एक पाहतसा एकांची दहने| सावध त्या गुणे कांरे न व्हा||१||
मारा हाक देवा भय अट्टाहासे| जव काळा ऐसे जाले नाही||२||
-तुकाराम
मनुष्यजात-सर्व प्राणिमात्रही-ज अगणित काल एकेकांशी दहने पहात आली आहे. पण ती त्या गुणे व्हावी तितकी सावध झालेली दिसत नाही. उलट हल्लीचा दुष्काळ, प्लेग आणि बंधुघातकी संग्राम इ. मुळे ह्या जातीकडून मरणाची ‘अतिपरिचयादवज्ञा’च होत आहे असे म्हटले तरी चालेल. तथापि जेव्हा एकाद्या महात्म्याच्या मरणामुळे ह्या मरणगुरूची मुलाखत घडते, तेव्हा पुन: आश्चर्य व प्रेरणा, भय आणि बोध इ. विषयक ह्याचा प्रभाव तीव्र वेगाने भासू लागतो. ज्या गुणावरून आमचा साधाभोळा तुकोबा आम्हांला सावध करू पाहत आहे, त्याच गुणाचा उल्लेख आधुनिक पंडितशिरोमणी भट्ट मोक्षमूलर हे धर्माचे मूळ धुंडीत असताना असा करीत आहेत:- “माणसाला (प्रथम) भयाने अट्टाहासे हाक मारण्याला लावणारी, त्यास जबरीने विचार करावयाला लावणारी-जर कोणती गोष्ट असेल तर ती नि:संशय मरण ही होय, आणि जगातल्या ज्ञानाच्या अतिशय महत्त्वाच्या व अक्षय भागापैकी काही भाग मरणाच्या दर्शनामुळेच प्रथम कसा लाभला, हे आता आपण पाहू.”
पण हे मरण म्हणजे केवळ भयावहच आहे असे नव्हे, तर ते आश्चर्यावहही तसेच आहे. किंबहुना आश्चर्याची परमावधीच ही. पशुपक्षीदेखील हे आश्चर्य पाहून थक्क होतात. आपला हालताचालता सवंगडी एकाएकीच अगदी स्तब्ध झाला हे पाहून मुकी जनावरे, पण तीदेखील कशी तटस्थ राहतात आणि त्यांची ती तटस्थवृत्ती पाहूनही किती आश्चर्य वाटण्यासारखे आहे. एक जनन शिवायकरून ह्या जगतात मरणाइतके दुसरे गूढ कोडे काय असू शकेल! ह्या घडीपर्यंत तो प्राणी ह्या शरीरात ठाणे देऊन भोवतालच्या अनंत विश्वात टेहळणी करीत होता, तो आता कोठे नाहीसा झाला! तो आहे की नाही, का असून नसल्यासारखा आहे! सुखदु:खाच्या त्याच्या वेदना कशा, त्याचा अनुभव काय, त्याची स्थिती कशी? हे व असे इतर प्रश्न विचारणे सोपे आहे, पण त्यास समाधानकारक उत्तर कसे मिळणार? पुनर्जन्म, पुनरूत्थान इ. मधुर मुग्ध कल्पनांनी का खरे सांत्वन होणार आहे? आत्मा अमर आहे, ह्या उपजत श्रद्धेचे अवलंबन करू म्हटले तर तीमुळेच ना ह्या सर्व आश्चर्याला अवकाश? ती नसती तर पाण्यात विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे हे शरीर पंचत्वाप्रत पावले आणि बाकी शून्य उरले म्हणून केव्हाच स्वस्थ बसता आले असते. पण तसे नाही. शरीर नाहीसे झाले तरी काही शिल्लक रहात असावी, पण त्या काहीच्या व आमच्यामध्ये ह्या मरणाने घनघोर अंधकाराचा पडदा सोडिला आहे. इतर पडद्याच्या आड एकादा पदार्थ झाला तर तो पदार्थ नाही दिसला तरी त्याला आच्छादणारा पडदा तरी दिसतो. पण येथे पदार्थही दिसत नाही व स्वत: पडदाही दिसत नाही! ही किती आश्चर्याची गोष्ट.
पण आश्चर्य ही ज्ञानाची पहिली पायरी होय. तीव्र आश्चर्य वाटले की आपण ज्ञानाच्या आई आणि मरण ही त्या आश्चर्याची आई. ह्यावरून मरण म्हणजे केवळ भयावह नाही, केवळ आश्चर्यावह नाही, तर ज्ञानावहही आहे. ते आमच्या ठायी प्रेरणा करते, आमच्या कानात महाबोधाची फुंकर मारते! तो महाबोध कोणता म्हणाल तर मोक्षमुलर सांगतात, ‘जेव्हा एकादा आपल्यासारखाच मित्र एकाएकी गार होतो तेव्हा जवळ उभा असलेल्यास (आमच्या प्राथमिक पूर्वजास) समजून येते की पूर्वी काहीशी वस्तू त्याच्या ठायी असे ती आता येथे नाही. काहीसे निघून गेले.’ आत्म्यासंबंधी व तद्वारा सर्व धर्मसंबंधी ही आद्य श्रुती होय. स्पेन्सरसारखे समाजशास्त्री व टायलरसारखे मानवविकासशास्त्रीदेखील धर्माचे मूळ शोधीत असता हीच साक्ष देतात की धर्म साक्षात्काराचे आदी साधन म्हणजे प्राथमिक पुरूषास झालेले मरणाचे प्रथम दर्शन हेच होय. ह्यावरून मृत्यू हा आम्हांला आमच्याविषयी आत्मबोध व भोवतालच्या अनंताविषयी परमात्मबोध करून देणारा आदी धर्मगुरू होय असे होते. ज्याप्रकारे आरोग्य नाहीसे झाल्याविना आम्हांला आरोग्याची प्रतीती होत नाही त्याचप्रकारे कदाचित ह्या मरणरूपी आदिगुरूच्या साहाय्यावाचून आम्हांस आत्मप्रतीतीच झाली नसती. असो, जरी मरणाचे योगाने एवढे मोठे मोठे लाभ झाले आहेत, तथापि स्वत: मरण म्हणजे काय हा आमचा पूर्वीचा प्रश्न अद्यापि तसाच राहिला आहे!
ह्या गहन प्रश्नाचे उत्तर असे सहज मिळणारे नाही. जरी मिळालेतरी ते पटणार नाही. मरण ह्याचा खरा अर्थ समजण्यास अगोदर जीवन ह्याचा खरा अर्थ कळला पाहिजे. तो खरोखर कळणे किती कठीण आहे! हे जीवन म्हणजे काय, उगम कोठून, अंत कोठे, आधार कसा,चालक कोण, त्याचा हेतू काय वगैरे गोष्टी कळण्यास किती कठीण, जवळजवळ अशक्यच नाहीत काय? असे असून काही वेदांती म्हणतात की, हे दृश्य जीवन, हे मायिक जग, हे व्यवहारिक सत्य कळण्यास फार कठीण नाही, हे पुष्कळांस समजते पण ते गूढ ब्राह्मिक जीवन (Esoteric Advait) ते तात्त्विक जग मात्र फार थोड्या अधिकारी पुरूषांसच कळण्यासारखे आहे. पण आम्हांला तर ह्याच्या उलट प्रकार भासत आहे. केवल व अनंत अशी वस्तू ह्या विश्वात एकच असणार, अनेक केवलांची व अनंताची बुद्धीस कल्पनाही करवत नाही. म्हणून ज्ञानवादाने नुसते अद्वैत प्रतिपादणे हे आमच्या मताला मोठेसे कठीण दिसत नाही. तत्त्वज्ञानात साधारण गती झाल्याबरोबर ‘एकमेवाद्वितीयम्’ हा महासिद्धांत उघड दिसू लागतो. पण खरी अडचण येते ती ह्या दृश्य जगाचीच मीमांसा करतेवेळी, आणि तिच्यासंबंधी तर काही वेदांती ही केवळ माया आहे. पोकळ भास आहे असे सांगून थोडक्यात आटपू पाहतात. ‘ब्रह्म सत्यं’ हे कबूल पण जगत् मिथ्या हे कसे? खरा अद्वैत सिद्धांत जो सर्व विचारी मनास ग्रहण करावाच लागतो, तो कायम ठेवून जगत् जे ब्रह्माचेच कार्य, त्याची समाधानकारक मीमांसा करणे हे फार कठीण येथेच मोठा अधिकार पाहिजे. दृश्य जग म्हणजे आमच्यासारख्या जीवांच्याच जीवनाचे बनले आहे. ह्या जीवनाची मीमांसा कशी करावी? ह्याचे लक्षण काय? ह्याच्यापाशी प्रस्तुत मरणाचा कसा संबंध आहे? ‘मरणं प्रकृति: शरीरिणां विकृतिर्जीवितमुच्यते बुधै:|’ म्हणजे देही जो आत्मा त्याच्या आयुष्यात देहाचे मरण ही साहजिक घडणारी गोष्ट आणि देहाचे जीवित तोच मात्र एक विकास आहे, असे कालिदास सांगतो आणि मोक्षमूलर आपल्या पत्नीस लिहिलेल्या एका पत्रात म्हणतो, * “आम्ही तर मरणाच्या अटीवरच ह्या पृथ्वीवर जन्मतो, आणि शेवटी मरणच आम्हांस विधात्याकडे नेते” व तो आपल्या एका मित्राच्या पत्रात म्हणतो, S“मरण म्हणजे एका जीवनातून दुस-या जीवनात जाण्यासाठी एक पूल बांधला आहे.” इजिप्शियन लोकांच्या अतिप्राचीन थडग्यात जी नानाविध सामग्री आढळते त्यावरूनही असे सिद्ध होते की, ते लोक मरण म्हणजे जीवनक्रमातलाच एक विशेष प्रसंग मानीत असत. असो, पण अशा ह्या मरणाचा अधिक विचार करण्यापूर्वी विशुद्धि माग्ग नावाच्या बौद्ध ग्रंथात ८ व्या भागात मरणाचे जे दोन प्रकार सांगितले आहेत त्यांचा उल्लेख करणे बरे. ते प्रकार म्हणजे एक अकाली मरण, दुसरे साहजिक मरण हे होत. जीवनशक्तीचा पूर्ण विकास होण्यापूर्वीच अगर तो होऊन त्याचा पूर्ण उपयोग होण्यापूर्वी बाळपणी अगर तरूणपणी जे मरण घडते ते अकाली होय. ख-या रीतीने पाहिले असता हे मरणच नव्हे, हा अपघात. येथे कर्माची काय गहन गती असते अगर दुस-या शब्दांनी म्हणावयाचे झाले, तर ईश्वरी कसली गूढ योजना असते, हे सांगणे आमच्या ज्ञानाबाहेरची गोष्ट आहे. असंख्यात बालमृत्यू झाले, अगणित अर्धवट वाढीचे तरूण गेले आणि जूलिअस सीझरसारखे किंवा जीजस ख्रिस्तासारखे पूर्ण विकासलेले महात्मेही मध्येच विराम पावले, ही सर्व अपघाताचीच कोटी. विश्वाच्या ह्या अवीट वखारीत ही अशी मोडतोड का होते, इतका कच्चाच माल तयार होऊन बाहेर आणखी कोठे व कशासाठी जातो व शेवटी
ब-याचशा पक्क्या मालाची अपघाताने अशी धूळधाम का उडते ह्या गोष्टीचा खुलासा त्या एका विश्वकर्म्याशिवाय इतरांस होणे हल्लीच्या स्थितीत तरी शक्य नाही. नसो, पण ज्याअर्थी हे अपघात म्हणजे मुळी ख-या रीतीने मरणाच्या कोटीतच येत नाहीत त्याअर्थी मरण म्हणजे काय ह्याविषयी विचार करीत असता अशा अपघाताची नीट उपपत्ती झाली नाही म्हणून काही हरकत नाही. कारण ती होण्यासारखी असली तरी करू पाहणे अप्रासंगिक होणार आहे. तर आपण दुस-या व ख-या प्रकारचे मरण जे साहजिक मरण ज्याच्यासंबंधानेच कालिदासाचे व मोक्षमूलरचे उद्गार वर दिले आहेत, आणि जे म्हणजेच आमच्या मायिक अथवा दृश्य (Phenomenal) जीवनाचा अंत आणि ब्राह्मिक अथवा तात्त्विक (Nuomenal) जीवनातला एक अति महत्त्वाचा प्रसंग होय. जे मरण जुलीअस सीझरला आले नाही तरी आगस्टस सीझरला आले, जे मरण येशूख्रिस्ताला आले नाही तरी गौतमबुद्धाला आले आणि जे मरण आता आमच्या महर्षी देवेंद्रनाथाला आले आहे, त्याचविषयी आता आपण काहीसा विशेष विचार करू या.
वर म्हटले आहे की, मरणाचा खरा अर्थ कळण्यास अगोदर आपल्यास जीवनाचा खरा अर्थ कळला पाहिजे. आता आपण अशी कोणती एक वस्तू आहे ती शोधू की, जी ह्या जीवनात सारभूत आहे, की जिच्यासाठीच आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, इतकेच नव्हे तर ह्या जीवनातून आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, की जिच्यासाठीच आम्ही ह्या जीवनास चिकटून राहतो आहो, इतकेच नव्हे तर ह्या जीवनातून बाहेर गेलेल्यासही जिच्यामुळे आपण आपल्याकडे ओढीत आहो. एकदम सांगून टाकावयाचे म्हटले तर ती वस्तू प्रेम ही आहे. ह्या प्रेमाविण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे नुसते अस्तित्व मात्र उरते, तुम्ही म्हणाल प्रेमाशिवाय कर्तव्य हे क जीवनाचे अंग आहे. पण कर्तव्य म्हणजे काय? केवळ नियम पाळणे. चंद्र, सूर्य, सारी जड सृष्टी सतत नियम पाळीत आहे आणि ती म्हणजे नुसत्या अस्तित्वापलीकडे काय आहे? तुम्ही म्हणाल जाणीव हेही एक दुसरे अंग आहे, पण जाणीव म्हणजे काय? केवळ बिंबप्रतिबिंब भाव. स्वच्छ आरशातही हा भाव असतो. म्हणजे आरशात जशी बाह्य वस्तूचे प्रतिबिंब दाखविण्याची शक्ती आहे तशी मनात जी शक्ती आहे ती जाणीव आणि हा आरसा, अथवा ही प्रतिहत पारदर्शकता म्हणजे काय, तर केवळ अस्तित्व! केवळ अस्तित्वमय कर्तव्यातून जीवनमय कर्तव्यात आम्हांस कोण आणून सोडतो! एक प्रेम. केवळ अस्तित्वमय जाणिवेतून म्हणजे बिंबभावातून जीवनमय जाणीवेत अगर ज्ञानात आम्हांस कोण आणते? एक प्रेम! तर जीवनाचे खरे लक्षण आणि सार, प्रेम हेच नव्हे काय?
पण प्रेम ह्या शब्दाची व्यवहारात केव्हा केव्हा अगदी भलत्याच अर्थी योजना होत असते. एकाद्याचे एकाद्या वस्तूवर प्रेम जडते म्हणून तो त्या वस्तूचा अपहार करतो असे आम्ही म्हणतो. पण येथे जी आसक्ती जडते ती प्रेम नव्हे, तर निव्वळ क्षुधा म्हणजे प्रेमाची अगदी उलट बाजू होय. प्रेमी मनुष्याने आपल्यास एक पदार्थ आवडतो म्हणून तो गिळून बसणे, हे प्रेम नव्हे, तर त्याप्रीत्यर्थ त्याने स्वत:स अर्पण करणे हे प्रेम होय. प्रेमाच्या विषयापुढे प्रेमी आपल्या स्वत:स विसरतो किंवा त्याशी तादात्म्य पावतो म्हणावयाचा. मोक्षमूलरने आपल्या प्रिय पत्नीस लिहिलेल्या दुस-या एका पत्रात म्हटले आहे:
S “आम्ही व इतर आत्मे ह्यांमध्ये जे कित्येक उपाधीचे पडदे पडले आहेत ते एकीकडे सारणे म्हणजेच प्रेम करणे होय. ईश्वराचे ठिकाणी आम्ही सर्वांचा जो ऐक्यसंबंध आहे व जो ह्या संसारात अनेक अदृष्ट कारणांमुळे तुटलेला असतो तो पुन: जोडणे म्हणजे तेच प्रेम होय.”
हे प्रेमच जीवनाचे लक्षण किंवा मुख्य हेतू होय. ह्याशिवाय जीवन हे जीवनत्वास मुकते असे वर म्हटलेच आहे. जीवनाच्या अगदी प्राथमिक कोटीतही हे काष्टातल्या अग्नीप्रमाणे गुप्त रूपाने असतेच. पशुकोटीत ते प्रथम अगदी स्थूलमानाने प्रकट होते. अत्यंत हिंस्त्र वाघीण, पण तिच्या पिलास क्षुधा लागल्याबरोबर तिला वेदना होते व आपले भक्ष्य ती त्यांच्यापुढे ठेवून आपण स्वस्थ बसते. मग मुलास जखम झाली असता मानवी आईच्या नेत्रांत अश्रू यावेत, मुलास दुखणे आले असता आईने पथ्य सांभाळावे ह्यात काय नवल? ह्या प्रकारे बालक व जननी ह्यांमधलाच द्वैताचा पडदा दूर होऊन जीवनाचे कार्य आटपते असे नव्हे तर व्यक्तीच्या जीवनाचा विकास जसजसा अधिक होतो तसतसा व्यक्ती आणि कुटुंब, व्यक्ती आणि जात, व्यक्ती आणि राष्ट्र, आणि अखेरीस व्यक्ती आणि विस्व ह्यांमधील पडदा क्रमाक्रमाने गळून पडतो. अशाप्रकारे व्यक्तीची मर्यादा अनंतत्वाप्रत पावल्यावर तिच्या आतापर्यंतच्या मर्यादित जीवनाचा शेवट अगर कळस होऊन अत:पर तिच्या अमर्याद जीवनास सुरूवात होते. मग त्या सुखाचे सोहाळे काय वानावेत! त्याला उपमा कसली द्यावयाची आहे.
तुकोबा म्हणतात:
आपुले मरण पाहिले म्या डोळा| तो जाला सोहळा अनुपम्य ||धृ||
आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने| सर्वात्मकपणे भोग झाला||१||
एकदेशी होतो अहंकारे आथिला| त्याच्या त्यागे जाला सुकाळ हा ||२||
फिटले सुतक जन्ममरणाचे | मी माझ्या संकोचे दूरी जालो ||३||
नारायणे दिला वसतीस ठाव | ठेवुनिया भाव ठेलो पायी ||४||
तुका म्हणे दिले उमटुनी जगी | घेतले ते अंगी लावुनिया ||५||
ह्याप्रमाणे मरण म्हणजे मुक्तीचे द्वार. आणि ते वर म्हटल्याप्रमाणे आम्ही आपल्या डोळ्यानेही पाहू शकतो. मरण म्हणजे देहाचे विसर्जन अवश्य झालेच पाहिजे असे नाही. किंवा विसर्जन झाले म्हणूनही काही वाईट झाले असे नाही. देहीच विदेही दशा भोगीत असता देह गेला काय राहिला काय सारखेच. मरण म्हणजे मर्यादित अथवा एकदेशीय जीवनाचा अंत किंवा केवळ कळस, अथवा आत्म्याचे पूर्णपणे जागे होणे. देह व इंद्रियगण ही सर्व त्या आत्म्यास जागे करण्याचे उपाय होत. एकाद्या सार्वभौम राजेंद्रास जागे करावयाचे झाल्यास प्रात:काळी त्याची पट्टरामी येऊन प्रथम पाय चेपू लागते, कंचुकी मंदमंद वारा घालितो व बंदीजन त्याच्या पूर्वजाचे यश मंजूळ स्वरात गाऊ लागतात. पण राजेश्वर एकदाचे खडखडी जागे झाले की, बंदीजनांचे गायन व सर्व उपचार बंद होतात, मग त्याला त्या गायनाचा गोंगाट नकोसा होतो. त्याचप्रकारे आत्म्याला एकादाचा पूर्ण प्रेमबोध मिळाला की, मग त्याला ह्या मर्यादित जीवनाच्या अंथरूणात पडून रहावयास नकोसे वाटते. ही हाडाकातड्याची झोळ झुगारून द्यावीसे वाटते. इंद्रियगण व त्यांचे विषय जी जागृतीची साधने त्यांचीही त्याला जरूरी राहत नाही. एकनाथांनी मार्मिकपणे म्हटले आहे:-
*नवा ठाई फाटला झगा | तो नये तुझे उपयोगा||
विषय भोगीत अंगा| तो मज दान पिंगळिया||
तेणे टळेल तुझी पीडा | चुकेल मीतूपणाचा झगडा||
स्वरूपी होईल आनंद गाढा | श्रीजनार्दन प्रसागे ||
एका जनार्दनी प्रेम बोध | प्रगट होय संवाद ||
पिंगळा भाकितसे प्रबोध | परोपकार जाणे गा राया ||
(डुगडुग्या, भजनी भारूड संग्रह.)
असो. एकूण मरण म्हणजे काही अशुभ व दु:खाचा प्रसंग नव्हे तर स्वरूपी होणार ‘गाढा आनंद’, असे एकनाथ स्वामी सांगतात. नारायणाने अंगी लावून घेतले म्हणून अनुपम सोहळा असे तुकाराम साधू म्हणतात. तोच अर्थ इंग्रजीत Restoration of union असे भट्ट मोक्षमूलर सांगतात! पण असे मरण यावयाला आम्ही आपले जीवन कसे घालविले पाहिजे हे आता निराळे सांगावयास नकोच. गौतमबुद्धाला असे मरम अथवा निर्वाण प्राप्त झाले. आमच्या महर्षी देवेंद्रनाथालाही हेच मरण आले. प्रयत्न केल्यास आम्हा सर्वांनाही हाच निर्वाणाचा सोहळा गाजावा असा ईश्वरी संकेत आहे. जयजयकार असो त्याच्या मंगल योजनेचा!