एडिंबरो आणि स्कॉच सरोवरे

एडिंबरोला जाण्याच्या आधी कार्लाइल शहरी त्यांनी रेव्ह. आर्लाश यांच्याकडे तीन दिवस मुक्काम केला. रेव्ह. आर्लाश हे कार्लाइल शहरापासून दूर असलेल्या इगलवुड नावाच्या जुन्या वाड्यात राहत होते. ह्या मुक्कामात त्यांनी कार्लाइल येथील कॅथीड्रल किल्ला पाहिला. ह्या स्थळाबद्दल ऐतिहासिक माहिती मिळवली. दोन-तीन दिवसांच्या मुक्कामानंतर ३१ जुलैला दुपारी साडेतीनच्या सुमारास ते एडिंबरो येथे पोहोचले. आगबोटीवर मित्र झालेले हैदराबादचे श्री. नायडू यांनी विठ्ठल रामजींसाठी मार्चमाँट क्रेसंट नंबर ४६ येथे मिसेस् सॉमर्व्हील ह्या लॅण्डलेडीकडे बि-हाड ठरविले होते.

समुद्रकाठी टेकड्यांच्या चढउतारावर वसलेले स्कॉटलंडचे हे राजधानीचे शहर विठ्ठल रामजी शिंद्यांना सगळ्या ग्रेट ब्रिटनमध्ये सुंदर वाटले. शहराचा बांधा पाखरासारखा आटोपशीर व टुमदार वाटला. लंडन शहर मात्र त्यांना बोजड व अस्ताव्यस्त पसरलेले वाटले होते.

संध्याकाळी ते ‘ब्लॅकफर्ड हिल’ या नावाच्या शहरापासून नजीक असलेल्या, गवत आणि झुडपे यांनी झाकून टाकलेल्या उंच टेकडीवर फिरावयास गेले. उन्हाळ्याचे दिवस असूनही थंडी वाजावी अशी थंडगार हवा होती. टेकडीवरून एडिंबरोचा देखावा सौम्य, शांत व सुंदर दिसत होता. तरुण जोडप्यांची ही टेकडी मोठी आवडती दिसली. त्यांनी लिहिले आहे, “टेकडीच्या वळणांतून, खाचखळग्यांत, झुडपांखाली, गवतातूनही प्रेमाने बद्ध झालेली जोडपी सर्व जगास विसरून आपापल्यातच गर्क झाली होती. वाटेने जाताना अवचितच अनपेक्षित अशा अवघड ठिकाणी जोडपे पाहून चमत्कार वाटे. न जाणो चुकून एखाद्यावर पाय पडेल म्हणून आजूबाजूस पाहून चालावे लागले. मानवी प्रेमाचे हे स्वाभाविक प्रदर्शन पाहून ज्यास विषाद वाटेल तो खरा हतभागी, करंटा, खोट्या तत्त्वज्ञानाने बिघडलेला, खोट्या नीतीच्या कल्पनांनी कुजलेला म्हणावयाचा. मि. फर्ग्युसन, आमच्या कॉलेजचा सीनियर विद्यार्थी एकदा म्हणाला, जगात ह्या देखाव्यापेक्षा अधिक सुख मला कोणत्याही देखाव्याने होत नाही. मला त्याच्या म्हणण्याचा रस कळला!”१ प्रेम मग ते कोणत्याही नात्यातून प्रकट होणारे असो, शिंदे यांना आनंददायक वाटत असे. त्यामध्ये त्यांना एक प्रकारची आध्यात्मिकता जाणवत असणार. जीवनातील सारभूत वस्तू प्रेम ही असून “ह्या प्रेमावीण जीवन जीवनत्वास मुकते आणि मागे नुसते अस्तित्वच उरते”, असे त्यांनी महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या मृत्यूनंतर केलेल्या उपदेशसमयी तीनएक वर्षांनंतर म्हटले आहे.२

एडिंबरोमधील आठवड्याच्या मुक्कामात अनेक प्रेक्षणीय स्थळे बघितली. एडिंबरोचा किल्ला व चित्रसंग्रह बघितले. सिव्हिल सर्व्हिसकरता बेळगावहून आलेले श्री. भाटे यांची गाठ पडली.३ त्यांची राजकीय मते जहाल होती. भाटे यांच्या उत्साही स्वभावामुळे शिंदे यांचा त्यांच्याशी स्नेहभाव जुळला. नायडू व भाटे यांच्यासमवेत शिंदे यांनी आपल्या मुक्कामात बरीच प्रेक्षणीय स्थळे बघितली. भाटे यांच्याबरोबर होलीरूड राजवाडा पाहिला. प्रिन्सेस स्ट्रीटवर असलेले स्कॉटचे आकर्षक स्मारक पाहिले. एके दिवशी एडिंबरोपासून नऊ मैल दूर असलेला मैलापेक्षाही जास्त लांबीचा दणकट, लोखंडी फोर्थ ब्रिज या नावाचा पूल पाहिला. ह्या पुलावरून समुद्राचा, खाडीचा व हिरव्याशार टेकड्यांचा सुंदर देखावा पाहिला. शिंदे अशी रम्य ठिकाणे बघत होते, त्याचप्रमाणे शक्य असेल तेव्हा वेगवेगळ्या चर्चमध्ये उपासनेला जात होते.

३ ऑगस्टच्या रविवारी सकाळी ते कथबर्ट चर्चमध्ये उपासनेला गेले. संध्याकाळी फ्री सेंट चर्चमध्ये उपासनेस गेले. रेव्ह. ब्लॅक ह्या तरुण उपदेशकाचा उपदेश शिंदे यांना फार आवडला. रेव्ह. ब्लॅकच्या प्रतिपादनात दुराग्रह नव्हता. त्यांनी कर्मठ मते मांडली नाहीत. जुन्या धर्मांचे उपदेश जर अशा पद्धतीने होत राहिले तर युनिटेरियन चळवळीचा झपाट्याने प्रसारही होणार नाही व त्याची जरुरीही भासणार नाही असे त्यांच्या मनात येऊन गेले. त्यांची धर्म दृष्टी खरीखुरी उदार आणि अभिमाननिरपेक्ष बनली होती हे यावरून जाणवते.

शिंदे यांनी एडिंबरो येथील सार्वजनिक मोफत वाचनालय पाहिले व त्यामुळे ते प्रभावित झाले. एडिंबरो सेंट्रल लायब्ररीची इमारत जॉर्ज फोर्थ पुलाजवळ आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी हे सार्वजनिक वाचनालय पाहिले त्या वेळेला सुमारे ४८, ००० पुस्तके ग्रंथालयात होती. खालच्या मजल्यावर वर्तमानपत्रे व मासिके वाचण्याची सोय होती व सुमारे शंभर मजूर तेथे वाचन करीत असलेले दिसून आले. मजूर लोकांना काम मिळेनासे झाले म्हणजे ते तेथे जाऊन बसत व मासिके अथवा पुस्तके वाचीत. त्यांना इमारत भव्य, सुंदर व स्वच्छ वाटली. या मोफत वाचनालयातील उत्तम व्यवस्था पाहून व गरीब लोकांच्या वाचनाची तेथे केलेली मोफत सोय पाहून “हे खरे लोकशिक्षण” अस विचार शिंदे यांच्या मनात आला.४

आपला एडिंबरो येथील मुक्काम संपवून विठ्ठल रामजी शिंदे ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता ग्लासगो या कारखान्याच्या व मजूर वस्तीच्या शहरी गेले. वाय. एम. सी. क्लबमध्ये ते उतरले. लखनौचे अजीझ अहमद या गृहस्थांची त्यांनी भेट घेतली. अहमद यांनी एका इंग्रज बाईंशी लग्न केले होते. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, पण मते ब्राह्म होती. मुलांची नावे मात्र मुसलमान धर्मांतील हैदरी, सखिना व उस्मान अशी ठेवली होती. सर्व कुटुंबीय शिंदे यांना फार मनमिळाऊ व अगत्यशील वाटले. अहमद हे ह्या शहरात हिंदुस्थानातून जे मजूर खलाशी येत असत त्यांना साहाय्य करणे, तेथील रीतिरिवाजांची कल्पना देणे वगैरे प्रकारे उपयोगी पडत असत.

९ ऑगस्ट हा बादशहाच्या राज्यभिषेकाचा दिवस होता. त्यानिमित्त होणा-या उपासनेला ते कॅथीड्रलमध्ये गेले. त्यांना अगदी पुढची जागा मिळाली. उपदेशक पूर्वी मद्रासला बिशप होते. हिंदुस्थानसंबंधी बोलताना त्यांनी शिंदे यांचा आवर्जून उल्लेख केला. फेट्यामुळे आपल्याला नेहमीप्रमाणे मान मिळाला असे म्हणून शिंदे यांनी गमतीने लिहिले, “मी फेट्याचे आभार मानले.” राज्यभिषेकानिमित्त ग्लासगो शहरात रात्री झालेली मोठी रोषणाई व लोकांचा उत्साह शिंदे यांना पाहावयास मिळाला. दुस-या दिवशी रविवारी तेथील युनिटेरियन मंदिरामध्ये ते उपासनेला गेले. ग्रेट ब्रिटनमध्ये लंडनच्या खालोखाल लोकसंख्या असलेल्या, कारखानदारीने गजबजलेल्या काहीशा बकाल अशा शहरातील आपला तीन दिवसांचा मुक्काम आटोपता घेऊन ११ ऑगस्टच्या सकाळी विठ्ठल रामजी शिंदे लाख लोमंड ह्या सरोवराला जाण्यास निघाले.

ग्लासगोच्या एका धुरकटलेल्या बोगद्यातून शिंदे यांची आगगाडी निघाली आणि सकाळच्या प्रहरी ते क्लाईड नदीच्या खाडीत निवांत पाण्यावर पोहोचले, तेव्हा त्यांच्या मनाला केवढीतरी ‘आराणूक’ वाटली. निवांतपणासाठी आसावलेल्या शिंद्यांना इथेही गर्दी चुकली नाही. त्यांना वाटले इतका वेळ कामात गुंतलेल्यांच्या गर्दीत होतो; तर आता विश्रांती घेणा-यांच्या गर्दीत पडलो. ज्या  बोटीवर ते चढले ती बोट आधीच भरून गेली होती. डोंगराच्या खबदडातही सुखाचे प्रत्येक साधन पुरविणारी हॉटेले आहेत. प्रवासाचे दर कमी करून भपकेदार वर्णनाची गाईडबुके लिहून व जाहिराती देऊन व्यापारी लोक गि-हाइकांस घरातून बाहेर काढतात. तशात फॅशनदेवीचे नवस पुरविणे इकडे फार जरुरीचे झाले आहे. ज्या ठिकाणी हिवाळा व पावसाळा घालविला, तेथेच उन्हाळ्यातही राहणे इकडच्या संभावितपणाला शोभत नाही वगैरे गर्दी होण्याची कारणे त्यांच्या मनात आली. पण त्यांना आश्चर्य वाटले ते हे की, ह्या लोकांची विश्रांती घेण्याची त-हाही दगदगीचीच.

त्यांची आगबोट क्लाईड नदीच्या रुंद खाडीतून लॉख लाँग नावाच्या सुंदर, चिंचोळ्या सरोवरात शिरली आणि पश्चिम भागातील हायलँड नावाच्या डोंगरी प्रदेशात वर वर जाऊ लागली. प्रत्येक वळशासरशी नवेच दृश्य दिसे. आता सरोवर संपले, पुढील खडकावर आता उतरणार असे त्यांना वाटावे तोच पुन्हा पाणी आणि पर्वत, गवत, वृक्ष आणि वेली यांचे अकल्पित नवे मनोहर दृश्य दिसू लागावे. अखेरीस लॉख लाँगच्या शिरोभागी ऍरोखर नावाच्या बंदरात आगबोट रिकामी झाली. तेथील ब्रॅड्स हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला.

स्कॉच सरोवराची राणी समजले जाणारे लॉख लोमंड सरोवर त्यांच्या मुक्कामापासून दीड मैल अंतरावर होते. दुस-या बाजूस चार-पाच मैलावर सर वॉल्टर स्कॉट ह्यांच्या ‘लेडी ऑफ द लेक’ ह्या काव्यातील मुख्य स्थळ लॉख कॅट्रेन होते. सरोवराच्या शिरोभागी ट्रोसॉक नावाच्या मनोहर दरीकडे जाताना ह्या काव्यातील नायिकेचे सुंदर ठिकाण एलनस आईल हे लागते. या ठिकाणाहून नौकेतून जात असता विठ्ठल रामजी शिंदे यांचे अंतःकरण सद्गगदित झाले. त्यांच्या मनात आले, “यावतकाळ हा डोंगर, हे सरोवर व ही दरी पृथ्वीवर राहतील तावतकाळ स्कॉटच्या नावाला व त्याच्या साध्या सरळ व सोप्या भारतीला बाध येणार नाही ही साक्ष पटते. मी दरीत शिरलो तेव्हा :
“All in the Trossak’s glen was still,
Noon tide was sleeping on the Hill.”
हा कवीचा दाखला मला प्रत्यक्ष पटला ! येथून पाऊल परत घेणे जिवावर आले !”५

जमखंडीच्या शाळेत १८९० साली इंग्रजी सहावीत असताना त्यांनी मित्रासमवेत स्कॉटचे ‘लेडी ऑफ द लेक’ हे काव्य आवडीने वाचले होते. त्यामध्ये वर्णन केलेले लॉख कॅट्रेन हे सरोवर त्यांनी साक्षात बघितले. जमखंडीमधील विद्यार्थिदशेतील तो काळ त्यांच्या स्मरणात पुनरुज्जीवित झाला. अंतःकरण भावनेने भरून आले. मुक्कामी गेल्यानंतर त्या वेळचे आपले वर्गमित्र जनार्दन सखाराम करंदीकर यांना एक सुंदर, काव्यात्म पत्र लिहिले. स्कॉच सरोवर प्रांतातील ह्या मुक्कामात एक दिवस ते ३, १९२ फूट उंचीचा बेन लोमंड हा पर्वत चढून गेले. क्वचित कोठे एखादे मेंढरू दिसे. वरून खाली नजर टाकल्यावर त्यांना अप्रतिम देखावा दिसत होता. २५ मैल लांब त्रिकोणाकृती लोमंड सरोवर क्लाईड नदीला जाऊन भिडले होते. जणू भले मोठे पिंपळाचे पान कोठून तरी तुटुन ह्या विस्तीर्ण प्रदेशात पडलेले आहे अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. कमालीचा एकांत, दुपारचे बारा वाजले होते, वारा वाहत नव्हता, थंडी वाजत नव्हती, उष्मा वाटत नव्हता. बाजूला तुटलेले कडे, वरती आकाशाचा घुमट, दूर नजर टाकली तर चाळीस मैलावरचा ग्लासगो शहरातला धूर आणि धुरळा दिसत होता. खाली लोमंड सरोवरावरून एखादी आगबोट केव्हातरी दुरून तरंगत असताना लहानशा हंसीसारखी दिसे. ह्या निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा लय लागला. समाधी म्हणावी अशा प्रकारचा अपूर्व एकतानतेचा अनुभव त्यांना आला.

निसर्गरम्य अशा स्कॉच सरोवर प्रांतामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकंदर नऊ दिवस वास्तव्य केले. टार्बेट, राऊडेंना ह्या ठिकाणी गरीब कुटुंबामध्ये झोपड्यात त्यांना राहण्यास जागा मिळाली. त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश फिरण्यास सापडले, शिवाय ‘हॉटेलात राहणा-या नागरिक लोकांचा संसर्गही थोडावेळ चुकविता आला’ हा त्यांना फायदाच वाटला. ह्या गरीब कुटुंबातील लहान मुलांचा सहवास त्यांना आवडला. शिंदे यांना निरागस लहान मुले निसर्गाचा भाग वाटत असत. त्यामुळे नेहमीप्रमाणे येथील लहान मुलांचा सहवास त्यांना आनंददायक वाटला. हा सरोवर प्रांत सोडण्याच्या आधी एक दिवस लॉख लोमंड सरोवरात त्यांनी स्नान केले. थंड पाण्यात, उघड्या हवेत परदेशामध्ये केलेले हे पहिले आणि अखेरचे स्नान.

२१ ऑगस्ट १९०२ रोजी रम्य अशा सरोवर प्रांताचा निरोप घेऊन वाटेत ग्लासगोला थोडे थांबून मँचेस्टर शहरी रात्री आठ वाजता ते पोहोचले. ती रात्र एका टेंपरन्स हॉटेलमध्ये काढली. दुस-या दिवशी मिस्टर होल्ट ह्या युनिटेरियन आचार्यांची भेट झाली. ह्या सात्त्विक गृहस्थाने बोलावल्यावरून मँचेस्टरमध्ये एक आठवडा त्यांच्याकडेच मुक्काम केला. यांचा चिटाचे छाप उठविण्याचा कारखाना होता.

मँचेस्टरपासून दहा-अकरा मैल दूर असलेल्या हेल् या गावी युनिटेरियन मंदिरामध्ये शिंदे यांनी सकाळ-संध्याकाळ दोन उपासना चालविल्या. मँचेस्टर येथील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणून ओवेन्स कॉलेज, रायलंड लायब्ररी आणि टेक्निकल स्कूल ही ठिकाणे पाहिली. कॉन्स्टन्स आणि एथेल ह्या होल्ट यांच्या दोन मुलींनी ही ठिकाणे त्यांना दाखविली. मँचेस्टर विलर्ट स्ट्रीट डोमेस्टिक मिशनचे युनिटेरियन मिशनरी रेव्ह. बिशप यांच्याबरोबर गलिच्छ वस्तीतील अत्यंत दरिद्री अशा आठ-दहा घरी ते गेले. कंगाल घरातदेखील भिंतीवर थोडीफार चित्र लावलेली असतात हे शिंदे यांच्या नजरेतून सुटत नसे. मात्र एकंदरीत यांची स्थिती त्यांना फार कंगाल दिसली. मिशनमध्ये शिंदे यांनी थोडा वेळ भाषण केले.

शिंदे यांना प्राथमिक शाळा, लहान मुलांच्या शाळा पाहण्याचा उत्साह होता. मँचेस्टर येथील किंडरगार्डन धर्तीची शाळा पाहण्यासाठी ते आवर्जून गेले. शाळेतील तरुण शिक्षिका त्यांना फार हुशार व उत्साही वाटल्या. शाळेत सुमारे ५०० मुले होती. त्यांना प्रत्यक्ष बाहुल्या दाखवून मातीची चित्रे करण्यास लावून, फुले व झाडे ह्यांची रंगीत चित्रे काढण्यास लावून शिकविण्याची पद्धती त्यांना फार आकर्षक वाटली. मँचेस्टरपासून पाच मैलांवर असेली एक दगडी खाण त्यांनी पाहिली. ही खाण जमिनीखाली ४४४ यार्ड खोल होती. आतमध्ये माणसे, घोडी, गाड्या काम करीत होती. हवा व प्रकाशाची सोय चांगली असल्याचे दिसून आले. मँचेस्टरसारख्या उद्योगी शहरात पृथ्वीच्या पोटातही कोणत्या प्रकारचा उद्योग चालतो हे शिंदे यांनी पाहून घेतले. या दगडी कोळशाच्या खाणीचे यथातथ्य व चटकदार वर्णन करणारा मुलांसाठी एक लेख लिहून त्यांनी तो सुबोधपत्रिकेला पाठविला.६

मँचेस्टरहून ते २८ ऑगस्टला लिव्हरपूल येथे आले. लिव्हरपूल डोमेस्टिक मिशनचे काम त्यांना पाहावयाचे होते. सगळ्या प्रवासामध्ये शिंदे यांनी डोमेस्टिक मिशनचे कंगाल वस्तीमध्ये चालणारे काम पाहणे हा एक उद्देश बाळगलेला दिसतो. रेव्ह. लॉईड जोन्स यांच्या घरी ते पाच दिवस राहिले. रविवारी संध्याकाळी डोमेस्टिक मिशनमध्ये उपासना चालविली. कंगाल वस्तीचे निरीक्षण केले व मिस्टर कॉक ह्या आपल्या मित्राकडे काही दिवस घालविण्यासाठी ते कॉर्नवॉल येथे गेले.

२७ सप्टेंबरच्या रविवारी क्रूकर्न येथील मंदिरात ‘हार्वेस्ट फेस्टिवल’ संबंधी सकाळी व संध्याकाळी वार्षिक उपासना चालविल्या. हा उत्सव शेतातील मळण घरी आणल्यावर ईश्वराचे आभार मानण्याप्रीत्यर्थ साजरा केला जात असतो. मंदिर फुले, फळे, रोपे इत्यादींनी अत्यंत कुशलतेने सजविले होते. लोकांमध्ये आदर, उत्साह व कळकळ दिसून आली. सकाळ व संध्याकाळच्या दोन्ही उपासनांना मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती. मिस्टर कॉक यांच्यासमवेत त्यांनी बॉस कॅसल येथील सुंदर समुद्रकिनारा पाहिला. टेनिसनने ‘एडिल्स ऑफ किंग’ ह्या काव्यात वर्णन केलेला समुद्रातील ऑर्थरचा किल्ला पाहिला. टर्नब्रिज वेल्स येथे मिस्टर जॉय यांच्याकडे चार दिवस मुक्काम करून ते ऑक्सफर्डला परतले. २ नोव्हेंबरला फ्रि चर्चमध्ये उपासना चालविण्यासाठी ते गेले. ब्राह्म समाजासंबंधी त्या वेळी शिंदे यांनी व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर एखा बाईने कलकत्ता येथील ब्राह्मो मुलींच्या शाळेच्या इमारत फंडासाठी एक पौंड दिला. ही रक्कम त्यांनी मिस्टर प्रिचर्डमार्फत कलकत्त्यास रवाना केली.

१९०२च्या ऑक्टोबरमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांची दुस-या वर्षाची पहिली टर्म सुरू झाली. फार्ले, इव्हर्ट, लॉकेट हे तिस-या वर्षांचे आणि बार्न्स, डॉट्रे, हँकीनसन, जोन्स आणि मिस् जी. व्हॉन पेटझोल्ड हे दुस-या वर्षाचे विद्यार्थी ह्या वर्षीही त्यांचे सहाध्यायी होते. जपानमधील झेड. टोयोसाकी हे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याप्रमाणेच  ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून आलेले खास विद्यार्थी या वर्षीही त्यांचे सहाध्यायी होते. मिस्टर जे. पार्क डेव्हिस, ऑर्थर गोलॅड, आलबर्ट थॉर्नहिल आणि सी. एम्. राइट हे ह्या पहिल्या वर्षी प्रवेश घेतलेले विद्यार्थी नव्याने सहाध्यायी झालेले होते.७ शिंदे, टोयोसाकी हे बाहेरून आलेले विद्यार्थी इथल्या वातावरणाला रुळले होते. वर्षभराच्या सहवासाने सगळ्या विद्यार्थ्यांत चांगला मित्रभाव निर्माण झाला होता. शिंदे यांचा वर्गातला अभ्यास व बाहेरचे अवांतर वाचन उत्साहाने चालले होते. उपासनेमध्ये द्यावयाची व्याख्याने ते लिहून काढीत असत. ते हिंदुस्थानातून आलेले विद्यार्थी असल्यामुळे हिंतुस्थातील ब्राह्म धर्म या सुधारणावादी, उदारधर्म पंथाबद्दल त्यांच्याकडून ऐकायला मिळावे ही श्रोत्यांची अपेक्षा असे व ती ते पूर्ण करीत होते असे दिसते. कधी कधी ‘लौकिक व धार्मि जीवन’ सारख्या (वर्ल्डलीनेस अँड गॉडलिनेस) विषयांवर ते व्याख्यान देत असत. गेल्या सहा महिन्यांच्या अवधीत उपासना चालविण्याची त्यांना कितीतरी निमंत्रणे आली होती व ते ह्या उपासना आत्मविश्वाने चालवीत असत. त्यांच्या उपासना प्रभावी होत असत. त्यांचे धर्मचिंतन चालू होते. कधी सहाध्यायासमवेत तर कधी एकटे ते ध्यान करीत असत. मनाच्या वृत्तीनुसार घरात एकतारीवर भजन करीत असत. किंवा निसर्गात रम्य स्थळी एकांतामध्ये भक्तिपर पदे गात असत. त्यांचे धर्मशिक्षण आणि धर्मसाधन गंभीरपणे आणि मनासारखे चालले होते. त्यांच्या मनाला समाधान होते.

मँचेस्टर कॉलेजातील विद्यार्थी प्रौढ वयाचे, पदवीधर होऊनच येथे आलेले व पुढे धर्मोपदेशकाचे काम करणारे असे होते. मात्र ते नेहमीच गंभीरपणाने वागत असत असे मात्र नव्हे. ते बहुतेक खेळकर वृत्तीने वागत. तर कधी कधी लहान मुलांप्रमाणे व्रात्यपणा करीत. दंगा करीत.

जपानमधून आलेले टोयोसाकी हे उंचीने ठेंगू आणि वृत्तीने गमती होते. इतर विद्यार्थीही त्यांची चेष्टा करीत. ते कॉलेजच्या वसतिगृहातच राहत होते. एकदा अशी टूम निघाली की, सर्वांची उंची मोजावी. टोयोसाकील एका भिंतीजवळ उभा केले. त्याच्या उंचीची रेघ मारण्याच्या मिषाने हात वर करून वर आलेली पाण्याची तोटी खुली केली. टोयो दचकून निसटला व सर्वत्र हशा पिकला. दर रविवारी टोयो लाँग कोट, टॉप हॅट असा फार सभ्यतेचा पोशाख करून शहरातील मुख्य मुख्य रस्त्याने हिंडून येई. एकदा त्याच्या सोबत्यांनी त्याच्या पाठीवर कोटाल ‘चेस मी गर्ल्स’ असे जाड अक्षरात लिहिलेली कागदाची चिठ्ठी लावली. नेहमीप्रमाणे ऑक्सफर्डमधील प्रमुख शहराची फेरी मारून स्वारी परत आली तरी त्याला ह्या गोष्टीचा पत्ताच नव्हता, हे पाहून मोठाच हशा पिकला.

कॉलेजच्या इमारतीत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कॉमन रूममध्ये सिगरेटी फुंकणे, खिदळणे हे विद्यार्थ्यांचे प्रकार मनसोक्त चालत. विठ्ठल शिंदे हे इतरांसारखे खिदळत नसल्याने त्यांना ‘मीक इंडियन’ म्हणजे ‘मलूल हिंदी’ असे म्हणत असत. त्यांचा निरुपद्रवीपणा हाच बाकीच्यांना जणून उपद्रव देत होता. म्हणून त्यांची चेष्टा करण्यासाठी एकदा त्यांना गोल मेजावर निजवून काहींनी घाण्यासारखे गोल फिरवले. एकदा तर वर्गात प्रोफेसर ड्रमंड यांचे व्याख्यान चालून असता इव्हर्ट ह्या स्कॉच विद्यार्थ्याने भलताच खोडकरपणा केला. शिंदे फेटा बांधून त्याचा शेमला सोडून वर्गात गेले होते. इव्हर्टने त्यांच्य मागे बसून शेमल्याचे टोक हळूहळू खेचायला सुरुवात केली. शेवटी त्यांच्या डोक्याला फेट्याचा फक्त एक विळखा राहिला. सगळा वर्ग तर हसू लागलाच पण, प्रिन्सिपॉल ड्रमंड यांनाही तिकडे न पाहिलेसे करून व्याख्यान चालविणे जड जाऊ लागले.

सिगरेट न ओढणारे विद्यार्थी फक्त शिंदे. त्यांची बसावयाची खोली स्वच्छ व टापटिपीची असे. हा अपराध कॉलेजबंधूंच्या दृष्टीने असह्य होता. एकदा त्यांच्याकडे चार-पाच वर्गबंधू चहासाठी न बोलावता आले. बरोबर सगळ्यांनी सिगारेटचे डबे आणले होते व प्रत्येकजण धुराचे लोळच्या लोळ सोडू लागला. लँडलेडी जेव्हा चहा द्यायला खोलीकडे आली तेव्हा आग लागली की काय या भयाने तिने किंकाळीच फोडली.
गंभीरपणे धर्मशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या स्वभावाची ही दुसरी बाजू होती!

आतापर्यंतची प्रत्येक सुटी नवीन प्रदेश, नवी ठिकाणे, वेगवेगळी शहरे पाहण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे खर्च करीत आले होते. इंग्लंड, स्कॉटलंडमधील बहुतेक रम्य प्रदेश व प्रेक्षणीय स्थळे त्यांनी बघून घेतली होती. म्हणून १९०२च्या डिसेंबरमधील नाताळची सुटी ऑक्सफर्डमध्येच लेखन-वाचनात घालवायची असे त्यांनी ठरविले.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ११८-११९. आठवड्यानंतर शिंदे पुन्हा एकदा ब्लॅकफर्ड हिलवर फिरावयाला गेले असता तेथे एक पोलीस त्यांना आढळला. सार्वजनिक ठिकाणी घडू नये तो प्रकार घडत असल्यास त्याचा प्रतिबंध करण्याचे काम त्याजकडे होते असे चौकशीअंती त्यांना समजले. प्रस्तुत लेखक ऑक्टोबर १९८३ मध्ये तेथे गेला असता पोलिसांची ही व्यवस्था अद्याप चालू असल्याचे गस्त घालणा-या फिरत्या गाडीतील पोलीस अधिका-याने त्यांना सांगितले.
२.    विठ्ठल रामजी शिंदे, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १७३.
३.    विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. १२०. येथे उल्लेखिलेले भाटे म्हणजे प्रा. गणेश सदाशिव भाटे (१८८०-१९२७) होत. ते इंग्लंडमध्ये आय्. सी. एस्. होण्यासाठी गेले होते. त्यांना त्या परीक्षेत यश मिळाले नाही. नंतर त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची एम्. ए. ची पदवी संपादन केली. बडोदा संस्थानात मुलकी अधिकारी व त्यानंतर भारत सरकारच्या शिक्षणखात्यात प्राध्यापक म्हणून काम. मराठीत समीक्षालेखन. नृत्यविशारद रोहिणी भाटे यांचे ते वडिल. (संदर्भ-(संपा.) वसंत पाटणकर, ग. स. भाटेः एक वाङ्मयसमीक्षक, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई व प्रतीमा प्रकाशन, पुणे, १९९५.)
४.    शिंदे यांनी रोजनिशीत उल्लेखिलेले हे सार्वजनिक वाचनालय म्हणजे एडिंबरो येथील जॉर्ज फोर्थ ब्रिजजवळ असलेली एडिंबरो सेन्ट्रल लायब्ररी होय. प्रस्तुत लेखकाने हे ग्रंथालय ऑक्टोबर १९८३ मध्ये ग्रंथालयामध्ये एडिंबरोबद्दलची सर्व माहिती मिळेल. अशी एक एडिंबरो रूम असून प्रस्तुत लायब्ररीची सर्वांगीण माहिती देणारा प्रबंधही तेथे उपलब्ध होता.
५.    सुबोधप्रत्रिका, १ फेब्रुवारी १९०३.
६.    तत्रैव, १८ जानेवारी १९०३.
७.    मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड, अन्युअल रिपोर्टस्, १९०४-१९१८.