मिशनच्या वाढत्या कामाला सदैव पैशाची चणचण भासत असे. दयारामजी गिडुमल ह्यांनी मिशनला दरमहा १००/-रु. ची जी देणगी दिली होती ती ३ वर्षांसाठी होती. १९१०च्या जून अखेर ही वर्गणी बंद व्हावयाची होती. म्हणजे मिशनचे काम तर वाढले परंतु पैसा मात्र नाही, अशी पाळी मिशनवर आली होती. ह्या परिस्थितीचे विनोदात्म वर्णन शिंदे ह्यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे, “गरिबांची लग्ने करण्यात लोक मोठा परोपकार समजतात; पण लग्नामुळे संसाराच पसारा होऊन गरिबांचे फार हाल होतात. तसाच ह्या मिशनचा प्रकार झाला.”१
निराश्रित सेवासदन मदतीच्या अभावी बंद करून कार्यकर्त्यांची इतर कामांकडे त्यांना वाटणी करावी लागली. सय्यद अब्दुल कादर आणि इतर कार्यकर्ते ह्यांचे वेतन बंद करणे शक्य नव्हते. मात्र पनवेलची नोकरी सोडून आलेल्या जनाबाईंचे अल्पवेतन मात्र त्यांना थांबवावे लागले. गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क ह्यांच्या कन्येने जलसा केल्यामुले जी मदत मिळाली होती तीत भर घालून ५ हजार रुपयांची रक्कम मुंबईतील ट्रस्टीकडे कायम निधी म्हणून ठेवण्यात आली. तिचा चालू खर्चासाठी उपयोग नव्हता. त्यामुले रुपी फंड, तांदूळ फंड, कपडे फंड, पेटी फंड अशा युक्त्या-प्रयुक्त्या शिंदे ह्यांनी योजिल्या. त्यामुळे मिशनच्या कामाचा प्रचार होऊन खर्चाची तोंडमिळवणी करणे संस्थेला काहीसे शक्य झाले.
१८ ऑक्टोबर १९०९ रोजी मिशनच्या संस्थापनेचा दिवस साजरी करण्यासाठी आणि शाळांतील मुलाचा बक्षीस समारंभ करण्याकरित मुंबईच्या टाऊन हॉलमध्ये टोलेजंग जाहीर सभा भरविण्यात आली. तिचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीरावमहाराज गायकवाड ह्यांनी सुशोभित केले. मिशनचे अध्यक्ष नामदार चंदावरकर, नामदार गोपळ कृष्ण गोखले, मि. विमा दलाल, बडोद्याचे पंडित आत्माराम ह्यांची भाषणे झाली. गावातील प्रमुख स्त्री-पुरुषांनी प्रशस्त टाऊन हॉल गच्च भरला होता. श्रीमंत सयाजीरावमहाराजांनी दोन हजार रुपयाची रक्कम शिष्यवृत्ती देण्यासाठी जाहीर केली. मिशनचे उपाध्यक्ष शेठ दामोदरदास सुखडवाला ह्यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली. ह्या मोठ्या रकमा कायम निधीकडेच वळविण्यात येणार असल्यामुळे दैनंदिन खर्चाची चिंता तशीच राहिली.
मिशनला आर्थिक साहाय्य व्हावे ह्या हेतूने सौ. लक्ष्मीबाई रानडे व इतर दोन-तीन सहकारी स्त्रियांनी ह्या प्रसंगी एक वेगलीच युक्ती अवलंबिली. टाऊन हॉलचे पुढचे तीन दरवाजे त्यांनी रोखले व एकेका दरवाजात दोघीदोघी भगिनी आपली शाल पसरून त्या प्रचंड समुदायातील बाहेर जाणा-या प्रत्येकास काहीतरी देणगी टाकण्याचा आग्रह करू लागल्या. सारा जमाव जणू काय कैद झाल्यासारखा देखावा दिसू लागला. पण कोणीही तक्रार न करता उलट ह्या स्त्रियांचे कौतुक करून श्रोतेमंडळी आपखुशीने शालीत देणग्या टाकू लागली. ह्म कैदेत मुंबईचे पोलीस कमिशनर सापडले. खिसे चाचपल्यानंतर खिशात काही न सापडल्यामुळे कमिशनरसाहेब गयावया करू लागले. लक्ष्मीबाईंनी एक शिसपेन्सिल आणि कागदाचा तुकडा त्यांच्या हाती देऊन “झोळीत आकडा टाका म्हणजे सुटका होईल, एरव्ही नाही.” असे सांगितले. कमिशनरसाहेबांनी दुस-या दिवशी देणगीची रोकड शिंदे ह्यांच्याकडे पाठविली. “ही माझी खंडणी घेऊन माझी मुक्तता करा.” अशी त्यांनी विनंती केली होती. देणगीचा आकडा अशा प्रकारे बराच मोठा झाला होता.
मिशनच्या कामाचा बराच बोलबाला झाला होता. त्यामुळे अनपेक्षितपणे कधी कधी देणगी मिळत असे. हिंदुस्थानचे व्हाईसरॉय हार्डिंज व त्यांची पत्नी लेडी हार्डींज ह्यांच्या कानी मिशनचे काम गेले. म्हणून न मागता लेडी हार्डिंज ह्यांनी मोठ्या उदारपणे रोख दोन हजार रुपये पाठवले. मिशनच्या कामाचा चांगलाच बोलबाला झाला होता व मिशनने चालविलेल्या कामाचे महत्त्व समाजातील सगळ्या थराला जाणवू लागले होते. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या इंग्रजी अधिका-यांनाही जाणवू लागले होते.
अस्पृश्यतानिवारणाचे कार्यक्षेत्र वाढवावे, ह्या कार्याची महती लोकांनी पटकून द्यावी, शक्य असेल तिथे मिशनच्या शाखा नव्याने सुरू कराव्यात वा मिशनच्या कार्यामध्ये सामील करून घ्याव्यात, त्याचप्रमाणे मिशनच्य ह्या वाढणा-या कामासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करावा ह्या हेतूने विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी विस्तृत दौ-याची योजना आखली.
१९११च्या एप्रिलच्या ९ तारखेपासून त्यांनी व-हाड, काठेवाड, कर्नाटक आणि कोकणातील पश्चिम किनारा ह्या भागाचा दौरा सुरू केला. दौ-यामध्ये व्याख्यानाच्या द्वारा अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्याचे महत्त्व पटवून देणे; ह्या कामाबद्दल सहानुभूती असणा-या गावांतील प्रतिष्ठित वजनदार मंडलींना सहभागी करून सभा घेणे; ह्या कामासाठी स्थानिक वजनदार पुढा-यांची कमिटी नेमणे; अस्पृश्यवर्गीयांच्या वस्तीची पाहणी करून तेथील लोकांशी संपर्क स्थापन करणे; डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे ज कार्य चालले आहे त्या कामाची माहिती सांगून त्याचे महत्त्व पटवून देऊन मिशनसाठी निधी गोळा करणे ही अण्णासाहेब शिंदे ह्यांनी दौ-याची उद्दिष्टे व कार्यपद्धती ठेवली होती.
शिंदे ह्यांनी ९ एप्रिल रोजी अकोल्यापासून दौ-याला प्रारंभ केला. अकोला, अमरावती, थगाव येथे सुमारे दोन आठवड्यांचा त्यांनी दौरा केला. अकोल्यातील थिएटरात व्याख्यान दिले. जानोजी डिप्रेस्ड क्लास बोर्डिंगमध्ये उपासना चालविली. महारवाड्यातील रात्रीच्या शाळेत अस्पृश्य स्त्रियांकरिता व्याख्यान दिले व महारवाड्यात कीर्तन केले. अकोला येथील जानोजी फ्री बोर्डींग हे मिशनच्या वतीने चालविले जात होते. स्थानिक कमिटीच्या सदस्यांच्या गाठी घेऊन कामाविषयी त्यांनी चर्चा केली व बोर्डींगची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढेल ह्यासंबंधी विचारविनिमय केला. अमरावतीला एक दिवस राहून थुगाव येथे गेले. चार दिवस तेथे राहिले. अण्णासाहेबांच्या प्रेरणेने गणेश आकाजी गवई ह्यांनी तेथे प्रार्थनासमाज स्थापन केला होता. अण्णासाहेबांच्या तेथील मुक्कामात अस्पृश्यांची मोठी परिषद भरली. ह्या परिषदेत आजूबाजूच्या ८० खेड्यांतून सुमारे चार हजार लोकांचा समुदाय लोटला होता. ही परिषद दोन दिवस चालली. थुगाव येथील प्रार्थनासमाजात अण्णासाहेब शिंदे ह्यांनी उपासना चालविली. तेथील भजनसमाज उत्तम प्रकारे काम करतो हे त्यांच्या ध्यानात आले. समाजातील सुमारे २० महार सदस्यांची सामाजिक व धार्मिकबाबतीत प्रागतिक स्वरूपाची मते असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. ह्यामुळे मुंबई शाखेने येथील भजनसमाजाकडे अधिक लक्ष पुरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी ध्यानात घेतले. थुगाव येथील कामगिरी आटोपून ते अमरावतीस परत गेले.
अमरावती येथील कार्याला प्रारंभ विठ्ठल रामजी शिंदे प्रेरणेनेच झाला होता. १९११ साली प्रसिद्ध झालेल्या मिशनच्या १९०८ ते १९१०च्या त्रैवार्षिक अहवालात अमरावती शाखेचा अहवाल समाविष्ट केला आहे. त्यामध्ये श्री. जी. एन्. काणे व श्री. एन्. एस्. भांगले ह्या सेक्रेटरींनी अमरावती शाखेचा पूर्वेतिहास देताना म्हटले आहे, “मे १९०७ मध्ये ज्या वेळेला डी. सी. मिशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी हे अमरावतीला भेट देण्यासाठी आले होते व त्यांनी अस्पृश्य मानलेल्या वर्गाच्या उन्नतीसंबंधी नगरवाचनालयात डिस्ट्रिक्ट जज्ज मि. प्रिदॉ (Pridaux) ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले, त्या वेळेला त्या शहरामध्ये अस्पृश्यवर्गीयांचा प्रश्न पहिल्यांदा चर्चिला गेला.”२ ह्या भेटीमध्ये रावबहादून आर. एन्. मुधोळकर व मिशनचे स्थानिक सेक्रेटरी जी. एन. काणे ह्यांनी मिशनशी सहकार्य करण्याचे वचन दिल्यामुळे ह्या भागात पुन्हा एकदा मुद्दाम भेट द्यावी असे त्यांच्याच विचाराने ठरविले. स्थानिक मंडळींच्या मोठ्या उत्साहामुळे व-हाडातील डी. सी. एम्. शाखांची ही प्रमुख मध्यवर्ती शाखा होण्यास योग्य आहे असे त्यांना वाटले. हा दौरा आटोपून मुंबईस ते २३ एप्रिलला परत आले.
विठ्ठल रामजी शिंदे मुंबईस आल्यानंतर त्याच दिवसी म्हणजे २३ एप्रिल रोजी काठेवाडच्या दौ-यावर निघाले. ह्या दौ-यात ते राजकोट, गोंडल, भावनगर, मांगरोल, जुनागड, वादिया ह्या ठिकाणी गेले व पुन्हा राजकोटला येऊन मुंबईस १८मे रोजी परतले. राजकोट येथील राजे ठाकोरसाहेब ह्यांची धेड लोकांच्या सुधारणेबद्दल सहानुभूती होती व त्यांच्या प्रेरणेने ह्या लोकांसाठी तेथे एक शाळा चालली होती. ठाकोरसाहेबांच्या अध्यक्षतेखाली अण्णासाहेब शिंदे ह्यांचे कॅनॉट हॉलमध्ये व्याख्यान झाले. राजकोट येथील स्थानिक कमिटी मिशनशी संलग्न नसतानाही तिच्या सभासदांनी शिंदे ह्यांच्याशी सर्वतोपरी सहकार्य करून मिशनसाठी २९९ रुपयांची रक्कम जमा केली. ह्यापैकी अर्धी रक्कम शिंदे ह्यांनी कमिटीच्या स्थानिक उपयोगासाठी परत केली. दोन दिवस राजकोटला राहिल्यानंतर शिंदे गोंडल येथे गेले. तेथील दिवाणांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कॉलेजमध्ये त्यांनी एक व्याख्यान दिले. गोंडलचे ठाकोरसाहेब सर भगवंतसिंगजी व त्यांचे चिरंजीव यांच्याशी मुलाखत झाली. श्रीमंत ठाकोरसाहेब इंग्लंडला जाण्याच्या गडबडीत असल्यामुळे विशेष काम होऊ शकले नाही. गोंडल येथून शिंदे भावनगर येथे गेले. दिवाणसाहेब प्रभाशंकर पट्टणी ह्यांच्या अध्यक्षतेखाली सामळदास कॉलेजमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. धेड लोकांच्या तेथील वस्तीचे त्यांनी निरीक्षण केले. भावनगर येथील पाच दिवसांच्या वास्तव्याचे फलित म्हणून शिंदे ह्यांना तेथे मिशनची स्थानिक कमिटी स्थापन करता आली. डॉ. देव ह्यांना अध्यक्ष व एल्. बी. वैद्य ह्यांना सेक्रेटरी नेमण्यात आले. ह्या कमिटीने एका शाळा स्थापना करण्याचा निर्णय घेऊन पुढे त्याप्रमाणे शाला स्थापनही केली. दिवाण प्रभाशंकर पट्टणी ह्यांनी शिंदे ह्यांना अरंभिलेल्या कार्याबद्दल आर्थि साहनुभूती दाखविली व त्यांचा संस्थांच्या वतीने उचित गौरव केला. येथे मिशनसाठी रु. ४०५/- एवढा फंड जमला.
मांगरोल हे मुसलमानी संस्थान होते. तेथे चीफसाहेब हिज हायनेस शेखसाहेब व दिवाण बॅ. अलिमहंमद देहवली ह्या दोघांनीही मिशनच्या कार्याला योग्य ते साहाय्य देण्याचे अभिवचन दिले. तेथील मुक्कामात चीफसाहेब त्याचप्रमाणे पोलिटिकल एजंट मि. ई. मॅकनॉच ह्यांच्य भेटी घेतल्या. तेथील धेड लोकांची वस्ती पाहिली. डॉ. रविशंकर अंजारी ह्यांना सन्मान्य सेक्रेटरी करून एक नवीन कमिटी स्थापन केली व ह्या कमिटीच्या वतीने एक दिवसाची शाळा उघडली.
जुनागड येथे अण्णासाहेब शिंदे ह्यांनी १२ व १३ मे असे दोन दिवस वास्तव्य केले. जुनागडचे अँडमिनिस्ट्रेटर मि. रेंडॉल ह्यांची शिंदे ह्यांनी भेट घेऊन त्यांची सहानुभूती संपादन केली. तेथील स्थानिक हायस्कुलात जुनागडचे शिक्षणाधिकारी मि. तर्खड ह्यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान दिले. तेथे स्थानिक कमिटीची स्थापना करून तर्खड ह्यांना अध्यक्ष व मि. पी. नानावटी ह्यांना सेक्रेटरी करून अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन केली. मि. रेंडॉल ह्यांनी व्यक्तिशः आर्थिक मदत तर केलीच पण त्याशिवाय अस्पृश्यांच्या शाळेचा सगळा खर्च संस्थानाकडून चालविण्याचे वचन दिले. जुनागड येथे मिशनसाठी साडेतीनशे रुपयांचा निधी जमला. शिंदे यांनी वादिया येथे १४ मे रोजी तेथील चीफसाहेबांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शाळेत जाहीर व्याख्यान दिले. तेथून ते राजकोटला परत आले. लिमडीच्या महाराजांकडून २५०/- रुपये व पोरबंदरच्या अँडमिनिस्ट्रेटरकडून निधीसाठी १००/- रुपयांची देणगी मिळाली. व-हाडच्या दौ-यामध्ये अण्णासाहेब शिंदे ह्यांना २७५/- रुपयांचा निधी मिळाला होता तर काठेवाडच्या दौ-यात रु. १४२९/- एवढा निधी जमला. कामाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने शिंदे ह्यांचा काठेवाडीतील हा दौरा यशस्वी झाला असे आढळून येते.
ह्यानंतर अण्णासाहेब शिंदे १२ ऑगस्ट रोजी कर्नाटक प्रांतातील व पश्चिम
किना-यावरील दौ-यावर निघाले. सतत साडेतीन महिने ते त्या दौ-यावर होते. १२ ऑगस्ट रोजी ते पुण्यास गेले. पुणे येथे मिशनची अंगभूत शाखा उत्तम प्रकारे काम करीत होतीच. मिशनच्या शाळेची त्यांनी पाहणी केली. सुतारकामाच्या वर्गामध्ये पुष्कळशी सुधारणा घडत असून ही शाखा उत्तम प्रकारे काम करीत राहील असा विश्वास त्यांच्या मनात उभा राहिला. फर्ग्युसन कॉलेजचे प्रो. लिमये ह्यांच्या अध्यक्षतेखाली जॉन स्मॉल हॉलमध्ये त्यांनी जाहीर व्याख्यान दिले. त्यांचे फर्ग्युसन कॉलेजमधील एक बालमित्र प्रो. के. रा. कानिटकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली फर्ग्युसन कॉलेजात व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांसमवेत रुपी फंडासंबंधी चर्चा केली.
१५ ऑगस्ट रोजी साता-यास येऊन तेथे त्यांनी सात दिवस मुक्काम केला. डिस्ट्रिक्ट जज्जांच्या अध्यक्षतेखाली ऑर्थर हॉलमध्ये जाहीर व्याख्यान दिल. सातारा येथील एक प्रार्थनासमाज सर्वस्वी अस्पृश्यवर्गाच्या वतीने चालविण्यात येत असे. त्या समाजामध्ये अण्णासाहेब शिंदे ह्यांनी उपासना चालविली. रावबहादूर व्ही. एन्. पाठक ह्यांच्या घरी वरिष्ठवर्गाच्या स्त्रियांची बैठक बोलाविली. रा. ब. रा. रा. काळे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथील स्थानिक कमिटीची पुनर्घटना केली. मिशनच्या फंडासाठी तेथे ५९४/- रुपये एवढी रक्कम जमली. सातारा येथे शिंदे ह्यांना एक विशेष गोष्ट दिसून आली. तेथील स्थानिक भजनसमाजाचे महार मांग लोकांशी उघडपणे रोटी व्यवहार करीत होते. असा प्रकार इतरत्र कोठेही आढळून येत नव्हता. महार सदस्यांना मिशनच्या कामाबद्दल सहानुभूतीपूर्वक आदर होता.
साता-याहून विठ्ठल रामजी शिंदे सांगली, मिरज, बुधगाव अशा संस्थानाच्या गावी गेले. सांगली येथील राजेसाहेबांची त्यांनी भेट घेतली. हायस्कूलमध्ये व्याख्यान दिले व तेथील महारवाडा पाहिला. सांगलीला मिळालेल्या निधीची रक्कम रु. १० एवढी होती. मिरजेला चीफसाहेबांशी मुलाखत झाली. बुधगावला २४ ऑगस्टला चीफसाहेबांशी मुलाखत झाली. तेथील अस्पृश्यांची शाळा त्यांनी पाहिली. मिरज आणि बुधगाव येथे मिशनला निधी मिळाल्याचा उल्लेख मात्र आढळत नाही.
२७ ऑगस्ट रोजी शिंदे बेळगावास परतले व पाच दिवस तेथे वास्तव्य केले. तेथे कलेक्टरांची मिशनच्या कामाबद्दल सहानुभूती होती. शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. म्युनिसिपल ऑफिसमध्ये एक व्याख्यान झाले. तसेच महारवाड्यातही व्याख्यान झाले. तेथे स्थानिक कमिटी स्थापन करून गोविंद रामचंद्र ओक ह्यांना सेक्रेटरी नेमले. मिशनला २१०/- रुपये एवढा निधी मिळाला.
शिंदे हे बेळगावहून धारवाडला गेले व १ ते ५ सप्टेंबर असे पाच दिवस धारवडमध्ये राहिले. मि. रोद्द यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सोशल व्याख्यान दिले. अस्पृश्यवर्गाच्या दोन शाळा तपासल्या. मुलींच्या शाळेत अस्पृश्यतानिवारण्याच्या बाबतीत वरिष्ठवर्गीय स्त्रियांशी चर्चा केली. पुरुषांच्या व स्त्रियांच्या ट्रेनिंग कॉलेजास भेट देऊन तेथील प्रिन्सिपॉल व लेडी सुपरिटेंडेंट ह्यांच्याशी अस्पृश्य समाजाबाबत चर्चा केली. तसेच शिंदे धेडवाड्यात गेले व तेथील अस्पृश्यांबरोबर त्यांची स्थिती, त्यांच्या अडचणी व त्या निवारण्यासंबंधी करावयाचे उपाय ह्याबद्दल चर्चा केली. मि. रोद्द हे सामाजिक सुधारणांबाबत प्रयत्न करणारे धारवाडमधील वजनदार गृहस्थ होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली तेथे एक नवी कमिटी स्थापन करून श्री. एन्. आर. देशपांडे वकील यांना सेक्रेटरी नेमले. धारवाड येथील अस्पृश्यवर्गाच्या शाळेत मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आढळली. पण बहुतेक मुली यलम्मादेवीच्या जोगतिणी होत्या. ही बाब शिंदे ह्यांनी डॉ. मॅन ह्यांना कळविली. मुरळी सोडण्याच्या प्रथेविरुद्ध काम करणा-या बालसंरक्षण मंडळींचे डॉ. मॅन हे अध्यक्ष होते.