प्रस्तावना

डॉ. गो. मा. पवार यांच्या स्नेहापोटी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विनंतीनुसार मोठ्या आनंदाने मी ही प्रस्तावना लिहीत आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे एवढे सविस्तर, सांगोपांग, समतोल, गौरवपर पण त्याच वेळी तटस्थ आणि अस्सल साधनांवर आधारलेले हे पहिलेच चरित्र कर्मवीर जाऊन जवळ जवळ अर्धशतकाचा काळ होऊन गेल्यानंतर का होईना प्रसिद्ध होत आहे. अशा ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने महर्षींना आदरांजली वाहण्याची संधी मला मिळत आहे याबद्दल डॉ. पवार आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचे मी आभारच मानतो.

या प्रस्तावनेत प्रस्तुत चरित्राबद्दल व चरित्रनायकाबद्दल मी वेळोवेळी माझी मूल्यमापनात्मक विधाने अत्यंत संक्षेपाने व नम्रपणे वेळोवेळी मांडली आहेत. प्रस्तावनेच्या शेवटच्या विभागात माझे स्वतःचे महर्षींच्या जीवनाबद्दलचे आकलनही विनीत भावाने सादर केले आहे. तरीसुद्धा ही प्रस्तावना प्राधान्येकरून वर्णनात्मक आहे; विश्लेषणात्मक नाही याची नोंद वाचकांनी कृपया घ्यावी. डॉ. पवार यांनी महर्षींचे जीवन कसकसे, कोणत्या सूत्रांनुसार आणि कोणत्या पद्धतीने उलगडून दाखविले आहे हे बहुतांशी त्यांच्याच शब्दांत मी स्पष्ट केले आहे. एवढ्या मोठ्या समाजधुरिणाच्या एवढ्या मोठ्या चरित्राचा आशय थोडक्यात सादर करण्यात जर मी थोडाफार यशस्वी झालो तर बहुसंख्य आणि त्यातही नव्या पिढीच्या वाचकांना ती गोष्ट सोयीची होईल याच आशेने मी हे लिखाण करत आहे.


गेल्या दोन दशकांमधील महाराष्ट्राचा साक्षेपी वेध घेणा-या अभ्यासकांमध्ये एका गोष्टीविषयी एकवाक्यता आढळते. ती म्हणजे महर्षी रामजी शिंदे यांच्या असाधारण अशा सर्वगामी कार्याची आपण आजवर केलेली उपेक्षा. याचा उलगडा करण्याचा यत्न जाणत्यांनी वेळोवेळी केला आहे. उदाहणार्थ, डॉ. वि. भि. कोलते ह्यांच्या मते या उपेक्षेची मीमांसा अनेक दृष्टींनी करता येईल. “ज्या मराठा समाजात ते जन्मले तो त्यांच्याविषयी उदासीन आहे. ज्या दलित समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याला त्याचे महत्त्व कळत नाही आणि राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाशी सूत न ठेवता ज्या राष्ट्रीय पक्षाला ते मिळाले त्यांच्या महाराष्ट्रीय वारसदारांनी सोयिस्कर रीतीने त्यांची उपेक्षा चालविली आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांची कामगिरी अगदीच उपेक्षणीय आहे असे नाही, पण खास पुण्यात भरणा-या साहित्य संमेलनांच्या व्यासपिठावरून जेथे अतिसामान्य व्यक्तिंच्या चोपड्यांचा आवर्जून गौरव केला जातो तेथे आण्णासाहेबांच्या किंवा त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा नुसता उल्लेखही होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव आहे.” अण्णासाहेबांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य स्पृश्य आणि त्यातूनही वरिष्ठ वर्णांना मनापासून रुचण्यासारखे होते असे नाही तर अस्पृश्यांमध्ये राजकारणाचे नवीन वारे शिरल्याने तेही शिंद्यांची उपेक्षा करू लागले अशी डॉ. कोलते यांची मीमांसा आहे. (कोलते, पृ. २-३).

डॉ. ध. रा. गाडगीळ यांच्या मते कर्मवीरांचे ‘ब-याच अंशी विस्मरण’ झाल्याची कारणे धर्मकारण, संशोधन, अस्पृश्यतानिवारण आणि राजकारण या चारही क्षेत्रांत पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्या मते, “आपल्या आयुष्यात कोणत्याच प्रचलित विचारात अथवा कार्यप्रवाहात कर्मवीर शिंदे पूर्णपणे समरस झालेले दिसत नाहीत.” धर्मकार्यात महाराष्ट्रात ब्राह्मोसमाज राहोच, पण त्याची विशिष्ट मराठी आवृत्ती प्रार्थनासमाज यासही कधी महत्त्व प्राप्त झाले नाही. इतिहास व भाषाशास्त्र या दोन्ही क्षेत्रांत कर्मवीर शिंदे यांच्या चिकित्सक, सखोल व स्वतंत्र विद्वतेची खोली व बुद्धीची चमक आपल्याला जाणवते. पण त्यांचे हे लेखन “प्रसंगोपात, वेळात वेळ काढून केलेले... मधून मधून कोठेतरी प्रकाशित झाले असल्यामुळे” त्याचे वजन पडले नाही. डॉ. गाडगीळांच्या मते, “त्या वेळचे मान्यवर संशोधक व विचारांची रूढ दिशा याबाबतचे बरेचसे लिखाण टीकात्मक असल्यामुळे त्याची उपेक्षा झाली हेही घडले असावे.” कर्मवीरांच्या कार्याचा अस्पृश्यतानिवारण हा गाभा होता. पण “त्यांच्या या कार्याच्या पूर्वार्धात स्पृश्य समाजाची फारशी सहानुभूती व मदत त्यांस मिळाली नाही. पुनरुज्जीवित सत्यशोधक समाजाची दृष्टी ब्राम्हणांवरील हल्ल्यात केंद्रित झाली व महात्मा जोतीबांच्या कार्याच्या या दुस-या बाजूकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. पुढील काळात स्पृश्यांची वृत्ती व त्यांच्या कार्याची गतिमानता यांबद्दल अधिकाधिक निराशा उत्पन्न झाल्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अस्पृश्यांनी चढाऊ धोरण व स्वावलंबी मार्ग पत्करला आणि शिंदे साहजिकच बाजूला पडले. राजकरणातही तीच गत झाली.

“कर्मवीर शिंदे यांचा पिंड राजकरणी दिसत नाही. ....परंतु ब्राह्मणेतरांचा सवतासुभा ज्यायोगे होईल असे काही करू नये, असे म्हणणा-याला त्या वेळेस मान्यता न मिळणे साहजिक होते आणि जे तरुण त्यांच्या विचाराशी सहमत होते त्यांचा कल मार्क्सवादाकडे वळल्यामुळे श्री. शिंदे यांच्या व्यापक भूमिका त्यांस पटणे शक्य नव्हते.’’ (मंगुडकर; १९६३, पृ. ७-८). ही झाली कर्मवीर का उपेक्षित राहिले याची डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची मीमांसा. (गाडगीळ, पृ. ७-१०).

कर्मवीर शिंदे यांच्या जीवनाचे मर्म व वर्म उलगडताना श्री. रा. ना. चव्हाण यांच्या मते कर्मवीर उपेक्षित राहिले याचे कारण म्हणजे त्यांनी “कोणालाच सर्वांशी प्रमाण किंवा सर्वांशी अप्रमाण मुळीच मानले नाही..... सत्य हे बहुमतमान्य व लोकमान्य नसते, तरी त्याची साधना त्यांनी सोडली नाही. सत्यासाठी ते एकाकी (अलग-अस्पृश्य!) देखील होत.... विग्रह घेण्याच्या मागे त्यांची जी मौलिक दृष्टी व स्वतंत्र वागणूक झाली, हीच महत्त्वाची ठरते..... तटस्थतेत व त्रयस्थतेत त्यांनी विषाद मानिला नाही. व लोकरंजन व लोकाराधना केली नाही. प्रामाणिक मतभेद झाल्यामुळे व स्वशोधित स्वत:चे पण तात्त्विक सत्यच महत्त्वाचे मानण्याची आग्रही, हट्टी म्हणजे अशा स्वरूपाची सत्याग्रही प्रवृत्ती त्यांच्यात असल्यामुळे मतभेद विकोपाला जाऊन त्यांना जीवनात जबर किमती द्याव्या लागल्या व त्यांनी त्या दिल्या. हेच त्यांच्या जीवनाचे मर्म व वर्म होय, एवढेच नव्हे तर तत्त्वप्रधान मतभेद हाच पाया व शिखर ठरले. ...यामुळेच त्यांचे सारेच जीवन गतिमान व क्रांतिकारक झालेले आढळते..... (त्यांचे विग्रह व तटस्थता) ही सर्व त्यांचा मनोनिग्रह व त्याग दाखवते व ‘ग्यानबाची मेख’ या त्यांच्या हट्टी (!) व आनुष्ठानिक आग्रही स्वभावातच शोधता येते व शोधिली पाहिजे. त्यांची उपेक्षा म्हणजे भारतीय जटिल अस्पृश्यतेच्या चिवट प्रश्नाची व समस्येची उपेक्षा ठरते.” (चव्हाण, पृ. ३०-५६).

न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या मते “महर्षी फार पूर्वी जन्माला आले. ते द्रष्टे सेनानी होते. परंतु त्यांच्या विचारांची आणि तत्वज्ञानाची झेप फार उंच आणि लांब पल्ल्याची होती. ती समाजाला त्या काळी पेलण्यासारखी नव्हती. समाजाचे नेतृत्व करणा-या माणसाने समाजापुढे नेहमीच असले पाहिजे. परंतु त्यानं किती पुढे असावे, याला मर्यादा असते. तो समाजाचा वाटाड्या असावा. त्याने दृष्टिक्षेपापलीकडे जाता कामा नये. तो तसा गेला तर मार्गदर्शनाचे कार्यच संपुष्टात येते. शिंद्यांचे जवळ जवळ असेच झाले.’’ (सावंत, पृ. ६-८).

महर्षी शिंदे हे उपेक्षित महात्मा का राहिले ह्याची अगदी अलीकडील भेदक व विचारदर्शक मांडणी भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी केली आहे. त्यांच्या विवेचनानुसार महर्षींनी “त्यांनी ऐतिहासिक कार्य केलं, तथापि आपण इतके कर्मदरिद्री व करंटे ठरलो की त्यांच्या क्रांतिकारक सामाजिक विचाराचा आणि आचाराचा आशयच आपण ओळखू शकलो नाही. मराठा समाज त्यांच्याबाबतीत इतका अनुदार आणि असहिष्णू वृत्तीने वागला की त्याने त्यांना ‘महार शिंदे’च मानलं आणि त्या वेळी अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणा-या ज्या समाजासाठी त्यांनी आयुष्याची अक्षरशः बाजी लावली व आई, वडील, पत्नी, बहिणी व मुलेबाळे घेऊन महारवाड्यात आपले बि-हाड केले त्या समाजाला त्यांच्या रक्तामांसाचे नेतृत्व मिळाल्यानंतर त्या वर्गाने अण्णासाहेबांचा दुस्वास करायला सुरुवात केली. तशातच ज्या जाणत्या वर्गाला अण्णासाहेबांच्या कार्याचं महत्त्व समजत होतं, त्या वर्गाला त्यांचं कार्य नको होतं.” (पाटील, पृ. ४).

खुद्द प्रस्तुत चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार महर्षी कोणत्याच मतांशी, पक्षांशी, चळवळींशी तादात्म्य पावले नाहीत. “कारण अशा तादात्म्यामुळे स्वतःच्या मतांना मुरड घालण्याची पाळी येते. शिंदे यांच्या भूमिकेत ही गोष्ट बसणारी नव्हती.’’ (पृ. २६८). म्हणूनच, “ज्या ज्या कामामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणतीही लौकिक स्पृहा मनात न ठेवता स्वतःला समर्पित केले त्या संस्थेमधून बाहेर पडण्याचे, तिच्याशी फारकत घेण्याचे दुर्धर, शोकात्म प्रसंग शिंदे यांच्या आयुष्यात येत राहिले.’’

ब्राह्मणेतर समाजातर्फे २३ एप्रिल १९२५ रोजी महर्षींना पुण्यामध्ये मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी उत्तरादाखल बोलताना स्वतः श्री. शिंदे यांनी “मी माझ्या मुख्य किंवा आनुषंगिक कार्यामध्ये कोणत्याही एका पक्षाच्या अथवा पंथाच्या अधीन झालो नाही. माझा पक्ष केवळ परमेश्वराचा आणि माझी सदसद्विवेकबुद्धी माझा प्रतोद. मला माहीत आहे, की अशा प्रकारचा मनुष्य कोणालाही खूष ठेवू शकत नाही’’ असे उद्गार काढले होते हे आपण विसरता कामा नये.

माझ्या मते तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात इतरांनीही आपापल्या भूमिका, कार्यक्रम व हितसंबंध यांच्याविषयी आग्रही राहून आपापल्या अग्रक्रमांनुसार कर्मवीरांशी त्या त्या वेळी फारकत घेतली तर ऐतिहासिक विकासक्रमाच्या गतिशास्त्राप्रमाणे समजूनही घेता येते. पण त्या त्या स्थळकाळाचे संदर्भ ओसरल्यानंतरही पुढच्या पुढच्या पिढ्यांनी महर्षी शिंदे यांच्याविषयीचे पूर्वग्रह, किंतू, दुरावा व उपेक्षा सोडू नये यात मात्र ऐतिहासिक दृष्टीचा आपल्याकडे सर्रास आढळणारा अभावच दिसून येतो. आपापल्या जन्मजात जातवर्गाच्या अहंकारातून व हितसंबंधांतून मुक्त होऊन ऐतिहासिक सत्य व सामाजिक वास्तव यांना मुक्तिशील लोकहितपर भूमिकेतून सामोरे जाणे हे किती अवघड असते हीच गोष्ट या उदाहरणाने स्पष्ट होते. आपण जोवर सर्वांगीण सम्यक व सत्यनिष्ठ मुक्तीची दृष्टी स्वीकारणार नाही तोवर कर्मवीर शिंदे यांच्यासारखा महात्मा व महापुरुष उपेक्षेच्याच कक्षेत वारंवार ढकलला जाईल असेच चित्र आज तरी दिसते.

महर्षींचे विस्तृत असे चरित्र आजवर सिद्ध होऊ शकले नाही याचे कारण कोणत्या परिस्थितीत दडलेले असावे एवढ्याकरिता त्यांना भोगाव्या लागलेल्या उपेक्षेची त्रोटक का होईना एवढी मांडणी करावी लागली.


महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनाविषयी तसेच विचारधनाविषयी आजवर उल्लेखनीय असे काहीच लिहीले गेले नव्हते असा मात्र उपरोक्त प्रतिपादनाचा अर्थ नाही. प्रस्तुत प्रस्तावनेच्या म्हणजेच कर्मवीरांचे जीवन, व्यक्तिमत्त्व व कार्य यांच्याचपुरत्या मर्यादित संदर्भात बोलावयाचे म्हटले तर १९३० पासून ते थेट आजवर त्यांची अनेक छोटी-मोठी चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. कृष्णराव भाऊराव बाबर (१९३०), डॉ. गंगाधर मोरजे (१९७३), प्रा. संभाजीराव पाटणे (१९७६), डॉ. मा. प. मंगुडकर (१९७६), डॉ. ह. कि. तोडमल (१९८६), डॉ. भि. ना. दहातोंडे (१९९५), श्री. ए. के. घोरपडे गुरुजी (१९९८) व अगदी अलीकडे श्री. अनंतराव पाटील (१९९९) आणि ऍड. पी. के. चौगुले (१९९९) आदींनी महर्षींच्या चरित्र व कार्याचा लक्षणीय परामर्श घेतलेला आहे. १९९० साली प्रा. एम्. एस्. गोरे यांनी कर्मवीरांच्या कार्याचा परिचय एका इंग्रजी ग्रंथातही सादर केला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखक डॉ. गो. मा. पवार यांनीच १९९० साली नॅशनल बुक ट्रस्टकरिता अठ्ठावन्न पानांची एक पुस्तिका लिहिली होती. तिचा इंग्रजी अनुवादही (२०००) उपलब्ध आहे.

इतके असूनही महर्षींचे अगदी सविस्तर, सर्वगामी, सखोल व चिकित्सक असे चरित्र आजवर उपलब्ध नव्हते. ही उणीव सामान्य वाचक, कार्यकर्ते आणि विचारवंत यांना चांगलीच खटकत होती. ही मोठी उणीव डॉ. गो. मा. पवार यांच्या प्रस्तुत ग्रंथाने फार जिव्हाळ्याने, कसोशीने आणि व्यासंगनिष्ठ पद्धतीने दूर केलेली आहे. कर्मवीरांचे हे चरित्र विस्तृत, अस्सल साधनांवर आधारलेले व विचारप्रवर्तक आहे, याविषयी दुमत होण्याची शक्यता मला तरी फार दिसत नाही.

या चरित्राचे दोन विशेष प्रकर्षाने जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही चरित्रकाराला भेडसावणा-या एका पेचातून डॉ. पवार यांनी अगदी स्पष्ट भूमिका घेऊन चांगलीच वाट काढली आहे. पेच असा की, त्या त्या स्थलकालाचा यथासांग तपशील न देता नुसताच चरित्रपट रेखाटला तर मांडणी सूत्रमय दिसते व ग्रंथ आटोपशीर होतो. पण यातली अडचण अशी असते की तत्कालीन इतिहासाचे ज्ञान असलेला जाणता अभ्यासवर्ग सोडला तर इतरांना असा ग्रंथ रोचक वाटला तरी दुर्बोध ठरतो. मुख्य म्हणजे त्यामुळे चरित्रव्यक्तीची त्या त्या वेळची विवक्षित निवड व वर्तन यांचे मर्म सामान्य वाचकाच्या आटोक्यात येत नाही. याउलट चरित्रव्यक्तीच्या जीवनक्रमाचा उलगडा तत्कालीन स्थलकालाच्या दमदार चित्रणातून करावयाचा म्हटला तर ग्रंथाची गुणवत्ता वाढते पण त्याचा विस्तार घसघशीत आकार घेतो. यामुळे जाणत्या अभ्यासकांना या सर्वपरिचित (!) गोष्टींचा एवढा प्रपंच का मांडला गेला आहे, असे वाटू लागते. तर दुसरीकडे एवढा मोठा ग्रंथविस्तार नव्याने विषयप्रवेश करणा-यांचा हिरमोडही करू शकतो.
डॉ. पवार यांनी यांपैकी दुसरा पर्याय डोळसपणे पण निर्धाराने स्वीकारला आहे. तरुण पिढीतील सामान्य वाचक व कार्यकर्ते या निवडीचे स्वागतच करतील, याविषयी मला शंका नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मातब्बर संस्था पाठीशी असल्यामुळेच डॉ. पवार यांना असले धाडस जमले असेल. त्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानावेत तेवढे अपुरेच ठरतील. पण त्याच वेळी असा ग्रंथविस्तार फापटपसारा ठरणार नाही, याकरिता लेखकापाशी सम्यक दृष्टी, विकारनिरपेक्ष तटस्थता, अस्सल साधनांवर आधारलेला निखळ व्यासंग आणि रसाळ व चित्रमय निवेदनशैली हवी. डॉ. पवार याबाबतीत उणे पडत नसल्याने हे चरित्र एकाच वेळी मनोवेधक तसेच विचारप्रवर्तक असे ठरणार आहे.

दुसरा विशेष म्हणजे डॉ. पवार यांनी महर्षींच्या अतिशय समृद्ध व बहुआयामी विचारधनाची त्यांच्या चरित्राइतकीच विस्तृत व चिकित्सक मांडणी करण्याचा मोह या ग्रंथात टाळला आहे. ही पण एक पेचाचीच बाब होती. पुढच्या अनेक पिढ्यांना वारंवार दखल घ्यावी लागेल एवढा संपन्न वैचारिक वारसा श्री. शिंदे यांच्या विविध लिखाणांत उपलब्ध आहे. तो बाजूस ठेवला तर कर्मवीरांच्या महत्तेचे पूर्ण स्वरूप आपल्याला उमजणार नाही. पण त्यांच्याविषयीच्या विस्तृत चरित्राची उणीव प्रथमतःच भरून काढावयाची ठरविल्यावर डॉ. पवार यांना त्यासाठी दुस-या खंडाची जोड द्यावी लागली असती. हे कार्य स्वत: डॉ. पवार यांना किंवा अन्य कोणाला केव्हातरी करावेच लागेल. पण प्राप्त परिस्थितीत डॉ. पवार यांनी श्री. शिंदे यांच्या लिखाणाचा चिकित्सक परामर्श प्रस्तुत ग्रंथात घेतला नाही, ही गोष्ट मला तरी समर्थनीय वाटते.

चरित्रलेखनाविषयी डॉ. पवार यांनी घेतलेले परिश्रम आपल्याला लगेच जाणवतात. कर्मवीरांसंबधीच्या हस्तलिखित सामग्रीचा धांडोळा त्यांनी चिकाटीने घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील मँचेस्टर कॉलेजमधील ग्रंथालयात श्री. शिंदे यांच्या कॉलेजप्रवेशाच्या तारखेची नोंद व सही असलेले रजिस्टर, श्री. शिंदे यांनी पाठविलेली डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माहितीसंबंधीची पुस्तिका, त्यांचे गुरू प्रो. कार्पेंटर यांच्याशी श्री. शिंदे यांचा झालेला पत्रव्यवहार, पॉझ व मार्टिनो क्लब या वादविवादसंस्थांची वृत्तान्त पुस्तके व त्यामुळेच “धर्मप्रसाराच्या कार्यात स्त्रियांना सहभागी करून घेतले तर ते काम अधिक जोमाने चालेल’’, असा श्री. शिंदे यांनी पॉझ क्लबमध्ये मांडलेला ठराव आणि त्या कॉलेजमधील प्रथेप्रमाणे श्री. शिंदे यांच्यावरील कविता व त्यांचे एका समकालीनाने ‘कॉलेज ब्यूटी’ या नावाने काढलेले व्यंगचित्र हस्तगत करू शकले.

समकालीन इंग्रजीच नव्हे तर आपल्या हितचिंतकांच्या साहाय्यामुळे डॉ. पवार यांनी फ्रेंच व डच वृत्तपत्रे, नियतकालिके व ग्रंथ यांचाही अस्सल चरित्रलेखनाकरिता चांगलाच तलास घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील युनिटेरिअन चर्चमध्ये श्री. शिंदे यांनी चालविलेल्या उपासना व केलेली भाषणे, कर्मवीरांनी हिंदू गृहस्थितीबद्दल दिलेले व्याख्यान व सादर केलेला नाट्यप्रयोग, ऍमस्टरडॅममधील १९०३ च्या युनिटेरिअन जागतिक त्रैवार्षिक परिषदेत श्री. शिंदे यांनी केलेल्या प्रभावशाली भाषणाचे वृत्तान्त, त्या संदर्भात शिंदे यांच्या फोटोसह डच वृत्तपत्रात आलेली माहिती, तसेच ३० ते ३२ इंग्रजी ग्रंथालयांतून श्री. शिंदे यांनी उल्लेखिलेल्या युनिटेरिअन धर्मपुरुष व संस्था यांच्याबद्दलची माहिती प्रस्तुत चरित्रात प्रतिबिंबित होऊ शकली.

विशेष म्हणजे श्री. शिंदे इंग्लंडमधील एकूण सतरा शहरी आणि त्याच्याच जोडीला ऍमस्टरडॅम, पॅरिस, रोम व पाँपी या नगरात जिथे जिथे गेले तिथे तिथे (म्हणजे विद्यापीठीय व महाविद्यालयीन ग्रंथालये, सार्वजनिक वाचनालये, वस्तुसंग्रहालये व प्राणिसंग्रहालये, वने, उपवने, उपहारगृह, इतकेच नव्हे तर पॅरिसमधील ‘पेर ला शाज’ ही स्मशानभूमी व अन्य प्रेक्षणीय स्थळे) डॉ. पवार आवर्जून जाऊन आले. मुळात डॉ. पवार साहित्याचे रसिक व व्यासंगी प्राध्यापक व समीक्षक, रसाळ लेखक व त्यातही वरील खटाटोप. त्यामुळे कर्मवीर शिंदे यांच्या इंग्लंडमधील वास्तव्याचे व युरोपमधील प्रवासाचे प्रत्ययकारक, चित्रमय व लोभस असे रूप या चरित्रग्रंथातून आपल्यापुढे साकार होते.

महर्षींच्या प्रदीर्घ चरित्रलेखनाचे शिवधनुष्य डॉ. पवार यांनी सहजपणे पेलले आहे. त्याचे त्यांच्या उपरोक्त परिश्रमाच्या जोडीला आणखी एक कारण आहे. डॉ. पवार हे कर्मवीरांच्या जीवनाचा व विचारधनाचा गेली अनेक दशके मागोवा घेत आलेले आहेत. महर्षींचे चिरंजीव श्री. प्रतापराव शिंदे हे डॉ. पवार यांचे सासरे. श्री. प्रतापरावांच्या संग्रहात असलेल्या मोठ्या रोजनिशांचे साक्षेपी व काटेकोर असे संपादन डॉ. पवारांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी या नावाने १९७९ च्या प्रारंभीच ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले होते. महर्षी शिंदे यांच्या “असाधारण व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारी ही रोजनिशी’’  डॉ. पवार यांच्या ४७ पानी प्रस्तावनेमुळे अधिकच खुललेली आहे. डॉ. पवारांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या रोजनिशीचे वाङ्मयीन मूल्यही तिच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांच्याच जोडीला वाचकांच्या प्रत्ययाला येत असते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महर्षी वि. रा. शिंदे जन्मशताब्दी समारोह समितीने श्री. शिंदे यांच्या ग्रंथसंपादनाचे कार्य ज्या संपादक मंडळावर सोपविले त्याचे डॉ. पवार हेही एक घटक होते. याच मंडळाने १९७६ च्या एप्रिलमध्ये कर्मवीरांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा व १९७९ च्या फेब्रुवारीमध्ये धर्म, जीवन व तत्त्वज्ञान हा असे दोन ग्रंथ संपादून प्रसिद्ध केले. यानंतर मागेच नमूद केल्याप्रमाणे डॉ. पवार यांनी नॅशनल बुक ट्रस्टकरिता विठ्ठल रामजी शिंदे यांचे ट्रस्टच्या याबाबतीतील रिवाजाप्रमाणे ५८ पानांचे एक छोटेखानी पण फार मार्मिक व सुबोध असे चरित्र लिहिले. केवळ सात प्रकरणात महर्षींच्या जीवनकार्याचे रेखीव चित्रण केल्यानंतर आठव्या प्रकरणात केवळ सहा पानात महर्षींच्या ‘संशोधनकार्य आणि साहित्यसेवा’ या क्षेत्रातील असाधारण गुणवत्तेवर त्यांनी अचूक बोट ठेवले आहे. अशा प्रकारे चरित्रलेखनाकरिता घेतलेल्या परिश्रमाला एवढ्या प्रदीर्घ आणि आस्थापूर्ण अभ्यासाची जोड लाभल्याने प्रस्तुत चरित्राला चांगलेच वजन लाभले आहे.