धर्म

प्रकरण नववे

आतापर्यंतच्या विवेचनावरून दिसून आले असले पाहिजे की, हिंदुस्थानात हल्ली ज्या मानीव अस्पृश्यांच्या असंख्य जाती आहेत, त्या अगदी भिन्न भिन्न वंशांतून आलेल्या आहेत व त्यांची संस्कृती आणि दर्जाही भिन्न आहे; इतकेच नव्हे तर, त्यांच्या संस्कृतीत मध्यंतरीच्या इतिहासात बरेच चढउतार झाले आहेत.  पण हेही खरे की आजकालच्या अस्पृश्य जातींपैकी ज्यांनी प्राचीन काळी वैभव भोगिले असावे, अशांवरही पुढे अस्पृश्यतेचा परिणाम बरीच शतके होत आल्याने स्वाभाविकपणे त्यांच्या संस्कृतीचा फार बिघाड झालेला आहे.  ह्या आणि पुढील प्रकरणांतील विषयाचा विचार कातना ह्या जातींमध्ये घडलेल्या मध्यंतरीच्या कालवाकालवीकडे दृष्टी ठेवणे जरूर आहे. एरवी आमच्या विचारांना एकांगीपणा येऊन, ह्या बिचाऱ्यांवर आणखी एका नवीन अन्यायाचा बोजा पडेल !

ह्या प्रकरणात 'धर्म' हा जो शब्द योजिण्यात आला आहे तो सामुदायिक धर्म म्हणजे धार्मिक पंथ किंवा संघ ह्या अर्थानेच योजिला आहे.  धर्माचा जो आध्यात्मिक अथवा परमार्थिक अर्थ आहे तो केव्हाही व्यक्तिपुरताच असतो.  तो सामुदाचिक होऊ शकतच नाही.  सामुदायिक अर्थ म्हणजे पंथ अथवा संघ हा देश, काल अथवा जनसमाज यांच्या संकेताप्रमाणे बदलणारा भिन्न असतो.  धर्माचा खरा अर्थ आध्यात्मिक असतो, तो काही कोणा समूहाच्या संकेताप्रमाणे बदलणारा नसतो.  तो सनातन असून केवळ व्यक्तीच्या अनुभवातच आढळून येणारा असतो.  ती व्यक्ती स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित कशीही असो; प्रौढ वय आणि शुध्द भावना असली की पुरे.  तिच्या अनुभवात आणि जीवनव्यवहारात कमी अधिक मानाने हा सनातन धर्म आढळणारच.  हा सनातन धर्म ह्या प्रकरणाचा मुळीच विषय नव्हे.  इतकेच नव्हे, ह्या सार्वत्रिक धर्माला हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती वगैरे नावांनी संबोधिताही येणार नाही.

येथून पुढील प्रकरणांत अस्पृश्यतेचा, अर्थात हिंदुस्थानात आज हजारो वर्षे वर दिलेल्या व्याख्येनुसार बळी पडलेल्या असंख्य जनसमूहाचा प्रश्न धसाला लागत आहे.  पहिला प्रश्न हा आहे की, ह्या अवाढव्य अस्पृश्य समाजाचा धर्म कोणता ?  म्हणजे सामाजिक आणि कायद्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने सुधारलेल्या जगात हल्ली जे दहापाच मोठे मोठे सर्वमान्य धर्मसंघ, अथवा गट, रूढ झाले आहेत, त्यांपैकी कोणत्यात ह्यांचा समावेश होत आहे किवा होण्यासारखा आहे ?  कोणी सहज विचारतील की, हा प्रश्नच मुळी कसा उद्भवतो ?  अर्थात हे सर्व लोक हिंदुधर्मसंघात आजपर्यंत वावरत आले असून आताच ही विक्षिप्त दीर्घ शंका का आली ? शंका दीर्घ असो की विक्षिप्त वाटो, ती अनाठायी नाही.  अगोदर हिंदुधर्माचीच ठाम व्याख्या होत नाही.  यहुदी, झरतुष्ट्री (पारशी), बौध्द, जैन, ख्रिस्ती, मुसलमान, ह्या मोठया आणि प्राचीन, किंवा शीख, लिंगायत, ब्राह्म समाज, आर्यसमाज, देवसमाज वगैरे अर्वाचीन लहान संघांप्रमाणे हिंदुसंघाच्या मर्यादा इतिहासाच्या दृष्टीने, किंबहुना लोकव्यवहाराच्या दृष्टीनेही ठाम ठरविता येत नाहीत.  हिंदुधर्म ही एक केवळ पुरातन काळापासून चालत आलेली रूढी आहे.  कोणत्याही रूढीच्या मर्यादा ठरविणे जितके कठीण आहे, त्याहूनही ह्या हिंदू धर्मरूपी पुरातन रूढीच्या मर्यादा ठरविणे अनंत पटीने जास्त दुरापास्त आहे.  हे काम जवळ जवळ अशक्य आहे.  हिंदुधर्म हे एक मायपोट आहे !  ह्यात सगळया जगाचाही समावेश करू पाहणाराचा हात कोणालाही, निदान तर्कशास्त्राचे दृष्टीने, धरता येणार नाही.  कोणी म्हणेल, हिंदू म्हणजे जातिभेद मानणाऱ्यांचा एक गट आहे.  पण शीख, लिंगायत, ब्राह्म समाज वगैरे अलीकडचे जातिभेद न मानणारे पंथही खानेसुमारीच्या अहवालात बिनबोभाट हिंदू ह्या सदरात गणले जात नाहीत काय ?  परवापर्यंत मिश्रविवाह करू पाहणाऱ्यांना आपण हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती वगैरेंपैकी कोणी नाही असे लिहून दिल्याशिवाय इंग्रज सरकारचे रजिस्ट्रार त्यांचा विवाह नोंदण्याचे नाकारीत असत.  पण अलीकडे सर हरिसिंग गौरच्या ह्या कायद्यातील सुधारणेमुळे ही खुंटीही अगदी ढिली झाली आहे.  गौरच्या सुधारणेपूर्वीही अनेक मिश्रविवाहितांनी आपले विवाह नोंदून घेण्याचेच मुळी साफ नाकारले आहे.  म्हणून तेवढयानेच ते हिंदू नाहीत असे कोण म्हणू शकेल ?  मनुस्मृतीत वर्णसंकराचा कितीही बाऊ दाखविला असला, तरी प्रत्यक्ष मनुस्मृतीच्या काळातही चार वर्णांच्या मर्यादा ठरविणे जे अशक्य होते, ते आता शक्य थोडेच झाले आहे ?  तात्पर्य काय की हिंदू धर्माची धरी व्याख्या म्हणजे जो कोणी आपल्यास हिंदू म्हणवीत असेल, तोच हिंदू.  जो हिंदू असूनही म्हणवून घेण्यास तयार नसेल त्याच्यावर कोण जबरी करू शकेल ?  रोजच्या व्यवहाराच्या दृष्टीने इतक्या खोल पाण्यात शिरण्याची तसदी कोणी घेत नाही.  पण खानेसुमारी तयार करणारावर ह्या खोल पाण्यात शिरण्याची जबाबदारी अलबत पडते; ती त्याला टाळता येणार नाही.  आजच्या आमच्या ह्या खंडवजा मोठया देशात असे अनेक असंसकृत मागासलेले जनसमूद आहेत की, ते आपण हिंदू आहोत की नाही, ह्या प्रश्नाला काहीच उत्तर देऊ शकत नाहीत; किंबहुना देऊ इच्छितही नाहीत.  अशा असंख्य असंस्कृतांच्या आचारविचारांची नीट पाहणी करून व त्यांच्या लक्षणांची व्याख्या ठरवून त्यांना धर्माच्या सदरात एक विवक्षित जागा देणे खानेसुमारीच्या खात्याला भाग पडते.

इ.स. १९०१ साली हिंदी खानेसुमारीचे प्रमुखत्व जेव्हा सर एच. एच. रिस्ले ह्या नामांकित समाजशास्त्रज्ञाकउे सोपविण्यात आले, तेव्हा त्याला अशा अनेक असंस्कृत जाती ह्या देशात आढळून आल्या की, त्यांच्या धार्मिक आचारविचारांना आणि भावनांना हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती वगैरेंपैकी कोणत्याच नावाखाली समाविष्ट करणे अश्यक्य झाले.  आणि साधारण गणकांना तर काहीतरी वटहुकूम फर्माविणे भाग पडले.  म्हणून धर्माचाप्रश्न आल्याबरोबर अशा धर्माच्या सदराखाली त्या त्या असंस्कृत जातींचेच कामचलावू नाव नमूद करण्याविषयी हुकूम देणे रिस्ले ह्यांना भाग पडले.  याप्रमाणे गणकांचे काम सोपे झाले.  तरी अशा अनेक जातींना प्राथमिक प्राकृत धर्माची लक्षणे पाहून काही तरी एक नवीनच सामान्य नाव कल्पिणे भाग पडले.  देशी रूढ भाषेत असे नाव आढळेना.  (१) Fetishism श्रमणवाद (जडवस्तुपूजा), (२) Shamanism (श्रमणवाद ऊर्फ पंचाक्षरी मार्ग), (३) Animism (भूतपूजा), ही तीन नावे त्यांनी आधुनिक समाजशास्त्रातून अथवा तौलनिक धर्मशास्त्रातून निवडून, त्यांपैकी सारासार विचार करून तिसरे भूतधर्म अथवा पिशाचपूजा हे नाव पसंत केले.  व त्या नावाच्या सदराखाली या सर्व जातींची सरगणना करण्यात आली.  सन १९०१ साली हिंदुस्थान, बलुचिस्थान आणि ब्रह्मदेश मिळून एकंदर लोकसंख्या २९,४३,६१,०५६ आणि एकंदर हिंदूंची संख्या २०,७१,४७,०२६ भरली.  त्या हिंदूंशिवाय वरील भूतधर्मीयांची संख्या एकूण ८५,८४,१४८ दाखविण्यात आली आहे.  (खाने. रिपोर्ट १९०१; खंड १-अ, भाग २-कोष्टके; कोष्टक ६, पान ५८-६२ पहा).  त्याच रिपोर्टाच्या पहिल्या पुस्तकातील पुरवणी भागात शेवटी पान ५६०-५६९ पर्यंत एकंदरीत सर्व हिंदी लोकांचा सामाजिक दर्जा दाखविणारी जी कोष्टके दिली आहेत; त्यात निरनिराळया प्रांतांतून जी अस्पृश्य मानलेल्या अनेक जातींची संख्या दिली आहे तिचा वट्ट आकडा ५,१७,३८,६७३ हा तयार होतो.  या विशिष्ट प्रांतवार कोष्टकांवरून उघड दिसते की, रिस्ले यांनी या मानीव अस्पृश्यांना पूर्ण विचाराअंती व जबाबदारीपूर्वक हिंदू-धर्म-संघातच समाविष्ट केले आहे.  शास्त्रीय आणि केवळ औपपत्तिक दृष्टीने काही ठरो, चालू लोकमत आणि लोकव्यवहार या दृष्टीने पाहता, या गणनेत आक्षेपार्ह असे काही नाही असे कोणासही वाटेल; आणि मलाही असेच वाटते.  पुढील दशवार्षिक म्हणजे इ.स. १९११ सालच्या शिरगणतीचे काम इ.ए. गेट यांचेकडे सोपविण्यात आले.  हे गृहस्थ इ.स. १९०१ सालीही रिस्ले साहेबांचे सहकारी होत.  या दहा वर्षांत पुढीलप्रमाणे वरील वट्ट आकडयात वाढ झालेली दाखविली आहे.  एकूणन हिंदी लोकसंख्या ३१,३५,४७,८४०, एकूण हिंदू २१,७५,८६,८९२, एकूणन भूतधर्मीय १,०२,९५,१६८.  या दहा वर्षांत हिंदूंच्या वट्ट लोकसंख्येविषयी मुलमानांनी वाद उपस्थित केला होता.  पण तो या भूतधर्मीयांच्या संख्येबद्दल नसून केवळ अस्पृश्यांना हिंदूत गणावे की वेगळे गणावे, याबद्दल होता.

इ.स. १८६७ सालापासून म्हणजे हिंदुस्थानात खानेसुमारी सुरू झाल्यापासून या भूतधर्मीयांची संख्या हिंदूंपासून अलग दाखविण्यात येत आहे; म्हणून त्यांच्यासंबंधाने वादाला कारणच नव्हते.  पण अस्पृश्यांच्याबद्दल वाद उपस्थित होण्यास सबळ कारण होते.  मानीव अस्पृश्यांची जेव्हा इ.स. १९०१ सालच्या खानेसुमारीत जवळ जवळ ५॥ कोटी ही संख्या प्रांतवार पसरलेली आढळली, इतकेच नव्हे, पण या मानीव अस्पृश्यांतही काही प्रांतांतून काही काही अस्पृश्य जाती भूतधर्मीयांच्या सदरात दाखविलेल्या आढळल्या, तेव्हा सर्वच मानीव अस्पृश्यांसंबंधी वाद उपस्थित होणे साहजिकच होते.  कदाचित या वादला काही अंशी बळी पडून म्हणा, किंवा ही कटकट चुकविण्याच्या हेतूने म्हणा, इ.स.१९११ साली मानीव अस्पृश्यांची संख्या वेगळी दाखविण्यात आली नाही.  इतकेच नव्हे, तर १९०१ सालाप्रमाणे हिंदुधर्मांतर्गत निरनिराळया समाजांचा अथवा जातींचा परस्पर उच्चनीच दर्जा दाखविणारी कोष्टकेच स. १९११ सालच्या खानेसुमारीतून वगळण्यात आली.  त्यामुळे ह्या भूतधर्मीयांपैकी किती जाती व त्यांची किती संख्या मानीव अस्पृश्य आहे, आणि उलट पक्षी, ह्या मानीव अस्पृश्यांतील किती जाती व त्यांची किती संख्या भूतधर्मीय आहे, हे नक्की ठरविण्यास मार्गच उरला नाही.  काही असो.  मानीव अस्पृश्यांच्या प्रचंड लोकसंख्येत काहीतरी भूतधर्मीयांची गणना झालेली आहे, ह्यात शंका नाही.  तथापि सर्वच मानीव अस्पृश्य भूतधर्मीय, असेही म्हणता येत नाही.  कारण पहिल्यांची वट्ट संख्या दुसऱ्यांच्यापेक्षा पाच पटीहून अधिक उघड उघड भरत आहे.

हा निर्णय झाला आधुनिक लोकमतानुसारे व लोकव्यवहाराच्या दृष्टीने.  पण अगदी प्राचीन काळी जेव्हा वेदधर्मीय आर्य (?) नावाचे लोक हिंदुस्थानात येऊन वसाहत करू लागले.  त्या वेळी हिंदुधर्माचा व्याप आणि अर्थ आजच्यासारखा व इतका स्पष्ट असणे शक्य नाही.  अस्पृश्यतेची संख्या आर्यांच्या वसाहतीपूर्वी किंवा वसाहतीच्या काळी ह्या देशात होती की नव्हती हे निश्चित ठरविण्यास साधन नाही.  वेदसंहितेचा काळ ख्रिस्ती शकापूर्वी हजार बाराशे वर्षे इतका अलीकडे मानला तरी त्या काळच्या वाङमयात अथवा अन्य प्रकारे अस्पृश्यतेचा ग्रांथिक अथवा लेखी पुरावा मुळीच सापडत नाही, हे आपण पहिल्या खंडात पाहिले.  मानीव अस्पृश्य त्या वेळी असले तरी, त्यांची संख्या आणि आपत्ती आजच्यासारखी आणि इतकी तीव्र असणे शक्य नव्हते.  कारण, तत्कालीन सामाजिक घटना आजच्याप्रमाणे सुसंघटित व दृढमूल झालेली नव्हती.  पाणिनीच्या कालापासून अस्पृश्यतेचे उल्लेख मिळू लागतात.  यास्काचार्यांनी आपल्या निरुक्तात अध्याय ३, खंड १६, मंत्र १० ह्यावर भाष्य करताना केलेला 'चत्वारो वर्णा निषादः पंचम इति औपमन्यवः ।'  हा पंचम वर्णाचा उल्लेख संस्कृत वाङमयात जवळ जवळ पहिलाच होय.  वर्ण तर चारच.  पाचवा जन म्हणजे वर्णबाह्य निषादांच्या जाती असा पंचम शब्दाचा अभिप्राय आहे.  औपमन्यवांच्या काळीही निषाद म्हणून जो लोकसमूह होता, तो सर्व आताप्रमाणे अस्पृश्य मानला जात होता ह्याला पुरावा नाही.  निषाद म्हणजे आर्यांच्या वसाहतीबाहेरचे लोक; स्वतः वसाहत करून स्वतंत्रपणे राहणारे. त्यांचा व आर्यांचा संबंधच येत नसल्याने आधुनिक बहिष्काराचा व अस्पृश्यतेचा प्रश्नच त्यांच्यासंबंधी उद्भवत नाही. (मागे पान २५-२७ पहा.)

आजची अस्पृश्यता मनुस्मृतीच्या काळी पूर्णत्वाला आलेली आढळते.  ह्या अस्पृश्यांची पूर्वापीठिका आणि हे कोणत्या कारणांनी अस्पृश्य ठरविण्यात आले, ह्याविषयी मनुस्मृतीची मीमांसा निराधार व अनैतिहासिक आहे, असे मी वर प्रतिपादिले आहे.  तरी त्या काळी आजचा बहिष्कार व अस्पृश्यता ह्यांचा जम पूर्ण बसला होता असे मानण्याचा मनुस्मृतीचा पुरावा अगदी बिनतोड आहे, अह्यात शंका नाही.  मनूच्या दहाव्या अध्यायात वर्णसंकराने उत्पन्न झालेल्या कोणत्या जाती कशा व किती हीन, म्हणून अस्पृश्य व बहिष्कृत, ह्याचा निर्णय दिला आहे.  ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष ह्यांच्या प्रतिलोमसंकरजन्य संततीला चंडाल ही संज्ञा देऊन ती जात पहिल्या पायरीची अस्पृश्य कल्पिली आहे.  पण ह्या चंडाल आणि निषाद स्त्री ह्यांच्या संकरसंततीला व अंत्यावसायी, पुक्कस, कारावर, आहिंडिक, सोपाक, वगैरे जातींना, चंडालाहून अधिक नीच पायरीचे ठरविण्यात आले आहे.   चांडाल झाला तरी शूद्रापासून म्हणजे वर्णांतर्गत शेवटच्या वर्णापासून झाला म्हणून तो तुलनेने बरा.  पण वर्णबाह्य निषाद आणि हा अस्पृश्य चांडाल ह्यांच्या संकराला अधिकाधिक नीच मानण्यात आले आहे.  तरी पण स्वतः निषाद हा अस्पृश्य असण्याचे कारणच नव्हते.  कारण त्यांचा व आर्य वसाहतींचा अर्थाअर्थी संबंधच येत नव्हता.  त्याचप्रमाणे हल्लीही बृहद् हिंदू समाजाशी अगदी फटकून राहणाऱ्या जंगली भूतधर्मीय जाती अस्पृश्य मुळीच नाहीत.  ज्या असंस्कृत आर्येतरांचा आर्य वसाहतीशी केवळ हीन कामधंद्यासाठी संबंध आला; किंबहुना ज्या स्वतंत्र जातींना जिंकून अगर त्यांच्याशी समजुतीने वागून, वसाहतीला चिकटूनच पण अगदी बाहेर डांबण्यात आले; त्याच तेवढया जमाती आजकालच्या बहिष्कृत अस्पृश्य जाती होत.  केवळ जिंकण्यामुळे, अगर हीन धंद्यामुळेच नव्हे तर पाखंडी धर्मावरील क्रूर बहिष्कारामुळेही वेळोवेळी व देशोदेशी या बहिष्कृतांत भर पडत जाऊन आजकालची अवाढव्य संख्या कशी तयार झालेली आहे, हे मागील प्रकरणात सिध्द झालेच आहे.  पण अजून त्यांचा वसाहतीशी संबंध आलेला नाही, अशा जंगली जाती आजही अस्पृश्य नाहीत.  पण त्यांचा धर्म मात्र प्राथमिक दर्जाचा म्हणजे भूत-प्रेत-पिशाचादिकांची पूजा, हा आहे.

आजचा प्रस्तुतचा मुद्दा 'अस्पृश्यांचा' धर्म कोणता हे ठरविण्याचा आहे.  आज हजारो वर्षे मानीव अस्पृश्य यजाती शहरांतून व खेडयांतून वरिष्ठ म्हणविणाऱ्या हिंदू, मुसलमान इत्यादिकांच्या वसाहतीजवळ त्यांच्या सेवेत राहत आल्यामुळे या मानीव वरिष्ठांच्या धर्माचा व राहणीचा थोडा फार परिणाम या मानीव अस्पृश्यांवर होणे अगदी साहजिक आहे.  बौध्द, लिंगायत, शीख, ख्रिस्ती, मुसलमान हे धर्मपंथ प्रसारक आणि प्रागतिक असल्याने मानीव अस्पृश्यांचा शिरकाव या निरनिराळया नवीन पंथांत हजारांनीच नव्हे, तर लक्षांनी झाला आहे.  एरवी या परकीय व पाखंडी समजले गेलेल्या पंथांना तरी प्रथम प्रथम रिक्रूट भरती कोठून मिळणार ?  बंगाल्यात, मध्यप्रांतात, विशेषतः मद्रासेत आणि मलबारात हल्लीच्या मुसलमानांच्या व ख्रिस्त्यांच्या संख्येपैकी शेकडा नव्वद हे मूळचे 'अस्पृश्य'च आहेत, असे जे खानेसुमारीच्या रिपोर्टात म्हटलेले आढळते, ते मुळीच अतिशयोक्तीचे नाही.  या नवीन सुधारक पंथात न शिरता, मागे सवयीच्या जोरावर ज्यांची मोठी संख्या पूर्वस्थितीत राहिली त्यांच्यापैकी बहुसंख्येवर हिंदुधर्मातील हीन देवता आणि अडाणी विधिसंस्कार यांचा परिणाम कालवशात झाला असलेला आता दिसतो व म्हणून त्यांना हिंदू हे नाव पडले यात काय नवल ?  नवल हेच की परकीयांनी व 'पाखंडयांनी' या अस्पृश्यांचा एवढा मोठा भाग काबीज करून घेतला असता, उलट सावळा हिंदुधर्म अद्यापि या बिचाऱ्यांना झिडकारून हिरमुसले करीत आहे !  इतकेच नव्हे, तर त्यांचे हाडवैर संपादन करीत आहे.  ते कसेही असो.  अशा स्वाभाविक ओघाने अस्पृश्यांचा समावेश हिंदुधर्मात झालेला आता दिसत आहे.  ते संस्कारतः हिंदू नसून, केवळ संसर्गतः किंबहुना स्वभावतः हिंदू बनले आहेत असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.

एखाद्या मेजवानीचे वेळी पक्वान्नाचा ताजा वाटा सर्व 'वरिष्ठ' वर्गांना जाऊन मातीत मिसळलेल्या उष्टया पत्रावळी उकिरडयावर टाकल्यावर, ज्याप्रमाणे खेडयातील 'अस्पृश्यांना' चाटायला मिळतात, त्याचप्रमाणे हिंदुधर्माचा हीन भाग मात्र नेमका यांच्या वाटयाला येतो.  बंगाल्यातला चैतन्यांचा वैष्णव भक्तिमार्ग, शिखांचा सत् अकाल, महाराष्ट्रातील ज्ञानबा-तुकारामांचा वारकरी संप्रदाय अनुसरण्यास आणि द्राविडांतील काही वरवरची सांप्रदायिक चिन्हे आचरावयास त्यांना मुभा आहे.  पण उच्चवर्णी वैष्णवांत कोणी अस्पृश्य वैष्णवाने अगर शैवाने समान दर्जाने मिसळू म्हटले किंवा देवळांतच काय पण काही देवळांच्या नुसत्या वाटेवर पाय ठेवू म्हटले तर त्यांच्या जीवावरच येऊन बेतते.  इतकेच नव्हे, तर सार्वजनिक शांतीच्या सबबीवर इंग्रज बहादुरांचे सोटेशाही पोलीस व लष्कर सोवळेवाल्यांचीच बाजू घेऊन या हतभाग्यांवरच घसरते.  असो, या अपवादक गोष्टी सोडुन दिल्या तर आज मानीव अस्पृश्यांचा बहुजनसमाज भुताखेतांच्या पूजेतच गुरफटलेला दिसत आहे.  तो केवळ नामधारी खानेसुमारीतलाच हिंदू आहे असे म्हटल्यास, निदान तज्ज्ञांचा तरी आम्हांवर राग होणार नाही अशी आशा आहे.

बहुतेक मानीव अस्पृश्यांची प्रमुख प्रमुख प्राचीन राष्ट्रे; उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील महार, मांग, मद्रासेकडील पारिया, पुलया, बंगाल्यातील नमशूद्र राजबंसी इ. यांचे मूळ राष्ट्रदैवत म्हणजे एकच; ती मरीआई हेच होय.  हे दैवत भूमिमातेचेच एक रूपक अथवा प्रतीक आहे, हे तौलनिक धर्मशास्त्राने सिध्द होण्यासारखे आहे.  हे आद्य दैवत केवळ आजकालच्या अस्पृश्यांचेच नव्हे, तर प्राचीन काळच्या बहुतेक साऱ्याच प्राथमिक राष्ट्रांच्या देव्हाऱ्यावर कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपाने प्रतिष्ठित होतेच.  इतकेच नव्हे तर आजही हिंदुस्थानातील ब्राह्मण, क्षत्रिय आदीकरून वरिष्ठ गणलेल्यांचे कुलदैवत अगर इष्ट दैवत दुसरे कितीही उच्च असले, तरी त्यांच्या बायकांकडून प्रसंगविशेषी, शितळादेवी, सटवाई, मेसाई, मरीआई या गावाच्या शिवेवर ठाण मांडून बसलेल्या माताच पूजेचा मान आणि हक्काचा नैवेद्य उगविल्याशिवाय राहत नाहीत.  शिव आणि काली ही दैवते जी प्रसिध्दपणेच मूळच्या रहिवाश्यांची होती, ती मागाहून आलेल्या सुधारलेल्यांनी आपलीशी करून घेतली.  त्यांना आता प्रतिष्ठा आली आहे.  पण वरिष्ठ वर्गांचे लौकिक व्यवहार आणि लोकभ्रम यांजकडे दृष्टी फेकली तर पिंपळावरचा मुंजा, भिंतीवरचा नाग-नरसोबा, नदीनाल्यांतल्या जकण्या, दाट झाडीतली काळूबाई यांचा अंमल 'अस्पृश्यां'प्रमाणे अद्यापि 'स्पृश्यां'वरदेखील इतका जारी चालू आहे की, या हिंदुधर्माच्या मायपोटात संस्कृत धर्मांची हद्द संपते कोठे व प्राकृत धर्माची सुरू कोठे होते, हे शोधणे म्हणजे मृगजळाच्या मर्यादा शोधण्याप्रमाणे व्यर्थ ठरते.  अशा परिस्थितीत बिचाऱ्या 'अस्पृश्यां'नाच हसण्यात कोणता शहाणपणा आहे ?  वरिष्ठ वर्गांचा असला तिरस्कार व छळ सोसून अद्यापि या भोळया जाती आपल्यास हिंदू म्हणविण्याचा आग्रह सोडीत नाहीत हेच वरिष्ठ म्हणविणारांनी आपले मोठे भाग्य समजावे.  असे असून आजकालच्या वर्णाश्रम स्वराज्य परिषदा अस्पृश्यांना तर दूर लोटतात इतकेच नव्हे, पण त्यांच्या वतीने दोन समजुतीच्या गोष्टी सांगावयास येतो म्हणणाऱ्या अस्सल ब्राह्मण विद्वानांना, देशाभिमानी पुढाऱ्यांना व विरक्त संन्याशांनादेखील आपल्या आजूबाजूला फिरकू देत नाहीत, या अन्यायाला काय म्हणावे !  म्हणावयाचे काय, ह्या अपूर्व अन्यायाचेच नाव अलीकडे 'सनातनी हिंदुधर्म' असे रूढ झाले आहे.

केवळ संघाच्या दृष्टीने पाहता मात्र ह्या अस्पृश्यांच्या प्रचंड समूहाला हिंदुधर्मात जागा आहे असे मानण्याच्या उलट आणखी एक मोठा प्रबळ व प्रतिकूल पुरावा अभेद्य परंपरेने चालत आलेला आहे,  तो दृष्टीवेगळा करून चालवयाचे नाही.  हिंदू संघाच्या शेजारी राहून अनुकरणवशात् मानीव अस्पृश्यांतील काही सुधारलेल्या समाजांनी हिंदू उपासनेचा स्वीकार केला तर तिकडे हिंदुधर्माचा पुरोहितवर्ग फार तर दुर्लक्ष करील.  प्रत्यक्ष हरकत करण्याची दगदग करणार नाही.  पण स्वतः जाऊन स्पृश्यांचे पौराहित्य आजवर कोणत्याही प्रांतांत कोणाही ब्राह्मणाने केलेले नाही.  किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपल्या धर्माचा नुसता उपदेशही केलेला नाही !  लग्नविधी असो, किंवा स्मशानविधी असो, बारसे असो, किंवा मृताचा दिवस असो, अशी सर्व शुभाशुभ धर्मकृत्ये करावयाला ह्या सर्व अस्पृश्य यजातींचे आपल्यापैकीच गुरू अथवा गोसावी असतात.  त्यांचया परंपरा चालत आलेल्या असतात.  त्यांना जातीकडून अथवा क्वचित राजाकडूनही उत्पन्ने असतात.  व्यक्तिशः दक्षिणाही मिळते.  ह्यावरून धर्मसंघाच्या दृष्टीने ह्या ग्रामबाह्य जाती आचारबाह्य आहेत असे स्पष्ट होते.  लोकमान्य टिळकांनी -

प्रामाण्यबुध्दिर्वेदेषु साधनानामनेकता ।
उपास्यानामनियमः एतध्दर्मस्य लक्षणम ॥

अशी एकदा हिंदुधर्माची एक कामचलावू व्याख्या केली होती.  ती त्या वेळी किती जरी ऐसपैस वाटली, तरी ह्या जातीला तीदेखील लागू पडत नाही.  'उपास्यानामनियमः' आणि 'साधनानामनेकता' ही व्यतिरेकी लक्षणे तर अजागळवत् व्यर्थच आहेत.  कारण ही व्यतिरेकी लक्षणे, जी अधर्माची आहेत; ती पुनः धर्माची कशी होऊ शकतील ?  ती काहीतरी विधायकच असली पाहिजेत ना ?  ख्रिस्ती व मुसलमानी धर्मसंघांत उपास्यांचा नियम आहे.  तो हिंदुधर्मसंघात नाही.  एवढयावरून तो हिंदूंचे वैशिष्टय होऊ शकत नाही.  कारण असा अनियम बौध्द व इतर समाजातही आढळतो.  'प्रामाण्यबुध्दिर्वेदेषु' म्हणजे वेद प्रमाण मानणे हेही तत्त्व व्यवहारात फारच गैरसोयीचे झाले आहे.  कोणाही स्पृश्य ब्राह्मणेतराचे घरी पूजा अथवा गृह्यसंस्कार चालविण्यास ब्राह्मण गेला तर तेथे वेदमंत्र म्हणण्यास तो तयार नसतो.  ब्राह्मणेतरांसाठी पुराणेक्त निराळे मंत्र तयार आहेत.  जेथे ब्राह्मणेतरांच्या बाबतीत स्वतः ब्राह्मणांचीच प्रामाण्यबुध्दी अशी लटपटते, तेथे अस्पृश्यांच्या आणि वेदांच्या संबंधाची नुसती कल्पनाही कशी शक्य होणार !  मग अस्पृश्य हिंदू कसे हा एक खरोखर प्रश्नच आहे.  आज ज्या शूद्र देवतांच्या उपासना अस्पृश्य करीत असलेले दिसतात, त्यांची उपासना वरिष्ठ म्हणविणारे हिंदूही राजरोस करितात.  एवढयावरूनच अस्पृश्यांना हिंदू म्हणावयाचे ना ?  पण ह्या देवता अस्पृश्यांनी स्पृश्यांपासून घेतल्या की स्पृश्यांनी अस्पृश्यांपासून ?  कोणी म्हणेल स्पृश्यास्पृश्यतेचा उद्भव होण्यापूर्वीपासूनच ह्या देवता आणि त्यांची उपासना सर्वत्रच चालू आहे.  पण मग तेवढयानेच अस्पृश्य हिंदू कसे ठरतात ?  अशा उपासना महायान बौध्द धर्माच्या हीन अनुयायांमध्ये अद्यापि हिंदुस्थानाच्या सरहद्दीवर व बाहेरही चालू आहेत.  मग तेही हिंदूच काय ?  मुसलमान ताबुत करितात, व त्यांचे पाहून काही हिंदू मुसलमानांपेक्षाही अधिक बेहोष होऊन ताबुतापुढे नाचतात.  म्हणून हिंदूंना काय मुसलमान म्हणावयाचे ?  की ताबुतांना हिंदुधर्माचे साधन म्हणावयाचे ?  ह्या विक्षिप्त संबंधाला जसे केवळ अनुकरणसंबंध म्हणता येईल, तसेच स्पृश्यांच्या व अस्पृश्यांच्या दरम्यान आज दिसणारा धार्मिक संबंधही केवळ अनुकरणसंबंध का म्हणू नये ?  हा संबंधही केवळ उपासनेच्या काही भागापुरताच दिसतो.  सर्वच उपासना तरी स्पृश्यांप्रमाणे अस्पृश्यांत कोठे रूढ आहेत ?  गाय, ब्राह्मण आणि तुळशीवृंदावन ही तीन पूजास्थाने हिंदु बहुजनसमाजामध्ये रूढ आहेत, तशी ती अस्पृश्यांमध्ये आहेत काय ? मुळीच नाहीत.  ख्रिस्ती-मुसलमानांप्रमाणे शीख आणि लिंगायतांनी पुष्कळ प्रमाणाने व शैव-वैष्णवांनी थोडया प्रमाणात ह्या बहिष्कृतवर्गांना आपल्यांत घेण्याचा प्रयत्न केला; पण ख्रिस्ती-मुसलमानांचे ह्या बाबतीतले यश उत्तम, शीख-लिंगायतांचे यश मध्यम, आणि शैव-वैष्णवांचे यश कनिष्ठ का ठरले ?  लिंगायतांत च्छलवादी आणि शिखांत मजबी अथवा लालबेग म्हणून जे लोक असतात ते अस्पृश्यांतूनच आलेले असतात.  ते अद्यापि अस्पृश्यच आहेत !  पहिल्यांनी अस्पृश्यांना एकदम आपल्या धर्मसंघात एकजीव करून घेतले, दुसऱ्यांनी धरसोड चालविली आहे, व तिसऱ्यांनी तर अस्पृश्यांना आपल्या वेदांच्या, देवळांच्या, आणि संघाच्या बाहेर लांब ठेवले आहे.  हिंदुधर्माची परंपरा, सांघिक शासन, विधिसंस्कार, पठण, पाठण, मग ते वैदिक असो, पुराणोक्त असो, संस्कृत असो वा प्राकृत असो; त्याचा अधिकार मानीव अस्पृश्यांना स्वप्नातदेखील मिळणे शक्य नाही.  तो मिळविण्यासाठी अस्पृश्याने मरून पुनः स्पृश्यांत जन्मले पाहिजे; एरवी नाही.  असाच खरोखर त्यांच्या वरील बहिष्काराचा अर्थ आहे.  ह्या अर्थाचा निषेध व निराकरण करून धमक असेल तर हिंदू समाजाची व संघाची नवी घडी घालणे हे सुधारकाचे काम आहे.  नुसती अर्थाची शाब्दिक लावालावी करून वास्तविक बदल कसा घडेल ? तोवर अस्पृश्यांच्या धर्माचे कोडे कसे उकलणार ?

हिंदुस्थानातील कोटयवधी अस्पृश्य आज कित्येक शतके बिनबोभाट आपल्यास हिंदू म्हणवीत आहेत, त्यांचा प्रत्यक्ष छळ करणारे स्पृश्यवर्गही नुसते नावाने हिंदू म्हणवून घेण्याला त्यांना हरकत करीत नाहीत.  इतकेच नव्हे, कपटराजनीतीत कुशल असलेल्या इंग्रज सरकारच्या खानेसुमारी खात्याच्या प्रमुखांनी प्रति-दशवार्षिक अहवालात, निर्विकार समाजशास्त्राचे आलोडन करूनही अस्पृश्यवर्गांची गणना हिंदुधर्माच्या सदराखालीच केली आहे.  असे असूनही त्यांच्या हिंदुत्वाविषयी मी जी वर शंका प्रकट केली आहे, ती काही आमच्या राष्ट्राच्या परसातील गृहकलह जो एकदा कसा तरी दृष्टीआड झाला आहे त्याची खपली पुनः उकरून नसते नवीन वितुष्ट माजविण्याच्या कुत्सित हेतूने नव्हे; तर हे जे आमच्या राष्ट्रशरीराचे अगदी जुनाट हाडव्रण, आज जे भरून आल्याप्रमाणे दिसत आहे, ते आतून भरून आले नसून, नुसते बाहेरून वरवर भरलेले दिसते.  ते केव्हा ना केव्हा आणि पुनः पुनः चिघळणारच अशी प्रामाणिक भीती मला वाटत आहे.  अशा प्रकरणात भिडस्तपणा किंवा चालढकलपणा फार घातकी आहे.  म्हणून वरील इशारा देणे मला अगदी जरूर वाटते.  मला हेही ठाऊक आहे की, अलीकडे - विशेषतः आमच्या महाराष्ट्रात - अगदी सोवळे ब्राह्मण भटजी केवळ दक्षिणेच्या आशेने महारवाडयात आणि मांगवाडयात काही इकडचे तिकडचे श्लोक म्हणून लग्ने लावताना आणि सत्यनारायणाच्या पोथ्याही वाचताना आढळतात.  पण अशा प्रसंगी ते किती सुरक्षित रीतीने दूर उभे राहतात, आणि आपणच शिजविलेल्या सत्यनारायणाचा प्रसाद असूनही स्वतः आपण सेवन करण्याचे कसे टाळतात; आणि अशा लपंडावांमुळे लग्ने आणि पोथ्या तात्पुरत्या पार पाडल्या तरी चतुर अस्पृश्यांच्या मनाला अपमानाच्या नवीन जखमा होऊन नवीन वाद व नव्या चळवळी कशा जोरावतात, तेही ध्यानात घेणे जरूर आहे.  पुराणोक्ताची धूळ डोळयांत सलू लागल्यामुळे स्पृश्य ब्राह्मणेतरांत ज्याप्रमाणे सत्यशोधकांची चळवळ सुरू होऊन ब्राह्मणांचा शिरकाव काही झाले तरी आपल्या धर्मकृत्यात घडू द्यावयाचा नाही, अशी नवी तेढ बळावू लागली आहे, तिचाच प्रसार अस्पृश्यांमध्ये अलीकडे होऊ लागला आहे.  आणि समंजस अस्पृश्य लोकही आपले संस्कार आपल्याच लोकांकडून करून घेऊ लागले आहेत.  ह्याला जबाबदार कोण ?  तोंड दाबून बुक्क्यांचा मार कोठवर सहन होणार ?  बुक्क्या तरी बंद नाही तर तोंड तरी मोकळे झालेच पाहिजे ना ?  महारांची दक्षिणा पाहिले पण त्यांचा स्पर्श नको, हे व्हावे कसे ?

हिंदुधर्माची आणि समाजाची एकदा व दृढता न्यायाच्या दृष्टीने निर्विवाद सिध्द व्हावी ही कळ, आता हिंदुमहासभेसारख्या उध्दारक संस्थाना, पंडित मालवीय व डॉ. मुंजेंसारख्या सोवळया आणि ओवळया ब्राह्मणपुढाऱ्यांना सारखीच भासू लागली आहे.  कोल्हापूरच्या क्षत्रिय जगद्गुरूंनी शेकडो अस्पृश्यांना क्षत्रियत्वाची दीक्षा स्वहस्ते दिली,  मालवीयजींनी आपल्या हातांनी अस्पृश्यांच्या गळयांत जानवी अडकविली, रत्नागिरीकडे बॅ. सावरकरांच्या अविश्रांत परिश्रमाने व डॉ. कुर्तकोटींसारख्या सुधारक शंकराचार्यांच्या अनुज्ञेने अस्पृश्यांच्या तोंडून प्रत्यक्ष वेदमंत्र म्हणून मूर्तीची षोडशोपचार पूजा झाली.  इतकेच नव्हे, तर थाटाने सर्व जातींचे सहभोजनही झाले, अशा बातम्या वर्तमानपत्रांतून नित्यशः प्रसिध्द होत आहेत.  प्रसंगविशेषी एखादे आडबाजूचे मारुतीचे देऊळ किंबहुना शेठ जमनालाल बजाजसारख्या देशभक्तांच्या वैयक्तिक वजनाखाली चाललेले मोठे देऊळही अस्पृश्यांना उघडे होते.  ही धामधूम खरोखर अशीच सर्वत्र चालून अखेर ज्या दिवशी लहानथोर अस्पृश्य स्त्रीपुरुष हिंदू स्पृश्यांच्या सहवासात समसमान दर्जाने सर्वच बाबतीत वावरू लागतील, तेव्हाच त्यांची गणना हिंदुधर्मात यथार्थ झाली, असे कोणीही म्हणेल.  असे झाल्यावर अस्पृश्य हे खरे हिंदू आहेत की भूतधर्मीय आहेत, का आणखी कोणी आहेत, हे पाहण्यासाठी सरकारी खानेसुमारीची पुस्तके चाळण्याची कशाला जरुरी पडेल ?  असे होणार नसेल, तर ही पाने चाळून तरी काय फायदा ?

शेवटी एका नाजूक गोष्टीचा उल्लेख करून हे प्रकरण आटपू.  वर जी मी शंका प्रदर्शित केली, ती केवळ काल्पनिक नाही.  सांघिक धर्माची व राजकारणाची नेहमी गुंतागुंती पडते.  परवा डॉ. आंबेडकरांनी कलकत्त्यास सायमन कमिशनच्या पोटकमिटीचे एक सभासद ह्या नात्याने २३ ऑक्टोबर १९२८ रोजी भरलेल्या त्या कमिशनच्या संयुक्त परिषदेपुढे साक्ष दिली; तेव्हा त्यांनी स्पष्ट आणि जबाबदारीपूर्वक सांगितले की, "There is really no link between the Hindus and the Depressed classes.  Therefore we must be regarded as a distinct and independent community, separate from the Hindus."

(अर्थ :  ''अस्पृश्यांचा व हिंदूंचा अर्थाअर्थी काही संबंध नाही.  त्यांचा एक स्वतंत्र निराळा असा अल्पसंख्यांक समाज आहे, असे समजून त्यांना तसे वागविण्यात यावे.''  डॉ. आंबेडकरांच्या ह्या विधानाला व मागणीला सर्वच अस्पृश्यांचा पाठिंबा आहे, असे मुळीच नाही.  पण कोणाच्या कोणत्या विधानाला ह्या जगात कधी सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे ?  म्हणून डॉ. आंबेडकरांच्या ह्या विधानांची आम्हाला हेटाळणी करता येईल ?  असो.  ह्या मुद्दयाचा विचार पुढे राजकारणाच्या प्रकरणात अधिक करणे बरे होईल.  तूर्त असेच आणखी एक अगदी गैरसोईचे विक्षिप्त विधान, अगदी अनपेक्षित दिशेने मला आढळलेले; येथे उल्लेखिल्याशिवाय मला राहवत नाही.

'म्हारम्हात्म्य' नावाच्या एक विक्षिप्त पुराणाचे मी मागील प्रकरणात बरेच उतारे दिले आहेत.  पुढील दोन उतारे मासलेवाईक दिसतात.

नाना जाती अठरा वर्ण ।  ह्यांचे उचिष्ट न खावे म्हाराने ।
मिलंची वेगळा करोन ।  इतर जातीचे न खावे ॥ १४ ॥
मिलंची आणि म्हार जाण ।  ही दोन्ही चंद्रवंशी उत्पन्न ।
म्हणोनि तयांचे घरचे अन्न ।  खावे म्हाराने वेद घाये (?) ॥ १५ ॥
(अध्याय ५ वा)

येथे मिलंची हा शब्द म्लेंच्छ ह्याचा अपभ्रंश आहे.  त्याचा अर्थ मागील तिसऱ्या अध्यायात मुसलमान असाच शब्द योजून कर्त्याने स्पष्ट केला आहे :

सेख सैय्यद मोंगल पठाण ।  अरब रोहिलेही मुसलमान ।
रंगारी आत्तार बागवान ।   त्याच्या पोटी जावे ॥ १८ ॥
म्हार आणि मुसलमान ।  हे दोघे एक वंशे उत्पन्न ।
चंद्र वंश पूर्ण ।  सोम म्हणताति यालागे ॥ १९ ॥

डॉ. आंबेडकर हे महारांचे एक विद्वान आणि प्रतापी पुढारी आहेत.  त्यांना सर्वांचा नाही तरी पुष्कळांचा पाठिंबा आहे.  त्यांच्यासाठी प्रत्यक्ष जिवाचीही आहुती देण्यास काही अनुयायी तयार आहेत.  ह्या 'म्हार म्हात्म्य' पुराणाचे कर्ते बाळकदास हे म्हारांचे एक पुरोहित गोसावी बुवा दिसतात.  ह्यांनी आपल्या ग्रंथाच्या समाप्तीचा काळ व स्थळ ही शेवटी दिली आहेत.  शके १८८८ असे लेखकाने चुकीने पडले असावे.  संदर्भावरून शके १७८८ हे साल दिसते.  नीरानदीचे काठी पुणे जिल्ह्यात पाडेगाव म्हणून एक गाव आहे.  ते स्थळ ग्रंथाचे शेवटी दिले आहे.  ह्या गावी म्हार गोसाव्यांची प्रसिध्द घराणी आहेत.  ते असले ग्रंथ करितात, असे ऐकतो.  ह्या बुवांच्या, वरील मुसलमानांसंबंधी विधानाला म्हारांचा पाठिंबा आज मिळेल असे वाटत नाही.  तरी म्हार मुसलमानांच्याकडे जेवतात.  ते मुसलमानाप्रमाणे डुकराचे मांस अत्यंत त्याज्य मानून, गाईचे मांस मात्र उघड खातात हे प्रसिध्द आहे.  मुसलमान व महार हे दोघे चंद्रवंशी उत्पन्न झाले असे वर 'म्हारमहात्म्या'तून अवतरण दिलेच आहे.  मुसलमानांची चांद्रमास व निशाणावर चंद्राची कोर प्रसिध्दच आहे.  मुसलमानी अमदानीत म्हारांवर त्यांचया संस्कृतीचा परिणाम थोडाथोडका झाला असेल, असे नाही.  इंग्रज सरकारचा व ख्रिस्ती मिशनऱ्यांचा आताही तसाच होत आहे.  ह्या सर्व गोष्टींचा विचार करिता सुमारे पाऊणशे वर्षांमागे ह्या गोसाव्याने असे विधान केलेले पाहून विशेष आश्चर्य मानावयाला नको.  अशा विक्षिप्तपणाला 'उपास्यानां अनियमः ।  साधनानां अनेकता' अशी व्याख्या करून लोकमान्य टिळकांनी जरी आपली मूक संमती दिली आहे, तरी तिची मजल येथवर जाईल असे कोणालाही वाटणार नाही.  काही असो, आजकालच्या राजकारणाच्या ओढाताणीत आपण मुसलमान होऊ अशी धमकी केव्हा केव्हा अस्पृश्य पुढारी देत असतात.  तिचा कोणताही संबंध गोसाव्याच्या वरील विधानाशी मुळीच दिसत नाही.  असता तर आपल्या पुराणात तशी अधिक शिकवण दिल्याशिवाय तो न राहता.  ते कसेही असो, हिंदुधर्माची शुध्दी व उत्कर्ष आणि हिंदू समाजाचे ऐक्य आणि दृढता वगैरेची चाड बाळगणाऱ्या सर्वांनी अस्पृश्यवर्गाच्या खास प्रतिनिधीचे वरीलप्रमाणे उद्गार अगदीच टाकावू ठरवून अतःपर घमेंडीत राहू नये, एवढाच तूर्त इशारा आहे.

मंदिरप्रवेशाचा मुद्दा ह्याच प्रकरणाखाली येईल असे कोणासही वरवर पाहता वाटेल; पण त्याचा धर्म नसून अस्पृश्यांचे राजकारण आहे.  आणि ते योग्यच आहे.  व्हायकोम येथे प्रथम मंदिरप्रवेश सत्याग्रह झाला.  तेव्हा मी स्वतः त्यात भाग घेतला.  कारण सार्वजनिक देवळात जाण्याचा प्रत्येक हिंदूचा धार्मिकच नव्हे तर सामाजिकही हक्क आहे.  तो सामाजिक हक्क बजावण्यासाठी साधू शिवप्रसाद हे ब्राह्म होण्यापूर्वी तिय्या ह्या अस्पृश्य जातीचे होते; म्हणून त्यांनाही व्हायकोमच्या देवळाच्या नुसत्या वाटेवरही फिरण्याची मनाई झाली.  ह्याचा खुलासा करून घेण्याकरिता मला ब्राह्मसमाजाच्या वतीने व्हायकोमला जावे लागले.  मी त्या वेळी दक्षिण कानडा जिल्ह्यात मंगळूर ब्राह्मसमाजाचा आचार्य होतो.  व्हायकोम गाव त्रावणकोर संस्थानात आहे.  कलकत्त्याच्या साधारण ब्राह्मसमाजाने त्रावणकोर दरबारला शिवप्रसाद ह्या प्रचारकाला झालेल्या मनाईबद्दल खुलासा विचारला असता काहीच उत्तर मिळाले नाही.  म्हणून मी तेथे गेलो.  शिवप्रसादाच्या हातात हात घालून मी सत्याग्रहाच्या फाटकात शिरण्याचा प्रयत्न केला.  पण मी येणार ही बातमी अगोदरच प्रसिध्द झाल्याने मुख्य पोलीस सुपरिटेंडेंट स्वतःच फाटकावर कडेकोट तयारीने उभे होते.  त्यांनी मला वाट दिली इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष मंदिरातही नेऊन दाखविण्याची तयारी दर्शविली.  पण शिवप्रसादांना फाटकाच्या आत जाऊ देईनात.  सर्व पोलीस आम्हांशी आदराने व तितक्याच जबाबदारीपूर्वक निश्चयाने वागले.  मग हे प्रकरण मी थेट त्रिवेंद्रम येथे दिवाणाकडे नेले.  त्यांनी प्रथम झालेल्या प्रकाराबद्दल औपचारिक खेद प्रदर्शित केला.  पण शेवटी त्यांनी असा दत्परी सल्ला दिला की, शिवप्रसादाने आपण हिंदू नाही असे कबूल करावे.  मग ते ब्राह्म असोत, आर्यसमाजाचे असोत, कोणी असोत, त्यांना फाटकात जाण्याची परवानगी मिळेल.  अर्थात हा विक्षित सल्ला स्वीकारण्यात आला नाही.  ते प्रकरण तेथेच थांबले.  पुढे पालघाट म्हणून एक गाव ब्रिटिश मलबारात आहे.  तेथे आर्यसमाजात प्रविष्ट झालेल्या अस्पृश्यांबाबत प्रश्न उत्पन्न झाला असता स्वामी श्रध्दानंद हे प्रसिध्द आर्यसमाजाचे संन्याशी तेथे गेले.  तरी अशा अस्पृश्यांना मंदिरप्रवेशाचाच नव्हे पण मंदिराच्या वाटेवरही फिरण्याचा हक्क मिळाला नाही.  सार्वजनिक शांतताभंग होईल म्हणून उलट ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भिडेला श्रध्दानंदांना मात्र बळी पडावे लागले, असे प्रत्यक्ष स्वामीजींनीच मला सांगितले.  एकूण काय तर अस्पृश्य जोवर हिंदुधर्मात राहण्याचा आग्रह धरतील, तोवरच त्यांच्यावर हा मंदिर बहिष्कार आहे !  ज्या दिवशी ख्रिस्ती अगर मुसलमान यांसारख्या सत्ताधारी धर्माचा ते उघड स्वीकार करतील, त्या दिवशी त्यांच्यावर बहिष्काराचे शस्त्र उगारण्याची इच्छा हिंदुलोकांत असो वा नसो, सामर्थ्य मात्र खास नाही, हीच गोष्ट वरील दक्षिण देशातील सत्याग्रहाने सिध्द झाली आहे.  

व्हायकोमचा सत्याग्रह केवळ काँग्रेसच्या जोरावर बरेच महिने मोठया चिकाटीने चालला.  तरी त्याला पूर्ण यश आले नाही.  त्यानंतर महाराष्ट्रात उमरावतीची अंबाबाई, पुण्याची पर्वती, नाशिकचा काळा राम वगैरे देवळांपुढे सत्याग्रह पध्दतशीर झाला, पण कोठेच यश आले नाही.  महाड येथील तळयावरील पाणवठयाचा सत्याग्रह मात्र बहुतांशी यशस्वी झाला आहे.  वरील सर्व मंदिरप्रवेशाच्या सत्याग्रहांना यश येईपर्यंत अस्पृश्य हे हिंदू आहेत की नाहीत हा प्रश्न पुनः अनिश्चितच राहतो.  ते कसेही असो.  वरील सत्याग्रही आपल्या धार्मिकच नव्हे तर सामाजिक हक्काबद्दलही भांडत आहेत.  तरी पण ह्या धकाधकीत धर्म अथवा समाजसुधारणा नसून उभय पक्षांचे राजकारणच आहे, असे माझे प्रांजल मत झाले आहे.  आता ह्या राजकारणाला केवळ अस्पृश्यांच्या हट्टाचे स्वरूप आले आहे.  स्पृश्यांनी हिंदुमहासभेचे व काँग्रेसचे ऐकून अस्पृश्यांना सामोपचारे ह्यापूर्वीच सर्व मंदिरे खुली करून दिली असती तर अस्पृश्य मोठे धार्मिक व भक्तिमान झाले असते, असे नव्हे.  पण आजच्या त्यांचया राजकारणाला खात्रीने निराळे वळण लागले असते.  त्यांना - निदान त्यांच्यापैकी जे स्वतंत्र मतदारसंध मागत आहेत त्यांना तरी - आपल्या आग्रहाला आधार उरला नसता.  पण काही अदूरदर्शी व आपमतलबी हिंदूंच्या हट्टामुळेच स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आज अगदी न्याय्यच नव्हे तर अवश्य ठरत आहे.  तिच्यामुळे राष्ट्राला धोका आहे हेही खरेच आहे.  तो धोका हा की, ह्या मागणीला अधिकच उग्र स्वरूप येऊन, पुढे सर्व सार्वजनिक देवळेच नव्हेत, तर खासगी देवघरेही अस्पृश्यांना मोकळी केली तरी त्यांचा हट्ट कदाचित काही काळ तसाच कायम राहील.  अशाने अस्पृश्यांचे म्हणण्यासारखे मोठेसे कल्यास झाले नाही तरी परकीयांच्या काही चेष्टेचे मात्र आणखी थोडे जास्त प्रदर्शन होईल.  ह्यापेक्षा जास्त ह्या मंदिरप्रवेशाच्या मुद्दयाचा विचार, ह्या प्रकरणात करणे मुळीच जरूर नाही.