ऑक्सफर्डमध्ये आल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे प्रथम मिस्टर आणि मिसेस् ग्रेडन या दांपत्याच्या घरी ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहू लागले. इंग्लंडमध्ये काही मध्यम प्रतीचे लोक पाहुण्यांकडून पैसे घेऊन आपल्या घरी राहण्याची सोय करतात. ग्रेडन यांच्यासारख्या संभावित कुटुंबामध्ये राहिल्यामुळे इंग्रजी चालीरीतींची आणि सभ्यतेची माहिती मिळून त्यांचा मोठा लाभ झाला, असे त्यांना वाटले.
कॉलेजमध्ये सकाळी दहापासून दुपारी एकपर्यंत अध्यापकांची व्याख्याने असत. झालीच तर संध्याकाळी जाहीर व्याख्याने होत. रात्रीच्या वेळी चर्चामंडळाच्या सभा, संमेलने चालत. वर्षातून सहा महिने अभ्यास आणि सहा महिने सुट्टी असे आणि आठवड्यातून चार दिवस कॉलेज व शनिवार, रविवार, सोमवार हे सुट्टीचे दिवस असत. भार कशाचाच नसल्यामुळे सगळ्याच गोष्टी करण्याबाबत विठ्ठल रामजी शिंदे यांना उत्साह वाटत असे.
धर्माचे अध्ययन हा त्यांच्या केवळ आवडीचाच नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्यांचे नेमलेल्या अभ्यासविषयाचे वाचन तसेच आनुषंगिक वाचन जोमाने सुरू झाले. ते आणि त्यांचे मित्र मिळून धर्मसाधन करू लागले. वादविवादाचा आणि चर्चेचा तर त्यांच्या ठिकाणी उदंड उत्साह होता. ‘मार्टिनो क्लब’, ‘डिस्कशन क्लब’ आणि ‘पॉझ क्लब’ अशी ती चर्चामंडळे कॉलेजात अस्तित्वात होती. पॉझ क्लब केवळ मँचेस्टर कॉलेजच्या विद्यार्थ्याचा. इतर दोन मंडळांमध्ये मँचेस्टर कॉलेजातील तसेच इतर कॉलेजांतील विद्यार्थ्यींनाही सभासद म्हणून निवडले जाई. विठ्ठल रामजी शिंदे तीनही चर्चामंडळाचे सभासद म्हणून निवडले गेले होते.
मार्टिनो क्लब हा मँचेस्टर कॉलेजचे नामवंत प्रोफेसर डॉ. जेम्स मार्टिनो (१८०५-१९००) यांच्या स्मरणार्थ काढला होता. वयाच्या ९४व्या वर्षी ११ जानेवारी १९०० रोजी त्यांचे निधन झाले. मँचेस्टर कॉलेजशी विद्यार्थी या नात्याने सुरू झालेल्या त्यांचा संबंध पुढील ७० वर्षे टिकला.१ १९०१-०२ ह्या वर्षासाठी क्लबच्या कमिटीचे अध्यक्ष ए. एच. थॉमस व सेक्रेटरी गॉर्डन कूपर हे होते. मँचेस्टर कॉलेजचे आठ विद्यार्थी सदस्य म्हणून ह्या वर्षासाठी निवडले गेले. त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे एक होते. ऑक्सफर्डमधील बॅलिओल, वॅड हॅम, एक्सिटर क्वीन्स इत्यादी कॉलेजमधूनही प्रतिनिधी निवडले होते. चर्चामंडलाचे एकंदर २८ सदस्य होते. यामध्ये जी. जी. राणे हेही एक नाव आढळते.
मार्टिनो क्लबच्या कमिटीची बैठक प्रेसिडेंटच्या खोलीमध्ये ७ नोव्हेंबर १९०१ रोजी भरली. ही बैठक प्राधान्याने नवे सदस्य निवडण्यासाठी होती. हया बैठकीच्या वृत्तान्तात असेही नमूद केलेले आढळते की स्त्रियांना निवडणुकीसाठी पात्र समजावे काय, यावर चर्चा झाली आणि विचारविनिमयानंतर असे ठरविण्यात आले की मँचेस्टर कॉलेजच्या नियमित अथवा खास विद्यार्थिनींना पात्र समजावे. मात्र याच वेळी सगळ्या उपस्थित सदस्यांनी सांगितले की सोसायटीच्या बैठकीसाठी अन्य स्त्रियांना मात्र निमंत्रित करू नये. मिस् जॉन्सन, मिस् पेटझोल्ड ह्या विद्यार्थिनींना त्याचप्रमाणे मँचेस्टर कॉलेजच्या अन्य सहा पुरुष विद्यार्थ्यांना सदस्य म्हणून निवडले. त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांची सदस्य म्हणून निवड केली गेली. बारनेस, टोयोसाकी हे शिंदे यांचे अन्य सोबतीही सदस्य म्हणून निवडले गेले.२
मार्टिनो क्लबचे प्रेसिडेंट थॉमस यांनी आदल्या दिवशी जाहीर केल्यानुसार शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी क्लबची बैठक झाली. विठ्ठल रामजी शिंदे हे सदस्य ह्या नात्याने बैठकीस गेले. संध्याकाळी ७ वाजता जेवण झाल्यानंतर व्ही. जी. चर्टकॉफ यांनी ‘रशियातील धार्मिक शिक्षण’ ह्या विषयावर निबंध वाचला. “चर्टकॉफ हे टॉलस्टॉयचे मित्र व अनुयायी, पक्के सोशॅलिस्ट व अनार्किस्ट होते.”३ हे टॉलस्टॉयच्या धर्मविचाराचा प्रभाव पडून त्यांचे कट्टर अनुयायी झाले. सैन्यातील अधिकाराची नोकरी व संपत्तीचा त्याग करून शेतक-यासारखे साधे जीवन जगू लागले. निबंधवाचनानंतर प्रश्नोत्तरे व चर्चा झाली. विठ्ठल राजमी शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्टकॉफनी आपली काही पुस्तके व स्तःबद्दलची माहिती त्यांना पाठवून देण्याचे कबूल केले. दुसरी सभा २९ नोव्हेंबर रोजी झाली. मँचेस्टरचे रे. एनफिड डॉसन ह्यांनी ‘टेनिसनच्या कवितेचे काही पैलू’ ह्यावर निबंध वाचला. तो विठ्ठल रामजींना फार चांगला वाटला. त्यावर वादविवादही मनोरंजक झाला. टेनिसनला सृष्टीचे चित्र जसेच्या तसेच वठविता येत होते पण वर्डस्वर्थप्रमाणे सृष्टीत दैवी तत्त्व दिसले नाही असा निबंधाचा व एकंदरीत वादाच रोख होता. शिंदे यांना हा विचार रास्त वाटला.४
धर्मविषयक वाचन आणि धर्मसाधन ह्या दोन्ही गोष्टी विठ्ठल रामजी शिंदे यांनी उत्सहाने चालविल्या होत्या. अँनी बेझंट यांचे पुनर्जन्म (Reincarnation) ह्या पुस्तकाचे वाचन ते करावयास लागेल होते. त्यांचा कॉलेज बंधू मि. कॉक हा थिऑसॉफिस्ट होता. कॉकबद्दल शिंदे यांना ममत्व वाटू लागले. १० नोव्हेंबर रोजी दुपारपासून संध्याकाळपर्यंत शिंदे कॉककडेच बोलत बसले. परस्परांची हकिकत समजून घेतली. कॉक व त्याची बहीण अशी दोघेच ऑक्सफर्डला विद्यार्थिदशेत आनंदाने दिवस घालवीत होते. ते दोघेही अत्यंत ममताळू, सात्त्विक व हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचे चाहते होते. कॉक हा स्वतः खाटकाचा मुलगा असून स्वतः खाटकाचा धंदा बरेच दिवस करून तो आणि त्याची बहीण शाकाहारी झाली होती. आध्यात्मिक भाव आणि भक्ती वाढविण्यासाठी नियमित वेळ आपण एकत्र जमून काही साधना करावे असे त्याने सुचविले. विठ्ठल रामजींच्या मनातही ते होतेच. त्याप्रमाणे त्या दोघांनीही धर्मसाधनासाठी दर शुक्रवारी रात्री नऊ वाजता एकत्र जमावयाचे ठरविले.
हिंदुस्थानात असताना विठ्ठल रामजी शिंदे कधी कधी मांसहार करीत होते पण तो अजिबात सोडावा असे त्यांना वाटत होते. लंडनमधून येताना त्यांनी शाकाहार पुरस्कर्त्यांची काही पुस्तकेही विकत घेतली होती. मि. कॉकच्या उदाहरणामुळे पूर्ण शाकाहारी होण्याचा त्यांचा विचार बळावला. घरी आल्यानंतर जेवताना मिस्टर आणि मिसेस् ग्रेडन यांच्याशी मांसाहाराबद्दल कडाक्याचा वाद झाला. दुस-या दिवसापासून ग्रेडन मंडळींचा आग्रह न जुमानता केवळ शाकाही अन्न घेण्यास त्यांनी सुरुवात केली.
पुढच्या शुक्रवारी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी शिंदे हे मि. शोन, मि. बार्न्स यांच्यासह आध्यात्मिक साधनासाठी कॉक यांच्या घरी जमले. कॉकने सुचविले की प्रत्येक आठवड्यास एकाने कुणातरी मोठ्या साधूचा विचार वाचून दाखवावा किंवा त्याचा विशेष ऊहापोह करावा. शोनबरोबर विठ्ठल रामजींचा युनिटेरियन मताविषयी थोडा वाद झाला. बार्न्सने सुचविले की, आपण जमल्यावर पाचदहा मिनिटे स्वस्थ समाधिस्थ बसावे व कुणास काही स्फूर्ती अगर प्रेरणा झाल्यास तिच्याविषयी सर्वांनी विचार करावा. ह्याप्रमाणे ६ डिसेंबरपर्यंत चार साधनसभा झाल्या. ६ डिसेंबरच्या साधनसभेत प्रर्थना झाल्यानंतर विठ्ठल रामजींनी ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव...’ ह्या भगवद्गीतेतील श्लोकावर विवेचन केले. नंतर अद्वैत, कर्म, पुनर्जन्म इत्यादी पौरस्त्य सिद्धान्ताबद्दल चर्चा झाली. ह्या सभेला लिंकन कॉलेजचे रो नावाचे गृहस्थ उपस्थित राहिले होते. शोन हे कॉकप्रमाणेच थिऑसॉफिस्ट होते. धर्मविषयक बाबींवर चर्चा करण्यात त्यांना गोडी वाटत होती.
ऑक्सफर्डमधील वेगवेगळ्या चर्चमध्ये उपासना पाहण्याची व सर्मन ऐकण्याची संधी सोडीत नसत. एक तर धर्माबद्दल त्यांच्या ठिकाणी अत्यंत कळकळ होती. दुसरे म्हणजे, स्वतःची युनिटेरियन उपदेशक म्हणून तयारी करण्याच्या दृष्टीने जेवढ्या म्हणून उपासना पाहावयास मिळत तेवढ्या त्यांना हव्या असत. १७ नोव्हेंबरच्या रविवारी सकाळी साडेदहा वाजता युनिव्हर्सिटी चर्चमध्ये त्यांनी सर्मन ऐकले. नंतर त्यांच्या कॉलेजमधील देवळात प्रोफेसर रेव्ह. ऍडिस यांनी चालविलेल्या उपासनेला ते उपस्थित राहिले आणि संध्याकाळी ख्राइस्ट चर्च कॉलेजच्या देवळात ते उपासनेला गेले. तेथील उपासना एपिस्कोपल चर्चच्या नमुन्याप्रमाणे होती. हा पंथ रोमच्या पोपच्या प्रभुत्वापासून फुटून निघालेला पंथ असून धर्मगुरू नेमण्याचा पोपचा अधिकार त्यांनी झुगारला. अशा त-हेने एका रविवारी तीन उपासनांना ते उपस्थित राहिले. १ डिसेंबरला त्यांच्या कॉलेजच्या मंदिरात प्रो. कार्पेंटर यांचा ‘लिव्हिंग प्रॉव्हिडन्स’ अथावा ‘जिवंत जागृत देव’ ह्या विषयावर उपदेश झाला. तो त्यांना अतिशय प्रेरणादायी व धार्मिक सुखाचा अनुभव देणारा वाटला.
विठ्ठल रामजींना धर्माभ्यासात आणि धर्मचिंतनात गोडी होती त्याचप्रमाणे लोकजीवनाबद्दलही आस्था होती. गायकवाड, मित्र, राणे, कॉक यांसारख्या मित्रांकडे ते फिरायला जाण्यासाठी, चहा पिण्यासाठी वा गप्पा मारण्यासाठी कधीमधी जात असत. शामराव गायकवाड यांच्याबरोबर एकदा ते शहरापासून दोन-अडीच मैल फिरावयास गेले होते. एका शेतात मजूर नांगरीत होता. त्याला त्यांनी माहिती विचारली. शेतमजुराला आठवड्याला बारा-पंधरा शिलिंग मजुरी मिळते ही माहिती त्यांना मिळाली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सायकलवर बसण्याचा सराव त्यांनी केला. २३ नोव्हेंबरला शोनबरोबर टेम्स नदीवर ते फिरायला गेले व पहिल्यांदाच नाव वल्हविली व दीड मैलाचा फेरफटका मारला.
मि. ग्रेडन यांचे कुटुंब मध्यमवर्गातील असल्याने त्यांच्याकडे पाहुण्यांची बरीच वर्दळ असे. विद्यार्थी या दृष्टीने त्यांच्या घरातील वास्तव्य असावे तितके सोयिस्कर नव्हते. त्याशिवाय काटकसरीच्या दृष्टीनेही विठ्ठल रामजी यांनी एकत्र राहण्याचा विचार करून जागेचा शोध घेतला. वुर्स्टर प्लेस या नावाच्या मध्यम वस्तीच्या भागात पिअर्सन कुटुंबाच्या ३३ नंबरच्या घरातील पहिल्या मजल्यावरील जागा ह्या दोघांनी मिळून घेतली व १६ नोव्हेंबरपासून तेथे राहावयास गेले. दोघांसाठी दोन निजण्याच्या खोल्या असून दोघांना बसण्याला आवश्यक ते फर्निचर असलेली एक समान खोली होती.
पिअर्सन कुटुंब हे मध्यम स्थितीतील अगदी खालच्या दर्जाचे होते. गरीब स्थितीतील कुटुंब सबंध घर भाड्याने घेऊन आपण तळमजल्यात राहून इतर मजले सभ्य गृहस्थास भाड्याने देऊन आपली गुजराण करते. कुटुंबातील मालकीण म्हणजे लँड लेडी पाहुण्यांचे जेवणखाण, स्नानाची, कपडे वगैरे धुण्याची व्यवस्था पाहत असते. मिस्टर पिअर्सन ऑक्सफर्डच्या एका मोठ्या हॉटेलात वाढप्याचे काम करीत होते. ह्यांना दोन मुले व चार मुली होत्या.
पिअर्सन कुटुंब हे अत्यंत साधे, गरीब व प्रामाणिक होते. ऑक्सफर्डचा विद्यार्थी व त्यातल्या त्यात धर्मशिक्षणाचा विद्यार्थी याचा दर्जा इंग्लंडात फार मोठा समजला जातो. स्वाभाविकपणे पिअर्सन कुटुंबातील लहानथोर माणसांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना फार आदबीने वागविले. पिअर्सन कुटुंबीयांच्या अगत्यशील वागणुकीमुळे ऑक्सफर्डमधील वास्तव्यकाळात पुन्हा बि-हाड बदलण्याची त्यांना गरज वाटली नाही. त्यांची सर्वात मोठी मुलगी अलाईस हिच्याकडे पाहुण्यांची सर्व व्यवस्था पाहण्याचे काम होते. दाट परिचय झाल्यावर विठ्ठल रामजी पुढे आपणहूनच एखाद्या वेळी तळघरातील स्वयंपाकघरात मिसेस् पिअर्सनकडे खेळीमेळीने जात. तेव्हा सर्व कुटुंबाला आपला सन्मान झाल्यासारखे वाटे. अलाईसचे वय सुमारे बावीस वर्षांचे होते. तिच्या पाठीवर विली व फ्रँक असे भाऊ होते आणि त्यांच्या पाठीवर नेली, मेरी व मॅगी अशा तीन मुली होत्या. मॅगी तीन वर्षांचीच होती. विठ्ठल रामजी सर्व मुलांना घेऊन एखाद्या रविवारी फिरण्यास जात असत. नेली आणि मेरी ह्यांच्याशी त्यांची विशेष गट्टी जमली होती.
विठ्ठल रामजी शिंदे हे माणसांकडे आध्यात्मिक अंगाने पाहत असत. ही त्यांची विचारदृष्टी पुढील काळात त्यांनी केलेल्या व्यक्तींच्या आकलन-मूल्यमापनावरून दिसून येते. त्यांच्या ह्या वैशिष्ट्याचा आढळ त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनच दिसून येतो. पिअर्सन कुटुंबात राहायला आल्यानंतर चार दिवसांनंतरची गोष्ट. २० नोव्हेंबर १९०१च्या रोजनिशीत त्यांनी लिहिले आहेः (मि. जॅक्सच्या लेक्चरनंतरच्या विद्यार्थाने चालविलेल्या) “मी आजच्या उपासनेला बसलो नाही. मी घरी येऊन मिस् पिअर्सनशी बोलत बसलो. ह्या संभाषणाने मला वरील ठरावीक व्याख्यानापेक्षा अधिक ज्ञान मिळाले. इतकेच नव्हे तर माझी आध्यात्मिक उन्नती झाली.” विठ्ठल रामजींनी हे विधान का केले आहे याची स्पष्टता नोंदीच्या अखेरच्या भागात होते. “आज काही वेळ अलाईस हिच्याशी बोललो. ही किती साधी आहे. पोशाख साधा, हिचे रूप साधे, हिची बुद्धीही साधी (साधारण) तसेच मनही साधे (सरळ.). कला आणि कावेबाजी ह्यांचा हिला स्पर्शही नाही. आपल्या उणिवा छपविण्याची हिच्यात शक्ती नाही. तशीच इच्छाही नाही; इतकेच नव्हे तर आपल्या उणिवांबद्दल हिला असमाधानही वाटत नाही; हिच्यात कोणतीही नैतिक वाण दिसत नाही. म्हणून हिचा हा भोळा व मुग्ध स्वभाव हिला फारच शोभतो. गरीब स्थितीतील हे निष्कलंक अंतःकरण पाहून माझ्या आध्यात्मिक शिक्षणात बरीच भर पडली!!”६
ऑक्सफर्डमध्ये विठ्ठल रामजी रमले होते. नवे ज्ञान मिळत होते. नवा विचार कानावर पडत होता. वाचायला मुबलक पुस्तके होती. तळमळीने शिकविणारे अध्यापक होते. मनापासून चर्चा करणारे अगत्यशील मित्र होते. फिरायला जायला टेम्स नदीचा काठ होता. नौकाविहाराची सोय होती. शोनसारख्या कॉलेजबंधूची घरात सोबत होती. आतिथ्यशील प्रेमळ असे पिअर्सन कुटुंब त्यांची काळजी घ्यायला होते. ऑक्सफर्डमधील दिवस आनंदात चालले होते.
संदर्भ
१. दि इन्क्वायरर, लंडन, २० जानेवारी १९००.
२. मिनिट बुक ऑफ मार्टिनो क्लब, मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड, फेब्रुवारी १८९७ पासूनची हस्तलिखित वही, मँचेस्टर कॉलेज ग्रंथालय, ऑक्सफर्ड.
३. विठ्ठ रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ६९.
४. तत्रैव, पृ. ७५.
५. तत्रैव, पृ. ७४.
६. तत्रैव, पृ. ७४.