धर्मशिक्षणासाठी निवड आणि परदेशगमन

विठ्ठल रामजी शिंदे १८९८ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८९९ व १९०० अशी दोन वर्षे सेकंड एल्. एल्. बी. च्या टर्म्स भरण्यासाठी मुंबई जाऊन राहिले. या काळामध्ये मुंबईत प्रार्थनासमाजाच्या शेजारच्या रामजी पुरूषोत्तमच्या चाळीत तिस-या मजल्यावर ते राहत होते. त्यांचे बालपणापासूनचे मित्र जनुभाऊ करंदीकर हेही मुंबईस विठ्ठलरावांप्रमाणेच एल्. एल्. बी. च्या टर्म्स भरण्याच्या हेतूने मुंबईस आले होते व ते दोघेही एकत्रच राहत होते.१ ह्या काळामध्ये विठ्ठलरावांना एल्. एल्. बी. साठी करावयाच्या अभ्यासाच्या उत्साह असल्याचे दिसत नाही. त्याउलट प्रार्थनासमाजाकडे मात्र त्यांचा ओढा प्रबळ झालेला दिसतो. ते दर रविवारी मुंबई प्रार्थनासमाजात जाऊ लागले. तेथे नव्यानेच सुबोधपत्रिकेचे संपादक झालेले द्वारकानाथ गोविंद वैद्य, विल्सन हायस्कूलमधील शिक्षक वामन सदाशिव सोहोनी आणि मुंबई प्रार्थनासमाजाचे जुने कार्यकर्ते श्री. बाबण बापू कोरगावकर ह्यांचा परिचय झाला. ह्यांपैकी वैद्य व सोहोनी हे तरूण होते, तर कोरगावकरांच्या घरी विठ्ठलरावांचे विशेष जाणे-येणे होते. विठ्ठलरावांचा प्रार्थनासमाजाकडे असणारा ओढा, त्यांची धर्मविषयक तळमळ व त्यांची क्षमता ध्यानात घेऊन उपासना चालविण्यासाठी पुणे प्रार्थनासमाजाने त्यांना प्रथम बोलावले. पुण्याच्या व्यासपीठावरून त्यांनी प्रथम उपासना चालवली त्या वेळी उपदेशाकरिता, ‘धाई अंतरिच्या सुखे | काय बडबड  वाचा मुखे|’ हा तुकारामाचा अभंग घेतला. डॉ. भांडारकर, रा. ब. का. बा. मराठे, केशवराव गोडबोले, शिवरामपंत गोखले इत्यादी वडील मंडळी उपासनेस उपस्थित होती. उपासना चालविण्याचा विठ्ठलरावांचा हा पहिलाच प्रसंग असला तरी उपदेश फारच चांगला वठला. डॉ. भांडारकरांनी जवळ जाऊन त्यांची पाठ थोपटली व प्रेमपूर्वक अभिनंदन केले. शिंदे हे उपासना उत्तम चालवितात व पुण्याची उपासना चालविल्यानंतर डॉ. भांडारकरांनी त्यांचे कौतुक केले, ही वार्ता मुंबईस समजल्यावर तेथूनही विठ्ठलरावांना उपासनेच्या पाळ्या येऊ लागला. ३० जुलै १९०० रोजी मुंबई प्रार्थनासमाजामध्ये विठ्ठलरावांनी उपासना चालविली. विवेचनाकरिता त्यांनी ‘काय किर्ती करू लोकदंभ मान | दाखवी चरण तुझे मज |’ हा अभंग घेतला होता.

सुटीच्या काळात ते जमखंडीला गेल्यानंतर आपल्या घरी दर रविवारी मोठ्या थाटाने उपासना करू लागले. ह्या उपासनेसाठी बाहेरची मंडळीही जमू लागली. आपला मुलगा प्रार्थनासमाजाचा सभासद झाला हे रामजीबाबांना आणि यमुनाबाईंना फार आवडले. प्रार्थनासमाज म्हणजे आपल्या भागवत धर्माचीच सुधारलेली आवृत्ती आहे, असे त्यांना वाटू लागले. तुकाराम, एकनाथ, रामदास ह्यांच्या अभंगांची निरूपणे उपदेशाच्या वेळी होत असत. विठ्ठलरावांचे पोक्त वयाचे मित्र मीरासाहेब हथरूट ह्या मुसलमान गृहस्थास व त्यांच्या लिंगायत, ब्राह्मण मित्रांस प्रार्थनासमाजाच्या ह्या उपासनांचे कौतुक वाटत असे.

मुंबई प्रार्थनासमाजाचे अन्य काम करण्यातही त्यांना गोडी वाटत होती. थीइस्टिक मिशनच्या वतीने चालविल्या जाणा-या रात्रीच्या शाळांची व्यवस्था प्रार्थनासमाजाकडे आली होती. ह्या रात्रशाळा चेऊलवाडी, गिरगाव, गावदेवी, डोंगरी, खेतवाडी, भायखळा आशा वेगवेगळ्या वस्तींमध्ये होत्या. शिवाय महार, मांग, चांभार वगैरे अस्पृश्य मानलेल्या जातींच्या लोकांकरिता डोंगरीनजीक मदनपु-यामध्ये एक शाळा १८९० पासुन चालविली जात होती. ह्या शाळांवर देखरेख ठेवून तपासण्याचे काम विठ्ठल रामजी शिंदे, वा. स. सोहोनी व ए. बी. ओळकर हे करीत असत.२ मुंबई येथे शिंदे यांची आर्थिक स्थिती सुधारली होती अशातला भाग नव्हता. तरीही ते आपल्या कुवतीप्रमाणे प्रार्थनासमाजाच्या दुष्काळ फंडाला मदत करीत होते. त्यांनी दुष्काळ फंडाला एक रुपया दिल्याचा उल्लेख पाहावयास मिळतो.३ १९०० सालच्या सप्टेंबर महिन्यात प्रार्थनासमाजाच्या दृष्टीने एक दुःखदायक घटना घडली. न्यू इंग्लिश स्कूलमधील बुद्धिमान, पदवीधर शिक्षक श्री. मोती बुलासा यांनी १८९८ मध्ये प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली याचा उल्लेख आधी आलाच आहे. रे. डॉ. जे. टी. संडरलॅंड यांच्या सूचनेवरून ब्राह्मसमाजाच्या लायक होतकरू व्यक्तीस ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनच्या आर्थिक साहाय्याने धर्मशिक्षणासाठी ऑक्सफर्डला दोन वर्षे पाठविण्याची योजना सुरू झाली होती व ह्या योजनेनुसार सन १९०० मध्ये धर्मशिक्षणासाठी ऑक्सफर्डला पाठविण्यासाठी श्री. मोती बुलासा यांची निवड प्रार्थनासमाजाच्या शिफारशीनुसार कलकत्याच्या ब्राह्मसमाजाच्या कमिटीने केली होती. ह्या घटनेचा आनंद प्रार्थनासमाजीय मंडळींना झाला. श्री. मोती बुलासा हे १५ सप्टेंबर १९०० रोजी धर्मशिक्षणासाठी विलायतेला जाणार म्हणून त्यांच्या अभिनंदनार्थ पुण्यात तीन-चार ठिकाणी सभा झाल्या. शुक्रवार दिनांक २ सप्टेंबर १९०० रोजी पुण्याच्या प्रार्थनासमाजात त्यांच्यासाठी डॉ. भांडारकरांनी एक विशेष उपासना चालविली.४ या प्रसंगी केलेल्या भाषणामध्ये डॉ. भांडारकरांनी विलायतेस धर्मशिक्षणासाठी जाण्याचे प्रयोजन काय व त्याची उपयुक्तता कोणती याबद्दल उत्तम विवेचन केले व श्री. मोती बुलासा यांना त्यांच्या कामी शुभेच्छा दिल्या. मोती बुलासा हे १५ सप्टेंबर रोजी बोटीने विलायतेस जाण्यास निघाले. परंतु दुर्दैवी घटना अशी घडली की, वाटेत पोर्ट सय्यद येथे वातज्वराचा विकार होऊन त्यांचे आकस्मिक निधन झाले. ही बातमी ऐकून पुणे व मुंबई येथील प्रार्थनासमाजीयांना फारच वाईट वाटले. डॉ. भांडारकर यांनी पुणे प्रार्थनासमाजात मोती बुलासांच्या दुखवट्यानिमित्त एक विशेष उपासना चालविली. याप्रसंगी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॉ. भांडारकरांजवळ जाऊन त्यांना “मोती बुलासांच्या निधनाने रिकाम्या पडलेल्या जागेसाठी मला जर गुरुवर्यांनी पात्र ठरविले तर मी विलायतेस जाण्यास तयार आहे” असे सांगितले. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा हा निर्णय विठ्ठलरावांनी अंतःप्रेरणेने कसा घेतला ह्याचे वर्णन प्रारंभीच्या प्रकरणात केले आहेच.

धर्मप्रचारासाठी आपले आयुष्य वाहण्याचा निर्णय घेऊन वेगळी वाट शिंदे यांनी का चोखाळली असावी बरे? त्या काळामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल साशंक असणारा अज्ञेयवादी वर्ग सुशिक्षितांमध्ये मोठ्या प्रमाणात होता. मिल्, स्पेन्सर, आगरकर ह्या विचारवंतांच्या प्रभावामुळे मुख्यतः शहरी सुशिक्षितांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण प्राधान्याने इहवादी, उपयुक्ततावादी आणि व्यक्तीवादी असाच होता. शहरी सुशिक्षितवर्ग हा खेडेगावपासून दुरावलेला. खेडेगावच्या लोकांच्या दुःखाबद्दल त्यांना आच नव्हती हे तर सोडाच, परंतु त्यांना त्यांच्याबद्दल नीटशी माहितीही नव्हती. अशा शहरी सुशिक्षितांपेक्षा शिंदे यांचे आकलन, जाणीव व दृष्टिकोण वेगळे होते.
 
धर्माचे विकृत स्वरूप त्यांनी ग्रामीण लोकांमध्ये पाहिलेले होते. विपर्यस्त धर्मकल्पनांनी, अंधश्रद्धांनी व धर्माच्या नावाने चालू असलेल्या रूढींनी लोकांची किती हानी होत आहे, हे त्यांनी पाहिले होते. धार्मिक रूढीच्या नावाखाली बुवाबाजीचे स्तोम माजले होते. त्यामुळे खेडेगावच्या लोकांची अनेक प्रकारे नागवणूक व छळणूक होत असे. कित्येकांच्या आयुष्याचे नुकसानही होत असे. मद्यपान, पशुबली इत्यादी अनाचार धर्माच्या नावाखाली चालू होते. धर्माच्या नावाने चालू असलेल्या रूढीमु्ळे खालच्या समजल्या जाणा-या जातीतील कित्येक मुली देवाच्या नावाने मुरळी म्हणून सोडल्या जात व आयुष्यभर निंद्य स्वरूपाचे वेश्येचे अथवा वेश्यासदृश जिणे जगावे लागत होते, हेही शिंदे यांनी पाहिले होते. धर्माबद्दलची नीतीवर आधारलेली रास्त कल्पना लोकांच्या मनामध्ये नसल्यामुळे अनेक प्रकारचे अनर्थ घडत होते, हे त्यांना उत्कटत्वाने जाणवत होते. तेव्हा धर्मामधील हीण काढून सर्वसामान्य माणसाला धर्माचे उज्ज्वल स्वरूप जाणवून दिले तर एकंदरीतच जीवनाची प्रत उंचावल्यासारखे होईल, असे त्यांचे चिंतन चालू असले पाहिजे.
 
उन्नत धर्मकल्पनेची सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जाणीव निर्माण करून धर्मसुधारणा करणे म्हणजे केवळ मानवी जीवनाच्या एका क्षेत्रात सुधारणा करणे असा धर्मसुधारणेचा मर्यादित अर्थ त्यांचा नव्हता. जीवनातील सर्वच कृत्यांच्या मुळाशी उन्नत धर्मविचाराचे नैतिक स्वरूपाचे अधिष्ठान असावयास पाहिजे, अशी शिंदे यांची कल्पना बनली होती. धर्म जीवनाच्या सर्वच अंगाला व्यापणारा असतो हा विचार राजा राममोहन रॉय यांच्या कर्तृत्वाचे आकलन करताना १९०३ सालच्या ऍमस्टरडॅम येथील  उदार धर्मपरिषदेत पुढे त्यांनी प्रकट केला आहे. नवसारीच्या १९०४ सालच्या वार्षिकोत्सवाच्या भाषणात त्यांनी म्हटल्याप्रमाणे धर्मसुधारणा ही केवळ एक सुधारणा नसून सर्व चांगल्याच्या मुळाशी असणारी ती गोष्ट आहे. म्हणून उदार धर्म हा विश्वधर्म होऊ शकतो.
 
तेव्हा धर्माच्या नावावर चालू असणा-या रूढीग्रस्त समाजातील विविध प्रकारची अनिष्टे निपटून काढून सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण जीवनाचा स्तर उंचवावयाचा असेल, त्याला नैतिक अधिष्ठान द्यावयाचे असेल तर उन्नत धर्मविचाराचा प्रसार करणे हाच अत्यंत परिणामकारक उपाय आहे, आशी शिंदे यांची चिंतनाच्या अंती मनोधारणा झालेली असणार. म्हणूनच अंतःप्रेरणेच्या एका विशिष्ट क्षणी त्यांनी आपले आयुष्य धर्मकार्याला वाहून टाकण्याचा निर्णय घेतला असणार.

विठ्ठलरावांची धर्मशिक्षण घेण्यासाठी विलायतेस जाण्याची तयारी आहे हे समजून डॉ. भांडारकरांना फार आनंद वाटला व त्यांनी विठ्ठलरावांना प्रेमाने कुरवाळले. मँचेस्टर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची निवड करताना काही प्रमुख अटी असत. अशा विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणामध्ये प्रगती झालेली असावयास पाहिजे. त्याचप्रमाणे ब्राह्म वा प्रार्थनासमाजाचे कार्य करण्याची त्यांच्यामध्ये पात्रता दिसून थोडेबहुत कार्यही त्यांच्या हातून झालेले असायला पाहिजे. ह्या गोष्टी ध्यानात घेऊन तो विद्यार्थी ज्या भागातला असेल त्या भागातील समाजाच्या सभासदांनी आणि कार्यवाहकांनी त्याची एकमताने शिफारस करायला पाहिजे. प्रांतिक समितीची शिफारस कलकत्त्यातील साधारण ब्राह्मसमाज आणि नवविधान ब्राह्मसमाज या शाखांच्या प्रतिनिधींच्या ब्राह्मसमाजाच्या कमिटीने पसंत करावयास पाहिजे. निवडलेल्या विद्यार्थ्याला वर्षाला १०० पौंड अशी स्कॉलरशिप दोन वर्षे देण्यात येई. मात्र प्रवासाचा खर्च विद्यार्थ्यालाच सोसावा लागे. मँचेस्टर कॉलेजमधील शिक्षणक्रम आटोपून स्वदेशी आल्यानंतर त्या विद्यार्थ्याने ब्राह्मसमाजाच्या प्रचाराचे कार्य आजन्म करावयाचे असते. निदान ह्या उद्देशाशी विसंगत असा उदरनिर्वाहाचा मार्ग अवलंबू नये. ह्याच्या उलट मात्र, अशा विद्यार्थ्याच्या योगक्षेमाबद्दल ब्रिटिश कमिटी, कलकत्त्यातील कमिटी किंवा दुसरी कोणी कायदेशीर हमी घेतलेली नसे. मोती बुलासांच्या रिकाम्या जागी स्कॉलरशिप घेऊन धर्मशिक्षणार्थ इंग्लंडला जाण्याची आपली तयारी आहे हे डॉ. भांडारकर यांच्याजवळ म्हणताना ह्या सा-या कडक अटी विठ्ठलरावांच्या मनात होत्या. घरची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. एल्. एल्. बी. ची अखेरची परीक्षा देण्याचे दिवस जवळ आले होते. बडोदा संस्थानात नोकरी मिळण्याची केवळ शक्यता होती, असे नव्हे तर नोकरी करण्याची अट त्यांनी मान्य केली होती. ह्या शिक्षणाच्या जोरावर मोठ्या पगाराची नोकरी त्यांच्या सहज आवाक्यात होती. अशा परिस्थितीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे, “कोणताही अडथळा मनात येऊ न देता किंबहुना त्याचा विचारही न करता केवळ परमेश्वरी आदेश समजून मी गुरुवर्य भांडारकरांकडे माझा निश्चय गंभीरपणे प्रकट केला. गुरूवर्यांनीही तो तितक्याच झटकापटकीने स्वीकारला.”

“डॉ. भांडारकरांनी मनात आणल्यावर प्रांतिक समाजाची, कलकत्त्याच्या समितीची, नंतर ब्रिटिश कमिटीची व अखेरीस मँचेस्टर कॉलेजची पसंती ह्या ओघाओघानेच मिळाल्या” असे नमूद करतानाच शिंदे यांनी मधेच जो एक व्यत्यय घडला त्याचा निर्देश केलेला आहे. तो म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी श्रीधर विष्णू परांजपे ह्या तरुणाची शिफारस केली होती. ह्या परांजप्यांच्या संदर्भात लिहीत असताना ग. त्र्यं. माडखोलकर यांनी म्हटले आहे, “त्यांच्या या विविध गुणांचा इतका परिणाम डॉ. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यावर झाला की, इंग्लड-अमेरिकेमधील युनिटेरियन पंथाने तुलनात्मक धर्मशिक्षणासाठी ठेवलेल्या शिष्यवृत्तीकरिता त्या दोघांनीही १९०० च्या डिसेंबरमध्ये त्यांची शिफारस केली. एकेश्वरवादाचे प्रचारक म्हणून ते उत्तम काम करतील, असा विश्वास प्रार्थनासमाजाच्या त्या दोघाही धुरिणांनी, आपल्या या शिफारशीच्या पत्रात, त्यांच्याविषयी व्यक्त केलेला होता.
तथापि, ती शिष्यवृत्ती युनिटेरियन पंथाचे प्रमुख डॉ. संडरलँड यांच्या कर्मवीर श्री. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील लोभामुळे अखेर त्यांना मिळाली व परदेशात जाऊन तौलनिक धर्मशास्त्राचे अध्ययन करण्याचा श्रीधररावांचा योग हुकला.”५

स्कॉलरशिपसाठी असलेल्या अटी, विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया व विठ्ठल रामजी शिंदे यांची पात्रता विचारात घेता ग. त्र्यं. माडखोलकर यांचे वरील म्हणणे योग्य माहितीवर आधारलेले दिसत नाही. ह्या निवडीनंतर तीन वर्षांच्या आतच १८ मे १९०३ रोजी श्रीधर विष्णू परांजपे यांनी श्रीरामदासानुदास असे नाव धारण करून वर्धा शहरापासून सुमारे एक मैलाच्या अंतरावर असलेल्या एका टेकडीवर हनुमानगडाची स्थापना केली. एक ओटा बांधून त्यावर मारूतीची स्थापना केली व अभिनव ‘श्रीरामदास संप्रदायाचा’ प्रारंभ केला. मारुती हे त्यांचे उपास्य दैवत होते.६ परांजपे यांचा मूर्तिपूजेवर व अवतारवादावर विश्वास होता असे दिसते. यावरूनही ब्राह्मसमाजाच्या, प्रार्थनासमाजाच्या धर्मकल्पनेवर त्यांची अढळ श्रद्धा होती असे दिसत नाही.

शिंदे यांची निवड झाली खरी; परंतु पैशाची सोय काय हा बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. प्रवासखर्चासाठी निदान दीड-दोन हजार रुपयांची आवश्यकता होती. त्याशिवाय पोशाखाचा खर्च, ते परत येईपर्यंत कुटुंबाच्या योगक्षेमाची तरतूद अशी खर्चाची कलमे त्यांच्यासमोर आ म्हणून उभी होती. त्याशिवाय दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे त्यांनी बी. ए. व एल. एल. बी. च्या खर्चासाठी श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून सुमारे दीड हजार रुपयांची स्कॉलरशिप घेतली होती. त्यासाठी बडोदे संस्थानात नोकरी करण्याची अट त्यांनी मान्य केली होती. परंतु मँचेस्टर कॉलेजची स्कॉलरशिप घेतली तर त्यांना बडोदे संस्थानातच काय कुठेही नोकरी करता येणार नव्हती आणि बडोदे संस्थानात नोकरी केली नाही तर स्कॉलरशिपची रक्कम परत करण्याचा कायदेशीर करार होता. या पेचातून मार्ग कसा काढावा या प्रचंड फिकिरीत विठ्ठलराव पडले असता त्यांना एकच उपाय दिसला, तो म्हणजे श्रीमंत सयाजीरीव गायकवाडांकडे जाऊन सगळा प्रकार त्यांना सांगून त्यांची मदत मागणे. त्याप्रमाणे महाराजांची भेट घेण्यासाठी ते १९०१ च्या फेब्रुवारीमध्ये बडोद्यास गेले. या भेटीचे त्यांनी वर्णन केले आहे ते असेः “भेट झाली. महाराज खरे दिलदार. ते हसून म्हणाले, “ काय शिंदे, आमच्या पैशाची काय वाट?” मी अत्यंत नम्रपणाने उत्तर केले, “महाराज, पत्करलेले कार्य ईश्वराचे आहे आणि ते आपल्यास पसंत पडण्यासारखेच आहे. धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादी प्रागतिक गोष्टींचे बाळकडू आपण आजपर्यंत पुष्कळच पाजीत आलेले आहात. आता तर विलायतेतील युनिटेरियन समाजाने माझा अर्ज पसंत केल्यावर ही चालून आलेली संधी आपण दवडणार नाही अशा भरवशावरच आपणाकडे आलो. मला प्रवासात लागणारे सुमारे दीड हजार रुपये जर आपण कृपाळूपणे द्याल तर अर्थातच माझे मागचे दीड हजार रुपयांचे ऋण फिटले असेच मी समजेन.” ऋण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून दयाळू महाराज हसले, “बरे आहे. शिंदे, तुम्ही यशस्वी होऊन या!” सेकंडक्लास डेकचे जाण्यायेण्याचे भाडे देण्याची हुजुराज्ञा झाली.”७
 
श्रीमंत सयाजीराव गायकवाडांनी विठ्ठलरावांना इंग्लडचा प्रवासखर्च तर मंजूर केलाच शिवाय संस्थानामध्ये नोकरी करण्याच्या अटीतूनही मुक्तता दिली हे वृत्त समजल्यानंतर समाजातील मित्रमंजडळींना फारच आनंद झाला. त्यांची प्रवासाची तयारी करण्याबाबत श्री. कोरगावकरांनी पुढाकार घेतला व इतर मित्रांनीही सढळपणे मदत केली. ह्या घटना नोव्हेंवर, डिसेंबर १९०० च्या सुमारास घडल्या. त्यांच्या सेकंड एल्. एल्. बी. च्या चारही टर्म्स भरल्या होत्या. कायदा बहुतेक वाचला होता. परीक्षेचा फॉर्म भरून मुंबई युनिव्हर्सिटीकडे फीही भरली होती. परंतु कायद्याकडे विठ्ठलरावांचा मुळातच कल नव्हता आणि आता तर ह्या परीक्षेला बसणे त्यांना निरर्थक वाटले. म्हणून परीक्षेला बसण्याचा विचार त्यांनी सोडून दिला.

याही पुढे विठ्ठलरावांच्या दृष्टीने आणखी एक कठीण प्रसंग होता तो म्हणजे आपल्या वृद्ध आईवडिलांना आपला विलायतेला जाण्याचा विचार व आपले आयुष्य धर्मकार्याला वाहावयाचे असा केलेला निश्चय कळवण्याचा. त्या वेळची स्वतःची मनःस्थिती आणि आईवडिलांची प्रतिक्रिया त्यांनी निवेदिली आहे. “उच्च शिक्षण दुर्मीळ असलेल्या त्या वेळी बी. ए., एल्. एल्. बी. वगैरे परीक्षा होऊन बडोद्यासारख्या संस्थानात माझी चांगली वर्णी लागण्याचा काळ इतका जवळ आला असताना त्या सर्वांवर निःशंक पाणी सोडून विलायतेसारख्या दूर देशात जाण्याचा मार्ग मी पत्करावा आणि तोही ऐहिक स्वार्थासाठी नसून परत आल्यावर फकिरी पत्करण्यासाठी! हे जेव्हा आईबाबांना कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल याचे दारुण चित्र मला दिसू लागले. शेवटी मला जेव्हा त्यांना सर्व प्रकार कळविणे भाग पडले तेव्हा वडिलांना धक्का बसून ते कित्येक आठवडे आजारी पडले. पण आश्चर्य हे की, माझ्या आईने धीर सोडला नाही. ती त्यांची वरचेवर समजूत घालू लागली. आपल्या निराशेचे दुःख आवरून धरून दोघेही मी स्वीकारलेल्या मार्गात मला यश मिळावे अशी प्रार्थना करू लागले. इतकेच नव्हे तर परत आल्यावर मी जे व्रत पत्करले होते. त्यात आपणही भाग घेऊ, असे आश्वासू लागले. मला धन्यता वाटू लागली.”८

मँचेस्टर कॉलेजची टर्म १९०१ च्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार होती. तोपर्यंत पाच-सात महिन्यांचा अवधी होता. या अवधीत विठ्ठलरावांनी पुण्याच्या किबे वाड्यातील नूतन मराठी विद्यालयाच्या हायस्कूलात इंग्रजी सहाव्या व सातव्या इयत्तेला इतिहास व इंग्रजी काव्य या विषयांचा शिक्षक म्हणूम का पत्करले. शाळेजवळच असणा-या जमखंडीकरांच्या वाड्यात त्यांनी बि-हाड केले. ह्या अवधीत त्यांचे धर्मसाधन उत्साहाने चालले होते. पुणे प्रार्थनासमाजाचा तिसावा वार्षिकोत्सव १९०१ च्या जानेवारी महिन्याच्या तिस-या आठवड्यामध्ये साजरा झाला. त्यामध्ये भरगच्च कार्यक्रम झाले. ह्या कार्यक्रमाचे अवलोकन केले असता त्या वेळी प्रार्थनासमाजाचे वार्षिकोत्सव कसे साजरे केले जात याची कल्पना येऊ शकते. ‘धर्मबाबतीत आमचे चालढकलीचे धोरण’ ह्या विषयावर डॉ. भांडारकर यांचे कळकळीचे इंग्रजीतून भाषण झाले. तेथील उपासना किती मनःपूर्वक आणि प्रेरक असत याची कल्पना आपल्याला श्री. गणपतराव कोटकरांनी चालविलेल्या उपासनेवरून येऊ शकते. श्री. गणपतराव आंजर्लेकर व त्यांचे चिरंजीव ह्यांनी आरंभीच भजनात आपल्या गाण्याने अगदी गुंगवून सोडले. नंतर गणपतराव कोटकरांनी शांत व गंभीर भाव उद्भूत केल्यानंतर त्यांची विश्वात्म्याची कोमल व उदात्त प्रार्थना चालली असता समस्त बंधू-भगिनींची अंतःकरणे तल्लीन होऊन श्रोतृवृंद चित्रात रेखल्याप्रमाणे तटस्थ बसला होता. नंतर ‘पंडित वाद वदे सो झूटा।’ ह्या कबिराच्या पदाच्या आधारे व ‘अन्नाच्या परिमळे, जरी जाय भूक । तरी का होती पाक घरोघरी ।’ ह्या तुकारामाच्या अभंगानुरोधाने उपदेश झाला. पोकळ विधिसंस्कार करण्याने अगर शुष्क वाद करून मोठमोठी सिद्धान्तमते स्थापण्याने धर्मसाधन होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपले सर्व भाव शुद्ध होऊन तदनुसारेच आपल्या सर्व कृती झाल्या म्हणजेच धर्माचरण केले म्हणावयाचे असे विस्ताराने प्रतिपादले. नंतर आरती होऊन साडेअकरा वाजता उपासना आटपली.

...संध्याकाळी चार वाजता महाराष्ट्रीय ब्राह्मसमाजात म्हणजे सातारकर जंगली महाराजांच्या बंगल्यात उपासना झाली. ती रा. वि. रा. शिदे यांनी चालविली. मंडळी सुमारे चाळीसपर्यंत हजर होती. ‘प्रथम भाव शुद्ध कर’ ह्या अभंगाच्या आधारे प्रपंचातच परमार्थ करावा अशासंबंधी उपदेश केला.

त्याच दिवशी साडेसहापासून रात्री साडेआठपर्यंत प्रार्थनासमाजात डॉ. भांडारकरांनी उपासना चालविली. ‘आता माझ्या भावा, अंतराय नको देवा’ ह्या अभंगाचे निरूपण करून डॉ. भांडारकर यांनी सांगितले की, प्रार्थनासमाजास आज तीस वर्षे झाली. ह्यावरून त्याची बाल्यावस्था संपून त्याने आता दृढपणे मूळ धरले आहे. प्रत्येक सभासदाने तुकारामाप्रमाणे आपला असाच भाव कायम राहावा अशा अर्थाची परमेश्वराजवळ प्रार्थना करावी व सर्व समाजसंस्थेनेही एकरूपाने तीच प्रार्थना करावी. आरंभी समाजात यावयाचे झाले तर अगदी चोरून यावे लागत असे. लाज, भीड, लोकनिंदा इत्यादी अडचणी दुःसह होत. पण आता तो प्रकार राहिला नाही. समाजाच्या बाहेरचे पुष्कळ लोक उपासना ऐकायला येत असतात. तर देवाजवळ आता फक्त निश्चयाचे बळ मागावे.९

ह्या उत्सवात २३ जानेवारी रोजी शिंदे यांनी एकदा व्याख्यान दिले व एकदा उपासना चालविली. भवानी पेठेतील ब्राह्मसमाजात त्यांनी महात्मा राजा राममोहन रॉय यांच्यावर व्याख्यान दिले व त्यांच्या चरित्रातील ठळक ठळक गोष्टींचे निरुपण करून ह्या विभूतीचे मोठेपण कशात आहे, तिने हिंदुस्थानवर कोणते उपकार केले आहेत व त्यांच्यासंबंधी निदान ब्राह्माने तरी आपले कर्तव्य कसे बजावले पाहिजे वगैरे गोष्टींचे नीट स्पष्टीकरण केले.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी सायंकाळी सहा वाजता मंदिरात माघोत्सवाची उपासना चालविली. “I hope in India, more than any where else, in the Brahm Samaj sooner than in any other communion, the principle of historical evolution of all religious thought will be recognised,” ह्या प्रो. मॅक्समुल्लरसाहेबांनी ब्राह्मसमाजासंबंधी काढलेल्या उद्गारांचे ऐतिहासिकदृष्ट्या विवरण करून सर्व धर्माचे परिणत स्वरूप ब्राह्म धर्मात कसे आले आहे हे त्यांनी दाखविले. बंगाल्यात ब्राह्म, मुंबईत प्रार्थना व पंजाबात आर्यसमाज इत्यादी नावांनी नुसते हिंदुस्थान देशातच नव्हे तर      युनिटेरिऍनिझम व युनिव्हर्सालिझम ह्या नावांनी इंग्लंड व अमेरिका वगैरे ठिकाणी धर्माचे संशोधन झपाट्याने चालले असून चहूकडे ब्राम्ह्य धर्माचाच प्रसार होत आहे असे सांगून तो सनातन आहे; इतकेच नव्हे तर पुढे सर्वसाधारण होण्याची चिन्हे स्पष्ट दाखविली.१०
 
शिंदे यांनी दिलेली व्याख्याने व उपासनामधून केलेले निरूपण व विवेचन यांमधून त्यांचा धर्मविषयक सखोल व्यासंग व व्यापक दृष्टिकोण प्रकट होत होता. त्याचप्रमाणे एकेश्वरी धर्मविचारावर असलेली त्यांची उत्कट श्रद्धा प्रकट होत होती.

इंग्लंडला धर्मशिक्षणासाठी जाण्याच्या आधी लोकमान्य टिळकांचे दर्शन घेऊन त्यांचे विचार आपण ऐकावे अशी विठ्ठल रामजी शिंदे यांना इच्छा झाली. त्यांची टिळकांबद्दल विरोधपूर्ण भक्तीची भावना त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनच निर्माण झाली होती. रोजनिशीमध्ये काळ ह्या वृत्तपत्राबद्दल लिहीत असताना त्यांनी केसरीसंबंधी जे लिहिले आहे त्यातून नेमके गुण व खटकणारी नेमकी वैगुण्ये मार्मिकपणे नमूद केली आहेत.११ टिळकांचा सुधारणेला असलेला विरोध व सनातन्यांचा कैवार त्यांना रुचत नसला तरी, टिळकांचे निखळ राष्ट्रप्रेम, त्यांची धडाडी आणि निर्भयपणा इत्यादी गुणांबद्दल त्यांना आदर वाटत होता. विलायतेला जाण्यापूर्वी त्यांचे विचार ऐकून घेणे विठ्ठल रामजी शिंदे यांना महत्त्वाचे वाटले. टिळकांच्या भेटीचा हा प्रसंग त्यांनी स्वतःवर्णन केला आहे. “त्या वेळी ते लोकमान्य झाले होते, तरी लोकमान्य ही पदवी प्रचारात आली नव्हती. मी एक लहानसा अप्रसिद्ध विद्यार्थी; आचारविचार, ध्येय वगैरेंत त्यांच्याशी माझे मुळीच साम्य ना संबंध. अशा स्थितीत त्यांच्याकडे जाण्यात धाडसच करीत आहे असे मला वाटले. धर्माध्ययनासाठी विलायतेस जातो ही गोष्ट ऐकून तर ते खात्रीने नाकच मुरडतील अशी खूणगाठ बांधून मी गेलो, तेव्हा ते अगदी जुन्या रीतीने जमिनीवरच बसले होते. जणू काय फार दिवसांचा लोभ आहे अशा सलगीने त्यांनी मला ओढून अगदी आपल्याजवळ बसवून घेतले. आणि सामान्यत: उदार धर्मासंबंधी व तुलनात्मक विवेचनपद्धतीसंबंधी अगदी मोकळ्या मनाने व तज्ज्ञपणाने आपले प्रागतिक विचार मजपुढे बोलून दाखविले. इतरेच नव्हे तर आमच्या प्रार्थनासमाजासंबंधीदेखील काही बाबतीत त्यांनी आपली गुणग्राहकता प्रकट केली. आमच्या हिंदू तत्त्वज्ञानात द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत इत्यादी पुढे जे तट आणि उपासनेत शैव, वैष्णव, शाक्तादी पंथ माजले त्यायोगे आपली दृष्टी विकृत होऊ न देता व त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पण कमी न करता उपनिषदकाळात हिंदूची जी निर्भय व स्वतंत्र दृष्टी होती तीच राखून पौरस्त्य, पाश्चात्त्य आचारविचारांची तुलना करण्यास शिका, असा त्यांनी प्रेमाचा इशारा दिला. मला सानंद आश्चर्य वाटले.”१२

लोकमान्य टिळकांशी त्यांची झालेली ही भेट त्यांना उपयुक्त तशीच उत्साहवर्धक वाटली असणार. लोकमान्य टिळकांच्या प्रत्यक्ष भेटीने त्यांच्या स्वभावाचा मोकळा दिलदारपणा व दृष्टिकोणाचा उदारपणा त्यांना जाणवला असणार. म्हणून विठ्ठलरावंनी भावी काळात आरंभिलेल्या सामाजिक तसेच राजकीय स्वरूपाच्या कार्यात त्यांनी निःशंकपणे लो. टिळकांचे सहकार्य मागितलेले दिसते. वा सहकार्य केलेले दिसते.

शाळेमधील अध्यापन व प्रार्थनासमाजाचे काम यामध्ये विठ्ठलरावांचे दिवस भरभर जात होते. जमखंडीकरांच्या वाड्यामध्ये त्यांच्यासमवेत त्यांचे आईवडील, भाऊ एकनाथ व बहीण जनाबाई आणि पत्नी रुक्मिणीबाई राहत होत्या. रुक्मिणीबाईंचे दिवस भरत आले आणि १९०१ सालच्या सप्टेंबर महिन्यातील नऊ तारखेस त्यांनी मुलाला जन्म दिला. हाच विठ्ठलरावांचा थोरला मुलगा प्रताप विठ्ठलरावांचा विलायतेला जाण्याचा दिवस जवळ येऊ लागला. २१ सप्टेंबरला निघणा-या बोटीने ते जाणार होते.

विठ्ठल रामजी शिंदे हे विलायतेत धर्मशिक्षणासाठी जाणार ह्या निमित्ताने पुणे प्रार्थनासमाजात डॉ. भांडारकर यांनी एक विशेष उपासना चालविली. खरे म्हणजे आदल्या वर्षीच श्री. मोती बुलासा हे ह्याच कार्यासाठी विलायतेस जाणार होते म्हणून डॉ. भांडारकरांनी मोठ्या आनंदाने विशेषोपासना चालविली होती. यावेळी मात्र मोती बुलासांच्या मृत्यूच्या दुःखाचे सावट त्यांच्या मनावर होते. शिंदे यांना शुभेच्छा देण्याच्या प्रसंगी मोती बुलासांच्या अकाली झालेल्या मृत्यूच्या आठवणीने त्यांचे मन व्याकूळ झाले होते. ह्या धर्मकार्यासाठी शिंदे पुढे आले यामुळे त्यांच्या मनाला सांत्वन मिळाले. या प्रसंगी डॉ. भांडारकर उद्गारले, “समाजाचे काम जोराने सुरू करण्याच्या उमेदीने गेल्या वर्षी एक तरुण, विव्दान व होतकरू गृहस्थ विलायतेस जाऊन धर्मज्ञान प्राप्त करून घेण्यास निघाले होते. ते परत आल्यावर समाजाला पुष्कळ चांगले दिवस येतील अशी फार आशा वाटत होती. पण आमच्या दुर्दैवाने वाटेतच त्यांचा अंत झाला. ह्या योगे धैर्य खचून जाऊन निराशाच व्हावयाची; पण ती अत्यंत खेदजनक वार्ता आमच्या कानी पडली नाही तोच दुसरे एक आस्थेवाईक तरुण गृहस्थ ते काम हाती घेण्यास पुढे आले व ते आता विलायतेस लवकरच जाणार ह्याकरिता त्यांच्या अभीष्टचिंतनार्थ आम्ही सर्वजण त्या परमेशाची मनोभावे प्रार्थना करण्याकरिता आज येथे जमलो आहोत. ही गोष्ट प्रार्थनासमाजात काही जोम आहे की नाही ह्याची साक्ष देत आहे. परमेश्वर करो आणि त्यांना पुष्कळ आयुष्य देवो. त्यांचा प्रवास सुखाचा होवो व ते परत आल्यावर त्यांचे हातून आपली मंगलकार्ये पुष्कळशी घडून आणो व तेही आजच्या अभंगात सांगितल्याप्रमाणे सर्व भार देवावर घालून आपली कार्ये मोठ्या आस्थेने करोत.”१३

अशा प्रकारे शिंदे यांना मनापासून अभीष्ट चिंतल्यानंतर ह्या प्रसंगाला धरून विलायतेत धर्मज्ञानासाठी का जावयाचे ह्या प्रश्नाचा त्यांनी ऊहापोह केला. आदल्या वर्षी केलेल्या विवेचनाचाही त्यांनी संदर्भ दिला. डॉ.भांडारकर म्हणाले, “ज्या वेळी आमच्या देशात पाश्चात्य विदे्यचा व पाश्चात्य सुधारणेचा आरंभ झाला तेव्हा नवीन त-हेने शिकलेल्या लोकांचा जुन्या चालीरीती, जुने आचारविचार ह्यावरील विश्वास उडाला; सर्व जुनी बंधने शिथिल पडली व मन मानेल तसे वागण्यास सुरूवात झाली. धर्मसंबंधित बाबतीतही तीच स्थिती झाली. धर्माच्या नावाखाली मोडणा-या पुष्कळशा बाबतीतील पोचटपणा व वेडेपणा दृष्टोत्पत्तीस आल्याने धर्मावरील सर्व विश्वासच नाहीसा झाला. इंग्लंडातल्याप्रमाणे येथे मिल्, हक्स्ले, स्पेन्सर इत्यादी लोकांचे प्राबल्य वाढले व धर्म म्हणजे शुद्ध वेडेपणा अगर ढोंग ह्यांपैकी काहीतरी एक होऊन बसला व पाश्चात्त्य राष्ट्रातल्याप्रमाणे कोणी आपणास जडवादी तर कोणी अज्ञेयवादी व कोणी तर आपणास नास्तिकच मानून घेण्यात आनंद मानू लागले. पण इंग्लंडात ही स्थिती फार दिवस टिकली नाही. विवेकास अग्राह्य व नविन नविन निघालेल्या शास्त्रीय शोधात विसंगत अशा ज्या गोष्टी धर्मात घुसळून गेल्या होत्या त्यांना कायमचा फाटा तेथे मिळाला. पण ह्याच शास्त्रीय ज्ञानाने अधिक परिपक्व झालेल्या विवेकशक्तीने उच्चतर धर्माचा मार्ग दाखवून दिला. भौतिकशास्त्र व धर्म ह्यातील विरोध नाहीसा होऊन सारासार विचारास धर्मास अवकाश मिळाला. भौतिकशास्त्राचे ज्ञान हे धर्मज्ञान अधिक प्रज्ज्वलित करण्याचे एक साधन होऊन बसले व सत्यधर्माचा प्रकाश अधिकाधिक पडून त्याचा पगडा सुशिक्षित जनांच्या मनावर दिवसेंदिवस बसत चालला. अशा रीतीने ज्या ठिकाणी नास्तिक्यादी स्वैर विचारांचा उद्भव झाला त्याच ठिकाणी ते नाहीसे करून सत्यधर्म प्रस्थापित करण्याचा उपाय निघाला व त्यास जोराने यश येत चालले आहे. तेव्हा आपल्याही देशात ही स्वैर विचारांची लाट बंद करावयाची असली तर आम्हांसही त्याच उपायांचा अंगीकार केला पाहिजे व ह्याकरिता जेथे तो प्रथम अस्तित्वात आला व जेथे तो जारीने उपयोगात आणिला जात आहे त्याच ठिकाणी जाऊन त्याचे पूर्ण अध्ययन व अवलोकन केले पाहिजे हे एक विलायतेस जाऊन धर्मज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे काम.”१४
 
दुसरे कारण नमूद करताना डॉ. भांडारकरांनी म्हटले आहे, “आम्हांस सध्या जी धर्मसुधारणा करावयाची आहे ती होता होईल तो उदार पायावरच केली पाहिजे. म्हणजे आमच्या धर्माची तत्त्वे अमुक एका कालची अथवा अमुक लोकांची असावयाची असे नसून ती सर्व स्थळी, सर्व काळी व  सर्व लोकांस सारखी लागू पडली पाहिजेत...पण जणसमाजाकरिता धर्माची तत्त्वेच बदलून निराळी करा, म्हणजे उदाहरणार्थ भलत्याच एखाद्या पदार्थास देव मानणे अथवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीस देवाचा अवतार मानून त्याची पूजा करणे, असे केल्याने उन्नतीऐवजी अवनतीच खास होणार. तेव्हा ही धर्माची मूलतत्त्वे जेवढी उन्नत मिळतील तेवढी मिळवून त्यांचाच प्रसार केला पाहिजे... ही धर्मतत्त्वे सर्व जगाचे ज्ञान व अनुभव पाहून जी मनुष्यस्वभावात सर्वत्र खिळलेली आहेत म्हणजे परमेश्वरानेच जी मनुष्यास निवेदन केली आहेत तीच घेऊन त्यांचा प्रसार करणे हेच योग्य. ह्याकरिता ज्या भाषेत व ज्या स्थळी जगातील सर्व धर्मांचा ऊहापोह होत आहे, त्याच भाषेत व त्याच ठिकाणी जाऊन योग्य मनुष्याचे हाताखाली धर्मज्ञान संपादन केल्यास उदार पायावर धर्म रचण्याचे कार्य सिद्धीस जाईल.”१५
 
डॉ. भांडारकरानी हे विवेचन करताना आणखी एका कारणाचा निर्देश केला. पाश्चात्त्य राष्ट्रात सर्वसाधारणपणे सर्व मनुष्ये परमेश्वराची लेकरे असे मानून त्यांच्या ऐहिक व पारलौकिक उन्नतीकरिता झटणे ह्या उच्च तत्त्वाचा प्रचार ब-याच प्रमाणात दिसतो तो आम्ही शिकला पाहिजे. पाश्चात्त्य जगातील लोक अनंत अडचणी सोसून त्यांनी जो धर्म मानला त्याचा प्रचार करतात. त्याचप्रमाणे अनाथ बालकांचे पालन करण्यासाठी व आंधळे, पांगळे, दुबळे इत्यादिकांना साहाय्य करण्यासाठी अपरिमित त्रास सहन करतात व खूप पैसा खर्च करतात. त्यांची ही प्रचंड धर्मार्थ कामे इतक्या सुरळीतपणे व बिनबोभाटपणे कशी चालली आहेत याचे सूक्ष्म अवलोकन करून काही अंशाने तरी तशी स्थिती आमच्याकडे घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉ. भांडारकर यांनी दुस-या एका महत्त्वाच्या मुद्याचा येथे निर्देश केला. “पाश्चात्त्य राष्ट्रातल्याप्रमाणे जगाची प्रत्येक बाबतीत सुधारणा करण्याची खटपट ही केलीच पाहिजे. पण त्याबरोबरच ध्यान, मनन, प्रार्थना वगैरे करून ईश्वरसान्निध्यही मिळविले पाहिजे. नाही तर अहंकार, मत्सर वगैरे दोष अंगी शिरून तिकडील राष्ट्रात जी वरचेवर स्थिती दिसून येते की, एका मिशनचे
दुस-या मिशनबरोबर भांडण, आम्ही इतके आपल्या धर्मात आणिले, इतकी कामे केली ह्याकडेच सर्व लक्ष व तन्मूलक अभिमान तीच स्थिती इकडे आमच्याकडेही होण्याचा संभव आहे. तेव्हा परोपकाराची कामे करीत असता परमेश्वराच्या सान्निध्यात राहून या सकल ब्रह्मांडाचे व्यापार सतत चालविण्या-या त्या सर्वशक्तिमान परमेश्वरापुढे आपण कसे कस्पटाप्रमाणे आहोत हे ध्यानात घेऊन अंगी विनीत व पूज्य भाव ठेवला पाहिजे.”१६ ह्या शेवटच्या सूचनेत पाश्चात्त्यांची परोपकाराची कामे उत्तम रीतीने करण्याची जी दृष्टी आणि क्षमता आहे तिचा त्यांनी गौरव केला आहे, त्याचप्रमाणे ख-या आध्यात्मिक दृष्टीच्या अभावी अहंकार, मत्सर हे दोष कसे शिरतात हेही त्यांनी मार्मिकपणे सांगितले आहे व आपण ख-या आध्यात्मिक बुद्धीच्या साह्याने हे दोष टाळावयास पाहिजेत अशी सूचनाही केली आहे.
 
या प्रमाणे डॉ. भांडारकर यांनी शिंदे यांना शुभेच्छा देताना अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त विचार प्रकट केले. आदल्या वर्षी श्री. मोती बुलासा यांना शुभेच्छा देताना त्यांनी जे विचार मांडले होते ते विचारही श्रोत्यांच्या मनात तरळत असणार. सर्वशक्तिमान परमेश्वराची मूर्ती बनवून त्याचप्रमाणे त्याला आपल्यापैकीच एक समजून त्याचे मानुषीकरण करण्यामुळे आपली कशी आध्यात्मिक अधोगती होते याचा त्यांनी उल्लेख केला होता. त्याचप्रमाणे सर्व देशातल्या धर्मांच्या उन्नत तत्त्वांचे एकीकरण करून त्यांना फुटलेले आडफाटे तोडून काढून ती नीट विकसित करण्यासाठी ‘हिस्टरी ऍण्ड फिलॉसफी ऑफ रिलिजन’ याचे अध्ययन उपयोगी पडणारे आहे, ह्याचा उल्लेख केला होता.१७

विठ्ठल रामजी शिंदे हे २१ सप्टेंबर १९०१ रोजी मुंबईहून इंग्लंडला जाणा-या ‘पर्शिया’ ह्या बोटीने निघणार असे ठरले. त्यांना अत्यंत आदरणीय असणा-या डॉ. भांडारकरांनी व इतर ज्येष्ठ व तरुण प्रार्थनासमाजीयांनी त्यांना धर्मशिक्षणासाठी व परदेशगमनासाठी शुभेच्छा दिल्या. ते आपले आईवडील, भाऊ एकनाथराव व बहीण जनाबाई यांच्यासह मुंबईस गेले. नुकत्याच प्रसूत झालेल्या त्यांच्या पत्नीला मात्र मुंबईस जाणे शक्य नव्हते.

मुंबईस त्यांचे ज्येष्ठ मित्र बाबण बापू कोरगावकर यांच्या बि-हाडी त्यांना निरोप देण्यासाठी मित्रमंडळी जमली होती. मुंबईच्या दोन वर्षांच्या वास्तव्यात विठ्ठल रामजी शिंदे यांचा विशेष स्नेह श्री. कोरगावकर यांच्याशी जुळला होता व त्यांच्या घरी वरचेवर जाणेयेणे होते. पूर्वी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने बाबांचे घरी सामाजिक मेळे भरविले जात. तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जाणारे प्रमोथलाल सेन, हेमचंद्र सरकार, मोती बुलासा...यांचे शुभ चिंतण्याकरिता त्यांच्या घरी मेळे भरले होते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल तर त्यांना विशेष लोभ वाटत होता. त्यांना निरोप देण्यासाठी व शुभ चिंतण्यासाठी श्री. कोरगावकरांच्या घरी मेळा भरला.१८

२१ सप्टेंबर रोजी साडेदहा वाजता विठ्ठलरावांनी बाबणराव कोरगावकरांचे बि-हाड सोडले व आई, जनाबाई, एकनाथ, केशवराव कानिटकर यांच्यासह व्हिक्टोरियात बसून बॅलार्ड पियर ह्या बंदरावर जाण्यास निघाले. ‘आजचा आपल्या आयुष्यातला मुख्य दिवस. आजवर बालपणचे विचाराचे, कल्पनेचे, तयारीचे असे दिवस गेले. आज आपल्या कृत्यात्मक अथवा कार्यकारी जीवनाचा आरंभ झाला’ इत्यादी विचार त्यांच्या मनात येत होते. व्हिक्टोरियात कानिटकर मोठ्या कळकळीने त्यांना म्हणाले की, “समाजाबाहेरच्या व काही समाजातल्या लोकांना तू विलायतेला जातोस यामध्ये नुसता भपकाच वाटत आहे. त्यांच्यापुढे तू अगदी कानाकोप-यांतला सामान्य बुद्धीचा मनुष्य आहेस. तू अपयश घेऊन येतोस किंवा येथे आल्यावर तुझ्या हातून काहीच न होऊन तुझा उपहास मात्र होणार या गोष्टीची ते वाटच पाहत आहेत. ते केवळ मजेनेच तुजकडे पाहत आहेत. अशा स्थितीत तुजवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.”१९ कानिटकरांनी ह्या गोष्टींची जाणीव करून दिल्यामुळे विठ्ठलरावांच्या मनावरचा ताण अधिकच वाढला. अर्ध्या तासात ते बंदरावर पोहोचले.

विठ्ठलरावांना निरोप देण्यासाठी आलेली मित्रमंडळी आणि समाजाचे सभासद यांनी बॅलार्ड पियर फुलून गेला होता. गोविंदराव सासने, कोरगावकर, यशवंत जामदार, आप्पा लिखते, कारखानीस, रामतीर्थकर, संत, पालेकर, शिवरामपंत गोखले, दीनानाथ माडगावकर, वासुदेवराव सुखटणकर, जयंतराव माडगावकर इत्यादी वडीलधारी व मित्रमंडळी आणि समाजाचे कितीतरी सभासद बॅलार्ड पियरवर त्यांना निरोप देण्यासाठी जमले होते. कानिटकरांनी विठ्ठलरावांना एकीकडे नेऊन आपल्यास पत्रे लिहिण्यास सांगताना त्यांचा कंठ अगदी दाटून आला. वासुदेवराव आणि गोविंदराव हे दोघे म्लान होऊन स्तब्ध उभे होते. खुद्द विठ्ठलरावांना आईच्या आणि जनाबाईंच्या तोंडाकडे पाहून वरचेवर उमळून येऊ लागले. त्या दोघी तर भानावर नसल्यासारख्याच दिसत होत्या. विठ्ठलरावांच्या आईबाबांनी आपल्या वियोगाच्या शोकभावनेला कमालीच्या संयमाने आवर घातला. खरे तर त्यांच्या बाबांनी एक महिन्यापासून हाय खाऊन जेवण सोडले होते. बंदरावर मात्र त्यांनी आपल्या वियोगाचे दुःख प्रकट होऊ दिले नाही. जे काही होईल ते मुकाट्याने, खिन्न चेह-याने ते पाहत होते. कोणी म्हटले इथे उभे राहा, राहिले उभे. तिकडे चला, चालू लागले. असा प्रकार त्यांच्याकडून घडत होता. विठ्ठलरावांना घेऊन जाणारी बोट जेव्हा हालली तेव्हा थरथर कापत असलेल्या आईने स्वतःशीच हळूच उद्गार काढले, “बाळा, जातोस खरं पण तू पोटात असताना मला जसे फिरल्यासारखे होत होते तसेच आत्ताही माझ्या पोटात फिरल्यासारखे होत आहे रे.”२० शेवटी जाताना बाबांनी जेव्हा विठ्ठलरावांना वरचेवर पत्र पाठविण्यास काकुळतीने विनविले तेव्हा त्यांना भडभडून आले.

साडेबारा वाजता प्लेग डॉक्टरची तपासणी झाल्यावर बोटीकडे जाणा-या वाफेच्या मचव्यात ते बसले तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती विलक्षण झाली. सभोवती इतकी गर्दी असता ओळखीचा एकही चेहरा दिसेना. जिवलग माणसांना निदान दोन वर्षे तरी अंतरलो ह्याची तीव्र जाणीव त्यांना झाली. आपल्या त्या वेळच्या मनःस्थितीचे त्यांनी रोजनिशीत वर्णन केले आहे, “ईश्वरा, दोन मिनिटांतच माझी कोण तारांबळ उडाली! माझ्या धैर्याचा मागमूसदेखील उरला नव्हता. अशात मचवा झपाट्याने निघाला. मी घाबरल्यासारखा लोकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. जास्त काय लिहू? असेदेखील मनात आले की, सामानसुमान टाकून झटकन मचव्यातून खाली उडी मारावी आणि आईबाबांस धावत जाऊन घट्ट मिठी मारावी. निर्दय मचवा माझ्या स्थितीकडे अगदीच दुर्लक्ष करून तसाच पुढे चालला. मला अशी दहशत पडली की, आता परतणे तर शक्य नाही पण अशा भयंकर स्थितीत मला दोन वर्षे काढावी लागतील!! ती दोन मिनिटे मला दोन वर्षांसारखी भासली तर ह्या दोन वर्षांस मी कसली उपमा देऊ? अशा हताश अवस्थेत मला अखेरीस परमेशाची आठवण होऊन या पाशातून सोडविण्यास मी त्याची गयावया, प्रार्थना करू लागलो. त्यानेच गा-हाणे ऐकले. तरी ह्या वियोगाच्या दुःसह चटक्याची फुणफूण मी आगबोटीवर गेल्यावरदेखील कितीवेळ तरी होत होती.”२१

अडीच वाजता बोट चालू होताच वासुदेवराव सुखटणकरांनी विठ्ठलरावांची आई, वडील, जनाबाई, एकनाथराव यांना राजाबाई टॉवरकडे नेले. जनाबाईने आपल्या आठवणीत लिहिले, “राजाबाई टॉवरवरून आम्ही कितीतरी वेळपर्यंत अण्णांना नेणा-या बोटीकडे एकसारखी टक लावून पहात होतो. सर्वांचीच मने जड झाली होती ऊर भरून आले होते.”२२ तिकडे विठ्ठलरावांच्या मनाची भावना प्रार्थनामय झाली. विरहवेग कमी होऊ लागला. मनाच्या या भावनामय अवस्थेत मुंबई युनिव्हर्सिटीवरचा आणि शिक्षणपद्धतीवरचा त्यांचा पूर्वीचा राग कुठल्या कुठे लुप्त होऊन गेला. तेही किना-यापासून हळूहळू दूर चाललेल्या बोटीवरून किना-याकडे आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या राजाबाई टॉवरकडे पाहत राहिले. त्यांच्या मनात आले, “ह्या प्रवासाची मनात प्रेरणा होण्यास जी पर्यायाने कारण झाली आहे, ती मुंबई युनिव्हर्सिटी जणू काय हात वर करून आशीर्वाद देत आहे.”२३

याच सुमारास आपल्या मुलाला किना-यापासून दूर परदेशी घेऊन जाणा-या बोटीकडे राजाबाई टॉवरवरून विठ्ठलरावांचे आईबाबा पाहत होते आणि आपल्या मुलाला मनोमन आशीर्वाद देत होते, मात्र निश्चित.

संदर्भ
१. केसरी, १२ नोव्हेंबर १९४०, पृ. ४.
२. सुबोधपत्रिका, ८ सप्टेंबर १९०१.
३. तत्रैव, २२ जुलै १९००.
४. तत्रैव, ९ सप्टेंबर १९००.
५. ग. त्र्यं. माडखोलकर, श्रध्दांजली, नागपूर प्रकाशन, नागपूर. १९७४, पृ. १६७.
६. तत्रैव, पृ. १६२.
७. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. ११४.
८. तत्रैव, पृ. ११५.
९. सुबोधपत्रिका, ३ फेब्रुवारी १९०१.
१०. तत्रैव, १० फेब्रुवारी १९०१.
११. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी, पृ. १६.
१२. स. वि. बापट (संपा.) लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड २, पृ.
    २००-२०६.
१३. सुबोधपत्रिका, १३ ऑक्टोबर १९०१.
१४. तत्रैव.
१५. तत्रैव.
१६. तत्रैव.
१७. तत्रैव, ९ सप्टेंबर १९००.
१८. बी. बी. केसकर, बाबण बापू कोरगावकर, मुंबई, १९४२, पृ. ६०.
१९. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ६१.
२०. जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, सा. तरूण महाराष्ट्र, १७ जून १९४९.
२१. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ६२-६३.
२२. जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, १७ जून १९४९.
२३. बी. बी. केसकर (संपा.) वि. रा. शिंदे यांचे लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. २.