अपूर्व स्नेहसंमेलन

अलीकडच्या काळात मधुमेह, कंपवात ह्या व्याधींमुळे अण्णासाहेब फारसे कुठे बाहेर जाऊ शकत नव्हते. वाई ब्राह्मसमाजाच्या मंडळींच्या आग्रहाखातर व कार्याच्या निष्ठेमुळे क्वचित वाईला जाणे होईल तेवढेच. घरी भेटावयास आलेल्या मंडळींबरोबर मात्र ते मोकळेपणाने चर्चा करीत. आवश्यक वाटे तेव्हा सल्ला देत. सातारचे भाऊराव पाटील अण्णासाहेबांकडे अलीकडे वरचेवर येत असत व शैक्षणिक प्रश्नांबाबत त्यांच्याशी विचारविनिमय करीत, त्यांचा सल्ला घेत. वाई ब्राह्मसमाजाच्या फिरतीवर अण्णासाहेबांबरोबर भाऊराव पाटीलही कधी कधी असत आणि वाईच्या परिसरातील खेडयांतील लोकांपुढे आपले विचार मांडीत असत. भाऊरावांच्या मनात अण्णासाहेबांबद्दल मोठी आदराची भावना होती. भाऊराव त्यांना गुरूस्थानी मानीत असत. अण्णासाहेबांनी ज्या अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याला प्रारंभ केला होता त्याची अंमलबजावणी भाऊरावांनी आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू केली होती. सातारा येथील त्यांनी सुरू केलेल्या बोर्डिंगांमध्ये अस्पृश्यता पाळली जात नव्हती. स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांचे राहणे-जेवणे एकत्र होत असे व भाऊराव सर्व जातिधर्माच्या मुलांना पित्याच्या वात्सल्याने वागवीत असत. खेडेगावांमध्ये शिक्षणप्रसाराचे भाऊरावांनी चालविलेले काम व अनुषंगाने सुरू ठेवलेला अस्पृश्यतानिवारणाचा उपक्रम अण्णासाहेबांनाही फार मोलाचा वाटायचा आणि भाऊरावांनाही आपल्या कार्याला अण्णासाहेबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद असावेत असे वाटत होते. म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकांना शपथ देण्याचा समारंभ भाऊरावांनी अण्णासाहेबांच्या हस्ते ठेवलेला होता.


१९३७ साली काँग्रेसने मुंबई इलाख्यात अधिकारग्रहण केले व आपले मंत्रिमंडळ स्थापन करून राज्यकारभार करण्यास सुरूवात केली. मुंबई सरकारच्या मंत्रिमंडळात ना. बाळासमुख्यमंत्री होते. कॉंग्रेस सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षणक्रमात आमूलाग्र बदल करण्याचे ठरविले व त्याबद्दलची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. शिक्षणविषयक फेररचनेचा भाग म्हणून मुंबई इलाख्यातील १४ सरकारी हायस्कुले लोकांच्या स्वाधीन करण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री बाळासाहेब खेर ह्यांनी केली. खाजगी संस्थांना ही हायस्कुले देण्याच्या बाबतीत घाईने निर्णय करणे हे अण्णासाहेबांना धोक्याचे वाटत होते. ज्या शिक्षणसंस्थांना बहुजन समाजाच्या शिक्षणाबद्दल आस्था नाही अशा शहरी शिक्षणसंस्थांच्या स्वाधीन जर ही हायस्कुले केली तर ही गोष्ट बहुजन समाजाच्या हिताची ठरणार नाही, असेही त्यांना वाटत असावे. कदाचित भाऊराव पाटलांनीही याबाबतीत त्यांच्याशी चर्चा केली असेल. तेव्हा ह्या शिक्षणविषयक धोरणाचा गंभीरपणे विचार व्हावा व राजकीय क्षेत्रातले नेते, मंत्री आणि शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्यामध्ये एकत्र बसून विचारविनिमय व्हावा, स्नेह वृध्दिंगत व्हावा या हेतूने अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या राहत्या घरी एक स्नेहसंमेलन आयोजित करावयाचे ठरविले. सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन पुण्यासच चालू होते, त्यामुळे मंत्रिमंडळाचे सदस्यही एकत्रितपणे उपलब्ध होण्याची शक्यता होती, म्हणून अण्णासाहेब शिंदे यांनी कॉंग्रेस सरकारमधील मंत्री, विधिमंडळ चिटणीस तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व विचारवंत अशा सुमारे ५२ मंडळींना ह्या स्नेहसंमेलनासाठी निमंत्रित करावयाचे ठरविले. ह्या स्नेहसंमेलनाच्या येण्याचे निमंत्रणपत्र त्यांनी पाठविले, ते असे :१


स्नेहसंमेलन
काँग्रेसने अधिकार स्वीकार केल्यापासून राजकारणाखेरीज इतर राष्ट्रीय बाबतीतही क्रांती हळूहळू घडत आहे, परंतु त्याप्रमाणे स्नेह व ऐक्य यांचे वर्धन होत नाही. त्यामुळे क्रांतीचा उद्देश कृतीत उतरत नाही. म्हणून हे छोटेसे संमेलन मी माझ्या घरी (रामविहार, जंगली महाराज रोड, भांबुर्डा, पुणे-५) येत्या शनिवारी तारीख १८ सप्टेंबर १९३७ रोजी सायंकाळी बरोबर सहा वाजता बोलाविले आहे. मुंबई इलाख्याचे मंत्रिमंडळापैकी ना. खेर, ना. लठ्ठे, ना. पाटील वगैरेंनी कृपा करून भाग घेण्याचे कबूल केले आहे. संमेलनाचा उद्देश केवळ सामाजिक नसून, राष्ट्रीय शिक्षणाच्या एका महत्त्वाच्या बाबीविषयी जिव्हाळयाची चर्चा करावी हा एक विषय आहे. म्हणून खालील मित्रमंडळींनी वेळेवर हजर राहण्याची तसदी घ्यावी, अशी नम्र विनंती आहे. काहींचा प्रत्यक्ष परिचय नसला तरी कार्याकडे व हेतूकडे पाहून औपचारिकपणा टाकून ते मजवर उपकार करतील या खात्रीने ही विनंती आहे. संमेलनाचे यश वक्तशीर आगमन व मुद्देशीर चर्चा यांवर अवलंबून आहे. कळावे ही विनंती.
रामविहार
भांबुर्डा, पुणे नं. ५
ता. १४ सप्टें. १९३७.


कार्यक्रम
सायंकाळी ६ वाजता -  स्वागत, परिचय वगैरे
सायंकाळी ६ वाजून १५ मि. - बैठक (भाषणे व चर्चा)
सायंकाळी ७ वाजून ३० मि. - चहा.


योजिल्याप्रमाणे हे संमेलन विठ्ठ्ल रामजी शिंदे यांच्या गच्चीवर शनिवारी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुरू झाले. उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री ना. बाळासाहेब खेर, ना. आ. बा. लठ्ठे (अर्थमंत्री), ना. ल. मा. पाटील (स्थानिक स्वराज्य मंत्री), ना. मोरारजी देसाई (महसूल मंत्री), अन्य मंडळींपैकी के. ब. देशमुख (संगमनेर), बा. ज. शिंदे (सातारा), रा. कृ. करवडे(सातारा), रा. भा.थोरात(नाशिक), ज. भ. मोरे(पंढरपूर), दा. खा. जगताप(केंजळ, मजूर पक्ष मुंबई), श्रीमती लक्ष्मीबाई गणेश ठुसे, श्री. धनाजीराव चौधरी(जळगाव), श्री. न. भी. मास्तर(मुंबई), भु. मा. नंदा, श्री. भा. म. गुप्ते(विधिमंडळ चिटणीस), मा. पु. पाटील(बेळगांव), ति. रू. नेसवी(धारवाड), सौ. हंसाबेन मेहता(मुंबई), डॉ. जीवदास मेहता(विधिमंडळ चिटणीस) संमेलनासाठी आले होते. इतर प्रतिष्ठित कर्त्या मंडळींपैकी श्री. रघुनाथराव खाडिलकर, बा. ग. जगताप, बाबुराव जेधे, हरिभाऊ वागिरे, सुभेदार घाटगे, स्त्रियांच्या ट्रेनिंग कॉंलेजच्या प्रि. कु. शिंदे, भाऊराव पाटील (सातारा),नारायणराव काजरोळकर (जॉइंट सेक्रेटरी, डी. सी. मिशन सोसायटी ऑफ इंडिया), श्री. सोनागावकर (मुंबई), भाऊसाहेब जाधव, इनामदार (वाघोली), केशवराव बागडे वकील (पुणे), शंकरराव मोरे (पुणे), शं. बा. चव्हाण (पुणे), सौ. नागम्मा पाटील (धारवाड), वसंतराव नायक (धारवाड) ही मंडळी उपस्थित होती. एकंदर सुमारे शंभर माणसांचा समुदाय रामविहारच्या प्रशस्त गच्चीवर जमला होता.


स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी अण्णासाहेबांच्या सून सौ. लक्ष्मीबाई व पुतणी शुभा ह्या दोघींनी ‘ऊठ, जाग मुसाफीर, भोर भयी अब रैन कहां जो सोवत है’ हे पद म्हटले. त्यानंतर अण्णासाहेबांनी प्रास्ताविक भाषण केले. प्रथमतः त्यांनी कामाची गर्दी असतानाही पाहुणे मंडळी वेळेवर आलेली पाहून सर्वांचे आभार मानले. त्यानंतर ते म्हणाले, “वरिष्ठ, दुय्यम शिक्षणाचा सर्व खर्च धनिक लोकांकडून घेऊन प्राथामिक शिक्षणाची तातडीने सोय करणे भाग आहे. महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यापूर्वी सर्व जातीच्या आणि दर्जाच्या लोकांच्या हितसंबंधाचे संरक्षण होईल, अशी खातरजमा देणे आवश्यक आहे. त्याशिवाय मागासलेल्या वर्गाचा ह्या योजनेवर विश्वास बसणार नाही व पाठिंबा मिळणार नाही. इलाख्यातील १४ हायस्कुले लोकांच्या स्वाधीन करण्याची घोषण झाली आहे.


खाजगी संस्थांना ही हायस्कुले देण्याच्या बाबतीत घाई होणे फार धोक्याचे आहे. बहुजन पक्षाच्या प्रतिनिधींची संमती मिळवून त्यांच्या हितानुरूप जे योजना करतील अशांच्या खाजगी संस्थांकडे ही ही हायस्कुले सोपविणे अगत्याचे आहे. युरोपात जर्मनीसारख्या उच्छृंखल राष्ट्रांचे सर्वाधिकारी असलेल्या हिटलरसारख्याने टोटॅलिटेरिअँनिझम म्हणजे प्रजेचे सर्वस्व आपल्या मुठीत आवळण्याचे तत्त्व, प्रस्थ झपाट्याने चालविले आहे. राजकीय, धार्मिक, आर्थिक सर्वच बाबतीत आपण करू ती पूर्व दिशा असे होऊन लोकशाही धुळीस मिळत आहे. अशा वेळी काँग्रेसने शिक्षणाचा काही भाग लोकांकडे सोपविणे हे फार सुचिन्ह आहे. मात्र हा प्रयोग सावधगिरीने व सर्वांकडे लक्ष देऊन केला पाहिजे.” अशा प्रकारचे प्रास्ताविक करून अण्णासाहेब शिंदे यांनी ना. खेर यांना या संबंधीचे काँग्रेसचे धोरण मंडळींपुढे दोन शब्दांत ठेवण्याची विनंती केली. ना. खेर यांनी अत्यंत विनयपूर्वक स्पष्ट शब्दांत आपले विचार मांडले. ते म्हणाले, “आपली सर्व संस्कृती पाश्चात्त्य झोटिंगशाहीच्या विरुद्ध आहे. शिक्षण सुधारण्याच्या बाबतीत काँग्रेस जे प्रत्येक पाऊल टाकेल ते सर्व भिन्न हितसंबंधाची योग्य तजवीज करूनच टाकेल. मराठी भाषेचे एक विद्यापीठ होणे जरुरीचे आहे. हल्लीचे उच्च शिक्षण अगदीच कुचकामी आहे. त्याबाबत दुमत नाही. मुंबई विद्यापीठाला इलाख्याच्या सर्व गरजा भागविणे शक्तीबाहेर झाले आहे. त्यातील उणिवा भरून काढण्यासाठीच ह्या नवीन विद्यापीठाचा प्रयत्न होईल. हायस्कुले खाजगी संस्थांना देण्यात येतील. त्याबाबतीतही सर्व जातीच्या हितसंबंधाची तरतूद करून लायकी पाहूनच सोपविण्यात येतील.” असे स्पष्ट आश्वासन देऊन ना. खेर यांनी आपले भाषण संपविले.


यानंतर म. गांधींच्या गौरवाचे एक सुंदर पद म्हणण्यात आले. त्यानंतर अण्णासाहेबांनी “हिंदभूमीच्या उत्कर्षासाठी झटण्यात या महात्म्याला यश येवो, त्यांची शिष्टमंडळी जी अधिकाररूढ झाली आहेत तिला पूर्ण जबाबदारीची जाणीव राहो, हल्लीच्या कठीण काळी प्रजेच्या सर्व आशा सफळ होवोत” अशी कळकळीची प्रार्थना केली. सर्वांचा अल्पोहार व चहा झाला. चहा आनंदाच्या खेळीमेळीच्या वातावरणात परस्परांशी प्रेमपूर्वक बोलण्यात पार पडला. अण्णासाहेब शिंदे यांचा निरोप घेताना ना. खेर त्यांना म्हणाले, “पदे आणि प्रार्थना ऐकून आपल्यास गहिवर आला आणि नेत्रांतून आसवे गळली.” एकंदर समारंभाला एखाद्या महाउपासनेचे स्वरूप आले, असे सुबोधपत्रिकेने नमूद केले आहे.२


अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल व कार्याबद्दल आदर वाटत असल्यामुळे मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांपासून ते महाराष्ट्रातील दूरदूरपर्यंतची कार्यकर्ती मंडळी ह्या समारंभास आस्थेने उपस्थित राहिली. खेड्यापाड्यांतील लोकांची सर्वांगीण उन्नती, बहुजन समाजातील मुलांचे शिक्षण याबद्दल अण्णासाहेबांना आस्था व काळजी वाटत होती. काँग्रेसच्या स्वकीय राज्यातही बहुजन समाजातील आणि मागासलेल्या वर्गातील मुलांची शिक्षणविषयक तरतूद नीट व्हावी असी सूचनाच आस्थेपोटी ह्या स्नेहसंमेलनात अण्णासाहेबांनी केली व अण्णासाहेबांच्या मनातील आस्था व चिंता लक्षात घेऊन ना. बाळासाहेब खेर यांनी शिक्षणासंबंधीचे निर्णय सगळ्या जातीचे हित लक्षात घेऊन अमलात आणले जातील असे आश्वासनही दिले. अण्णासाहेबांच्या प्रार्थनेत प्रकट झालेली आंतरिक तळमळ ही उपस्थितांच्या अंतःकरणाला भिडलेली असणार. म्हणूनच ना. खेर यांनी अण्णासाहेबांचा निरोप घेताना पदे व प्रार्थना ऐकून आपल्याला गहिवर आला व डोळ्यांतून अश्रू ओघळले असे सांगितले. अण्णासाहेब शिंदे यांचे वार्धक्यातील व व्याधिग्रस्त अवस्थेतील राजकीय, सामाजिक स्वरूपाचे हे अखेरचेच महत्त्वाचे कार्य म्हणता येईल.


अण्णासाहेब शिंदे यांनी आयोजित केलेल्या ह्या स्नेहमेळाव्यामुळे व त्यामधील चर्चेमुळे सरकारी हायस्कुले खाजगी शिक्षणसंस्थांच्या स्वाधीन करण्याच्या प्रश्नाचा खेर मंत्रिमंडळाने पुनर्विचार केला असला पाहिजे. कारण सरकारने जाहीर केलेल्या मनोदयाप्रमाणे हा विचार प्रत्यक्षा अमलात मात्र आला नाही.


संदर्भ
१.    शिंदे यांची कागदपत्रे.
२.    सुबोधपत्रिका, २६ सप्टेंबर १९३७.