७-फर्ग्युसनमधील रोजनिशी
ता. ३ एप्रिल ९८ रविवार
संध्याकाळी मी व चि. जनाक्का बंडगार्डन्सवर सास्ने यास भेटावयास गेलो. ५III चे सुमारास त्यांची तेथे भेट झाली. मग जवळच्या टेकडीवरील सांबाच्या पोखरलेल्या देवळात गेलो.१६ तेथे पाणी वगैरे पिऊन टेकडीच्या माथ्यावर शहराकडे तोंड करून सुमारे ७॥ वाजेतोपर्यंत बसलो होतो. पण सास्ने डेक्कनला गेले व आम्ही रम्य चांदण्यातून वाटेवरच्या बंगल्यांची शोभा पाहत परत घरी आलो. वाटेत एका बंगल्यात सत्यनारायणाची पूजा चालली होती. पाश्चात्य फॅशनच्या आवारात ह्या आमच्या हिंदू चालीचे मंडण चाललेले पाहून मौज वाटली.
पंधरा दिवसामागे हुल्याळ१७, कानीटकर१८, मी व सास्ने यांमध्ये बंडगार्डन्समध्येच आम्ही पुढे काय करायचे याबद्दल बोलणे झाले होते. त्यात सास्ने ह्यांनी एकट्यांनी विचार करून आपला निश्चय कळवितो असे सांगितले होते. आज त्यांनी आमच्याप्रमाणेच आपलाही विचार आहे असे कळविले.
ता ७ एप्रिल १८९८ गुरुवार
सास्ने व इतर कोल्हापुरच्या मंडळीत सेल्बी साहेबाने क्वारंटायीनस्तव १० दिवस आधी सोडिले. म्हणून ते आज कोल्हापुरास गेले. सास्ने यांचे सोबती मोहित्ये यांचे बरेच सामान गावातून न्यावयाचे होते. म्हणून त्यांचे कामात माझा सर्व दिवस गेला. ज्यासाठी मी इतका त्रास सोसिला तो इसम इतका योग्य नव्हता हे मला संध्याकाळी कळून आले. ते ९ च्या गाडीने स्टेशनावर जावयाचे होते. पण मला म्हसक्यांकडे लष्करात जावयाचे होते. म्हणून मी व सास्ने पुढे पायीच निघालो. सास्ने यांचे सर्व सामान बांधून मंडळीच्या स्वाधीन केले होते. एक तांब्या मात्र वर राहिला होता तेवढा मोहित्ये यास हातात घेऊन येण्यास सांगितले आसता ते ऐकीनात. मला वाईट वाटले. अशा बेपर्वा मंडळीच्या २।३ महिन्याच्या सहवासात किती त्रास झाला तो सास्ने यांनी सांगितला. व मीही नेहमी मूर्ख आणि बादशाही थाटाच्या लोकांच्या कोरड्या भिडेस पडून कशी नुसती हमाली करीत असतो हे समजून नेहमी प्रमाणे विनाकारण मनातच तरफडलो. आजच कानीटकर व हुल्याळ हे आजारी पडले. दोघांनाही एनफ्लुएंझा झाला असावा असे वाटते. पण डा. च्छत्रे यांस तसे वाटत नाही.
ता १२ एप्रील १८९८
ता. ७ पासून आजपर्यंत काही वाचणे झाले नाही. केवळ हुल्याळाची शुश्रूषा करण्यात दिवस गेले. असो. पण तो बहुतेक बरा झाला आहे. ४।५ दिवस त्याचे अंगात ताप होताच. डोक्यावर गार पाण्याची पट्टी ठेवण्यास डाक्तरनी पुष्कळ सांगितले. पण धैर्य झाले नाही. शेवटी परवा दोन प्रहरपासून सारखी १२ तास डोक्यावर पाण्याने थबथबलेली पट्टी ठेविली होती. सुमारे २ तोळे गुलाबपाणी मिसळलेले सुमारे १॥ दिड पावशेर पाणी त्याचे डोक्यावर वाळले असेल. म्हणून त्याला पर्वा रात्री झोप आली आणि काल ताप हाटला. त्याने थोडी भाकरही खाल्ली.
परगावात व असल्या प्लेगच्या दिवसात ताप आला असता रोग्याच्या जवळच्या माणसात जितका त्रास व धास्ती पडावी तितकी मला पडली. ताप प्लेगचा नव्हे तरी एनफ्युएंझा असावा असे मला वाटत होते. तपासणीचीच मोठी काळजी पडली. वाड्यातले कारकून पंडीत व शिपाई बाळबा यांनी तर मला घाबरेच केले. तरी खाणावळीण बाई आपलेच घरी हुल्याळ ह्यास आणा 'मी त्यास मुलाप्रमाणे पाहते' असे म्हणते म्हणून पंडितास सांगितले. पण त्यास वाड्यातच ठेवा असे सांगितलेले ऐकून एक प्रकारे बरे वाटले. एकंदरीत पंडीत हा गृहस्थ चांगला आहे. मला जरी ताप स्पर्शजन्य वाटत होता तरी शुश्रुषेत मी काही कमी केले नाही. रात्री निजतेवेळी मात्र बाहेर पडवीत निजलो. हुल्याळच्या अगदीच प्रीतीतला कोणी नातलग असता तर कदाचित तो त्याच खोलीत निजता. पण हे करणे मला फाजील मायेचे व वेडेपणाचे वाटते. तरी मी रात्री २।३ दा तरी उठून त्याचा घाम वगैरे पुसून व पांघरूण घालून निजत असे. व निजायला ११।११॥ वाजत, तोपर्यंत खोलीतच असे. देशपांड्ये व परांजपे हे खाणावळीतून अन्न आणून देत असत. पण तेथे निजण्यास कां कूं करू लागले हे पाहून मी त्यांस आपले बिर्हाडीच निजण्यास सांगितले. व त्यांनीही तसेच केले. आमचे घरी जनाक्कास एकटीलाच रात्री भीती वाटते म्हणून २ दिवस आपले सोबतीणीकडे निजली पण रोज तिला त्रास नको म्हणून जनाक्का आत एकटीच आमचे खोलीत निजत असते.
कानीटकर लिखते यांचे घरी होता. पण तेथे त्याची चांगली श्रुषा झाली नाही. डाक्तरचे औषधच त्यास मिळाले नाही. त्या अव्यवस्थित घरी घरच्या मंडळीची देखील नीट व्यवस्था होत नसते. अशात तपासणी आली व त्यास पकडले. पण शर्थीने सुटला. त्यास हिव येत आहे. तो काल घोमास गेला. हुल्याळही फार भ्याला होता. (साहजिक आहे). दोन दिवस ताप थांबवून घरी जावे असेही म्हणत होता. पण मला हे शहाणपणाचे वाटले नाही. वरून भ्यालो नाही असे [दाखविले]. पण पहिले दिवशीच "A slight disease recalls the idea of Death" हे त्याचे तोंडचे वाक्यातून त्याचे अंतर्याम दिसले. मागचे प्लेगचे वेळी मला ताप आला असता हुल्याळ व करंदीकर यांनी कशी थट्टा केली हे आठवले. व सगळे सारखेच असता प्रसंगी मात्र एकमेक का थट्टा करितात हे कळले.