिताना कल्पनेने ज्याप्रमाणे शौर्याची भावना आपणांमध्ये आणतो, त्याप्रमाणे टेनिसनने कवित्वाच्या जोरावर हे काल्पनिक वर्णन केले असावे असे प्रथम वाटते, पण अधिक विचार केल्यावर आणि त्या काव्याचे पुन:पुन्हा परिशीलन केल्यावर, त्या कवीचे नव्हे, तर साधारण मानवी कल्पनाशक्तीच्या संबंधानेही आपण फार कोती समजूत करून घेतली असे दिसून येईल. टेनिसनला खरोखरच दु:सह वेदना झाल्या, ह्याचे कारण त्याचे आपल्या मित्रासी तसेच अभेद्य तादात्म्य झाले होते आणि त्याचा भंग झाल्यामुळे त्याला वेदना होत होत्या. अशा तादात्म्याचा ज्यांना अनुभव नाही आणि कल्पनाही नाही त्यांना ते वर्णन नुसते कवीचे लाघव वाटणे साहजिक आहे. मित्राच्या जिवास त्याचा जीव लागून गेल्यामुळे व त्याशी एकाकार झाल्यामुळे त्याच्या वियोगामुळे आपले अर्धे अंग कापून गेल्याप्रमाणे त्यास वेदना होऊन लागल्या. परंतु ह्या वेदनांमुळे त्याला नुसता प्राकृत माणसाप्रमाणे शोकच होऊन राहिला असे नाही. शोक तर झालाच, पण क्रमाक्रमाने त्यामध्ये अति गंभीर विचारजागृती होऊन हळूहळू थोर तत्त्वांचे दर्शन होऊ लागले. विरह, उद्वेग, निराशा, विचार, शंका, आशा, श्रद्धा आणि शेवटी आनंद अशी त्याच्यामध्ये आध्यात्मिक अनुभवाची परंपरा उत्पन्न झाली. ज्या मित्रावर आपण जीव की प्राण असे प्रेम केले तोच जणू आपल्या आकुंचित कुडीतून उडून जाऊन दशदिशा फाकला, जो आपल्या प्रेमाचा साठा आणि विनाशी विषय होता तो आता सर्वत्र पसरलेला आणि अनंत काळ टिकणारा असा झाला. अज्ञेयवादी टेनिसन स्नेहसंबंधाच्या प्रभावामुळे किंबहुना त्याच्या विरहामुळे श्रद्धाळू आणि आनंदवादी भक्त बनला.

असा आमच्या ह्या प्रापंचिक स्नेहाचा महिमा आहे. तो संबंध आम्ही निष्ठेने जर चालवू तर तो फलदायी होईल. कोणी म्हणेल स्नेहसंबंध ही स्वाभाविक बाब आहे तर तेथे निष्ठेची काय जरूर आहे? तो आपोआप वाढत जाईल. पण मनुष्यस्वभावामध्ये जशी संघातक तशीच विघातकही बीजे आहेत. आणि कित्येक वेळां जसे आंतरिक दोषामुळे तसेच बाह्य उपाधीमुळेही आपल्या स्नेहाच्या प्रवाहात विक्षेप घडतो. अशा वेळी आपल्या अंगी निष्ठेचे बळ असल्यास ह्या विघ्नातून आपण पार पडू. प्रवाहातून पोहत जाणारा मनुष्य भोव-यात सापडला असता त्याच्या अंगी कस असल्यास तो त्या भोव-यास फोडून बाहेर पडतो. एरवी त्यातच बुडून जातो. त्याप्रमाणे आपण स्नेहसंबंध निष्ठेने चालविण्याचे बळ अंगी संपादिले तर अंतर्बाह्य कारणामुळे वेळोवेळी घडणा-या ह्या आमच्या स्नेहसंबंधाच्या प्रवाहातील विक्षेपाच्या भोव-यामधून आम्ही पार पडू. एरवी तो संबंध मध्येच तुटून गेल्याची अनेक उदाहरणे आढळतात. अशा रीतीने आमरण स्नेहसुख भोगून जर मित्रवियोग घडला तर तो वियोगच, टेनिसनला अनुभव आल्याप्रमाणे, ईश्वरी दर्शनास कारण होईल. ह्याप्रमाणे परलोकाप्रत गेलेल्या आपल्या मित्रावर निष्कामवृत्तीने केलेल्या प्रेमामध्ये अविनाशी अनंत भक्तीची बीजे कशी रूजलेली असतात हे कळेल. सुरवंटाचा जसा पतंग बनून तो सर्वस्थळी आनंदाने वावरू लागतो, तसा आमचा विदेही मित्र सर्वव्यापी झाला असता आमचे मनही त्याच्या मागोमाग भ्रमण करीत सर्वव्यापी होते. ह्यापरती ईश्वरभक्ती वेगळी कोठे राहील? अशा मित्राचा वियोग झाला तर काही वेळ आपण गडबडून जाऊ, पण पुढे विवेकासहित आपल्यामध्ये वैराग्याचे बळ उत्पन्न होऊन, सर्व जग माझा मित्र आहे असे आपणांस वाटेल. आपली आकुंचित वृत्ती नष्ट होईल, आपणांस आनंदीआनंद होईल. असे सुखवादी झालो म्हणजे आपण ईश्वरभक्त झालो असे म्हणावयाचे. मग तुकारामाने सांगितल्याप्रमाणे-

ऐसे भाग्य कई लाहाता होईन| अवघे देखे जन ब्रह्मरूप||
मग तया सुखा अंत नाही पार| आनंदे सागर हेलावती||

हा अनुभव आपणांस येईल. पण त्यासाठी अगोदर आपण आपल्या भोवतालच्या मनुष्यामध्ये स्नेहसंबंधाचे वलय वाढवावे. मनुष्यावर प्रेम न करता मी ईश्वराचा भक्त आहे असे कोणालाही म्हणविता येणार नाही. ह्याकरिता राजाने प्रजेवर, पतीने पत्नीवर, धन्याने चाकरावर हाच स्नेहसंबंध प्रेम किंवा निष्ठा ठेवून वाढवावा. म्हणजे त्याचा लय ईश्वरभक्तीमध्ये होईल.

मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१

परमार्थाची प्रापंचिक साधने

मानवी आदर आणि दैवि श्रद्धा|
सेवा-भक्ती-भाव, नेणे मी पतित||
-तुकाराम

परमेश्वरावर प्रथम भाव ठेवणे, त्यासच आपल्या प्रेमाचा विषय करणे, त्याची इच्छा तीच आपली इच्छा अशा भावनेने त्याची सेवा करणे आणि ह्या तीन साधनांच्याद्वारे प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित ह्या कर्मबंधनातून मुक्त होणे, ह्या परमार्थाच्या चार पाय-या आहेत. परंतु परमेश्वराचे स्वरूप म्हणजे अगदी अतर्क्य आणि अज्ञेय हा अनुभव लहानमोठ्या सर्वांसच येतो. “न कळे महिमा वेद मौनावले| जेथे पांगुळले मन पवन|” असे संत सांगतात. तर मुळी समजण्यासच कठीण, अशा परमेश्वरावर भाव कसा ठेवावयाचा,भक्ती आणि सेवा कशी करावयाची आणि मुक्त कसे व्हावयाचे? आम्ही प्रापंचिक माणसे, आमच्या अल्पशक्तीचा आणि वेळेचा बराच भाग आमच्या प्रापंचिक गोष्टीतच खर्च होणार. बाल्य, जरा, व्याधी इत्यादिकांमध्ये आमच्या आयुष्याचा बराच भाग निकामी होणार. अशा स्थितीत परमेश्वरासंबंधी भाव, भक्ती, सेवा ही प्रत्यक्षपणे आमच्या हातून कशी घडावी? तशी आमची इच्छा असूनही, घडणे जवळ जवळ अशक्य आहे. म्हणून आमच्या प्रापंचिक व्यवहारातच जर कोणी असा मार्ग दाखवून दिला, आणि आमच्यातील परस्पर व्यवहारांना कोणी असे वळण लावून दिले की, त्याचे पर्यवसान वरील भाव, भक्ती, सेवा ह्यांमध्ये साहजिकपणे होईल, तर मोठी चांगली गोष्ट होईल. एरवी परमेश्वराविषयी कितीही दर्शने स्थापिली, कितीही कंठरवाने उपदेश केला, तरी त्याचा तादृश्य फायदा होणार नाही. प्रापंचिक व्यवहार आणि त्यातील  अपूर्णता समूळ नाहीशी होऊन, केवळ वरील पारमार्थिक भावनांचे साम्राज्य चालेल हे संभवत नाही. व्यक्तीविषयक अपवाद सोडून दिले, आणि सर्व मनुष्यजातीचा समवायाने परमार्थ साधावयाचा असला तर तो ह्या आमच्या रोजच्या प्रापंचिक व्यवहारालाच हळूहळू योग्य वळण देऊन साधणार आहे. म्हणून आम्हांस परमार्थाची काही प्रापंचिक साधने कोणी सांगेल तर तोच खरा उपदेशक.

परमार्थाच्या उपदेशकास प्रापंचिकांनी जर वर सांगितल्याप्रमाणे आपली अडचण कळविली तर ती अगदी योग्य होईल. आणि ती ध्यानात ठेवून उपदेशकाने आपला सर्व रोख अवश्य वळवावयास पाहिजे ह्यात संशय नाही. म्हणून आम्ही प्रथम ईश्वरावर आमची श्रद्धा प्रत्यद्ध एकदम जरी जडली नाही, तरी पर्यायाने कशी जडेल हे पाहू. संसारात इष्टमित्र, सखेसोयरे, आश्रितजन आणि परकीय ह्यांच्यामध्ये परस्परांचा नित्य संबंध येतो. त्यात असे एक वर्तनाचे कोणते तत्त्व आहे की, जे पूर्णपणे आणि निश्चयाने सांभाळिले असता त्याचे पर्यवसान ईश्वरी श्रद्धेमध्ये होईल? एकदम सांगावयाचे म्हणजे आम्ही जर परस्परांशी आदरबुद्धीने वागू आणि त्यामध्ये कधीही चूक होऊ देणार नाही, तर शेवटी आमची ईश्वरावर आपोआपच श्रद्धा जडलेली आहे असे आपणांस आढळून येईल. रोजच्या व्यवहारात मनुष्यप्राण्याशी किंबहुना भूतमात्राशी आदराने वागल्याने अपरिमित, अप्रमेय ईश्वरावर श्रद्धा ती कशी बसेल ह्याविषयी शंका उत्पन्न होईल. पण आदराचे हे व्रत अखंड चालविल्यानेच वरील शंकेचे निरसन होणार आहे. एरवी शाब्दिक युक्तिवादाने ते होणार नाही.

मनुष्यमात्राशी आदरबुद्धीने वागावे ही त्यातल्यात्यात सुलभ गोष्ट आहे. दुस-याने आपला अपराध केला तर त्याला क्षमा करावी, दुस-यावर आपल्या स्वत:प्रमाणेच प्रेम करावे, ह्या गोष्टी कठीण भासतात, इतकेच नव्हे तर त्या अधिक महत्त्वाच्या वाटतात. पण पुष्कळ प्रसंगी क्षमेचा आणि प्रेमाचा प्रसंगच येत नसूनही आपण क्षमा आणि प्रेम करीत आहो असे आपल्यास मात्र वाटत असते. क्षमा करावयाच्या पूर्वी दुस-याने खरोखरीच आपला अपराध करावयास पाहिजे. पुष्कळ वेळां असे घडते की, दुस-याकडून अपराध झालेला नसतो तो आम्ही उगाच मानून घेऊन क्षमा करीत असतो. आणि यद्यपि खरोखर अपराध झाला असला, तरीक्षमा करण्याचा अधिकार आपणाकडे न घेता तो ईश्वराकडे सोपविणे अधिक श्रेयस्कर असते. काही झाले तरी क्षमेची भावना आपल्या मनात येत असता दुस-यांच्या दोषांच्या जाणिवेचा थोडाबहुत विटाळ आपल्या मनाला होतोच. आदरबुद्धीचा तसा प्रकार नाही. सर्व मनुष्यांस आपल्यासमान लेखणे हा आदरबुद्धीचा अर्थ आहे. दुस-याचे दोष दिसल्याबरोबर आपल्या दोषांचे स्मरण होणे, दुस-यांची पापे पाहिल्याबरोबर जणू काय ती आप-या हातून घडली, असे वाटून त्याविषयी अनुकंपा बाळगणे हे आदरबुद्धीचे लक्षण. दुस-याच्या शरीराला क्षत पडल्याबरोबर आपल्या मनाला दु:ख होते, तर दुस-याच्या मनाला क्षत पडल्याबरोबर आपल्या मनाला जास्त दु:ख व्हावयास पाहिजे. पण असे न होता, दुस-याच्या मनाचा उणेपणा अथवा अपराध नजरेस आल्याबरोबर आपण आपल्यामध्ये क्रोध आणि तिरस्कार ह्यास जागा देतो. ह्याचे कारण मनुष्यमात्रासंबंधी आपल्यामधील आदरबुद्धीचा अभाव हेच होय. ‘आत्मवत् सर्वभूतानि य: पश्यति स पश्याति|’ हे आदरबुद्धीचे योग्य प्रवचन आहे. आदरबुद्धी म्हणजे केवळ औपचारिक ओढून ताणून आणलेला दरबारी संभावितपणा नव्हे. मनुष्याचे मन-मग तो मनुष्य कसाही असो-ही एक आदरणीय वस्तू आहे, सुखदु:ख, पाप आणि पुण्य ह्या सर्व स्थितीत ह्या मानवी मनाशी अन्यायाने, बेपर्वाईने, निष्काळजीने कधीही वागता कामा नये, अशी आपल्या मनाला संवय लावावी. सर्व प्राणिमात्रांच्या जीवास धक्का न लागावा, म्हणून अहिंसेचे जे तत्त्व आम्ही आचरितो, ह्याच तत्त्वाचा अधिक परिणत विकास म्हणजे मानवी मनाशी आपल्यामध्ये आदराची उपजतबुद्धी राखणे हे होय.

एकाच कुटुंबामधील माणसे पुष्कळ मागे परस्पराशी भांडून रूसतात आणि अलग होतात. पण कौटुंबिक रक्तसंबंधामध्ये असे काही अपूर्व रसायन आहे की, त्यायोगे हा रूसवा-फुगवा लवकरच नाहीशी होऊन ती एकत्र होतात. परंतु परकीयाशी बेबनाव झाला तर आपल्यामध्ये वरील उपजत आदरबुद्धीचे रसायन नसल्यास हा तुटलेला संबंध पुन्हा जुळून येत नाही. पण ह्या आदराच्या भावनेत आम्ही नित्य वागू लागलो, तर संसारातील ब-याच कटकटीच्या प्रसंगी आपल्या मनाला जखमा होणार नाहीत; झाल्या तरी त्या लवकर भरून येतील आणि मनाची पुष्कळ मोडतोड आणि झीजही होणार नाही.

ही आदरबुद्धी खालील तीन प्रकारांनी पाळण्याचे व्रत धरिले पाहिजे; जसे आपले विचार आपल्यास प्यारे असतात तसेच आणि तितकेच दुस-यांचेही विचार त्याना प्यारे असतात तसेच आणि तितकेच दुस-यांचेही विचार त्याना प्यारे असतात ही गोष्ट अगदी उघड आहे. तथापि एकाद्या विषयावर आपण चर्चा करू लागलो, तर ही गोष्ट आपण पार विसरून जातो,  आणि चर्चा करणारे दोन्ही पक्ष आपले विचार आपल्यास प्रिय आहेत एवढ्याच समजुतीने बोलू लागतात. आपल्याला दुस-यास जे सांगावयाचे ते त्याला त्याचे विचार ‘प्रिय आहेत हे आपण जाणतो’ असे दाखवून नंतर सांगावे. प्रतिपक्षाला एकदा हा आमच्यातील आदरभाव समजला म्हणजे वादाची तीव्रता बरीच कमी होऊन जाते, नाही तर तो आमचा एक शब्दही ऐकणार नाही व जर ऐकू लागलाच तर त्याचा आमच्याविषयी गैरसमज होईल. प्रथमारंभीच आदराच्या ह्या नियमाची हेळसांड करून आपण वादविवाद करू लागल्यास वाद एका बाजूस राहून द्वंद्व माजते व प्रकरण हातघाईवर येते. ज्याची मते ज्याला त्याला प्रिय असतात, म्हणून कोणास कोणी काही सांगू नये असा ह्याचा अर्थ नव्हे. परंतु त्याला मान्य नसलेले असे काही आपण त्याला सांगावयाचे असते, म्हणून आपण त्याची तयारी करण्यासाठी त्याच्या मताविषयीचा आपला पूज्यभाव त्याच्या मनावर चांगला ठसविण्याची जरूरी आहे.

दुसरा प्रकार, दुस-याच्या मनोवृत्ती सांभाळणे हा होय. आपल्याप्रमाणेच दुस-यालाही वृत्ती आहेत, आणि दुस-याप्रमाणेच आपल्यामध्येही व्यंगे आहेत. दुस-याने जर आपल्याशी सांभाळून वागावे असे आपणांस वाटते तर आपणही दुस-याशी तसेच वागले पाहिजे. नाही तर बेपर्वाईने, बेगुमानपणाने, व्याख्यानाच्याद्वारे, वर्तमानपत्राच्याद्वारे किंवा अन्य त-हेने आम्ही आपला हलगर्जीपणा दाखविला तर त्याचा दुष्परिणाम दोघांनाही भोवतो. तिसरा प्रकार हा की, केवळ दुस-याचे दोषच सांभाळून न राहता दुस-याच्या गुणांचे आणि कृतीचे योग्य मंडन केले पाहिजे. एकाद्याच्या हातून काही कृत्य घडले व ते लोकांच्या कानी घातल्यापासून फायदा आहे अशी आपली खात्री झाली तर, त्याची प्रसिद्धी करणे आपले कर्तव्य आहे आणि तसेच दुस-याच्या आनंदाने आपण आनंदी होणे हे मोठेपणाचे लक्षण आहे.

ह्याप्रमाणे आम्ही जर मनुष्यमात्राशी आदराने वागू तर ह्याच प्रापंचिक आदरबुद्धीचा विकास ईश्वराच्या ठायी आमची श्रद्धा जडण्यामध्ये होईल. तुम्ही प्रेम करा, न करा, क्षमा बाळगा न बाळगा, पण हा आदरभाव कायम ठेविल्यास प्रेम आणि क्षमेचे श्रेय येईल. घडोघडी संबंध जडणा-या मनुष्याशी अनादराने वागून अदृश्य ईश्वरावर श्रद्धा ठेवणे कधीतरी आम्हांला संभवनीय होईल काय? पाया आणि तळमजला असल्याशिवाय वर भरभक्कम किल्ला आहे हे मानणे जसे वेडगळपणाचे होईल, तसे आदर नसताना मी श्रद्धावान होईन हे म्हणणेही वेडगळपणाचे आहे. ईश्वर मला तारो वा मारो, मी त्याचे पाय दृढ धरीन, त्याचे रूप कसेही असो त्याची वसती मजमध्ये आहे असे मी मानीन, पण शेजारच्या मनुष्याशी माझा आदरभाव आहे की नाही इकडे लक्ष देणार नाही हे म्हणणे चमत्कारिक दिसते. उलटपक्षी आपण ह्या प्रपंचामध्ये ह्या आदराचा सुलभ मार्ग चालून जाऊ, तर काही काळाने आपल्यामध्ये आपोआप ईश्वरी श्रद्धेचा साक्षात्कार होईल, म्हणूनच तुकाराम म्हणतात:

नको मज ताठा नको अभिमान|
तुजवांचुनि क्षीण होतो जीव||१||

मागासलेले व अस्पृश्य

[विठ्ठलराव शिंदे, निपाणी येथे १९१६ साली भरलेल्या मागासलेल्यांच्या परिषदेस गेले होते. तेथून परत आल्यावर ते लोणावळे येथे सर नारायण यांच्या भेटीस गेले होते. त्यावेळी झालेले संभाषण].

विठ्ठलराव शिंदे- मी, निपाणी येथे नुकतीच जी मागासलेल्या वर्गाची परिषद झाली तिच्या बैठकीस गेलो होतो. ही परिषद पन्नास वर्षांपूर्वी जोतिबा फुले ह्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या तर्फे भरली होती. परिषदेचां पुढाकार कोल्हापूरचे भास्करराव जाधव ह्यांनी घेतला होता. परिषदेला पुष्कळ लिंगायत व जैन गृहस्थ आले होते. ब्राह्मणांच्या विरूद्ध परिषदेचा कटाक्ष होता. सुमारे १५०० माणसे जमली होती. त्यात वरील गृहस्थांशिवाय माळी, तेली वगैरे जातींच्या लोकांचा अधिक भरणा होता. अस्सल मराठे जे आपल्याला क्षत्रिय म्हणवितात त्यांच्यापैकी फार थोडे लोक परिषदेस हजर होते. दोन दिवस परिषदेची बैठक चालू होती. अनेक ठराव पास झाले, त्यात ब्राह्मणांना कुटुंबातील पुरोहितपणाचीकार्य करावयास बोलावू नये. मागासलेल्या जातीत शिक्षणाचा प्रसार जारीने करण्याचे प्रयत्न करावे हे मुख्य विषय होते. ब्राह्मणांच्या विरूद्ध ह्या परिषदेतून पुष्कळ भाषणे झाली. ह्या परिषदेनंतर मागासलेल्या वर्गाच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे त्याचा विचार करण्यासाठी निराळी राजकीय परिषद भरली होती.

सर नारायण- पण काय हो, ह्या परिषदेत अस्पृश्य वर्गाच्या लोकास येण्याची परवानगी होती काय?

विठ्ठलराव शिंदे- त्यांचेकडून परवानगी मिळणे शक्य नाही, हे जाणूनच त्या वर्गातील कोणी लोक आले नाहीत.

सर नारायण- तुम्ही तर अस्पृश्यता निवारक मंडळीचे चिटणीस, त्यांच्या उन्नतीसाठी झटणारे आणि मग येथे अस्पृश्यांना मज्जाव होता अशा परिषदेला तुम्ही हजर कसे राहिलात.

विठ्ठलराव शिंदे- त्यांनी आपल्या परिषदेचे मला आमंत्रण दिले आणि मी गेलो. माझ्याप्रमाणे सव्हँट ऑफ इंडिया सोसायटीचे नारायणराव जोशीही आले होते. परिषदेनंतर कित्येक जैन, लिंगायत व इतर गृहस्थांनी आपल्या मिशनच्या शाळा येऊन पाहिल्या. परंतु ते आपल्या परिषदेमध्ये अस्पृश्यांना येऊ देणार नाहीत, आमच्या सारख्यांची त्यांना सहानुभूति हवी आहे म्हणून त्यांनी आम्हाला आमंत्रणे पाठविली इतकेच.

सर नारायण- पण ह्या लोकांना अस्पृश्यांसंबंधी काही सहानुभूती तरी वाटते काय?

विठ्ठलराव शिंदे- त्यांना काही सहानुभूती वाटते असे मला वाटत नाही. माझा तर असा अनुभव आहे की, मागासलेले म्हणून आपल्याला म्हणविणा-या लोकांपेक्षा अस्पृश्यांच्या उद्धाराविषयी ब्राह्मणांनाच अधिक कळकळ वाटत असून त्यांचीच ह्या कामी अधिक सहानुभूती आहे.

सर नारायण- दक्षिणप्रांती मी गेलो होतो तेव्हा मलाही तुमच्यासारखाच अनुभव आला.

  1. महाराष्ट्र सुधारक आगळा
  2. महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
  3. मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
  4. मरण म्हणजे काय?
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
Page 14 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी