1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

पुरातन अस्पृश्यतेचे रूपनिदर्शन

प्रकरण दुसरे

बुद्धोदयकालीन अस्पृश्यता

गौतम बुद्धाचा उदय म्हणजे भारतीय इतिहासातील, किंबहुना आशियाखंडाच्या इतिहासातील एक मोठी मुहूर्तमेढ होय.  कोणत्याही ऐतिहासिक विषयाचे विवेचन करावयाचे झाल्यास ह्या मेढीपासून पुढे, म्हणजे अलीकडे ऐतिहासिक काळात, व मागे, म्हणजे पलीकडे प्रागैतिहासिक काळात, शोध करीत जावे लागते.  आणि आम्हाला अस्पृश्यतेचा छडा लावण्यासाठी ह्या दोन भिन्न दिशांनी ह्या मेढीपासून आगेमागे गेले पाहिजे.  म्हणून प्रथम प्रत्यक्ष बुद्धादयकाली, म्हणजे इ.स. पूर्वी ६०० वर्षांच्या सुमारास अस्पृश्यतेची, उपरिनिर्दिष्ट व्याख्येच्या दृष्टीने किती प्रतिष्ठा झाली होती, ते पाहू या.  ह्या काळी उत्तर भारतात चार वर्णांची आर्यांनी तर पूर्ण स्थापना केली होतीच.  ती वर्णव्यवस्था जवळजवळ जन्मसिद्ध मानली जात असे.  इतकेच नव्हे, तर ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या दोन्ही जाती डोईजड झाल्या असून त्यांच्यात परस्पर वर्चस्वासाठी तीव्र तंटा चालू होता.  स्वतः बुद्ध आणि महावीर, तसेच त्यांचे अनुयायी, क्षत्रिय वर्णाला सर्वश्रेष्ठ मानीत आणि ब्राह्मण वर्गास त्यांचे आश्रित समजत.  पुढे जी ब्राह्मणी संस्कृतीची पुराणे झाली त्यांतही राम, कृष्ण इत्यादी अवतारी पुरुष आणि जनकादी तत्त्वद्रष्टे हे क्षत्रियच होते; म्हणून क्षत्रियांविषयीची पूज्यबुद्धी ब्राह्मणांमध्येही पुढे रूढ झालेली आढळते.  तथापि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा जातिमत्सरविषयक तंटा बुद्धाच्या पूर्वीच विकोपाला गेला होता, हे पाली आणि संस्कृत वाङ्‌मयावरून उघड होते. ह्या दोन डोईजड वर्णांनी वैश्य नावाच्या सामान्य आर्य वर्गालाही तुच्छ मानिले होते; मग आर्येतर शूद्रांची काय कथा ?

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यांति परां गतिम् ।  (भगवद्‍गीता, ९.३२) ह्या भगवद्‍गीतेच्या उदार उद्‍गारावरूनच सिद्ध होते की, त्या काळी शूद्रांप्रमाणे वैश्यांचा दर्जाही ब्राह्मण-क्षत्रियांकडून कमीच मानला गेला होता.  आध्यात्मिक बाबतीत स्त्रियांचा दर्जा शूद्रांपेक्षाही कमी होता.  प्रत्यक्ष गौतम बुद्धालाही स्त्रीसमाजाविषयी म्हणण्याइतका आदर नव्हता.  अशा वेळी शूद्रत्वाचाही मान ज्यांना मिळाला नव्हता अशा अतिशूद्र वर्गाची स्थिती वरील व्याख्येप्रमाणे पूर्णपणाने बहिष्कृत होती.  मानीव चार वर्णांचा हळूहळू लोप होऊन हल्ली दृढ झालेल्या जाती-पोटजाती ह्यांची आर्थिक पायावर झपाट्याने उभारणी चालली होती.  आणि ह्या उभारणीत अतिशूद्रांना कोणत्याही वृत्तीचा अधिकार अथवा धंद्याची मान्यता दिली गेली नव्हती.  अस्पृश्य जाती ग्रामबाह्य ठरून त्या वंशपरंपरागत नीच आणि व्यवहारवर्ज्य ऊर्फ अनाचरणीय ठरल्या होत्या.  म्हणूनच ह्या सर्व अन्यायाला विरोध करण्यासाठी गौतमाचा शुद्ध बुद्धिवाद उदय पावला.  त्याच्या काळी चांडाल, निषाद, वृषल, पुक्कस, (पुल्कस) इत्यादी ज्या जाती अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होत्या त्यांनाही तो उपदेश करी व त्यांतील कोणी योग्य दिसल्यास त्यास आपल्या भिक्षुसंघातही निःशंक घेई.  थोडक्यात सांगावयाचे ते हे की, उत्तर भारतात, म्हणजे आर्यावर्तात, चार वर्ण आणि त्यातील सर्व पोटभेदांचाच तत्कालीन ग्रामव्यवस्थेत समावेश झाला होता.  आणि ह्या वर्णव्यवस्थेबाहेरील अतिशूद्रांची किंवा असत-शूद्रांची गावाबाहेर पण जवळच वस्तीची व्यवस्था झाली होती.  आपस्तंब धर्मसूत्र मनुस्मृतीपेक्षा आणि भगवद्‍गीतेपेक्षाही जुने आहे.  ते बुद्धपूर्वकालीन असावे, निदान बुद्धसमकालीन तरी असावे.  त्यात ब्राह्मणादी उच्चवर्णीयांचा स्वयंपाक सत्शूद्रांनी करावा आणि स्वयंपाक करतेवेळी आचमन म्हणजे आंघोळ कशी करावी ह्याविषयी खालील नियम आहे.

आर्याधिष्ठिता वा शूद्राः संस्कर्तारः स्युः ॥४॥  तेषां स एवाचमनकल्पः ॥५॥
अधिकमहरहः केशश्मश्रुलोमनखवापनम् ॥६॥
-आपस्तंब धर्मसूत्र, प्रश्न २, खण्डिका ३.

आर्यांच्या घरी स्वयंपाक करताना त्यांच्या देखरेखीखाली सत्शूद्रांनी आर्यांप्रमाणेच आचमन करून म्हणजे हस्तपादादी अवयव धुवून रोज रोज केस, मिशा, नखे काढून कामाला लागावे, असा संप्रदाय होता.  हल्लीही अस्पृश्य मानलेल्या बटलरांना युरोपियन साहेबांच्या बंगल्यांत हेच नियम हुबेहूब पाळावे लागतात.  पुढे ह्याच आपस्तंब सूत्रात म्हटले आहे की-

अप्रयतोपहतमन्नं अप्रयतं न त्वभोज्यम् ॥२१॥
अप्रयतेन तु शूद्रेणो उपहृतमभोज्यम् ॥२२॥

रा. सातवळेकरांनी प्रयत शब्दाचा अर्थ स्वच्छ असा केला आहे.  त्याचा अर्थ आर्यांच्या नियमनाखाली आलेला किंवा वर्णव्यवस्थेत स्वीकारलेला शूद्र असाही होईल.  शिकवून तयार केलेला - ट्रेन्ड - असा अर्थ होईल.  अशा शिकलेल्या शूद्राने आणलेले अन्न घ्यावे, अप्रयत म्हणज न शिकलेल्या - अन्ट्रेंड - असत्शूद्राचे घेऊ नये, असा अर्थ होतो.  ह्यावरून अप्रयत शूद्र हेच ग्रामबाह्य अतिशूद्र असावेत असा तर्क होतो.  अशाच एका बहिष्कृत बाईजवळ तथागताने म्हणजे गौतम बुद्धाने पाणी पिण्यास मागितले, अशी एक बौद्ध कथा वर सांगितलेल्या ख्रिस्ताच्या कथेसारखीच आहे.  सोपाक (श्वपच) नावाच्या एका चांडाळाला भिक्षुसंघात घेतले हे प्रसिद्धच आहे.  बुद्धकालीन समाजव्यवस्थेसंबंधी साधार ऐतिहासिक माहिती पाली वाङ्‌मयावरून तयार केलेली प्रसिद्ध बौद्ध वाङ्‌मयसंशोधक प्रो. र्‍हिस डेव्हिड्स ह्यांच्या 'बुद्धिस्ट इंडिया' ह्या ग्रंथाच्या ४ थ्या भागात चांगली मिळण्यासारखी आहे.  ती पुढे यथानुक्रम आढळेल.  असो.

आता आपण प्रथम ह्या बुद्धोदयकालाच्या मागे मागे अस्पृश्यतेचा छडा लावीत, प्राचीन वाङ्‌मयात मिळतील तितके संदर्भ शोधीत जाऊ.  अगदीच गती खुंटल्यावर मागे परतू.  मग तिसर्‍या प्रकरणात बुद्धोदयकालापुढील बौद्धकालातील अस्पृश्यतेचे निरीक्षण करू.  तदनंतर क्रमाक्रमाने अगदी आताच्या काळाला भिडू.

बुद्धपूर्वकालीन ऊर्फ प्रागैतिहासिक अस्पृश्यता

१.  पाणिनीचा काल

संस्कृतचा आद्य व्याकरणकार पाणिनी ह्याचा काल नक्की ठरत नाही.  सर डॉ. भांडारकर त्याच्या कालाचा सुमार इ.स. पूर्वी ६००-७०० असावा म्हणतात.  पाणिनीच्या अष्टाध्यायीत पुढील सूत्र आहे :

शूद्राणाम् अनिरवसितानाम् ।
...पाणिनीय अष्टाध्याची, २. ४. १०

ह्या सूत्रावर भट्टोजी दीक्षितकृत सिद्धान्तकौमुदीत पुढील टीका आहे :

अबहिष्कृतानां (अनिरवसितानां) शूद्राणां प्राग्वत् ।  तक्षायस्कारम् ॥
पात्राद्वहिष्कृतानां तु चण्डालमृतपाः ।

म्हणजे भावार्थ असा की तक्षा = सुतार, अयस्कार = लोहार वगैरे अबहिष्कृत शूद्रांच्या नावांचा द्वंद समास पूर्वीच्या नियमाप्रमाणे नपुसंकलिंगी आणि चंडाल, मृतप इत्यादी बहिष्कृत शूद्रांच्या नावांचा द्वंद समास पुल्लिंगी असा पणिनीकृत निर्णय आहे.  आमचा प्रस्तुत मुद्दा व्याकरणाचा नसून, पाणिनीच्या कालात बहिष्कृत ऊर्फ निरवसित अस्पृश्यता इतकी रूढ झाली होती की तिच्या विधिनिषेधाचा प्रवेश व्याकरणाच्या सूत्रांतही आढळावा, हा आहे.  निरवसित ह्या शब्दाचा अर्थ भट्टोजी दीक्षितांनी पात्राद् बहिष्कृत असा केला आहे.  पात्राद् बहिष्कृत म्हणजे ज्यांनी वापरलेली भांडी वरिष्ठ वर्गास चालत नव्हती ते, असा अर्थ होतो.  अशा अस्पृश्यांना बंगाल प्रांतात 'अनाचरणीय जाती' अशी संज्ञा अद्यापि आहे.  'ग्रामाद् बहिष्कृत' असा अर्थ केला असता, तर आम्ही ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे पाणिनीच्या काळी आजकालची अस्पृश्यता रूढ झाली होती असा ठाम सिद्धांत ठरला असता.  तथापि बहिष्काराचा उल्लेख, मग तो 'पात्रात्' असो की 'ग्रामात्' असो, इतका स्पष्ट पाणिनीच्या पूर्वी दुसरा मिळेपर्यंत पाणिनीच्या काळातच आमच्या प्रस्तुत अस्पृश्यतेचे प्रस्थान ठेवणे तूर्त भाग आहे.  पाणिनीचा देश हिंदुस्थानच्या हल्लीच्या पश्चिम शिवेवरचा पेशावर प्रांत होता.  अर्थात् हे प्रस्थान उत्तर हिंदुस्थानापुरतेच ठरत आहे.  दक्षिणेकडील अस्पृश्यतेचा विचार पुढील टप्प्यात करू.
२.  अव्वल औपनिषद काल
चांडाल आणि पौल्कस

सुदैवाने आपल्यास बृहदारण्यकोपनिषदातील चौथ्या अध्यायातील तिसर्‍या ब्राह्मणातील २२ व्या सूक्तात अस्पृश्यांच्या स्थितीसंबंधी मोठा मार्मिक उल्लेख आढळतो.  तो असा :

अत्र पिताऽपिता भवति माताऽमाता लोका अलोका देवा अदेवा वेदा
अवेदा अत्र स्तेनोऽस्तेनो भवति भ्रूणहाऽ भ्रूणहा चाण्डालोऽ चाण्डालः
पौल्कसोऽ पौल्कसः श्रमणोऽ श्रमणस्तापसोऽतापसोनन्वागतं पुण्येनानन्वागतं
पापेन तीर्णो हि तदा सर्वाञ् शोकान्हृदयस्य भवति ।

ह्याच्या पूर्वीच्या २१ व्या सूक्तात आत्मस्थितिप्रत पोहचलेल्या प्राज्ञ पुरुषाची जी अत्यंत उच्च स्थिती वर्णिली आहे तिचेच वर्णन ह्या २२ व्या सूक्तात अधिक विस्ताराने केले आहे.  ह्याचा भावार्थ हा की, ह्या अत्युच्च स्थितीला पोहोचलेला पुरुष बापाला बाप म्हणून अथवा आईला आई म्हणून ओळखीत नाही, ह्या अभेद्य स्थितीत चांडालाचे चांडालत्व व पौल्कसाचे पौल्कसत्वही विलय पावते, इत्यादी इत्यादी.  म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यावहारिक स्थितीत चांडाल व पौल्कस इत्यादी भेद तेव्हा पाळले जात असत असे दिसते.  बौद्ध वाङ्‌मयात या स्थितीला प्रज्ञापारमिता असे पारिभाषिक नाव असे.  जुन्या मताचे हिंदू चांडालादी वर्णबाह्य लोकांना दूर ठेवीत, केवळ प्रज्ञापारमितावस्थेतच त्यांचा अभेद कल्पीत असत.  तर उलटपक्षी बौद्धमतवादी व्यावहारिक स्थितीतही त्यांना स्पृश्य मानीत असत, असे सिद्ध होते.  बौद्ध जरी अस्पृश्यता मानीत नव्हते तरी इतर हिंदू ती मानीत असल्याने बुद्धोदयकाळी ती होती, हे आम्ही वर सिद्ध केलेच आहे.  परंतु त्याच्यापूर्वी सुमारे दोनतीनशे वर्षांच्या काळात म्हणजे बृहदारण्यक व छांदोग्य ह्या उपनिषदांच्या काळात अस्पृश्यता होती की नव्हती हे ठरविणे कठीण आहे.  ह्या काळी चांडाल व पौल्कस ह्या जाती तिरस्करणीय मानल्या जात होत्या असे उल्लेख सापडतात पण त्या आजच्यासारख्या अस्पृश्य व बहिष्कृत होत्याच असा स्पष्ट उल्लेख नाही.  निदान तूर्त सापडत नाही.

ह्याच प्रकारचे दोन उल्लेख छांदोग्य उपनिषदात आढळतात.  हे उपनिषदही जवळजवळ बृहदारण्यकाइतके जुने व विस्तृत आहे.  ह्याच्या ५ व्या अध्यायाच्या १० व्या खंडातील ७ वा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे :

तद्य इह रमणीयचरणा अभ्याशो ह यत्ते रमणीयां योनिमापद्येरन्
ब्राह्मणयोनिं वा क्षत्रिययोनिं वा वैश्ययोनिं वाथ य इह कपूयचरणा अभ्याशो
ह यत्ते कपूयां योनिमापद्येरन् श्वयोनिं वा सूकरयोनिं वा चाण्डालयोनिं वा ॥

अर्थ :  पुण्याचरण करणारे पितृयानात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादी आर्य ऊर्फ शुभ योनी प्राप्‍त करून घेतात व अशुभ आचरण करणारे कुत्रा, डुक्कर किंवा चांडालादी हीन योनीप्रत जन्म घेतात.  पुनः ह्याच उपनिषदाच्या ५ व्या अध्यायाच्या २४ व्या खंडातील ४था श्लोक असा आहे :

तस्मादु हैवं विद्यद्यपि चण्डालायोच्छिष्टं प्रयच्छेदात्मनि हैवास्य तद्वैश्वानरे हुतं स्यादिति ।

अर्थ :  ह्या खंडात अग्निहोत्राचे महत्त्व सांगून शेवटी म्हटले आहे की, जो ब्रह्मविद् आहे त्याने चंडालाला आपले उष्टे दिले तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुती दिल्याप्रमाणेच पुण्य आहे.  ह्या दोन्ही श्लोकांचा भावार्थ बृहदारण्यकोपनिषदातील भावार्थाप्रमाणेच आहे.  एकंदरीत ह्या उपनिषदांच्या काळात आर्यांचे तीनच वर्ण होते आणि हल्लीचा जातिभेद नव्हता.  हे वर्ण केवळ जन्मावरच अवलंबून नसून कर्मावरून आणि ज्ञानावरूनही क्वचित घडत असत.  ह्या तीन वर्णांच्या बाहेरचा मोठा जो आर्येतर समाज त्यातील काही जाती आर्यांच्या स्वाधीन होऊन त्यांची परिचर्या करून राहत.  त्यांचा शूद्र नावाचा चौथा वर्ण पुढे बनविण्यात आला.  ह्या चौथ्या वर्णात समाविष्ट न झालेल्या चांडाल व पौल्कस इत्यादी तिरस्करणीय जाती वर्णबाह्य अशाच राहत होत्या.  यांनाच पुढे अप्रयत शूद्र अशी संज्ञा मिळून पुढे बुद्धोदयकाळी किंवा त्यांच्या आगेमागे आपंस्तंब सूत्राच्या काळी त्यांना हल्लीची अस्पृश्यता प्राप्‍त झाली असावी.  परंतु ह्या अव्वल उपनिषत्काळी चांडाल, पुल्कस इत्यादी जाती जरी हीन मानल्या जात होत्या तरी त्या खरोखरच अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होत्या की नाही, हे ठरविण्यास निश्चित पुरावा नाही.  तरी बहुतकरून त्या तशा असाव्यात असाच अंदाज करणे जास्त योग्य होईल.
३.  ब्राह्मणकालीन अस्पृश्यता

प्राचीनात प्राचीन जे बृहदारण्यक उपनिषद त्याच्याही मागे वाङ्‌मयात ब्राह्मणकाल आहे.  कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडात चांडाल व पौल्कस ह्या दोन राष्ट्रांचा केवळ नामनिर्देश मात्र आढळतो.  पण त्यावरून ही राष्ट्रे अगदी अस्पृश्य व ग्रामबाह्य होती असा तर्क काढण्यास मुळीच जागा नाही.  त्रैवर्णिक आर्याहून त्या भिन्न वंशाच्या होत्या.  फार तर त्या किंचित कमी गणल्या जात असाव्यात इतकेच सिद्ध होते.  ह्या तैत्तिरीय ब्राह्मणाच्या कालात पुरुषमेध करण्याची चाल अद्याप शिल्लक राहिलेली होती.  पण ह्या मेधात पशूंच्याऐवजी ज्या पुरुषांचा बळी देण्यात येत असे, त्या पुरुषाला ठार न मारता जिवंत सोडून देण्यात येत असे.  अद्यापि काही अस्सल मराठ्यांच्या घरी रानसटवाईची अथवा घोडेसटवाईची पूजा म्हणून एक विधी मूल जन्मल्यापासून त्याचे जावळ काढावयाच्या अगोदर करण्यात येत असतो.  हा विधी रानातच करावयाचा असतो.  रानसटवाईच्या पूजेत बकरे जिवंत मारून त्याचा नैवेद्य सटवाईला दाखवावयाचा असतो.  पण घोडेसटवाईच्या पूजेत एक बकरे आणून त्याचा बळी देऊन ते जिवंतच सटवाईच्या नावाने सोडावयाचे असते.  नैवेद्य व जेवण पुरणपोळीचेच असते.  माझ्या बाळपणी माझ्यामागून जन्मलेल्या सर्व भावंडांचे जावळ काढण्यापूर्वी हा घोडेसटवाईचा विधी माझ्या वडिलांनी केलेला मी स्वतः पाहिला आहे.  घोडेसटवाई या नावावरून पूर्वी घोडे जिवंत सोडले जात असावेत; पण गरिबीमुळे ती पाळी बकर्‍यावर, कोंबड्यावर व शेवटी अंड्यावर आणि लिंबावरही आली असावी.  हाच प्रकार तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडात वर्णन केलेल्या पुरुषमेधाचाही आहे.  पुरुषमेध म्हणजे ॠग्वेदाच्या १० व्या मंडलातल्या पुरुषसूक्तातील, विराटपुरुषाच्या मेधाप्रमाणे रूपकवजाच आहे.  ह्या तृतीय कांडातील ४ थ्या प्रपाठकात निरनिराळ्या लहान-मोठ्या देवतांना निरनिराळ्या जातींच्या पुरुषांच्या बळीचा विधी सांगितला आहे.  ह्या देवतांच्या महत्त्वाप्रमाणे पुरुषांच्या जातीचे महत्त्व अथवा लघुत्व दिसून येते.  १४ व्या मंत्रात ''बीभत्सायै (देवतायै) पौल्कसम्'' आणि १७ व्या मंत्रामध्ये ''वायवे (देवतायै) चाण्डालम्'' असे उल्लेख स्पष्ट आहेत.  ह्यावरून पौल्कस जातीचे लोक बीभत्स (शिश्नदेवतेची) पूजा करीत असावेत व चांडाल वायुदेवतेची पूजा करीत असावेत, असा तर्क करावा लागत आहे,  वायुदेवतेचा, संबंध रुद्र ऊर्फ शिव देवतेशी पोहोचतो.  ह्यावरून चांडाल आणि पौल्कस आताप्रमाणेच तेव्हाही शक्तीची आणि शिवाची उपासक राष्ट्रे असली पाहिजेत इतकेच सिद्ध होते.  ह्या पूजेचे प्रकार तेव्हा बीभत्स असले तरी ह्या जाती तेवढ्यावरूनच अस्पृश्य होत्या, असा मुळीच ध्वनी निघत नाही.
निषाद आणि वृषल

चांडाल आणि पौल्कस ह्यांशिवाय यास्काच्या निरुक्तात या जातींचा उल्लेख अध्याय ३, खंड १६ मध्ये पुढीलप्रमाणे आढळतो;
वदिति सिद्धोपमा ।  ब्राह्मणवत् वृषलवत् ।  ब्राह्मणा इव वृषला इव ।

ह्या मंत्रावर यास्कानेच जे भाष्य केले आहे त्यात वृषलाचा अर्थ सांगताना केलेल्या 'वृषलो वृषशीलो भवति वृषाशीलो वा ।'  ह्या व्युत्पत्तीवरून वृषल नावाची एक निराळी जात होती की बैलासारखा एखादा मठ्ठ अनार्य माणूस इतकाच वृषल याचा अर्थ घ्यावयाचा, असा विकल्प प्राप्‍त होतो.  चंद्रगुप्‍त मौर्याचा गुरू आणि दिवाण चाणक्य केव्हा केव्हा रागावून चंद्रगुप्तास 'रे वृषल' ('ए बैला') असा टोमणा मारीत असे.  ह्यावरूनही वृषल नावाची एक निराळी जात नसावी अशी शंका येते.

निरुक्ताचा अध्याय ३, खंड ८ यात माणसांच्या निरनिराळ्या २५ प्रकारांपैकी पंचजन हा एक प्रकार सांगितला आहे.  ह्या पंचजन नावाचा अर्थ सांगताना यास्काचार्यांनी 'चत्वारो वर्णा निषादः पंचम इति औपमन्यवः' असा औपमन्यव नावाच्या प्राचीन स्मृतिकारांचा दाखला दिला आहे.  त्याशिवाय निषादः कस्मात् ?  निषदनो भवति, निषण्णमस्मिन् पापकम् इति' ।  म्हणजे, ज्याच्यामध्ये पाप दृढ होऊन बसले असते तो निषाद, असा अर्थ स्वतः यास्काचार्य देत आहेत.  परंतु बुद्धोदयकालाच्या उपनिषदांतून फक्त शूद्र वर्णाचा उल्लेख सापडतो.  पाचव्या वर्णाचा उल्लेख औपमन्यवांनीच प्रथम केला आहे.  त्यावरून औपमन्यवांचा काळ उपनिषदांच्या मागूनचा म्हणजे बुद्धोदयानंतरचा किंवा फार तर तत्कालीन असावा; असे होते.  आणि यास्काचा काळ तर त्याच्याही मागूनचा असे सिद्ध होते.  मनुस्मृतीने यास्काच्याही मागून चांडालांना 'नास्ति तु पंचमः' असे म्हणूनही पुनः ५ व्या प्रकारात गणिले आहे.  त्याचा विचार योग्य स्थळी करू.

वर जे यास्क, पाणिनी वगैरे प्राचीन ग्रंथकारांचे उल्लेख आले आहेत, त्यांचा संदर्भ वाचकांनी फार सावधगिरीनेच समजला पाहिजे.  कारण त्यांच्या कालनिर्णयासंबंधाने विद्वानांत फार वाद माजून राहिला आहे.  जसजसे संशोधन जास्त होत आहे तसतसा हा वाद अधिकच माजत आहे.  यास्क आधी किंवा पाणिनी आधी, आणि हे दोघेही बुद्धकाळापूर्वी किंवा मागून, ही गोष्ट छातीवर हात ठेवून अद्यापि सांगण्यास कोणी विद्वान धजत नाहीत.  साधारणपणे यास्क, पाणिनीच्या पूर्वी कित्येक शतके झाला असावा अशी समजूत आहे.  कारण, पणिनीने यास्क शब्द सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला आहे.  ह्यावरून हा पाणिनीच्या पूर्वी असावा.  बृहदारण्यक उपनिषदात व पिंगल छंदःसूत्रात ह्याचा उल्लेख आहे, वगैरे पुण्याचे चित्रावशास्त्री आपल्या 'प्राचीन चरित्रकोशा'त लिहितात.  राजवाडे पाणिनीचा काळ इ.स.पू. १२००-९०० इतका मागे नेतात, सर डॉ. भांडारकर तो ७००-६०० ठरवितात, पण कित्येक पुरावे असेही मिळतात की, पाणिनी फार तर इ.स.पूर्वी ४००-३५० पेक्षा मागे जाऊ शकतच नाही.  राजशेखराची काव्यमीमांसा ख्रिस्ती शकानंतर १००० च्या सुमारास झाली.  तिच्यात उल्लेख आहे तो असा :

श्रूयते च पाटलिपुत्रे शास्त्रकारपरीक्षा -
अत्रोपवर्षवर्षाविह पाणिनिपिङगलाविह व्याडि: ।
वररुचिपतञ्ञली इह परीक्षिताः ख्यातिमुपजग्मुः ॥
काव्यमीमांसा, १० (पृ. ५५)

ह्या पाणिनी, पिंगल इत्यादी मंडळींच्या परीक्षा पाटलिपुत्र या राजधानीत झाल्या असल्या तर, पाटलिपुत्र हा गाव उदयी राजाने प्रथम राजधानीचा केला, त्यानंतर झाल्या असाव्या.  त्या उदयी राजाचा काळ इ.स.पू. ४५० हा आहे.  हरचरितचिंतामणीच्या २७ व्या सर्गात माहिती मिळते की, नंदाच्या पाटलिपुत्र राजधानीत शंकरस्वामीच्या वर्ष नावाच्या पुत्रापासून पाणिनी हा विद्या शिकला.  यावरूनही त्याचा काळ इ.स.पूर्वी ४००-३५० च्या सुमाराचा ठरतो.

ते कसेही असो !  ह्या प्राचीन ॠषींचा कालनिर्णय करण्याचे हे स्थळ मुळीच नव्हे.  पण निरुक्ताचा अध्याय ३, खंड ८ यात माणसाच्या २५ जातींचा उल्लेख केला आहे, असे वर म्हटले आहे, तेथे यास्काचार्यांनी प्रथम :-

पंचजना मम होत्रं जुषध्वम् ।  ॠग्वेदसंहिता, १०.५३.४.

असा श्रुतिमंत्राचा आधार देऊन त्यावरील भाष्यात स्पष्ट म्हटले आहे -

गंधर्वाः पितरो देवा असुरा रक्षांसीत्येके ।  चत्वारो वर्णा निषादः पंचम इत्यौपमन्यवः ॥

येथे पंचजन ह्या शब्दाचे दोन अर्थ स्पष्ट सांगितले आहेत.  'गंधर्व, पितर, देव, असुर, राक्षस' हा एक अर्थ आणि 'चार वर्ण, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि पाचवा निषाद, म्हणजे वर्णबाह्य मानलेल्यांचा समुदाय, हा दुसरा अर्थ.  आता हे औपमन्यव स्मृतिकार कोण व केव्हाचे असावेत हाच प्रश्न मुद्द्याचा आहे.  ब्राह्मणकाळात आणि अव्वल उपनिषद्काळात तीनच वर्ण होते.  पुढे चौथा शूद्रवर्ण समाविष्ट केला तो अव्वल उपनिषदांचा काळ नव्हे.  तो पाणिनीचा काळ; म्हणून हे औपमन्यव पाणिनीच्या, किंबहुना ते ज्या अर्थी पाचवा वर्ण मानतात त्या अर्थी बौद्धांच्या काळी, किंवा त्यानंतरचे, असावेत असा तर्क होत आहे व त्यांचा उल्लेख ज्या यासकाचार्यांनी केला ते पाणिनीनंतरचे अशी अर्थापत्ती निघत आहे.  पण यासकाचार्यांचा काळच बृहदारण्यक उपनिषदाच्या वेळी ठरत असल्यास औपमन्यव त्याहूनही पूर्वीचे ठरून पाचवा वर्ण जो निषादांचा तो इ.स.पू. ८००-९०० चा ठरून जवळजवळ श्रीकृष्णाच्या काळापर्यंत मागे जाऊ पाहतो.  निषाद म्हणून कोणी एक विवक्षित जात नव्हती.  पण शूद्रवर्णाहून ते निराळे व वर्णबाह्य होते हे खरे.  तथापि, ते आमच्या वरील व्याख्येप्रमाणे अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होते असे ठरत नाही.  वाचकांनी ह्या सर्व गोष्टी तारतम्याने व सावधपणानेच विचारात घ्याव्यात हे बरे.

प्रो. मॅक्डोनेल व कीथ यांनी Vedic Index या नावाचा वेदांतील शब्दांचा कोश तयार केला आहे.  त्याच्यात ४५३ पानावर निषाद शब्दासंबंधी पुढील खुलासा केला आहे :

Nishada is found in later samhitas and the Brahmans.  The word seems to denote not so much a tribe but a general term for the Non-Aryan tribes who were settled down but were not under Aryan control as the Shudras were; for the Aupamanyava took the five people panchajana to be the four castes and the Nishadas and the Commentator Mahidhara explains the word as Bhills.

अर्थ :  ''निषाद हा शब्द नंतरच्या संहितांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये आढळतो.  तो शब्द येथे विशिष्ट जातिवाचक नसून सामान्येकरून ज्या आर्येतर जाती त्या वेळेस वसाहत करून होत्या; परंतु शूद्रांप्रमाणे ज्या आर्यांच्या सत्तेखाली आल्या नव्हत्या अशा सामान्य जातींचा वाचक आहे, असे वाटते.  कारण, औपमन्यव हे पंचजन याचा अर्थ चार वर्ण आणि निषाद असा घेतात, आणि भाष्यकार महीधर निषाद शब्दाची भिल्ल अशी व्याख्या करतो.'' ह्यावरून निषाद ही जमात चातुर्वर्ण्याच्या बाहेरची होती, तरी ती अस्पृश्य खात्रीने नव्हती; आणि भिल्ल, सांताळ, गोंड वगैरे रानटी जाती आजही अस्पृश्य नाहीत हे ध्यानात घेण्यासारखे आहे.

Read more: पुरातन अस्पृश्यतेचे रूपनिदर्शन

पुण्यातील मेहेतर लोकांच्या अडचणी

(लेखक :  नाथा महाराज मेहेतर, भवानी पेठ, पुणे.)

१.  पेशव्यांनी पुणे शहर वसविल्यावर आम्हांला येथे आणले.  तेव्हापासून पेशवाई संपेपर्यंत आम्ही आनंदात होतो.  आम्हांला चांगली मिळत होती.  त्यामुळे मुलामाणसांचा गुजारा होत होता व आमचा धंदा दुसरा कोणी करणार नाही अशी खात्री होती.  त्या वेळी आम्हांला चांगला पगार मिळून शिवाय सणासुदीच्या दिवशी बक्षिसेही मिळत.  शिवाय पुणे शहरातले सोनखत आम्हीच विकत होतो.  त्यावर दुसऱ्या कोणाचा हक्क नव्हता.  

२.  आता आमच्या कामाची सर्व व्यवस्था म्युनिसिपल कमिटीकडे आहे व आमचे पहिले सर्व हक्क बुडवून ६७८९ प्रमाणे आम्हांला पगार मिळत आहे.  पण एवढयात आमची गुजराण होत नाही.

३.  महार, मांग वगैरे लोक इतर धंदे करून निदान आठ आणे तरी रोजी मिळवतात, पण आम्हाला जास्तीतजास्त पगार म्हणजे रोजी ४॥ आणे.  तरी आमची अशी इच्छा आहे की, आम्हांला रोजी ८ आणे तरी मिळावे.  एवढे उपकार आमच्यावर म्यु. कमिटीने केल्यास आम्हांस पोटभर भाकरी दिल्याचे पुण्य कमिटीला लागेल.

४.  आम्हाला पगार फार थोडा असल्यामुळे आम्ही कर्जबाजारी बनतो व रुपयाला वेळेनुसार ३-४ आणे व्याज देऊनही कर्ज काढतो.  तरी आम्हांला कमी व्याजाने कर्ज मिळेल अशी कोणी तरी व्यवस्था करावी.

५.  आमचे काम पाहण्याकरिता आमच्याच जातीचे लोक मुकादम नेमिले होते, पण त्यांपैकी ६ जणांना पुढे कमी केले.  तर म्यु. कमिटीने पुन्हा त्यांना नेमावे किंवा ते लोक शिकलेले आहेत म्हणून त्यांना दुसरीकडे नोकरी द्यावी.

६. पुणे शहरांत ड्रेनेजचे काम सुरू झाले आहे.  त्यामुळे आमच्या धंदा बराच कमी होईल.  तरी आम्हाला त्याऐवजी दुसरा धंदा द्यावयाची म्युनिसिपल कमिटीने तजवीज करावी.

७.  आमची मुलेदेखील १२ वाजेपर्यंत कामधंदा करतात; तरी त्यांस शिक्षण देण्यासाठी आमच्या मोहल्ल्यात निराळी शाळा दयाळू सरकारने अगर म्युनिसिपालिटीने द्यावी.  कारण इतर शाळांत आमच्या मुलांना घेत नाहीत.  व आमच्या कामाच्या वेळेला इतर शाळा भरतात.

८.  ड्रेनेजचे काम सुरू झाल्याने आमहांला फार चिंता लागून राहिली आहे.  कारण आमचा धंदा बुडाला तर आम्ही खावे काय ?  दुसरा कोणता धंदा करावा ?  नोकरी कोण देणार ?  दुकानदारी मांडली तरी गिऱ्हाइके कोण होणार ?  अशी अनेक संकटे आम्हांला घेरून बसलेली आहेत.  याचा विचार सरकार, म्युनिसिपल कमिटी व वरिष्ठ जातीचे सर्व लोक यांनी दयाळूपणाने व उदारबुध्दाीने करावा व आम्हांस मार्ग दाखवावा.

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या पुणे शाखेचे फ्री बोर्डिंग
विनंतिपत्रक

हे बोर्डिंग येत्या फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे ठरविले आहे.  या बोर्डिंगात प्रारंभी पंधरा विद्यार्थी घेण्यात येतील.  पुणे येथील राहणी मध्यम खर्चाची असली तरी शहरची वस्ती व जिनसांच्या वाढत्या किमती यांचा विचार करून दर मुलामागे सध्या दरमहा कमीत कमी तरी पाच रुपये खर्च येईल असा अंदाज आहे.  भा.नि.सा मंडळीच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते.  व त्याचा खर्च उदार हितचिंतकांकडून मिळालेल्या वर्गण्या व देणग्यांवर चालतो ही गोष्ट मशहूरच आहे.  अशा बिकट मिळकतीच्या मानाने अशाश्वत स्थितीतदेखील प्रेमळ बंधुभगिनींकडून मिळणाऱ्या मदतीवर विश्वासून व ईश्वरावर पूर्ण भरीभार घालून ठिकठिकाणच्या आपल्या शाखांना फ्री बोर्डिंगे जोडून शिक्षणाच्या सोयी वाढविण्याचा व गरजा पुरविण्याचा प्रयत्न मंडळी करीत आहे.  या रीतीने पाहिले तर मंडळीच्या वाढत्या कार्यक्षेत्राच्या प्रमाणाने मंडळीला जीवनाधार असलेला लोकाश्रयाचा ओघही जास्त जोराने वाहू लागला पाहिजे, हे सुज्ञांच्या सहज लक्षात येईल.  या बोर्डिंगला सुरुवात करावयास प्राथमिक खर्च व पुढील दोन वर्षांचा खर्च धरून आज दोन हजार रुपयांची जरुरी आहे.  तरी दयाळू बंधुभगिनींनी खाली दर्शविलेल्या मार्गांनी या बोर्डिंगला मदत करून मंडळीबद्दल आपली सक्रिय सहानुभूती दाखवावी, अशी त्यांना मंडळीची आग्रहाची विनंती आहे.

१.  पहिल्या प्रतीचे वर्गणीदार  :  दरमहा पाच रुपये म्हणजे एका विद्यार्थ्याचा खर्च देणाऱ्या सदगृहस्थांना प. प्र. वर्गणीदार समजण्यात येईल.  व तो विद्यार्थी त्यांचा बोर्डर म्हणून समजला जाऊन त्याला बोर्डिंगमध्ये दाखल केल्याबरोबर त्याचा फोटो त्यांजकडे पाठविला जाईल व त्याच्या विद्याभ्यासाची माहिती त्यांजकडे वरचेवर कळविली जाईल.

२.  दुसऱ्या प्रतीचे वर्गणीदार  :  दरमहा अडीच रुपये देणाऱ्यांना दु. प्र. वर्गणीदार समजण्यात येईल.  त्यांजकडेही त्यांच्या विद्यार्थ्याची माहिती वरचेवर कळविण्यात येईल.

३.  तिसऱ्या प्रतीचे वर्गणीदार  :  दरमहा एक रुपया देणारे ति. प्र. वर्गणीदार समजण्यात येतील.  त्यांजकडे व वरील सर्व वर्गणीदारांकडे बोर्डिंगचे रिपोर्ट प्रसिद्ध होतील तसतसे पाठविण्यात येतील.

४.  साहाय्यक  :  या बोर्डिंगला सवडीप्रमाणे दरवर्षी ठरलेली रक्कम व धान्य, कपडे, भांडी वगैरे इतर सामान नियमितपणे देणाऱ्यांना साहाय्यक समजण्यात येईल, व त्यांजकडे बोर्डिंगचे रिपोर्ट वगैरे पाठविण्यात येतील.

या बोर्डिंगकरिता पाठवावयाची मदत पुणे येथील नि. सा. मंडळीच्या लष्करातील शाळेत नि. सा. मंडळीच्या फ्री बोर्डिंगचे सुपरिंटेंडेंट यांजकडे २००८ सेंट विन्सेंट स्ट्रीट येथे ताबडतोब पाठविण्याची विनंती आहे.

विठ्ठल रामजी शिंदे
जनरल सेक्रेटर, भा. नि. सा. मंडळी,
नि. मा. मंडळीची शाळा,
लष्कर-पुणे

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची महाराष्ट्रीय बंधुभगिनींना विनंती

प्रिय बंधुभगिनींनो, आमची मंडळी स्थापन होऊन गेल्या दीपवाळींतील प्रतिपदेलाच सहा वर्षे पुरी होऊन सातवे वर्ष सुरू झाले आहे.  वरिष्ठ हिंदू समाजाने टाकलेल्या - अस्पृश्य ठरविलेल्या - हिंदू बांधवांच्या उन्नतीकरिता हिंदूंनी चालविलेली ही एकच संस्था आहे.  या संस्थेच्या बिकट कार्याची कल्पना व अस्पृश्यांच्या खऱ्या अडचणीची जाणीव हिंदूंखेरीज दुसऱ्या कोणालाही पूर्णपणे होणार नाही.  अनदी कालापासून हिंदूंनी बाहेर टाकिलेल्या या अस्पृश्य समाजाला (१) शिक्षण देऊन, (२) सामाजिक व धार्मिक बाबतीत उदार मतांचा प्रसार करून, (३) वरिष्ठ हिंदूंन या जातीवर घातलेला अस्पृश्यपणा दूर करण्याबद्दल वरिष्ठ हिंदू समाजास विनंती करून आणि (४) हिंदू समाजाचा एक घटक या नात्याने अस्पृश्यांना उत्तम नागरिकत्वाचा व राजनिष्ठेचा उपदेश करून त्याची उन्नती करण्याचा आमच्या मंडळीचा संकल्प आहे.  हा आमचा संकल्प पुरा करण्याचे काम परमेश्वराच्या आशीर्वादावर व उदार हितचिंतकांकडून मिळणाऱ्या मदतीवरच अवलंबून आहे.  या मंडळींच्यामार्फत पंधरा शाखांच्या पंचवीस शाळा व पाच वसतिगृहे चालू असून त्यात अकराशे अस्पृश्य विद्यार्थ ज्ञानामृताचे सेवन करीत आहेत.  या संस्था चालविण्यास मंडळीला दरसाल वीस हजार रुपयांवर खर्च करावा लागत आहे.  हा सर्व खर्च मंडळीच्या हितचिंतकांकडून मिळणाऱ्या वर्गण्या, देणग्या व सरकारी ग्रँट यांवरच चाललेला आहे.  महाराष्ट्रातल्या अस्पृश्य समाजाच्या लोकसंख्येकडे पाहिले तर मंडळीचे चालू प्रयत्न सिंधूत बिंदूप्रमाणे आहेत.  मंडळीच्यामार्फत आणखी कित्येक ठिकाणी शाळा, वसतिगृहे, भजन समाज सुरू करावे अशी मागणी असून तसा मंडळीचा विचारही आहे.  पण उदार बंधुभगिनींकडून मंडळीला मदत मिळाल्याखेरीज वरील विचार कृतीत आणण्यास मंडळी असमर्थ आहे.  म्हणून मंडळीची प्रत्येक महाराष्ट्रीय बंधुभगिनीस आग्रहाची विनंती आहे की, प्रत्येकाने वर्षाकाठी निदान एक रुपया तरी मंडळीला देऊन मंडळीमार्फत चालणाऱ्या समाजकार्याला मदत करावी.

विठ्ठल रामजी शिंदे
जनरल सेक्रेटरी
भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची शाळा,
परळ, मुंबई.

परिषद फंडाकरिता मदत देणा-यांची नावे

भा. नि. साहाय्यकारी मंडळीची महाराष्ट्रीय परिषद

परिषद-फंडाकरिता मदत देणाऱ्यांची नावे 

तक्ता (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

जमाखर्चाचा तक्ता (तक्ता क्र. १ पहा)

परिषदेला आलेल्या पाहुण्यांची यादी (तक्ता क्र. १ पहा)

तक्ता क्र. १

भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेस आलेल्या पाहुण्यांची जिल्हावार, स्थळवार व जातावार यादी  (तक्ता क्र. २ पहा)       
 

तक्ता क्र. २
भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या महाराष्ट्रीय परिषदेचे हेतू वगैरे

हेतू

महाराष्ट्रीय निराश्रितवर्गाच्या उन्नतीसंबंधी व्यावहारिक विषयांची त्यांच्या हितचिंतकांमध्ये व्यवस्थित रीतीने चर्चा व्हावी, वरील मंडळीने याच दिशेने चालविलेल्या कार्याची इतर शिक्षणविषयक व परोपकारी संस्थांच्या चालकांना माहिती मिळून, त्यांच्याशी मंडळीने सहकार्य साधावे व सर्वसाधारण लोकसमुहामध्ये या कार्याविषयी सहानुभूती वाढवावी या हेतूने वरील मंडळीच्या विद्यमाने ही परिषद ऑक्टोबर तारीख ५६७ शनिवार, रविवार व सोमवार या तिन्ही दिवशी भरविण्यात आली.

चर्चेचे विषय
१.  मंडळीला वाहिलेल्या माणसांची जरुरी.
२.  येथील शाखेसाठी बोर्डिंगची आवश्यकता.
३.  निराश्रितवर्गाच्या औद्योगिक शिक्षणाची दिशा.
४.  निराश्रितवर्गाच्या विशेष अडचणी.
५.  निराश्रितवर्गाच्या वाङमयात्मक शिक्षणाची दिशा.
६.  मुंबई व पुणे येथे मंडळीच्या स्वतःच्या इमारतीची आवश्यकता.
७.  म्युनिसिपालिटया, खासगी शिक्षणविषयक संस्था आणि परोपकारी संस्था यांच्याशी मंडळीचे सहकार्य.
८.  सरकारी विद्याखाते व देशी संस्थानिक यांच्याशी शिक्षणविषयक बाबतीत मंडळीचे सहकार्य.
९.  आध्यात्मिक व सामाजिक बाबतीत निरनिराळया धर्मपंथातील अनुयायांशी मंडळीचे सहकार्य.

वरील सर्व विषयांवर चर्चा शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी फर्ग्युसन कॉलेजच्या ऍंफिथिएटरमध्ये डॉ. सर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  सोमवार तारीख ७ रोजी मंडळीच्या लष्करातील शाळेत श्रीमती रमाबाईसाहेब रानडे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ वर्गांतील हितचिंतक भगिनी व निराश्रित भगिनी यांची सभा भरून परिषदेचे काम संपले.

वरील दोन्ही प्रसंगी पुरुषवर्गाप्रमाणेच स्त्रीवर्गाकडून मंडळीच्या कार्याला सहानुभूती दाखविण्यात आली आहे, ही गोष्ट मंडळीच्या इतिहासात संस्मरणीय होऊन राहील.

परिषद स्वागत कमिटीचे सभासद  :  डॉ. हॅरोल्ड एच. मॅन  (अध्यक्ष), श्रीयुत वामन अच्युत देसाई, श्रीयुत प्रो. केशव रामचंद्र कानिटकर, श्री. प्रो. गोविंद चिमणाजी भाटे, श्री. प्रो. दत्तात्रय लक्ष्मण सहस्त्रबुध्दे, श्री. वासुदेव गोपाळ भातखंडे, श्री. जी. एन. सहस्त्रबुध्दे, श्री. एल. एम. सत्तूर, श्री. सीताराम यादवराव जव्हेरे, श्री. माधवराव हणमंतराव घोरपडे, श्री. ए. के. मुदलियार.

स्थानिक निराश्रितवर्गाचे प्रतिनिधी  :   श्री. शिराम जानबा कांबळे, श्री. श्रीपत रामजी थोरात, श्री. रखमाजी शिवराम कांबळे, अनंता अमृता भादेकर, दगडू, बाबाजी माने, श्री. येसू खंडूजी कांबळे, विश्वनाथ विष्णु सावळे, श्री. नथू रामजी चव्हाण, श्री. मारुती लक्ष्मण जाधव, श्री. नूरासिंग पिरू मेहतर, श्री. वजीर मन्नू.

सेक्रेटरी  :  श्री. वि. रा. शिंदे आणि श्री. दा. ना. पटवर्धन.

स्वयंसेवक मंडळी  :  श्री. व्ही. आर. मुदलियार, श्री. ए. एच. ढवळे, श्री. रा. ना. राजाज्ञा, ऍग्रिकल्चर कॉलेजमधील स्टुडंट्स मेसर्स बसानी, जडेज्या, भाटरकर, बेंडिगिरी, खोले, आगाशे, साने, सुळे, तानवडे, भांबुरा आणि मिठुजी.

शेवटी विनंती

परिषदेचे हेतू तडीस नेण्याकरिता परिषदकमिटीने शक्य तितकी खटपट केलेली आहे.  परिषदेत ज्या विषयासंबंधी एकमत दिसून आले त्या प्रकारच्या कामात तरी समाजाकडून मंडळीला मदत मिळावी व मंडळीने दर्शविलेल्या मार्गांनी इतर संस्थांनी, मंडळीशी सहकार्य साधावे आणि मंडळीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढून, मंडळीच्या या परिषदेत चर्चा झालेल्या विषयांच्या संबंधात महाराष्ट्राने मंडळीला वाढत्या प्रमाणात मदत केलेली आहे अशी स्थिती मंडळीच्या पुढील परिषदेच्या वेळी दिसून यावी, एवढीच परिषद कमिटीची सर्वांस विनंती आहे.

भा. नि. सा. मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेत वाचावयास आलेल्या निबंधांचा त्रोटक सारांश

(परिषदेत वाचावयाकरिता पुष्कळ गृहस्थांचे निबंध आले होते.  पण परिषदेत वेळेच्या अभावामुळे निबंध वाचावयास सवड झाली नाही व कित्येक वक्तयांनाही बोलावयास सापडले नाही.  मुंबईचे रा. संतूजी वाघमारे, नगरचे कै. वा. रा. डांगळे वगैरेंसारख्या सुशिक्षित अस्पृश्य बंधूंना बोलावयास अवसर द्यावयास सापडला नाही, याबद्दल आम्ही फार दिलगीर आहेत.  याबद्दल वरील बंधू राग मानणार नाहीत, अशी आशा आहे.  सेक्रेटरी प.क.)
खेडेगावांतील शाळांत निराश्रित मुलांना घेत नाहीत ही अडचण कशी दूर व्हावी  ?
(लेखक  :  राजाराम नारायण राजाज्ञे, स्कूलपंच मु. ऐतवडे, जि. सातारा)

१.  स्कूलपंचांची निवडणुक  :   दरसाल शाळेची व्यवस्था पाहणारे स्कूलपंच निवडताना शाळेत अस्पृश्य मुलांना घ्यावयास काही हरकत नाही अशा मताचे पंच निवडावे व पंचांची पुन्हा निवडणूक करतेवेळी इतर गोष्टींबरोबर त्यांनी अस्पृश्य मुलांना शाळेत घेण्याच्या बाबतीत काय केले, याचाही विचार व्हावा.  गावातील सर्व जातींच्या लोकसंख्येच्या मानाने त्यांचे प्रतिनिधीही स्कूलपंचांत असावेत.

२.  नवीन शाळा देताना त्या शाळेत अस्पृश्य मुलांना घेण्यास आमची काही हरकत नाही अशी गावकऱ्यांची लेखी कबुली घ्यावी व याविरुद्ध कोणाचे वर्तन जाहल्यास त्या गावातील शाळा उठवावी किंवा अस्पृश्यांकरिता मुलांच्या संख्येकडे न पाहता निराळी शाळा द्यावी व त्याचा खर्च लोकलबोर्डातर्फे किंवा गावकऱ्यांपासून घ्यावा.

३.  स्कूलपंचांचे काम नीट होते की नाही, या बाबतीत सरकारी कामगारांनी शाळेची स्थिती व गावातील इतर जातीच्या लोकमताबरोबर निराश्रितांचे लोकमत याचा विचार करून योग्य वेळी किंवा जरूर वाटल्यास मध्यंतरीही स्कूलपंचांची पुन्हा निवडणूक करून घ्यावी.
खेडेगावांतील महार बलुतेदारांच्या अडचणी

१.  महार बलुतेदारांना सरकारने इनाम जमिनी दिलेल्या आहेत.  पण त्याबद्दल त्यांना सरकारचावडीवरील काम करावे लागते.

२.  पूर्वीच्या इनामी पद्धतीवरून पाहता त्यांच्या कामाच्या आकाराइतका साऱ्याचा आकार माफ करून महारांना इनाम जमिनी दिल्या असाव्यात.  पण आता त्यांना ज्या जमिनी इनाम आहेत, त्यांच्या साऱ्यांच्या आकारापेक्षा त्यांच्या कामाच्या मुशाहिऱ्याची रक्कम पुष्कळ जास्त दिसून येते.

३.  पूर्वी पाटील-कुळकर्ण्यांनाही अशा इनाम जमिनी व बैते बलुते वगैरे देऊन त्यांजपासून काम करून घेतले जात असे.  पण आता सरकारने त्यांच्या जमिनी त्यांस इनाम देऊन त्यांच्या कामाच्या मानाने त्यांस नक्त नेमणूक करून दिली आहे व या नेमणुकीत वाढ होण्यासंबंधी सरकारी कायदेकौन्सिलात प्रश्न विचारले जात आहेत.

४.  महारांना बलुते मिळते ते गावकऱ्यांच्या नोकरीबद्दल, परीट, न्हावी वगैरेंना मिळते; त्याप्रमाणे मिळते व जमिनीचा सारा माफ आहे तो सरकारी नोकरीबद्दल आहे.  हा माफ असलेला सारा सरकारी नोकरीबद्दल मिळू शकणाऱ्या मुशाहिऱ्यापेक्षा पुष्कळ कमी आहे ही गोष्ट शिक्षण नसल्याने बिचाऱ्या महारांना कळत नाही, व कळली तरी आपण तक्रार केल्यास आपल्या इनाम जमिनी जातील अशी त्यांस भीती वाटते.

५.  तरी दयाळू सरकारांनी त्यांच्या इनाम जमिनी पाटील-कुळकर्ण्यांप्रमाणे त्यांनी आजपर्यंत इमानेइतबारे अल्प मुशाहिऱ्यावर केलेल्या नोकरीबद्दल, त्यांस तशाच पुढे इनाम चालू ठेवाव्या व त्यांस पडणाऱ्या सरकारी कामाबद्दल त्यांस अल्प मुशाहिरा नेमून द्यावा व अशा रीतीने कामाच्या मानाने कमी तैनात मिळत राहू नये.

६.  या बाबतीत ठिकठिकाणच्या सुशिक्षित व समंजस निराश्रितांनी व इतर सुशिक्षित वरिष्ठ जातींच्या देशबंधूंनी पुढे येऊन या अडचणींची माहिती आमच्या अज्ञानी महारांस करून द्यावी.  नामदार सभासदांनी व पुढारी वर्तमानपत्रांनी ही गोष्ट सरकारच्या निदर्शनास आणून व हिंदी साम्राज्याच्या एका अज्ञानी व दरिद्री भागाला जास्त दोन घास मिळवून दिल्याचे श्रेय द्यावे अशी त्यास विनंती आहे.

अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचे कार्य संघटित व सुव्यवस्थित कसे होईल ?

(लेखक  :  या. शं. वावीकर, मेकॅनिकल इंजिनिअर, मुंबई.)

१.  नि. सा. मं. चे काम सुव्यवस्थित चालण्याकरिता त्याच कामास वाहिलेले, कळकळीने झटणारे लोक पाहिजेत.  मिशनरी मंडळीप्रमाणे स्वार्थत्यागपूर्वक या कामास लागले पाहिजे.  गावोगाव हिंडून, व्याख्याने देऊन, जागृती उत्पन्न करून, फंड जमा करून, सहकार्य करणारी मंडळी मिळवून ठिकठिकाणी काम सुरू केले पाहिजे.

२.  ब्रिटिश मुलुखात व देशी संस्थानांत काम करण्याची पद्धती एकच असणार नाही.  ठिकठिकाणच्या परिस्थितीच्या मानाने ध्येयाकडे लक्ष देऊन भिन्न साधने योजली तरी हरकत नाही.

३.  या अस्पृश्य लोकांची राहण्याची घरे, दिवाबत्ती, रस्ते, पिण्याचे पाणी वगैरे बाबतीत स्वच्छता राखण्यास त्यास उपदेश करून त्यांचे रस्ते, पाणी वगैरे बाबतीत सुधारणा करण्यासाठी त्या गोष्टी म्युनिसिपालिटया व सरकार यांच्या नजरेस आणाव्या.

४.  नि. सा. मं. ची एक मुख्य मध्यवर्ती महासभा असून त्या सभेच्या नियंत्रणाखाली इतर शाखा चालल्या पाहिजेत व या सभेचे एक मासिक अगर त्रैमासिक असावे.

५.  स्पर्शास्पर्शाच्या बाबतीत व्याख्यानांच्या द्वारे लोकमत तयार करून लोकांच्याकडून सहानुभूतिपूर्वक या प्रश्नाचा विचार होईल असे केले पाहिजे.  सरकारी कायद्याच्या सक्तीने हे व्हावयाचे नाही.  सर सयाजीराव म्हणतात की, माझ्या कार्यात मला लोकांची सहानुभूतीच पाहिजे.

६.  लोकांनी या वर्गास दूर ठेविले; तसेच हे आपण होऊन दूर राहिले आहेत. म्हणून त्यांनी आत्मस्थिती सुधारण्याचे उपाय योजिले पाहिजेत.  आत्मस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणे हे मनुष्यमात्राचे आद्य कर्तव्य आहे.  प्रोटेस्टंट लोकांनी चळवळ करून, छळ सोसून आपणावरील जुलूम नाहीसा केला.  इंग्लंडात मजूरवर्गाने संघशक्तीने चळवळ करून आपल्या गरजांकडे प्रधानमंडळांचेही लक्ष वेधून घेतले आहे.  पारशी लोक धर्मप्रीतीने स्वदेश सोडून हिंदुस्थानात येऊन राहिले, पण स्वतःच्या पराक्रमावरच आज ते प्रत्येक बाबतीत पुढारी होऊन बसले आहेत.  ब्राह्मणाचे मुख्य काम अध्ययन व अध्यापन, पण ते ब्राह्मणदेखील आज अनेक इतर धंदे करीत आहेत.  मुसलमान बंधूंनी स्वतःच्या हिमतीवर आपल्या हिताचा प्रश्न लाटसाहेबांच्या कौन्सिलापर्यंत नेऊन भिडविला आहे.  ही उदाहरणे पुढे ठेवून अस्पृश्य बंधूंनीही पुढे येऊन चळवळ सुरू करावी व सर्व प्रकारच्या धंद्यांत आपला प्रवेश करून द्यावा म्हणजे स्पर्शास्पर्शाचा प्रश्न आपोआप सुटेल.

७.  नि. सा. मं. ने या लोकांकरिता  १.  परस्पर साहाय्यकारी मंडळया, २. प्रॅक्टिकल मॅन्युअल ट्रेनिंगचे वर्ग, ३. वीव्हिंग स्कूल्स वगैरेंसारख्या संस्थाही काढाव्या व त्यांना निरनिराळे धंदे शिकवावे.  सुशिक्षितांचा ऑफिसांतून प्रवेश व अशिक्षितांच्या शालागृहांत प्रवेश करवून देण्याच्या बाबतीत नि. सा. मंडळीने खटपट करावी.

अंत्यजोध्दाराच्या कार्यातील अडचणी

(लेखक  :  महंत ज्ञानगिरी गोसावी, उपदेशक, सोनई, सत्यसमाज, जि. अहमदनगर.)

१.  आमच्यातील पुष्कळ शहाणी मंडळी उपदेशांत व व्याख्यानांत ओतप्रोत सहानुभूती दाखवितात पण कृतीत ही उतरत नाही.

२.  कदाचित कोणी उदार मनुष्य बोलल्याप्रमाणे करू लागला तर हिंदू समाजातील वरिष्ठ म्हणविणाऱ्या जातीकडून त्यास छळ, उपाहास, त्रास, कष्ट, दुःखे, शिव्याशाप वगैरेंची लेखी व तोंडी लाखोली मिळते.  व या अडचणी त्याला पदोपदी भंडावून सोडतात.  यामुळे अंत्यजोध्दाराच्या बिकट कामात फार विघ्ने येतात.

३.  माझ्या वरील विधानाची सत्यता पाहावयाची असल्यास सूक्ष्मबुध्दीने खेडयांतील व कित्येक प्रसंगी शहरांतीलसुध्दा स्थितीचे निरीक्षण करावे म्हणजे त्यातील सत्यता प्रत्यक्ष दिसून येईल.

४.  निराश्रितांचे स्पर्शास्पर्शाबद्दल माझे स्वतःचे मत खालील अभंगात दिले आहे :

अस्पृश्य म्हणोनी मानितां जयासी ।  अस्पृश्यता त्यासी केवीं सांगा ॥१॥
तनु मानवाची समान सर्वांची ।  काय अस्पृश्याची खूण आहे ॥२॥
सम हस्त-पाद कर्ण-चक्षु-घ्राण ।  मन-बुध्दि-प्राण सारिखेची ॥३॥
अस्थि-मांस-रक्त-चर्माचे वेष्टण ।  सर्वांसी समान एकरूप ॥४॥
क्षुघातृषानिद्रा शरीराचे धर्म ।  अवघे हे कर्म सारिखेची ॥५॥
क्रोधमत्सरादी षड्रिपु वऱ्हाड ।  समान बिऱ्हाड वासनेचे ॥६॥
सर्व भूतांतरी एकचि श्रीहरी ।  अस्पृश्यां अंतरी कोण दूजा ? ॥७॥
ऐसीया विवेके पाहता मानसी ।  स्पृश्यास्पृश्यतेची थारा नाही ॥८॥
ज्ञानगिरी विश्वी सर्वा बंधू मानी ।  अस्पृश्य त्या कोणी दिसेनाची ॥९॥


मराठी भाषा बोलणाऱ्या चांभारांची स्थिती

(लेखक  :  सी. ना. शिवतरकर, मुंबई रोहिदास हितवर्धक समाजाचे माजी चिटणीस.)

१.  जसे महाराष्ट्रात ब्राह्मणादी उच्च जातींमध्ये पोटभेद आहेत, त्याप्रमाणे अस्पृश्य मानिलेल्या जातींमध्येही पुष्कळ पोटभेद आहेत व या पोटभेदात रोटी व बेटीव्यवहार होऊ शकत नाही.  काहींमध्ये रोटीव्यवहार होतो पण बेटीव्यवहार होत नाही.

२.  मराठी बोलणाऱ्या चांभारांमध्ये देशस्थ व कोकणस्थ असे मुख्य दोन भेद आहेत व हा प्रत्येक पोभेद स्वतःला दुसऱ्यापेक्षा वरिष्ठ म्हणवीत असतो.

३.  देशी चांभार - अर्थात देशावर राहणारे चांभार - यांची वस्तीही देशस्थ ब्राह्मणांप्रमाणे देशावरच आहे.  यांच्यात निव्वळ व्यापार करण्याकडे दृष्टी असल्यामुळे विद्येकडे फार थोडयांची दृष्टी असते.  शहरांतील काही चांभार मंडळी आपली मुले ख्रिश्चन अगर म्युनिसिपल शाळांत घालितात.  पण मुलांच्या शिक्षणाची मजल ३-४ इयत्तांच्या पुढे जात नाही.  लगेच त्याला दुकान सुधारावे लागते.  मुलांच्या शिक्षणाची ही स्थिती, मग मुलींच्या शिक्षणाची गोष्ट काढावयास नको.  माझ्या ऐकण्यात फक्त ४-५ मुली मराठी पाचवीपर्यंत शिकलेल्या आहेत, असे आहे.  इंग्रजी शिकलेले लोक देशी चांभारांमध्ये सर्व देशावर मिळून ५-१०सापडतील की नाही शंकाच आहे.  देशावर शहरांतले चांभार लोक चांभार धंद्याखेरीज इतर धंदेही करतात.  कोणी गवंडी, कोणी सुतार, कोणी टांगेवाले, कोणी इंजिनड्रायव्हार व कोणी गार्डही आहेत.  पुण्यानजीक वानवडीचे रा. शिवराम कृष्णाजी कांबळे व दौंडचे दादा मिस्त्री यांनी कंत्राटासारख्या स्वतंत्र धंद्यातही नाव मिळविले आहे.  देशी चांभार आचाराने, राहणीने व स्वच्छतेने कुणबी लोकांच्या खालोखाल आहेत. पण त्यांच्यातही शिक्षणाचा पुष्कळ प्रसार होऊन पुढारी माणसांनी पुढाकार घेऊन उपदेश करून मद्यपान वगैरे बाबतीत यातिनिर्बंध करून त्यांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. व यातीचे पैसे जमतात ते निव्वळ मठ व देवळे बांधण्याकडे खर्च न करता त्या पैशाने आपणाकरिताच का होईना, विद्यादेवीचे जंगी मठ व मंदिरे बांधून ती चालविली पाहिजेत.

४.  कोकणस्थ चांभार हे अर्थात कोकणातले.  यांचीही राहणी वर सांगितल्याप्रमाणे आहे.  यांची वस्ती मुंबईत हल्ली सुमारे सात हजार आहे.  या लोकांचा पूर्वी फलटणीमध्ये प्रवेश होऊन त्यापैकी काही सुभेदार मेजरच्या हुद्दयांपर्यंत चढलेले होते.  पण सध्या यांची लष्करात विशेष भरती नाही.  मुंबईत या कोकणी चांभार मंडळीपैकी बरेच लोक इंग्रजीही शिकलेले आहेत व ते गिरण्या, रेल्वे व खाजगी कंपन्या यांमध्ये क्लार्क आहेत.  व इतर यांत्रिक कामे - टर्नर, पेंटर, सुतार, लोहार, बॉयलर मेकिंग वगैरेही -करीत आहेत.  सारांश, कोकणी चांभारांनी आपला धंदाच न सांभाळता इतर धंद्यांतही ते पुढे येत आहेत. पण ही गोष्ट फक्त मुंबईपुरतीच आहे; इतरत्र नाही.  सर्वात सांगण्यासारखी अभिमानाची गोष्ट ही आहे की, विलायतेतदेखील नाव मिळविलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू रा. बाळू बाबाजी पालवणकर व त्यांचे तिघे बंधू हेही या कोकणी चांभारांपैकीच आहेत, याबद्दल या ज्ञातीला पराकाष्ठेचा अभिमान वाटत आहे.  रा. बाळूसारखी पुष्कळ गुणी माणसे जर जातीत निपजतील तर चांभारांचाच काय, पण कोणत्याही अस्पृश्य जातीचा अस्पृश्यपणा जाण्यास फारच मदत होईल.

५.  चांभारांच्या शिक्षणाच्या बाबतीत अडचणीही पुष्कळ आहेत.  देशावर पुष्कळ शाळांतून आमच्या मुलांना शाळेत घेत नाहीत.  बाहेर बसवितात.  त्यामुळे उन्हात वगैरे बसावे लागते.  सरकारच्या कृपाळूपणाच्या हुकुमाने मास्तरांची आडकाठी नसली तरी गाववाल्यांची जबर आडकाठी असते.  त्यामुळे खेडयापाडयांतून शिक्षणाची हेळसांड होते.  बरे, शहरात तरी चांभारांनी सर्व सवलतीचा फायदा घ्यावा, तर मुलगा ७८ वर्षांचा झाला तरी तोच ते त्याला द्रव्यलोभामुळे आपला धंदा शिकविण्याकरिता घरी ठेवतात. त्याचे लग्नही घरी पैसे नसले तरी कर्ज काढून करितात.  यामुळे बालपणातच बिचाऱ्याच्या पायात बायकोची, कर्जाची व संसाराची अशा तिन्ही बेडया पडतात.  कोकणस्थ चांभारांची पुष्कळ वस्ती मुंबईत आहे पण मुंबईतील राहणी बिकट, खर्च जासत व त्या मानाने पगार थोडा.  शिवाय लग्ने व इतर कामासाठी काढलेले कर्ज यामुळे त्यांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे नीट लक्ष देता येत नाही.  मुलगा ७८ वर्षांचा झाल्याबरोबर ते त्याला गिरणीत ३॥ रुपयांवर लावतात व त्या पैशाचा उपयोग लग्नाच्या कर्जाची फेड व मदिरामंदिराच्या कर्जाची फेड याकडे करितात.  

६.  आमच्या ज्ञातीत शिक्षणप्रसारासंबंधाने चाललेल्या प्रयत्नांची थोडक्यात माहिती :  आमच्यातील मुंबईच्या कॉलेजात १, पुण्याच्या मेलट्रेनिंग कॉलेजात १, मुंबई येथील हायस्कुलांत १० व म्युनिसिपालिटीच्या व नि. सा. मंडळीच्या शाळेत मिळून सरासरी ३०० इतके विद्यार्थी सध्या शिकत आहेत.  मुंबईस रोहिदास हितवर्धक समाज नावाची एक संस्था निघालेली असून ह्या संस्थेमार्फत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीशी मदत होत असते.  शिवाय जातीत असलेल्या वाईट चाली काढून टाकण्यासाठी ही संस्था झटत असते.  गणपती-उत्सवात व स्मशानयात्रेच्या प्रसंगी दारू पिण्याच्या चालीला या संस्थेच्या प्रयत्नाने पुष्कळ आळा पडला आहे.  गिरणीतील मजुरांत फुकट शिकविण्याकरिता या संस्थेने एक नाईट स्कूलही काढले आहे.

७.  चांभार ज्ञातीच्या गरजा  :  १.  या ज्ञातींत विद्येची आवड उत्पन्न होण्याकरिता व्याख्याने, पुराणे, भजने यांसारख्या प्रसंगी वरिष्ठ जातींच्या मंडळींनी यांना उपदेश केला पाहिजे.  २.  देशातील शाळांतून सरकारने ज्या स्कॉलरशिपा ठेविल्या आहेत, त्या, प्रत्येक अस्पृश्य जातीला एक याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात ठेवाव्या व मुंबईसही अशाच स्कॉलरशिपा म्युनिसिपालिटी किंवा सरकार यांनी किंवा दोघांनी मिळून ठेवाव्या.  ३. उच्च प्रतीच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिपा असाव्या.  ४.  या जातीच्या मंडळींना निरनिराळया सरकारी खात्यांतून इतर ज्ञातीच्या लोकांप्रमाणे नोकऱ्या मिळाव्या.  ५. ठिकठिकाणच्या चांभार पुढाऱ्यांनी आपली उन्नती करून घेण्याकरिता प्रयत्न सुरू करावे.

निराश्रितांच्या उन्नतीच्या मार्गातील मुख्य अडचण
(लेखक :  शिमराव जानबा कांबळे, पुणे येथील महार समाजाचे एक पुढारी.)

१.  निराश्रितांच्या उन्नतीच्या मार्गातील अडथळा म्हटला म्हणजे त्यांजवरील अस्पृश्यपणा होय.  हा त्यांजवर लादलेला दोष दूर करण्याचे काम सरकारचे नाही.  हे आमच्या हिंदू समाजाचे आहे व हे जर हिंदू समाजाने केले तर आमच्या सुधारणेचा मार्ग बराच मोकळा होईल.

२.  अस्पृश्यपणा घालविण्याचे काम रेल्वे, आगबोटी, इराणी दुकाने वगैरे करीतच आहेत.  पण वरिष्ठ हिंदूंनी बुध्दिपुरःसर आम्हांस शिवण्याचा प्रघात पाडला पाहिजे.

३.  धर्माभिमानी व कर्मठ हिंदूंना आमची हिच विनंती आहे की, आम्ही अज्ञानी असून अद्याप हिंदुधर्माला चिकटून राहिलो आहोत.  इतकेच नव्हे, तर वरिष्ठ जातीत ज्याप्रमाणे हल्ली धर्मावरील श्रध्दा शिथिल होत चालली आहे त्याप्रमाणे आमची गोष्ट नाही.  आम्हांला हिंदुधर्माचा पूर्ण अभिमान असल्यामुळे आम्ही धर्मांतराचा आश्रय केला नाही.  हे लक्षात घेऊन आमच्याशी न्यायाचे वर्तन सुरू करा.  आपले परमपूज्य बादशहा पंचम जॉर्जमहाराज यांचा Sympathy म्हणजे सहानुभूती हा फार प्रिय व मार्गदर्शक शब्द आहे.  आम्हांलादेखील तुमची सहानुभूती पाहिजे आहे.  एका धर्माच्या अनुयायांत परस्पर बंधुप्रेम नसणे ही मोठया खेदाची गोष्ट आहे.  आम्ही तुमच्या हिंदुधर्माचेच आहो.  त्या हिंदुधर्माचा अभिमान जर तुम्हाला असेल, तर विचार करून दयाळूपणाने आमच्यावरील अस्पृश्यपणा दूर करा.

४.  हिंदुधर्मातल्या लोकांना परधर्मी व परदेशी लोकांनी न्यायाने वागवावे असे वाटत असेल तर त्यांनी प्रथम स्वधर्मीयांनाजवळ करावे व मग सर्वांच्या संघशक्तीने वादविवाद चालू द्यावा.  तोवर इतरांना नावे ठेवण्याची पात्रता त्यांच्या अंगी नाही हे पक्के ध्यानात असावे.

५.  उदारपणाने या प्रश्नाचा विचार करून चाकरी मिळवून देण्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, धार्मिक व सामाजिक बाबतीत जर वरिष्ठ हिंदू आम्हांस मदत करतील; दुःस्थितिगर्तेत बुडालेल्या आम्हांला वर येण्यासाठी जर पुढे हात करतील; तर त्यांचा आश्रय घेऊन आम्ही आपली स्थिती सुधारून या मदतीबद्दल सदैव ॠणी राहू.

अस्पृश्य जातींच्या लोकांकरिता सक्तीच्या शिक्षणाची आवश्यकता
(लेखक :  पांडुरंगराव डांगळे, अहमदनगर येथील निराश्रितांच्या शाळेचे अनुभवी हेडमास्तर.)

१.  अस्पृश्य लोक आज अनेक शतके अस्पृश्य राहिल्याने त्यांना स्वतःच्या वाईट स्थितीबद्दल कल्पनाही नसते.  यांचया मनात त्यांच्या उन्नतीबद्दल कोणी वरिष्ठ जातीचा माणूस उदारपणाने व भूतदयेने प्रेरित होऊन चांगल्या कल्पना भरवून देऊ लागला, तर त्याला स्वजातीयांकडून फार छळ करून घ्यावा लागतो.  यामुळे वरिष्ठ जातींचे लोक या कामी यावे तसे पुढे येत नाहीत.  अस्पृश्यांपैकी कोणी त्यांना स्वतःची राहणी सोडण्याविषयी उपदेश करू लागला तर शतकानुशतके त्या सर्व सवयी अंगवळणी पडल्या असल्यामुळे त्यांना त्यांचा तो उपदेश रुचत नाही व अज्ञानामुळे आपणाभोवती जगात चाललेल्या व्यवहाराकडे कोणत्या दृष्टीने पहावे व आपण त्यातले काय ग्रहण करून त्याप्रमाणे वागावे, हेही समजत नाही.

२.  हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या मानाने पाहता त्यांच्याकरिता काम करणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ वाढली पाहिजे.  नि. सा. मंडळी व सर्वण्ट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थांच्या सभासदांची संख्या वाढून त्यांच्यात या कामाची वाटणी व्हावयास पाहिजे.

३.  दयाळू इंग्रज सरकारने नामदार गोखले त्यांनी वरिष्ठ सरकारी कौन्सिलात ठेविलेल्या सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी निदान अस्पृश्य जातीत तरी करावी.  कारण सक्तीखेरीज सरकारने दयाळूपणाने जरी आमच्याकरिता निराळया शाळा दिल्या, तरी त्या शाळातून अस्पृश्य लोक आपली मुले नियमितपणे पाठवीत नाहीत.  याचे कारण त्यांना ज्ञानाची किंमत समजत नाही.

४.  म्हणून सरकारने निदान ४ ते १४ वर्षांच्या मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा करावा व 'ज्यांसि आपंगिता नाही', असे जे आम्ही त्या आम्हांस हृदयी धरून आमची सुस्थिती होण्याच्या उपायांची योजना करावी. असे केल्यास सरकारने आमळांस अग्निकुंडातून बाहेर काढून आम्हावर अमृतवृष्टी केली असे होईल.

५.  आमच्या हिंदी समाजातील सुशिक्षित बंधूंना आमची ही विनंती आहे की, त्यांनी सक्तीच्या शिक्षणाबद्दल म्युनिसिपालिटया, संस्थाने व इतर सार्वजनिक संस्थांतून सारखी चर्चा चालू ठेवावी व अशा रीतीने लोकमत जागृत ठेवून पुनःपुनः ही गोष्ट दयाळू सरकारचे नजरेस आणीत जावी.

प्रत्येक जिल्ह्याच्या गावी निराश्रितांकरिता फ्री बोर्डिंगची आवश्यकता
(लेखक :  नरसू शिंदू सूर्यवंशी, असिस्टंट मास्तर, अहमदनगर.)

दयाळू इंग्रज सरकारने जरी निराश्रितांकरिता शाळा काढिल्या, तरी ह्या शाळांत येऊन शिक्षण घेणारी मुले त्या शाळांत साधारण १० वर्षांची होईपर्यंत टिकतात.  पुढे त्यांचे आईबाप, पालक पंतोजींकडे येऊन 'गरिबीमुळे मुलांस शाळेतून काढावे लागत आहे', 'मुलाचे शिक्षण पुढे चालावे अशी इच्छा आहे, पण पैशाची सवड नाही' या सबबी सांगून त्यांस शाळेतून काढतात व या रीतीने अर्धवट शिकलेली मुले लवकरच विसरतात.  तरी अशा मुलांपैकी निदान होतकरू व हुशार मुलांची पुढे विद्या चालावी म्हणून त्यांच्याकरिता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक फ्री बोर्डिंग सुरू करावे, अशी निराश्रित साहाय्यकारी मंडळीस सर्व निराश्रितांतर्फे माझी नम्र विनंती आहे.

खेडेगावांतील अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाच्या मार्गातील अडचणी
(लेखक :  जनक साधू शेलार (महार), कॅबिनमन, लोणावळे.)

१.  शहरांतून ज्याप्रमाणे निराश्रितांकरिता निराळया शाळा, भजन समाज व लायब्रऱ्या आहेत, त्याप्रमाणे खेडयापाडयांतून काहीच सोयी नाहीत.  त्याचप्रमाणे शहरांतल्याप्रमाणे खेडयांतून नोकऱ्याही मिळत नाहीत.  यामुळे खेडयांतील अस्पृश्य अत्यंत गरीब असतात, त्यांच्यासाठी शाळांची व्यवस्था व्हावी.  ज्या ठिकाणी सरकारी शाळांत अशा मुलांना घेत असतील, या ठिकाणची गोष्ट अलाहिदा.  पण ज्या ठिकाणी गावकरी अस्पृश्यांना शाळेत बसू देत नाहीत, त्या ठिकाणी त्यांच्याकरिता निराळी तजवीज रात्रशाळा काढून करावी.

२.  खेडेगावांतील शाळांतून जरी अस्पृश्य मुलांना घेतले तरी निराळे बसावे लागते व मुलांच्या अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष पुरविले जात नाही; त्यामुळे मुलाला शाळा सोडावी लागते किंवा त्यांची 'वर्तणूक वाईट' असा शेरा मारून पंतोजीही त्यांचे नाव काढून टाकितात.

३.  अस्पृश्य लोकांना शिकून कोठे सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत काय ?  असा प्रश्न आमचेच लोक आम्हांस विचारतात.  याचे उत्तर काय द्यावे हे आम्हांस समजत नाही.  कारण नोकरी मिळण्यास कायद्याने कोणतीही हरकत नाही.  पण मिळत मात्र नाही.  मला स्वतःला एका दयाळू इंग्रज गृहस्थांनी म्युनिसिपालिटीत नोकरी दिली, पण त्यांच्या जागी एक ब्राह्मण गृहस्थ आल्याबरोबर त्यांनी एक महिन्याच्या आत मला कमी केले.  यावर अर्थातच मला आमच्या जातीच्या लोकांनी, तुम्ही शिकून काय केलेत ?  असा प्रश्न केला.  त्याचे उत्तर मी तरी काय देणार ?  त्या वेळी मी धर्मांतर करण्याइतका निराश झालो होतो पण माझ्या परमपूज्य तीर्थरूपांनी उपदेश करून माझे मन थाऱ्यावर आणिले.

४.  अस्पृश्य जातीच्या लोणावळे येथील मुलांना त्यांचे पालक मुलगे ८-९ वर्षांचे झाल्याबरोबर कोणा तरी साहेबाकडे अगर रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये क्लीनरची नोकरी लावतात व त्या मुलांना अज्ञानामुळे व वाईट संगतीमुळे जुगार, चोऱ्या करणे व दारू पिणे या सवयीही बालपणापासूनच लागतात. तरी या मुलांकरिता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व नि. सा मंडळीने मिळून रात्रीची शाळा व भजन समाज काढून त्यांची सुधारणा करावी.

मांग लोकांच्या गरजा

(लेखक :  श्रीपतराव नांदणे, मांग, मु. सातारा.)

१.  आमची मांग लोकांची संख्या सुमारे वीस लक्ष आहे.  परंतु इतर जातींस म्हणजे महार, रामोशी चांभार, कुंभार वगैरेंना मूळच्या जमिनी व इनाम जमिनी आहेत; परंतु मांग लोकांस मुळीच नाहीत.  जंगलखात्यातून मुलकी खात्याकडे ज्या जमिनी गेल्या आहेत व मुलकी जमिनी व खालसा झालेल्या जमिनी ज्या ठिकाणी शिल्लक आहेत, त्या ठिकाणी त्या मांग लोकांना देण्याची दयाळू इंग्रज सरकारने तजवीज करावी.

२.  मांग लोकांना ते कोठेही असले तरी चौकीवर हजिरी देण्याची तसदी आहे.  तरी ती जातीवर न ठेवता सरकारने माणसांवर ठेवून निदान चांगल्या माणसांवरील तरी माफ करावी, नाही तर त्यामुळे थोडक्या मंडळींकरिता सर्व जातीला त्रास सोसावा लागतो.

३.  मांग लोकांचे धंदे दोऱ्या वळणे वगैरे नीट चालावे म्हणून सरकारने त्यांना वाकाची लागवड कशी करावी हे शिकवावे व वाकाच्या दोऱ्या करण्याची यंत्रे देऊन त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही तरी उपाय योजावे, अशी सरकारास विनंती आहे.

मांग लोकांच्या अडचणी व गरजा

(लेखक  :  विश्वनाथ विष्णू साळवे, मांग, गंज पेठ, पुणे.)

१.  आमच्या मुलांकरिता बोर्डिंगशाळा काढाव्या व मोफत शिक्षण द्यावे.
२.  आमच्यासाठी निरनिराळे धंदे काढावे व आम्हास स्वसंरक्षणाचे निरनिराळे मार्ग दाखवून द्यावे.
३.  जी माणसे दिवसा काम करतात, त्यांसाठी रात्रीच्या शाळा काढाव्या.
(लेखक :  सीताराम लांडगे, म्यु. स्कूल मास्तर, गंज पेठ, पुणे.)

१.  अस्पृश्य लोकांच्या अंगी गलिच्छपणाने राहणे, पड खाणे, उच्छिष्ट अन्न खाणे, मद्यपान करणे, जुगार खेळणे, नाच, तमाशाची आवड वगैरे गलिच्छ सवयी आहेत.  त्यामुळे या लोकांबद्दल तिरस्कार उत्पन्न होतो.

२.  तरी अस्पृश्य बांधवांनी वरील सर्व व्यसने टाकून, शिक्षणाचा लाभ घेऊन आपली उन्नती करून घ्यावी.

निराश्रित साहाय्यक मंडळी

हिंदुस्थानातील अस्पृश्य मानिलेल्या लोकांची स्थिती अत्यंत शोचनीय आहे व त्यांच्या उन्नतीसंबंधी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, असे वरिष्ठ वर्गांतील लोकांना पुष्कळ वर्षे वाटत आहे; पण आपल्या महराष्ट्र प्रांतात ह्या कामी प्रथमतः खऱ्या प्रयत्नाला आरंभ केल्याचे श्रेय परलोकवासी श्रीयुत जोतीबा फुले ह्यांनाच द्यावे लागेल.  त्यांच्याच श्रमाने पुणे मुक्कामी ह्या लोकांसाठी एक-दोन शाळा स्थापन करण्यात आल्या.  हल्ली त्या तेथील म्युनिसिपालिटीच्या ताब्यात आहेत.  त्यानंतर ह्या हतभागी लोकांकडे ज्या दुसऱ्या उदार अंतःकरणाच्या पुरुषाचे लक्ष गेले; ते परलोकवासी श्रीयुत रामचंद्र अण्णाजी कळसकर हे होत.  ह्यांनी प्रथम 'वांगी व्हिलेज एज्युकेशन सोसायटी' नावाची संस्था वांगी येथे स्थापन करून नंतर ती बारामती येथे नेली.  ह्या संस्थेच्या आश्रयाखाली त्यांनी महार लोकांकरिता खेडयांतून काही शाळा उघडल्या होत्या; पण त्या फार दिवस चालल्या नाहीत.  हे काम भरपूर द्रव्यसाहाय्याशिवाय नावारूपास येणे शक्य नव्हते; सरकार, संस्थानिक आणि श्रीमंत व्यापारी ह्यांच्याजवळ द्रव्यबळ आणि सत्ताबळही असतात; पण तेवढयाने अशी कामे उदयाला येत नाहीत.  हे मुंबईसारखी धनाढय शहरे आणि इंग्रजांसारखे मातबर आणि न्यायी सरकार ह्या देशात पिढयानपिढया असूनही ह्या दीन लोकांचे भाग्य उदयास आले नाही ह्यावरून उघड होते.  महानुभाव श्रीमंत सयाजीराजे ह्यांच्या कारकीर्दीत मात्र ह्या दीनांची बरीच दाद लागत आहे व अलीकडे कोल्हापूर येथेही बरीच चळवळ चालली आहे, पण काही होवो; हे कार्य इतके अवघड आहे की, तशीच असाधारण धर्मप्रेरणा झाल्याशिवाय आणि कोणत्यातरी एका नव्या जोमाच्या उदार पंथाने पुढाकार घेतल्याशिवाय ह्याला काही रूप येईल, हे अद्यापि संभवत नाही.

प्रार्थनासमाज, ह्या कामी हळूळहू पण बिनबोभाट आज बरीच वर्षे अल्पस्वल्प प्रयत्न करीत आला आहे.  मुंबई, पुणे, सातारा, अहमदनगर ह्या ठिकाणी ह्या लोकांकरिता रात्रीच्या शाळा उघडून त्यांतून समाजाचे प्रचारक थोडाबहुत धार्मिक आणि नैतिक उपदेश आज बरीच वर्षे करीत आहेत.  अलीकडे ह्या वर्गाविषयी कळवळा वाटणारांना हुरूप येण्यासारखा एक नवीन प्रकार दिसून येतो, तो हा की, आज कित्येक वर्षे अज्ञान आणि कंगाल अवस्थेच्या चिखलात रुतून गेलेल्या ह्या हतभागी लोकांतच स्वतःची स्थिती सुधारण्यासंबंधी जागृती दिसू लागली आहे.

ह्या अपूर्व जागृतीस इंग्रजी राज्याचे औदार्य आणि त्या औदार्याची अपूर्णता ह्या दोन्ही परस्परभिन्न गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत.  इंग्रजी राज्यातील समतेच्या वागणुकीमुळे महारमांगांची लष्करांत भरती होऊन गेल्या दोनतीन पिढयांत ह्या वर्गातील बरेच लोक हवालदार, जमादार आणि सुभेदार-बहादूर अशा पदवीला पोहचले होते.  शिवाय, साहेबलोकांच्या खासगी तैनातीत बटलरचे वगैरे धंदेही इमानाने बजावून त्यांच्या साहजिक समागमाने ह्या वर्गातील बरीच कुटुंबे अंमळ सुखवस्तू झाली; पण ह्या बाबतीतील आपल्या उदार धोरणाचा विकास उत्तरोत्तर जास्त होऊ देण्याचे नैतिक धैर्य आणि शक्ती ह्या जातिभेदाने सडलेल्या देशात इंग्रज बहादुरांच्याही अंगी कायम राहिली नाही व सुमारे पंधरा वर्षांपासून अलीकडे ह्या लोकांची लष्करात पूर्वीप्रमाणे भरती होईनाशी झाली आहे.  पुढे येण्याला जो एकच मार्ग खुला होता, तोही अशा रीतीने बंद झालेला पाहून ह्या लोकांचे आपल्या निराश्रित अवस्थेसंबंधी डोळे किंचित उघडू लागले.  ह्या बाबतीत प्रथम जे प्रयत्न झाले व अजून चालू आहेत; त्याचे बरेचसे श्रेय पुणे येथील महार जातीतील पाणीदार गृहस्थ श्रीयुत शिवराम जानबा कांबळे यांजकडे आहे.  श्रीयुत कांबळे ह्यांचा मुख्य रोख जरी सरकारात आपल्या जातीची पूर्वीप्रमाणे भरती व्हावी म्हणून कायदेशीर पध्दतीने अर्ज करण्याचाच अद्याप आहे, तरी आपल्या जातीला शिक्षण मिळून तिचे पाऊल पुढे पडावे म्हणून त्यांचे दुसऱ्या बाजूनेही अविश्रांत श्रम चालले आहेत.  त्यांनी 'सोमवंशीय समाज' नावाची संस्था पुण्यास काढली असून तिच्याच नमुन्यावर अहमदनगर येथे श्रीयुत श्रीपतराव थोरात आणि पांडोबा डांगळे ह्यांच्या परिश्रमाने दुसरा एक 'सोमवंशीय समाज' सन १९०५ सालच्या जून महिन्यात स्थापन झाला आहे.  ह्या पूर्वी नागपूरजवळ मोहपा येथे श्रीयुत किसन फागू नावाच्या एका तरुण आणि स्वार्थत्यागी गृहस्थाने धर्माच्या पायावर एक समाज स्थापून चळवळ चालविली होती.  मुंबई येथील प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनची काही उदार मतांची पुस्तके वाचून ह्या तरुण गृहस्थाचे मन प्रार्थनासमाजाकडे वळले.  प्रार्थनासमाजाविषयी प्रत्यक्ष माहिती करून घेण्यासाठी म्हणून मुंबई प्रार्थनासमाजाच्या १९०५ सालाच्या वार्षिक उत्सवाला श्रीयुत किसन फागू हे आले होते.  तेथे पंधरा दिवसांच्या पाहुणचारामुळे त्यांची आणि समाजाच्या काही मंडळीची ओळख होऊन परस्पर हेतूंची आणि प्रयत्नांची परस्परांस माहिती झाली.  शेवटी हे गृहस्थ समाजाच्या प्रीतिभोजनातही हजर असल्याचे प्रसिध्दच आहे.  ह्या ओळखीमुळे ह्या जातीतील आत्मोन्नतीसंबंधी ज्या काही चळवळी चालल्या होत्या, त्यांकडे समाजाच्या प्रचारकांचेही बरेचसे लक्ष वेधले व पुढे लवकरच (हल्ली परलोकवासी झालेले) स्वामी स्वात्मानंद आणि मी असे दोघे अहमदनगरास फिरतीवर गेलो असता तेथील नवीनच स्थापना झालेल्या 'सोमवंशीय समाजा'मार्फत भिंगार नावाच्या खेडयातील महारवाडया आमची काही व्याख्याने झाली.

लोकांची हळूहळू या विषयाकडे सहानुभूती वळू लागली, आणि विशेषेकरून मुंबई प्रार्थनासमाजाच्या आणि सोशन रिफॉर्म असोसिएशनच्या उदार मनाच्या अध्यक्षांनी या कामात बरेच प्रोत्साहन दिल्यामुळे मी एक निबंध लिहून त्यात या लोकांची कशी स्थिती आहे, संख्या किती आहे, यांच्यासाठी कोणी काय काय केले आहे, या मुद्दयाचे विवरण केले आणि शेवटी यांना वर आणण्याकरिता एतद्देशीय लोकांनी आपले पौरस्त्य आचार, रीतिरिवाज आणि परंपरा यांना धरून एक कायमचे मिशनच स्थापले पाहिजे आणि ते सध्याच्या स्थितीत प्रार्थनासमाजाशिवाय दुसऱ्याकडून होणे विशेष संभवनीय नाही, असे विचार, उदार मतवादी समाजबंधूंपुढे मांडले.  हा निबंध 'इंडियन सोशल रिफॉर्मर'च्या ता. २९ जुलै १९०६ च्या अंकात प्रसिध्द झाला व नंतर स्वतंत्र पुस्तकरूपाने छापून प्रार्थनासमाजाच्या पोस्टल मिशनच्या आश्रयाने त्याच्या पुष्कळ प्रती वाटण्यात आल्या. विचार केला, सहानुभूती मिळाली, निर्णय झाला, निश्चय झाला.  तथापि 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' हे त्रिकालसत्य कधी खोटे व्हावयाचे नाही.  म्हणून ह्या तांदुळांची वाट काही दिवस पहावी लागली.

नावांची व्युत्पत्ती व इतिहास

प्रकरण आठवे
आता काही मुख्य जातींच्या नावांची मूळ व्युत्पत्ती काय असावी, ह्याचे भाषाशास्त्राच्या निर्विकार दृष्टीने विवेचन करून ह्या हीन मानलेल्या जाती खरोखर मुळातच हीन होत्या, किंवा त्यांचया नावांतूनही काही उज्ज्वल पूर्वेतिहासाचा पुरावा बाहेर डोकावत आहे, हे पाहण्याचा मी प्रयत्न करीत आहे.  हे विवेचन करण्यासाठी ज्या थोडया जाती मी निवडल्या आहेत; त्या जातींच्या लोकांमध्ये मी स्वतः बहुशः दोन-दोन, चार-चार महिने, क्वचित वर्ष वर्षभरही, जाऊन राहिलो आहे.  त्यात माझा हेतू हा होता की, त्यांचे खाद्य, पेय, पेहराव, डामडौल, व्यक्तिविषयक आवडी, घरगुती चालरीत, जातीय परंपरा, ह्या गोष्टी समक्ष निरखून पहाव्या.  आज माझ्या तीस वर्षांच्या सूक्ष्म निरीक्षणानंतर मला ह्या कित्येक हतभागी जातींचे ऊर्फ राष्ट्रांचे मूळ उज्ज्वल असावे, असे स्वतंत्रपणे वाटत आहे.  पुढील व्युत्पत्तीमध्ये माझे भाषाशास्त्र सपशेल जरी चुकले असले, तरी त्यामुळे माझ्या इतर निरीक्षणाला बाधा येत नाही.  उलट पक्षी, माझी व्युत्पत्ती खरी ठरल्यास मात्र तो एक स्वतंत्र पुरावा होईल. एवढयाच उद्देशाने माझ्या ह्या ऐतिहासिक विषयाला हे जे व्युत्पत्तीचे ठिगळ जोडण्याचे धाडस मी केले आहे, ते अगदी अनाठायी ठरेल, असे मला वाटत नाही.

महार (महाराष्ट्र)

महार ह्या नावाचा विस्तार मराठी भाषेपुरता अथवा महाराष्ट्रापुरताच नसून पंजाबी, सिंधी, गुजराथी, राजस्थानी, हिंदी, बंगाली, ओरिया, तेलगू, आसामी, इतक्या भाषांतून व अनुक्रमे देशांतून आढळतो.  तो असा :- महार, म्हार - आधुनिक महाराष्ट्र, मध्य हिंदुस्थान; म्हेतर, म्हेर, मेर - गुजराथ, मारवाड, माळवा, राजपुताना आणि मध्य प्रांताचा हिंदी भाग; मेघ, मघ-मेघवाळ, मोघिया-पंजाब, गुजराथ, ग्वाल्हेर; माल, मालो, माली, मलयन-बंगाल, ओरिसा, आंध्र, मलबार.

महार ह्या नावाची आजवर अनेक निरुत्तेफ् सुचविण्यात आली आहेत.  त्यांपैकी काही विक्षिप्त आहेत, तर काही विचार करण्यासारखी आहे.  महाअरी = मोठा शत्रू अशी व्युत्पत्ती जोतीबा फुले ह्यांनी सुचविली आहे.  दुसरी अशी आहे : पार्वतीच्या कपाळावर घामाचा बिंदू आला, तो एका कमळ पत्रावर पडला; त्याचे सुंदर मूल होऊन खेळू लागले.  ते रांगत बाहेर जाऊन एक मेलेली गाय खाऊ लागले.  म्हणून शिवाने रागावून त्यास महा आहारी - मोठा खादाड - होशील असा शाप दिला.  तो महार झाला; ही विक्षिप्त निरुत्तेफ्.

मृताहर  :   परलोकवासी डॉ. सर भांडारकर ह्यांनी मृताहर अशी व्युत्पत्ती सुचविली होती.  इ.स. १९१२ साली पुण्यात डी. सी. मिशनची पहिली अस्पृश्यतानिवारक परिषद भरली, तिचे अध्यक्ष ह्या नात्याने डॉक्टरसाहेबांनी ही प्रथमतःच पुढे आणिली. मृत + आहार = मेलेली गुरे ओढून नेणारा, हा अर्थ ह्या लोकांच्या चालू धंद्याला लागू पडतो.  पण संस्कृत वाङमयात ह्या नावाचा असा प्रचार कोठे आढळत नाही. माडेय पुराणातील ३२ व्या अध्यायात पुढील श्लोक आहेत :

उदक्याश्वशृगालादीन्सूतिकान्त्यावसायिनः ।
स्पृष्ट्वा स्नायीत शौचार्थ तथैव मृतहारिणः ॥३३॥
मृतनिर्यातकाश्वैव परदारारताश्च ये ।
एतदेव हि कर्तव्यं प्राज्ञैः शोधनमात्मनः ॥४०॥
अभोज्यसृतिकाषंढमार्जाराखुश्वकुक्कुटान ।
पतिताविध्दचंडालान् मृताहारांश्च धर्मविद् ॥४१॥
संस्पृश्य शुध्दयते स्नानादुदक्याग्रामसूकरौ ।
तद्वच्च सूचिकाशौचदूषितौ पुरुषावपि ॥४२॥

वरील उताऱ्यास चांडाल, अन्त्यावसायी, असे शब्द योजून पुनः मृताहार, मृतहारि, मृतनिर्यातक असे शब्द घातले आहेत.  मृत ह्याचा अर्थ मनुष्य अथवा प्रेत असाच आहे.  मेलेली ढोरे अशा अर्थाचा संदर्भ ह्या ठिकाणी मुळीच संभवत नाही.  वरिष्ठ जातीच्या माणसांची प्रेते महार नेऊ शकणार नाही, म्हणून मृतांचे आप्त असाच येथे अर्थ आहे.  मृताहार म्हणजे मेलेली ढोरे ओढणारा असा अर्थ डॉ. भांडारकर ह्यांनी नव्यानेच केलेला दिसतो.  महार असे मागाहून संभावित मराठीत रूपान्तर झाले, त्याचे मूळ रूप म्हार असे गावंढळांचे तोंडांत अद्यापि आहे, तेच रूप पहिले असावे.  माळव्यात व नागपुराकडे हिंदी भाषेत 'म्हेर' असे रूप हल्लीही आहे; त्यावरून मराठीत म्हार असे होणेच जास्त संभवनीय आहे.  त्याचा संभावित अपभ्रंश महार असा करून पुनः त्याचे 'मृताहर' असे संस्कृत रूप मानण्यात फारच दुरान्वय होत आहे.  म्हार हे पूर्वीपासूनच मेलेली गुरे ओढणारे होते, ही कल्पना इतिहासाला धरून नाही; म्हणून ही व्युत्पत्ती असमर्थनीय ठरते.  माळव्याप्रमाणे गुजराथेतही म्हारांना म्हेत्तर असे म्हणतात.  त्यापासून म्हेर असे रूप होणे शक्य आहे.  अजमीर-मेरवाडामध्ये म्हेर असे रूप आहे.  म्हेतर (महत्तर) म्हणजे मोठा अथवा जुना माणूस.  म्हातारा शब्दाचीही हीच व्युत्पत्ती आहे.  आणि हीच व्युत्पत्ती ह्या प्राचीन जातीच्या इतिहासाला अधिक सुसंगत दिसते.

म्हार म्हात्म्य  :   ह्या पुराणाची हस्तलिखित पोथी इ.स. १९०७ साली परळ येथील आमच्या रात्रीच्या शाळेतील एका भाविक म्हार मुलाने मला दिली.  तिची भाषा मासलेवाईक म्हारी आहे.  ह्यात म्हार, म्हादेव, म्हामुनी असे नमुनेदार शब्द आहेत.  ह्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी खालीलप्रमाणे मूळ वर्णिले आहे.

आद्यन्त तुमच्या ववस्याचे म्हैमा ।  सेस न वर्णवी झाली सीमा ।  वेदा न कळे आगमा ।  सोमववष अप्रंपार ॥२॥  हे म्हार म्हात्म्य कथा आगळी ।  जो का धरील हृदयकाळी ।  तयाचे द्वीतभावाची होळी ।  करील रुषि माडी ॥३॥ ... तरी हा माडी मूळ पुरुष ।  तयापासून म्हाराचा ववस ।  ऐसा सजना हो सावकास ।  चित्ती विश्वास धरुनिया ॥५॥ अनंत यौगापासून ।  कितीक राजाचे ढळले जन ॥  परी हा म्हार जुनाट पुरातन ।  न ढळेची कल्पान्ती ॥६॥  देव झाले उदंड ।  परि हा म्हार अक्षय्य काळदंड ।  ह्याच्या स्वाधीन नवखंड ।  केले मुळीच क्रत्यांनी ॥७॥

मुसलमानांचा संबंध मोठा चमत्कारिक उल्लेखिला आहे.

म्हार आणि मुसलमान ।  हे दोघे एक वंशे उत्पन्न ।  चंद्र वंश पूर्ण ।  सोम म्हणती तयालागे ॥  अ. ३ ओवी १९.

तिसऱ्या अध्यायाच्या आरंभी विलक्षण आचार सांगितला आहे.  ह्या अध्यायाची ७६ वी ओवी अशी आहे :

म्हाराचा मूळ पुरुष सोमाजी नाम ।  दैवत सिव, देस मार्वड उत्तम ।  रुषि माडेय तयाचा उत्तम ।  घाई पूर्ण गरजतसे ॥७६॥

सहाव्या अध्यायात ४९ व्या ओवीपासून आद्य शून्यवादाचे वर्णन आहे.  ह्यात महायान बौध्द धर्माची छटा दिसते.  सातव्या अध्यायात कर्त्याचे नाव आहे.

''पूर्वी व्यास वाल्मिक मनी ।  सुखसनकादिक आदि करुनी ।  तयाने हे म्हार म्हात्म्य रत्नखाणी ।  कल्पित करोनी ठेविले ॥१६॥  तयाची चतुरा ऐसी ।  कलियुगी अवतरला बाळकदास ।  त्यांनी ह्या म्हार म्हात्म्याचा प्रकास ।  करोनि दाखविला कलियुगी ॥''

सातव्या अध्यायाच्या शेवटी ग्रंथसमाप्तीचे स्थळ व काळ सांगितला आहे.

''पूर्वे सन्निध पने पाकन ।  पावणे दोन योजन ।  दक्षिणेस गोदावरी पूर्ण ।  तीन योजने जाण बा ॥८०॥  पश्चिमेस नीराबाई मध्ये ।  उत्तरभागी पाडेगाव आहे ।  ग्रंथकर्त्याचा अवतार पाहे ।  तेथे झाला जाणिजे ॥८१॥  शके १८८८ (?) । सर्वधारी नाम संवत्सर प्रवेसी ।  वैशाख वद्य पंचमीस ।  ग्रंथ समाप्त झाला पै ॥८२॥ चंद्रवार ते दिसि ।  सोमवंश प्रवेसी ।  प्रथम प्रहारासी ।  ग्रंथ समाप्त केला हो ॥८३॥

शके १८८८ असे चुकून पडले असावे.  शके १७८८ असावे.  येरवी पुढील ओवीचा प्रास जुळणार नाही.  शके १८८८ पुढे यावयाचे आहे.

Read more: नावांची व्युत्पत्ती व इतिहास
  1. धर्म
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. डी.सी. मिशनचा १७वा वाढदिवस*
  4. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंती
  • 130
  • 131
  • 132
  • 133
  • 134
  • 135
  • 136
  • 137
  • 138
  • 139
Page 135 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी