२१-फर्ग्युसनमधील रोजनिशी

पावनगड
ता. २४ एप्रिल १८९९
आज पावनगड पाहिला. पन्हाळ्यालागूनच पूर्वेस हा आहे. `पावन` ह्याची व्युत्पत्ती तीन प्रकारे ऐकली. १ली, पावन म्हणजे पवित्र गड. हीच माझी पूर्वी समजूत होती. पण येथे विशेष पवित्र असे कोणते स्थान नाही. पश्चिम बाजूला तटाचे गर्भातच लगुडबंद म्हणून कोणी पिराचा दर्गा आहे. तटाला बाहेरून एक भोक दिसते त्यातून पाय-या अंधारातच आहेत. त्या चढून वर गेले असता भिंतीतच सुमारे ७।८ खणाचे ह्या पिराचे देऊळ आहे. जुना झाल्याकारणाने व माती चांगली नसल्याकारणाने देवळासकट तटाची वरपासून खालपर्यंत सबंध भिंत गडाला सोडून सुमारे १।।-२ फूट पुढे झुकली आहे. त्यामुळे जिना चढून वर जाण्यास नवख्यास फार भिती वाटते. वर जावे तो देवळाचा सर्व भाग जागोजाग चिरून विकल झालासा दिसतो. इतका उंच तट असा चिरलेला आणि सुटलेला केव्हा ढासळेल याचा नियम नाही. आणि ढासळला तर अपरंपार खाली दरीत कोठे पडेल ही भयंकर कल्पना मनात येऊन येथे फार वेळ राहवत नाही. पण ह्याच स्थितीत हे पूर्वीचे काम आज कितीतरी वर्षे असेच अनेक पावसाळ्याची चेष्टा करीत आहे. हे ऐकून आपल्या जिवाची भिती जाऊन पूर्वजाच्या अकलेची धन्यता वाटते ! लगुडबंदाच्या कबरीच्या खालच्या मजल्यात अंधारात खाली कोठेशी एक वाट जात आहे तिचा पत्ता नाही. हे स्थान पूर्वी मार्कंडेय ऋषीचे होते असे म्हणतात. पण ह्यावरूनच ह्यास पावन गड हे नाव मिळाले हे संभवत नाही. २ री व्युत्पत्ती, पाव उणा गड म्हणजे पाऊण गड अशी म्हणजे पावगड अद्यापी बांधावयाचा आहे ही. पण तसाही प्रकार कोठे आढळला नाही. गड चहुकडे बांधलेला दिसतो. ३ री व्युत्पत्ती, पाहून गड म्हणजे पन्हाळा पाहून हा बांधला. कारण येथे बहुतेक तितक्याच उंचीची आणि मा-याची ही जागा आहे. हीच व्युत्पत्ती सर्वात अधिक संभवनीय दिसते. ह्या गडावर वस्ती तीन-चार मुसलमानांची घरे आहेत तेवढीच. एक मोठी भयाण जुनी विहीर आहे. शिवाय सांबाचे एक पडके देऊळ आहे. पूर्वीच्या कचे-याची वगैरे इमारत पडली आहे. सिंव्हगडप्रमाणे येथेही वर कोठेही फारशी झाडे नाहीत. क्षेत्रफळ सिंहगडपेक्षा थोडे कमीच येईल. म्हणजे सुमारे चार चौरस फर्लांग येईल. आकार गोल आहे. ह्याचे पूर्वेस जोतीबाचा डोंगर (वाडी रत्नागिरी) आहे. सायंकाळी ह्याची सावली ह्या डोंगरावर पडते. ह्या गडाचे दोन कोपरे पूर्वेचा व ईशान्येचा तुटलेले अगदी पुढे आले आहेत. त्यावरून खाली खोल खो-यातून कोल्हापुराहून पन्हाळ्यास व खाली मलकापुरास गेलेल्या सडकांचा सुंदर देखावा दिसतो. पन्हाळ्याहून व एथून मिरजेच्या मिरासाहेबांचा सुमारे ४० मैलावरचा घुमट दिसतो असे म्हणतात. आम्ही मुळी पाहिलाच नाही. कोल्हापूरचा राजवाडा मात्र दिसला. वर सांगितलेल्या पूर्वेकडच्या कोप-यावरच्या बुरुजाच्या अगदी टोकातून एक पिंपळाचे झाड पुढे हवेत वाढले आहे. त्या झाडाच्या एका फांदीवर मी खाली पाय सोडून (मंडळी नको म्हणत होती) देखावा पाहत बसलो. गोविंदरावांनी बरोबर काही कापशीची बोंडे घेतली होती. हारडीकरांनी त्याचे पतंग करून वा-यात सोडले, ते वा-याच्या झुळकीसरशी उंच वर जात आणखी खाली येत. असे उंच झोके खात ते जोतीबाच्या डोंगराच्या बाजूवर पडले असावेत. सडकांवरून खडी पसरवली होती ती अगदी सोनकावीच्या रंगाची होती त्यामुळे मला अति प्रियकर उषःकालच्या फिकट आबाशायी रंगाची काळ्या फत्तरातून व हिरव्या झाडीतून सडकांची हृदयंगम वळणे पाहून वारंवार माझे मन द्रवत असे व अंतरंगातील अतिगूढ विषयाकडे हट्टाने ओढ घेत असे !! माझ्या हातातील गाठीच्या काठीची गवांड्याची झाडे मी येथे पाहिली. रात्री चांदण्यातून घरी आलो.
वाडी रत्नागिरी
ता. २५ एप्रिल १८९९ मंगळवार
आज चैत्री पौर्णिमा म्हणून जोतीबाच्या प्रसिद्ध यात्रेस गेलो. पन्हाळ्याहून हा डोंगर सुमारे ५ मैल आहे. पन्हाळ्याची उतरण संपून मधली मलकापूर रत्नागिरीची सडक ओलांडल्याबरोबर ह्याची चढण सुरू होते. भोवतालच्या टेकाडाची उंची चढल्यावर डोंगरास चहूकडून ओबडधोबड फरसबंदी रूंद वाटा केल्या आहेत. शिवाय कोल्हापुरापासून थेट डोंगरावर देवळापर्यंत घोड्याच्या गाडीची सुरेख सडक आहे. आम्ही सकाळी आठ वाजता दसम्या घेऊन निघालो. वाटेत चार मैलाच्या विहिरीवर फराळ केला. उरलेले दसम्याचे ओझे डोंगरावर उगीच ने आण न करता झाडास टांगावे अशी जनाक्काने युक्ती काढली. मी लगेच एका उंच झाडाच्या गर्द पालवीत शिदोरी बांधून वरील युक्ती आमलात आणली ! परत येताना ती जशाची तशीच सापडली !! १२ चे सुमारास देवळास पोचलो. वाटेत दर माणशी एक आणा कर द्यावा लागला. गाडीच्या सडकेशिवाय ह्या कराचा मोबदला यात्रेकरांस कोठे मिळतो हे कळत नाही. पण कर मात्र दरवर्षी चैत्र मास संबंध महिना कायमचा असतो. कराचा मक्ता होतो तो दरवर्षी ४ पासून ६ हजारापर्यंत देखील केव्हाकेव्हा होतो असे सांगतात. ह्यावरून ही जत्रा लाख दीड लाखाची निदान जमते. देवळात माणसे चेंगरून अपघात होतात. क्वारंटाईनमुळे अलीकडे जत्रा भरत नाही. यंदा मक्ता २०१ दोनशे एक रुपयांचा झाला आहे. एकंदर यात्रेकरू ५०० पाचशेच्या आत बाहेर होते. एथे पाण्याची गैरसोय दिसते. डोंगर वैराण आहे. देवळाला सोडून लांब दक्षिण व उत्तर असे दोन महादरवाजे आहेत. दक्षिण दरवाजा शिंदे सरकाराचा. ह्या देवस्थानास शिंद्याचे व कोल्हापूरच्या चव्हाण सरदाराचे बरेच उत्पन्न आहे. देवस्थान अधिकारी मामलेदार आहे ! विष्णूपंत च्छत्रे यांनी कोल्हापुरकरास दिलेला खुळा हत्ती त्यांनी देवास नेमणुकीसह दिला आहे. शिवाय चार कोतवाली घोडे दोन उंट आहेत. ही यात्रा साधी दिसते. सकाळपासून... चार वाजेतो लोक जमतात. गावोगावाहून जोतीबाच्या उंच काठ्या (सासणी) सुमारे २० वीस आल्या होत्या. ह्या काठ्या म्हणजे बांबूचे उंच सोट, वर कापड अगर चीट गुंडाळलेले व मधोमध तोल राखण्याकरता दोर लावलेले अशा असतात. खालून ५।६ फुटाच्या अंतरावर लाकडी जाड फळी बसवली असते. देवळात आल्यावर तरुण उमेदीचे लोक काठी डोक्या (वर) उभी धरून नाचत देवळास ३ प्रदक्षणा करितात. भोवती ७।८ जण दो-यांनी तोल सांभाळतात. पुढे कुणब्याचे वाद्य लहान कर्कश वाजंत्री व डफडे वाजत असते. डफडेवाला व काठीवाला हे समोरासमोर आपल्या ओबड तालावर बेहोष नाचतात. इतका तोल सांभाळला तरी काठी झुकून खाली माणसात पडते. लोक चोहिकडून वाजत गाजत देवास नैवेद्य आणतात. पुजारी मराठे गुरव आहेत. मांसाचाही नैवेद्य असतो. देवाला गुलाल खोबरे खारका ह्यांची मोठी आवड दिसते. मुख्य देव जोतीबा ह्याचे तोंड दक्षिणेकडे म्हणजे कोल्हापुराकडे आहे. जोतीबास केदारलिंग असे म्हणतात. हे स्थान बारा ज्योतीर्लिंगापैकी एक आहे. आवारात तीन उंच शिखरे आहेत. ह्यावरून तीन मुख्य दैवते येथे आहेत असे दिसते. एका भागात महादेवाची पिंडी आहे. हे स्वयंभू लिंग आहे असे म्हणतात. हेच बारा जोतीर्लिंगापैकी एक असावे. हे उत्तराभिमुखी असून जोतीबाच्या उजवे बाजूस आहे. ह्या लिंगाचे उजवे बाजूस पश्चिमाभिमुखी एक देवीची मूर्ती उभी आहे. हिचे नाव चोपडाई. ही जोतीबाची आई असे सांगतात. हे दुसरे दैवत. तिसरे दैवत स्वतः जोतीबा अगर केदारलिंग दक्षिणाभिमुखी आहे. देवूळ मोठे व मजबूत असून काम सुंदर कोपरेदार आहे. दक्षिणेतील सौंदतीचे यल्लामाचे देऊळ हुबेहुब असेच आहे. शिखरे उंच कोनदार चौकोनी आहेत. देवळावर सुरेख गच्ची आहे. समोर नगारखाना असून एक स्नानाची व एक सकाळच्या काकड आरतीची अशा दोन जंगी घांटा आहेत. चोहीकडे फरसबंदी आहे. विस्तीर्ण चौफेर प्रदक्षिणामार्ग आहे. जोतीबासमोर मुख्य भव्य सभामंडप आहे. त्यास तीन तीन फूट जाडीचे पितळेने मढविलेले भक्कम चार खांब आहेत. मंडपाचे डावे बाजूस अंधेरात तुकाईची मूर्ती आहे. देवळाबाहेर जोतीबाचे पाठभिंतीत काळभैरवाची मूर्ती आहे. लोक याच्याच पुढे नारळ फोडतात. देवळाचे उत्तरेकडे लांब खालचे बाजूस यमाईचे स्वतंत्र देऊळ आहे. ह्या देवाचा पौराणिक इतिहास काय आहे ते नीट कळले नाही. केदारविजय म्हणून एक पोथी आहे. तीत येथील सर्व महात्म्य आहे. जोतीबा हा जमदग्नीचा अवतार असे सांगतात. यमाई त्याची बहीण म्हणे. ती त्यास नवरी पाहण्यास गेली होती. ती सापडली नाही म्हणून ती बाहेरच राहिली. पौर्णिमेदिवशी सायंकाळी चार वाजता जोतीबाचा यमाईच्या देवळापर्यंत हत्ती, घोडे, उंट, काठ्या इतर जामानिशी पालखीचा च्छबिना निघतो तो यमाईचे देवळास ६ सहा वाजता पोचतो. पालखी देवळास पोचताच यमाईचे गर्भदेवळाचे दार पूर्वी आपोआप लागत असे असे सांगतात. कारण जोतीबा लग्नाचे थाटाने घरी आला असता यमाईला नवरी सापडत नाही, म्हणून ती त्यास तोंड दाखवीत नाही. हल्ली पुजारी आपणच दार लोटतात ! शेवटी तेथेच जोतीबाचे गोरज मुहूर्तावर कट्यारीशी लग्न होते. लग्नाची अंतर्पाटासह सर्व तयारी होते. कोल्हापूरकराकडून या लग्नाकडे दीडशे १५० रुपयांची नेमणूक आहे. आम्हाला उशीर झाला म्हणून लग्न पाहावयाला राहिलो नाही. जोतीबाच्या मूर्तीच्या सर्वांगभर लिंगेच आहेत असे कळले. पण आज पूजा बांधिली होती म्हणून ती आम्हांस पाहण्यास मिळाली नाहीत. संध्याकाळी साडेसहा (ला) निघून आठ वाजता घरी पोचलो.