काठेवाडचा दौरा

विठ्ठलराव शिंदे जमखंडीवरून परत आल्यानंतर १९०४च्या एप्रिलमध्ये काठेवाडात दौरा करण्याचा योग जुळून आला. त्यांचे गुजराथेतील मित्र नानालाल कवी हे त्या सुमारास सादरा येथे सरकारी नोकरीत होते. त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत शिंदे यांच्याबरोबर काठेवाडीतील समाजाच्या प्रचारकार्यासाठी दौरा काढण्याचे ठरविले व शिंदे यांना तसे निमंत्रण दिले. स्टेशनवरून त्यांना सादरा गावापर्यंत उंटावर बसून जावे लागले. हा प्रवास काही सुखद नव्हता. साद-याहून प्रथम ते दोघे अहमदाबाद प्रार्थनासमाजात गेले. समाजाचे अध्यक्ष पंढरपूर येथील अनाथालयाचे संस्थापक लालशंकर उमियाशंकर यांची प्रथमच ओळख झाली. विठ्ठलराव शिंदे यांनी प्रार्थनासमाजात व्याख्याने दिली. सभासदांचा परिचय करून घेतला. प्रार्थनामंदिर प्रशस्त आणि सुंदर होते. नंतर अहमदाबादहून ते दोघे राजकोटला गेले व शंकर पांडुरंग पंडित यांच्याकडे उतरले. राजकोटातील राजकुमार कॉलेज व दुसरी एक श्रीमंत थाटाची शाळा त्यांनी पाहिली. राजकोटहून भावनगरला जाऊन शिंदे यांनी तेथील कॉलेजात व्याख्यान दिले. जुनागड येथे दिवाण बेचरदास यांच्याकडे ते उतरले. व्याख्याने, भेटी इत्यादी कार्यक्रमानंतर गिरनार पर्वतावर चार दिवस मुक्काम करण्याचे ठरविले. दिवाणांच्या ओळखीमुळे त्यांची तेथे राहण्याची उत्तम व्यवस्था झाली.

गिरनार पर्वत जवळ जवळ ४००० फूट उंच आहे. पायथ्याशी सम्राट अशोकाचा प्रसिद्ध शिलालेख आहे. गिरनारच्या पश्चिमेस गीर नावाचे सिंहासाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. प्राणिसंग्रहालयात त्यांनी दहा-बारा सिंह पाहिले. शिखरावर कित्येक प्राचीन, सुंदर जैनमंदिरे आहेत. तेथून आसमंतातला देखावा आत्म्याला जागृत करणारा आहे असे शिंदे यांना वाटले. ह्या पर्वतावर मोठमोठ्या खोल गुहा आहेत. नानालाल व शिंदे एका गुहेत प्रवेश करून बरेच लांबवर गेल्यावर त्यांना विलक्षण दृश्य दिसले. शिंदे यांनी त्याचे मोठे वेधक वर्णन केले आहे. “गाभा-यात कितीतरी निःसंग आणि विरक्त साधू राहत असलेले आम्ही पाहिले. पेटलेल्या धुनीचा प्रकाश अंधारात रौद्र रसाची प्रेरणा करीत होता. साधूंच्या मुद्रा गंभीर आणि प्रसन्न. शरीरे धष्टपुष्ट आणि तेजःपुंज. बहुतेक नग्न आणि राखेने माखलेली पाहून फार आश्चर्य वाटले. ह्या निर्जन प्रदेशात ह्या साधूंची खाण्यापिण्याची सोय कशी लागते, इतर योगक्षेम कसा चालतो याचे कोडे आम्हाला पडले. साधूंना असे प्रश्न विचारल्यावर त्यांनी नुसते हासून आमची बोळवण केली. गुहेच्या आसपास ठिकठिकाणी शुद्धोदकाची कित्येक टाकी दिसली. त्यांचा उपयोग हे साधू आणि जंगलातले व्याघ्रादी वन्य पशू यांच्याशिवाय दुसरे कोण करणार! हे आळीपाळीने टाक्यावर येऊन जात असत. त्यांच्या गाठीभेटी होऊन काय प्रकार घडत असे हे कळण्याला मार्ग नव्हता.”१

गिरनार पर्वतावरील वास्तव्याचे त्यांचे चार दिवस मोठ्या समाधानाचे, एकांतवासाचे आणि धर्मचिंतनाचे गेले. जुनागडला परत आल्यानंतर त्यांची मियागावचे ठाकूर यांच्याशी भेट झाली. त्यांनी आपल्या जहागिरीच्या गावी येण्याचे शिंदे यांना मोठे अगत्यपूर्वक निमंत्रण दिले व शिंदे त्याप्रमाणे गेलेही. तेथे त्यांना एका जुन्या शाहिराची एकतारीवरची सुंदर भजने ऐकावयास मिळाली. त्यांपैकी तेजाभगत नावाच्या शाहिराची दोन-तीन पदे त्यांनी उतरून घेतली. पुढे कीर्तनात त्यांना त्यांचा चांगला उपयोग झाला. नानालाल कवींचा निरोप घेऊन शिंदे अहमदाबादहून मुंबईला परतले.

संदर्भ
१.    विठ्ठल राजमी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १६५.