प्रार्थनासमाज

मुंबईचा प्रार्थनासमाज हे बंगालमधील ब्राह्मसमाजाचे भावंड म्हणता येईल. मुंबईच्या प्रार्थनासमाज या संस्थेची स्थापना ३१ मार्च १८६७ रोजी फाल्गुन वद्य एकादशी म्हणजे पापमोचनी एकादशीच्या दिवशी झाली. प्रार्थनासमाज व  ब्राह्मसमाज ह्या संस्था बहुतेक सारखीच तत्त्वे प्रतिपादणा-या आहेत. मुंबई येथे प्रार्थनासमाज स्थापन होण्यामागे कोणती परिस्थिती होती, प्रार्थनासमाजाच्या स्थापनेस ब्राह्मसमाजाचे अस्तित्व काही एका प्रमाणात कारणीभूत झाले का, वगैरे इतिहास थोडक्यात ध्यानात घेऊ.

महाराष्ट्रामध्ये इ. स. १८१८ मध्ये पेशव्यांची सत्ता संपुष्टात येऊन इंग्रजी सतेचा अंमल सुरू झाला. पेशव्यांच्या दरबारात इंग्रजांचा वकील असलेला एल्फिन्स्टन मुंबईचा पहिला गव्हर्नर झाला. इंग्रजी अमलाबरोबर नवीन धर्तीच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला. मुंबई शहराची वस्ती वाढून उद्योगधंदे, व्यापार, सट्टे ह्या सर्वांच्या द्वारे धनाची विपुलता निर्माण झाली. वाढत्या संपत्तीबरोबर वेश्यांचे नाचगाणे व दुर्व्यसनांचे इतर प्रकार सुरू झाले. ख्रिस्ती मिशन-यांनी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासूनच महाराष्ट्रात शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. १८१४ मध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश आले व मुंबईतील वास्तव्याला सरकारची परवानगी मिळाली. त्यानंतर हळूहळू त्यांनी धर्मविषयक विचाराच्या प्रसृतीला सुरुवात केली. त्यांचे हे काम जोमाने चालले होते. १८५२ साली स्वधर्माचा त्याग करून ख्रिस्ती झालेल्यांची संख्या एक लाख बाराशे पंचविस एवढी झाली. चर्च मिशनरी मंडळी, लंडन मिशनरी मंडळी, वेस्लियन मिशन इत्यादी मिशन-यांच्या संस्थांनी शाळा काढून शिक्षण देण्याचे काम झपाट्याने चालविले होते. या मिशन-यांच्या शाळांमध्ये सुमारे पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षण घेऊ लागली होती. इंग्रजी सत्तेमुळे येथे सुरू झालेल्या नव्या शिक्षणाच्या प्रथेबरोबर इंग्रजांच्या संस्कृतीचा, त्यांच्या धर्माचा, त्यांच्या राहाटीचा नव्याने परिचय इंग्रजी शिकलेल्या महाराष्ट्रातील तत्कालीन तरुण पिढीला होऊ लागला. त्यामुळे वास्तवाचे व विचारांचे एक नवे विश्व त्यांच्यासमोर खुले झाले. इंग्रजी संस्कृतीचा आणि विचाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे होऊ लागला, तर मिशन-यांचे आक्रमण अधिक स्पष्ट स्वरूपात घडू लागले. याचा स्वाभाविक परिणाम म्हणून आपला धर्म, आपल्या सामाजिक संस्था आणि आपली जीवनपद्धती याबाबत नवशिक्षित पिढी अंतःर्मुख होऊन विचार करू लागली. रूढ हिंदू धर्मातील अनेक चालीरीतींचा समाजावर कसा अनिष्ट परिणाम होत आहे हे त्यांना जाणवू लागले. मूर्तिपूजेमुळे, जातिभेदामुळे समाजाची अवनत अवस्था झालेली आहे, हेही त्यांना प्रकर्षाने जाणवू लागले. इंग्रजी संस्कृतीकडून मूकपणे घडणा-या व ख्रिस्ती मिशन-यांकडून उघडपणे होणा-या आक्रमणाला तोंड देण्याची, कृतिशील उत्तर देण्याची गरज निर्माण झाली. अशा काळात महाराष्ट्रातील तत्कालीन कर्त्या, जबाबदार पुरुषांनी प्रार्थनासमाजाची स्थापना धार्मिक, सांस्कृतिक आक्रमणाला एक प्रकारे कृतिशील उत्तर देण्याचा प्रयत्न केला असे म्हणणे रास्त ठरेल.

 मिशन-यांचे आक्रमण एका बाजूने सुरू असताना नवशिक्षित मंडळींनी दर्पण, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, गुजराती व मराठी ज्ञानप्रसारक सभा यांसारखे उपक्रम सुरू करून लोकशिक्षणाचे कार्य आरंभिले. त्याचबरोबर समाजातील विचारी वर्ग रूढ धर्मातील दुष्ट व वेडगळ समजुतींमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. विशेषतः स्त्रियांवर होणारा अन्याय व जाती-जतींमधील उच्चनीच भाव, सोवळेपणा ह्यामुळे आपल्या समाजचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. हे व या प्रकाचे विचार विशेषतः दादोबा पांडुरंग तर्खडकर, राम बाळकृष्ण जयकर, डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, तुकाराम तात्या पडवळ, बाळा भाऊ शिंत्रे, लक्ष्मणशास्त्री हळबे, भिकोबा लक्ष्मण चव्हाण वगैरे त्या वेळच्या कर्तबगार गृहस्थांच्या मनात घोळत असत. ह्या सुमारास पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा व राम बाळकृष्णांच्या भेटीचा योग मुंबई शहरामध्ये आला. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, याबद्दलची ईश्वरचंद्राची तळमळ, त्यांची विद्वत्ता व सत्यनिष्ठा यांचा राम बाळकृष्णांच्या मनावर अत्यंत इष्ट परिणाम घडला. पंडित ईश्वरचंद्र हे महर्षी देवेन्द्रनाथांच्या तत्त्वबोधिनी सभेचे सभासद होते. पंडित ईश्वरचंद्र यांचे राम बाळकृष्ण आणि इतर मंडळींसमवेत ब्राह्मसमाजाविषयी बोलणे झाले असण्याची शक्यता आहे. कलकत्त्यातील ब्राह्मसमाजाप्रमाणे मोठी नसली तरी अल्प प्रमाणावर आपण येथे चळवळ सुरू करावी असा निश्चय करून ह्या मंडळींनी राम बाळकृष्णांसमवेत १८४० च्या सुमारास ‘परमहंस मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली. प्रथमतः ही मंडळी गुप्त होती. प्रकटपणे समाजाला न रूचणा-या गोष्टींसंबंधी चळवळ करण्याला हा काळ अनुकूल नाही असे समजून परमहंस मंडळीचे काम गुप्त ठेवण्यात आले. मूर्तिपूजेचा निषेध, एकेश्वरी मताचा पुरस्कार व जातिभेदाचा उच्छेद हे परमहंस मंडळीचे मुख्य उद्देश होते. जातिभेद मोडल्याची साक्ष म्हणजे पावरोटी सर्वांसमक्ष खाणे. सभेस प्रारंभ होताना व अखेरीस देवाची प्रार्थना म्हणण्याचा प्रघात असे. दादोबा पांडुरंगांनी लिहिलेला हस्तलिखित स्वरूपातील ग्रंथ सभासदांना वाचावयास देत असत. कोणताही एक धर्म ईश्वरद्त्त नाही असे त्यामध्ये विवेचन केले होते. दादोबा पांडुरंग यांनी ‘पारमहंसिक ब्राम्ह्यधर्म’ नावाचे छोटे पद्यमय प्रकरण लिहिले होते व त्यामध्ये ईश्वरभक्ती व भूतद्या, भक्ष्याभक्ष्य विचार इत्यादी बाबींसंबंधी विवेचन केले होते. परमहंस मंडळींच्या शाखा मुंबईच्या बाहेर पुणे, अहमदनगर, सातारा, बेळगाव, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी निघाल्या व एकंदर सभासदसंख्या हजारापर्यंत गेली. परंतु कोणा एका नविन सभासदाने मंडळींचे दप्तर लांबविले. सभासदांची नावे प्रसिद्ध केली व सभेच्या हेतूचा विपर्यास करून टीका केली. ही सभासदमंडळी अमुक एक दिवशी ख्रिस्ती होणार अशी भुमका उठविली. याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये सभासदांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. सभासदांची उपस्थिती रोडावली व हळूहळू परमहंस सभेचे काम बंद झाले.

परमहंस सभा जरी संपुष्टात आली तरी तिच्यामुळे जी जागृती झाली ती नष्ट झाली नाही. परमहंस मंडळीतील काही सभासदांस धर्माचीच अत्यंत आवश्यकता वाटत होती. डॉ. आत्माराम पाडुरंग, भिकोबादादा चव्हाण इत्यादी मंडळी एकमेकांपासून दूर झालेली नव्हती. पुढे कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याच्याबद्दल विचारविनिमय चाललेला होता. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, ज्ञानप्रसारक सभा, बाँबे असोसिएशन यांच्याद्वारा त्याचप्रमाणे हिंदू रिफॉर्मर, दंभहारक, प्रभाकर, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश इत्यादी वृत्तपत्रांच्या द्वारा व अप्रत्यक्ष रीतीने होत होताच. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, जनार्दन सखाराम गाडगीळ, विष्णुशास्त्री पंडित हे सामाजिक विषयात लक्ष घालून संस्थांच्या द्वारा व लेखलनाद्वारा उपयुक्त कामगिरी बजावित होते. १८६३ मध्ये इंदुप्रकाश निघाल्यापासून सामाजिक सुधारणेस अनुकूल असे धडाडीचे लेख प्रसिद्ध होत. अशा प्रकारे लोकजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू झाले होते. पंचवीस वर्षांपूर्वीच्या तुलनेत सर्वांगीण सुधारणेला अनुकूल अशा प्रकारचे वातावरण निर्माण होऊ लागले.
 
मात्र १८६४ मध्ये आर्थिक आघाडीवर मुंबईत वेगळेच चित्र दिसू लागले होते. शेअर्सच्या सट्टेबाजीत हजारो लोक धनवान बनले. पैशाशिवाय अन्य गोष्टींकडे लक्ष देण्याची कुणाच्या ठिकाणी वासना राहिली नव्हती. अशा वेळी ब्राह्मधर्माचे प्रभावी प्रचारक ब्रह्मानंद केशवचंद्र सेन मुंबई व्याख्याने देण्यासाठी आले होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, अमोघ वक्तृत्व, उदार विचार आणि अंतःकरणास भिडावे अशा प्रकारचे उद्गार या कशाचाही परिणाम संपत्तीने उद्दाम बनलेल्या मुंबईकरांवर झाला नाही. मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे १८६५ मध्ये अमेरिकेतील सिव्हिल वॉर संपले. कापसाच्या किमती गडगडल्या व शेकडो व्यापा-यांचे दिवाळे निघाले. आर्थिक संकटांनी हाहाकार उडाला. सांपत्तिक स्थितीतील हा चढउतार पाहिल्यावर परमहंस सभेतील जुनीमंडळी पुन्हा उत्साहाने कामाला लागली. १७ डिसेंबर १८६६ रोजी डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या घरी बाळ मंगेश वागळे, भास्कर हरी भागवत, नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद, सर्वोत्तम सखाराम मानकर, तुकाराम तात्या पडवळ, वासुदेव बाबाजी नवरंगे इत्यादी मंडळी उपस्थित राहिली. ह्या बैठकीमध्ये सामाजिक सुधारणेच्याच विषयाचा ऊहापोह झाला व विधवाविवाह, स्त्री-शिक्षण या कार्यास उत्तेजन द्यावे; बालविवाहाची चाल बंद व्हावी यासाठी प्रयत्न करावा, जातिभेदाची चाल वाईट असल्याचे उघडपणे प्रतिपादावे इत्यादी विचार झाला. परंतु ह्यासंबंधी झालेल्या नंतरच्या सभांमध्ये ऐहिक कल्याणावर विशेष दृष्टी ठेवून ही कार्ये हाती घेण्यापेक्षा मनुष्याचे ह्या जन्मी मुख्य कर्तव्य जे परमार्थसाधन त्याकडे विशेष दृष्टी ठेवली पाहिजे हा विचार कायम प्रार्थनासमाजाच्या स्थापनेचा निश्चय करण्यात आला. फाल्गुन वद्य एकादशी, शके १८७८ रविवार दिनांक ३१ मार्च १८६७ रोजी ईश्वरोपासनेस प्रारंभ झाला. समाज स्थापण्याच्या वेळी उद्देश व मूलतत्त्वे निश्चित करण्यात आली. देव एकच व निराकार आहे; त्याचे मानसिक भजन, पूजन करणे योग्य व आपले कर्तव्य आहे; मूर्तिपूजा हा असन्मार्ग असून देवास अपमानकारक आणि मनुष्यास नीचत्व आणणारा व दुराचरणाप्रत नेणारा आहे, तेव्हा हा असन्मार्ग सुटून सन्मार्गात लोकांची प्रवृत्ती व्हावी हा या समाजाचा उद्देश आहे असे स्पष्ट करण्यात आले. त्याशिवाय मूलतत्त्वामध्ये मूर्तिपूजेवर माझी श्रद्धा नाही असे स्पष्ट कलम घातले. समाजाचा सभासद होणा-यांस ही तत्त्वे मान्य असावी लागत. शिवाय त्याला पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा करावी लागे. “मी प्रत्यही परमेश्वराचे चिंतन करीत जाईन. सत्कर्मे आचरावयास व असत्कर्मापासून दूर रहावयास मी यत्न करीन. स्वभावदोषाने काही वाईट कर्म मजकडून घडल्यास त्याविषयी पश्चाताप व्हावा एतदर्थ परमेश्वरापाशी प्रार्थना करीन. हे परमेश्वर, ह्या प्रतिज्ञा पाळण्याचे सामर्थ्य मला दे.”

संस्थेची स्थापना होतेवेळी प्रार्थनासमाज हे नाव दिले गेले नव्हते. ऑक्टोबर १८६७ मध्ये टीकेला उत्तर देताना समाजाच्या एका सभासदाने ह्या मंडळीचे नाव प्रार्थनासमाज आहे असे स्पष्ट विधान केले.

प्रार्थनासमाजाने स्थापनेच्या वेळी ब्राह्मसमाजाचा नमुना डोळ्यांसमोर ठेवला होता ही गोष्ट खरी असली तरी मुंबईच्या मंडळींनी आपले स्वतःचे स्वत्त्व कायम ठेवून तत्त्वांची रचना केली होती असे दिसते. खुद्द देवेंद्रनाथ हे स्वतः जरी मूर्तिपूजेच्या जोरदार विरोधात असले तरी आदि ब्राह्मसमाजाच्या तत्वामध्ये प्रतिमापूजनासंबंधाने जोरदार विरोध दिसत नाही. देवेंद्रनाथांच्या काळातच ब्राह्ममंदिरातील वेदीच्या पाठीमागे जाऊन केला जाणारा वेदमंत्राचा घोष, ट्रस्टडीडशी विसंगत ठरणारा अवतारवादाला अनुकूल असा उपदेशकांकडून प्रकट होणारा विचार हा अनुभव घेतल्यानंतर १८४४ मध्ये महर्षी देवेंद्रनाथांनी प्रतिमापूजनाचा आपण त्याग करीत आहोत अशी इतर वीस अनुयायांसह प्रतिज्ञा घेतली व जे प्रतिमापूजनाच्या विरोधात आहे्त तेच खरे ब्राह्म असे जाहीर केले. बंगालमधील हा अनुभव ध्यानात घेऊन मुंबई प्रार्थनासमाजाने प्रारंभिक काळात मूर्तिपूजेसंबंधी ही कठोर भूमिका अंगीकारली असावी.

३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाल्यानंतर त्यासंबंधीची बातमी ख्रिस्ती धर्ममताच्या ज्ञानोद्य ह्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. प्रतिमापूजन निषिद्ध मानून परमेश्वराची भक्ती करणा-या मंडळींकडे ख्रिस्ती लोक अपेक्षेने बघत असत. हे लोक पुढे-मागे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील अशी त्यांना आशा वाटत असे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ख्रिस्ती मंडळींना आत्मीयता वाटत असे. मुंबई प्रार्थनासमाजाचे पहिले आचार्य अशी मान्यता असलेले श्री. भिकोबादादा चव्हाण हे मोठे ईश्वरनिष्ठ व प्रगल्भ मनोवृत्तीचे गृहस्थ होते. २ जून १८६७ रोजी बघितलेल्या उपासनेचे वर्णन ज्ञानोद्याचे संपादक शाहूराव कुकडे यांनी केले आहे. डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या कांदेवाडीतील माडीवरील दिवाणखान्यात शंभराहून जास्त मंडळी जमली असल्याचा त्यांनी निर्देश केला. त्यांनी म्हटले, “आम्ही गेलो तेव्हा रा. भिकाजी लक्ष्मण म्हणून एक भंडारी मनुष्य सिंहासनावर उभा राहून ईश्वराची प्रार्थना कशी करावी व प्रार्थना करणा-यांनी कसे वर्तावे या विषयावर एक निबंध वाचीत होता... हे काम चालविण्याकरिता ह्या मंडळींसारखा कोणी विद्वान, सुधारलेला, वजनदार मनुष्य नेमावा... कुणी योग्य मनुष्य मिळेपर्यंत पूर्वोक्त भंडारी मनुष्य त्यांनी उभा केला आहे हे बरे केले. पण तो असल्या मंडळींत शोभत नाही व लायक नाही... जो व्याख्याने देतो तोही पोशाख, भाषण वगैरे गोष्टींनी संभावित असला पाहिजे.”१ भिकोबादादा चव्हाण हे ‘मनी स्कुला’त मराठी शिक्षकाचे काम करीत असत. त्यांचा प्रेमळ स्वभाव, उत्कट ईश्वरनिष्ठा, सरळ वृत्ती ह्यांची माहिती नसल्यामुळे व भंडारी लोक वापरीत तसे मोठे पागोटे, अंगरखा व धोतर असा पोशाख पाहून त्यांच्यासंबंधी ज्ञानोद्यकारांनी अशा प्रकारचे अप्रस्तुत गैर उद्गार काढले.

आपल्या मतानुसार ईश्वरावर किती आत्यंतिक स्वरूपाची निष्ठा असू शकते याचे उदाहरण म्हणून भिकोबादादा चव्हाणांकडे निर्देश करता येऊ शकेल. दीनानाथ माडगावकर यांनी भिकोबादादांच्या आय़ुष्यातील एका प्रसंगाचे वर्णन केले आहे. उतरवयामध्ये भिकोबादादांची ‘मनी स्कुला’तील मराठी शिक्षकाची नोकरी संपली होती. त्यांना मिळणारे अल्पस्वल्प वेतन थांबले होते. अशा अवस्थेत त्यांच्या एकुलत्या एक साठ-सत्तर रुपये कमविणा-या पस्तीस-छत्तीस वर्षांच्या मुलास देवाज्ञा झाली. त्या मुलाला पत्नी व दोन मुले होती. अशा विपन्नावस्थेत संसार चालविण्याचा भार भिकोबादादांवर येऊन पडला. भिकोबादादांच्या मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकून प्रार्थनासमाजातील लहानथोर मंडळी त्यांना भेटून सांत्वन करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरी गेली. त्याप्रसंगी कोमल अंतःकरणाच्या एकदोन सभासदांना तर भिकोबादादांना बघितल्यावर रडे कोसळले. आपल्या भेटीस आलेल्या मित्रांची स्थिती पाहून भिकोबादादा काही वेळपर्यंत तो दुःखाच उमाळा शांत होईल म्हणून त्या मित्राकडे टक लावून पहात राहिले. शेवटी म्हणाले, “हे तुम्ही काय आरंभिले आहे? हा तुमच्या अश्रूंचा लोट मजवर हा दुर्घट प्रसंग गुदरला याबद्दल आपणास अतिशय दुःख होत आहे त्याची साक्ष आहे आणि देवाने ह्या दुःखात मला घालू नये होते असे आपणास वाटले, याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे असा माझा समज झाला आहे. तो चुकीचा नसेल तर आपल्या ह्या मनोवृत्तीबद्दल मला फार वाईट वाटते. परमेश्वर मायबाप आहे. तो कृपासागर, करुणानिधान असून न्यायी आहे असे मानणारे व तोंडातून उद्गार काढणारे तरी आपण सर्व आहोत. मग असे परमेश्वराविषयी मनात येणे अथवा त्यास मनात थोडीही जागा देणे किती अनुचित आहे याचा तुम्हीच विचार करा. हा प्रसंग मजवर येणे योग्य नाही असे म्हणणे करूणामय देवावर क्रूरतेचे व अन्यायाचे दोषारोपण करणे होय आणि श्रद्धाळू मनुष्यास हे बोलणे तर काय पण असा विचार मनात येऊ देणेही शोभत नाही. हा प्रसंग दुःसह तर खराच आणि परमेश्वर कृपेने तो कुणावर न येवो पण तो ओढवल्यापासून देवांनी कृपा करून एकाच परंतु सुशील, आज्ञाधारक व माझे कधीच मन दुखविण्यासाठी निरंतर झटणा-या अशा मुलाची देणगी दिली आणि माझे अनेक ज्ञाताज्ञात अपराध पोटी घालून तो मुलगा एवढा मोठा होईपर्यंत माझ्या अंगी पात्रता येईल म्हणून वाट पाहिली; अखेरीस मी तिला अपात्रच ठरलो आणि तो परत घेऊन गेला; अशीच माझी खात्री झाली आहे. आपण मनसोक्त वागावे आणि देवास दूषण द्यावे यात काय अर्थ?”