२३-फर्ग्युसनमधील रोजनिशी

विशाळगड
ता. २७ एप्रिल १८९९
आज संध्याकाळी बरोबर ७ वाजता बैलगाडीत बसून विशाळगडास निघालो. अर्धवर्तुलाकार गडावरून वळशावळशांनी खाली उतरत असता मागे वरचेवर पाहून मला वाईट वाटत होते. रात्रीचा वेळ, वाटेत चोरट्यांची भीती आहे, म्हणून कोणी सांगितले म्हणून आम्ही बराच वेळ गाडीमागून चालतच होतो. बांबोड्याचे धर्मशाळेत २ तास निजून सकाळी मलकापुरास आठ वाजता पोचलो. हा गाव सुमारे ३।४ हजार वस्तीचा असून कोल्हापूरचे पंतप्रतिनिधी श्रीमंत विशाळगडकर यांची राजधानी आहे. पन्हाळ्याहून २१ मैल आहे.
ता. २८ एप्रिल १८९९
मलकापुराहून दोन प्रहरी ३ वाजता निघालो. एथून सारखी चढण लागते. मांजरे गावाला येईपर्यंत रात्रीचे ११ वाजले. येथे जंगलातच निजलो. वाटेने दाट जंगल लागले. पहाटे तीन वाजता निघालो. चांदणे पडले होते. येथे आम्हा सर्वांची इतकी दिशाभूल झाली की चंद्र अगदी थेट पश्चिमेकडे उगवून पूर्वेकडे मावळतो असा दिसला ! येथून मात्र पहाटेपर्यंत भयंकर पारधीचे किर्र जंगल लागले. दुतर्फी एकमेकांशी लागलेले गगनचुंबीत वृक्ष स्तब्ध तापशाप्रमाणे उभे होते. त्यावरून दाट रानवेली शेंड्यापासून बुडक्यापर्यंत लोंबत होत्या. वाट चढणीची असल्यामुळे बैल हळू चालले होते. मधून मधून पालवीतून रस्त्यावर चांदण्याचे ठिपके पडले होते. चहुकडे इतके सामसुम होते की गाडीच्या चाकाचा आवाज व बैलांच्या गळ्यातल्या जंगांचा नाद आरण्यभर गुंगत होता. आमचा गाडीवानही रंगेल गवयी होता. `माझ्या चतुरा बैला चल । माझ्या पट्टाण्या बैला वड` ई. लके-या कंठ मोकळा सोडून ललकारू लागला. तशा प्रशांत समयी तशा घनघोर स्थळी ह्या लके-यांचे गंभीर प्रतिध्वनी उमटू लागले. एकही घातूक जनावर भेटले नाही. आम्हाला वाटले की, गाडीवानाच्या ताना ऐकून हिंस्त्र वनपशूंना देखील झोप लागली असावी. अशा प्रसंगी कैद्याप्रमाणे मला गाडीत बसवेना. म्हणून मी चटकन गाडीखाली उडी टाकली. मागून चिंतामणी आणि हारडीकर हेही उतरले. उतरू नका असा जनाक्काचा सारखा आग्रह होता. आमची चाहूल ऐकून झाडावरच्या वानराचा घूत्कार प्रतिध्वनीसकट घुमू लागला. ह्याच रानात कोल्हापूरकर, इचलीकरंजीकर वगैरे वाघांची पारध करितात. इकडून अस्वल उतरेल काय, इतक्यात वाघ डुरकावेल काय ? अशी प्रतिक्षणी मनातल्या मनात धास्ती वाटत होती. पण कपी वर्गाशिवाय आमचे स्वागत कोणीच केले नाही हे पाहून शेवटी आमची किंचित निराशा झाली ! बरोबरच आहे. कारण असले अश्रुतपूर्व गाणे बजावणे ऐकून तटस्थ न होणारा एका चावट माकडाशिवाय दुसरा कोण अरसिक प्राणी आहे !! पहाट झाली तेव्हा आम्हाला अत्यानंद झाला ! जंगल संपून उघड्यावर आलो तोच एक सुंदर स्वच्छ नदी सामोरी आली. इथे गाडी थोडी थांबली. आणि आम्ही प्रातर्विधी आटपला. हा प्रसंग मी कधी विसरणार नाही.
ता. २९ एप्रिल १८९९
सकाळी ७ चे सुमारास गजापुरास पोचलो. विशाळगड दोन मैल उरला. पुढे गाडीची वाट नाही. पेठेपासून ५ पैसे देऊन आमचा बोजा उचलण्यास एक हमाल केला. पेठ नावचीच होती. नारळाशिवाय काही सामान मिळाले नाही. डोंगर चढू लागलो. आणि इतके जवळ आलो तरी विशाळगड दिसेना म्हणून अगोदर थोडी निराशा झाली.
सुमारे सकाळचे आठ वाजता गडावर पोचलो. विशाळगड पन्हाळ्याहून सुमारे ४० मैल आहे. विशाळगड नावानुरूप खरोखरीच विशाळ आहे ! म्हणून ह्याच्या नावाची व्युत्पत्ती हुडकीत बसलो नाही. इतर गडाप्रमाणे हा आसमंत भागच्या टेकाडाच्या चौथ-यावर आरूढ झाला नसल्यामुळे अगदी जवळ गेल्याशिवाय गड असा हा ओळखतच नाही. जवळ जाऊन पोचलो की एकदम ह्याच्या भोवतालचा नैसर्गिक भयंकर खोल खंदकच दिसू लागतो. डोंगरी मोठा किल्ला पाहण्याचा जर कोणाचा पहिलाच प्रसंग असेल तर तो पाहून किती आश्चर्य व आल्हाद पावेल ! हा मुद्दाम खणून तयार केल्याप्रमाणे दिसणारा अती गंभीर खंदक, त्यात तटाप्रमाणे सरळ उभे असलेले गडाचे उंच कडपे, त्यांना बुरुजाप्रमाणे आधारभूत झालेल्या व त्यांच्या टोकापासून खंदकात दूरवर उतरत येणा-या डोंगराच्या तीक्ष्ण धारा, जागजागी ह्या धारा तुटल्यामुळे कित्येक वर्षे तसेच खडे राहिलेले, शूर व धिप्पाड गडक-याप्रमाणे भासणारे, काळे उंच सुळकेदार फत्तर ई. हे सर्व विराटस्वरूपी निसर्गाचे कठोर विलसित पाहून, प्रेक्षकास आश्चर्याचे एकामागून एक जबर धक्के बसल्यावाचून राहत नाही.