इंटरमीजिएटचे दुसरे वर्ष

पालकरांच्या वाड्यात विठ्ठलरावांचे आणि गोविंदरावांचे बि-हाड जणू एकत्र कुटुंबपद्धतीप्रमाणे वागत होते. दोन्ही कुटुंबांचा स्वयंपाक एकत्रच होत असे. गोविंदरावांच्या पत्नी जुन्या वळणातल्या, काहीशा अबोल स्वभावाच्या व आपण भले की आपले काम भले अशा बेताने वागणा-या होत्या. त्यांचा स्वभाव विठ्ठलरावांच्या आईशी आणि जनाबाईंशी जुळणारा होता.
 
आपल्या कुटुंबातील स्त्रियांना शहर आणि शहरातील बघण्याजोगी ठिकाणे दाखवावी याचा विठ्ठलरावांना उदंड उत्साह असे. किंबहुना घरच्या स्त्रियांना शहरात आणण्याच्या पाठीमागे त्यांचा हा एक सुधारकी हेतू होता. त्यांनी घरच्या सर्वांना चतुःशृंगी, बंडगार्डन, एम्प्रेस गार्डन वगैरे स्थळे मोठ्या हौसेने दाखविली. मंडईजवळील मोठा गणपती पाहून तर विठ्ठलरावांच्या आईला फारच आश्चर्य वाटले. एवढा मोठा गणपती कसा तयार करीत असतील याची त्या कल्पनाही करू शकत नव्हत्या. मंडईचा गणपती दाखविताना विठ्ठलरावांचे वाईचे मित्र केशवराव कानिटकर बरोबर होते. भला मोठा गणपती बघितल्यावर आई  आश्चर्य करू लागल्यावर ते म्हणाले, “आई, हा गणपती म्हणजे काहीच नाही. कृष्णेच्या काठावरचा आमचा वाईचा गणपती पहाल तर रात्री झोपदेखील येणार नाही इतका भयंकर मोठा आहे.”१ मंडईतल्या गणपतीप्रमाणेच त्यांच्या आईला बंडगार्डनवरील धबधब्याची शोभा पाहूनही फार समाधान वाटले.

प्रेक्षणीय स्थळे व निसर्गरम्य ठिकाणे दाखविण्यात विठ्ठलरावांना जसा उत्साह होता त्याचप्रमाणे शहरी राहाटी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना माहिती व्हावी अशीही विठ्ठलरावांची इच्छा होती. पुण्यामध्ये त्या वेळेला नुकत्या झालेल्या रे मार्केटात विठ्ठलरावांनी आपली आई व चार-पाच वर्षांची धाकटी बहीण चंद्राबाई ह्यांना मंडई दाखविण्यास एकदा नेले. टोमॅटो, श्रावण घेवडा, सुरण, चौधारी शेंगा ह्या भाज्या पाहून आईला व जनाबाईला आश्चर्य वाटले. या भाज्या त्या प्रथमच पाहात होत्या. टोमॅटो हे नाव तर जमखंडीस असताना त्यांनी ऐकलेही नव्हते. चंद्राबाईने दुकानासमोर ठेवलेल्या भल्या मोठ्या सुरणावर आपला पाय घाशीतच विठ्ठलरावांना विचारले, “अण्णा, ही दगडासारखी काळीरकुट्ट भाजी पुण्यातले लोक कसे हो खातात?”२ बिचारे विठ्ठलराव ह्या सगळ्यांच्या प्रश्नाला शक्य तेवढी खुलासेवजा उत्तरे देत. मंडईत आलेले अस्सल पुणेकर मात्र मंडई बघणा-या ह्या खेड्यातून आलेल्या कुटुंबाकडे कुतूहलाने बघत होते.

एके दिवशी विठ्ठलरावांनी घरी पाव आणला. पाव हा पदार्थ जनाबाईने बघितला नव्हता. आपली काहीतरी चेष्टा करण्याच्या हेतूने ही कापसासारखी वस्तू खायला दिली आहे असे समजून त्यांनी तो बाजूला सारला. त्या काळात पुण्यात सायकल क्वचित दिसत असे. सर्कशीत काम करणा-याकडे बघावे त्याप्रमाणे सायकलवर बसून जाणा-याकडे आई एकटक बघायची. हा पडेलबिडेल की काय अशी धास्तीच त्यांच्या मनात असायची.

१८९५च्या इंटरमीजिएटच्या वर्षात विठ्ठलरावांच्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या. १८९५च्या अखेरीस पुण्यास अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. बंगालचे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे नावाजलेले वक्ते व देशभक्त संमेलनाचे अध्यक्ष होते. ह्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या वेळी विठ्ठलरावांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.३ राष्ट्रीय कार्याकडे असलेला त्यांचा ओढा ह्या वेळीच स्पष्टपणे दिसून आला. पुण्यातल्या सनातनी मंडळींनी सामाजिक परिषदेच्या मंडपाचे निमित्त करून ह्या अधिवेशनापूर्वी मोठाच गोंधळ घातला होता. सनातनी लोकांचा बुरसटलेला दृष्टिकोण, त्यांची हुल्लडबाजी करण्याची वृत्ती विठ्ठलरावांना पसंत पडणे शक्य नव्हते. ते समाजसुधारणेच्या बाजूचे तर आधिपासूनच होते. ह्या अधिवेशनाच्या सुमारास ते राष्ट्रीय पक्षाचे झाले व स्वयंसेवक होण्याच्या प्रत्यक्ष कृतीतून ते प्रकट झाले. हा राष्ट्रीय बाणा आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या ठिकाणी उत्कटत्वाने वास करीत रहिला.

विठ्ठलरावांच्या चरित्रावर परिणाम घडविणारी आणखी एक घटना ह्या सुमारास घडली. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनने डॉ. जे. टी. संडरलॅंड ह्या तळमळीच्या मिशनरी गृहस्थाला आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. राष्ट्रीय सभेत त्यांचे जोरदार भाषण विठ्ठलरावांना ऐकावयास मिळाले. हिंदुस्थानातील ब्राह्मसमाज किंवा महाराष्ट्रातील प्रार्थनासमाज ह्यांच्या पूर्वी युनिटेरियन ह्या पाश्चात्त्य धर्मपंथाचा परिचय त्यांना घडून आला. डॉ. संडरलॅंड यांची विठ्ठलरा्वांनी समक्ष भेट घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. विठ्ठलरावांचे नव्याने मित्र झालेले झालेले वासुदेव अनंत सुखटणकर हेही संडरलरॅंड यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्यासमवेत होते. युनिटेरियन पंथाच्या अनेक लहान लहान चोपड्या डॉ. रे. संडरलॅंड यांच्याकडून त्यांनी वाचावयास नेल्या. ह्याच वर्षी पुणे येथील प्रार्थनासमाजात एक लहानशी एकेश्वरी पंथाची परिषद भरली होती हे विठ्ठलरावांना पुढे कितीतरी वर्षांनी कळले. डॉ. संडरलॅंड यांनी आपल्या देशातील युनिटेरियन सभेला कामाचा अहवाल सादर करताना एक विशेष सूचना केली. सूचना अशी की, हिंदुस्थानातील एकेश्वरी पंथाचा, म्हणजे ब्राह्म व प्रार्थनासमाजाचा एक तरुण होतकरू विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड येथील धर्माला वाहिलेल्या कॉलेजात स्कॉलरशिप देऊन बोलावण्यात यावा. त्यांच्या ह्या सूचनेप्रमाणे कलकत्त्याहून दर दोन वर्षांनी एक असे तीन विद्यार्थी पाठविल्यानंतर ह्या कामी खुद्द विठ्ठलरावांची निवड करण्यात आली. भविष्यात असे काही घडेल याची पुसटशी कल्पनादेखील विठ्ठलरावांना त्या वेळी असणे अशक्य.

विठ्ठलराव रे. जे. टी. संडरलॅंड यांना समक्ष भेटले. त्यांच्याशी विचारविनिमय केला. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासारख्या धर्माबद्दल आस्था आणि उत्साह असणा-या भारतीय तरुणाची भेट झाल्यामुळेसुद्धा रे. संडरलॅंड यांच्या डोक्यामध्ये असा विचार आला असणे शक्य आहे की, याच्यासारख्या धर्मजिज्ञासा असणा-या भारतीय तरुणाला इंग्लंड-अमेरिकेतील धर्माचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्याची व्यवस्था केली तर धर्मकार्याच्या प्रसाराला चांगली मदत होण्यासारखी आहे. संडरलॅंड यांच्या भेटीचा विठ्ठलरावांवर प्रभाव पडला. त्याचप्रमाणे रे. संडरलॅंड यांच्या लक्षात विठ्ठल रामजी शिंदे चांगलेच राहिले होते असे दिसते. कारण ऑक्सफर्ड येथील कॉलेजात धर्मशिक्षण घेण्यासाठी निवड करणा-या अंतिम मंडळात ते एक सभासद होते.

विठ्ठलरावांची पैशाची विवंचना मात्र मिटलेली नव्हती. त्यांना पुन्हा इंटरमीजिएटच्या परीक्षेला बसावयाला लागले. पुण्यास ते व बहीण जनाक्का होती. शिवाय १८९६ मध्ये त्यांनी पत्नीलाही पुण्याला नेले व बहीणीबरोबर शाळेत घातले. पुण्यास तिघांचा खर्च तर त्यांना करावा लागायचाच परंतु जमखंडीस त्यांचे आईवडील व तीन भावंडे यांच्या खर्चाची व्यवस्था करणेही त्यांना भाग होते. विठ्ठलराव आणि जनाक्का यांचे स्कॉलरशिपचे दरमहा प्रत्येकी दहा रूपये अशी वीस रूपयांची जमा होत असे. शिकवणीच्या पाच-सात रुपयांची पडलीच तर भर पडत असे. बाकीच्या खर्चाचे कर्ज होऊ लागले. त्यामुळे खर्चाची मोठी काळजी त्यांना पडली होती. विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले आहे, “माझ्या तीन सख्ख्या बहिणी; पण प्रपंचाची काळजी ही चौथी एक जन्माची सख्खी बहीण होती.” पैशाची अडचण थोडीफार दूर व्हावी असा एक मार्ग विठ्ठलरावांना सुचला. ह्या आर्थिक ओढाताणीत असतानाच विठ्ठलराव इंटरमीजिएटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. पुढची बी. ए. ची दोन वर्षे कशी जावी हा घोर तसाच राहिला. अशा परिस्थितीत त्यांना बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराज भेट घ्यावी असा विचार आला. बडोदा येथे श्री. लक्ष्मणराव माने व श्री. खासेराव जाधव या प्रतिष्ठित मराठा गृहस्थांशी त्यांचा परिचय झाला होता. ह्या दोन सद्गृहस्थांच्या शिफारशीमुळेच महाराजांनी विठ्ठलरावांसारख्या विद्यार्थ्याची गाठ घेतली. महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रुपये स्कॉलरशिप दिली. ही रक्कम त्यांना ‘डेक्कन मराठा असोसिएशन’ द्वारेच मिळावयाची होती. ही मदत मिळते म्हणून संस्थेने आपली दहा रूपयांची मदत बंद केली. म्हणजे वस्तुतः पंधरा रुपयेच त्यांना जास्तीचे मिळू लागले. परंतु त्यांची निकडीची आर्थिक विवंचना दुर करण्याच्या दृष्टीने ही मदतसुद्धा फार उपयोगाची होती. हीस्कॉलरशिप देताना विठ्ठलरावांकडून स्टॅम्पवर एक कायदेशीर बाँड लिहू्न घेण्यात आला. त्यात शिक्षण संपल्यावर त्यांनी बडोदा संस्थानात नोकरीस राहावे, नाहीतर घेतलेल्या स्कॉलरशिपची रक्कम परत करावी असा स्पष्ट करार होता.
          
संदर्भ   
१. जनाबाई शिंदे, स्मृतिचित्रे, साप्ताहिक तरूण महाराष्ट्र, २५-३-१९४९
२. तत्रैव, १-४-१९४९
३. विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, प. १०६.