मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग

व्हायकोम येथील सत्याग्रहाचे प्रकरण संपल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे हे साधू शिवप्रसाद यांना बरोबर घेऊन मलबार प्रांताच्या दौ-यावर निघाले. धर्मप्रसाराच्या कार्याच्या जोडीनेच मलबार प्रांतातील वैशिष्टयपूर्ण समजल्या जाणा-या समाजस्थितीचे, तेथील जातिव्यवस्थेचे व कुटुंबव्यवस्थेचे निरीक्षण करावे असा शिंदे यांचा मनोदय होता. समाजशास्त्रीय स्वरुपाच्या निरीक्षणाबद्दल त्यांच्या ठिकाणी केवळ कुतूहल होते असे नव्हे, तर जगातील आणि भारतातील समाजस्थितीचे अवलोकन करण्याची त्यांच्या ठिकाणी प्रबळ उर्मी होती असे म्हणणे रास्त ठरेल. युरोपात असताना त्यांनी तेथील वेगवेगळ्या देशांमध्ये हिंडून सामाजिक परिस्थितीचे अवलोकन व चिंतन केले. सामाजिक दृष्टिकोणातून निरिक्षण करण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानमध्ये विविधता आणि वैचित्र्य विपुल प्रमाणात होते व वेळोवेळी केलेल्या भारतामधील दौ-यांत ते डोळसपणे समाजस्थितीचे अवलोकन करीत आले होते.


त्या वेळच्या मलबार प्रांतामध्ये विशेषतः नायर समाजात, मातृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित होती. नंबुद्री नावाचे ब्राह्मण आणि नायर नावाचे क्षत्रिय ह्या दोन प्रभावी जाती तेथे होत्या व त्यांचे परस्परसंबंध हेही वैशिष्टयपूर्ण होते. नंबुद्री व नायर ह्या जातींमध्ये अनुलोम विवाहपद्धती प्रचलित होती. नंबुद्री हे श्रेष्ठ समजले जात व नंबुद्री घरातील थोरला मुलगाच केवळ नंबुद्री जातीतील मुलीशी लग्न करीत असे. इतर धाकटे भाऊ नायर जातीतील मुलीशी लग्न करीत असत. आपल्या घरातील मुलगी नंबुद्री ब्राह्मणाला विवाह संबंधात देणे नायर मंडळी भूषणास्पद मानीत. नंब्रुद्री घरातील केवळ थोरला मुलगाच नंबुद्री मुलीशी लग्न करीत असल्यामुळे नंबुद्री मुलींचा विवाह होणे कठीण पडत असे व या कारणाने नंबुद्री ब्राह्मण अनेक नंबुद्री स्त्रियांशी विवाह करीत असे. नायर कन्येने नंबुद्री तरुणाशी विवाह करणे ह्या चालीला 'संबंधम्' असे नाव असे. नंबुद्री आणि नायर यांच्यात या प्रकारचा बेटीविवाह असला तरी रोटीव्यवहार होत नसे हीही एक सामाजिक विसंगती त्या वेळेला प्रचलित होती. नायर लोक हे नंबुद्रीप्रमाणेच आल्याहून कनिष्ठ समजल्या जाणा-या जातीशी बेटीव्यवहार करीत असत. मलबारातील हा नायर समाज मातृसत्ताक पद्धतीचा होता. म्हणजे आर्थिक मिळकतीचा वारसा व वहिवाट बायकांकडून चालत असे. पुरुष हा मिळकतीचा नुसता व्यवस्थापक असे.


वस्त्रप्रावरणाच्या बाबतीतही नायर लोकांत चमत्कारिक चाली असल्याचें शिंदे यांना आढळून आले. कमरेपासून शरीराच्या वरील भागावर कोणतेच वस्त्र न घेण्याची पद्धत होती. स्त्रिया अर्धनग्नच असत. छातीवर एखादा लहानसा रुमाल किंवा वस्त्र टाकले की त्यांचा पोशाख पुरा होत असे. पण कोणी वडीलधारा पुरुषमाणूस समोर आल्यास त्याचा मान राखण्याकरिता तोही रुमाल बाजूला करण्याची पद्धती होती. युरोपियन लोक ज्याप्रमाणे डोक्यावरची टोपी काढून सन्मान दाखवितात त्याप्रमाणे छातीवरीचे वस्त्र काढण्याची ही पद्धत स्त्रियांमध्ये होती. नायरांहून कनिष्ठ समजल्या जाणा-या जातीतील स्त्रिया रसत्यावरुन उघड्या छातीने हिंडत असल्याचे त्यांना दिसून आले. वरिष्ठ जातीपुढे छातीवर वस्त्र घेऊन जाणे म्हणजे त्यांचा उपमर्द करण्यासारखे आहे असे कनिष्ठवर्गीय स्त्रिया समजत. कलावंतिणी व वाईट चालीच्या स्त्रिया अंगावर संपूर्ण पोशाख घातील. अशा अनेकविध सामाजिक वहिवाटी शिंदे यांना प्रचारात असलेल्या दिसून आल्या.


ह्या प्रवासामध्ये कपडे घालण्याच्या चालीबद्दल एक मनोरंजक हकिकत शिंदे यांना ऐकण्यास मिळाली. मंगलोरकडे कोवीं नावाची एक जंगली जात आहे. त्या जातीच्या बायका रस्त्यातून अर्धनग्न स्थितीत हिंडत असत. तेथील डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनचे सेक्रेटरी के. रंगराव यांच्या मनात एकदा असे आले, की ह्या जातीच्या स्त्रियांस सभ्य चालीरीती शिकवाव्यात. त्यांनी बरेचसे नवीन कापड आणून त्याच्या चोळ्या शिवून त्या ह्या स्त्रियांस वाटण्याची व्यवस्था केली. प्रथम हा नवीन पोशाख पाहून त्या बायकांना आनंद वाटला. पण त्या घरोघर गेल्यावर त्यांच्या जमातीला हा भ्रष्टाचार पाहून इतका राग आला की त्यांनी ह्या बायकांस बेदम मारले. दुस-या दिवशी त्या बायकांनी नवीन पोशाखाचे गाठोडे परत आणून के.रंगरावांच्या अंगणात फेकून दिले व त्यांना अत्यंत बीभत्स शिव्याशाप देत, त्रागा करीत त्या निघून गेल्या. या प्रांतातील लोकांची स्वच्छतेविषयी आस्था मात्र दांडगी असे. प्रत्येकाच्या परड्यामद्ये तळी असत. जाता-येता कित्येक वेळा स्नान करुन ओलेत्याने स्त्री-पुरुष हिंडत, असेही शिंदे यांच्या दृष्टोत्पत्तीला आले.


मलबार प्रांतातील प्रवास करुन व तेथील समाजस्थितीचे अशा प्रकारचे अवलोकन करुन विठ्ठल रामजी शिंदे १८ जून १९२४ रोजी मंगलोर शहरी परत आले. पाहतात तो, त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा आणखी एक पेचप्रसंग निर्माण झाला होता. मलबारात हिंडत असातना वेगवेगळ्या ब्राह्मसमाजाला भेटी दिल्यानंतर शिंदे यांच्या लक्षात आले होते, प्रत्येक स्थानिक समाजात कुठल्यातरी प्रकारचा अंतस्त कलह आहे, त्याचप्रमाणे ब्राह्मसमाजी मंडळीना राजकारणाची अवास्तव धास्ती आहे. मंगलोर समाजामध्येही याहून वेगळी परिस्थिती नाही असे त्यांच्या अनुभवास आले. परत आल्यानंतर दोन दिवसांतच म्हणजे २० जून रोजी दहा बिल्लव जातीच्या पुढा-यांच्या सह्यांचे एक रजिस्टर पत्र शिंदे यांना मिळाले. ह्या पत्रात शिंदे यांच्याबद्दल तक्रारी नमूद केल्या होत्या. त्या अशा :


१. शिंदे हे त्यांना विनंती करुनही गांधीटोपी घालावयाचे सोडीत नाहीत.
२. व्हायकोमच्या दौ-यावर असताना कालिकत येथे व दक्षिण मलबारात जाहीर सभांतून राजकीय विषयावर भाषणे करुन शिंदे यांनी राजकीय चळवळीत भाग घेतला,
३. शिंदे यांच्या ह्या वर्तनामुळे व कृत्यामुळे सरकारी व युरोपियन कंपनीत नोकर असलेल्या सही करणा-या दहा गृहस्थांना व इतरांनाही शिंदे यांच्या राजकारणापासून धोका पोहोचणे संभवनीय आहे.
४. म्हणून शिंदे यांनी इत:पर आपण राजकारणात भाग घेणार नाही' असा लेख आपल्या सहीनिशी ज्या ज्या वृत्तपत्रांतून त्यांच्या राजकीय चळवळीविषयक वृत्त आले अशा वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करावा व असे तातडीने न झाल्यास ब्राह्मसमाजाची जादा साधारण सभा बोलावून योग्य तो उपाय करावा लागेल. हे पत्र वाचल्यावर स्वाभाविकपणेच शिंदे यांना वाईट वाटले असणार. मात्र आपल्या अंत:प्रेरणेशी कोणत्याही प्रकारे ते प्रतारणा करणे शक्य नव्हते. त्यांची धर्मविषयक व राजकारणविषयक जी प्रामाणिक भूमिका होती तिला अनुसरुनच शिंदे यांचे कार्य व विचारप्रकटन चालले होते. आपल्या लौकिक प्रतिष्ठेच्या आणि सरकारदरबारी व जनसामान्यांत असलेल्या प्रतिष्ठा सांभाळण्याच्या चिंतेतून बिल्लव मंडळूकडून हे कृत्य घडले होते. शिंदे यांनी ह्या पत्राला ताबडतोब उत्तर दिले, " मी मंगलोर येथे परत आल्यावर खुलास घेऊन मग ही तक्रार केली असती तर चालले असते. दौ-यावर मी जी चळवळ केली, भाषणे दिली त्यांचा विषय राजकारण मुळीच नसून समाजसुधारणा व धर्मसुधारणा हाच होता. अर्थात राजकारणात भाग घेणार नाही असे लिहून देण्यास मी मुळीच बांधलेला नाही. तो माझ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. ब्राह्मसमाजाच्या हिताला बाध न आणता राजकारणाच्या मूलतत्त्वाबद्दल ऊहापोह करणे माझे पवित्र कर्तव्य आहे. आता तरी तक्रार करणा-यांशी समक्ष भेटून तक्रार मिटवावी. कलकत्याच्या ज्या साधारण ब्राह्मसमाजाचा प्रतिनिधी म्हणून मी हे कार्य करीत आहे त्यांच्या सांगण्यावरुनच मी व्हायकोमला गेलो आणि जे जे मी केले ते ते सर्व त्यांना पसंत पडेल अशी माझी खात्री आहे."


बिल्लव पुढा-यांनी नमूद केलेली गांधी टोपीबद्दलची तक्रार शिंदे यांना अगदीच पोरकटपणाची वाटली.परंतु त्या काळी विशेषत: दक्षिणेत गांधी टोपीवर सरकारचा मोठा रोष होता, हेही त्यांच्या ध्यानात आले होते व म्हणूनच बिल्लव मंडळींना गांधीटोपीबद्दल धास्ती वाटत होती. एखाद्या घरी गांधीटोपीवाला आहे असे कळले तर सरकार त्या घरावर नजर ठेवी असेही त्यांना कळले. ( अगदी पुढच्या काळातही गांधी टोपीचा दबाव दक्षिण प्रांतात जाणवत होता. गांधीटोपीबद्दल मद्रास हायकोर्टात चाललेल्या एका खटल्याचा निर्णय लागून गांधी टोपी घालणे हे राष्ट्रद्रोहाचे कृत्य नाही असा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला. )


स्वाभाविकपणेच इंग्रज सरकारची मर्जी राखू पाहणारी बिल्लव मंडळी गांधीटोपीला बिचकत होती. शिंदे यांचा गांधीटोपी घालण्याचा आग्रहच असला तरी निदान तिचा रंग तरी काळा असावा एवढी सवलत द्यायला ही मंडळी तयार होती. पण गांधीटोपी घालणे ही बाब शिंदे यांना काही मोठी तत्त्वाची वाटली नाही व डोक्यावर काहीच घालावयाचे नाही असा निर्णय शिंदे यांनी तेव्हा घेतला व पुढच्या आयुष्यातही पाळला. खादी न वापरण्याबद्दलचा आग्रह बिल्लव पुढा-यांनी सोडून दिला. शिंदे यांच्याविरुद्ध पत्र लिहिणा-या दहा मंडळींत दोन पोलीस अधिकारी होते. त्यामुळे ही बिल्लव मंडली कोणत्या धोरणाची आहेत हे शिंदे यांच्या लक्षात आले. हे सर्व प्रकरण आपल्या बाजूसह शिंदे यांनी कलकत्याच्या ब्राह्मसमाजाच्या कमिटीकडे पाठविले. त्यांनी शिंदे यांची बाजू पूर्णपणे उचलली. साधारण ब्राह्म समाजाच्या अध्यक्षांनी स्वत:च्या सहीने मंगलोर ब्राह्मसमाजाच्या अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या मिशनरींचा व प्रतिनिदींचा उपमर्द होत आहे अशी स्पष्ट तक्रार केली.


कलकत्ता येथील साधारण ब्राह्मसमाजाकडून शिंदे यांना दरमहा जी नेमणूक होती त्यासाठी थोडासा भाग ( दरमहा रु. २५/-) मंगलोर समाजाकडून कलकत्यास जात असे. ह्या रकमेशिवाय कोणताही खर्चाचा भाग शिंदे यांच्याबाबतीत मंगलोर समाजावर पडत नव्हता. पण आपल्याविरुद्ध मंगलोर समाजाने अशा प्रकारची चमत्कारिक तक्रार केली आहे हे समजल्यावर मंगलोर समाजाकडून पाठविली जाणारा हा रकमेचा भाग स्वीकारण्याचे शिंदे यांनी नाकारले. मुंबई येथील प्रार्थनासमाजातील धुरिणांशी मतबेद झाल्यानंतर १९१० नंतर शिंदे यांनी मुंबई प्रार्थनासमाजाकडून प्रचारक म्हणून मिळणारे वेतन घेण्याचे आपणहून थांबविले होते. नेमकी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती मंगलोर येथेही झाली. शिंदे यांच्याबाबतीत योगच अशा प्रकारचे होते असे दिसते. शिंदे यांची राजकारण, समाजकारण ह्यांचा समावेश करणारी व्यापक धर्मकल्पना मुंबई येथील प्रार्थनासमाजाच्या धुरिणांना पचली नाही, त्याचप्रमाणे मंगलोर येथील लब्धप्रतिष्ठित बिल्लव ब्राह्मोंना मानवली नाही. मंगलोर ब्राह्मसमाजातील पेचप्रसंग मिटेना. शिंदे आणि स्थानिक पुढारी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होईना. अंतर्गत कलह तसाच धुमसत राहिला. ह्या धुमसणा-या कलहात तेल पडावे अशीच आणखी एक घटना त्या सुमारास घडली.


मंगलोर ब्राह्म समाजाचे बिल्लव जातीचे सभासद व पुढारी दिवाणबहादूर एम्.बंगेरा यांच्या भावाच्या मुलीचे लग्न निघाले. दिवाणबहादूर एम् बंगेरा यांचे पूर्ण नाव मंगलोर मुंडप्पा बंगेरा असे होते. ह्या सुमारास ते डिस्ट्रिक्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्या आधी मंगलोर म्युनिसिपलटीचे कमिशनर म्हणूनही ते काही काळ कारभार सांभाळत होते. त्या काळातच आपल्या प्रतिष्ठेच्या व अधिकाराच्या बळावर त्यांनी मंगलोर ब्राह्म समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी करण्यासाठी जागा व परवानगी दिली. ब्राह्मसमाजीयाना स्वतंत्र स्मशानभूमी असणे ही हिंदुस्थानात अपवादभूतच घटना म्हणावी लागेल. दिवाणबहादूर बंगेरा यांचा दबदबा मोठा होता. दक्षिण हिदुस्थानमध्ये डिस्ट्रिक्ट जज्जाच्या पदापर्यंत पोहोचणारे ते पहिले भारतीय गृहस्थ होते. त्यांच्या कुटुंबातही मुले शिकलेली व मोठमोठ्या हुद्यावर काम करणारी होती. त्यांचा एक मुलगा लंडनमध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत होता. दोन मुले सरकारी नोकरीत न्याय खात्यात व मुलकी खात्यात अधिकारी होती व एक बॅंकेमध्ये मॅनेजर होता. अशा या लब्धप्रतिष्ठित ब्राह्म कुटुंबातील मुलीचे लग्न निघाले. स्वाभाविकपणेच ब्राह्मसमाजाचे मिशनरी असलेल्या शिंदे यांनी समाजाला पुरोहित या नात्याने हे लग्न लावावे अशी दि. ब. बंगेरा यांनी इच्छा प्रदर्शित केली. परंतु बंगेरा ह्यांच्या भावी जावयांनी शिंदे यांच्याबाबतच्या निषेधपत्रावर सही केली होती. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन ह्या भावी जावयांनी आपली सही परत घेऊन आपल्याबद्दलचा विश्वास प्रकट केल्याशिवाय लग्नविधीत आपण भाग घेणार नाही असे शिंदे यांनी दि. ब. बंगेरा यांना स्पष्ट कळविले. शिंदे यांच्या या भूमिकेने दि. ब. बंगेरा यांना राग येऊन हे प्रकरण अधिकच चिघळू लागले.


अशा वेळी पुण्याचा अहल्याश्राच्या नविन इमारतीच्या उद्घाटनासाठी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन हे ऑक्टोबर महिन्यात येण्याचे ठरले. शिंदे यांनी त्यांच्या स्वागतार्थ पुण्यास यावे असे पुणे शाखेचे आग्रहाचे निमंत्रण शिंदे यांना आले. म्हणून त्यांना पुण्यास या समारंभासाठी जावे लागले. त्यानंतर दोन महिने ते तिकडेच राहिले. बेळगावास नाताळास काँग्रेसचे अधिवेशन झाले त्याला जोडून भारतीय अस्पृश्यता निवारक परिषदेची बैठक काँग्रेसच्या मंडपात घेण्याचे ठरले. त्यासाठी शिंदे यांनी आपला मुक्काम वाढविला. ह्या परिषदेचे अध्यक्ष रामलिंगम् रेड्डी होते व परिषदेपुढे म. गांधीचे मुख्य भाषण झाले. परिषद आटोपल्यानंतर नवे-जुने गोवे येथील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी शिंदे यांनी प्रवासाचा बेत आखला व तो पार पाडून जानेवारी १९२५ च्या प्रारंभी ते मंगलोरला पोहोचले.


अजूनही दहा निषेधकांचा वाद धुमसतच होता. निषेध करणा-यापैकी समक्ष भेटून वादाची तड लावण्यासाठी कुणी पुढे येत नव्हते, की माघार घेत नव्हते. शिंदे यांची भूमिका तत्त्वाला धरून असल्यामुळे त्यांनी माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता. मंगलोर ब्राह्मसमाजाचे अध्यक्ष के. रंगराव हे पूर्णपणे शिंदे यांच्या बाजूचे होते. परंतु त्यांनाही या प्रकरणाची तड लावता येईना. उलट बिल्लव मंडळींचा आग्रह बघून त्यांचा विषाद उत्तरोत्तर वाढतच गेला व समाजाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते मद्रासला निघून गेले. शिंदे यांनी पुढचे तीन महिने या प्रकरणाची तड लावण्याच्या दृष्टीने वाट पाहिली. अखेरीस कलकत्याच्या साधारण ब्राह्मसमाजाच्या कमिटीची अनुमती घेऊन मंगलोर ब्राह्मसमाजाचा निरोप घेऊन ते पुण्यास कायमचे राहण्यासाठी आले.


अशा रीतीने जिथे मन लावून काम केले त्या संस्थेशी फारकत घेण्याचा हा आणखी एक प्रसंग शिंदे यांच्या आयुष्यात लिहिलेला होता.  त्यांच्या धर्मविषयक कार्याचे एक आवर्तन मंगलोर येथे पूर्ण झाले.