महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन

यंदा रा. विठ्ठलराव शिंदे ह्यांस कीर्तन करण्याची विनंती करण्यात आली होती. खरे पाहता त्यांचा हा प्रथमच प्रयत्न होता. असे असूनही कीर्तन एकंदरीने चांगल्या रीतीने पार पडले हे कळविण्यास फार आनंद वाटतो. मागच्या साथीवर कीर्तनाचे यशापयश थोड्या अंशी अवलंबून असते. ती साथ असावी तशी नसूनही बुवांच्या प्रयत्नास यश आले. ह्या प्रसंगासाठी मंदिर सालाबादप्रमाणे विशेष रीतीने पुष्पमालांनी शृंगारले होते. बुवा अननुभवी आहेत हे माहीत असूनही कीर्तनास बरीच मंडळी आली होती. मात्र स्त्रियांचा जमाव दरसालपेक्षा थोडा कमी होता असे वाटते. असो. बुवांनी मंगल चरणानंतर परमेश्वरास वंदन करून सद्गुरू रामकृष्णपंत व आपले तीर्थरूप रा. रा. रामजी बसाप्पा ह्यांच्या चरणांचे वंदन करून व त्यांचा आशीर्वाद घेऊन कीर्तनास प्रारंभ केला. विषयोपदेशासाठी त्यांनी-

कारे हरी अंतरी आठवाना ||धृ०||
संसारदायक साधकबाधक|
सर्व चिंता दिगंता पाठवाना||१||
परात्परेश्वर चिंतुनी सादर|
मदमत्सर सागर आखाना||२||
केशव पंडित स्वामी अखंडित|
मने मनी लोचनी सादवाना||३||

हे केशव स्वामीचे पद घेतले होते. संसारामध्ये साधकबाधक, लाभदायक आणि त्रासदायक अशा दोन्ही बाजूंचा अनुभव येत असतो. आणि तो करीत असता काळाचा फेरा केव्हा येईल ह्याचा नेम नसतो, आणि लोक तर धर्मसाधनामध्ये निमग्न न राहता भलत्यासलत्या मार्गाचे अवलंबून करीत असतात आणि असुरी संपत्तीचा मात्र पदरी मनमुराद संचय करतात. देवधर्माच्या कार्यात मग्न राहिल्यासारखे करून खुद्द देवाला सांदीमध्ये ठेवून भलत्याच वस्तूवर देवत्व आरोपून वेडे वेडे प्रकार करतात. हे पाहूनच एकदा नाथांनी पुढील उद्गार काढले.

दादा या जनांसी काय बा झाले? ||धृ०||
शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडुनी उंच बसविले,
अंकलारूनी वस्त्र गुंडाळिले, त्यासी भलतेचि नाव ठेविले रे ||दादा||
शुद्ध उदके करूनी भिजविले, गंध पुष्पे लावुनि झाकिले,
धूप दावुनि दोष उजळिले, हात दाखवुनि चालविले रे ||दादा||
मागे पुढे करूनि भोवंडिले, आपआपणा नाही उमजले,
एका जनार्दनी व्यर्थ गेले रे ||दादा||

परंतु लुंग्यासुंग्या देवाच्या मागे न लागता एका परमेश्वराच्याच सेवेमध्ये रत राहण्याचा व त्यालाच शरण जाण्याचा जरी निश्चय केला तरी मन काही ठिकाणावर राहत नाही. दंभ होतो व त्या दंभाच्या भरामध्ये आपण आपल्याकडे भलताच मोठेपणा घेऊन आपणच देव होऊन बसतो! ज्यांना जागृती होते तेच पुढील पद्यातील अर्थाचे उद्गार काढतात व धन्यतेच्या स्थितीचा त्यांना लाभ होतो.

मेरा हिरा हरा गया कचरनमो||धृ०||
कोई गंगा कोई जमुना जावे|
कोई मथुरा कोई काशी मो||१||
कोई सुरत कोई मुरत पूजे|
कोई पाणी कोई पथर नमो||२||
सुरनर मुनिजन हिरा पावे|
भूल गये सब नरवर नमो||३||
धर्मदास प्रभू हिरा पावे|
बांधलीया जिने आंचल नमो||४||

बाळकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला हे आख्यान लाविले होते. ह्या आख्यानाच्या रूपकाच्या दृष्टीने बुवांनी अर्थ करून श्रीकृष्णाने भागवत धर्म संस्थापिला, तो सद्धर्मगोप्ता होता, तो भागवत धर्माचा, भक्तिमार्गाचा प्रस्थापक कसा होता हे दाखविले.