पुण्यास स्थलांतर

आपल्या आत्मनिवेदनपर ग्रंथामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या जन्मानंतर त्यांच्या गृहज्योतिषांनी वर्तविलेली कुंडली जशीच्या तशी दिली आहे. ह्या कुंडलीबद्दल लिहिताना त्यांनी म्हटले आहे. “वरील अशुद्ध लेखनावरून पुरोहितबुवा फारसे मोठे भाषापंडित होते असे दिसत नाही. त्यांचे ज्योतिषशास्त्रपांडित्य किती होते हे सांगण्याचा मला अधिकार नाही.” फलश्रुती ताडून पाहता कुंडलीत सांगितलेले योग अनुभवाला आले नाहीत असे त्यांनी नमूद केले. मात्र स्वतःच्या आयुष्याचे सिंहावलोकन करताना त्यांना आपल्या आयुष्यासंबंधी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जाणवली. ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात दर दहा वर्षांनी एक ठळक स्थित्यंतर घडून येत राहिले. त्यांचा जन्म १८७३ सालचा. त्यांच्या आयुष्यात पहिले परिवर्तन घडून आले, ते म्हणजे १८८२-८३च्या सुमारास त्यांचा विवाह झाला. वडिलांनी विवाहप्रीत्यर्थ वडिलोपार्जित घर गहाण ठेवून कर्ज काढले. त्या पायी सर्व मिळकत जाऊन भयंकर दारिद्र्य आले. वडील बंधूचा मृत्यू झाला आणि त्यांचे स्वतःचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. दुसरे परिवर्तन १८९२-९३ साली घडून आले. मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना जमखंडी येथील शाळेत शिक्षकाची जी पहिली नोकरी मिळाली होती ती सुटली व कॉलेजशिक्षणासाठी ते पुण्यास गेले. तिसरे परिवर्तन १९०३ साली घडले. विलायतेहून धर्मशिक्षण संपवून ते मुंबईस परत आले. प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून सार्वजनिक कामाला प्रारंभ केला. चौथे परिवर्त १९१२-१४च्या सुमारास घडून आले. प्रचारक ह्या नात्याने प्रार्थनासमाजाशी असलेला त्यांचा संबंध सुटला. भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या कार्याचे अर्धे तप संपले. मुंबई शहराची वस्ती सोडून पुणे शाखेची व्यवस्था त्यांनी प्रत्यक्ष ताब्यात घेतली व त्यासाठी पुण्यास येऊन राहिले.
शिंदे यांनी नमूद केलेल्या त्यांच्या दशवार्षिक स्थित्यंतरात एक महत्त्वाची गोष्ट मात्र बसत नाही. त्यांच्या जीवनातील कदाचित सर्वात महत्त्वाचे सामाजिक कार्य म्हणजे १९०६ साली त्यांनी केलेली भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना. अर्थात शिंदे यांच्या भूमिकेनुसार हे कार्य धर्मकार्याच्या अंतर्गतच मोडणारे आहे.

१९१० नंतर मुंबईमधील वास्तव्याची दोन वर्षे शिंदे यांच्या दृष्टीने मोठी संकटाची व क्लेशदायक अशी गेली. त्यांना ज्यांच्याबद्दल अतीव भक्ती वाटत होती; ज्यांचा आधार वाटत होता असे त्यांचे आईबाप ह्या काळात वारले. मुंबई प्रार्थनासमाजाचा प्रचारक या नात्याने असलेला त्यांचा संबंध संपुष्टात आला ही तर दुःखाची बाब होतीच; शिवाय त्यामुळे त्यांच्या योगक्षेमाचे तुटपुंजे का होईना जे साधन होते तेही नाहीसे झाले. घरातील मंडळी रोगग्रस्त झाली. ह्या अडचणींमुळे अण्णासाहेब शिंदे फार रंजीस आले. परंतु मिशनच्या कामासाठी आणखी दोन वर्षे त्यांनी मुंबईत मोठ्या निर्धाराने काढली. मिशनची व्याप्ती झपाट्याने वाढत होती. केवळ मुंबईतच नव्हे, तर गुजरात, कर्नाटक इथेही मिशनच्या शाखा निघालेल्या होत्या. मुंबईप्रमाणेच पुण्यालाही मिशनचे काम अत्यंत जोरदारपणे चालले होते. मुंबईत मिशनच्या कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने शिंदे यांनी विचार सुरू केला. परंतु मुंबईसारख्या दाट शहरात मिशनला पुरेशी जागा मिळेल अशी लक्षणे त्यांना दिसेनात. सरकारलाच कचे-यांसाठी जागा कमी पडू लागली होती. मुंबई शहरातील वस्ती लंब रेषेत पसरू लागली. अशा वाढत्या वस्तीमध्ये मुंबईला मिशनसाठी अधिक जागा मिळणे त्यांना दुरापास्त वाटू लागले. त्या शिवाय मुंबईचा खर्चीकपणाही मिशनच्या विस्ताराच्या दृष्टीने परवड्यासारखा नाही हे त्यांना जाणवू लागले. तेव्हा मिशनचे ठाणे सर्व प्रकारच्या चळवळीचे केंद्र असलेल्या पुणे शहरामध्ये हलवावे असा विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागला आणि पुण्यास स्थलांतर करणे भाग पडावे अशी परिस्थितीही त्यांच्याबाबतीत निर्माण झाली.

एकतर, मुंबई शाखेचे काम त्यांचे सहकारी श्री. वामनराव सोहोनी हे उत्तम त-हेने पार पाडीत होते, म्हणून मुंबईच्या कामाची कोणत्याही प्रकारे काळजी करण्याची त्यांना गरज राहिली नव्हती. वामनराव सोहोनी हे विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक होते. प्रार्थनासमाजाच्या कार्यात त्यांना गोडी होती. १९०६ सालच्या होळीच्या दिवशी अण्णासाहेब शिंदे हे वामनराव सोहोनी यांना आपल्याबरोबर परळ भागातील अस्पृश्यांची स्थिती बघण्यासाठी घेऊन गेले होते. तेथे सोहोनी यांनी अस्पृश्यवर्गाची जी दुर्दशा पाहिली त्याचा खोल ठसा त्यांच्या मनावर उमटला व त्यांच्या अंतःकरणात ह्या दीन वर्गाबद्दल करुणा उत्पन्न झाली. त्याच साली ऑक्टोबरमध्ये अण्णासाहेब शिंदे यांनी भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची मुहूर्तमेढ रोविली. त्या वेळी वामनराव सोहनी हे विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक असेल तरी, त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्यांचे अंतःकरण निराश्रित साहाय्यकारी मंडळीत होते. वामनराव सोहोनींच्या मनाचा हा कल ध्यानात घेऊन, तसेच त्यांची कार्यकुशलता लक्षात घेऊन त्यांनी भा. नि. सा. मंडळींमध्ये आजीव सेवक म्हणून सामील व्हावे अशी शिंदे यांनी आपली इच्छा त्यांच्याजवळ प्रकट केली. सय्यद अब्दुल कादर, भगिनी जनाबाई ही मंडळी आपआपल्या नोक-या सोडून मिशनची आजीव सेवक आधीच झाली होती. सोहोनींनीही त्यांच्याप्रमाणे निर्णय घेतला व मुंबई शाखेचे कुलगुरू म्हणून मिशनच्या आश्रमामध्ये कायमचे येऊन राहिले. मुंबई शाखेचे केंद्र हे परळ येथील पोयबावडीच्या नाक्यासमोर घडियाली हॉल या नावाच्या एका प्रशस्त जुन्या बंगल्यात करण्यात आले होते. हा बंगला दुमजली व भोवताली उपगृहे असलेला होता. इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या वतीने हा बंगला सवलतीच्या भाड्याने मिळाला होता. मुंबई शाखेची अशी चांगली व्यवस्था लागलेली असल्यामुळे व वामनराव सोहोनींच्या जबाबदार हातांत तेथील कारभार असल्यामुळे अण्णासाहेब अन्यत्र जाण्याचा विचार करू शकत होते.

पुणे येथील मिशनची शाखा १९०८ साली स्थापन झाली होती व या शाखेचा कारभार सन्मानीय सेक्रेटरी म्हणून श्री. ए. के. मुदलियार हे अत्यंत जबाबदारीने पाहत होते. ह्या शाखेच्या कामाला मार्गदर्शन करण्यासाठी व देखरेख ठेवण्यासाठी प्रतिष्ठित मंडळींची स्थानिक कमिटीही होती. शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन हे तिचे अध्यक्ष, प्रिन्सिपॉल र. पु. परांजपे हे उपाध्यक्ष तर ऑ. बी. एस्. कामत, एस्. वाय. जव्हेरी आणि मा. ह. घोरपडे हे सभासद होते. श्री. मुदलियार यांच्यावर ह्या सुमाराला मोठीच कौटुंबिक आपत्ती कोसळली. त्यांच्या पत्नी सौ. सीताबाई एकाएकी निवर्तल्या. त्यांची मुदलियार यांना कामामध्ये मोठी मदत होत असे. ह्या कौटुंबिक आपत्तीमुळे मुदलियार यांना मिशनच्या कामाचा राजीनामा देणे भाग पडले. ऑगस्ट १९१२ मध्ये पुणे शाखेने ठराव केला की जनरल सेक्रेटरी यांनी म्हणजे शिंदे यांनी पुढील तजवीज करावी व ती होईपर्यंत स्वतः पुण्यास राहून ह्या कामाची जबाबदारी घ्यावी. पुणे शाखेने केलेल्या विनंतीनुसार पुणे शाखेचे सेक्रेटरी म्हणून शिंदे यांनी ही जबाबदारी पत्करली व मिशनचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही आपली जबाबदारी ते तेथूनच पार पाडू लागले.

ह्या सुमारासच मिशनच्या कामाची फेरव्यवस्था करणे भाग पडले. शेठ दोमोदरदास सुखडवाला यांची मदत बंद पडल्यामुळे मुंबईचे निराश्रित सेवसदन बंद ठेवावे लागले व तेथे काम करणा-या भगिनी जनाबाई यांची दुस-या कामावर रवानगी करावी लागली. व-हाडची आणि मध्यप्रांताची परिस्थिती अजमावून पाहण्यासाठी जनाबाई तिकडे गेल्या आणि यवतमाळ येथे लहानसे वसतिगृह काढून ते चालवू लागल्या. याचवेळी हुबळी येथे कर्नाटक शाखा उघडण्यात येऊन तिची जबाबदारी सय्यद अब्दुल कादर यांच्यावर सोपविण्यात आली. सय्यद अब्दुल कारद हे मूळ जमखंडीचे. विठ्ठल रामजी शिंदे हे वयाने लहान असतानाही सय्यद अब्दुल कादर यांच्या वडिलांचा त्यांच्याशी स्नेह जुळला होता. या प्रकारचा कौटुंबिक संबंध असल्यामुळे व विठ्ठल रामजींबद्दल सय्यदांच्या मनात आदराची भावना असल्यामुळे पोर्ट ट्रस्टमधील आपली नोकरी सोडून ते मिशनचे आजीव कार्यवाह झाले होते. अण्णासाहेबांच्या प्रभावामुळे त्यांनी ब्राह्मसमाजाची दीक्षा घेतली होती व प्रथम पत्नी निवर्तल्यानंतर कल्याणीबाई या सारस्वत तरुणीशी त्यांनी १९०९ साली विवाह केला होता. सय्यद हे जमखंडी येथील असल्यामुळे व कानडी ही मातृभाषेप्रमाणे त्यांना अवगत असल्यामुळे हुबळी येथील कर्नाटक शाखेचे काम ते उत्तम प्रकारे करून शकले. कल्याणीबाईंची ह्या कामी त्यांना मदत मिळत होती. मिशनमधील आपल्या सहका-यांची अशा प्रकारे नवी व्यवस्था लावल्यानंतर १९१३ सालच्या आरंभी पुणे शाखेच्या पुनर्घटनेसाठी शिंदे यांनी पुण्यास यावयाचे ठरविले. राहण्याची स्वतंत्र व्यवस्था होईपर्यंत काही काळ ते आपले स्नेही प्रा. केशवराव कानिटकर यांच्या फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरातील बंगल्यामध्ये सहकुटुंब येऊन राहिले.१

संदर्भ
१.    प्रा. केशवराव कानिटकर यांचे ज्येष्ठ श्री. नरहर यांची पुण्यात १६ मे १९७४ रोजी घेतलेली मुलाखत.