डी.सी. मिशनचा १७वा वाढदिवस*

(भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या पुणे येथील अहल्याश्रमात मंडळीचा १७ वा वाढदिवस कार्तिक शुध्द प्रतिपदा तारीख २१-१०-१९२२ शनिवारी सकाळी साजरा करण्यात आला.  त्या वेळी मंडळाचे प्रचारक रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी सालाबादप्रमाणे मुख्य ईश्वरोपासना चालविली.  शाळांतील मुले व गावातील निमंत्रित पाहुणे हजर होते.  उपासकांनी उपदेशासाठी ''म्या देखिला निजदाता ।  सदगुरुजनिता आता ॥१॥... अखंड शोभतसे समधामी ।  तारक केशव स्वामी ॥४॥ ही अनुभविक उक्ती घेऊन निरूपण केले व नंतर मंडळीच्या गेल्या सोळया वर्षांच्या कामगिरीचे प्रांजलपणे सिंहावलोकन केले.  ते म्हणाले :)

''अस्पृश्यांचा'' उध्दार करण्यात ''स्पृश्य'' आपलाच उध्दार करीत आहेत हा सर चंदावरकरांचा मार्मिक उद्गार मिशन उघडतेवेळी, १६ वर्षांपूर्वी, काढलेला अद्यापि एका आध्यात्मिक सत्याची साक्ष देत आहे.  ह्या मिशनच्या मिशनरींची सांसारिक तरतूद कधीच करण्यात आलेली नव्हती.  मिळेल ते घ्यावे व हातून होईल ते काम मुकाटयाने करावे अशी व्यवसथा आजपर्यंत कशीबशी पार पडली.  मनू पालटल्यामुळे असली जुनीपुराणी व्यवस्था पुढे टिकणार नाही अशा तक्रारी पुष्कळ ऐकल्या; पण हा प्रश्न सोडविण्याला मात्र कोणीच पुढे येत नाही.  अस्पृश्यता निवारण्याचा प्रश्न आता काँग्रेसने हाती घेतला आहे व सक्तीच्या शिक्षणाची बिलेही पास होऊ लागली आहेत.  पण रड आणि ओरड तशीच कायम आहे.  ह्यावरून असे दिसते की, लोकशिक्षण, अस्पृश्यतानिवारण वगैरेसारखी कामे सार्वजनिक ठरावापेक्षा बहुत करून सार्वजनिक स्वार्थत्यागावरच अधिक अवलंबून असावीत.  दिवसेंदिवस अशा स्वार्थत्यागास मात्र अधिक ओहोटी लागल्यामुळे काही लोक त्यागाची उणीव शाब्दिक ठरावांनी भरून काढू पाहत आहेत.  सामाजिक सुधारणेला राजकीय स्वरूप आल्याने व जातीजातींमध्ये जगभर तेढ माजू लागल्यामुळे असल्या मिशनच्या बाबतीत कच्च्या दिलाच्या माणसांनी निराश होणे साहजिक आहे.  असली कामे जड साधनांपेक्षा आध्यात्मिक साधनांनीच जास्त साध्य होणार हे खरे.  पण हल्ली जे भयंकर युगांतर होत आहे त्यात आध्यात्मिक साधने मागे पडून फेरपक्षाच्या जड साधनांचा गवगवा फार माजला आहे.  त्यामुळे ''अस्पृश्य'' वर्गाच्या काही पुढाऱ्यांची दिशाभूल मात्र होण्याचा संभव बराच आहे.  सक्तीचे शिक्षण मिळाले तरी खरी अस्पृश्यता जाण्याला थोडा जास्तच अवधी लागेल अशी भीती आहे.  मुंबई, पुणे, नागपूर, हुबळी मंगळूर, कालिकत, बंगलोर, मद्रास, भावनगर, राजकोट वगैरे ठिकाणी ह्या मिशनची ठाणी आहेत.  ती चालू राहोत किंवा बंद पडोत, काँग्रेस कितीही ठराव व कौन्सिले कितीही बिले पास करोत, जोपर्यंत ''स्पृश्य'' मानिलेल्यांचा स्वार्थत्याग आणि ममता व ''अस्पृश्य'' मानिलेल्यांची सहनशीलता आणि सहकारिता ही वाढत नाहीत, तोपर्यंत ह्या मिशनचे काम संपले असे म्हणता येणार नाही.  ईश्वर करो आणि हे काम लवकर संपो !!

---------------------------------------------------------
* सुबोधपत्रिका, २९ ऑक्टोबर १९२२
---------------------------------------------------------
पुणे येथील नव्या इमारती बांधण्याची सर्व कामे आता संपत आली आहेत.  कंत्राटदाराच्या अडचणींमुळे त्यांनी मुख्य इमारत अद्यापि मिशनच्या ताब्यात दिली नसली, तरी लवकरच त्यांच्याकडून काम संपून प्रवेश समारंभ होण्यास हरकत राहणार नाही.  एकंदर खर्च एक लाख रुपयांवर होईल.  अशा कठीण काळात मिशनला इतक्या इमारती मिळाल्या ही ईश्वरीच देणगी समजावयाची.  इंदूरच्या महाराजांनी पहिले २० हजार रुपये दिले नसते तर ही कल्पनाच निघाली नसती.  मुंबई सरकारांनी बरीच देणगी दिल्याने मिशन त्यांचेही आभारी आहे.  पुणे शाखा जड साधनांच्या दृष्टीने आता स्थिर झाली असे म्हणता येईल.  आपली उन्नती करून घेणे हे यापुढे ''बहिष्कृत'' वर्गावरच अधिक अवलंबून आहे.  त्यांची दोषैकदृष्टी लवकरच कमी न होईल तर ''वरिष्ठ'' म्हणविणाऱ्या वर्गातून त्यांच्या सेवेस जास्त माणसे वाहून घेतील असे दिसत नाही.  जी माणसे अद्यापि टिकून आहेत, त्यांच्यामध्येही खऱ्याखोटया सबबीवर वितंडवाद माजणे चालू कलियुगात शोभण्यासारखेच आहे.  तथापि कोणीही त्यांचा अंत पाहण्यात आपला काळ दवडणार नाही अशी आशा आहे.  शेवटी कर्ता करविता परमेश्वर समर्थ हेच खरे !