मेपासून दोन महिन्यांची कॉलेजची टर्म सुरू झाली. विठ्ठल रामजींचा अभ्यास आणि अवांतर वाचन चालू होते. नवनवीन विचार त्यांच्या कानावर पडत होते व नव्या विचाराचे ग्रहण करताना त्यांना आनंद वाटत असे. कॉलेजच्या देवळामध्ये दर रविवारी प्रोफेसरांच्याही उपासना होत असत. २० मे १९०२च्या रविवारी प्रो. रेव्ह. ऑजर्स यांची झालेली उपसना त्यांना फारच चांगली वाटली. सुधारक युनिटेरियन धर्ममतावर टीका करण्याचे, त्यांच्या उणिवा दाखविण्याचे स्वातंत्र्य सहजपणे येथे प्रोफेसर मंडळी घेत असत.
प्रो. ऑजर्स यांनी धर्माची सत्यता व आवश्यकता ही उपयुक्तता, नीती वगैरे बाह्य गोष्टींच्या पलीकडची आणि आत्म्याच्या अनिर्वचनीय व्यापारात निगूढ अशी आहे असे सांगून उदार धर्म व सुधारणा ह्यांस धर्माचे हे श्रेष्ठ स्वरूप कळत नाही. अशा आशयाचा उपदेश केला.१
धर्म, परमेश्वर ह्यांच्याबद्दल विविध मते शिंदे यांच्या कानावर पडत होती आणि त्याबद्दल त्यांचे चिंतनही चालू असे. त्यांच्या मनाची आध्यात्मिक तळमळ चाललीच होती. ह्या दिवशीच त्यांच्या मनाला अशांतता वाटू लागल्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी एकतारीवर 'संकट कोण निवारी प्रभूविण' हे पद म्हणून बराच वेळ भजन केले. नंतर रीस डेव्हीड ह्यांच्या ‘बुद्धधर्म’ ह्या पुस्तकाची तीसएक पाने वाचली. रात्रीचे साडेबारा वाजले होते. चांदणे स्वच्छ पडले होते. सर्वत्र सामसूम होती. देखावा सौम्य, गंभीर होता. थोडेसे फिरून येऊन विठ्ठल रामजी अंथरुणावर पडले. आपल्या मनाची चाचपणी त्यांनी केली. गेल्या तीन-चार वर्षांपासून अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनाचा कानोसा घेण्याची त्यांची सवय होती. त्यांची परमेश्वरावर श्रद्धा अभंग होती पण जीविताचे गूढ काय हे कळत नाही. ते कधी उकलेल काय? अशी विनवणी त्यांनी परमेश्वराजवळ केली.२
त्यांच्या ह्या तीव्र स्वरूपाच्या आध्यात्मिक तळमळीचा परिणाम असेल, परमेश्वराचा आपल्याला साक्षात्कार झाल्याची अनुभूती त्यांना आल्यासारखी वाटली. १९०२ च्या छोट्या रोजनिशीत ३० मे रोजी अशा अनुभवाची त्यांनी नोंद केली आहे. “मी ‘अमेरिकन जर्नल ऑफ थिऑलॉजी’ मधील ‘जपानमधील सद्यःकालीन धर्मस्थीती’ हा लेख वाचताना अगदी रंगून गेलो होतो. मी सहज डोके वर करून बाहेर पाहिले, केवढे अपूर्व दृश्य दिसले. मँचेस्टर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसलो होतो. शेल्फमध्ये असलेले ग्रंथ जिवंत झाले. डॉ. मार्टिनोचे वचन डाव्या बाजूला. झिनो, सॉक्रेटीस ह्यांची वचने समोर. ह्या गतकालीन विभूतीच्या आत्म्याशी माझा संवाद सुरू झाला. बाहेर सायंप्रकाश ओसरून अंधार होऊ लागला होता. नंतर वेगाने अंधारून आले. मी आत्मभान विसरून गूढ अशा ध्यानावस्थेत गेलो. मी परमेश्वराला पाहिले.”3 ह्या दिवसात अशा आध्यामात्मिक अनुभूतीची ओढ त्यांना लागून राहिली होती. लवकरच दुसरा एक अनिर्वचनीय आनंदाचा आध्यात्मिक अनुभव सरोवर प्रांतात प्रो. कार्पेंटर यांच्याकडे ते मुक्कामाला असताना आला.
प्रो. कार्पेंटर यांनी लेक डिस्ट्रिक्टमध्ये बॉरोडेल येथे आपल्या बि-हाडी सुटीचे पंधरा दिवस घालविण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांचे सहा वर्गबंधू यांना बोलावले होते. मँचेस्टर कॉलेज म्हणजे एक मोठे कुटुंबच होते. कॉलेजात विद्यार्थी पंधरा-वीस, पाच-सात प्रोफेसर, त्यांच्या मुली, नाती व इतर कुटुंबीय असा सगळा धर्मपरिवार म्हणजे बृहत् कुटुंब असे. ज्येष्ठ प्राध्यापक विद्यार्थ्यांना आळीपाळीने आपल्या घरी चहा घेण्याला आठवड्यातील एक दिवस मुक्रर करून अगत्याने निमंत्रण करीत असत. प्रो. कार्पेंटर यांनी निसर्गरम्य अशा सरोवर प्रांतातील बॉरोडेल या गावी लीथस् कॉटेज हे निवासस्थान सुटीमध्ये भाड्याने घेतली होते. या उन्हाळ्याच्या सुटीत प्रत्येक पंधरवड्यात पाच-सहा विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी बोलावून सर्व विद्यार्थ्यांचा पाहुणाचार करावयाचे प्रो. कार्पेंटर यांनी ठरविले होते. १४ जुलै १९०२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ऑक्सफर्डहून शिंदे रेल्वेने निघाले. बरोबर त्यांचे मित्र मि. कॉक आणि मि. बार्न्स होते. मि. फर्ग्युसन, मि. लॉकेट आणि मि. लमिस व मि. टिंडेल हे त्यांच्या आधीच कार्पेंटरांच्या बि-हाडी पोहोचले होते. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर वर्डस्वर्थसारख्या कवीच्या कवितांतून सरोवर प्रांतातील निसर्गाचे रम्य वर्णन त्यांनी वाचले होते. तो रम्य असा सरोवर प्रांत प्रत्यक्ष आपल्याला पहायला मिळणार ह्याबद्दल विठ्ठल रामजींना विलक्षण आनंद झाला होता. त्यांची गाडी ७० मैल वेगाने निघाली आणि प्रवासात प्रारंभी मनावर प्रतिकूल परिणाम करणारे चित्र त्यांना पहावे लागले. वाटेत बर्मिंगहॅमपासून, स्टॅफर्ड शेफिल्ड, मँचेस्टर अशी कारखान्यांची गावे असलेला मुलूख लँकस्टरपर्यंत लागला. कारखान्यांनी गजबजलेला हा प्रदेश ‘ब्लॅक कंट्री’ म्हणून ओळखला जातो. “बाहेर धुराने व धुळीने दिशा धुंद झाल्या होत्या. मांडीवरच्या वर्तमानपत्रावर दोन-चार मिनिटांतच कोळशाची भुकटी साचे. छाती वर करून बाहेर डोकावल्यास चहूकडे नुसती गिरण्यांची धुराडी व त्यांतून निघणारे धुरांचे कल्लोळ दिसत. घरे देवळे व रस्ते ही सर्व सारखीच काळवंडून गेली होती.” हे दृश्य बघितल्यावर विठ्ठल रामजींच्या मनात आले. अशा वातावरणात अष्टौप्रहर राहून निर्जिव यंत्राप्रमाणे झीज सोसणा-या हतभागी मजुरांची काय दशा असेल. आमच्या कवींनी नुसत्या कल्पनेनेच भवचक्राची चित्रे काढली आहेत. येथे मात्र हे चक्र प्रत्यक्ष भ्रमत असलेले दिसत आहे. प्रगतीची ही काळी खरखरीत बाजू जाणवून, सुधारणेची ही दोन अंगे बघून ते अंतर्मुख झाले. सुधारणेच्या बाह्य भपक्यामागे तिचे हे कष्ट, घामाच्या धारा कशा असतात हे जाणवले. येथे नुसती मोकळी हवाही मिळत नाही ही किती दुर्भाग्याची गोष्ट. सुधारणेला उद्देशून ते मनातल्या मनात म्हणाले, “हाल आणि श्रमाची तर गोष्ट राहू दे. जगात राहण्याची कला आपल्यास चांगली साधली आहे असे तू किती वेळा तरी म्हणतेस. पण नाही सुधारणे ! तुलादेखील अद्यापि पुष्कळ सुधारले पाहिजे आहे.”४
शिंदे यांच्या मनात या प्रकारचे विचार यावेत असेच एकंदर बाहेरचे दृश्य होते. दोन तास झाले तरी वेगाने धावणा-या गाडीतून खिडकीच्या बाहेर मोकळा प्रदेश असा फार वेळ पहायला सापडेना. “व्यापाराची घडामोड व उद्योगाची धड्धड् किती लगट केली तरी मागे राहीनात. एखादे पटांगण नजरेस पडल्यास त्यात धुरकट व दमट हवेत आणि कोळशाच्या राखेत कंगाल पोरे बागडत आहेत असे दिसावे! घरे पहावीत तर कबुतराच्या खुराड्यासारखी रांगेत नेमकी बसविलेली. सोय आणि शांती यामुळे इतकी सवंगली आहेत की बिचा-यांस राहता भुई पुरेना.”५ अशा प्रकारच्या विचाराच्या तंद्रीत काळा प्रदेश संपून गाडी पेनरिथ् स्टेशनवर येऊन पोहोचली. माणसाने दूषित केलेला प्रांत ओलांडून निसर्गाच्या अकृत्रिम प्रदेशामध्ये त्यांनी प्रवेश केला. पेनरिथपासून केसिकपर्यंत सरोवर प्रांतात जाण्यासाठी अठरा मैलांचा फाटा असलेल्या रेल्वेने तिघेजण केसिकला संध्याकाळी सहा वाजता पोहोचले. केसिक येथे पोहोचल्यावर, आता केवळ निसर्गाच्याच सान्निध्यात आल्यानंतर, विठ्ठल रामजी शिंदे यांची वृत्ती उल्हासित झाली. त्यांनी म्हटले, “केसिक येथे पोहोचल्याबरोबर सुधारणेची शेवटची खूण जी आगगाडी तिलाही निरोप दिला. माहेरी आल्यावर सासरच्या गड्यास निरोप देताना कितीसे वाईट वाटते हे प्रत्येक सासुरवाशिणीस माहीत आहेच.”६ शिंदे यांचा निसर्ग व यांत्रिक सुधारणेचे वातावरण यांकडे बघण्याचा कोणता दृष्टिकोण होता, हे त्यांनी दिलेल्या उपमेवरून उत्तम रीतीने प्रत्ययाला येते.
प्रो. कार्पेंटर आणि फर्ग्युसन त्यांना घरी नेण्यासाठी आले होते. ऑक्सफर्ड विद्यालयात नेहमी विद्याव्यासंगात पाहिलेल्या प्रोफेसरसाहेबांची मूर्ती येथे त्यांना निराळी दिसली. अंगात पहाडी सडा पोशाख, हातात रानटी काठी, खांद्यावरून आडवी जानव्यासारखी सोडलेली कातड्याच्या वादीस अडकवलेली लहानशी दुर्बिणीची थैली, गालावर हासे, तोंडात माहितीचा पुरवठा, भाषणात विनोद असे त्यांच्या गुरूचे चालतेबोलते अपूर्व चित्र दिसले. त्यांनी सामान बसमधून पाठवून बोटीने डरवेंट वॉटर सरोवरावरून व डरवेंट नदीवरून पाळीपाळीने दोघे-दोघेजण बोट वल्हवीत निघाले. बोटीत वजन फार झाल्यास आधी शिंद्यांना नदीत ढकलू अशी प्रो. कार्पेंटरांनी त्यांची थट्टा केली. अत्यंत धडधडीच्या प्रदेशातून अत्यंत शांत स्थळी आल्यावर शिंदे यांच्या मनाला विलक्षण आनंद वाटला. सरोवराचे पाणी स्तब्ध व स्वच्छ होते. जणू एक मोठा आरसाच. दोन बाजूस उंच पर्वत. स्किडो पर्वताची उंची ३, ००० फूट. हे सरोवर बॉरोडेल नावाच्या दरीत शिरते. एका बाजूस १, ००० फूट उंचीचा कडा तुटलेला. दुसरीकडे गवताने आच्छादलेली टेकडी. अशा रम्य स्थानातून नाव वल्हवीत ते लीथस् कॉटेच्या जवळ पोहोचले. ही नाव झाडाच्या मुळाशी बांधून त्यांनी किना-यावर पाय ठेवला तोच मिसेस् कार्पेंटरबाईंनी झोपडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून आणि हातरुमाल हलवून मोठ्या प्रेमाने त्यांचे स्वागत केले.
इंग्लिश सरोवर प्रांत हे एक सा-या युरोपात पाहण्यासारखे रमणीय स्थळ आणि त्यात डरवेंट वॉटर हे सुंदर सरोवर व त्याच्या काठचे बॉरोडेल खोरे हे अतिसुंदर ठिकाण आहे. शिंदे यांच्या गुरूची कुटिका बॉरोडेल खो-याच्या तोंडाशी, डरवेंट नदीच्या काठी, डोंगराच्या बगलेत, जेथून सर्व सरोवर नजरेत चांगले भरेल अशा नाक्यावर उभी होती. त्यामुळे ह्या कुटीतून उठता-बसता सदैव निसर्गाची रमणीय अशी शोभा दिसत असे. ह्या कुटीत आल्यानंतर सगळ्यांचे संध्याकाळचे जेवण झाल्यावर प्रोफेसरांच्या बरोबर सगळ्या विद्यार्थ्यांनी दरीमध्ये शतपावली केली.
दुस-या दिवशी सकाळी आठ वाजता न्याहारी आपोटल्यावर विठ्ठल रामजी शिंदे हे कॉक, बार्न्स, फर्ग्युसन व लॉकेट यांच्यासमवेत नौकेतून फिरावयास गेले. डरवेंट नदीतून डरवेंट वॉटर सरोवरात दोन मैल दूर असलेल्या हर्बट नावाच्या लहानशा बेटापर्यंत ते जाऊन आले. दोन प्रहरी प्रोफेसरांबरोबर स्किडो डोंगरावर फिरावयास गेले ते डरवेंट सरोवरातून नाव वल्हवीत रात्री आठ वाजता सगळे परतले. नऊ वाजता जेवण आटोपल्यावर विठ्ठल रामजी शिंदे कॉक यांच्याबरोबर बॉरोडेल दरीमध्ये शतपावलीस निघाले.
अलीकडच्या काळात शिंदे यांच्या मनाला आध्यात्मिक तळमळ लागून राहिली होती. थोड्याच दिवसांपूर्वी ते मँचेस्टर कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसले असताना त्यांना आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती आली होती याचा आधी उल्लेख केलेला आहेच. आज ते बॉरोडेल दरीत शतपावलीस गेले असताना निसर्गाच्या सान्निध्यात, दुर्मीळ अशा आध्यात्मिक अनुभवाची त्यांना प्रतीती आली. या अनुभवाचे त्यांनी वर्णन केले आहे ते असे :
“ही शतपावली कधी तरी विसरणे शक्य आहे काय ! ह्या डोंगरातील सडकही रुंद, प्रशस्त आणि धुतल्यासारखी स्वच्छ होती. दोहो बाजूंस हजार हजार फुटांचे उंचवटे क्वचित अगदी अंगाला येऊन भिडत. क्वचित पुन्हा मागे हटत. त्यांवरून नाना जातींची झाडे पालवली होती, फुले फुलली होती, लता लोंबत होत्या, लोहाळे लगटले होते. भारतीय देखाव्यांची प्रमुख लक्षणे जी रंगीबेरंगी शोभा आणि परिमळाचा दर्प ती मात्र येथे नव्हती. तथापि सौंदर्यात उणीव भासत नव्हतीच. उजवीकडचा कडा सरळ तुटला होता. डावीकडे डरवेंट नदी खडकातून उतरत असता आपल्याशीच मंद स्वरात मंजुळ ओव्या गात होती. त्या स्वरास सृष्टि-राग म्हणतात असे माझ्या मित्राने सांगितले.
“चहूकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. शांतीचेच साम्राज्य जणू डोळ्यांनी निरखू लागलो. सुधारणेची कटके तिने येथून बारा कोस पळविली होती. सुधारणा, उद्धारणा वगैरे विचारांचा गवगवाही बंद पडला. बाह्य शांतीमुळे अंतरातील खोल शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. साडेनऊ वाजले होते तरी असा गोड संधिप्रकाश पडला होती की, वाचता सहज यावे. समोर कॅसल क्रॅगच्या निमुळत्या मनो-यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. आम्ही दोघे संगतीने चाललो होतो, तरी बोलत नव्हतो. स्वतः कौतुक करण्याचीही वेळ मागेच टळून गेली होती, मग संवादाल जागा कुठे राहिली! जसजसे पुढे जावे तसतशी दरी आकसू लागली. नकळत सृष्टीने आम्हांला शेवटी अगदी अंतःपुरात नेले! तेथे जिवलग जनांचीही स्मृती उरली नाही. निकट विषयांचेदेखील भान उडाले. लौकिकातून नाहीसेच झालो!
“असा कोण जादूवाला ह्या भारलेल्या अंतःपुरात होता, की ज्याने आमची अशी पाहता पाहता पराधीन अवस्था करून सोडली! वरती जो एकदा लय लागला तो खाली करण्याची काही शक्ती उरली नाही.
आनंद होत होता काय आम्हांला?
सांगवत नाही. काही वेळापूर्वी मात्र झाला होता खरा.
आम्ही काही पहात होतो काय?
नव्हतो! दिसत होते पण काहीतरी!
मागितले का काही?
छे हो! काय मागावयाचे?
जिवाला कसे होत होते?
मधूनमधून सुस्कारे बाहेर पडत होते!
ते का म्हणून?
“कोणी सांगावे! काहीतरी आतून बाहेर निघत होते व काही बाहेरून आत शिरत होते. छे, मी काहीतरी वेड्यासारखे वर्णन करीत आहे. एकूण हा प्रकार काय? आणि ते कोण?...
“...मला तर आता असे कळून चुकले की, वरील जो प्रकार घडला ती माझी प्रार्थना होती आणि परमेश्वरावाचून जवळ कोणी नव्हते. एकूण प्रार्थनेचे काम साधे व सोपे आहे काय? होय... देवा! अशी प्रार्थना करावयाला व ही भेट घ्यावयाला सरोवर प्रांतापर्यंत येण्याचीच जरुरी आहे काय? नाही. जेथे कसली उपाधी नाही, अशा कोठल्याही उघड्या जागेत आणि मोकळ्या हवेतही उपासना घडण्यासारखी आहे. माणसांच्या गर्दीतही देवा, तू भेटतोस. नाही कसे म्हणू? घरी आईची माया, बहिणीची प्रीती, पत्नीचा अनुराग, पुत्राचे वात्सल्य, समाजात शेजा-याची सहानुभूती, मित्रांचा स्नेह, राष्ट्रात देशभक्तांची कळकळ व संतांचा अनुग्रह आणि शेवटी जगतात महात्म्यांची निरपेक्ष अनुकंपा इत्यादी दर्शनेही तुझ्याशिवाय इतर कोणाची असू शकतील? जनात तुझा असा साक्षात्कार घडतो खरा, पण तो किती विरळा. उलटपक्षी किती कठीण अनुभव येतो! पण इथले तुझे रूप कसे अबाधित आणि अखंड आहे! हे वरचे आकाशाचे छत कधी फाटेल काय? हा खालचा सरोवराचा आरसा कधी फुटेल किंवा मळेल काय? ह्या पाखरांचे गळे कधी बसतील काय? हे पर्वताचे तट, हा वा-याचा पंखा, वृक्ष, वल्ली, दळ, पाषाण, पाणी, आकाशातील मेघ ह्यांवरूनही सर्वत्र ईश्वरा, ‘तुझी कुशलधाम नामावली’ अशी सुवाच्य रेखाटली आहे! लहान बालकेदेखील ती वाचून आनंद पावतात! मग आम्ही का असे वारंवार विन्मुख व्हावे? हे कल्याणनिधान, आम्ही स्वतःभोवती जो क्षुद्र चिंतेचा गुंता निरंतर गोवीत असतो तो तूच करुणेने उकल आणि आतासारखेच वेळोवेळी आपल्याकडे कृपाहस्ताने आम्हांला ओढून घे. आमच्या इच्छेनेच तुजकडे येण्याची आमची शक्ती नव्हे! वगैरे, वगैरे प्रार्थना देव भेटून गेल्यावर उघडपणे करीत आम्ही परत कुटिकेत आलो.”७
खरे तर सव्वा दहा वाजले होते तरी त्यांना परतावेसे वाटत नव्हते. पौर्णिमेच्या रात्री उपासनेस या ठिकाणी येऊन सारी रात्र येथेच काढावयाची व पर्वतशिखरावरून दर्शन घेऊन घरी जावयाचे असा त्या दोघांनी बेत केला.
मनोमन त्यांची प्रार्थना होती-देवा, अशी वारंवार भेट दे!
शिंदे यांनी आपल्याला येणा-या यासारख्या आध्यात्मिक अनुभूतीचे स्वरूप अंतर्मुख होऊन न्याहाळले आहे. अशा अनुभवाचे विश्लेक्षण करून त्याचे स्वरूप कोणत्याही प्रकारे गूढ, दैवी असेन नसून साधारण मानवी अनुभूतीचा तो भाग कसा असू शकतो हेही त्यांनी दाखवून दिले. लीथस् कॉटेजमधील मुक्काम आटोपून सुमारे तीन आठवड्यांनी ते स्कॉटलंड येथील सरोवर प्रांतात गेले होते. बेनलोमंड ह्या ३००० फूट उंच अशा डोंगरावर ते गेले असता असीम शांततेचा अनुभव त्यांना आला. ह्या अनुभवाचे वर्णन करताना ओघात त्यांनी समाधी या शब्दाचा उपयोग केला. शिंदे यांना आलेल्या या आध्यात्मिक स्वरूपाच्या अनुभवासंबंधी त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणतात, “ वरील पत्रात मी माझ्या निरनिराळ्या खासगी अनुभवास ‘प्रार्थना, भेट, समाधी’ अशी मोठी नावे दिली आहेत. त्यावरून वाचकास ही आत्मप्रौढी आहे असे वाटेल आणि केलेले वर्णन अतिशयोक्तीचे आहे असा आरोप येईल. पण खरा प्रकार तसा नाही. वरील प्रसंगी कोणाही यःकश्चित मनुष्याची वरील अवस्था होणे साहजिक आहे. फार तर काय, खालील प्राण्यांतही जेथे जेथे चैतन्याचा अधिक विकास झालेला असतो तेथे तेथे वरील सौंदर्यदर्शनाचे प्रसंगी वरील समाधीचा म्हणजे चैतन्याच्या एकीकरणाचा प्रकार सहज घडतो. मेघास पाहून मोर नाचून नाचून तटस्थ होतो. वसंतगामी कोकिळा गाऊन गाऊन स्तब्ध बसते. 'सर्प भुलोनी गुंतला नादा । गारुडिये फांदा घातलासे।' हे तुंकाराम सांगतात. असा जर सर्वत्र सृष्टिनियम आहे तर त्याला माझेच मन का अपवाद असेल!”
पुढे ते असेही स्पष्ट करतात की, या प्रकारचा अनुभव सर्वसाधारणमानाने सर्वच माणसांस होण्यासारखा असून किंबहुना होत असूनही जर काहीजण तिकडे तादृश लक्ष पुरवीत नसतील अगर लक्ष पुरवूनही त्या त्या अनुभवाचा तादृश अर्थ करीत नसतील तर ती त्यांची खुशी. पण ह्या बाहेरच्या खुशीच्या भिन्नत्वामुळे आतील स्वाभाविक अनुभवास बाध येत नाही किंवा भिन्नत्वही येत नाही. या प्रकारचा आध्यात्मिक अनुभव हा ह्या जगात काही थोड्या अधिकारी धर्मपुरुषासा येणारा अनुभव आहे असे नव्हे, तर सर्वच माणसांना हा अनुभव येऊ शकतो अथवा येत असतो असे सांगून केवळ वृत्तिभिन्नत्वामुळे काहीजण त्या अनुभवाकडे लक्ष पुरवितात, काहीजण पुरवीत नाहीत. मात्र आत्म्याला
येणा-या अनुभवाचे स्वरूप हे सारखेच असते. आपल्याला विश्वामधील चैतन्याची प्रतीती येणे, आपल्यातील चैतन्य आणि विश्वामधील चैतन्य एकरूपच आहे या प्रकारची प्रचिती हे या आध्यात्मिक अनुभवाचे स्वरूप आहे अशी शिंदे यांची धारणा दिसते.८
इंग्लंडमधील व स्कॉटलंडमधील सरोवर प्रांती या प्रकारची जी प्रतीती आली व तिच्या अनुषंगाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे चिंतन केले त्यामुळे अलीकडच्या काळात जी आध्यात्मिक तळमळ त्यांना लागून राहिली होती ती शांत झाली असे दिसते.
विठ्ठल रामजी शिंदे यांचे निसर्गप्रेम उत्कट होते. आपण बालपणात निसर्गाला हृदयदान दिले असे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला असलेली निसर्गाची आवड परिपूर्ण व्हावी, निसर्गाच्या अनेकविध रम्यतेचा अनुभव मिळावा ह्या दृष्टीने सरोवर प्रांतातील वास्तव्य ही त्यांना मोठीच पर्वणी होती. दररोज एका नव्या निसर्गरम्य ठिकाणी प्रोफेसरांचे हे विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय सहल काढीत होते व निसर्गसौंदर्याचा, विमुक्त भटकण्याचा व चालण्याच्या परिश्रमाचा मनसोक्त अनुभव घेत होते. १६ जुलैला दोन घोड्यांच्या मोठ्या बसमधून घरातील सर्व मंडळी-एकूण ११ जण-बटरमिअर ह्या सरोवराची सफर करण्याकरिता निघाले; तर १७ जुलैला विठ्ठल रामजी शिंदे नौकेमधून डरवेंट वॉटरवरून ४ मैलाचे अंतर कापून केसिकला जाऊन आले. १८ जुलैला प्रो. कार्पेंटर, त्यांचे पाच विद्यार्थी आणि रेव्ह. लमिस असे सातजण अल्सवॉटर सरोवर पाहण्यास गेले. अल्सवॉटर हे तर विठ्ठल रामजींना डरवेंट वॉटर सरोवरापेक्षा अधिक सुंदर वाटले. सुमारे दोन हजार फूट चढल्यावर अर्ध्या मैलाची घाटशीळ लागली. दुस-या बाजूने ते थर्लमियर सरोवराकडे उतरले. २३ जुलैला ग्रासमिअर सरोवराच्या काठी असलेल्या ग्रासमिअर खेड्यामध्ये ते वर्डस्वर्थची समाधी पाहण्यासाठी गेले. स्कॉफेल हा इंग्लंडमधील ३२१० फूट उंचीचा सर्वात उंच डोंगर. २४ जुलैला ते इतर तीन मित्रांसह हा डोंगर चढून गेले. तेथे त्यांनी डरवेंट नदीचा उमग पाहिला. सरोवर प्रांतातील अशी एकाहून एक रम्य स्थळे बघण्याचा उपक्रम त्यांनी उत्साहाने चालविला होता.
प्रोफेसरांच्या बि-हाडी बहुधा दररोज सकाळी ११ वाजता कौटुंबिक उपासना होत असे. २० जुलैची कौटुंबिक उपासना विठ्ठल रामजी शिंदे यांना फारच भावली. प्रार्थनेनंतर प्रो. कार्पेंटर यांनी हरफर्ड ब्रुक याचे एक व्याख्यान वाचले व त्यानंतर मॅथ्यू अर्नोल्डची कविता वाचली.
ही कविता वाचताना त्यांचे डोळे आसवांनी भरले होते. प्रोफेसरांची वेगवेगळी रूपे विठ्ठल रामजींना प्रतीत होत होती. भावत होती. प्रोफेसरांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या मनावर फार अनुकूल परिणाम घडत होता.
इंग्लंडमधील एखादा धर्ममेळा कसा असतो हे पाहण्याची, त्याचा अनुभव घेण्याची संधी शिंदे यांना प्राप्त झाली. २० जुलैच्या रविवारपासूनच केसिक येथे सुरू
होणा-या आठवड्याच्या कन्व्हेन्शनला (धर्ममेळ्याला) शिंदे संध्याकाळी गेले होते. बॉरोडेलपासून सुमारे चौदा मैल अंतरावर केसिक हे रमणीय स्थान आहे. १८७५ मध्ये रेव्ह. कॅनन बॅटर्सबाय ह्यांनी येथे प्रथमतः हा मेळा भरविला. पहिली दोन वर्षे हा मेळा एस्किन स्ट्रिटवर भाड्याच्या तंबूमध्ये भरत असे. त्यात सुमारे ६०० माणसे सामावली जात. सध्या केसिक कन्व्हेशनच्या कौन्सिलच्या मालकीच्या तंबूत मेळा भरत असून दरवर्षी सुमारे हजारभर लोक उपस्थित राहतात. १९०२ मधील मेळा हा अठ्ठाविसावा वार्षिक मेळा होता. हा मेळा संघटित करणारी मंडळी जुन्या ख्रिस्ती मताची असली तरी त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पंथाभिमान नाही असे शिंदे यांना जाणवले. जॉन मॅकलीनचे परिणामकारक भाषण झाले. बहुजन समाजाचे लक्ष ख्रिस्ती धर्माकडे लागावे ह्या हेतूने हा मेळा भरविला होता.९ (अद्यापही केसिक येथे हा मेळा दरवर्षी दोन आठवडे भरविला जातो. एवढेच नव्हे तर देशातील अन्य दहा-बारा ठिकाणी ‘कौन्सिल कन्व्हेशन’ या नावानेच धर्ममेळे भरविले जातात. केसिक येथील धर्ममेळ्यात झालेल्या भाषणांचे पुस्तकही केसिक धर्मसंघाच्या वतीने प्रकाशित केले जाते.१०)
२२ जुलैला मंगळवारी पाऊस सारखा लागलेला होता. सहलीला जाणे शक्य नव्हते. आपल्या पाहुण्या विद्यार्थ्यींनी आजचा पूर्ण दिवस केसिक कन्व्हेन्शनला घालवावा असे प्रोफेसर कार्पेंटर यांनी सुचविले. विठ्ठल रामजी सकाळी ११ वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत तीन्ही बैठकांना हजर होते. लंडनच्या रेव्ह. एफ्. आर. मेयर यांनी चांगला उपदेश केला. सुमारे दोन हजार लोक मावतली असे दोन तंबू उभारलेले होते. संगीत, भक्तिपर, उदात्त आणि करुण रसाने भरले होते. उपासना संपल्यावर रेव्ह. मेयर यांनी अशी प्रार्थना केली की, सर्व मंडप तटस्थ होता व ईशपायी लीन झाला. “तुम्हाला पश्चात्ताप वाटतो काय? तुमची पापे आठवतात काय? दुसर-याचे तुम्ही ऋणी आहात काय? अद्यापि ते ऋण देऊ नये असे वाटते काय? हल्ली कोणाचा मत्सर वाटतो काय? देवाच्या क्षमेचा कधी अनुभव आला आहे काय? क्षमेस पात्र आहात असे वाटते काय? असे व दुसरे अंतःकरण भेदणारे प्रश्न उपासक मंद व खोल स्वराने थांबून थाबून विचारीत असे. रेव्हा. मेयर ह्यांच्या प्रार्थनेचा बहुजन समजावर विलक्षण परिणाम झाल्याचे दिसत होते. प्रार्थना संपल्यावर तर एख तरुण मुलगी स्फुंदून स्फुंदून रडत होती व एक वृद्ध गृहस्थ तिचे सांत्वन करत होता असे दृश्य विठ्ठल रामजी शिंदे यांना दिसले.
केसिकमधील हा धर्ममेळा बघितल्यावर आपल्याकडील क्षेत्राच्या ठिकाणी भरणा-या यात्रांची तुलना त्यांच्या मनात आली. आपल्याकडे काशी, रामेश्वर इत्यादी ठिकाणच्या कर्मठ यात्रा उच्च वर्गाच्या असतात आणि जोतीबा, जेजुरी, सौंदत्ती येथील यात्रा बहुजनवर्गाच्या असतात. आपल्याकडील यात्रेचा दुसरा प्रकार म्हणजे पंढरपूर, आळंदी येथे भरणा-या भक्तीच्या यात्रा. केसिक कन्व्हेन्शनची गणना त्यांना भक्तिमार्गी यात्रेमध्ये करावीशी वाटते. कोणत्याही पंथाचा अभिनिवेश न बाळगता बहुजनांत भक्तीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने, अंतःकरणशुद्धीच्या दृष्टीने त्यांना हा मेळा महत्त्वाचा वाटला.११
प्रोफेसरांचे पाहुणे विद्यार्थी येथील मुक्कामात जसे निसर्गाच्या सान्निध्यात रमत होते; कौटुंबिक उपासनेचा अथवा प्रसंगोपात सार्वजनिक उपासनेचा पवित्र अनुभव घेत होते; त्याचप्रमाणे कौटुंबिक वातावरणात, हास्यविनोदात रंगून जात होते. मनःपूर्वक चर्चा करीत होते.
सुटीतील करमणुकीचा प्रकार म्हणून विद्यार्थ्यांनी पॉझ मॅगेझिन नावेच एक तात्पुरते हस्तलिखित अनियतकालिक पत्र काढले. त्यातील सगळा मजकूर विनोदाने भरलेला असे. आपल्या आदरणीय वाटणा-या प्रोफेसरांनाही विनोदविषय बनविण्याचे स्वातंत्र्य त्यातील लिखाणात निःसंकोचपणे घेतले जाई. प्रो. कार्पेंटर यांना चिप, प्रो. रेव्ह. ऍप्टन यांना अपी आणि प्रिन्सिपॉल ड्रमंड यांना डमी अशी विनोदी टोपणनावे देऊन त्यांच्या नावापुढे समर्पक विनोदात्म अशा कविता लिहिण्याचे स्वातंत्र्य घेतले जाई. धर्मशिक्षण घेणारे हे विद्यार्थी उच्छृंखलपणा करण्यात मुळीच कमी नव्हते. प्रिन्सिपॉल ड्रमंड यांना पाच सुंदर तरुण मुली होत्या. त्यांच्या नावापुढे खालील वचन होते.
Happy is the man whose quiver is full
ह्या मुली म्हणजे भात्यातील पाच मदनबाणच होत असा व्यंग्यार्थ त्यातून सुचविला होता.
प्रो. कार्पेंटर यांच्या नावापुढे खालील कविता होती.
Each day he does a mountain climb
A ten miles row, three meals, a witticism.
And fills the intervening time
With Pali Texts and Hebrew Criticism.
शिंदे यांच्यावरील कविता अशी :
A meek and modest Indian
Who will, unless he faints,
Some day duly be worshipped
Among his country saints.
He is no vulgur fraction
As single student be
But he and Mrs. Shinde
Form one integrity.
१७ जुलैचा अंक प्रो. कार्पेंटर यांनीच वाचला. एका लेखाच्या शेवटी पाच जणांची व्यंगचित्रे रेखाटली होती व नाव दिले होते, ‘कॉलेज ब्यूटी.’ त्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचे फेटा बांधून शेमला सोडलेले, नाक आहे त्याहून जास्त अपरे दाखविलेले, एका बाजूने रेखाटलेले व्यंगचित्र आहे.१२
रात्रीच्या जेवणानंतर कधी कधी दिवाणखान्यात एखाद्या विषयावर चांगले संभाषण होई. १९ जुलै रात्री जेन ऑस्टिनच्या कादंबरीविषयी बोलणे झाले. विठ्ठल रामजींनी प्रो. कार्पेंटर यांच्याशी बरीच चर्चा केली. प्रो. कार्पेंटर यांना ऑस्टिनबाईंच्या कादंब-या विशेष महत्त्वाच्या वाटल्या नाहीत. त्यांचे म्हणणे असे होते, की ऑस्टिनच्या नायिका व इतर मुली ह्यांची मुख्य चिंता म्हणजे लग्नाची. ह्यावरून ऑस्टिनबाईंची आयुष्यभराची थोर कल्पना होती असे दिसत नाही. चित्र बरोबर हुबेहुब वठविले म्हणून मोलाचे ठरत नाही. अंतरात्म्यास रमविणारे व शिकविणारे असे काही असल्याशिवाय चित्राला किंत येत नाही अशी प्रो. कार्पेंटर यांनी भूमिका मांडली. विठ्ठल रामजी शिंदे यांचे म्हणणे असे पडले की, कादंबरीकाराच्या वास्तविक व काल्पनिक (रियालिस्टिक व आयडियालिस्टिक) अशा ज्या दोन जाती आहेत त्यांपैकी वास्तविक कादंबरीकारांमध्ये जेन ऑस्टिनचा नंबर अगदी पहिला लागेल.
२० जुलैच्या रात्री एक विनोदात्म आणि हृद्य संभाषणात्मक प्रसंग घडला. केसिक कन्व्हेन्शनवरून परत येत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांना अंधारात व आडवळणास कित्येक प्रेमी जोडपी प्रियाराधनात गर्क झालेली दिसली. येथे वारंवार दिसणारे मानवी संसारातील हे चित्र अत्यंत गोड व पवित्र वाटे. गरीब लोकांस दिवाणखाने व बागा नसल्याने सार्वजनिक उपवनात व रस्त्याने आराधना करावी लागते. त्याबद्दल त्यांना फारशी शरम वाटत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. घरी परत आल्यावर ह्यासंबंधी प्रोफेसर व पाहुणे स्त्रीपुरुष यांच्याबरोबर मौजेचे भाषण झाले. प्रोफेसर व इतर सभ्य गृहस्थ अशीच आराधना करतात काय असा शिंद्यांच्या प्रश्न ऐकून मंडळींना भारी कौतुक वाटले. कार्पेंटरबाई निजावयास जाताना त्यांच्या कानाशी जाऊन म्हणाल्या, “मला एक गुप्त गोष्ट सांगावयाची आहे ती ही की, प्रोफेसरही अशीच आराधना करतात बरे.”
अशा मनमोकळ्या कौटुंबिक वातावरणात येथील मुक्कामात सगळ्यांचा काळ मोठ्या आनंदात चालला होता. ह्या पंधरा दिवसातील “बहुतेक दिवस सकाळी आठ वाजता न्याहरी करून संध्याकाळी आठ वाजता जेवणाच्या वेळेपर्यंत खांद्यावर फराळाच्या पडशा टाकून जंगलातून हिंडत, पाण्यावरून तरंगत आणि पर्वतावरून सरपटत काळ घालविला.” आणि बि-हाडी असल्यावर मनमोकळ्या हास्यविनोदात आणि कधी कधी गंभीर चर्चेत, अशा दैनंदिन कार्यक्रमात पंधरा दिवस झपाट्याने सरले. विठ्ठल रामजींनी पुढचा कार्यक्रम म्हणून स्कॉटलंडमधील शहरे आणि तेथील सरोवर प्रांत बघावयाचे ठरविले होते. २८ जुलै १९०२ रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी आपल्या प्रेमळ, अगत्यशील गुरूंचा, गुरुपत्नींचा तसेच आनंदी वर्गबंधूंचा निरोप घेतला आणि स्कॉच सरोवरे पाहण्याचा उद्देश मनात ठेवून एडिंबरोला जाण्यासाठी निघाले.
संदर्भ
१. शिंदे यांची १९०१-०२ ची छोटी हस्तलिखित रोजनिशी.
२. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. १०३-१०४.
३. शिंदे यांची १९०१-०२ ची छोटी हस्तलिखित रोजनिशी.
४. विठ्ठल रामजी शिंदे, ‘जनांतून वनात व परत’ सुबोधपत्रिका, १ फेब्रुवारी १९०३, समाविष्ट, विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने, उपदेश, पृ. ५८-५९.
५. तत्रैव, पृ. ५९.
६. तत्रैव, पृ. ६०.
७. तत्रैव, पृ. ६२-६३.
८. तत्रैव, पृ. ६८-६९.
९. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ११४.
१०. डेव्हिड पोर्टर (संपा.) दि गॉस्पेल, दि स्पिरिट, दि चर्च, केसिक कन्व्हेन्शन कैन्सिल, ब्रॉम्ले, केंट, इंग्लंड, १९७८, पृ. ७.
११. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ११५.
१२. पॉझ मॅगेझिन, हस्तलिखित, मँचेस्टर कॉलेज ग्रंथालय, ऑक्सफर्ड.