धर्मप्रचारार्थ दौरा

१९ ऑक्टोबर १९०५च्या संध्याकाळी विठ्ठल रामजी शिंदे, रुबेन आणि स्वामी स्वात्मानंदजी यांनी राममोहन आश्रमात थोडा वेळ प्रार्थना केली आणि महाराष्ट्राच्या दौ-यासाठी प्रस्थान ठेवले. सायंकाळी साडेपाच वाजता ठाणे येथील श्री. दत्तात्रय मार्तंड गुप्ते वकील यांच्या घरी पोहोचले. गुप्ते वकील हे मुंबई समाजाचे सभासद होते. त्यांनी या मंडळींचे मोठ्या आनंदाने स्वागत केले व पुढील कार्यक्रम ठरविले. मुंबई समाजाचे सहा सभासद, सात हितचिंतक व आणखी काही मित्रमंडळी धरून वीसजण समाजाची आस्था बाळगणारी मंडळी आहेत हे ऐकून शिंदे यांना समाधान वाटले. भोजनानंतर रात्री गुप्ते यांच्या घरी
१०-१२ मंडळी जमली. रुबेन यांच्या एकतारीवर सुमारे तासभर भजन झाले. रुबेन यांचे एकतारीवादन विलक्षण चित्तवेधक असे. एकतारी वाजविताना रुबेन स्वतःतीमध्ये पूर्णपणे रंगून जात असत व ऐकणाराही त्या नादब्रह्मात गुंग होऊन जात असे. रुबेन यांचे भजन व प्रार्थना झाल्यानंतर शिंदे यांनी जमलेल्या मंडळींसमोर काही सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, वीस वर्षांपूर्वी येथे सद्धर्म समाज म्हणून मंडळी होती. ब्राह्मधर्माचे कार्य येथे नवे नाही. तुम्ही एवढी आस्थेवाईक मंडळी आहात तर पूर्वीच्या प्रयत्नाचा जीर्णोद्धार करावा. महत्त्वाकांक्षा किंवा अतिकांक्षा न बाळगता मंडळाची स्थापना करावी असे अखेरीस शिंदे यांनी आवाहन केले. त्यांनी अखेरची प्रार्थना केली व रुबेन यांनी आशीर्वचनपर पद गाइले. रुबेन कोणत्या प्रकारी पदे गात असत याची कल्पना त्यांनी त्या वेळी गाइलेल्या पुढील पदावरून येऊ शकते.

लाज मेरी राखो, श्रीहरी लाज मेरी राखो।
आशीर्वाद करो, कृपाहस्त शिष धरो।।
कौन योग्यता, प्रभुजी कौन योग्यता।
रखाऊ जो मैं नहीं करूं, तुम्ही भिक्षुता।।
तुम्हारा काज है, हरीजी तुम्हारा काज है।
जो करू मैं इसलिय, तुम्ही का लाज है।।१

दुस-या दिवशी रात्री आठ वाजता शिंदे यांचे जाहीर व्याख्यान झाले. त्यानंतर गुप्ते वकील यांच्या घरी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. गुप्ते वकिलांना समाजाचे सेक्रेटरी करण्यात आले. अशा त-हेने या द-याच्या प्रारंभी ठाणे येथे नवा प्रार्थनासमाज स्थापन करण्याचा शुभारंभ झाला.

दुस-या दिवशी हे तिघेजण नाशिक येथे जाण्यास निघाले. पूर्वी नाशकास न्या. रानडे, लालशंकर उमियाशंकर ही मंडळी असताना तेथे एक प्रार्थनासमाज होता व तो ब-यापैकी चालला होता. तेथे एक उपासना मंदिर बांधण्याचे रानडे यांच्या मनात होते. रानडे-लालशंकर यांच्या मागे समाजाची जबाबदारी प्रसिद्ध देशभक्त व देवभक्त गंगाधर नृसिंह केतकर यांच्यावर पडली. केतकर कालवश झाल्यानंतर अलीकडील पाच-सात वर्षांत त्यांच्यामागे प्रार्थनासमाजाचे काम उरले नव्हते.

नाशकास बापूसाहेब केतकरांचे चिरंजीव अप्पासाहेब यांच्याकडे उतरण्याच्या इराद्याने हे तिघे तेथे पोहोचले. परंतु तेच मुंबईस चालले होते. त्यामुळे ते सर्वजण नीलकंठराव पाटणकर वकील यांच्याकडे उतरले. पाटणकरांनी मोठ्या अगत्याने त्यांचा पाहुणचार केला. शहरात स्वदेशी चळवळ मोठ्या जोरात चालली होती. रामाच्या देवळात विद्यार्थ्यांनी परदेशी कापडाची होळी केली. या शहरात एक गिरणी काढण्याचे घाटत आहे व एका नवीन सहकारी देशी दुकानाची तयारी जोरात चालली आहे, हे ऐकून शिंदे यांना फार आनंद वाटला.

दुस-या दिवशी सायंकाळी पाटणकर वकिलांच्या घरी काही मंडळी खास बोलावण्यात आली. रुबेनचे भजन झाल्यानंतर शिंदे यांचे व्याख्यान झाले. हल्ली जगात धर्मविचारांचा व आचारांचा चहूकडे कसा जोराने विकास होत चालला आहे, हे त्यांनी थोडक्यात सांगितले. उदार धर्माच्या चळवळीत सामील होण्यापूर्वी व सामील होऊन प्रयत्न करीत असता आधुनिक मनुष्याने बुद्धी, सहृदयता आणि शक्ती या तिन्हीपासून आपली शीलसंपत्ती कशी वाढविली पाहिज याचा त्यांनी विस्ताराने विचार केला आणि मग प्रत्येकाना आपले व्यक्तीस्वातंत्र्य कायम ठेवून सामाजिक कार्य साधण्याची कशी आवश्यकता आहे हे सांगितले व शेवटी प्रार्थनासमाजाच्या तत्त्वाचेही दिग्दर्शन केले. हे विवरण करीत असताना शिंदे यांनी त्यांना दुसरीकडे आलेल्या अनुभवावरून आधीच इशारा केला की, रूढ धर्मातील शुद्ध स्वरूपाची व प्रार्थनासमाजीय मतांची पुष्कळ अंशांनी एकवाक्यता होण्यासारखी असून समाजाने चालवलेल्या अनेक सत्कृत्यांचा उच्चार करण्यासारखा आहे. काही मंडळींचे तिकडे दुर्लक्ष होण्याचा संभव आहे व केवळ काही आगंतुक आणि गौण गोष्टीस चिटकून राहिल्याने विनाकारण वाद माजण्याचा संभव आहे.

स्वात्मानंदजी यांचे भाषण झाल्यानंतर शिंदे यांनी आधीच भाकीत केल्याप्रमाणे वादप्रसंग उपस्थित झाला. काही मंडळी बळेच विरुद्ध पक्ष घेऊन प्रतिमापूजनाच्या तर्फेने ब्राह्मसमाजावर आक्षेप घेऊ लागली. जमलेल्या मंडळींतच परस्पर वाद सुरू झाला. दुस-या दिवशी जाहीर व्याख्यान व्हावयाचे होते. तेथे मूर्तिपूजेसारख्या रूढ धर्माला आधारभूत झालेल्या गोष्टीचा उल्लेख करू नये अशी अट घालण्याचाही काही मंडळींनी प्रयत्न केला. शिंदे यांनी “आम्ही आपल्या नेहमीच्या धोरणास अनुसरून व्याख्यान करू. जागोजागच्या लहरीप्रमाणे आम्हांस रंग बदलता येत नाही” असे स्पष्ट सांगितले. दुस-या दिवशी सोमवारी संध्याकाळी तेथील विजयानंद थिएटरात ‘धर्माची सामान्य भूमिका’ या विषयावर शिंदे यांचे व्याख्यान झाले. स्वामी स्वात्मानंद यांनी याच विषयाचा केवळ हिंदू धर्मग्रंथांच्या व संस्थांच्या आधारे विचार मांडला. पाटणकर वकिलांनी योग्य प्रकारे समारोप केला.

तारीख २४च्या संध्याकाळी अप्पासाहेब केतकर यांच्या घरी पुन्हा काही मंडळी जमली. कुष्णाजीपंत जोशी हे प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. त्यांनी प. वा. बापूसाहेब केतकर यांच्याप्रमाणे समाजाची उपासना वगैरे नियमितपणे चालवीण्याचे कबूल केले. जमलेल्या मंडळींतून समाजाला काही हितचिंतक मिळाले. समाजाचा कोणीतरी प्रचारक या स्थळी येऊन दोन-तीन महिने कायमचा राहून कार्य करील तर पुष्कळ यश येईल असे शिंदे यांना वाटले.२

पाटणकर वकिलांच्या सूचनेवरून नाशिक जिल्ह्यातील आसवले येथे राहणा-या अस्पृश्यवर्गातल्या एका श्रीमंत पुढा-याकडे ही मंडळी गेली. परंतु गृहस्थाने या मंडळींची भेट घेण्याचे टाळले.

त्यांचा पुढचा मुक्काम अहमदनगरमध्ये होता. आसवले येथे दुपारून निघणा-या गाडीत ते बसले व रात्री साडेबारा वाजता अहमदनगरास सहदेवराव बागडे यांच्या घरी पोहोचले. अहमदनगर समाजाचे एक मोठे आस्थेवाईक सदस्य रा. देशपांडे हे वाटेत येवले येथे राहत होते. त्यांच्या मदतीने तेथे बरेच काम करण्याजोगे होते. परंतु प्लेगमुळे लोक गावाबाहेर राहण्यास गेले होते. म्हणून येवल्यास जाणे उपयोगाचे नव्हते.

नाशकात स्वदेशीची चळवळ भराला आलेली त्यांना दिसली. पण येथे मात्र स्वदेशीबाबतीत सामसूमच आढळून आली. नगरात कापसाचा मोठा बाजार आहे. भोवतालचा कापूस येथूनच बाहेर रवाना होतो. कापसाचे गठ्ठे बांधण्याचा येथे एक कारखानाही आहे. असे असता येथे कापसाची एखादी गिरणी का उभारून नये? पण नगरात पिण्याच्या पाण्याची मारामारी आहे तर गिरणी कशी चालेल? निदान तूर्त देशी कोणकोणता माल मिळेल हे लोकांच्या नजरेत भरविण्यासाठी जागोजागी प्रदर्शन उघडल्यास काय हरकत आहे इत्यादी विचार स्वदेशी इसमाच्या मनात चालू असल्याचे शिंदे यांनी जाणून घेतले. नगर येथील ३० हजार लोकवस्तीपैकी ख्रिस्तीवस्ती ६ हजारावर आहे. शिवाय जिल्ह्यात ७ हजारावर ख्रिस्त्यांची वस्ती आहे. नगर हे महाराष्ट्रातील ख्रिस्ती मिशनचे मुख्य ठिकाण आहे. मि. चर्चहिल नावाच्या अमेरिकन इसमाने साठ हातमागाचा कारखाना व गालिच्यांचा कारखाना जोरात चालविलेला शिंदे यांनी पूर्वीच पाहिला होता. त्यामध्ये आता सव्वापट वाढ झालेली त्यांना दिसून आली. आपले लोक मात्र काहीही करीत नाहीत हे शिंदे यांना जाणवले.

दुस-या दिवशी सकाळी प्रार्थनासमाजाचे चिटणीस श्री. अभ्यंकर यांच्या अनुमतीने पुढील कार्यक्रम झाले. आलेल्या अनुभवावरून शिंदे यांनी प्रचारकार्याचे धोरण निश्चित केले होते. ज्या ठिकाणी समाजाचे काही कार्य प्रथमच करावयाचे असते तेथे वादग्रस्त विषयावरील व्याख्याने किंवा निषेधात्मक चर्चा होताहोईतो टाळावयाची. अशा ठिकाणी धर्मासंबंधी हल्ली जगाच्या सुधारलेल्या भागात जे उदार प्रयत्न चालू आहेत त्यांचे हेतू कसे निष्काम व निरभिमान आहेत; त्यांच्या मार्गात अडचणी काय आहेत व यश किती आले आहे; त्यांच्यामध्ये परस्परसंगती, सहानुभूती व सहकार्य कसे चालू आहे व या सनातन सार्वत्रिक धर्मकार्यासंबंधी स्वदेशी चळवळ ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजाने आज कित्येक वर्षे कशी चालविली आहे इत्यादी सामान्य विषयांवर केवळ माहितीच्या रूपानेच व्याख्याने देण्याचे व संवाद चालविण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे बहुतेक ठिकाणी वावदुकास वाव मिळत नाही, असा त्यांचा अनुभव होता.

अहमदनगर येथील प्रार्थनासमाज ३० वर्षांइतका जुना असल्याने येथे सामान्य पद्धतीने काम न करता काही विशिष्ट मतांचा व हेतूंचा ऊहापोह करणे शिंदे यांना जरूर वाटले. हे काम तोल साधून करणे आवश्यक आहे. मात्र उत्तरोत्तर कार्यात विशिष्टता व नवीनपणा आला पाहिजे म्हणून या खेपेस समाजाच्या संदर्भात अत्यंत वादग्रस्त ठरलेले मूर्तिपूजा व जातिभेद हे विषय घेण्यात आले. मूर्तिपूजेचा शेवट मानसपूजेत घडत असतो व जातीविषयक विचारात बंधुता व समता हा पाया महत्त्वाचा असतो, सबगोलंकार करणे नव्हे ही धारणा ठेवून या विषयावर शांतपणे ऊहापोह करणे हितकर व आवश्यक आहे असा शिंदे यांचा विचार होता. म्हणून नगर येथील ‘आनंदविहार’ नाटकगृहात २६ व २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ‘मानसपूजा’ व ‘बंधुभाव’ या विषयावर प्रथम स्वामींनी व नंतर शिंदे यांनी भाषणे केली.

तारीख २७ रोजी शुक्रवारी सकाळी समाजमंदिरात उपासना झाली. त्या वेळी शिंदे यांनी सगळ्या भारताचे एक राष्ट्र होणे कसे आवश्यक आहे याचे प्रतिपादन करणारे व्याख्यान धार्मिक भूमिकेतून दिले. आजच्या स्वदेशी चळवळीच्या काळामध्ये लोकांची मने जागृत झाली आहेत तेव्हा राष्ट्रघटनेचा सात्त्विक अर्थ व दैवी हेतू काय याचे विवरण त्यांनी या व्याख्यानात केले. ज्याप्रमाणे कुटुंबाची घटना, लहानसहान जातीची घटना ईश्वरी योजनेमुळे झाली त्याचप्रमाणे राष्ट्रांची घटना होणे हीही विश्वनियंत्याचीच योजना आहे. केवळ शिशुविकास व विषयासक्ती यांमुळे कुटुंब जसे बनत नाही, अपत्यप्रेम व स्वार्थत्याग या योगेच बनते त्याचप्रमाणे केवळ स्वार्थबुद्धी व परापहार या कराणाने कधी राष्ट्र होणे शक्य नाही. ईश्वरी योजनेला विघातक अशी राष्ट्रे झाली तर चोरांच्या टोळ्यांप्रमाणे त्यांचा शेवटी नाशच होतो. तर आपण जगाच्या विकासाची एक पायरी चढण्याच्या उदात्त हेतूने आमच्या लहान लहान जाती व प्रांतिक राष्ट्र यांचे एकच भारतीय महाराष्ट्र बनविणे ही ब्राह्म धर्माची एक आज्ञा आहे असे प्रतिपादन शिंदे यांनी या व्याख्यानांतून केले.

शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अकरा वाजता भिंगार गावी अंत्यज सुधारक मंडळींची पंधरवड्याची सभा भरली होती. निमंत्रणावरून शिंदे व त्यांचे दोघे सहकारी सभेला निघाले. सभेच्या ठिकाणातून अर्ध्या मैलावर अलीकडे वाटेवर सुमारे १०० आबालवृद्ध मंडळी भजनाची सर्व तयारी करून बसली होती. शिंदे आपल्या सहका-यांसमवेत तेथे पोहोचल्यावर मशाली पेटवून वारकरी थाटाची दिंडी निघाली व ती बाजारातून सभास्थानी साडेअकरा वाजता पोहोचली. त्या ठिकाणी अशा मध्यानरात्री अंत्यज मानलेल्या जातीचे सुमारे ३०० स्त्री-पुरुष नीटनेटका पोशाख करून उत्कंठेने जमले होते. सभेसाठी एक लहानसा सुंदर मंडप उभारला होता.

१० जून १९०५ रोजी या मंडळींची सभा प्रथम झाली होती. शिंदे हे या मंडळींच्या स्थापनाप्रसंगी हजर होते व त्यानंतरही या सभेत व्याख्यान देण्यासाठी ते एकदा आले होते. सहा महिन्यांच्या अवधीमध्ये या मंडळींनी कामाची मोठी प्रगती केली होती हे पाहून शिंदे यांना फार आनंद वाटला.

दिंडीमध्ये सातगावचे वृद्ध पाटील, पंढरीचे वारकरी मोठ्या आस्थेने सामील झाले होते. नीच मानलेल्या जातीस सुधारण्याचे काम जुन्या मताचे वृद्ध करतात व उच्च मानलेल्या जातीत मात्र ते केवळ तरुण नवशिक्यांवर पडते हा विरोधाभास शिंदे यांना मनोरंजक वाटला. पूर्वी ही सभा दर महिन्यास एकदा एकाच ठिकाणी भरत असे. ती आता दर पंधरवड्यास महारांच्या प्रत्येक मोहोल्ल्यात पाळीपाळीने भरते. तिच्या खर्चासाठी दर पंधरवड्यास पाव आणा घरपट्टी मोठ्या व्यवस्थेने वसूल केली जात होती. सभेच्या प्रारंभी श्री. पांडोबा डांगळे मास्तर यांनी सभेचे नियम वाचून दाखविले. मद्य न पिणे, खाण्यापिण्यात व पोशाखात स्वच्छता ठेवणे, सर्व लहान मुलांस शाळेत पाठविणे आणि विशेष करून उच्च वर्णातील लोकांस प्रसंगी टोचून न बोलणे व त्यांचा उलट मान राखणे इत्यादी अत्यंत समंजसपणाचे नियम ऐकून शिंदे व त्यांचे सहकारी यांना मोठा गहिवर आला. विशेषतः शेवटचा नियम ऐकून शिंदे यांना वाटले की, “नीच म्हणविणा-यांनी उच्च म्हणविणा-यांस सभ्यतेचा मोठाच धडा शिकविला ह्यात काही नीचाशिवाय इतरांस शंका येणार नाही.”३

भिंगार गावी या मंडळीने आपल्या जातीसाठी एक शाळा सुरू करण्याची म्युनिसिपालटीकडून परवानगी मिळविली आहे. नगर शहरात व भिंगार गावी यांच्यासाठी दोन वाचनालयाची स्थापना होणार असल्याचे शिंदे यांना समजले. या मंडळींनी अल्पावधीत केलेली ही प्रगती पाहून शिंदे यांना संतोष वाटला. स्वामी स्वात्मानंदजींनी उत्तेजनपर मोठे कळकळीचे भाषण केले. याच नमुन्यावर नगर शहरातील माळीवाड्यातील महार मंडळीनेही आपल्या जातीच्या उन्नतीसाठी सभेचे काम दर पंधरवड्यास चालविले आहे. २९ तारखेस रात्री या सभेस शिंदे आपल्या सहका-यांसमवेत उपस्थित राहिले. प्रार्थनासमाजाने या मंडळींस हरेक रीतीने मदत करणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी जाहीरपणे सुबोधपत्रिकेत आवाहन केले.

सभा संपल्यानंतर रात्री पाऊणच्या गाडीने शिंदे आपल्या सहका-यांसमवेत बारामतीस जाण्यास निघाले. ३० तारखेस दुपारी साडेअकराच्या सुमारास शिंदे, स्वामी स्वात्मानंदजी व डॉ. रुबेन बारामतीस पोहोचले. त्याच दिवशी संध्यकाळी मंडळींच्या भेटी झाल्या. श्री. रामकृष्ण बळवंत लोटलीकर, सबरजिस्टार यांच्या घरी डॉ. रुबेन यांचे एकता-यावर भजन झाले.

महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटी ह्या ग्रामीण भागात व अस्पृश्यवर्गालाही शिक्षण देणा-या संस्थेची स्थापना रामचंद्र आण्णाजी कळसकर यांनी केली होती. त्यांचे कार्य बारामती व बाजूबाजूच्या वांगी, कळस वगैरे गावी चालू होती. शिंदे हे बी. ए. चे विद्यार्थी असताना १८९८ मध्ये कळसकरांशी त्यांचा परिचय झाला होता. श्री. कळसकर यांची कामाची तळमळ व धडाडी पाहून शिंदे यांच्या मनात त्यांच्याबद्दल अतीव आदराची भूमिका निर्माण झाली. अस्पृश्यांसाठी आपणही काहीएक काम करावे ही प्रेरणा प्रथमतः कळसकरांच्या परिचयानंतर शिंदे यांच्या मनात निर्माण झाली. कळसकर यांनी स्थापलेली शाळा बघण्याचा व त्यांची कार्यपद्धती निरखण्याचा योग शिंदे यांना बारामतीच्या या भेटीत आला. मात्र कळसकर यांचे निधन नुकतेच झालेले होते. याची खंत शिंदे यांना मनोमन वाटली असणार. त्या वेळी महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी म्हणून श्री. विष्णू रघुनाथ करमरकर हे काम पाहत होते.

३१ ऑक्टोबर रोजी सकाळी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सोसायटीचे कागदपत्र पाहिले. उद्योगशाळेतील मुलांची ड्रॉइंग, कार्पेंटरी वगैरे कामे पाहिली व इतर अभ्यासाची मुलांची परीक्षा घेतली.

सायंकाळी ७ ते ९ पर्यंत बारामती येथील क्लबात शिंदे व स्वामी स्वात्मानंदजी यांनी वेद व उपनिषदे यांस अनुसरून मानसपूजाच मुख्य आहे अशा मुद्यावर व्याख्यान दिले. रात्री दोन तास लोटलीकर यांच्या घरी भजन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्याच घरी ईश्वरोपासना झाली.

महाराष्ट्र व्हिलेज एज्यूकेशन सोसायटीच्या १६व्या  वार्षिक समारंभासाठी शिंदे हे १ नोव्हेंबर १९०५ रोजी संध्याकाळी ६ ते ९ उपस्थित राहिले. हा समारंभ सोसायटीचे प्रेसिडेंट मालेगावचे राजेसाहेब शंभूसिंगराव जाधवराव हे येऊ न शकल्याने रेव्ह. अलेक्झांडर रॉवर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. ह्या प्रसंगी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी भाषण केले व शिणासंबंधी या सोसायटीचे महत्त्व, तिची उपयुक्तता व लोकाश्रयाची तिला असलेली आवश्यकता इत्यादी बाबींबद्दल मार्मिक असे विवेचन केले. या प्रसंगी स्वामी स्वात्मनंदजी यांनी हिंदुस्थानीत धंदे-शिक्षणाच्या संबंधी भाषण केले.

बारामती येथील मुक्कामाचे चांगले फलित म्हणजे तेथे झालेली प्रर्थनासमाजाची स्थापना. १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत श्री. लोटलीकर सबरजिस्टार यांच्या घरी त्यांच्याच अध्यक्षतेखाली प्रर्थनासमाजाची स्थापना झाली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सुपरिटेंडेंट रा. नारायण मारुतीराव नवले यांना प्रार्थनासमाजाचे सेक्रेटरी नेमले. आठ-दहा व्यक्ती समाजाच्या सभासद झाल्या. अशा प्रकारे कार्यभाग आटोपल्यानंतर शिंदे व त्यांचे सहकारी रात्रौ दीडच्या सुमारास पंढरपुरास जाण्यासाठी निघाले.४ हा प्रवास त्यांनी बैलगाडीने केला.

पंढरपूर येथे प्रार्थनासमाजाने चालविलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये तिघेजण उतरले. बारामती येथील कामानंतर डॉ. रुबेन ह्यांनी निरोप घेतला व त्यांच्या जागी लक्ष्मण मलकू सत्तूर हे दाखल झाले होते. अशा प्रकारच्या प्रचारकार्यात कोणाच्यातरी खोडसाळपणामुळे फजिती होणे वा चमत्कारिक प्रसंग ओढवणे हे शिंदे ह्यांना जमखंडी येथील प्रसंगावरून अनुभवास आले होते. पंढरपूर येथे असाच प्रसंग त्यांच्या वाट्याला आला. तेथील हायस्कूलचे प्रमुख श्री. मोडक हे शिंदे यांच्या परिचयाचे होते. शिंदे ह्यांचे व स्वात्मानंदजी यांचे अशी दोन व्याख्याने श्री. मोडक यांनी आपल्या शाळेमध्ये ठरविली होती व तशी जाहिरातही केली होती. पण मोडक महाशयांचा डाव वेगळाच होता हे व्याख्यानाच्या वेळी शिंदे व स्वात्मानंदजी यांच्या ध्यानात आले. कारण व्याख्यानाची वेळ होऊन अर्धा तास उलटून गेला तरी शाळेत एक चिटपाखरूही आले नाही. हेडमास्तरांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी केल्यामुळे व्याख्यात्यांचा असा कोंडमारा झाला होता. त्यांच्यासमोर रिकामी बाके होती. स्वामी स्वात्मानंदजी मोठे करारी होते. ते म्हणाले, “शिंदेजी, आज हम व्याख्यान करेंगे, आप सुनिए. कल आप कीजिए और मै सुनुंगा”। व त्यांनी संपूर्ण व्याख्यान दिले दुस-या दिवशी शिंदे ह्यांनी तसेच केले, असे हे ‘पंढरीमहात्म्य’ अनुभवल्यावर शिंदे यांना तुकारामबुवांचे वचन आठवले, ‘हा तो काही नव्हे निराशेचा ठाव। भलें पोटीं वाव राखिलिया’।।५

शिंदे यांना सोलापुरात मात्र चांगला अनुभव आला. तेथील सरकारी वकील रा. नागेश पै यांच्याकडे शिंदे उतरले. रिपन हॉल येथील रिपनक्लबात १८ तारखेस त्यांचे व्याख्यान झाले. युवराजाच्या सन्मानार्थ सगळीकडे रोषणाई केलेली होती. ह्या प्रसंगाच्या निमित्ताने शिंदे यांनी ‘देशभक्ती आणि देवभक्ती’ या विषयावर व्याख्यान दिले. आपल्यातील आध्यात्मिक उणीवा म्हणजेच राष्ट्रीय ऐक्याचा अभाव होय. सुखदुःखाच्या प्रसंगी राष्ट्राचे वर्तन जणू एखाद्या व्यक्तीच्याच वर्तनासारखे होणे ही राष्ट्रीयता निर्माण झाल्याची खूण असते व देशसेवेच आद्य तत्त्व म्हणजे राष्ट्रीय ऐक्य वाढविणे हे होय, अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केले. व्याख्यानावर चांगली चर्चा झाली. त्यानंतर पुढचा दौरा विजापूर येथे केला. तेथील एका थिएटरात व्याख्यान दिले व ब्राह्मो पोस्टल मिशनचे साहित्य सढळ हातांनी वाटले. विजापूरहून ते हुबळी येथे गेले. तेथील म्युनिसिपल हॉलमध्ये त्यांचे व्याख्यान झाले. धारवाड, बेळगाव येथेही दौरा करून धर्मप्रचारार्थ त्यांनी व्याख्याने दिली व हा दौरा आटोपून ते मुंबईस परत आले.

एवढ्या अवधीत शिंदे ह्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई ह्यांचा आजार बरा होण्याऐवजी वाढला होता. अशातच मुंबईत प्रार्थनासमाजाने काशी येथे भरणा-या भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी प्रतिनिधी म्हणून शिंदे ह्यांना पाठविण्याचा निर्णय घेतला होता. ही जबाबदारी त्यांना पत्करावी लागली. धर्मपरिषदेचे काम आटोपल्यानंतर बंगाल, बिहार, आसामच्या लांबच्या दौ-यावर ते निघाले. शेवटी बारीसाल येथे त्यांचे जाहीर व्याख्यान चालू असतानाच त्यांना घरून एक तातडीची तार आली. सौ. रुक्मिणीबाई यांच्यावर मुंबईत एक अवघड ऑपरेशन झाले व अहमदनगर येथे त्यांची बहीण चंद्राबाई ही अत्यवस्थ आहे असा मजकूर तारेत होता. अर्ध्यावर टाकून शिंदे ह्यांना परत यावे लागले. अहमदनगरास ते पोहोचल्यानंतर आपल्या आवडत्या बहिणीचे त्यांनी दर्शन घेतले व पुन्हा येतो असे आश्वासन देऊन पत्नीच्या समाचारासाठी मुंबईस गेले. पण चंद्राबाईंची ही भेट अखेरचीच ठरली दुस-या दिवशी म्हणजे ३ फेब्रुवारी १९०७ रोजी चंद्राबाईंच्या निधनाची त्यांना बातमी समजली. बहिणीच्या गंभीरपणाच्या आजारपणाच्या काळात व अखेरच्या दिवसात आपण तिच्याजवळ राहू शकलो नही याचे त्यांच्या मनाला फार दुःख झाले.

धर्मप्रचारकार्यासाठी त्यांची अखंड धावपळ चालू होती.

संदर्भ
१.    सुबोधपत्रिका, २२ ऑक्टोबर १९०५.
२.    सुबोधपत्रिका, ५ नोव्हेंबर १९०५.
३.    सुबोधपत्रिका, १२ नोव्हेंबर १९०५. भिंगार येथील अस्पृश्यवर्गाच्या प्रस्तुत सभेचा भावनिक परिणाम आपल्या मनावर कसा झाला व त्याची परिणती डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या स्थापनेत कशी झाली याचे विवेचन शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात केले आहे. त्याचा उपयोग प्रस्तुत चरित्राच्या पहिल्या प्रकरणात केलेला आहे.
४.    सुबोधपत्रिका, १२ नोव्हेंबर १९०५, विष्णू रघुनाथ करमरकर यांनी पाठविलेले पत्र.
५.    वि. रा. शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १७४.