विठ्ठल रामजी शिंदे यांनी धर्मप्रचार करण्याच्या बाबतीत आणखी एक नवा उपक्रम सुरू केला. प्रार्थनासमाजाच्या वतीने सहा रात्रशाळा चालविल्या जात होत्या व तीमध्ये ३१२ विद्यार्थी होते. त्यांपैकी ५७ विद्यार्थी नीच मानलेल्या वर्गातील होते. ह्या शाळांमध्ये येणारे विद्यार्थी दिवसा गिरण्या-कारखान्यात, ऑफिसात कामकरी, शिपाई, मजूर म्हणून काम करणारे असत. शिंदे ह्यांना तर पांढरपेशा मुलांपेक्षाही रात्रशाळेतील त्या लोकांच्या धर्मशिक्षणाची व्यवस्था करणे जास्त गरजेचे वाटत होते. कारण त्यांना दिवसभर पोटाच्या उद्योगामागे लागणे भाग पडत असे. म्हणून खेड्यातील लोकांइतकादेखील त्यांना धर्मबोध नसे. उलट त्यांची नीती मात्र बिघडण्याचा पुष्कळ संभव असे. म्हणून रात्रशाळेतील त्या प्रौढ विद्यार्थ्यांच्या धर्मशिक्षणाची त्यांनी व्यवस्था केली.
शिंदे स्वतः १५ दिवसांनी प्रत्येक शाळेत जात असत. तेथे एखाद्या अभंगाचा ते अर्थ सांगत व त्याच्याच आधारे ते एक व्याख्यान देत. नंतर शाळेतील शिक्षक दररोज तो अभंग मुलांकडून म्हणवून घेत असत व त्याच्या आधारे बोध करीत असत. त्यामुळे काही अभंग मुलांकडून सहज पाठ होत असत. त्याचप्रमाणे दर पंधरा दिवसांनी सर्व रात्रशाळांतील मुले एकत्र जमवून त्यांस धर्मपर अथवा एखाद्या विषयावर व्याख्यान दिले जात असे. एकदा मद्यपाननिषेधक संस्थेचे चिटणीस मि. गिल्डर ह्यांनी मद्यपानापासून होणा-या घातक परिणामाची चित्रे दाखविली व एक व्याख्यानही दिले.
रात्रशाळांमध्ये धर्मशिक्षणाचा ह्या प्रकारचा उपक्रम सुरू केल्यापासून सुमारे ३ महिन्यांच्या अवधीनंतर ५ ऑक्टोबर १९०४ या तारखेस रात्रशाळेमध्ये एक विशेष समारंभ आयोजित केला. दिलेल्या धर्मशिक्षणासंबंधी परीक्षा घेऊन तीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना बक्षिसे देण्याचा हा समारंभ सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी शिंदे ह्यांनी रात्रशाळांमध्ये धर्मशिक्षणाची आवश्यकता, अवलंबिली जाणारी पद्धती ह्यासंबंधी माहिती दिली. कामाठीपुरा येथील शाळेचे शिक्षक रा. जोशी हे अंत्यज मुलांशी अत्यंत मनमिळावूपणाने वागून शिकवीत असत. तसेच गावदेवीच्या शाळेच्या हेडमास्तर रा. सावे हे शिस्तशीरपणे शाळा चालवून मुलांना टापटिपीचे, शिस्तीचे वळण लावत. त्याबद्दल ह्या दोन्ही शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. शिंदे यांच्या भाषणानंतर सीतारम नामदेव (शिवतरकर) व सीताराम महादेव ह्या दोन अंत्यज मुलांचा मद्यपाननिषेधसंबंधी फारच उत्तम असा संवाद झाला. सर भालचंद्र ह्यांनी बक्षिसे वाटल्यानंतर धर्मशिक्षण देण्याच्या ह्या उपक्रमाचे त्याचप्रमाणे मद्यपानासारख्या घातूक सवयीबद्दल जागृती करण्याच्या कामाचे महत्त्व सांगून ह्या प्रकारचा उपक्रम चालविणारे धर्मप्रचारक शिंदे व त्यांना साहाय्य करणारे शाळेतील शिक्षक ह्यांना धन्यवाद दिले.१ प्रार्थनासमाजाच्या रात्रशाळांच्या बाबतीत दुसरी एक उत्साहवर्धक घटना घडली, ती म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांच्या हस्ते झालेला बक्षीस समारंभ. १९०४च्या नाताळात काँग्रेसचे अधिवेशन मुंबई येथे भरले. सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान ह्यावर्षी महाराजांना द्यावयाचे ठरले होते. ह्याचवेळी एकेश्वरी धर्मपरिषदेची पुनर्घटना करून तिचे अधिवेशन मुंबईस करण्याच्या कामी शिंदे ह्यांनी पुढाकार घेतला होता. त्या वेळी मुंबई प्रार्थनासमाजास भेट द्यावी व समाजाच्या रात्रीच्या शाळांच्या बक्षीस समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे म्हणून श्रीमंत सयाजीराव गायकवाडांना निमंत्रण देण्यासाठी शिंदे हे बडोद्यास गेले व महाराजांनी ते निमंत्रण स्वीकारले. ह्या ठरविलेल्या कार्यक्रमानुसार ३० डिसेंबर १९०४ ह्या दिवशी सयाजीराव गायकवाडांच्या हस्ते रात्रीच्या शाळेतील विद्यार्थांना बक्षिसे वाटण्यात आली. धर्मासंबंधी त्यांनी विचार स्पष्टपणे लोकांसमोर ठेवले. त्याप्रसंगी सयाजीराव महाराजांनी प्रार्थनासमाजास भेट दिली. त्या निमित्ताने डॉ. भांडारकर ह्यांनी त्यांच्या गळ्यात हार घातला व न्या. चंदावरकरांनी स्वागतपर भाषण केले.
१२ फेब्रुवारी १९०४ रोजी ब्रिटिश अँड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचे सेक्रेटरी यांच्याकडून पत्र आले. त्यामध्ये सेंट्रल पोस्टल मिशन, लंडन या संस्थेने प्रार्थनासमाजामार्फत पोस्टल मिशनचे कार्य यशस्वी रीतीने चालविल्याबद्दल शिंदे आणि सुखटणकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला अशी माहिती कळविली. त्यानंतर ह्याच संस्थेच्या सेक्रेटरीकडून ११ ऑक्टोबर १९०४ रोजी आणखी एक पत्र आले. त्यामध्ये “पोस्टल मिशनच्या कामाचा विस्तार करण्यासाठी उदार धर्मवाचन ग्रंथाचा एक विशेष वर्ग चालवून त्यात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना पारितोषिके देण्याची व्यवस्था करीत असल्यास तूर्त १०० रुपयांची देणगी पाठवू काय?” असे विचारले होते. कलकत्त्यास हेमचंद्र सरकारने असा वर्ग काढला होता व त्यांना अशी देणगी देण्यात आली. उदार धर्मवाङमयाचा प्रसार हिंदुस्थानात अधिक प्रमाणात करण्यासाठी ब्रिटिश अँण्ड फॉरेन युनिटेरियन असोसिएशनचा प्रतिनिधी या नात्याने आपली इतर कामे सांभाळून काम करण्याची शिंदे यांची तयारी आहे काय? अशी विचारणा केली होती. शिंदे यांची तयारी असल्यास अशा वाङमयाचा साठा गरजेप्रमाणे पुरवण्याची व त्यासाठी लागेल तो खर्च वेळोवेळी रोख पाठविण्याची तयारी दाखविली होती. शिंदे यांनी उत्तरी कळविले की, “मी हा विशेष वर्ग चालविण्याचे कार्य आधीच सुरू केले आहे. या वर्गातील हजेरी पटावर सुमारे ३० अंडरग्रॅज्युएट्सची नावे आहेत. तूर्त विद्यार्थी युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत गुंतले असल्यामुळे हा वर्ग बंद ठेवण्यात आला आहे. योग्य वेळी सालोसाल तो पुढे चालू होईल.”
संदर्भ
१. सुबोधपत्रिका, ९ ऑक्टोबर १९०४.