कौटुंबिक उपासनामंडळ

मंगलोर येथील आपले वास्तव्य संपुष्टात आणल्यानंतर पुण्यास परतताना अण्णासाहेब शिंदे यांनी दक्षिण कर्नाटकातील मुडब्रिद्री, कारकळ येथील जैनधर्मीयांची देवळे, घुमटाराज हा पुतळा इत्यादी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आखलेला दौरा संपविला व १९२५ च्या एप्रिल महिन्यात ते पुण्यास पोहोचले. मंगलोर येथे प्रतिष्ठित ब्राह्म बिल्लवांशी त्यांचे जे मतभेद झाले होते त्यामुळे त्यांचे तेथील वास्तव्य सुखावह झाले नसले तरी धर्मप्रचाराचे काम विविध प्रकारे करता आल्यामुळे त्यांच्या मनाला आंतरिक समाधान वाटत होते. पुण्यात आल्यानंतर काही दिवस त्यांनी विश्रांती घेतली; परंतु धर्मप्रचाराचे उन्नत कार्य समाजाप्रमाणे केल्याशिवाय त्यांच्या मनाला स्वस्थता वाटणे शक्य नव्हते. स्वाभआविकपणेच त्यांनी आपल्या भावी धर्मकार्याची एक नवी योजना आखली.


१८९८ मध्ये ते बी.ए. चे विद्यार्थी असताना ब्राह्मसमाजात जाऊ लागल्यापासून खेडेगावातील लोकांमध्ये ह्या उन्नत धर्मविचाराचा प्रसार होणे निकडीचे आहे असे त्यांना वाटत होते. या संदर्भात रोजनिशीमध्ये नोंद करताना त्यांनी म्हटले आहे की, "असल्या गावंढळांचीच बहुसंख्या आणि त्यांन आपल्यात घेतल्याशिवाय समाजाचा खरा प्रसार कधी होणार नाही." ह्या नोंदीत त्यांनी 'माझ्यासारख्या गावंढळास' असाही स्वत:चा निर्देश केला आहे. ह्या निर्देशावरुन त्यांना किमानपक्षी ग्रामीण संस्कृतीतून, वातावरणातून आलेले लोक अभिप्रेत होत असे दिसते. ह्या त्यांच्या जुन्या विचाराने अलीकडच्या काळात उचल खाल्ली होती. ब्राह्मधर्माचा प्रचार बहुजन समाजात आणि विशेषत: कुटुंबात, कुटुंबातील बायकामुलांत कसा होईल याची विवंचना त्यांच्या मनाला लागली होती. ब्राह्मसमाजाच्या चळवळीचे एवढ्या अवधीत त्यांनी भारतभर निरीक्षण केले होते. ही चळवळ आजपावेतो सुशिक्षितांत, शहरात राहणा-यांत गुंतून पडली होती. ब्राह्मसमाजाची शुद्ध आणि उच्च बुद्दिवादाची शिकवण साध्या भोळ्या बहुजन समाजाला सहज कळण्यासारखी नव्हती. इंग्रजी आणि संस्कृत न जाणणा-या आणि खेड्यांत राहणा-या लोकांसाठी ब्राह्मसमाजाकडून प्रयत्न होणे कठीण होत व ते झालेही नव्हतें हे त्यांना माहीतच होते. मग अशा लोकांच्या बायकामुलांसाठी प्रयत्न होणे आणखी दूरच होते; म्हणून कुटुंबामध्ये धर्मप्रचार करण्याच्या दृष्टीने अण्णासाहेबांनी एक योजना आखली.


शिवाजी मराटी हायस्कूलचे संस्थापक हेडमास्तर श्री. बाबुराव जगताप, पुणे सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष श्री. बाबुराव जेधे व इतर मित्रमंडळीपैंकी गणपतराव शिंदे, रामराव जोतीबा शिंदे, वकील, काळभोर वगैरे मराठी समाजाचे पुढारी धार्मिकबाबतीत प्रागतिक विचारांचे होते. अण्णासाहेबांनी प्रथमत: ह्या मंडळींच्या घरी भगिनी जनाबाईंसह रविवारी आणि अन्य सुटीच्या दिवशी जाऊन ब्राह्मधर्माच्या कौटुंबिक उपासना चालविण्याचा उपक्रम सुरु केला. बायकामुलांना समजतील अशी सोपी भजने व भक्तिपूर्ण प्रवचने मंडळींना आवडू लागली. हा उपक्रम वर्षभर चालविण्यानंतर व त्याची यशस्विता अजमावल्यानंतर त्यांनी कौटुंबिक उपासनामंडळ रीतसरपणे घटना करुन स्थापण्याचा विचार केला. ह्या सुमारासच त्यांनी अहल्याश्रमातून आपले बि-हाड हालवन ते शुक्रवार पेठतील माळवदकरांच्या वाड्यात राहावयास गेले. मिशनमध्ये त्यांचे निष्ठावंत सहकारी असलेले कृष्णराव गोविंदराव पाताडे हे कौटुंबिक उपासनामंडळाच्या कार्यामध्ये साह्म करण्यास आनंदाने तयार झाले. ह्या काळात यश येण्याची चिन्हे त्यांना दिसू लागली. तेवहा १६ जून १९२६ रोजी कौटुंबिक उपासनामंडळाने पुढील विनंतीपत्र काढले.


कौटुंबिक उपासना मंडळ
विनंती पत्र
यं हि किच्चं अपविद्धं अकिच्चं पन करियती |
उन्नळानं पमत्तानं तेसं वड्ढन्ति आसवा ||
धम्मपद, अ. २१ श्लो. ३


अर्थ : जे करावयास पाहिजे त्याचा चुथडा होत आहे. जे करु नये ते पण केले जात आहे. उनाड आणि प्रमत्त जे, त्यांच्या वासना वाढत आहेत.
१. हल्ली लोकसमाजाची स्थिती अत्यंत कीव येण्यासारखी झाली आहे. अध्यात्म म्हणजे काय हे लोकांना न कळून त्याची थट्टा उघड उघड चालली आहे. तरुण नास्तिक व वृद्ध निराश झालेले दिसतात. मनुष्याचा मनुष्यावर विश्वास नाही. कारण एकच की धर्माचा पाया ढासळू लागला आहे.


२. धर्माविषयी विचार अथवा उपासना करावयाची झाल्यास फार तर प्रौढ मंडळीच जमतात. तेही क्वचित. अशा एकांगी विचारांचा आणि उपासनांचा परिणाम कुटुंबावर होत नाही, ह्यात नवल नाही. खरी धार्मिक उपासना सहकुटुंबच व्हावयास पाहिजे. म्हणून ख-या श्रद्धेने व प्रेमाने प्रेरित झालेली मंडळी नियमितपणे उपासनेसाठी एकत्र होणे आवश्यक आहे.


३. धर्म म्हणजे केवळ मत नव्हे. तत्त्वज्ञान किंवा बाह्म कर्मही नव्हे. धर्म ही बाब अंत:करणाची व भावनांची आहे, म्हणून धर्माचा उदय आणि प्रचार कुटुंबाचे द्वारा होणेच उचित आहे. तसे इतिहास सांगत आहे. कुटुंब म्हणजे केवळ बायकोच नव्हे. आईबाप, बहीण-भाऊ, नवरा-बायको, मुले ह्यांच्या प्रेमाचे केंद्र म्हणजे कुटुंब. हेच धर्माचरणाचे व प्रसाराचे क्षेत्र, केवळ व्यक्ती नव्हे.


४. वरील गोष्टी ध्यानात आणून अशा स्वतंत्र शुद्ध कार्यकारी उपासनेची एक घटना करण्याची मंडळाची इच्छा आहे. ज्यांना हा उद्देश पटतो त्यांनी ह्या घटनेत सहकुटुंब यावे, असे आमंत्रण आहे. ज्यांना कुटुंबच नसेल त्याने एकटे आल्यास चालेल; पण तो अथवा ती सभासद होऊ शकणार नाही. कोणाची खाजगी मते अथवा कौटुंबिक परंपरा कशा आहेत हे पाहण्याची व ती कशी असावीत हे ठरविण्याची मंडळाची इच्छा नाही व अधिकारही नाही. प्रत्येकाचे अंतर जाणणारा ईश्वर समर्थ आहे. एकमेकांच्या अंतरात डोकावण्यापेक्षा व वर्तनाविषयी साशंक राहण्यापेक्षा सर्वांनी एकत्र जमून चित्तशुद्धी करणे म्हणजेच उपासना होय.


५. कुटुंबे कोणत्याही दर्जाची, जातीची, राष्ट्रांशी, अगर धर्माची असोत, अथवा ह्यांपैकी उपाधी नसलेली असोत तिकडे पाहण्याचा मंडळाचा अधिकार नाही. मंडळाच्या येणा-यांना उपासनेसंबंधी खरी श्रद्धा आणि कळकळ पाहिजे आणि ती नियमितपणा, वक्तशीरपणा, स्थिरपणा आणि शांतपणा ह्या गुणांच्या द्वाराच दिसून आली पाहिजे. एवढीच मंडळीची शर्त आहे.


६. मंडळाचा सर्व विचार आणि व्यवहार केवळ बहुमताने ऐहिक कार्याप्रमाणे चालणार नाही. योग्यायोग्यातेनुरूपच निकाल व अंमलबजावणी होईल.
घ.न. २९६, शुक्रवार पेठ, पुणे
कृष्णाराव गोविंदराव पाताडे, सेक्रेटरी, कौ. उ. मंडळ, पुणे


कौटुंबिक उपासनामंडळ रीतसर सुरु झाल्यावर सुमारे दहा-बारा कुटुंबे सभासद झाली. पुणे येथील शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी हायस्कूल येथे मंडळाच्या सार्वजनिक साप्ताहिक उपासना व प्रासंगिक कीर्तने होत असत. पहिल्या सहा महिन्यांतच अशा तीस उपासना व पाच कीर्तने झाली. अण्णासाहेब शिंदे, काळभोर, जेधे, जगताप, लाड यांच्या घरी कौटुंबिक उपासना झाल्या. त्या वेळी स्त्रियांच्याच केवळ तेवीस संगतसभा झाल्या. ब्राह्मसमाजाच्या उन्नत विचाराचा लाभ कुटुंबातील बायकामुलांना विशेषत्वाने मिळावा हा जो अण्णासाहेब शिंदे यांचा हेतू होता तो ब-याच अंशी सफळ होताना दिसू लागला. स्त्रियांच्या सभांतून सभासद नसलेल्या कुटुंबातूनदेखील ब-याच स्त्रिया आपल्या सुनालेकींसह हजर असत. मंडळाच्या उपासनेत किंवा कोणत्याही कामात जातीचा किवा धर्माचा भेद मुळीच करण्यात येत नसे.


प्रारंभी मंडळाचे सेक्रेटरी म्हणून कृष्णराव गोविंदराव पाताडे ह्यांनी काम केले. त्यानंतर गणपतराव बापूजी शिंदे, बा.पा. लाड ह्यांनी सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. श्री. बाबुराव जगताप ह्यांचे सर्वतोपरी साहाय्य असे. कौटुंबिक उपासना मंडळाच्या कार्याचा विस्तार सातारा, कोल्हापूर येथे करावा असेही योजिले होते. परंतु ती योजना फलद्रूप झाली नाही. मंडळाच्या वतीने कोणी विशेष पाहुणे आले असता त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी शहरातील शेडीदशे व्यक्तींना निमंत्रणे पाठविली जात व रा. ब. पां. चि. पाटील, एन्. जी. पवार (इंजिनियर) जेधे बंधू, डुंबरे बंधू, बाबुराव सणस, व्ही. के. जोग, पां. ना. राजभोज, एस्. आर. तावडे, हॅरिएट गोरे, मालिनीबाई खान इत्यादी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहत. आनंदीबाई शिर्के, शं. के. कानेटकर (गिरीश), माधवराव पटवर्धन (माधव जूलियन), बाळूताई खरे ( विभावरी शिरुरकर), वेणूताई पानसे इत्यादी साहित्यिक मंडळीही उपस्थित राहत असत. मंडळाच्या वतीने शिकागो येथील युनिटेरिअन धर्मप्रचारक डॉ. साऊथवर्थ यांचे १४ डिसेंबर १९२८ रोजी व्याख्यान झाले. इंग्लंडमधील युनिटेरियन समाजाच्या प्रतिनिधी मिसेस वुडहाऊस व मिस् नेसफिल्ड यांनी ४ जानेवारी २९ रोजी मंडळास भेट देऊन व्याख्यान दिले. प्रा. धर्मानंद कोसंबी यांचे ७ एप्रिल १९२८ रोजी व्याख्यान झाले. अशी व्याख्याने व कार्यक्रम श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये होत असत व असा विशेष प्रसंगी उपस्थितांची संख्याही मोठी असे.


मंडळाच्या उपासना ब-याच वेळा अण्णासाहेब शिंदे चालवीत असत. तर कधी कधी बाबुराव जगताप, गणपतराव शिंदे हे चालवीत असत. बुद्धजयंती, ख्रिस्त जयंती, नवीन वर्षाचा प्रारंभ अशा विशेष दिवशी खास उपासना चालविल्या जात. १९२७ च्या डिसेंबर अखेरीपासून कौटुंबिक उपासना मंडळाचे अहवाल पुस्तकरुपाने लिहिण्यात येऊ लागले. सामान्यत: उपासक आपल्या निरुपणाचे सार ह्या पुस्तकात नमूद करीत असत. प्रमुख उपस्थितांची नावेही प्रत्येक उपासनेच्या वृत्तान्तामध्ये नमूद केली जात.


उपासनेच्या वेळी अण्णासाहेब शिंदे हे एखादा महत्त्वाचा आध्यात्मिक विचार लौकिक जीवनाच्या संदर्भात मांडीत असत. ८ जानेवारी १९२८ रोजी चालविलेल्या विशेष उपासनेत येणा-या संक्रांतीच्या सणाचे महत्त्व स्पष्ट केले. गोड बोलण्याचे आत्मिक महत्त्व त्यांनी विशद केले. सत्य समजून घेऊनच तृप्त न राहता अत्यंत प्रिय रीतीने त्याचा फैलावा करुन सामाजिक आनंदात भर टाकणे हे आपले आत्मिक कर्तव्य आहे. मधुर वाणी हा निर्मळ मनाचा वास आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.


१ एप्रिल १९२८ रोजी अण्णासाहेबांनी चालविलेल्या उपासनेमध्ये उद्धोधनासाठी धम्मपदातील पंधराव्या अध्यायातील सुखवग्ग हा भाग वाचून त्याचे निरुपण केले. उपदेशासाठी 'ऐसे भाग्य काई लाहता होईन ! अवघे देखे जन ब्रह्मरुप' हा अभंग घेतला व बुद्धाच्या धर्मचक्राचे विवेचन केले. विवेचनात त्यांनी म्हटले, आम्ही खरे सुखी केव्हा होऊ? तर भोवताली वैर, छळ, दु:ख निराशा असताही जर आम्ही आपली शांती राखू तेव्हाच आम्हाला आढळून येईल की, ह्या जगातही ख-या दृष्टीने पाहणा-यास सुखच दिसते. गौतम बुद्ध अथवा तुकारामासारखे संत हे निराशावादी होते, असे आम्ही वरवर विचार करणारे किती सहज म्हणून जातो. परंतु जगाच्या कसोटीतून उतरल्यावर कळून चुकते की, संत हेच आनंदवादी व आशावादी असून आम्ही प्रपंचलंपटच उलट कुरकुरणारे व निराशावादी ठरतो. जशास तसे वागण्यास केवळ दु:खाचे मूळ असून सुखाची लागवड आत्म्यातून बाहेर करावयाची आहे. बाह्म जगातून आत्म्यात सुखाची आवक शक्य नाही. सुखाचे व आनंदाचे उत्पत्तिस्थान आत्मा हे स्वयंभू स्थान आहे. मायेचे चक्र बाहेर फिरत आहे. त्यातच धर्मचक्र मायेहूनही अधिक प्रभावशाली फिरत असते. बुद्धासारख्या विभूतींनीच हे धर्मचक्र फिरवावयाचे नसून आम्ही-तुम्हीही नकळत फिरवीत असतो. गुरुत्वाकर्षणाच्या नियमास न जुमानता जसा कॅपिलरी फिनॉमिनॉ दिसतो, तसेच मायेच्या चक्राच्या उलट हे धर्मचक्र आत्मिक जीवन फिरवीत असते.


कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाची स्थापना होऊन १५ मे १९२८ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होतात ह्या निमित्ताने कौटुंबिक उपासना मंडळाचे ७ वे ८ एप्रिल १९२८ रोजी श्री. शिवाजी मराठा शाळेत उत्सव केला. ता. ७ रोजी सायंकाळी प्रो. धर्मानंद कोसंबी यांचे, 'हल्लीच्या परिस्थितीत श्री गौतमबुद्धाच्या शिकवणीचे महत्त्व' या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. व्याख्यानातील प्रतिपादन, श्रोत्यांचे प्रश्न व कोसंबींनी दिलेली उत्तरे ह्या सा-याचा वृत्तान्त अण्णासाहेब शिंदे यांनी स्वत: नमूद केला आहे.


ह्या वृत्तान्तावरुन समग्र व्याख्यानप्रसंगाचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येऊ शकते. प्रारंभी अण्णासाहेबांनी उचित शब्दांत धर्मानंद कोसंबीचा यथार्थ परिचय करुन दिला. वृत्तान्तामध्ये त्यांनी नमूद केले आहे, "प्रो. धर्मानंदांनी सांगितले की बुद्धाचे नुसता आपलाच मोक्ष न पाहता सर्व मनुष्यजातीने शांदी कशी मिळवावी हा मार्ग शोधून काढला. तो मध्यमा प्रतिपत्तीचा अष्टांगमार्ग होय. ह्याचे विस्ताराने कथन केले. करुणा व प्रज्ञा ह्या दोन्हीचे समत्व म्हणजे बौद्ध धर्म अशी त्यांनी व्याख्या केली. नियंत्रणाशिवाय दुस-या तत्त्वाचे प्राबल्य वाढळे म्हणजे जगात कसे घोटाळे होतात ते जैन धर्माची अहिंसा व आधुनिक शास्त्रीय ज्ञानजन्य प्रज्ञेचा दुरुपयोग ह्याचे दाखले देऊन स्पष्ट केले. ह्या दोन्हीचे समत्व म्हणजे योग असे सांगितले. हा योग श्री गौतमांनी आपल्या शिकवणीतच नव्हे तर चरित्रांत उत्तम अनुभवास आणून दिला. हल्ली करुणा व प्रज्ञा ही दोन्ही तत्त्वे जगात आहेत, पण त्यांचा परस्परांवर दाब नाही. त्यामुळे दु:ख  पसरले आहे. व्याखअयानात विद्धता, शांती, वक्तृत्व तर होतेच पण विनोद व समयसूचकताही अपूर्व असल्यामुळे ते आबालवृद्धांस सारखेच बोधक झाले. हजर असलेल्यांत शंकरराव चव्हाण, डेप्युटी कलेक्टर; शंकरराव मोरे वकील, श्रीपतराव शिंदे, बाबुराव जगताप, टी. डी. नाईक, गणपतराव शिंदे, डॉ. नवले, खैसाराम जैन, ल. भिडे, माधव जूलियन पटवर्धन, शिवाजी हायस्कूलची शिक्षक व शिष्य मंडळी, कौटुंबिक उपासनामंडळाचे बरेच स्त्रीसभासद, निराश्रित साह्यकारी मंडळीचे अहल्याश्रमातील बहुतेक कार्यवाहक वगैरे बराच मोठा समाज जमला होता. जवळ जवळ एक तास व्याख्यान दिल्यावर श्रोतृवर्गातील तरुणांनी काही प्रश्न विचारल्यास उत्तराच्या रुपाने खुलासा चांगला होईल असे व्याख्याते म्हणाले."


ओळख करुन देताना श्री. अण्णासाहेबांनी ज्ञानकोशकारांनी जो बौद्ध धर्माविषयी अत्यंत खोडसाळपणा केला आहे ( असे जे म्हटले ) त्या विषयी व्याख्यात्यांनी खुलासा करावा अशी सूचना केली होती. "अशा खोडसाळपणाला उत्तर देण्याची आपली शक्ती नाही. स्वत: गौतमबुद्धाचे अशांच्या तोंडी न लाण्याची आज्ञा केली आहे" असे सांगून व्याख्याते म्हणाले की, "ज्ञानकोशात जी चुकीची विधाने आहेत ती सर्व इकडून तिकडून गोळा केलेली आहेत व ज्या शिव्या दिलेल्या आहेत त्या मात्र निव्वळ स्वत:च्या आहेत," हे एका हरदासाची नक्कल सांगून मोठ्या विनोदाने पटविले. नंतर श्री. अण्णासाहेबांनी पुन्हा प्रश्न केला की, "युरोप-अमेकितेचीस प्रवासात व्याख्यात्यास बौद्ध धर्मप्रणीत शीलसंपत्तीचा पुरस्कार केलेला कोठे आढळला काय?" ते म्हणाले, "बौद्धप्रणीत अनत्याचारी शांतितत्वाचे जे जे प्रसिद्ध पुरस्कर्ते त्या बहुतेकांना कठोर राज्यकर्त्यांनी तुरुंगातच ठेवलेले आढळले." बौद्ध धर्माच्या अवनतीचे कारण ह्या धर्माने राजाश्रय केला त्यामुळे त्याला शत्रू उत्पन्न झाले. दुसरे कारण बौद्ध भिक्षूची दानत बिघडली. तिसरे कारण गौतमाने जातिभेदाला मूठमाती दिली, तसे बौद्ध गृहस्थाश्रमी लोकांकडून वर्तन झाले नाही, इत्यादी." रा. चव्हाणांनी विचारले, "अशोक हा बौद्ध नव्हता अशी कल्पना आहे, ह्याचा खुलासा काय?" उत्तर विनोदाने असे मिळाले की, "ज्यांची ही वेडगळ कल्पना असेल त्यांनाच हा खुलासा विचारणे बरे. दारु पिऊन एखाद्याने तुम्हाला शिव्या दिल्या तर त्याचा खुलासा व्याख्याता कसा करील?" (हशा). डॉ. नवले यांनी विचारले की, "बौद्ध धर्माच्या पुरस्कारासाठी एखादी मंडळी निघाली तर व्याख्याते मदत करतील काय?" उत्तर : "अति आनंदाने, हमालीदेखील करु." गणपतराव शिंद्यांनी विचारले की, "तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ आदिकरुन भागवत संतांच्या मराठी काव्यात बौद्धतत्त्वे गोविली आहेत ती वाचून बहुजन समाजापुढे ठेविली असता समाज ती लवकर ग्रहण करणार नाही का?" ह्याला विनोदाचे उत्तर: "एखाद्या दारुड्याने दारु सोडावी म्हणून अंगात देवी आल्याचे दाखवून देवी दारु सोड म्हणते असे भासविले, तर दुस-या बाजूचे लोक, दुसरी देवी दारु पी म्हणते असे भासवतील. म्हणून असे पर्यायाचे प्रयत्न न करिता प्रत्यक्षच केलेले बरे." श्रीपतराव शिंद्यांनी विचारले की, "महाराष्ट्रात असे प्रत्यक्ष प्रयत्न होत आहे काय?" उत्तर : "मुंबईस एम्. पॉवेल कंपनीचे डॉ. नायरनी बौद्ध समाजा काढला आहे. पण त्यापासून फार तर वाड्मयाची माहिती मिळते. प्रत्यक्ष शील वाढण्याचा उपाय नाही. श्री. अण्णासाहेब शिंदे जेथे जातील तेथे बौद्धधर्माचा सहानुभूतीने पुरस्कार करितातच."


"शेवटी अण्णासाहेब आभार मानताना म्हणाले की, व्याख्यात्यांचे व्याख्यान आपण सर्व विसरू, पण त्यांचा पुण्यकारक समागम जो आबालवृद्धांस आज प्रत्यक्ष घडला त्याचा संस्कार आम्हावर नकळतच घडला आहे. तो विसरण्याचा प्रश्नच नाही. पण त्याचा परिणाम झाल्याचे पुढे योग्य वेळी दिसून येईलच. श्रवणापेक्षाही संतसमागमाचा फायदा अधिक आहे. महाराष्ट्रात आपण जिल्ह्यानिहाय संचारास जाऊ तेव्हा प्रो. धर्मानंदांनी आपणही बरोबर येऊन बौद्ध धर्माची माहिती जनतेस सांगू असे आश्वासन दिल्याचे अण्णासाहेबांनी सांगून शेवटी करुणा व प्रज्ञा ह्यांच्या समत्याचे पूर्ण अधिष्ठान जे ईश्वरतत्व त्यांचे आभार मानून सभा बरखास्त केली."


कौटुंबिक उपासना मंडळाच्या साप्ताहिक उपासनांमध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी विविध विषयांवर प्रवचने केली. त्यांपैकी काही विषय पुढीलप्रमाणे होते : ईश्वर सच्चिदानंदरुप असून सत्, चित्, आनंद ह्या ईश्वर साक्षात्काराच्या पाय-या आहेत; ईश्वर आनंदरुप आहे; ईश्वर ही प्रेमशक्ती आहे; उपासनेचा हेतू आनंदाचा साक्षात्कार हा आहे; खरा धर्म चांगुलपणात आहे; ईश्वराच्या ठिकाणी सेव्यसेवकभाव असतो. कधी बहिणाबाईंचे चरित्र. तर कधी ख्रिस्त जयंतीनिमित्त ख्रिस्त जीवनातील एखादा उद्दोधक भाग यांवर त्यांनी प्रवचन केले. ह्या सर्व प्रवचनांचा रोख आपले लौकिकातील जीवन आध्यात्मिक पातळीवर कसे नेता येईल असे. त्यांनी स्वत: केलेल्या राजकीय चळवळीलाही आध्यात्मिक अधिष्ठान होते. त्यामुळे कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन पुणे जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, खेड ह्या तालुक्यातील दौरा आटोपून आल्यानंतर ११ मे १९३० च्या कौटुंबिक उपासनेमध्ये त्यांनी आपल्या दौ-याची इत्थंभूत माहिती सांगितली.


कौटुंबिक उपासना मंडळात बायकांना व मुलांना बोध करणे अभिप्रेत असल्याने आध्यात्मिक विषय सुबोधपणे व रंजकपणे मांडावा असेही अण्णासाहेब शिंदे यांना वाटत असे. त्यासाठी ते कधी कधी प्रसंगानुरुप हरिकीर्तेने करीत असत. १९२६ साली २१ जुलैला आषाढी महाएकादशीच्या निमित्ताने त्यांनी शिवाजी हायस्कूलमध्ये हरिकीर्तन केले. त्यामध्ये त्यांनी तुकारामाची पत्नी जिजाऊ यांचे आख्यान लावले. निरुपणासाठी त्यांनी जिजाऊवर 'अवलाईची नवलाई' हे पद मुद्दाम रचले. जेधे मेन्शनमध्ये गुरु गोविंदसिंग यांच्यावर, कार्तिक महाएकादशी दिवशी शिवाजी हायस्कूल येथे जनाबाई यांची आख्याने आपल्या हरिकीर्तनात केली. श्री जिजामाता स्मारक करण्याच्या चळवळीत स्त्रियांनी आस्थेवाईकपणे भाग घ्यावा अशी श्री शिवनेरी जीर्णोद्धार कमिटीतर्फे अण्णासाहेबांना विनंती करण्यात आली. त्यासाठी कौटुंबिक उपासना मंडळामार्फत पुण्यातील सर्व जातींतील स्त्रियांची मोठी जाहीर सभा शिवाजी हायस्कूलात भरविण्यात आली. त्यावेळी अण्णासाहेबांनी कीर्तन केले. त्यामध्ये जिजामातेचे आख्यान त्यांनी लावले. ह्या आख्यानासाठी त्यांनी जिजामातेची थोरवी वेधकपणे व परिणामकारक रीतीने वर्णन करणारा स्वत: रचलेला ठसकेबाज फटका म्हणून दाखविला. स्त्रीवर्गाची महती व कर्तृत्व श्रोत्यांच्या मनावर ठसविणे व स्त्रियांमध्येही आत्मसन्मानाची भावना जागृत करणे हा अण्णासाहेबांच्या आस्थेचा विषय होता. त्यांच्या कीर्तनातून नेहमी भक्तिज्ञानपर, धार्मिक किंवा सामाजिक विषय असत. पण केव्हा केव्हा सामान्य बायकांना व विशेषत: मुलांना कळण्यासाठी ते विनोदात्म पद्धतीने विवेचन करीत असत. जेधे मॅन्शनमध्ये केलेल्या कीर्तनात जुनी श्रद्धा व नवी सुधारणा यांच्यामधील झगडा दाखविणारी स्वकृत लावणी त्यांनी म्हणून दाखविली. वरवर विनोदी आणि उथळ वाटणा-या ह्या लावणीमध्ये श्रद्धा आणि सुधारणा यांचा संवाद दाखविला आहे व आध्यात्मरहित आधुनिक सुधारणेचा पोकळपणा निदर्शनास आणला आहे. वनोपासनेच्या उपक्रमामुळे अनेक कुटुंबे संपूर्ण दिवस एकत्र घालवीत व त्यामुळे कुटुंबाकुटुंबांमधील स्नेहभाव वृद्धिंगत होण्यास मोठी मदत होते, ह्या अनुभवामुळे मंडळाच्यावतीने वनोपासनेचा कार्यक्रम वर्षातून एकदा तरी घडविण्यात येत असे. २२ एप्रिल १९२७ रोजी मंडळाच्या सहलीची तसेच त्यांच्या विनोदात्म लेखनशैलीची कल्पना त्यामुळे येऊ शकेल. ३


"मंडळी प्रथम पर्वती गावाच्या पूर्वेकडील अंबील ओढ्याचे काठावरील अगदी निर्जन व निवांत अंबराईत पेरुच्या बागेत उतरली. त्या वेळी नऊदेखील वाजले नव्हते. हिवाळ्यामुळे उन्ह तान्ह्या मुलाहूनही कोवळे होते. हांतरुण पसरून सावलीत दोन तान्ह्या मुलांना ठेवून, त्यांना रा. संतुजीराव कदम व वि. रा. शिंदे ही म्हातारी राखत बसली. बाकी सर्व लहान-मोठी स्त्री-पुरुषे कोणी पाणी आणावयाला तर कोणी इतर कामासाठी, कोणी ओढ्याच्या पाण्यात तर कोणी झाडांच्या पारंब्यांवर यथेच्छ विहार करावयाचा गेली. कोणी मुलीनी आपल्या ओच्यात नव्या गजना भरल्या, तर कोणी मुलांनी टपु-या हिरव्या चिंचांनी आपले खिसे गच्च गरम भरले. कोणी थंडगार पाण्यात न्हाणेधुणे आटपले; तर कोणी कोवळ्या उन्हात रविकिरण स्नानात मग्न झाले. पण तास-दीड तासात ( सकाळपासून कोणी काहीच खाल्ले नसल्यामुळे ) मंडळीन बोलावताच हळूहळू लहान (आशाळभूत) तोंडे करुन जमू लागली. पोट हे बेलिफाचे काम किती उत्तम करिते, हे अशा वेळी त्याने बजावलेल्या यशस्वी वारंटावरुन चांगले समजले. साडेदहा वाजले. धनगरी पद्धतीने पंक्तीचा भाट असावा असे ठरले. सगळ्यांनी कोंडाळे करावे. मधे गोपाळकाला ठेवावा. एकदा वाढल्यावर कोण कोणासाठी न उठता, ज्याने त्याने हातानेच जे लागेल ते घ्यावे. असे चालले. दही पाहिजे असल्यास एकाने घ्यावे व तसेच (दह्याचे पाळे ) कोंडाल्यात हातपोस्टाने फिरवावे. ह्या नवीन टपालाचे काम अमेरिकेतील सुधारलेल्या पोस्टापेक्षाही चांगले वठले. वास्तविक पाहता ते धनगरी टपाल नवीन नसून श्रीकृष्ण गोपाळहूनही जुने आहे. तेथील चिंचेच्या खालील इतिहाससंशोधकांनी निकाल दिला. ही न्याहारी बरोबर एक तास चालली. मग काय विचारता. काहींना तर बसल्या बसल्याच लवंडण्याची पाळी आली. लेकुरवाळ्यांना आपली लेकरे जड झाली. झाडांना पाळणे बांधिले. त्यात जी लेकरे निजली ती तीन तास झाले तरी उठेनात. ज्या बायका दमट व अंधा-या खोल्यांतून रात्रीचा दिवस करुन राबतात, त्यादेखील सपशेल आडव्या झाल्या ना? मग, सांगतो, का मस्करी करितो.


"दोन तान्ह्या मुलांसह आम्ही लहान-मोठे चोवीसजण होतो. ह्याची नावे हाजरी पुस्तकांत नमूद झाली आहेत. म्हणून येथे दिली नाहीत. शिवाय एक मोलकरीण होती. तिच्यात सहानुभूतीचा लेशही नव्हता. ह्यावरुन ही अस्सल मराठे कुलांतली असावी असे ओघानेच ठरविले. लाकडाच्या बाहुलीसारखी जी ती बसली ती हालेना. मग हासल्याबोलण्याची गोष्ट दूर. इतर बायका पसरल्या, तरुणही लवंडले. अर्वाच्य पोरेही पेंगू लागली. जणू काय जेवणाचे श्रम सर्व श्रमात जास्त असह्म. हे उघड्या हवेचे माहात्म्य. पण आम्ही काय तेथे निजावयाला गेलो होतो? जेवणानंतर मुखशुद्धीसाठी अण्णासाहेबांनी 'हल्लीचे चिवडेवाले' आणि "अग नवनारी, ते चाललीस कुठे जरा थांब ना' ही महाकाव्ये म्हणून दाखविली. तरी काही आळसाचा हल्ला हटेना की ती लाकडाची मोलकरीण हासेना शेवटचा रामबाण म्हणून त्यांनी जेव्हा बंगाल्यातील गोपाळ भांड४ विदूषकाची गोष्ट सांगितली. ती संपण्यापूर्वीच बायकामुले उठून बसली. इतकेच नव्हे, तर हासे न आवरल्यामुळे त्यांची मुरकुंडी वळून जमिनीवर पडू लागली. तरीदेखील त्या लाकडी बाईला हासू आले नाही. डोळ्याचे पाते हालते नाही. योगीच ती !  अशा कौटुंबिक सोहळ्यात तीन वाजले तरी कोणास कळेना. पश्चिमेकडील सावल्या तितक्याच लांब पूर्वेकडे पसरल्या. तरी हांतरुणावर पसरलेली मंडली दुस-या मुक्कामास जाण्यास काही केल्या उठेनात. काही तर्करत्नांनी तर निजलेल्या तान्ह्यांची सबब पुढे करुन अॅडजर्नमेंटचा ठराव आणला. पण तो बहुमताने फेटाळण्यात आला. इतरांनी चिंचेची सावली, ओढयाचा काठ, आसपासची निर्जनता व शेवटी दूर उंचावर समोर दिसणारे पर्वतीचे सौंदर्य अशा एकका दोन अनेक आळशी रसिकतेच्या सबबीवर लहानमोटी अडवणुकीची अमेंडमेंड आणिली. पण अधिकारी मंडळाने त्या सर्वांचे गोड निवारण केल्यावर तीन वाजता सर्व मंडळी कशीबशी तेथून पर्वतीच्या दक्षिणेकडील दरीतील मळ्याकडे निघाली.


"मळ्यात सुमारे दोन तास होतो. बायकांनी आज तो संप केला तो मुंबईच्या मजुरांच्या संपाहून जास्त यशस्वी झाला. त्यांच्या मुलांना सायकलीवरुन आणि तान्हयांना हातांवरुन पुरुषांनाच न्यावे लागले. तेथे गेल्यावर तरुणांना (मुलींना नव्हे ) चहा करावा लागला. चहा तयार झाल्यावर लोळणा-या बायकांनी एकेक तर मुलींनी दोन दोन कोप झोडले. कधी चहा न पिणा-या एका वृद्ध कपीने तर एक कोप पिऊन दुसरा आपल्या अंगावर सांडून घेतला. पण स्वारी नको काही म्हणेना! ह्या तपस्वी बोवांच्या ह्या व्रतभंगावर जणू ताण करण्यासाठी एक साध्वी बाईंनी पाच मिनिटांपूर्वी आपण काही खाणार नाही म्हणून केलेली भीष्मप्रतिज्ञा पार विसरुन पोळ्या आणि गचक्याची उसळ जी खात बसली, ती उठते कशाला. तीन तासांतच इतकी भूक.


"असा हा दिवस आनंदात गेला. सूर्याला दुसरे बालपण येऊ लागले. दिवसा ढवळ्या आम्हाला घरी पोचावयाचे होते. वृद्ध दूरदर्शी असतात. म्हणून संतुजीराव आपला मगदूर ओळखून आगावू निघाले. पावसाळ्यात जसे एकामागून एक महापूर येतात. त्याप्रमाणे आजची दोन जेवणे व एक चहा ह्यांचा हल्ला झाल्यामुळे उपासना करण्याचा विचार वाहून कोठे गेला कोण जाणे. कृतयुगात लोक खाऊन पिऊन सुखी होते. तेव्हा धर्म नव्हता. त्याचप्रमाणे आम्ही आज खाऊन पिऊन सुखी आणि निष्पाप झालो. मग उपासनेची गरज कोठे राहिली. कलियुगात धर्माच्या परिषदा भरू लागल्या आहेत. आम्हीही परत गावात गेल्यावर धर्माचे स्तोम माजवू, हा काही विचार मनात येऊन नाखुषीने आम्ही मळ्यातून निघालो. दिवे लावण्यास घरी आलो."


मंडळाचे काम अन्य ठिकाणीही बाहेरगावी सुरु व्हावे यासाठी अण्णासाहेब शिंदे यांनी १९२७ च्या जुलैमध्ये व त्यानंतर कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, बेळगाव, निपाणी, गडहिंग्लज ह्या ठिकाणी सफरी काढल्या. त्यांच्याबरोबर काही ठिकाणी कृ. गो. पाताडे, गणपतराव शिंदे व बाबुराव जगताप हे गेले होते. कोल्हापूर येथ कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना १९२८ मध्ये होऊन डॉ. कृष्णाबाई केळवकर, गोविंदराव सासने, भगवंतराव बारटक्के ह्यांनी काही वर्षे चिकाटीने काम चालविले.


कौटुंबिक उपासना मंडळाने कार्य १९३० सालापर्यंत जोमाने चालले होते. १९३० सालच्या मे महिन्यात अण्णासाहेब शिंदे यांना कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे सहा महिन्यांची तरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे मंडळाचे काही उपक्रम बंद पडले. तरीही साप्ताहिक उपासना, पाहुण्यांचे स्वागत, वनोपासना वगैरे उपक्रम चालू राहिले. १९३६ साली अण्णासाहेब शिंदे वेताळपेठेतील भाड्याचे घर सोडून शिवाजीनगर येथील स्वत:च्या 'रामविहार' ह्या घरामध्ये राहावयास आले. त्या वेळी कौटुंबिक उपासना मंडळाची शिवाजीनगर शाखा उघडण्यात आली. प्रारंभी वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपॉल वि. के. जोग यांच्या घरी उपासना होत असत. ते कॉलेजच्या परिसरात राहायला गेल्यानंतर "रामविहार' ह्या अण्णासाहेबांच्या राहत्या घरामध्ये उपासना होऊ लागल्या. अण्णासाहेबांचे आजारपण आणि वार्धक्य यांमुळे कौटुंबिक उपासना मंडळाचे कार्य १९४० नंतर मंदावले.