९-फर्ग्युसनमधील रोजनिशी

शनिवार ता. १६ एप्रिल १८९८

आज संध्याकाळी मद्रास ४ चार वाजता आमच्या कॉलेजात पि. ई. हॉलमध्ये 'इंग्लंडातील व हिंदुस्थानातील शिक्षण' या विषयावर प्रो. गोखले२१ यांचे सुमारे दीड तास भाषण झाले.  त्यासाठी मला गावातून ३ वाजताच निघून कॉलेजास २ मैल भर उन्हातून जावे लागले.  पण मी जे भाषण ऐकिले त्यासाठी दहा मैलही चालत गेलो असतो !  इंग्रजी भाषेत शुद्ध, गोड, अस्खलीत बोलणे म्हणजे प्रो. गोखल्यास काहीच वाटत नाही, हे नव्याने सांगणे नकोच.  तरीपण काल जे त्यांच्या जिभेचे विलास मला पहाण्यास सापडले ते काही अप्रतीम होते.  या विलासास केवळ त्यांचे जिव्हाचापल्यच कारण नसून त्यांच्या मृदू अंतःकरणाची मार्मिकता व रसिकताही आहेत हे उघड दिसले.  आठ दिवसांपूर्वी कॉलेज रेसिडेन्सिमध्ये मुलांनी व प्रोफेसरांनी 'मून लाइट पार्टी' केली होती.  त्याचवेळी हे लेक्चर होणार होते.  पण आम्हा गावातल्या विद्यार्थ्यांच्या नशीबाने ते आज झाले.  कॉलेजचे प्रोफेसर, न्यू स्कूलचे मास्तर, कॉलेजची व शाळेची मंडळी मिळून सुमारे ३०० मंडळी जमली होती.  सुमारे दीड तास एवढा समाज चित्रासारखा तटस्थ होता.  अध्यक्षस्थान प्रिन्सिपाल राजवाड्यांनी२२ शोभविले होते.  एकतानतेने भाषण ऐकण्याची उत्कंठा दाबवेल तितकी दाबून मला जी फार थोडी टिपणे घेता आली, त्यावरून खालील सारांश आहे. "विषयाला जे गंभीर नाव दिले आहे ते मला विचारल्याशिवाय दिल्यामुळे व नावानुरूप तयारी करण्याला मला वेळ मुळीच न झाल्यामुळे आपली आज बरीच निराशा होईल. परवा मूंलाइट पार्टीचे दिवशी जेवणानंतर चार गप्पा सांगणार होतो. पण आज त्या विषयास व्याख्यानाचे गंभीर स्वरूप आले आहे! इंग्लंडला जाऊन आल्यापासून माझ्या आयुष्यात मोठा पालट झाला आहे. विचार, मत व कल्पना यांस निराळेच वळण बसले आहे. इंग्लंडातील शिक्षणाचे उत्तम व विविध प्रकार व त्याचा अवाढव्य प्रसार पाहून मी थक्क झालो. प्रकार, प्रसार व पद्धत या तिन्ही बाजूंनी ते तेथे कोणत्या थराला पोचले आहे याची येथे बसून कल्पनासुद्धा करवत नाही. अगोदर प्रसाराची बाजू घेऊ. ७ सात वर्षाची झाली की प्रत्येक मुलास शाळेत घातलेच पाहिजे असा सक्तीचा सरकारी कायदाच आहे. हे सक्तीचे शिक्षण केवळ प्राथमिक असून `बोर्ड स्कुलात` गरीबास मोफत मिळते व त्यात धार्मिक शिक्षणाची भेसळ होत नाही. सर्वास प्राथमिक शिक्षण मिळाल्यामुळे गाडीवाले, हजाम, मजूर वैगेर फावल्यावेळी रस्त्यातूनच खिशातून एकादे वर्तमानपत्र काढून वाचीत असलेले आढळतात. तरीपण ज्यास ऐपत आहे असे लोक खर्च देऊन आपले मुलास पब्लीक स्कुलात अगर ग्रामर स्कुलात घालतात. तिकडे आईबापांच्या उत्पन्नापैकी... भाग मुलांच्या शिक्षणाकडे जातो व बोर्ड स्कुला [त] मुलास पाठविणे कमीपणाचे समजतात. ह्या पब्लीक स्कुलातील शिक्षणपद्धती मुलास होता होईल तो मनोवेधक होईल व मुलांच्या स्वाभाविक शक्तीचा विकास होईल अशी असते. तसेच शिक्षक नेमावयाचे ते फार हुषार नेमतात व शिक्षकांनी तेवढ्याच धंद्याकडे आपले सर्व आयुष्य अर्पिले असते. मुलास मानसिकाप्रमाणे नैतिक शिक्षण घडत असते. सभ्य गृहस्थ व सभ्यपणा हे इंग्रजी भाषेत काही विशिष्ट शब्द होऊन बसले आहेत. दुस-यांनी नावे ठेवण्यासारखे एकही कृत्य सभ्यगृहस्थाकडू होणार नाही की असले कृत्य त्याने जरी पाहिले तरी त्याचा विनाकारण बभ्रा अगर उहापोह करणार नाही. प्रसंगाशिवाय दुस-याच्या वाटेस जाणार नाही. अपमान करणार नाही की तो नेभळेपणे सहनही करणार नाही. असल्या सभ्यपणाचे परिणामही शाळातून घडतात. तरी ते विशेषकरून गृहशिक्षणापासून होतात. (येथे वक्त्याने कॉन्स्टंटाइन नामक एका सभ्य गृहस्थाचे आपण घरी राहत होते तेथील एक गोष्ट फार चटकदार रितीने सांगितली). ह्या शाळा गावाबाहेर लांब असतात व त्याचेभोवती मोठमोठी पटांगणे असतात. मानसिकाइतकेच शारीरिक शिक्षणाकडेही अवश्य लक्ष असते. त्याचप्रमाणे कॉलेजचे शिक्षण. तेथे प्रोफेसरांची विद्वत्ता व योग्यता पाहून इंडियन प्रोफेसरशिपची मला फारच लाज वाटली. स्वत:चे बरेच मूळ ग्रंथ लिहून विषयाच्या ज्ञानात जास्त भर घातल्याशिवाय प्रोफेसराचे पद मिळत नाही. टॉड हंटरने२३ इतकी बुके लिहिली आहेत तरी तो नुसता फेलोच आहे. क्लासात रोज लेक्चर देणारांचा ट्युटर्स नावाचा एक निराळाच वर्ग आहे. तेही फार जाडे विद्वान असतात. प्रोफेसरांची व्याख्याने फार तर वर्षातून तीन चार होतात. आणि ती त्यांनी वर्षभर जे श्रम केले असतील त्यांची दिग्दर्शनेच असतात. प्रोफेसराने अमकेच केले पाहिजे असे काही नियम नसतात. त्यांचा आवडता व्यासंग व श्रम सारखे चालू असतातच. मुलांनीही पाहिजे त्या कॉलेजचे लेक्चर ऐकावे अगर सोडावे. काही धरबंध नसतो. फक्त हजरी मात्र असते. युनिफार्मवरून आमक्या शाळेचा अगर कॉलेजचा असे ओळखता येते. पण आपापल्या शाळांचा अभिमान मुलात फार असतो. आपण शिकलेल्या शाळेतच मुलांनी जावे अशी आई-बापांची फार इच्छा असते. व एकदा एका शाळेत लहानपणी गेला की अखेरपर्यंत (सिव्हिल् सर्व्हिसपर्यंतही) तेथेच त्याचा अभ्यास व्हावा अशी व्यवस्था असते. आपल्या शाळेतील मुलांनी दुसरीकडे जावू नये, त्यास जावे असे वाटू नये, अशा बद्दल अधिकाधिक काळजी घेतात. वरिष्ठ प्रकारचे शिक्षण शिकत (असता) आपला पुढे चरितार्थ नीट चालावा असा हेतू तेथे कोणाचा नसतो. एथल्याप्रमाणे शिकणारात गरजू व दुर्भिक्ष लोकांची अपार संख्या तेथे नसते. त्यामुळे सर्व लक्ष परीक्षा पास होण्याकडे नसते. काही दिवस कॉलेजमधून काढण्यातच त्यास महत्त्व वाटत असते. तरीपण पुष्कळ धनाढ्यांच्या मुलासही आपण परीक्षेत चांगले नाव करावे अशी फार महत्त्वाकांक्षा असते. वरिष्ठ शिक्षण फार खर्चाचे असते. युनिव्हर्सिटीत असताना परीक्षेच्या शिक्षणाच्या परिणामापेक्षा मुलांच्या मनावर समागम शिक्षणाचाच अधिक महत्त्वाचा परिणाम होऊन स्वभावाचा विकास फार समाधानकारक होतो. क्लब्स्, रिडींग रुम्स, खेळण्याची मैदाने, नदी-नाले, झाडी-झुडूप यातून अर्ध्यापेक्षा अधिक वेळ जातो. लाखो पुस्तकांच्या जंगी लायब्र-या असतात. मुलांची चालचलणूक विशिष्ट रिवाजाला धरूनच असली पाहिजे, अशाविषयी फार खबरदारी असते. हे सर्व पाहून मी इतका गहिवरलो की आपण दहा वर्षाचा होऊन येथे शिकावयाला राहिलो तर फार बरे होईल!! आमच्या येथे पहावे तर शिक्षणाला बाजारभाव आहे! मुलांच्या आवडीकडे अगर शक्तीकडे न पहाता ते एक सारखे कोंबले जात आहे. येथले उत्तम प्रोफेसर तिकडच्या ट्युटरांची देखील बरोबरी करीत नाहीत. येथे भिकारी विद्यार्थ्यांची संख्या शेकडा नव्वद पडते तर तेथे फार तर ५ पाच पडेल. उद्देश हलका, पद्धत दूषित व मुळी शिक्षणही अपूर्ते, एककल्ली व तेही नकली! (त्यापुढे वक्त्याने मोठे जोरदार अंतःकरणास हालवणारे पेशरेकन२४ केले.) कोणत्याही देशाच्या उदयास व भराटीस कारण त्यातील लोकांची नैतिक शक्तीच होय. इंग्लंडातील ह्या शक्तीचा लोट पुरून उरला आहे. तो दुसरीकडे धाव घेत आहे. येथे आलेल्या काही इंग्रजाचे मन बादशाही थाटाने घेरलेले दिसते. पण ते इंग्लंडात अपवादच होतात. सणसणी कार्यदक्षता, देशाभिमान, स्वार्थत्याग व अचाट साहस इत्यादी त्यांच्या राष्ट्रीय गुणांची स्थूल ३ कारणे आहेत. १ जातीधर्म २ गतकालाचा त्यांच्यावर होणारा परिणाम ३ शिक्षण. पहिली गोष्ट म्हणजे आंगची शक्ती ही केवळ निसर्गाचे स्वैर चेष्टीत असल्याने ती आमच्या (त) येणे अशक्यच आहे. दुसरी म्हणजे आमचे गत वैभव. हे आमच्यापासून फार दूरचे असल्याने सध्याचे काळी त्याचा आमचेवर काही पिरणाम होत नाही. तथापि जेवढे उरले आहे तेवढ्यावरच आम्ही आपला पाया घातला पाहिजे. शेवटचे शिक्षण मात्र आमच्या हातची गोष्ट आहे. राजकीय सामाजिक, औद्योगिक अशा चोही बाजूंनी.. कर्तव्याचे प्रचंड पर्वत पडले आहेत. हे सर्व ... केवळ सुशिक्षीत वर्गावर पडले आहे. तो वर्ग ... फार लहान आहे. इतकेच नव्हे तर परस्परांची फूट, विरोध, मत्सरादींनी हीन दशेला पोचला आहे. मनमुराद व मर्मभेदक वायफळ टीका केली की दमून `हुश्य` करून बसण्यापुरती त्यांची कर्तव्य दक्षता! असे बोलण्याचा प्रसंग येऊ नये पण वस्तुस्थिती अगदी अशीच आहे, अशी माझी पक्की खात्री असल्याने मला बोलणे भाग पडते. शेवटी सांगणे इतकेच की इंग्रजांच्या कर्तव्यासक्तीचे उदाहरण आम्ही गिरवले पाहिजे. जे कर्तव्य आम्ही समजतो व जसे समजतो ते तसेच नेटाने केले पाहिजे. मग ते कसेही असो. त्यावर शुष्क टीका करून आपला व दुस-याचा उत्साह भंग करू नये. कोणी केला तर त्यास जुमानू नये. ह्यानेच आमचा झाला तर उद्धार होईल! नंतर अध्यक्ष प्री. राजवाडे उठले. ते घोकंपट्टी व पोकळ ज्ञान ह्या विषयी म्हणाले की ज्या अर्थी आम्ही शिकतो हे ज्ञान अगदी नवीन मागविलेले असे आहे, त्या अर्थी ते आपल्या पदरी पडले असे नुसते वाटायला निदान घोकंपट्टीच पाहिजे. परक्या देशातील ह्या झाडाची लागवड तूर्त काही दिवस तरी अशा जबरीच्या उपायानेच इथे करावी लागत आहे खरे त्याला इलाज नाही. तसेच तिकडचे प्रोफेसर व हिकडचे यांमधील लज्जास्पद अंतर पाहून तर मी अगदी खचूनच जातोय. असेही वाटते की या जागेचा राजीनामा देऊन स्वस्थ बसावे!! गोखल्यांनी [नको] असे उद्गारले व सर्व श्रोतृसमाज मोठ्याने [हसला]. स्वत: राजवाडेही मोठ्याने खिदळले! शेवटी आभार मानले जावून सभा उठली.
गोखल्यांनी तेथल्या शिक्षणपद्धतीचे वर्णन केले आहे ते सर्व एकतर्फी दिसत आहे. खुद्द इंग्लंडातही तेथील पद्धतीबद्दल सारखी ओरड आहे. म्हणून त्यांना तिचे काही दोष दाखवयाचे होते. ती केवळ निर्दोषी असेल असे मुळीच वाटत नाही. तरी येथल्या शिक्षणास ताडून पाहता गोखल्याचे भाषण म्हणजे केवळ अतिशयोक्ती असे म्हणण्यास जागा नाही. येथील पद्धत इतकी दुष्ट आहे की [हीत] रूळलेल्यास तेथल्या पद्धतीतले फारच थोडे [दोष] दिसणे संभवनीय आहे. नेहमीच्या संभाषणातले वक्तृत्व त्या दृष्टीने पाहिले तर गोखले यांचे भाषण अगदी नंबर एकचे झाले. यापेक्षा कोणी युरोपियनही चांगले बोलील असे वाटत नाही. किंबहुना थोड्याच युरोपियनांना असे बोलता येईल. स्वतः गोखल्यासही आपली जन्मभाषा इतक्या झोकात वठविता येणार नाही. तो बोलताना ऐकणे म्हणजे एक लाभच.