विसाव्या शतकाच्या पहिल्या आठ-दहा वर्षांत महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. लो. टिळकांच्या जहाल आणि प्रभावशाली नेतृत्वाने अभूतपूर्व राजकीय जागृती झाली होती. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध संतापाची भावना निर्माण झाली. स्वातंत्र्याची आकांक्षा तीव्र स्वरूपात निर्माण होऊ लागली होती. मात्र राजकीय दृष्ट्या जहाल, स्वातंत्र्यपेमी असणारा टिळक पक्ष सामाजिक बाबतीत हिंदूंच्या रूढ अंधश्रद्धा जपणारा, शूद्रादिकांवर अन्याय करणा-या परंपरागत समाजरचनेची चौकट सांभाळणारा व प्रगतीसाठी एकही पाऊल पुढे न टाकणारा अशा अवरुद्ध स्थितीतच राहिला होता. ह्या राजकीय जहालांना स्वातंत्र्याची तीव्र ओढह होती खरे, परंतु सर्वसामान्य बहुजन समाजाच्या, शेतक-याच्या हितासंबंधी ओढ असल्याचे अगदीच दिसून येत नव्हते. उटल वेदोक्तासारखा प्रकरणावर टिळकपक्षीय ब्राह्मण मंडळींचा बहुजन समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोण तुच्छतागर्भ होता, असेच जाणवत होते. प्राधान्याने ह्या वेदोक्त प्रकरणाची प्रतिक्रिया म्हणून छत्रपती शाहूमहाराजांच्या प्रेरणेने व आश्रयानेदेखील महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाच्या विचाराचा जोरदार फैलाव होऊ लागला. वेदोक्त प्रकरणात प्रकट झालेल्या ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या अहंकाराची प्रतिक्रिया म्हणून सत्यशोधकी विचाराला ब्राह्मणविरोधाची धार प्राप्त झाली. एवढेच नव्हे तर टिळक पक्षीयांना विरोध करण्यासाठी निर्माण झालेल्या बहुजन समाजातील नेतृत्वाला इंग्रज सत्ताधारी जवळचे वाटायला लागले व ते इंग्रजांच्या सत्तेचे गुणगान करणारे व त्यांचे पक्षपाती बनले.
ह्या वस्तुस्थितीचा एक वेगळाच अर्थ काढला जाऊ लागला. बहुजन समाजातील व विशेषत्वाने मराठा जातीतील नेत्यांचे धोरण व मनोवृत्ती ही सर्वसाधारण मराठा समाजाचीही आहे आणि मराठा समाजाला जणू काय राजकीय स्वातंत्र्याची स्पृहा नाही. त्याला इंग्रजांच्या अमलाखालीच राहणे रुचते. इतिहासकाळापासून स्वातंत्र्यप्रिय असणा-या मराठा समाजाबद्दलची ही समजूत दूर होणे अगत्याचे आहे. एवढेच नव्हे तर, एकंदर मराठा समाजामध्ये, मराठ्यांच्या नेत्यांमध्ये व सुशिक्षित मराठा तरुणांमध्ये योग्य अशा राजकीय तसेच सामाजिक व सांस्कृतिक जाणिवा जागृत होणे अगत्याचे आहे असे विठ्ठल रामजी शिंदे यांना तीव्रतेने वाटू लागले. मराठा समाज हा महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज आहे. त्याच्या उन्नतीवर महाराष्ट्राची उन्नती अवलंबून आहे, अशी त्यांची धारणा होती. अशा समाजाने राजकीय विचाराच्या बाबतीत तर परिपक्व असावयास पाहिजे; शिवाय सामाजिक, सांस्कृतिक बाबतीतही त्याने योग्य दिशेने कार्यप्रवण असणे एकंदरीत राष्ट्रकार्याच्या दृष्टीने शिंदे यांना अगत्याचे वाटत होते.
अण्णासाहेब शिंदे यांचे वास्तव्य १९१२ पासून पुण्यास होऊ लागले. त्यांचे धडाडीचे अस्पृश्यतानिवारणाचे काम, त्यांची विद्वता आणि व्यासंग, विचारांचा सखोलपणा आणि समतोलपणा यांचा पुण्यातील मराठा समाजाला जवळून परिचय होऊ लागला. त्यांचे आपल्याला मार्गदशन लाभावे अशी इच्छा सुशिक्षित मराठा तरुणांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक होते. पुण्यात नुकत्याच स्थापन झालेल्या मराठा भ्रातृमंडळाच्या पदाधिका-यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना मंडळाच्या स्नेहसंमेलनप्रसंगी भाषण करण्याची विनंती केली आणि मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसंबंधी आपल्या मनात घोळणारे विचार मांडायला ही चांगली संधी आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी व्याख्यानाचे निमंत्रण स्वीकारण्याचे ठरविले.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक जीवन ढवळून निघाले होते. त्याचा परिणाम म्हणूनच पुण्यात मराठा भ्रातृमंडळ ह्या संस्थेची निर्मिती झाली होती.
१९१०च्या सुमारास पुण्यामधील शाळा-कॉलेजात शिकणारे तरुण मराठा विद्यार्थी काही निमित्ताने एकत्र जमत, त्यांची चर्चा होत असे. अशा विद्यार्थ्यांपैकी लक्ष्मणराव ठोसर, बाबुराव जगताप वगैरे तरुणांच्या मनात असा विचार आला की, गरीब मराठा विद्यार्थांना मदत करावी, त्यांना सहविचार करावयसा प्रवृत्त करावे या हेतूने एक संस्था स्थापन करावी. १९१०च्या सुमारास खरे तर बाबुराव गणपतराव जगताप हे हायस्कूलात जाणारे विद्यार्थी होते व लक्ष्मणराव ठोसर हे कॉलेजमध्ये शिकत होते. परंतु ह्या अगदी तरुण वयात त्यांनी पुढाकार घेऊन मराठा भ्रातृमंडळ (मराठा स्टुडंट्स ब्रदरहुड) ही संस्था स्थापन केली. ह्या सुमारास श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज हे पुण्यास वरचेवर येत असत. त्याचप्रमाणे शाहूमहाराजांचे जामात देवासचे श्रीमंत तुकोजीराव पवार व त्यांचे बंधू श्रीमंत भाऊसाहेब हेही पुण्यास येत असत. लक्ष्मणराव ठोसरांचा त्यांच्याशी परिचय झाला होता. पांडुरंग चिमणाजी पाटील हे त्या वेळी पुण्याच्या शेतकी कॉलेजात प्राध्यापक होते. त्यांचे मार्गदर्शनही जगताप, ठोसर या तरुणांना मिळाले. शेतकी कॉलेजचे प्रिन्सिपॉल हॅरॉल्ड एच मॅन यांनी मराठा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष होण्यास अनुमती दिली. त्याचप्रमाणे जगदेवराव पवार, भाऊसाहेब महाराज (देवास) यांनी व फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल रँ. रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी उपाध्यक्ष म्हणून राहण्यास आपली अनुमती दिली. लक्ष्मणराव ठोसर व सोपान नामाजी कु-हाडे हे या संस्थेचे सेक्रेटरी झाले. पां. चि. पाटील, रामचंद्रराव वंडेकर व अन्य प्रतिष्ठित मंडळी ही या मंडळाची सदस्य बनली. फेब्रुवारीत १९११ मध्ये मराठा स्टुडंट्स ब्रदरहुड ही संस्था स्थापन झाली.१ त्यामध्ये १५ मार्च १९१३ रोजी तिस-या वार्षिक संमेलनप्रसंगी पां. चि. पाटील यांचे ‘विलायतचा प्रवास’ या विषयावर व्याख्यान झाले. पुढील वर्षी २० जून १९१४ रोजी मंडळाच्या चौथ्या वार्षिक संमेलनप्रसंगी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सुशिक्षित मराठ्यांची नागरिक कर्तव्ये’ ह्या विषयावर व्याख्यान दिले.२
विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्रस्तुत विषयावरील व्याख्यान हे मराठा समाजातील, एवढेच नव्हे तर, एकंदरीच तरुणवर्गाला उत्तम प्रकारचे मार्गदर्शन करणारे म्हणून तर महत्त्वाचे होतेच; त्याशिवाय विठ्ठल रामजी यांचा जातिसंस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोण काय होता, मराठा समाज व इतर जाती यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध त्यांना अभिप्रेत होते, हे कळण्याच्या दृष्टीनेसुद्धा प्रस्तुत व्याख्यान महत्त्वाचे होते. व्याख्यानाच्या प्रारंभी मराठा हे जातिविशिष्ट नाव धारण करणा-या मंडळीपुढे आपण भाषण करणे हे कितपत प्रस्तुत आहे याचा शिंदे यांनी ऊहापोह केला व एकंदर समाजातील जातिसंस्थेबाबत भूमिका मांडली, प्रारंभीच ते म्हणाले, सकृतदर्शनी पाहताच तुमची सभा केवळ एका विशिष्ट जातीपुरतीच आहे आणि स्वतः मी तर जातिभेद मानीत नाही. इतकेच नव्हे पाळीतही नाही, किंबहुना या पुरातन संस्थेचे जे काही दुष्परिणाम अद्यापि घडत आहेत ते शक्य आणि इष्ट त्या रीतीने नाहीसे करण्याचा नम्रपणाने प्रयत्न करणा-यांमध्येच मी एक आहे. म्हणून मला आपल्या सभेपुढे असे व्याख्यान देण्याचा अधिकार आहे, की नाही याचीच मुळी शंका आली. पण तुमच्या संस्थेचे उद्देश आणि घटना पाहिल्यावर ती तितकी जातिविशिष्ट नाही असे कळून आले. डॉ. हॅरॉल्ड एच्. मॅन हे अध्यक्ष व तुमच्या घटनेतील अन्य काही सभासद यांचा मराठ्यांशी जातिशः संबंध नसूनसुद्धा त्यांचा संस्थेत अंतर्भाव झाला असल्याचा त्यांनी निर्देश केला. जातीविषयक भूमिका कोणती असते व असावी ह्याबद्दलचे विवरण करताना ते म्हणाले, “पण मी जो आपल्यापुढे उभा आहे तो केवळ हितचिंतकच म्हणून नव्हे. मी स्वतः मराठा जातीत जन्मलो असल्यामुळे स्वाभाविकपणे मजमध्ये दोन प्रकारचा त्या जातीसंबंधी अभिमान वसत आहे तो मी मांडणे आवश्यक नाही. जात्यभिमान तीन प्रकारचा असतो. आपली जात कशीही असो ती आपल्याला प्रिय, तिचा दुस-याशी कोणत्याही प्रकारे संबंध न जोडता ती ‘सोवळी’ राखणे, निदान तशी राखण्याचा बहाणा करणे, तिचेच हितसंबंध पाहणे, इतकेच नव्हे तर इतर जातींचा मत्सर करणे हा एक प्रकार. हा तामसी आहे. आपली जात थोर, इतिहासप्रसिद्ध असल्यास आणि वैभवशाली असल्यास याबद्दल दुस-या कोणत्याही जातीशी मत्सर न करिता किंवा फटकून न राहता मनामध्ये संतोष मानणे, हा दुसरा प्रकार. हा राजसी आहे. ह्याशिवाय तिसरा एक अभिमानाचा प्रकार असा आहे की, आपली जात अति उच्च गणलेली असो, की अति नीच गणलेली असो, ह्या बाह्म गणनेकडे केवळ दुर्लक्ष करून दुस-या लहानथोर जातीचा अणुमात्रही हेवा न करता किंवा त्यांच्या हितसंबंधास जाणून अथवा नेणून लवमात्रही न पोहोचेल अशी खबरदारी ठेवून आपल्या जातीच्या हितसंबंधी कर्तव्यबुद्धी जागृत ठेवणे हा सात्त्विक प्रकार आहे. पहिला प्रकार गर्हणीय, दुसरा क्षम्य आहे व तिसरा स्तुत्य आहे. जातिभेद नको म्हणणा-यांनी केवळ पहिलाच प्रकार टाकणे आवश्यक आहे आणि जोपर्यंत शेवटच्या दोन्ही प्रकारचे अभिमान म्हणणा-यांनी केवळ पहिलाच प्रकार टाकणे मला हे व्याख्यान देणे वावगे होणार नाही, असे समजून मी तुमच्या सन्माननीय सेक्रेटरीच्या निमंत्रणास मान दिला.”
मराठा ह्या शब्दाचा अन्वय प्रांत, पेशा, भाषा, पिढी आणि जात ह्या पाच विषयांशी लागत असला तरी त्यासंबंधी तात्त्विक आणि ऐतिहासिक मीमांसा करण्याचा आपला उद्देश नाही; तो केवळ व्यावहारिक आणि आजकाल आवश्यक अशा राष्ट्रीय दिशेचा आहे असे सांगून खानेसुमारीच्या अहवालात ज्यांना मराठा म्हटले आहे ते वर्गीकरण त्यांनी मान्य केले. ह्या जातीने आपल्या कर्तबगारीने एका विशिष्ट प्रदेशाला स्वतःचे नाव दिले असले तरी हल्ली हे लोक मागासलेले या नावाने ओळखले जातात व ते तसे खरोखर झाले आहेत. ह्या लोकसमूहाची जातिशः जी अवनती झाली आहे, त्याची दोन अंतःस्थ कारणे त्यांनी सांगितली. पहिले, ह्या जातीमध्ये ऐक्य (सॉलिडॉरिटी) नाही व दुसरे, ह्या जातीने आपल्या नागरिक कर्तव्याची जवळ जवळ फारकतच करून घेतली आहे. पैकी दुस-या कारणाचा विचार प्रस्तुत व्याख्यानात अभिप्रेत असल्याचे त्यांनी सांगितले.
ह्या जातीची रहाटी ब्राह्मणी संस्कृतीहून निराळी दिसून येणारी अशी आहे. महाराष्ट्रातील खालच्य दर्जाच्या अन्य काही जाती ह्या रहाटीच्या वळणाखाली आल्या आहेत नागरिकत्वाचा विचार करीत असताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९१० सालच्या खानेसुमारीचा अत्यंत उदबोधकपणे उपयोग करून घेतला आहे. धंदा, शिक्षण, शिक्षणातील स्त्री-पुरुषांची प्रगती इत्यादी संबंधातील आकडेवारी त्यांनी एकंदर लोकसंख्येच्या संदर्भातही विचारात घेतली आहे. मराठे व तत्संबंधी म्हणून कुणबी, माळी, साळी, शिंपी, मराठे वाणी, मराठे गवळी, मराठे न्हावी इत्यादी संबंधीची आकडेवारी त्यांनी उपयोगात आणली आहे. त्यांनी दिलेल्या कोष्टकात मुंबई इलाख्यातील मराठे व तत्सम जातीची लोकसंख्या सुमारे ५० लाख तर ब्राह्मणांची १० लाख व लिंगायतांची १३ लाख आहे. मराठ्यांच्या लोकसंख्येची बहुलता ध्यानात घेऊन त्यांनी म्हटले आहे, “नुसत्या संख्येच्या दृष्टीने पाहिले तरी मराठ्यांचे महत्त्व बरेच आहे. कारण त्यांची संख्या ह्या इल्याख्यातील कोणत्याही जातीपेक्षा बरीच मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या जनसमूहाचा हितसंबंध तो अर्थात राष्ट्रीय हितसंबंध, असे समजून राष्ट्राच्या एवढ्या महत्त्वाच्या व मोठ्या अवयवाने मागासलेले राहणे म्हणजे पर्यायाने सर्व राष्ट्रपुरुषाने मागासलेले राहणे होय व त्याला हातभार लावणे केवळ एका विशष्ट जातीवर मेहेरबानी करणे नव्हे, तर एक महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्यच बजावणे होय.”
नागरिकता या संज्ञेचा राष्ट्रीयतेच्या दृष्टीने काय अर्थ होतो, हे त्यांनी विशद केले. राष्ट्रीयता ही मानवजीविताच्या सामाजिक विकासाची आजची शेवटची पायरी होय. ह्या राष्ट्रीय संघटनेचा प्रथम घटक नगर हा असतो. व्यक्ती, कुटुंब, जात किंवा खेडे हा घटक होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी काही स्वतंज्ञ, कर्तबगार, जबाबदार आणि विद्याचारसंपन्न असे लोक राहतात आणि ज्या ठिकाणी व्यापाराची लहानशी का होईना स्वतंत्र पेठ असते अशा ठिकाणाला गाव किंवा नगर अशी संज्ञा देता येते. अशा कित्येक नगरांची जी एक स्वसत्तात्मक संघटना बनते तिला राष्ट्र अशी संज्ञा आहे व स्वसत्तात्मकत्व हे राष्ट्राचे मुख्य लक्षण होय असे त्यांनी सांगितले. स्वसत्तात्मकत्व हे मुख्य लक्षण कायमचेच नष्ट झाले तर त्या राष्ट्राचे राजकारण, उदीम, वाङमय, कलाकौशल्य इत्यादीकांवर नव्हे तर शेवटी त्याच्या शीलावरही परिणाम होऊन तो विवक्षित समूह राष्ट्रपदालाही मुकतो असे प्रतिपादताना त्यांनी स्वसत्तात्मकतेला राष्ट्रामध्ये आत्यंतिक महत्त्व असल्याचे सांगितले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले ज्या अर्थी राष्ट्राचा प्रथम घटक नगर हा आहे त्या अर्थी नगरालाही, स्थानिक का होईना, पण स्वसत्तात्मकतेची जरुरी आहेच. अशा स्वसत्तात्मक नगरात केवळ राहणा-याला नागरिक ही संज्ञा मिळणार नाही, तर त्या नगराची जी संघटनात्मक जबाबदारी आणि जे हक्क असतील ते जिच्यामध्ये पूर्णपणे आहेत, तीच व्यक्ती नागरिक या सेंला पात्र होईल, याप्रकारचा विचार मांडून ते नगराचा कारभार चालविणा-या अधिकारयुक्त संस्थेचा कारभार करण्यात सहभाग असेल अथवा कोणत्या ना कोणत्या निर्णय करण्याच्या व्यवस्थेमध्ये हक्क असेल, त्या व्यक्तीलाच ख-या अर्थाने नागरिक म्हणता येईल असेच त्यांनी सुचविले आहे. अशी व्यक्ती प्रौढ, स्वतंत्र, स्वावलंबी, जबाबदार आणि हक्कदार अशी असली पाहिजे. ह्या आवश्यक असलेल्या पाच गुणांपैकी एकाही गुणाने कमा असणा-या व्यक्तीला नागरिक म्हणता येणान नाही तर केवळ रहिवासी म्हणावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ह्या विवेचनातून त्यांनी राष्ट्रीयत्वाला महत्त्व दिले आहे. राष्ट्रयत्वाचा गाभा म्हणून स्वसत्तामत्मकत्व अथवा स्वतःचा कारभार चालविणे हे वैशिष्ट्य होय असे सांगितले आहे. या राष्ट्रीयत्वची जोपासन करण्यासाठी अथवा अंगी राष्ट्रीयत्व बाणविण्यासाठी प्रथमतः नागरिकत्व असणे आवश्यक आहे. त्याद्वाराच राष्ट्रीयत्वाचा आविष्कार करता येतो व हे राष्ट्रीयत्व मताचा, वृत्तीचा स्वतंत्रपणा, सर्व प्रकारचे निर्णय घेण्यात स्वावलंबन, जबाबदारीची यथार्थपणे जाणीव असणे आणि नागरी कारभारात निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये हक्क मिळविण्यासाठी पात्रता असणे हे आवश्यक गुण म्हणून त्यांनी प्रतिपादिले आहेत. या त्यांच्या प्रतिपादनावरून त्यांची राष्ट्रीयवृत्ती जशी प्रकट होते, त्याचप्रमाणे मराठे आणि अन्य मागासलेल्या जाती यांनी कोणत्या प्रकारची पात्रता संपादन करावी, कोणती वृत्ती अंगी बाणावावी व नागरिक व्हावे आणि पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीत राष्ट्रीय पातळीवर कर्तव्य बजवावे हेच हे तात्त्विक स्वरूपाचे विवेचन करून सुचविले आहे.
ह्या प्रकारची मांडणी केल्यानंतर मराठ्यांची नागरिक कर्तव्ये कोणती हे सांगत असताना, ती इतर जातींच्या कर्तव्याहून निराळी संभवत नाहीत असे म्हटले. ह्या चमत्कारिक देशात विद्याचारसंपन्नतेच्या दृष्टीने पाहू गेले असता महत्त्वाच्या जातींमध्येदेखील तफावत दिसते. म्हणून नागरित कर्तव्य बजावण्याच्या कामी स्वतःला पात्र करून घेण्यापूर्वी निरनिराळ्या जातीला निरनिराळ्या बाजूने तयारी करावी लागेल असे त्यांनी सांगितले. ह्या कर्तव्याच्या तयारीला लागण्यापूर्वी मराठ्यासारख्या विकत आणि मागासलेल्या ज्ञातीला अगोदर कोणती भली मोठी पूर्वतयारी करावयचा आहे, हे त्यांनी प्रतिपादले. ही पूर्वतयारी म्हणजे प्रथमतः बहुजन समाजात सामान्य प्राथमिक शिक्षणाचा फैलाव करणे ही होय. केवळ पुस्तकी ज्ञानाचे ख-या राष्ट्रीय तेजाशी जरी व्यक्तीच्या दृष्टीने म्हणण्यासारखे साहचर्य नसले तरी आधुनिक राष्ट्राच्या बांधणीला जनतेमध्ये निदान काही प्रमाणात तरी प्राथमिक शिक्षणाची अनिवार्य आवश्यकताच आहे. व्यक्तीला जसे भाषेशिवाय कोणतेही व्यवहार करणे मुळी शक्य नाही, तसेच जनतेला सार्वत्रिक प्राथमिक शिक्षणाशिवाय कोणतेच नाव घेण्यासारखे राष्ट्रीय व्यवहार करता येणे शक्य नाही, असे सांगून प्राथमिक शिक्षणाचे अपरिहार्य महत्त्व त्यांनी निदर्शनास आणले. त्यांनी दिलेल्या कोष्टकातील माहिती केवळे उद्बोधकच नव्हे, तर कुणालाही अंतर्मुख करायला लावणारी होती. १९१० सालच्या खानेसुमारीवरून शिक्षणाचे शेकडा प्रमाण त्यांनी जे दिले आहे त्यात लिहिता-वाचता येणारे ब्राह्मण पुरुष ५९, बायका ७, लिंगायत पुरुष १३, बायका २/९ आणि मराठे पुरुष ४.३/५ आणि बायका १/७. इंग्रजी लिहिता-वाचता येणा-यांचे शेकडा प्रमाणः ब्राह्मण पुरुष १, बायका १/३, लिंगायत पुरुष १/५, बायका १/९१८ आणि मराठे पुरुष १/७ आणि बायका १/२३९. ह्या आकडेवारीवरून मराठे तसेच लिंगायत ब्राह्मणवर्गाच्या तुलनेत किती मागे होते याची कल्पना येऊ शकते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढे १९२१ साली सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मुलांसाठी तसेच मुलींसाठी का आग्रह धरला याचीही कल्पना या आकडेवारीवरून येऊ शकते.
मात्र प्राथमिक शिक्षण निरतिशय महत्त्वाचे असले तरी ती नागरिकत्वाची प्राथमिक तयारीच होय. जणू काय हे सार्वत्रिक शिक्षण मराठे जातीला मिळाले आहे असे गृहीत धरून विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढील विचार मांडला. समोर बसलेल्या तरुण कॉलेज विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, “विश्वविद्यालयातून यशस्वी होऊन बाहेर पडल्यावर तुम्ही अगदी पहिली खबरदारी ठेविली पाहिजे, ती ही की, राजकीय कर्तव्य आधी की सामाजिक आधी; आमच्या देशोन्नतीला उद्योगधंद्याची जरुरी आहे की उदार धर्मप्रसाराची जरुरी आहे; सामाजिक सुधारणा करावयाची ती शिंगे मोडून की शिंगावर धूळ घेऊन; माझ्या जातीच्याच कल्याणाला माझे सर्वस्व वाहू किंवा निःसीम परोपकारास वाहून घेऊ, ह्या व अशा वादात तुम्ही मुळीच पडू नये. हा वाद नुसता पोरकट आहे इतकेच नव्हे, तर निव्वळ खोटा आहे... ह्यापुढे कामाची विभागणी चांगली पडत चालली आहे म्हणून तुम्ही आपली आवड, मगदूर, साधने ह्या सर्वांचा विचार करून राष्ट्रकार्याच्या विशाल आणि विघ्नांनी भरलेल्या क्षेत्रातून तुमचा स्वतःचा विशिष्ट मार्ग शोधून काढून होता होईल त्याला आमरण चिकटून रहा.” ही खबरदारी सर्वच सुशिक्षित तरुण नागरिकांनी घ्वावयाची आहे, असे सांगून विशेषकरून मराठा नागरिकांनी काय करणे आवश्यक आहे यासंबंधी विचार मांडताना शिंदे म्हणाले, “आजपर्यंत हायस्कुलातून व कॉलेजातून बरेच मराठे गृहस्थ बाहेर पडून आपल्या स्वतःचा चरितार्थ व स्वदेशाची सेवा आपआपल्या परीने करीत आहेत. परंतु राजकारण, समाजसुधारणा, समाजसेवा, धर्मप्रसार, उद्योगवृद्धी, साहित्यवर्धन, ललितकलांचा उत्कर्ष, परदेशगमन, मागासलेल्यांचा पुढाकार, हीन जातींचा परामर्श, सर्वसाधारण परोपकार ही व अशीच दुसरी आणखी नागरिकत्वाची परस्पर जी भिन्न अंग आहेत त्यांत सुशिक्षित मराठ्यांचा त्यांच्या संख्येच्या मानाने कितीसा हात आहे बरे? राजकीय चळवळ म्हणजे काही विशिष्ट जातीचा सुळसुळाट असा आम्हावर परकीयांचा का आरोप असावा? सामाजिक परिषदेच्या रंगभूमीवर नेहमी काही विशिष्ट घाटांचीच पागोटी का दिसतात? स्वदेशी बँक व इतर मोठ्या प्रमाणावरचे धंदे जे हल्ली चालू आहेत त्यांपैकी मराठ्यांनी किती चालविले आहेत? मी वर धंद्याचे प्रमाण दाखविणारे जे कोष्टक दिले आहेत त्यात वकील, डॉक्टर व इतर तसलेच प्रतिष्ठित पण स्वतंत्र धंदे करणारे मराठे किती मिळतील? ब्राह्मण, लिंगायत, जैन, पारशी मुसलमान ह्यांच्यातल्याप्रमाणे केवळ स्वतःच्या कष्टाने पैसा मिळवून लौकिकाला चढलेले लक्ष्मीपुत्र मराठ्यांमध्ये मागे किती झाले व आता किती उरलेले आहेत? लेखक, शोधक, आवडीने प्रवास करणारे, स्वदेशात सामाजिक छळ सोसणारे अथवा परदेशात राजकीय अपमान सोसणारे हल्ली जे कोणी हिंदी नागरिक आहेत त्यात सुशिक्षितांच्या मानाने पाहिले असताही किती मराठे आहेत बरे? हे आणि असले कित्येक दुसे स्वाशयनिवेदनात्मक व अंतःपरीक्षणात्मक प्रश्न तुम्ही स्वतःस वारंवार विचारा.” हे सांगत असताना आपला उद्देश मराठा जातीला हिणविण्याचा मुळीच नाही; ही इशारत देण्यात आपला उद्देश ‘भावी नागरिकत्वाची तयारी करावयाची असेल तर तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यामध्ये तुमच्या तयारीला आवश्यक अशी पोषकद्रव्ये आहेत काय ह्याचा विचार करा असे आवाहन करण्याचा व ती तशी नसतील तर शिक्षण जास्त भरीव कसे केले पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे हे सांगण्याचा आहे’ असे ते स्पष्ट करतात. व्याख्यानाच्य अखेरीस मराठ्यांची सामाजिक आणि साहित्यविषयक काय कर्तव्ये आहेत ह्यासंबंधी शिंद्यांनी आपले विचार मांडले. राजकी, धार्मिक, औद्योगिक वगैरे बाबींसंबंधी मराठे या नात्याने इतर सुशिक्षितांहून काही वेगळी विशेष कर्तव्ये आहेत असे आपल्याला वाटत नाही. मात्र समाजिक बाबतीत मराठ्यांची कर्तव्ये इतरांहून भिन्न आहेत असे त्यांनी प्रतिपादिले. खरे म्हणजे मागासलेले ह्या लाज आणणा-या वि शेषणाची आम्हाला चीड आली पाहिज. ह्या ओंगळ विशेषणाचे शेपूट केवळ पुस्तकी शिक्षणाचा फैलाव झाली तरी तेवढ्यानेच गळून पडणार नाही. त्याबाबतीत शिक्षणापेक्षा सामाजिक सुधारणा हा विशे, परिणामकारी तोडगा असल्याचे आपल्याला वाटते असे त्यांनी नमूद केले. समाजाचा अर्धा भाग असणारा जो स्त्रीसमाज त्याची मात्र आपल्यामध्ये फार शोचनीय स्थिती आहे. पडद्याची चाल व दुसरेही काही निरर्थक नवे-जुने ढंग आपल्यात अद्यापि दडी मारून बसले आहेत. मराठ्यांना ख-या नागरिकत्वाचा योगक्षेम साधावयाचा असल्यास इतरांप्रमाणे त्यांनी पूर्ण आधुनिकच बनले पाहिजे. प्रगतीच्या मार्गात अडखळून किंवा कुंथून चालावयाचे नाही, निष्ठा आणि नम्रता कायम ठेवून पराकाष्ठा केली पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. तलवारीच्या युद्धाचा आता काळ गेला, तेवढ्यावरून युद्धच सर्व संपले असे नाही. नैतिक युद्ध पुढे चालणार आहे.
सामाजिक बाबतीतील मागासलेपणा दूर करण्यासंबंधी विवेचन केल्यानंतर साहित्यासंबंधी जे भावी ग्रंथकार असलीत त्यांच्यासाठी त्यंनी एक-दोन सूचना केल्या. मराठ्यांची एक बाळबोध रहाटी आहे ती ब्राह्मणी रहाटीखाली किंवा नवीन चालून येणा-या पाश्चात्त्य प्रभावाच्या संमिश्र रहाटीखाली अद्यापि दबून गेली नाही. मराठी भाषेत ज्या काही थोड्या नाव घेण्यासारख्या कादंब-या व नाटके झाली आहेत ती बहुतेक प्रतिभासंपन्न ब्राह्मण ग्रंथकारांनीच लिहिली आहेत. त्यांतील नायक व नायिका हे मराठे आहेत व तदनुरोधाने बहुतेक सामाजिक आणि घरगुती देखावे मराठ्यांच्याच रहाटीचेच त्यांना वठवावे लागले आहेत. परंतु ह्या ब्राह्मणग्रंथकारांना मराठ्यांच्या रहाटीचे छायाचित्र निर्दोषपणे काढता आलेले नाही. छायाचित्र निर्दोषपणे काढण्यासाठी लेखकास त्या त्या जातीशी तादात्म्य पावता आले पाहिजे. मराठी साहित्यातील ही उणीव भरून निघावयाची असेल तर तुमच्यातूनच मार्मिक कवी निर्माण झाले पाहिजेत असे त्यांनी म्हटले. मात्र प्रतिभावंत साहित्यिक निर्माण होण्यात मानवी प्रयत्नापेक्षा ईश्वरी देणगीवर अधिक अवलंबून रहावे लागते असेही त्यांनी नमूद केले.
इतिहासलेखनाचा मात्र तसा प्रकार नाही. महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास म्हणजे ब्राह्मण आणि मराठे ह्या दोन वीर बंधूंची संयुक्त कृती आहे. जसा ह्या दोघांनी मिळून तलवारीला तलवार किंवा तलवारीला लेखणी भिडवून हा इतिहास निर्माण केला तसे आता ह्यापुढे त्याचे शब्दचित्रही दोन्ही जातींच्या विद्वानांनी लेखणीला लेखणी भिडवून रेखाटले आणि रंगविले पाहिजे. प्रत्यक्ष इतिहासलेखनाचा काल अद्यापि आला नसला तरी इतिहाससंशोधनाचा काळ तरी हल्ली व्यर्थ जात आहे असे त्यांनी सांगितले. ह्या बाबतीत ब्राह्मण शोधक जसे व जितके प्रयत्न करीत आहेत तसे मराठे करीत आहेत असे दिसून येत नाही. हे ध्यानात घेऊन तुम्ही आतापासून आपली कंबर बांधून आपल्या ब्राह्मणबंधूंशी व ब्राह्मणगुरूंशीही केवळ सात्त्विक अशी अहमहमिका चालविली पाहिजे. आज जशी साधने मिळतील तसा उद्या इतिहासग्रंथ वठेल. पुढील चित्रपटाच्या रेखा वक्र होऊ नयेत व रंगात भेसळ होऊ नये यासाठी आतापासूनच दोघांनी (ब्राह्मणांनी व मराठ्यांनी) सावधगिरी राखण्यात व श्रम घेण्यात कसूर करू नये, अशी अपेक्षा त्यांनी प्रकट केला.
मराठी साहित्यातील अवास्तव चित्रणाच्या नेमक्या उणिवांवर त्यांनी बोट ठेवले. साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात मराठे अभावानेच दिसतात, त्याचप्रमाणे इतिहाससंशोधनाच्या क्षेत्रात त्यांची अनुपस्थिती विशेषत्वाने जाणवते. भावी काळात इतिहास यथार्थपणे लिहावयाचा असेल तर ब्राह्मण व मराठे यांचे इतिहाससंशोधनात संयुक्त प्रयत्न व्हावेत ही बाब त्यांनी प्रतिपादिली. व्याख्यानाच्या अखेरीस ज्याप्रमाणे आपल्या स्वतःसंबंधी आणि आपल्या कुटुंबियासंबंधी कर्तव्य करणे जरुरीचे असते; त्याचप्रमाणे आपली नागरिक कर्तव्ये पार पाडणे आवश्यक असते ही जबाबदारीची जाणीव त्यांनी सुशिक्षित मराठ्यांना करून दिली. भगवदगीतेच्या तिस-या अध्यायातील बारावा श्लोक उद्धृत करून त्यांनी असे म्हटले, “आपण नगरात राहून जी नागरिक सुखे भोगतो त्याचे आमच्या डोक्यावर ऋण असते. ते ऋण आम्ही नागरिक कर्तव्याच्या रूपाने न फेडता आम्ही नागरिक सुखे मात्र भोगीत राहू तर आम्ही शुद्ध चोरी केल्याप्रमाणे होईल. हे अपश्रेय तुम्हाला न लागो आणि तुम्हा सर्वांच्या हातून मायदेशीची सेवा घडो,” अशी शुभेच्छापर प्रार्थना करून त्यांनी आपले भाषण संपविले.
संदर्भ
१. पांडुरंग चिमणाजी पाटील, माझ्या आठवणी, मौज प्रकाशन, मुंबई, १९६४, पृ. १२३-२४.
२. तीन व्याख्याने, मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड, पुणे प्रकाशकः ल. दे. ठोसर, पुणे, १९१४. सदर पुस्तिकेत मराठा भ्रातृमंडळाच्या वार्षिक संमेलनप्रसंगी पांडुरंग चिमणाजी पाटील यांनी ‘विलायतचा प्रवास’ ह्या विषयावर १५ मार्च १९१३ रोजी दिलेले व्याख्यान, विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘सुशिक्षित मराठ्यांची कर्तव्ये’ ह्या विषयावर २० जून १९१४ रोजी दिलेले व्याख्यान व सौ. गंगाबाई खेडकर (डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या कन्या) यांनी २१ जून १९१४ रोजी ‘विद्यार्थ्यांची कर्तव्ये’ ह्या विषयावर दिलेले व्याख्यान, अशी तीन व्याख्याने समाविष्ट केलेली आहेत. प्रस्तुत प्रकरणातील उल्लेख शिंदे यांच्या व्याख्यानातील पुस्तिकेच्या पृ. १८ ते ३५ मधील आहेत.