१९१२ साली घडलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची ऑक्टोबर महिन्यात पुणे येथे भरविण्यात आलेली महाराष्ट्र परिषद. १९०६ साली मिशनची स्थापना झाल्यापासून विविध प्रकारचे मिशनच्या कामाचा प्रचार करण्याचा जोरदार प्रयत्न शिंदे यांनी चालविला होता. वेगवेगळ्या गावी जाऊन तेथील हितचिंतक पुढा-यांची मने वळवून लोकमत तयार करण्यासाठी त्या गावी मोठमोठ्या सभा भरविणे, विविध ठिकाणी शाखा स्थापन करून निधी जमविण्यासाठी दौरा काढणे, ह्या मार्गाप्रमाणेच मिशनच्या खास सभा भरविणे हा एक अस्पृश्यतानिवारणकार्याचा आणि त्या वर्गाची उन्नती करण्याचा दुसरा परिणामकारक मार्ग होता.
मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक ह्या नात्याने काम करीत असताना शिंदे ह्यांनी अखिल भारतीय पातळीवरील राष्ट्रसभेचे अधिवेशन भरविण्याच्या ठिकाणी एकेश्वरी धर्मपरिषद भरविण्याचा उपक्रम सुरू केला होता हे आपण पाहिलेच आहे. १९०६ साली डिप्रेस्ड क्लासेसची स्थापना झाल्यानंतर राष्ट्रसभेच्या अधिवेशनाच्या वेळी शिंदे हे मिशनची परिषदही भरवू लागले. १९०७ साली सुरत, १९०८ साली मद्रास, १९०९ साली लाहोर, १९१० साली अलाहाबाद, १९१२ साली बांकीपूर आणि १९१३ साली कराची येथे राष्ट्रसभेच्या वेळी ह्या परिषदा भरविण्यात आल्या. बांकीपूर येथील काँग्रेसचे अध्यक्ष अमरावतीचे नामदार मुधोळकर वकील हे मिशनच्या परिषदेचेही अध्यक्ष होते. कराचीच्या परिषदेत लाला लजपतराय हे मिशनचे अध्यक्ष होते. मिशनच्या ह्या परिषदांमुळे हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या पुढा-यांचे लक्ष मिशनच्या ह्या कार्याकडे लागत असे. अस्पृश्यतानिवारणाच्या ह्या कामाबद्दल सहानुभूतीचे क्षेत्र वाढत असे. शिवाय त्या त्या प्रांतात मिशनच्या कार्याची उभारणी करण्यासाठी शिंदे ह्यांना माहिती व मदत मिळणे शक्य होई. प्रत्यक्ष काँग्रेसच्या कार्यामध्ये अस्पृश्यतानिवारणाच्या बाबीचा शिरकाव व्हावा असा शिंदे ह्यांनी ह्या वेळी सतत प्रयत्न करून पाहिला. परंतु हा प्रश्न धर्माचा आहे, त्याची भेसळ राजकारणात नको अशी सबब सांगून त्या वेळचे जहाल अथवा मवाळ राजकीय पुढारी ह्या प्रश्नाची टाळटाळ करीत असत. मात्र मिशनच्या परिषदा भरवून अनुकूल प्रचाराचे हे कार्य शिंदे ह्यांनी नेटाने चालविले होते. ते मिशनच्या पुणे शाखेच्या कामाची पाहणी करण्यासाठी १९१२ सालच्या ऑगस्टमध्ये पुण्यास गेले असताना त्यांच्या मनामध्ये पुणे शाखेच्याच हितचिंतकांची एक लहानशी परिषद अल्प प्रमाणात भरवावी असा विचार आला होता. पुढे रा. सीतारामपंत जव्हेरे, ल. म. सत्तूर, जी. एन. सहस्त्रबुद्धे, दा. ना. पटवर्धन ह्यांच्याशी चर्चा करून परिषदेचे काम कोणत्या धर्तीवर चालवावे ह्यासंबंधी विचार झाला. परंतु पुढे विचारांती केवळ पुणे शाखेच्या हितचिंतकांची छोटी परिषद भरविण्याऐवजी विस्तृत प्रमाणावर मिशनच्या महाराष्ट्रातील हितचिंतकांचीच एक व्यापक परिषद भरवावी असे ठरले. ही परिषद ५, ६ व ७ ऑक्टोबर ह्या तारखांना सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावी असे ठरले. तसेच परिषदेची जागा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे अँम्फी थिएटर हे स्थळ निश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे परिषदेची कार्यकमिटी भरविण्यात आली. कार्यकमिटीच्या ह्या रचनेत सर्व अस्पृश्य जातीचे निवडक प्रतिनिधी घेतले. शिवाय पुण्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधीही समाविष्ट केले.
महाराष्ट्रीय निराश्रित वर्गाच्या उन्नतीसंबंधी व्यावहारिक विषयांची त्यांच्या हितचिंतकांमध्ये व्यवस्थित रीतीने चर्चा व्हावी; नि. सा. मंडळीने चालविलेल्या कार्याची इतर शिक्षणविषयक व परोपकारी संस्थांच्या चालकांना माहिती मिळून त्यांच्याशी मंडळींनी सहकार्य साधावे व सर्वसाधारण लोकसमूहामध्ये ह्या कार्याविषयी सहानुभूती वाढवावी, हे हेतू परिषद भरविण्यामागे निश्चित करण्यात आले. वरील हेतूला धरून परिषदेत व्हावयाच्या चर्चेसाठी पुढील विषय निश्चित करण्यात आले.
१)मंडळीला वाहिलेल्या माणसांची जरुरी, २) पुणे येथील शाखेसाठी बोर्डिंगची आवश्यकता, ३) निराश्रित वर्गाच्या औद्योगिक शिक्षणाची दिशा, ४) निराश्रित वर्गाच्या विशेष अडचणी, ५) निराश्रितवर्गाच्या वाङमयात्मक शिक्षणाची दिशा, ६) मुंबई व पुणे येथील मंडळींच्या स्वतःच्या इमारतीची आवश्यकता, ७) म्युनिसिपालट्या, खाजगी शिक्षणसंस्था आणि परोपकारी शिक्षणसंस्था ह्यांच्याशी मंडळीचे सहकार्य, ८) सरकारी विद्यापीठे व देशी संस्थानिक ह्यांच्याशी शिक्षणाविषयक बाबतीत मंडळीचे सहकार्य, ९) आध्यात्मिक व सामाजिक बाबतीत निरनिराळ्या धर्मपंथातील अनुयायांशी मंडळींचे सहकार्य.
परिषदेच्या स्वागतकमिटीची रचना डॉ. हॅरॉल्ड एच. मॅन ह्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यामध्ये प्रो. के. रा. कानेटकर, प्रो. गो. चि. भाटे, प्रो. द. ल. सहस्त्रबुद्धे, श्री. ल. म. सत्तूर, श्री. ए. के. मुदलियार, सीताराम जव्हेरे, मा. ह. घोरपडे इत्यादी, तसेच स्थानिक निराश्रित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून श्री. शिवराम जानबा कांबले, श्री. श्रीपतराव नांदणे, श्री. रखमाजी कांबळे, श्री. अनंता दा. खांडेकर, श्री. नुरासिंग पिरू मेहतर, श्री. वजीर मन्नू इत्यादी वेगवेगळ्या जातींतील मंडळींना घेण्यात आले. परिषदेचे सेक्रेटरी म्हणून श्री. विठ्ठल रामजी शिंदे आणि दा. ना. पटवर्धन ह्यांनी काम पाहावयाचे ठरविले. स्वयंसेवक मंडळींमध्ये श्री. व्ही. आर. मुदलियार, श्री. रा. ना. राजाज्ञे ह्यांच्यासमवेत अँग्रिकल्चर कॉलेजमधील विद्यार्थी श्री. बसानी, जडेजा, भाटरकर, बेंडीगिरी, साने इत्यादी होते. डॉ. मॅन ह्यांचे मिशनच्या कामी सदैव साहाय्य होत असे. त्यांनी परिषदेच्या स्वागतकमिटीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे मान्य केले.