पुरातन अस्पृश्यतेचे रूपनिदर्शन

प्रकरण दुसरे

बुद्धोदयकालीन अस्पृश्यता

गौतम बुद्धाचा उदय म्हणजे भारतीय इतिहासातील, किंबहुना आशियाखंडाच्या इतिहासातील एक मोठी मुहूर्तमेढ होय.  कोणत्याही ऐतिहासिक विषयाचे विवेचन करावयाचे झाल्यास ह्या मेढीपासून पुढे, म्हणजे अलीकडे ऐतिहासिक काळात, व मागे, म्हणजे पलीकडे प्रागैतिहासिक काळात, शोध करीत जावे लागते.  आणि आम्हाला अस्पृश्यतेचा छडा लावण्यासाठी ह्या दोन भिन्न दिशांनी ह्या मेढीपासून आगेमागे गेले पाहिजे.  म्हणून प्रथम प्रत्यक्ष बुद्धादयकाली, म्हणजे इ.स. पूर्वी ६०० वर्षांच्या सुमारास अस्पृश्यतेची, उपरिनिर्दिष्ट व्याख्येच्या दृष्टीने किती प्रतिष्ठा झाली होती, ते पाहू या.  ह्या काळी उत्तर भारतात चार वर्णांची आर्यांनी तर पूर्ण स्थापना केली होतीच.  ती वर्णव्यवस्था जवळजवळ जन्मसिद्ध मानली जात असे.  इतकेच नव्हे, तर ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या दोन्ही जाती डोईजड झाल्या असून त्यांच्यात परस्पर वर्चस्वासाठी तीव्र तंटा चालू होता.  स्वतः बुद्ध आणि महावीर, तसेच त्यांचे अनुयायी, क्षत्रिय वर्णाला सर्वश्रेष्ठ मानीत आणि ब्राह्मण वर्गास त्यांचे आश्रित समजत.  पुढे जी ब्राह्मणी संस्कृतीची पुराणे झाली त्यांतही राम, कृष्ण इत्यादी अवतारी पुरुष आणि जनकादी तत्त्वद्रष्टे हे क्षत्रियच होते; म्हणून क्षत्रियांविषयीची पूज्यबुद्धी ब्राह्मणांमध्येही पुढे रूढ झालेली आढळते.  तथापि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा जातिमत्सरविषयक तंटा बुद्धाच्या पूर्वीच विकोपाला गेला होता, हे पाली आणि संस्कृत वाङ्‌मयावरून उघड होते. ह्या दोन डोईजड वर्णांनी वैश्य नावाच्या सामान्य आर्य वर्गालाही तुच्छ मानिले होते; मग आर्येतर शूद्रांची काय कथा ?

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यांति परां गतिम् ।  (भगवद्‍गीता, ९.३२) ह्या भगवद्‍गीतेच्या उदार उद्‍गारावरूनच सिद्ध होते की, त्या काळी शूद्रांप्रमाणे वैश्यांचा दर्जाही ब्राह्मण-क्षत्रियांकडून कमीच मानला गेला होता.  आध्यात्मिक बाबतीत स्त्रियांचा दर्जा शूद्रांपेक्षाही कमी होता.  प्रत्यक्ष गौतम बुद्धालाही स्त्रीसमाजाविषयी म्हणण्याइतका आदर नव्हता.  अशा वेळी शूद्रत्वाचाही मान ज्यांना मिळाला नव्हता अशा अतिशूद्र वर्गाची स्थिती वरील व्याख्येप्रमाणे पूर्णपणाने बहिष्कृत होती.  मानीव चार वर्णांचा हळूहळू लोप होऊन हल्ली दृढ झालेल्या जाती-पोटजाती ह्यांची आर्थिक पायावर झपाट्याने उभारणी चालली होती.  आणि ह्या उभारणीत अतिशूद्रांना कोणत्याही वृत्तीचा अधिकार अथवा धंद्याची मान्यता दिली गेली नव्हती.  अस्पृश्य जाती ग्रामबाह्य ठरून त्या वंशपरंपरागत नीच आणि व्यवहारवर्ज्य ऊर्फ अनाचरणीय ठरल्या होत्या.  म्हणूनच ह्या सर्व अन्यायाला विरोध करण्यासाठी गौतमाचा शुद्ध बुद्धिवाद उदय पावला.  त्याच्या काळी चांडाल, निषाद, वृषल, पुक्कस, (पुल्कस) इत्यादी ज्या जाती अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होत्या त्यांनाही तो उपदेश करी व त्यांतील कोणी योग्य दिसल्यास त्यास आपल्या भिक्षुसंघातही निःशंक घेई.  थोडक्यात सांगावयाचे ते हे की, उत्तर भारतात, म्हणजे आर्यावर्तात, चार वर्ण आणि त्यातील सर्व पोटभेदांचाच तत्कालीन ग्रामव्यवस्थेत समावेश झाला होता.  आणि ह्या वर्णव्यवस्थेबाहेरील अतिशूद्रांची किंवा असत-शूद्रांची गावाबाहेर पण जवळच वस्तीची व्यवस्था झाली होती.  आपस्तंब धर्मसूत्र मनुस्मृतीपेक्षा आणि भगवद्‍गीतेपेक्षाही जुने आहे.  ते बुद्धपूर्वकालीन असावे, निदान बुद्धसमकालीन तरी असावे.  त्यात ब्राह्मणादी उच्चवर्णीयांचा स्वयंपाक सत्शूद्रांनी करावा आणि स्वयंपाक करतेवेळी आचमन म्हणजे आंघोळ कशी करावी ह्याविषयी खालील नियम आहे.

आर्याधिष्ठिता वा शूद्राः संस्कर्तारः स्युः ॥४॥  तेषां स एवाचमनकल्पः ॥५॥
अधिकमहरहः केशश्मश्रुलोमनखवापनम् ॥६॥
-आपस्तंब धर्मसूत्र, प्रश्न २, खण्डिका ३.

आर्यांच्या घरी स्वयंपाक करताना त्यांच्या देखरेखीखाली सत्शूद्रांनी आर्यांप्रमाणेच आचमन करून म्हणजे हस्तपादादी अवयव धुवून रोज रोज केस, मिशा, नखे काढून कामाला लागावे, असा संप्रदाय होता.  हल्लीही अस्पृश्य मानलेल्या बटलरांना युरोपियन साहेबांच्या बंगल्यांत हेच नियम हुबेहूब पाळावे लागतात.  पुढे ह्याच आपस्तंब सूत्रात म्हटले आहे की-

अप्रयतोपहतमन्नं अप्रयतं न त्वभोज्यम् ॥२१॥
अप्रयतेन तु शूद्रेणो उपहृतमभोज्यम् ॥२२॥

रा. सातवळेकरांनी प्रयत शब्दाचा अर्थ स्वच्छ असा केला आहे.  त्याचा अर्थ आर्यांच्या नियमनाखाली आलेला किंवा वर्णव्यवस्थेत स्वीकारलेला शूद्र असाही होईल.  शिकवून तयार केलेला - ट्रेन्ड - असा अर्थ होईल.  अशा शिकलेल्या शूद्राने आणलेले अन्न घ्यावे, अप्रयत म्हणज न शिकलेल्या - अन्ट्रेंड - असत्शूद्राचे घेऊ नये, असा अर्थ होतो.  ह्यावरून अप्रयत शूद्र हेच ग्रामबाह्य अतिशूद्र असावेत असा तर्क होतो.  अशाच एका बहिष्कृत बाईजवळ तथागताने म्हणजे गौतम बुद्धाने पाणी पिण्यास मागितले, अशी एक बौद्ध कथा वर सांगितलेल्या ख्रिस्ताच्या कथेसारखीच आहे.  सोपाक (श्वपच) नावाच्या एका चांडाळाला भिक्षुसंघात घेतले हे प्रसिद्धच आहे.  बुद्धकालीन समाजव्यवस्थेसंबंधी साधार ऐतिहासिक माहिती पाली वाङ्‌मयावरून तयार केलेली प्रसिद्ध बौद्ध वाङ्‌मयसंशोधक प्रो. र्‍हिस डेव्हिड्स ह्यांच्या 'बुद्धिस्ट इंडिया' ह्या ग्रंथाच्या ४ थ्या भागात चांगली मिळण्यासारखी आहे.  ती पुढे यथानुक्रम आढळेल.  असो.

आता आपण प्रथम ह्या बुद्धोदयकालाच्या मागे मागे अस्पृश्यतेचा छडा लावीत, प्राचीन वाङ्‌मयात मिळतील तितके संदर्भ शोधीत जाऊ.  अगदीच गती खुंटल्यावर मागे परतू.  मग तिसर्‍या प्रकरणात बुद्धोदयकालापुढील बौद्धकालातील अस्पृश्यतेचे निरीक्षण करू.  तदनंतर क्रमाक्रमाने अगदी आताच्या काळाला भिडू.

बुद्धपूर्वकालीन ऊर्फ प्रागैतिहासिक अस्पृश्यता

१.  पाणिनीचा काल

संस्कृतचा आद्य व्याकरणकार पाणिनी ह्याचा काल नक्की ठरत नाही.  सर डॉ. भांडारकर त्याच्या कालाचा सुमार इ.स. पूर्वी ६००-७०० असावा म्हणतात.  पाणिनीच्या अष्टाध्यायीत पुढील सूत्र आहे :

शूद्राणाम् अनिरवसितानाम् ।
...पाणिनीय अष्टाध्याची, २. ४. १०

ह्या सूत्रावर भट्टोजी दीक्षितकृत सिद्धान्तकौमुदीत पुढील टीका आहे :

अबहिष्कृतानां (अनिरवसितानां) शूद्राणां प्राग्वत् ।  तक्षायस्कारम् ॥
पात्राद्वहिष्कृतानां तु चण्डालमृतपाः ।

म्हणजे भावार्थ असा की तक्षा = सुतार, अयस्कार = लोहार वगैरे अबहिष्कृत शूद्रांच्या नावांचा द्वंद समास पूर्वीच्या नियमाप्रमाणे नपुसंकलिंगी आणि चंडाल, मृतप इत्यादी बहिष्कृत शूद्रांच्या नावांचा द्वंद समास पुल्लिंगी असा पणिनीकृत निर्णय आहे.  आमचा प्रस्तुत मुद्दा व्याकरणाचा नसून, पाणिनीच्या कालात बहिष्कृत ऊर्फ निरवसित अस्पृश्यता इतकी रूढ झाली होती की तिच्या विधिनिषेधाचा प्रवेश व्याकरणाच्या सूत्रांतही आढळावा, हा आहे.  निरवसित ह्या शब्दाचा अर्थ भट्टोजी दीक्षितांनी पात्राद् बहिष्कृत असा केला आहे.  पात्राद् बहिष्कृत म्हणजे ज्यांनी वापरलेली भांडी वरिष्ठ वर्गास चालत नव्हती ते, असा अर्थ होतो.  अशा अस्पृश्यांना बंगाल प्रांतात 'अनाचरणीय जाती' अशी संज्ञा अद्यापि आहे.  'ग्रामाद् बहिष्कृत' असा अर्थ केला असता, तर आम्ही ठरविलेल्या व्याख्येप्रमाणे पाणिनीच्या काळी आजकालची अस्पृश्यता रूढ झाली होती असा ठाम सिद्धांत ठरला असता.  तथापि बहिष्काराचा उल्लेख, मग तो 'पात्रात्' असो की 'ग्रामात्' असो, इतका स्पष्ट पाणिनीच्या पूर्वी दुसरा मिळेपर्यंत पाणिनीच्या काळातच आमच्या प्रस्तुत अस्पृश्यतेचे प्रस्थान ठेवणे तूर्त भाग आहे.  पाणिनीचा देश हिंदुस्थानच्या हल्लीच्या पश्चिम शिवेवरचा पेशावर प्रांत होता.  अर्थात् हे प्रस्थान उत्तर हिंदुस्थानापुरतेच ठरत आहे.  दक्षिणेकडील अस्पृश्यतेचा विचार पुढील टप्प्यात करू.
२.  अव्वल औपनिषद काल
चांडाल आणि पौल्कस

सुदैवाने आपल्यास बृहदारण्यकोपनिषदातील चौथ्या अध्यायातील तिसर्‍या ब्राह्मणातील २२ व्या सूक्तात अस्पृश्यांच्या स्थितीसंबंधी मोठा मार्मिक उल्लेख आढळतो.  तो असा :

अत्र पिताऽपिता भवति माताऽमाता लोका अलोका देवा अदेवा वेदा
अवेदा अत्र स्तेनोऽस्तेनो भवति भ्रूणहाऽ भ्रूणहा चाण्डालोऽ चाण्डालः
पौल्कसोऽ पौल्कसः श्रमणोऽ श्रमणस्तापसोऽतापसोनन्वागतं पुण्येनानन्वागतं
पापेन तीर्णो हि तदा सर्वाञ् शोकान्हृदयस्य भवति ।

ह्याच्या पूर्वीच्या २१ व्या सूक्तात आत्मस्थितिप्रत पोहचलेल्या प्राज्ञ पुरुषाची जी अत्यंत उच्च स्थिती वर्णिली आहे तिचेच वर्णन ह्या २२ व्या सूक्तात अधिक विस्ताराने केले आहे.  ह्याचा भावार्थ हा की, ह्या अत्युच्च स्थितीला पोहोचलेला पुरुष बापाला बाप म्हणून अथवा आईला आई म्हणून ओळखीत नाही, ह्या अभेद्य स्थितीत चांडालाचे चांडालत्व व पौल्कसाचे पौल्कसत्वही विलय पावते, इत्यादी इत्यादी.  म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यावहारिक स्थितीत चांडाल व पौल्कस इत्यादी भेद तेव्हा पाळले जात असत असे दिसते.  बौद्ध वाङ्‌मयात या स्थितीला प्रज्ञापारमिता असे पारिभाषिक नाव असे.  जुन्या मताचे हिंदू चांडालादी वर्णबाह्य लोकांना दूर ठेवीत, केवळ प्रज्ञापारमितावस्थेतच त्यांचा अभेद कल्पीत असत.  तर उलटपक्षी बौद्धमतवादी व्यावहारिक स्थितीतही त्यांना स्पृश्य मानीत असत, असे सिद्ध होते.  बौद्ध जरी अस्पृश्यता मानीत नव्हते तरी इतर हिंदू ती मानीत असल्याने बुद्धोदयकाळी ती होती, हे आम्ही वर सिद्ध केलेच आहे.  परंतु त्याच्यापूर्वी सुमारे दोनतीनशे वर्षांच्या काळात म्हणजे बृहदारण्यक व छांदोग्य ह्या उपनिषदांच्या काळात अस्पृश्यता होती की नव्हती हे ठरविणे कठीण आहे.  ह्या काळी चांडाल व पौल्कस ह्या जाती तिरस्करणीय मानल्या जात होत्या असे उल्लेख सापडतात पण त्या आजच्यासारख्या अस्पृश्य व बहिष्कृत होत्याच असा स्पष्ट उल्लेख नाही.  निदान तूर्त सापडत नाही.

ह्याच प्रकारचे दोन उल्लेख छांदोग्य उपनिषदात आढळतात.  हे उपनिषदही जवळजवळ बृहदारण्यकाइतके जुने व विस्तृत आहे.  ह्याच्या ५ व्या अध्यायाच्या १० व्या खंडातील ७ वा श्लोक खाली दिल्याप्रमाणे आहे :

तद्य इह रमणीयचरणा अभ्याशो ह यत्ते रमणीयां योनिमापद्येरन्
ब्राह्मणयोनिं वा क्षत्रिययोनिं वा वैश्ययोनिं वाथ य इह कपूयचरणा अभ्याशो
ह यत्ते कपूयां योनिमापद्येरन् श्वयोनिं वा सूकरयोनिं वा चाण्डालयोनिं वा ॥

अर्थ :  पुण्याचरण करणारे पितृयानात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य इत्यादी आर्य ऊर्फ शुभ योनी प्राप्‍त करून घेतात व अशुभ आचरण करणारे कुत्रा, डुक्कर किंवा चांडालादी हीन योनीप्रत जन्म घेतात.  पुनः ह्याच उपनिषदाच्या ५ व्या अध्यायाच्या २४ व्या खंडातील ४था श्लोक असा आहे :

तस्मादु हैवं विद्यद्यपि चण्डालायोच्छिष्टं प्रयच्छेदात्मनि हैवास्य तद्वैश्वानरे हुतं स्यादिति ।

अर्थ :  ह्या खंडात अग्निहोत्राचे महत्त्व सांगून शेवटी म्हटले आहे की, जो ब्रह्मविद् आहे त्याने चंडालाला आपले उष्टे दिले तरी वैश्वानर आत्म्यामध्ये आहुती दिल्याप्रमाणेच पुण्य आहे.  ह्या दोन्ही श्लोकांचा भावार्थ बृहदारण्यकोपनिषदातील भावार्थाप्रमाणेच आहे.  एकंदरीत ह्या उपनिषदांच्या काळात आर्यांचे तीनच वर्ण होते आणि हल्लीचा जातिभेद नव्हता.  हे वर्ण केवळ जन्मावरच अवलंबून नसून कर्मावरून आणि ज्ञानावरूनही क्वचित घडत असत.  ह्या तीन वर्णांच्या बाहेरचा मोठा जो आर्येतर समाज त्यातील काही जाती आर्यांच्या स्वाधीन होऊन त्यांची परिचर्या करून राहत.  त्यांचा शूद्र नावाचा चौथा वर्ण पुढे बनविण्यात आला.  ह्या चौथ्या वर्णात समाविष्ट न झालेल्या चांडाल व पौल्कस इत्यादी तिरस्करणीय जाती वर्णबाह्य अशाच राहत होत्या.  यांनाच पुढे अप्रयत शूद्र अशी संज्ञा मिळून पुढे बुद्धोदयकाळी किंवा त्यांच्या आगेमागे आपंस्तंब सूत्राच्या काळी त्यांना हल्लीची अस्पृश्यता प्राप्‍त झाली असावी.  परंतु ह्या अव्वल उपनिषत्काळी चांडाल, पुल्कस इत्यादी जाती जरी हीन मानल्या जात होत्या तरी त्या खरोखरच अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होत्या की नाही, हे ठरविण्यास निश्चित पुरावा नाही.  तरी बहुतकरून त्या तशा असाव्यात असाच अंदाज करणे जास्त योग्य होईल.
३.  ब्राह्मणकालीन अस्पृश्यता

प्राचीनात प्राचीन जे बृहदारण्यक उपनिषद त्याच्याही मागे वाङ्‌मयात ब्राह्मणकाल आहे.  कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडात चांडाल व पौल्कस ह्या दोन राष्ट्रांचा केवळ नामनिर्देश मात्र आढळतो.  पण त्यावरून ही राष्ट्रे अगदी अस्पृश्य व ग्रामबाह्य होती असा तर्क काढण्यास मुळीच जागा नाही.  त्रैवर्णिक आर्याहून त्या भिन्न वंशाच्या होत्या.  फार तर त्या किंचित कमी गणल्या जात असाव्यात इतकेच सिद्ध होते.  ह्या तैत्तिरीय ब्राह्मणाच्या कालात पुरुषमेध करण्याची चाल अद्याप शिल्लक राहिलेली होती.  पण ह्या मेधात पशूंच्याऐवजी ज्या पुरुषांचा बळी देण्यात येत असे, त्या पुरुषाला ठार न मारता जिवंत सोडून देण्यात येत असे.  अद्यापि काही अस्सल मराठ्यांच्या घरी रानसटवाईची अथवा घोडेसटवाईची पूजा म्हणून एक विधी मूल जन्मल्यापासून त्याचे जावळ काढावयाच्या अगोदर करण्यात येत असतो.  हा विधी रानातच करावयाचा असतो.  रानसटवाईच्या पूजेत बकरे जिवंत मारून त्याचा नैवेद्य सटवाईला दाखवावयाचा असतो.  पण घोडेसटवाईच्या पूजेत एक बकरे आणून त्याचा बळी देऊन ते जिवंतच सटवाईच्या नावाने सोडावयाचे असते.  नैवेद्य व जेवण पुरणपोळीचेच असते.  माझ्या बाळपणी माझ्यामागून जन्मलेल्या सर्व भावंडांचे जावळ काढण्यापूर्वी हा घोडेसटवाईचा विधी माझ्या वडिलांनी केलेला मी स्वतः पाहिला आहे.  घोडेसटवाई या नावावरून पूर्वी घोडे जिवंत सोडले जात असावेत; पण गरिबीमुळे ती पाळी बकर्‍यावर, कोंबड्यावर व शेवटी अंड्यावर आणि लिंबावरही आली असावी.  हाच प्रकार तैत्तिरीय ब्राह्मणाच्या तृतीय कांडात वर्णन केलेल्या पुरुषमेधाचाही आहे.  पुरुषमेध म्हणजे ॠग्वेदाच्या १० व्या मंडलातल्या पुरुषसूक्तातील, विराटपुरुषाच्या मेधाप्रमाणे रूपकवजाच आहे.  ह्या तृतीय कांडातील ४ थ्या प्रपाठकात निरनिराळ्या लहान-मोठ्या देवतांना निरनिराळ्या जातींच्या पुरुषांच्या बळीचा विधी सांगितला आहे.  ह्या देवतांच्या महत्त्वाप्रमाणे पुरुषांच्या जातीचे महत्त्व अथवा लघुत्व दिसून येते.  १४ व्या मंत्रात ''बीभत्सायै (देवतायै) पौल्कसम्'' आणि १७ व्या मंत्रामध्ये ''वायवे (देवतायै) चाण्डालम्'' असे उल्लेख स्पष्ट आहेत.  ह्यावरून पौल्कस जातीचे लोक बीभत्स (शिश्नदेवतेची) पूजा करीत असावेत व चांडाल वायुदेवतेची पूजा करीत असावेत, असा तर्क करावा लागत आहे,  वायुदेवतेचा, संबंध रुद्र ऊर्फ शिव देवतेशी पोहोचतो.  ह्यावरून चांडाल आणि पौल्कस आताप्रमाणेच तेव्हाही शक्तीची आणि शिवाची उपासक राष्ट्रे असली पाहिजेत इतकेच सिद्ध होते.  ह्या पूजेचे प्रकार तेव्हा बीभत्स असले तरी ह्या जाती तेवढ्यावरूनच अस्पृश्य होत्या, असा मुळीच ध्वनी निघत नाही.
निषाद आणि वृषल

चांडाल आणि पौल्कस ह्यांशिवाय यास्काच्या निरुक्तात या जातींचा उल्लेख अध्याय ३, खंड १६ मध्ये पुढीलप्रमाणे आढळतो;
वदिति सिद्धोपमा ।  ब्राह्मणवत् वृषलवत् ।  ब्राह्मणा इव वृषला इव ।

ह्या मंत्रावर यास्कानेच जे भाष्य केले आहे त्यात वृषलाचा अर्थ सांगताना केलेल्या 'वृषलो वृषशीलो भवति वृषाशीलो वा ।'  ह्या व्युत्पत्तीवरून वृषल नावाची एक निराळी जात होती की बैलासारखा एखादा मठ्ठ अनार्य माणूस इतकाच वृषल याचा अर्थ घ्यावयाचा, असा विकल्प प्राप्‍त होतो.  चंद्रगुप्‍त मौर्याचा गुरू आणि दिवाण चाणक्य केव्हा केव्हा रागावून चंद्रगुप्तास 'रे वृषल' ('ए बैला') असा टोमणा मारीत असे.  ह्यावरूनही वृषल नावाची एक निराळी जात नसावी अशी शंका येते.

निरुक्ताचा अध्याय ३, खंड ८ यात माणसांच्या निरनिराळ्या २५ प्रकारांपैकी पंचजन हा एक प्रकार सांगितला आहे.  ह्या पंचजन नावाचा अर्थ सांगताना यास्काचार्यांनी 'चत्वारो वर्णा निषादः पंचम इति औपमन्यवः' असा औपमन्यव नावाच्या प्राचीन स्मृतिकारांचा दाखला दिला आहे.  त्याशिवाय निषादः कस्मात् ?  निषदनो भवति, निषण्णमस्मिन् पापकम् इति' ।  म्हणजे, ज्याच्यामध्ये पाप दृढ होऊन बसले असते तो निषाद, असा अर्थ स्वतः यास्काचार्य देत आहेत.  परंतु बुद्धोदयकालाच्या उपनिषदांतून फक्त शूद्र वर्णाचा उल्लेख सापडतो.  पाचव्या वर्णाचा उल्लेख औपमन्यवांनीच प्रथम केला आहे.  त्यावरून औपमन्यवांचा काळ उपनिषदांच्या मागूनचा म्हणजे बुद्धोदयानंतरचा किंवा फार तर तत्कालीन असावा; असे होते.  आणि यास्काचा काळ तर त्याच्याही मागूनचा असे सिद्ध होते.  मनुस्मृतीने यास्काच्याही मागून चांडालांना 'नास्ति तु पंचमः' असे म्हणूनही पुनः ५ व्या प्रकारात गणिले आहे.  त्याचा विचार योग्य स्थळी करू.

वर जे यास्क, पाणिनी वगैरे प्राचीन ग्रंथकारांचे उल्लेख आले आहेत, त्यांचा संदर्भ वाचकांनी फार सावधगिरीनेच समजला पाहिजे.  कारण त्यांच्या कालनिर्णयासंबंधाने विद्वानांत फार वाद माजून राहिला आहे.  जसजसे संशोधन जास्त होत आहे तसतसा हा वाद अधिकच माजत आहे.  यास्क आधी किंवा पाणिनी आधी, आणि हे दोघेही बुद्धकाळापूर्वी किंवा मागून, ही गोष्ट छातीवर हात ठेवून अद्यापि सांगण्यास कोणी विद्वान धजत नाहीत.  साधारणपणे यास्क, पाणिनीच्या पूर्वी कित्येक शतके झाला असावा अशी समजूत आहे.  कारण, पणिनीने यास्क शब्द सिद्ध करण्याचा प्रयत्‍न केला आहे.  ह्यावरून हा पाणिनीच्या पूर्वी असावा.  बृहदारण्यक उपनिषदात व पिंगल छंदःसूत्रात ह्याचा उल्लेख आहे, वगैरे पुण्याचे चित्रावशास्त्री आपल्या 'प्राचीन चरित्रकोशा'त लिहितात.  राजवाडे पाणिनीचा काळ इ.स.पू. १२००-९०० इतका मागे नेतात, सर डॉ. भांडारकर तो ७००-६०० ठरवितात, पण कित्येक पुरावे असेही मिळतात की, पाणिनी फार तर इ.स.पूर्वी ४००-३५० पेक्षा मागे जाऊ शकतच नाही.  राजशेखराची काव्यमीमांसा ख्रिस्ती शकानंतर १००० च्या सुमारास झाली.  तिच्यात उल्लेख आहे तो असा :

श्रूयते च पाटलिपुत्रे शास्त्रकारपरीक्षा -
अत्रोपवर्षवर्षाविह पाणिनिपिङगलाविह व्याडि: ।
वररुचिपतञ्ञली इह परीक्षिताः ख्यातिमुपजग्मुः ॥
काव्यमीमांसा, १० (पृ. ५५)

ह्या पाणिनी, पिंगल इत्यादी मंडळींच्या परीक्षा पाटलिपुत्र या राजधानीत झाल्या असल्या तर, पाटलिपुत्र हा गाव उदयी राजाने प्रथम राजधानीचा केला, त्यानंतर झाल्या असाव्या.  त्या उदयी राजाचा काळ इ.स.पू. ४५० हा आहे.  हरचरितचिंतामणीच्या २७ व्या सर्गात माहिती मिळते की, नंदाच्या पाटलिपुत्र राजधानीत शंकरस्वामीच्या वर्ष नावाच्या पुत्रापासून पाणिनी हा विद्या शिकला.  यावरूनही त्याचा काळ इ.स.पूर्वी ४००-३५० च्या सुमाराचा ठरतो.

ते कसेही असो !  ह्या प्राचीन ॠषींचा कालनिर्णय करण्याचे हे स्थळ मुळीच नव्हे.  पण निरुक्ताचा अध्याय ३, खंड ८ यात माणसाच्या २५ जातींचा उल्लेख केला आहे, असे वर म्हटले आहे, तेथे यास्काचार्यांनी प्रथम :-

पंचजना मम होत्रं जुषध्वम् ।  ॠग्वेदसंहिता, १०.५३.४.

असा श्रुतिमंत्राचा आधार देऊन त्यावरील भाष्यात स्पष्ट म्हटले आहे -

गंधर्वाः पितरो देवा असुरा रक्षांसीत्येके ।  चत्वारो वर्णा निषादः पंचम इत्यौपमन्यवः ॥

येथे पंचजन ह्या शब्दाचे दोन अर्थ स्पष्ट सांगितले आहेत.  'गंधर्व, पितर, देव, असुर, राक्षस' हा एक अर्थ आणि 'चार वर्ण, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि पाचवा निषाद, म्हणजे वर्णबाह्य मानलेल्यांचा समुदाय, हा दुसरा अर्थ.  आता हे औपमन्यव स्मृतिकार कोण व केव्हाचे असावेत हाच प्रश्न मुद्द्याचा आहे.  ब्राह्मणकाळात आणि अव्वल उपनिषद्काळात तीनच वर्ण होते.  पुढे चौथा शूद्रवर्ण समाविष्ट केला तो अव्वल उपनिषदांचा काळ नव्हे.  तो पाणिनीचा काळ; म्हणून हे औपमन्यव पाणिनीच्या, किंबहुना ते ज्या अर्थी पाचवा वर्ण मानतात त्या अर्थी बौद्धांच्या काळी, किंवा त्यानंतरचे, असावेत असा तर्क होत आहे व त्यांचा उल्लेख ज्या यासकाचार्यांनी केला ते पाणिनीनंतरचे अशी अर्थापत्ती निघत आहे.  पण यासकाचार्यांचा काळच बृहदारण्यक उपनिषदाच्या वेळी ठरत असल्यास औपमन्यव त्याहूनही पूर्वीचे ठरून पाचवा वर्ण जो निषादांचा तो इ.स.पू. ८००-९०० चा ठरून जवळजवळ श्रीकृष्णाच्या काळापर्यंत मागे जाऊ पाहतो.  निषाद म्हणून कोणी एक विवक्षित जात नव्हती.  पण शूद्रवर्णाहून ते निराळे व वर्णबाह्य होते हे खरे.  तथापि, ते आमच्या वरील व्याख्येप्रमाणे अस्पृश्य आणि ग्रामबाह्य होते असे ठरत नाही.  वाचकांनी ह्या सर्व गोष्टी तारतम्याने व सावधपणानेच विचारात घ्याव्यात हे बरे.

प्रो. मॅक्डोनेल व कीथ यांनी Vedic Index या नावाचा वेदांतील शब्दांचा कोश तयार केला आहे.  त्याच्यात ४५३ पानावर निषाद शब्दासंबंधी पुढील खुलासा केला आहे :

Nishada is found in later samhitas and the Brahmans.  The word seems to denote not so much a tribe but a general term for the Non-Aryan tribes who were settled down but were not under Aryan control as the Shudras were; for the Aupamanyava took the five people panchajana to be the four castes and the Nishadas and the Commentator Mahidhara explains the word as Bhills.

अर्थ :  ''निषाद हा शब्द नंतरच्या संहितांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये आढळतो.  तो शब्द येथे विशिष्ट जातिवाचक नसून सामान्येकरून ज्या आर्येतर जाती त्या वेळेस वसाहत करून होत्या; परंतु शूद्रांप्रमाणे ज्या आर्यांच्या सत्तेखाली आल्या नव्हत्या अशा सामान्य जातींचा वाचक आहे, असे वाटते.  कारण, औपमन्यव हे पंचजन याचा अर्थ चार वर्ण आणि निषाद असा घेतात, आणि भाष्यकार महीधर निषाद शब्दाची भिल्ल अशी व्याख्या करतो.'' ह्यावरून निषाद ही जमात चातुर्वर्ण्याच्या बाहेरची होती, तरी ती अस्पृश्य खात्रीने नव्हती; आणि भिल्ल, सांताळ, गोंड वगैरे रानटी जाती आजही अस्पृश्य नाहीत हे ध्यानात घेण्यासारखे आहे.
४.  श्रीकृष्ण काल

बृहदारण्यकोपनिषद हे सर्व उपनिषदांत अत्यंत प्राचीन असे जर्मन प्रोफेसर पॉल डॉयसन इत्यादिकांनी ठरविले आहे.  त्या काळापर्यंत म्हणजे इ.स.पूर्वी सुमारे ८०० वर्षे तरी -जास्तच पण कमी नव्हे - चांडालांची व पौल्कसांची आताप्रमाणे बहिष्कृत आणि अस्पृश्य अशी स्थिती थोड्याबहुत अंशाने व्हावयास लागली होती.  ह्याही पलीकडे आर्येतर शुद्र राष्ट्रांची नावे छांदस वाङ्‌मयात फार क्वचित आढळतात.  त्या राष्ट्रांची स्थिती बहिष्कृत आणि अनाचरणीय होतीच असा सबळ पुरावा सापडत नाही.  उलट ती तशी नसावी असे समजण्यास जे पौराणिक उल्लेख सापडतात त्यांचा आता निर्देश करू.  ब्राह्मणांच्या मागील काळ म्हणजे भारतीय युद्धाचा काळ.  हा श्रीकृष्ण वासुदेवाचा काळा होय.  पुराणकालाचा शास्त्रीय, निःपक्षपाती आणि सूक्ष्म असा विचार मि. एफ. ई. पार्जिटर यांनी आपल्या Ancient Indian Historical Tradition ह्या अत्यंत परिश्रमाने तयार केलेल्या पुस्तकात केला आहे.  ह्या ग्रंथाच्या १५ व्या भागात भारतीय युद्धाचा काळ इ.स.पूर्वी ९५० वर्षांचा असावा असा पुष्कळशा राजकुलांच्या वंशावळ्यांवरून ठरविण्याचा पार्जिटरने प्रयत्‍न केला आहे.  ह्याच्या अलीकडे कोणीही भारतीय युद्ध आणू शकत नाही.  पौरस्त्य पंडित हा काळ दीड हजारांपासून दोन हजार वर्षे मागे नेतात; पण त्यांनी पार्जिटरइतके पुरावे दिले नाहीत.

श्रीकृष्णाचा काळ नक्की कोणताही असो.  त्याच्या काळी भारतात प्रबळ आर्येतर राष्ट्रे होती.  त्यात चांडाल हे राष्ट्र प्रमुख होते.  श्रीकृष्णाच्या अष्टनायिकांत जांबवती नावाची एक अस्वल (?) जातीची कन्या होती.  तिच्याशी श्रीकृष्णाचा प्रीतिविवाह झाला.  ती कृष्णाला इतकी प्रिय होती की, तिच्यापोटी पुत्र व्हावा म्हणून त्याने कैलासास जाऊन शंकराचा प्रसाद प्राप्‍त करून घेतला व त्या योगाने त्याला सांब नावाचा पुत्र झाला.  हाच पुढे शिबी या नावाने प्रसिद्ध राजा झाला असा उल्लेख महाभारतात आहे.  हे शिबी नावाचे आर्येतर राष्ट्र सिंधू नदीच्या आसपास होते व याच्याशी यदू ह्या आर्याचा शरीरसंबंध झाला होता असाही भारतात उल्लेख आहे.  परंतु हाच दाखला आमच्या प्रस्तुत विषयाला बरोबर लागू पडेल अशा रीतीने पाली ग्रंथांतून अधिक स्पष्टपणे सांगितलेला आढळतो.  तो येणेप्रमाणे :

गाथा :  अत्थि जंबावती नाम माता सिबिराजस्स ॥
सा भारिया वासुदेवस्स कण्हस्स अहोसि पियाऽति ॥१४८५॥

अट्ठकथा (अर्थकथा) :  जंबावतीति सिबिरञ्जे माता कण्हायनगोत्तस्स दसभातिकानं जेट्ठस्स वासुदेवस्स पिया महेसी अहोसि ।  सो किर एकदिवसं, द्वारावतीती निक्खमित्वा उय्यानं गच्छन्तो, चंडालगामतो केनचिदेव करणीयेन पविसन्तीं, एकं एकमन्ते ठितं अभिरूपं कुमारिकं दिस्वाऽव पटिबद्धचित्तो हुत्वा, किंजातिकाति पुच्छापेत्वा, चंडालजातिकाऽति सुत्वाऽपि पटिबद्धचित्तताय विप्पटिसारी हुत्वा सस्सामिकभावं पुच्छपेत्वा, अस्सामिकाऽति सुत्वा, तमादाय, ततोऽवनिवत्तित्वा निवेसनं नेत्वा, रतनरासिम्हि ठपापेत्वा, अग्गमहेसिं अकासि ।  सा सिविनामं पुत्तं विजायी ।  सो पितु अच्चयेन द्वारावतीयं रज्जं कारेसि तं संधाय इदं वुत्तं इति ।  सो इमं उदाहरणं आहरित्वा एवरूपोपि नाम खत्तियो चंडालिया सद्धिवासं कप्पेसि, अम्हेसु तिरच्छानगतेसु किंवत्तब्बं अञ्ञमञं संवासरोचनं ञेव पमाणंऽति वत्वा अपरंऽपि उदाहरत्तो आह !-
महाउगम्म जातक (५४६), गाथा १४८५ (अट्ठकथेसह)

मूळ ग्रंथातले शब्द जसेच्या तसेच वाचकांस समजावेत म्हणून हा पाली उतारा घेतला आहे.  ह्याचा मराठीत भावार्थ असा होतो :

''शिबी राजाची आई जंबावती नावाची कृष्ण कुळातील वासुदेवाची प्रिय भार्या होती,''  एवढीच मूळची गाथा.  तिच्यावर पुढील काळी अट्ठकथा ऊर्फ भाष्य झाले ते असे :  ''कृष्णायन गोत्रातील १० भावांपैकी वडील जो, वासुदेव, त्याची जंबावती नावाची प्रिय राणी शिबी राजाची आई होती.  तो (वासुदेव) एके दिवशी द्वारकेच्या बाहेर निघून बागेकडे जात असता, चंडालवाड्यातून काही कामासाठी (मुख्य शहरात) प्रवेश करणारी एक लावण्यवती कुमारिका एका बाजूला उभी राहिलेली पाहू, आकृष्टचित्त होऊन, ती कोणत्या जातीची आहे असे (दुसर्‍याकडून) विचारवून, चंडाल जातीची आहे असे ऐकूनही, मोहित झाल्यामुळे विवश होत्साता तिला स्वामी (पती) आहे काय हे विचारून, नाही असे ऐकून, तिला घेऊन, तेथून निघून घरी नेऊन रत्‍नराशीवर बसवून तिला पट्टराणी करिता झाला !  तिला शिबी नावाचा पुत्र झाला.  त्याने बापाच्या मागे द्वारावतीचे राज्य केले असे वृत्त आहे.  क्षत्रियाने चांडालीशी विवाह केला ही तर गोष्ट असो; पण मनुष्य आणि पशू अशा भिन्न योनीमध्येही संयोग होणे स्वाभाविक आहे.  संवासाचे कारण जाती किंबहुना योनीही नसून केवळ प्रीतीच होय असे दाखविण्यासाठी दुसरे उदाहरण पुढे देत आहे...''

प्रस्तुत विषयावर इतका तपशीलवार स्पष्ट दाखला इतक्या प्राचीन काळातील दुसरा मिळणे अत्यंत मुष्कील आहे.  ह्यातील मूळ गाथा जी आहे ती फार प्राचीन- बौद्धकाळापूर्वीची- असावी.  अट्ठकथा ऊर्फ भाष्य जे आहे ते मात्र गौतम बुद्धानंतरच्या काळातील आहे.  मी ह्या उतार्‍याविषयीचा एक निबंध भारत इतिहास संशोधन मंडळाच्या एका संमेलनापुढे वाचला, तेव्हा 'भांडारकर इन्स्टिट्यूट' चे सेक्रेटरी प्रो. परांजप्ये ह्यांनी असा आक्षेप घेतला की, हा सबंध पालीतील उल्लेख व सर्व जातक कथा अलीकडच्या आहेत, इतकेच नव्हे, तर त्यांतून केवळ हिंदू ऐतिहासिक पुरुषांना ठिकठिकाणी कमीपणा आणण्याचा प्रयत्‍न केला गेला आहे.  त्यामुळे त्या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्त्व फारसे नाही.  परांजप्यांचे म्हणणे काही असो.  केवळ इतिहासाच्या दृष्टीने तुलना करावयाची झाल्यास, हिंदू पुराणे व पाली वाङ्‌मय यांचे दरम्यान, सत्य, सरळपणा, निर्हेतुकपणा व सरसपणा इत्यादी गुणांचे पारडे हिंदू पुराणांपेक्षा पाली वाङ्‌मयाकडे अधिक झुकते आहे हे निःपक्षपाती पंडितांना पटेल अशी मला उमेद आहे.  

जातकग्रंथ जरी अलीकडचे असले तरी ते हल्लीच्या महाभारताहूनही अलीकडचे असतील असे नाही.  शिवाय त्या ग्रंथात ज्या गाथा आहेत त्यांतील दंतकथांचा अंश प्रत्यक्ष गौतम बुद्धाच्याही काळापूर्वी उत्तर हिंदुस्थानातच नव्हे तर मेसॉपोटेमियापासून गंगेच्या किनार्‍यापर्यंत तत्कालीन आठवणींच्या वातावरणात वावरत होता हे प्राचीनेतिहासवेत्त्यांना सांगण्याची जरुरी नाही.  म्हणून; मला केवळ माझ्या प्रस्तुत विषयासाठी म्हणजे भारतीय इतिहासाचे टप्पे कसे पडत गेले हे पाहण्याच्या कामी हा वरील पाली भाषेतील उतारा बिनमोल वाटत आहे.  त्याचे कारण असे :  वरील गाथेत जांबवती अथवा जंबावती आणि वासुदेव ह्यांच्या नुसत्या नावांचा आणि नात्याचाच उल्लेख आहे.  जांबवती व वासुदेव हे भिन्न वंशांतले होते; पण तेवढ्यावरूनच त्या काही अशा भिन्न वंशांत विवाहसंबंध होत नव्हते किंवा जंबावतीच्या वंशाला अस्पृश्य मानण्यात येत होतेच, असे समजण्यापुरता वरील गाथेत तरी पुरावा नाही.  ह्यावरून श्रीकृष्णाच्या काळी आर्येतर लोकांवर - निदान चंडालासारख्या राजवैभवी आर्येतरांवर - ग्रामबहिष्कार पडून ते लोक किंवा ते राष्ट्र अस्पृश्य बनले होते असे मला वाटत नाही.  ह्याच काळी भीमानेही हिडिंब रावाच्या आर्येतराची मुलगी हिडिंबा हिच्याशी विवाह केला.  तिच्या पोटी घटोत्कच नावाचा पुत्र झाला.  बाजीरावाला मस्तानीच्या पोटी समशेरबहाद्दर होऊन तो जसा पानिपतच्या युद्धात हिंदूंच्या बाजूने कामास आला; तसाच घटोत्कचही ३००० वर्षांपूर्वी घडलेल्या युद्धात त्याच रणांगणात कामास आला हे महाभारतात सांगितले आहे.  तसाच अर्जुनाचा पुत्र बभ्रुवाहन हाही आईकडून आर्येतरच होता.  न जाणो प्रत्यक्ष पांडव आणि त्यांचे साथीदार कृष्णायन गोत्र, हेही आर्य होते की द्राविड होते हे ऐतिहासिकरीत्या सिद्ध करणे दिसते तितके सोपे नाही.  असो !  तो आमचा प्रस्तुत मुद्दा नव्हे.  आमचा प्रस्तुत प्रश्न इतकाच की, भारतीय युद्धाचे काळी हिंदुस्थानात हल्लीच्या स्वरूपात ग्रामबहिष्कार व अस्पृश्यता होती की नव्हती ?  मला वाटते, आर्य-आर्येतरांचा शरीरसंबंध झाल्याची वर दिल्याप्रमाणे अनेक उदाहरणे प्राचीन ग्रंथांत सापडतात.  त्यांवरून अस्पृश्यता त्या काळी नव्हती.  'होती' असा सिद्धांत कोणी करू पाहील तर त्याला इतक्या प्राचीन वाङ्‌मयात तूर्त पुरावाच मिळत नाही.  हा पुरावा पुढे बृहदारण्यकोपनिषदापासून मिळू लागतो; व तो बुद्धाच्या काळी भरपूर मिळून, तेव्हा मात्र अस्पृश्यतेची संस्था हल्लीच्या स्वरूपात स्थापित झाली होती, असे म्हणण्यास फारशी हरकत वाटत नाही.  

वरील पाली भाषेच्या उतार्‍यातील जी गाथा आहे तिची वासलात अशी लागली.  पण जे भाष्य आहे ते मात्र नंतरच्या ज्या काळात हल्लीची विस्तृत भारत, रामायण ही काव्ये रचली गेली, त्या नागरसंस्कृत व नागरपाली ह्या काळातील असावे असा माझा तर्क आहे.  ह्या काळी चंडालवाडे ऊर्फ महारवाडे मुख्य नगराच्या बाहेर वसविले जात होते.  जंबावती बाजूला उभी होती.  (मलबारात हल्लीदेखील स्पृश्य वाटने जाऊ लागला असता अस्पृश्य मनुष्य बाजूला उभा राहतो.)  ती चांडाल जातीची आहे असे ऐकूनही तिच्याशी श्रीकृष्णाने विवाह केला हे जे आश्चर्य वाटत आहे; ते नंतरच्या काळातल्या भाष्यकाराला वाटणे साहजिकच आहे.  पण प्राचीन गाथाकारांना वाटण्याचे कारण नाही.  त्यांच्या काळी अस्पृश्यता नव्हती.  प्रत्यक्ष कृष्णाचा म्हणजे भारतीय युद्धाचा काळ, किंबहुना पाली गाथाकारांचाही काळ, पाली अट्ठकथाकारांच्या बराच पूर्वीचा, किमान पक्षी पाचसहाशे वर्षे तरी अगोदरचा, असावा.  गाथा आणि अट्ठकथा एकाच ग्रंथात आहेत,  एवढ्यावरून त्यांचा काळही एकच असावा असे गृहीत धरता येत नाही.  त्यावरील विषयावरून तरी तसे खास म्हणता येत नाही.  संशोधक राजवाडे यांनी पाली भाषेचा काळ शालिवाहन शकापूर्वी १५०० वर्षे धरला आहे.  पाणिनीय संस्कृताचाही काळ तितकाच प्राचीन धरला आहे.  राजवाडे यांची अतिशयोक्तीकडे असलेली प्रवृत्ती ध्यानात घेतली असता, पाणिनीचा काळ इतका मागे खेचता येत नसला तरी पाली गाथांचा काळ भारतीय युद्धाचे काळापर्यंत मागे नेण्यास हरकत दिसत नाही.  आणि ह्या काळात कृष्णवासुदेव आणि पांडव व इतर ऐल (सोमवंशी) ऊर्फ आर्य क्षत्रिय हिंदुस्थानात त्यांच्याही पूर्वी आलेल्या सूर्यवंशी - म्हणजे मिसरी ऊर्फ इजिप्शियन अथवा द्राविड - क्षत्रियांशी बेटीव्यवहार करीत असत, इतकेच नव्हे तर शूद्र, नाग अथवा चांडालादी इतर क्षत्रिय कुलांशीही बेटीव्यवहार करीत असत, हे निर्विकार इतिहासज्ञांस कबूल करणे फारसे जड जाईल, असे मला वाटत नाही.  अशा विधानांस ग्रांथिक पुरावा मिळाल्यास ते चांगलेच, पण तो दुर्मिळ असल्यास त्याच्याविषयी आग्रह धरण्याचे संशोधकास कारण नाही.  असा कोणी आग्रहच धरल्यास वरील पाली उतारा महत्त्वाचा आहे, असे मी समजतो.  पण हा उतारा म्हणजे केवळ सिद्धांतच आहे, असेही माझे म्हणणे नाही, ही गोष्ट वाचकांनी ध्यानात बाळगावी.  प्रागैतिहासिक काळात प्रवेश केल्यावर प्रत्येक वाचकाने स्वतःच संशोधक बनावे.  इतरांनी व्यर्थ वादात पडू नये.  वरील पाली गाथेचा व तिच्यावरील अट्ठकथेचा, कालतः तारतम्यपूर्वक बारीक विचार केला असता असे दिसते की, श्रीकृष्णाच्या काली हल्लीची अस्पृश्यता मुळीच नसून केवळ अनाचरणीयता असावी.  ती केवळ परकीयासंबंधीच असावी.  आणि तीही श्रीकृष्णाने उल्लंघिली.
५.  वेद-मंत्र काल

ज्ञानकोश, भाग तिसरा, पान ३६३ वर 'वेदकालातील शब्दसृष्टी ह्या कथळ्याखाली वेदकालीन जातींची जी नावे दिली आहेत, त्यांतून हीन जातींची नावे निवडून पुढे दिली आहेत.

संहितातील नावे  (तक्ता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

वरील यादींचा वेदकाल म्हणजे मंत्र, आरण्यक, उपनिषद् व सूत्रकालापर्यंतचा काल असे ज्ञानकोशकारांनी म्हटले आहे.  खास ॠग्वेदसंहितेत वृषल हेच एक नाव आढळते.  दहाव्या मंडलाशिवाय जातिवाचक शब्दच आढळत नाहीत असे, ॠग्वेदाचा अगदी बारकाईने अभ्यास ज्यांनी चालविला आहे, त्या गुरुवर्य प्रि. राजवाड्यांनी सांगितले.  तथापि अधिक शोधाअन्ती जी जातिवाचक नावे आढळली.  ती पुढे दिली आहेत.  जीत 'वृषल' हा शब्द आहे, ती ॠग्वेदातील ॠचा अशी आहे :

पूर्वाह्वे अश्वान्युयुजे हि बभ्रून् ।  सो अग्नेरत्ने वृषलः पपाद ॥
ॠग्वेदसंहिता, १०.३४.११.

अर्थ - जो (जुगार खेळणारा) सकाळी तांबडे घोडे रथास जुंपून निघाला, तो दिवसाच्या (अग्नीच्या) शेवटी वृषल म्हणजे बैल हाकणारा होऊन पडला, म्हणजे जुगारात हरला.  येथेही वृषल ह्याचा अर्थ अस्पृश्य असा मुळीच होऊ शकत नाही.  ह्यावरून अस्सल मंत्रवाङ्‌मयात अस्पृश्यतेचा मागमूसही नाही, हेच सिद्ध होते.

अस्पृश्यतेचा जरी प्रत्यक्ष पुरावा मंत्रकालात मिळत नाही, तरी ॠग्वेदाच्या सातव्या मंडळात काही ॠचा आढळतात त्यावरून काही परधर्मी-परजातींविषयी आर्य ॠषींना किती भयंकर तिटकारा वाटत होता ते दिसते.  ह्यांपैकी काहींचा परविच्छेद करून त्या पुढे देत आहे.  

किमीदिन
) इंद्रासोमा सम् अघऽशंसम् अभि अघम् तपुः ययस्तु चरुः अग्निवान्ऽइव ।
ब्रह्मऽद्विष क्रव्यऽअदे घोरऽचक्षसे द्वेषः धत्तम् अनवायम् किमीदिने ॥
ॠग्वेद पदपाठ, ७.१०४.२.

अर्थ - हे इंद्रा आणि सोमा, दुष्ट किमीदिनाभोवती त्याचे पाप विस्तवात तापणार्‍या हांड्याप्रमाणे तापत राहो.  प्रार्थनेचा शत्रू, कच्चे मांस खाणारा, भयानक डोळ्यांचा जो किमीदिन त्याच्याशी निरंतर द्वेष राख.


२)  मा नः रक्षः अभि नट् यातुऽमावताम् अप उच्छतु मिथुना या किमीदिना ।
पृथिवी नः पार्थिवात् पातु अंहसः अन्तरिक्षम् दिव्यात् पातु अस्मान् ॥
ॠग्वेद पदपाठ ७.१०४.२३.

अर्थ - जादूगार राक्षस आम्हांजवळ न येऊ देत.  उषा किमीदिनांच्या जोडप्यांना हाकून देवो.  पृथ्वी आम्हांला पार्थिव संकटांपासून राखो.  आणि आकाशातून येणार्‍या विघ्नांपासून अंतराळ राखो.
यातुधान
३)  यः मा अयातुम् यातुऽधान इति आह यः वा रक्षाः शुचिः अस्मि इति आह ।
इन्द्रः तम् हन्तु महता वधेन विश्वस्य जन्तोः अधमः पदीष्ट ॥
ॠग्वेद पदपाठ ७.१०४.१६.

अर्थ - मी राक्षस नसून मला जो राक्षस म्हणतो आणि स्वतः राक्षस असून आपण राक्षस नाही असे म्हणतो, अशा दोघांनाही इंद्र तीव्र शस्त्राने मारो.  सर्वांत अत्यंत नीच अशा राक्षसाचा नाश होवो.

मूरदेव
४)  इन्द्र जहि पुमांसम् यातुऽधानम् उत स्त्रियम् मायया शाशदानाम् ।
विग्रीवासः मूरऽदेवाः ॠदन्तु मा ते दृशन् सूर्यम् उत्ऽचरन्तम् ॥
ॠग्वेद पदपाठ ७.१०४.२४.

अर्थ - रे इंद्रा !  जादुविद्येत जय मिळविणार्‍या आणि एकत्र रमणार्‍या पुरुष व स्त्री राक्षसांना ठार मार.  ज्यांचे देव मूर्ख आहेत आणि माना वाकड्या आहेत, अशा दुष्टांचे पतन होवो.  ते कधीच उदयास येणार्‍या सूर्याला न पाहोत.

शिश्नदेव
५)  न यातवः इन्द्र जूजुवुः नः न वन्दना शविष्ठ वेद्याभिः ।
सः शर्धत् अर्यः विषुणस्य जन्तोः मा शिश्नदेवाः अपि गुः ॠतम् नः ॥
ॠग्वेद पदपाठ ७.२१.५

अर्थ - हे बलवान इंद्रा !  कोणाही दुष्ट शूत्रूंनी आपल्या काव्यांनी आमचा पराभव केला नाही.  आमचा खरा देव त्यांच्या कळपांना जिंको.  हे बीभत्सपूजक आमच्या उपासनास्थानाजवळ न येवोत.

६)  सः वाजम् याता अपदुःऽपदा यन् स्वःऽसाता परि सदत् सनिष्यन् ।
अनर्वा यत् शतऽदुरस्य वेदः घ्नन् शिश्नऽदेवान् अभि वर्पता भूत् ॥
ॠग्वेद पदपाठ १०.९९.२.

अर्थ - तो (अग्नी) अत्यंत शुभ मार्गाने युद्धास जातो.  स्वर्गातील ज्योती मिळविण्याकरिता तो झटतो.  तो आपल्या विद्येने न अडखळता शंभर दरवाज्यांच्या किल्ल्यांतील भांडार लटतो, आणि शिश्नदेवांना ठार करतो.