महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे समग्र जीवन व कार्य बघितल्यानंतर आपल्या मनावर ठसा उमटतो तो एका धर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, त्यागशील, द्रष्ट्या अशा संपन्न व्यक्तिमत्त्वाचा. त्यांच्या उन्नत आध्यात्मिक मनोवृत्तीचा. विचार, उक्ती व कृती यांमध्ये आयुष्यभर स्वाभाविकपणे सुसंगती राखणा-या सच्च्या व्यक्तिमत्त्वाचा. विविध प्रकारच्या कार्यसिद्धीमध्ये त्यांनी कल्पक सर्जनशीलता दाखविली व अपूर्व कार्यक्षमता प्रकट केली. त्यांच्या ठायी तरल संवेदनशीलता होती आणि मनमोकळी प्रगल्भ सौंदर्यग्राही मनोवृत्ती.
महर्षी शिंदे यांचा समकालीन सुधारकाहून असणारा वेगळेपणा व त्यांची वैशिष्ट्यपूर्णता हीही आपल्या मनावर ठसल्यावाचून राहत नाही. ते कर्ते सुधारक होते. त्यांच्या सर्व कार्याला धर्मभावनेचे अधिष्ठान होते. त्यांचा विचार त्यांची कार्य शहरी लोकांपुरते सीमित नव्हते, तर खेडेगावातील लोकांच्याही सर्वांगीण उन्नतीचा विचार ते सदैव करीत; त्यानुसार कार्य करीत. त्यांचा दृष्टीकोण व्यापक होता. त्यात कुठेही एकांगीपणा, एकदेशीयता नव्हती. एकात्मता पाहण्याची त्यांची दृष्टी होती व एकात्मता निर्माण करण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांच्या ठायी अपवादात्मक तत्त्वनिष्ठा होती. लोकांच्या अनुनयासाठी त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली नाही, कधी तडजोड केली नाही. त्यांच्या लेखनाला अधिष्ठान होते तेही आध्यात्मिकतेचे.
महर्षी शिंदे हे कृतिवीर होते. केवळ अमुक सुधारणा करणे योग्य आहे असे सांगत राहून जुन्या मताच्या बहुसंख्य लोकांची समजूत बदलण्याची वाट पाहत राहणे त्यांच्या मनःप्रवृत्तीला मानवण्याजोगे नव्हते. आपल्याला मान्य असेल ती सुधारणा करण्यासाठी झटावे व सुधारणेचा काळ अलीकडे खेचून आणावा असे त्यांना तीव्रपणे वाटत असे आणि आपल्या वाटण्यानुसार तात्काळ कृतीला प्रारंभ करावा अशी त्यांची उत्कट मनःप्रवृत्ती होती. सुधारणेची कृती करण्यामुळे केवळ अप्रियताच नव्हे तर काहींचा रोष वाट्याला आला तरी तो सहन करण्याची त्यांच्या मनाची तयारी असे.
महर्षी शिंदे यांच्या कृतिनिष्ठतेचे उज्ज्वल उदाहरण म्हणजे त्यांनी केलेले अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचे व अस्पृश्यतानिवारणाचे कार्य. त्यांचे हे कार्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे अखिल भारतीय पातळीवरील कार्य होय. या कामाता त्यांचा द्रष्टेपणा दिसतो, तसाच कर्तेपणाही दिसून येतो. त्यांनी केलेला अस्पृश्यतानिवारणाचा प्रयत्न हा न्यायाच्या, मानवतेच्या आणि विवेकाच्या पायावर भारतीय समाजाची पुनर्घटना करण्याचा अभूतपुर्व प्रयत्न होता. आपण पाहिले आहेच, की एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला महात्मा फुल्यांचा अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचा युगप्रवर्तक प्रयत्न पांढरपेशावर्गाची साथ न मिळाल्यामुळे खंडित झाला होता. विसावे शतक उजाडले तेव्हा भारतीय समाजजीवनात अस्पृश्यतेची म्हणून एक कलंकभूत रूढी आहे याची कुणालाही जाणीव नव्हती, एवढी अस्पृश्यता समाजजीवनातील स्वाभाविक बाब म्हणून अंगवळणी पडलेली होती. सर्व भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गाची कशी दयनीय, दारुण अवस्था आहे हे शिंदे यांनी भारतभर हिंडून पाहिलेले होते, अनुभवलेले होते. १९०१ सालच्या खानेसुमारीच्या अहवालाचा अभ्यास करून अस्पृश्य मानला जाणारा वर्ग एकंदर भारतीयांच्या सातव्या हिश्श्याने आहे, हे त्यांनी दाखवून दिले. अस्पृश्यता हा एक प्रकारचा बहिष्कार असून अस्पृश्यवर्गाचे वर्णन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ या संज्ञेने केले. आपल्यापैकीच असणा-या काहीजणांना अस्पृश्य मानणे हे देशभर चाललेले सैतानी दुष्कर्म (नॅशनल इव्हल) आणि सगळ्या देशाचे पाप (नॅशनल सिन) आहे याची जाणीव त्यांनी १९०५-१९०६ साली आपल्या लेखांच्या व भाषणांच्याद्वरा करून दिली. समाजातील एवढ्या मोठ्या वर्गाला उच्च दर्जाची कामे करून न देणे ही बाब आर्थिकदृष्ट्याही मोठी हानिकारक आहे हेही त्यांनी जाणवून दिले.
विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभरात जी कार्ये केली, त्या प्रत्यक्ष कार्याचे महत्त्व तर असाधारण आहेच; त्याशिवाय या कार्याच्या पाठीमागे असणारी त्यांची वैचारिक भूमिका हीही मौलिक स्वरूपाची असे व लोकांची मानसिकता घडविण्याच्या दृष्टीने तिचेही महत्त्व फार मोठे होते. अस्पृश्यवर्गासंबंधी करावयाच्या कामाचे त्यांचे आकलन दुहेरी होते. एक, शतकानुशतके अस्पृश्यता लादल्यामुळे निर्माण झालेला ह्या वर्गाचा निकृष्टपणा नाहीसा करण्यासाठी त्यांना शिक्षण देणे, नोकरी-उद्योगाला लायक बनविणे, त्यांचा आत्माभिमान जागृत करणे, स्वतःची स्थिती सुधारण्यासंबंधी तळमळ निर्माण करणे हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला. तर स्पृश्य लोकांच्या मनात काही जातीत जन्मलेल्यांना अस्पृश्य मानण्याची जी भ्रामक कल्पना असे ती दूर करणे, म्हणजेच सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नाहीशी करणे हा त्यांनी आपल्या कामाचा दुसरा भाग मानला. अस्पृश्यवर्गाची उन्नती ध्यानात घेऊन आपल्या सामाजिक परंपरेला अपरिचित असणारी मिशनची कल्पना त्यांनी अवलंबिली. एखाद्या कामाला सर्वस्वी वाहून घेऊन समर्पणाच्या भावनेने संस्थेच्याद्वारा काम करणे ही मिशनची कल्पना होय. १९०६ साली त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली व पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांमध्ये मिशनच्या शाखा स्थापन करून शाळा व उद्योगशाळा चालवून अस्पृश्यवर्गाची उन्नती करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक पातळीवर अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी व्याख्याने, परिषदा यांचे आयोजन केले. ‘प्यरिटी सर्व्हंट’ सारखे मुखपत्र व आईवडिलांच्या निराशेला कारणीभूत होऊ नये यासाठी हाताला व डोक्याला उद्योगाचे वळण मिळावे यासाठी उद्योगशाळा चालविण्याबाबत त्यांचा कटाक्ष होता.
अस्पृश्यांसंबंधीचे कार्य असो, की धर्मविषयक अथवा शेतक-यांसंबंधीचे काम असो, शिंदे यांच्या असाधारण संघटनाकौशल्याचा प्रत्ययही ह्या विविध कामांत दिसून येतो. अस्पृश्यता समूळ नाहीशी करण्याची गरज सगळ्या राष्ट्राला जाणवून द्यावी ह्यासाठी त्यांनी १९०६ पासून राष्ट्रसभेच्या वार्षिक अधिवेशनाला जोडून अस्पृश्यतानिवारक परिषदा आयोजित केल्या. त्यासाठी सत्येंद्रनाथ टागोर, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, सयाजीराव गायकवाड, म. गांधी यांच्यासारखे अध्यक्ष मिळविले. महाराष्ट्राच्या पातळीवर १९१२ साली पुण्यात मिशनची महाराष्ट्र परिषद आयोजित केली. १९१८ साली मुंबईस सयाजीराव गायकवाडांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी भरवलेली अस्पृश्यतानिवारक परिषद देशाच्या पातळीवर महत्त्वपूर्ण ठरली. आपण व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही अशा प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर देशातील तीनशे पुढा-यांच्या सह्या त्यांनी मिळविल्या. अस्पृश्यतानिवारण कार्याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना व गृहिणींना व्हावी यासाठी त्यांनी रुपी फंड, तांदूळ फंड अशा प्रकारचे उपक्रम सुरू केले. देशातील समाजाच्या सर्व स्तरांमधून सहकार्य मिळविले. हिंदुस्थानातील मान्यवर संस्थानिक, गर्व्हनर, कलेक्टर यांसारखे मुलकी इंग्रज अधिकारी, जहाल-मवाळ राजकीय पुढारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारे सवर्णातील त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गातील पुढारी इत्यादिकांचे सहकार्य मिळविणे यात महर्षी शिंदे यांचे अपूर्व संघटनकौशल्य दिसून येते. पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानात केलेल्या प्रचारदौ-यात ते विविध शहरांतील शाळा-कॉलेजमधील तरुण विद्यार्थ्यांसमोर व्याख्याने देऊन त्यांच्यामध्ये या प्रश्नाबद्दल जागृती करीत असत. फर्ग्युसन महाविद्यालयातील त्यांचे शिक्षकही त्यांच्या कामात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे तेथील विद्यार्थीवर्गाला अस्पृश्यतानिवारण कार्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सभा घेऊन ह्या कामात भाग घेण्यासाठी शिंदे त्यांना प्रवृत्त करीत होते. अस्पृश्यतानिवारणासंबंधी अशा प्रकारच्या झटून केलेल्या प्रयत्नामुळे काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना १९१७ साली यश मिळाले.
मिशनच्या स्थापनेनंतर अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी देशभर जागृती करण्यात, ह्या प्रश्नाच्या बाबतीत व्यापक सहानुभूती मिळविण्यात विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना फार मोठ्या प्रमाणात यश आले. ना. गोखले ह्यांनी शिंदे यांच्या आणि मिशनच्या ह्या कामाचा निर्देश करून त्यांच्या ह्या कामामुळे समाजाच्या विवेकबुद्धीस खरोखरीच चालना मिळाली अशा प्रकारचे विधान जाहीर सभेत केले. अस्पृश्यतानिवारणाचे काम हे शिंदे ह्यांचे काम होय, अशा प्रकारचे समीकरण लो. टिळकांच्याही बोलण्यातून प्रकट झाले. ठक्करबाप्पांनी शिंदे ह्यांच्या कामाचे वर्णन करताना पंजाब व उत्तर प्रदेश सोडला तर सर्व भारतात या प्रकारच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होत असे म्हटले आहे.
अस्पृश्यतेच्या प्रश्नाबद्दल जागृती करून समाजमन मोठ्या प्रमाणात अनुकूल करण्याचे काम शिंदे करू शकले याचे कारण त्यांच्या मनाला अस्पृश्यतेचा प्रश्न झोंबलेला होता. ह्या वर्गाबद्दल त्यांच्यामनात अपरंपार कळकळ होती, प्रेम होते. म्हणून त्यांच्या उन्नतीसाठी व अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी अमुक अमुक करावे असे त्यांना स्फुरले असणार.
समाजपरिवर्तन घडवून सामाजिक पुनर्घटना करण्याच्या बाबतीत आपण जेव्हा अस्पृश्यतानिवारणाचा अथवा जातीयता नष्ट करण्याच्या प्रश्नाचा विचार करतो तेव्हा परिपूर्ण आकलनासाठी समग्रतेचे भान ठेवावे लागते. आणि ही समग्रता महात्मा फुले, महर्षी शिंदे, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वाढत्या व्यापकतेच्या क्रमाचे ऐतिहासिक टप्पे विचारात घेतले तर यथार्थपणे ध्यानात येऊ शकते. अस्पृश्यतानिवारणाच्या कामाला अग्रक्रम देऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय समाजक्रांतीचे आणि सामाजिक पुनर्घटनेचे काम पूर्ण होऊ शकणार नाही याचे सा-या राष्ट्राला भान शिंदे यांनी प्रथमतः आणून दिले.
महर्षी शिंदे यांनी १९२६ साली ब्राह्मणेतर पक्षाच्या मानपत्राला उत्तर देताना सांगितले, की आयुष्यात आपण कोणत्याही एका जातीसाठी काम केलेले नाही. त्याला अपवाद फक्त अस्पृश्य जातीचा आहे, व त्याचे कारण अस्पृश्यतेच्या प्रश्नाची प्रचंड व्याप्ती आणि तो सोडविण्याची निकड. त्यांनी म्हटले, “मला आणखी शंभर जन्म मिळाले तरी नरबळी घेणा-या अस्पृश्यतेच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही.” पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, “अस्पृश्यतानिवारण करणे हा माझा कायमचा ध्यास राहिला आहे. अस्पृश्यतेचे निवारण अद्यापि झाले नाही याची मला अन्य कोणापेक्षाही तीव्र अशी जाणीव आहे. ह्या वास्तवापेक्षा माझी श्रद्धा माझ्या कानात गुणगुणत आहे, की अस्पृश्यता निश्चित नष्ट होणार आणि केवळ ह्या श्रद्धेवरच माझ्या मनाची शांती टिकून आहे.”
शिंदे यांच्या जीवनातील दैवदुर्विलास असा, की ज्या अस्पृश्यवर्गासाठी अशा प्रकारची कळकळ अंतःकरणात बाळगून सर्वस्व होमून त्यांनी अपरंपार कष्ट केले त्या वर्गाचीच नाराजी त्यांच्यावर ओढवली. स्वकीयांनी केलेली उपेक्षा आणि अस्पृश्यवर्गाने केलेली अवहेलना पचवून शिंदे हे अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचा आणि अस्पृश्यता समूळ नाहीशी करण्याचा ध्यास आयुष्यभर कसा घेऊ शकले? याचे उत्तर म्हणजे त्यांच्या ठायी असलेली नितांत धर्मनिष्ठा. अस्पृश्यतानिवारणाचे कार्य त्यांनी एक फुटकळ सामाजिक सुधारणा म्हणून निवडलेले नव्हते, तर ते धर्मकार्य म्हणून आंतरिक प्रेरणेच्या ऊर्मीमुळे पत्करलेले होते. त्यांनी ज्या ब्राह्मधर्माची अंतःकरणपूर्वक दीक्षा घेतली होती, त्याचे एक तत्त्व असे होते-सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्परांशी बंधुभावाने वागावे. खरे म्हणजे केवळ अस्पृश्यवर्गाची सुधारणाच नव्हे तर सुधारणेची इतर कामेही त्यांनी धर्मभावनेने केल्याचे जाणवते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि अन्य सुधारक यांच्यामध्ये कर्तेपणावरून जसा फरक पडतो त्याचप्रमाणे धर्मद्धेबाबत त्यांच्यामध्ये असलेला भेद जाणवतो. आपल्याकडे सामाजिक सुधारणेच्या म्हणविल्या जाणा-या कार्याची उभारणी बुद्धिवाद, उपयुक्ततावाद असा तत्त्वावर केली जाते; धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्याची अगदी तयारी नसते. शिंदे यांनी जे प्रचंड काम केले ते पाहताही ही गोष्ट आपल्या मनाला पटू शकते.
प्रत्यक्ष जीवनातील सामाजिक सुधारणेच्या ऐहिक कार्याला विठ्ठल रामजी शिंदे यांनी धार्मिक पायाचाच आधार दिला होता. त्यांच्या सर्व कार्याला आधारभूत असणारी त्यांची धर्मकल्पना ही रूढ धर्मकल्पनेपासून वेगळी होती हेही आपण लक्षात घ्यावयास पाहिजे.
विठ्ठल रामजी शिंदे यांचे आयुष्य अनेक नाट्यात्म घटनांनी भरलेले आहे. त्यांपैकी त्यांच्या जीवनीतील पहिली प्रमुख घटना म्हणजे आपले आयुष्य उदार धर्मकार्याला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी अंतःप्रेरणेने घेतला व लगेच तो गुरुवर्य डॉ. भांडारकरांना सांगितला. आचारविचाराच्या दृष्टीने सामान्यतः परंपरानिष्ठ मानल्या गेलेल्या मराठा समाजातील एका पदवीधर तरुणाने शंभर वर्षांमागे अशा प्रकारचा निर्णय घेऊन तो अमलात आणणे ही अपूर्व गोष्ट होती. घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना व ते निवारण्यासाठी आणि सुखाचे जीवन जगण्यासाठी मोठ्या पागाराची संस्थानामधील नोकरी मिळण्याची शक्यता दृष्टीच्या टप्प्यात असता विठ्ठल रामजींनी अशा प्रकारचा निर्णय घेतला. एकांतात तपश्चर्या करून व्यक्तिगत पातळीवर पारमार्थिक श्रेयस मिळविण्याचा त्यांचा हेतू नव्हता तर उन्नत धर्माचा प्रचार करून सर्वसामान्य माणसाचे जीवन सर्व अंगांनी उंचावण्याची कळकळ त्यांच्या ठिकाणी होती. हा निर्णय त्यांनी अंधश्रद्धेच्या अधीन होऊन घेतलेला नव्हता. तर मोठ्या विवेकशीलतेने विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता.
विठ्ठल रामजींनी हा निर्णय आत्यंतिक धर्मनिष्ठेने घेतला होता हे तर उघडच आहे. घरातील वारकरी संप्रदायाच्या उदार संस्कारामुळे त्यांची धर्मनिष्ठा प्रबळ झालेली होती आणि प्रार्थनासमाजाच्या द्वारा त्यांना उन्नत एकेश्वरी मताचा परिचय झालेला होता. धर्म ही बाब सगळ्या माणसांच्या जीवनावर सत्ता गाजविणारी आहे हे वास्तव त्यांना दिसत होते. मात्र हा खराखुरा उन्नत धर्म नसून धर्माचे ते भ्रष्ट स्वरूप होते. त्यातून निर्माण झालेल्या रूढी होत्या, अंधश्रद्धा होत्या व त्यातून सर्वसामान्य माणसाचे जीवन हीन दशेला पोहचलेले त्यांनी पाहिलेले होते. अस्पृश्यता पाळणे, मुरळी सोडणे, देवतांना बळी देणे, भोंदू बुवांच्या मागे लागणे अशा अत्यंत अनिष्ट स्वरूपाच्या रूढी धर्माच्या नावाखाली प्रचलित होत्या. त्यामुळे माणसांच्या स्वाभाविक सत्प्रवृत्तीवरही पटल येऊन ही माणसे अवनत अवस्थेतील जीवन जगत होती. शिंदे यांनी वारकरी धर्माचे उज्ज्वल स्वरूप जाणले होते. ब्राह्मसमाज आणि प्रार्थनासमाज ह्या विवेकशील धर्माची तत्त्वे त्यांच्या मनाला भावली होती. पाश्चात्त्य जगात ख्रिश्चन धर्मातून विकसित झालेल्या युनेटिरिअन ह्या उन्नत धर्ममताचाही त्यांना उत्तम परिचय झाला होता. युनेटिरिअन अथवा एकेश्वरी धर्ममत हे सुधारलेल्या जगाचे ‘अंतर्याम’ (कॉन्शन्स) होय, अशी त्यांची खात्री पटलेली होती. त्यांनी पत्करलेला धर्म हा बुद्धीला अविरोधी असणारा विवेकशील धर्म होता. तेव्हा रूढीलाच धर्म समजून वागणा-या लोकांना या उन्नत धर्माकडे वळविणे म्हणजे त्यांची भ्रांत धर्मकल्पना, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यांच्यापासून सोडवणूक करून त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावणे अशी त्यांची खात्री पटलेली होती. त्यांच्या मते धर्मसुधारणा ही सुधारणेची एक स्वतंत्र बाब नव्हती, तर जीवनाच्या सर्वच अंगांची सुधारणा करणे होते. महर्षी शिंदे यांची धर्मभावना जीवनव्यापी व इहनिष्ठ होती. जीवनाच्या प्रत्येक बाबीला, प्रत्येक कार्याला उन्नत धर्मभावनेचे अधिष्ठान असावे लागते अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या धर्मकल्पनेत निवृत्ती नसून प्रवृत्ती आहे. ते श्रद्धेच्या जोडीनेच निर्लोभ प्रेमाचा समावेश धर्मकल्पनेत करतात. प्रेमाचे स्वरूप सांगताना ते म्हणतात, “प्रेम म्हणजे उत्साह, उदासीनता नव्हे; प्रेम म्हणजे जीवन; जीवनाचा कंटाळा नव्हे.” समाजसेवेलाही प्रेमाचे अधिष्ठान असल्याचे ते सांगतात. त्यांच्या दृष्टीने प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजे धर्मसाधन होय. द्वा. गो. वैद्य यांच्या लेखसंग्रहाला संपादकांनी दिलेल्या संसार आणि धर्मसाधना या नावाला आक्षेप घेताना ते म्हणतात, “धर्मसाधन म्हणजे काय? पोथी वाचणे, प्रार्थना करणे, स्तब्ध बसणे, तप करणे म्हणजे धर्मसाधन काय? मुळीच नव्हे. ब्राह्मसमाज म्हणतो प्रपंचातील प्रत्येक व्यवहार जागृतपणे आणि प्रेमाने करणे म्हणजेच धर्मसाधन होय. एखादा प्रामाणिक सुतार, हुशार न्हावी विशेषतः प्रेमळ भंगीदेखील पोटभरू पुरोहितापेक्षा शतपटीने धार्मिक म्हणता येणार नाही काय? असे जर आहे तर संसार म्हणजे धर्मसाधन ठरते.”