१३-फर्ग्युसनमधील रोजनिशी

ता. ३१ मंगळवार १८९८ मे
आजचे व्याख्यान `आधुनिक शास्त्रामुळे धर्मास विरोध येतो काय ?`  हे रा. काशिनाथ बाळकृष्ण मराठे सातारचे सब जज् यांचे खरोखर मालेस शोभणारे झाले. मराठे हे रानडे-भांडारकर यांचे जोडीचे व वेळचे आहेत असे अैकिले. यावरून युनिव्हर्सिटीच्या अव्वल अमदानातील जे पदवीधर झाले त्यात काही तथ्य आहे व होते हे खरे दिसते. पाश्चात्य ज्ञानापासून Reaction झालेली यांच्यामध्ये दिसते. तरी ती फार विचारी, शांत व स्वाभाविक दिसते. यांचा धर्म म्हणजे रूढ धर्म नव्हे तर तात्त्विक धर्म अगर मूल तत्त्वज्ञान अथवा ब्रह्मवाद हा होता. व्याख्यात्याचा कटाक्ष सर्व शास्त्रांचे आद्य गृहीत सिद्धांतावरच होता. मानव जातीच्या सनातन धर्म कल्पनेस दरवर्षी व प्रत्येक शोधकाच्या शोधाने बदलणा-या सिद्धांतानेविरोध येणार नाही. Sound motor = शब्द ब्रह्म = ध्वनिशक्तीविषयी न्यूयॉर्कमध्ये शेली साहेबाने एक विलक्षण शोध काढला आहे. तो हा की काही विशेष यांत्रिक रचना केली आहे की सतारीची एक तार वाजवून शेवटी असलेल्या fly wheel ला २५ हॉर्स पावरची शक्ती येते असे सांगितले !
ता. २ जून गुरुवार १८९९
नेहमीप्रमाणे आमचे कॉलेज आजच सुरू होईल असे वाटले नव्हते म्हणून आम्ही गेलो नव्हतो. पण प्रि. राजवाडे यांच्या नियमितपणामुळे आज लेक्चर्स देखील झाली असे ऐकून फार आश्चर्य झाले. इंग्लदच्या इतिहासामध्ये मला २४ च मार्कस पडलेले पाहून वाइट वाटले व चीड आली. पण पोलीटीकल एकानॉमीत ४५ मार्क्स पाहून समाधान झाले.
ता. ४ शनिवार जून १८९८
कळसकर यांस मेजवानी झाली. साडे दहा आण्याचे आंबे आणिले. स्वयपाक कळसकर, दाजीबा-त्यांचे एजंट, हुल्याळ, मी व जनाक्का इतक्यांस पुरे असा पहिल्या दोघांनीच केला. दिवस आनंदाचा गेला.
ता. ५ रविवार जून
आज सेटलूरचे३६ मालेत Our Social Institution सामाजिक संस्था यावर इंग्रजीत व्याख्यान झाले. यांच्या नावाप्रमाणे वक्तृत्व मुळीच नव्हते. विचारातही नवेपणा अगर खोलपणा म्हणण्यासारखा नव्हता. आमची समाजरचना हक्काच्या तत्त्वावर नसून कर्तव्यावर आहे. पाश्चात्य सुधारणा आधिभौतिक असून (आपली) आध्यात्मिक होती. आमच्या सर्व संस्था याच पायावर रचल्या आहेत. हे पक्के ध्यानात ठेवून ह्या तत्त्वाला व मूळ पायाला धक्का न बसेल अशा रीतीने सुधारकांनी हव्या त्या सुधारणा बिनधोक कराव्या. आमच्या इलाख्यात अशा सुधारणेत फार परिश्रम केले आहेत. पण येथल्या सुधारकाची पद्धत मला पसंत न पडल्यामुळे मी सामाजिक परिषदेच्या भानगडीत पडलो नाही. (मी इकडच्या व तिकडच्या पद्धतीत काय फरक आहे अशा प्रश्नाची एक चिठी त्यांस दिली. पण फार उशीर झाला असे ते म्हणाले व सभाही उठली.) जातिभेद, बालविवाह, स्त्रीशिक्षण इत्यादी गोष्टींत इकडल्या सुधारकांची मते त्यांस पूर्ण संमत आहेत. पण विधवाविवाहाचा तत्त्वाशीच विरोध असल्यामुळे त्यांस ते नाकबूल आहेत. इतकेच नव्हे तर पुरुषांनीही द्वितीय संबंध करू नये हीच `खरी सुधारणा` असे त्यांनी मोठ्या जोराने टाळ्याचे गजरात सांगितले. नंतर एडिटर एन्. सी. केळकर म्हणाले की सुधारणेला कोणीच नाकबूल असू शकणार नाही. ती सगळ्यालाच पाहिजे. पण तिची कलमे जातिभेद मोडणे ई. ई. कोणीच काही वाद करू नये, की ती पुढे आणू नयेत. (काहीतरी दुतोंडी अर्धवट भाषण करून वेळ मारून नेण्याची व शिंगे मोडून वासरात घुसण्याची कला गुरूपासून चेल्याने चांगली साधली आहे.)
प्रो. परांजपे एम. ए. म्हणाले की सती बंद झाल्यामुळे विधवाविवाहाची अडचण उपस्थित झाली. (त्यापूर्वी सर्व सुरळीत चालले होते) व आता विधवा विवाह सुरू होईल तर पाश्चात्यांच्या समाजातल्या घोर अपायकारक गोष्टी उद्भवतील इ. इ. शेवटी सेटलूर बोलले, की आज सर्व भाषणे एकतर्फीच झाली. सुधारणा पक्षाची बाजू काही दाखविली गेली नाही, हे पाहून वाईट वाटते. (त्यावरून पक्षभेदाची स्थिती चांगली दिसते). शिवाय पुण्यातील श्रोतृवर्गाच्या टार्गेपणाचा दुर्लौकिक मी जो ऐकला होता व अशा समाजाच्या पुढे सामाजिक विषयाची चर्चा करण्याचे मी जे धाडस केले त्याबद्दल जी भीती वाटत होती ती दोन्हीही निराधार आहेत. प्रो. परांजपे यांनी पुणेकरांची फारच पाठ थोपटली. खरा प्रकार पुणेकरांसच ठाऊक. त्यांस साक्ष प्रो. जिन्सिवाल्यांची !