मिशनचा पहिला बक्षीस समारंभ
२६ सप्टेंबर १९०९ रोजी श्रीमंत सयाजीरावमहाराज ह्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शाखेचा पहिला बक्षीस समारंभ मोठ्या थाटाने पार पडला. ह्या प्रसंगी डॉ. भांडारकर, नामदार गोखले, लेडी म्यूर मॅकेंझी, भोरचे अधिपती, सरदार नौरोजी पदमजी वगैरे प्रतिष्ठित मंडळी समारंभास अगत्यपूर्वक उपस्थित राहिली होती. हा समारंभ इस्लामिया स्कूल हॉलमध्ये साजरा झाला. उपस्थितांची भरपूर गर्दी होती. कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅन ह्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
ह्या समारंभाच्या निमित्ताने एक वादग्रस्त प्रश्न उदभवला होता. महार जातीचे पुढारी श्री. शिवराम जानबा कांबळे ह्यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत सयाजीरावमहाराजांना एक मानपत्र देण्याचा विचार त्या मंडळींनी केला होता व हे मानपत्र केवळ महार जातीकडून देण्यात यावे असा त्यांचा आग्रह होता. इतर अस्पृश्य जातींनाही त्यात भाग घ्यावासा वाटत होता. समारंभाचा दिवस जवळ आला तरी हा वाद मिटण्याचा रंग दिसेना. म्हणून मुंबईहून जनरल सेक्रेटरी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना बोलाविण्यात आले. सर्व वर्गाच्या पुढा-यांना बोलावून त्यांनी सांगितले, “मिशनचे रजिस्टर्ड ट्रस्टडीड आहे. त्याबहुकूम मिशनलाच अशा प्रकारचा जातिविशिष्ट काम करण्याच अधिकार नाही. मिशनच्या कार्यामध्ये जी वरिष्ठवर्गीय माणसे आहेत ती सर्व जातींची व धर्मांची आहेत; पण त्यांनाही सार्वत्रिक उदार धर्माच्य पायावरच मिशनचे कार्य करावे लागत आहे. स्वतः महाराजसरकारांनाही जातिविशिष्ट मानपत्र रुचणार नाही. ह्या उप्पर महार लोकांचा आग्रहच असेल तर आणि महाराज असे मानपत्र स्वीकारीत असतील तर ह्या मंडपाचे बाहेर अन्य ठिकाणी व अन्य वेळी कुणीही मानपत्र द्यावे. येथेच आणि आताच द्यावयाचे असेल तर सर्व अस्पृश्यवर्गाने एकत्र येऊन द्यावे. त्यांनी हा एकत्रितपणा दाखविला नाही तर त्यांच्यासाठी काम करण्यामध्ये वरिष्ठवर्गालाही विघ्ने येऊ लागतील.”१
हा प्रसंग अनेक दृष्टींनी बोलका आहे. अस्पृश्य मानल्या गेलेल्या वेगवेगळ्या जातींमध्ये सवतासुभा करण्याची प्रवृत्ती त्या वेळी बलवत्तर होती. त्याचप्रमाणे मिशनचे काम हे व्यापक पायावर व जातिनिरपेक्ष भूमिकेवरू चालले पाहिजे हा शिंदे ह्यांचा आग्रह ठाम स्वरूपाचा होता. अखेरीस सर्वांची समजूत पटून मिळूनमिसळून हा समारंभ साजरा झाला. त्यानंतर सेक्रेटरी मुदलियार ह्यांनी अहवाल वाचला. लेडी म्यूर मॅकेंझी ह्यांचे सुंदर व जोरदार भाषण झाले. अखेरीस महाराजांनी यथोचित भाषण करून एक हजार रुपयांची देणगी दिली. श्रीमंत सयाजीरावमहाराजांना ह्याप्रसंगी मानपत्र देण्यात आल्यावर महार, मांग व चांभार जातींच्या तीन बायकांनी महाराजांना आरती ओवाळली. तेव्हा महाराजंनी प्रत्येकीच्या तबकात एक एक सोन्याची गिनी टाकली.
मिशनचा वाढदिवस
सप्टेंबर, ऑक्टोबर हे दोन महिने पुणे शाखेच्या दृष्टीने धामधुमीचे गेले. बक्षीस समारंभानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे १८ ऑक्टोबर १९०९ रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशन डे साजरा करण्यासाठी पुणे शहरातील किर्लोस्कर थिएटरात एक प्रचंड जाही सभा भरविण्यात आली. पुणे शहरात अशा प्रकारची ही पहिलीच जाहीर सभा होती. मिशनला चोहीकडून जरी मदत मिळाली तरी पुण्यासारख्या जुन्या वळणाच्या शहराची मदत अद्याप मिळावयाचीच होती. मिशनच्या कार्याला पुणेकरांची सहानुभूती मिळाली व साहाय्य मिळावे ह्या हेतूने हा समारंभ शिंदे ह्यांनी घडवून आणला. प्रिं. र. पु. परांजपे ह्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. ह्या समारंभात महारांचे पुढारी श्रीपतराव थोरात, सुप्रसिद्ध वकील ल. ब भोपटकर, मुसलमानांचे पुढारी इस्माईल बहादूर, हंपी येथील शंकराचार्यांचे पतिनिधी श्री. हरकारे, न. चिं. केळकर, प्रो. धर्मानंद कोसंबी अशा विविध जातिधर्मांच्या पुढारी मंडळींची जोरदार भाषणे झाली. अध्यक्षांचे आभार मानताना प्रो. धोंडो केशव कर्वे ह्यांनी आपली शंभर रुपयांची देणगी दिली. हरकारे ह्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी हंपीच्या शंकराचार्यांची ह्या कामाला प्रत्यक्ष सहानुभूती असल्याचे सांगून तिचे द्योतक म्हणून त्यांच्या आज्ञेनुसार ३०० रुपयांची देणगी दिली. ह्या सभेचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अण्णासाहेब शिंदे ह्यांना विशेष वाटत होते. त्यांनी म्हटले आहे, “ह्या सभेमुळे ह्या इतिहासप्रसिद्ध शहराचे हृदयकपाट उघडले.”२
पहिल्या सहा महिन्यांच्या अहवालाच्या अखेरीस मासिक वर्गणीदारांची जी यादी प्रसिद्ध झाली आहे तिच्याकडे नजर टाकल्यास शिंदे ह्यांचे मत रास्त होते असे वाटते. प्रिं. सेल्बी, प्रो. वडहाऊस, सी. एक किंकेड ह्या युरोपियन लोकांनी दरमहा वर्गणी द्यावयास सुरुवात केली होती. त्याप्रमाणे प्रा. एच. जी. लिमये, प्रो. व्ही. के राजवाडे, प्रो. गो. चि. भाटे, श्री. जी. व्ही. लेले, श्री. ह. ना. आपटे ही मंडळीही वर्गणीदार झाली होती. प्रिं. र. पु. परांजपे, रावबहादुर का. बा. मराठे, श्रीमती रमाबाई रानडे, ल. म. सत्तूर, प्रो. के आर. भातखंडे, प्रो. गो. कृ. देवधर ह्या मंडळींची तर प्रार्थनासमाजाबद्दल व प्रार्थनासमाजाने चालविलेल्या अशा प्रकारच्या कामाबद्दल आधीपासून सहानुभूती होती. अण्णासाहेब शिंदे हे फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेत त्यांचे मित्र असलेले केशवराव कानिटकर हे आता तेथे प्राध्यापक झाले होते. प्रिंग. र. पु. परांजपे ह्यांच्यासारखी इतर प्राध्यापक मंडळीही उदारमतवादी होती. त्यामुळे अस्पृश्यतानिवारणविषयक कामामध्ये फर्ग्युसन कॉलेजमधील मंडळींचे शिंदे ह्यांना नेहमीच साहाय्य होताना दिसून येते. वर्गणीदार व देणगीदारांच्या यादीमध्ये श्री. के. ए. सावंत, व्ही. एम्. सातपुते, वाय. आर्. जाधव ह्यांसारखी मराठावर्गातील मंडळींची नावेही आढळतात. एकंदरीत मिशनच्या कामासाठी शिंदे यांना पुणे शहरातील ब्राह्म, मराठा, अस्पृश्य जातीतील प्रमुख मंडळींचे, तसेच इंग्रज सनदी व लष्करी अधिका-यांचे साह्या मिळू लागले.
येथेच शिंदे यांच्या दृष्टिकोणाचा व कार्यपद्धतीचा एक विशेष ध्यानत घेऊ.
अस्पृश्यवर्गाची सर्वांगीण उन्नती करण्याच्या हेतूने विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनसाठी भारतातील मवाळ-जहाल राजकीय पुढारी, लहानमोठ्या संस्थानांचे अधिपती आणि अस्पृश्यवर्गातील विविध जातींचे पुढारी यांचे साहाय्य घेतले. त्याशिवाय कलेक्टर, कमिशन ख्रिस्ती मिशन-यांचे साहाय्य घेतले ही बाब विशेष लक्षणीय म्हणावी लागेल. त्यामागे शिंदे यांची विशिष्ट भूमिका होती असे दिसते.
महात्मा फुले व केशवचंद्र सेन यांचे आकलन करताना शिंदे यांनी म्हटले आहे, “आपल्या देशोद्धाराच्या कठीण संग्रामातत्यांनी निष्कपटी ख्रिस्ती मिशन-यांचे व उदारधी सरकारी सत्ताधा-यांचे साहाय्य घेण्याचे नाकारण्याचा तोरा दोघांनीही कधी मिरविला नाही.”३ शिंदे यांची राजकीय मते जहाल होती, परंतु इंग्रजांचा द्वेष करावा अशी भावना त्यांच्या मनात कधीही नव्हती. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचे कार्य हे देशोद्धाराचे कार्य आहे, देशाच्या घडणीचे कार्य आहे, ही जाणीव त्यांना होती. त्यामुळे स्वतःची प्रतिष्ठा ठेवून इतरांबद्दल म्हणजे परधर्मीयांबद्दल, परकीय राज्यकर्त्यांबद्दल आदराची भावना ठेवून माणुसकीच्या पातळीवरून व्यवहार करणे शिंदे यांच्याबाबती स्वाभाविक होते. प्रार्थनासमाजाचे मुखपत्र असलेल्या सुबोधपत्रिकेच्या टीकेचा रोख सदैव पाश्चात्त्य मिशनरी व येथील जहाल राजकारणी यांच्याकडे असे. शिंदे यांचे तसे नव्हते. आत्माभिमान ठेवून राष्ट्रउभारणीच्या कामी इंग्रजांचे सहकार्य घेण्याची भूमिका त्यांनी अगदी १९०६ पासूनच ठेवली. इंग्रजांबद्दल अशा प्रकारची भूमिका ठेवणारे राजा राममोहन रॉय, जगन्नाथ शंकरशेट, महात्मा फुले, केशवचंद्र सेन आणि महात्मा गांधी या विभूतींबद्दल शिंदे यांच्या मनात आदराची भावना होती, त्याचे हेही एक कारण होते.
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. २३७-२३८.
२. तत्रैव, पृ. २३८.
३. विठ्ठल रामजी शिंदे, ‘महात्मा फुले व केशवचंद्र सेन,’ शिंदे लेखसंग्रह, पृ. २३७. १९२६ साली श्री. शिवाजी हायस्कूल, पुणे येथे दिलेले व्याख्यान.