डॉ. गो. मा. पवार यांच्या स्नेहापोटी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विनंतीनुसार मोठ्या आनंदाने मी ही प्रस्तावना लिहीत आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे एवढे सविस्तर, सांगोपांग, समतोल, गौरवपर पण त्याच वेळी तटस्थ आणि अस्सल साधनांवर आधारलेले हे पहिलेच चरित्र कर्मवीर जाऊन जवळ जवळ अर्धशतकाचा काळ होऊन गेल्यानंतर का होईना प्रसिद्ध होत आहे. अशा ग्रंथाला प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने महर्षींना आदरांजली वाहण्याची संधी मला मिळत आहे याबद्दल डॉ. पवार आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचे मी आभारच मानतो.
या प्रस्तावनेत प्रस्तुत चरित्राबद्दल व चरित्रनायकाबद्दल मी वेळोवेळी माझी मूल्यमापनात्मक विधाने अत्यंत संक्षेपाने व नम्रपणे वेळोवेळी मांडली आहेत. प्रस्तावनेच्या शेवटच्या विभागात माझे स्वतःचे महर्षींच्या जीवनाबद्दलचे आकलनही विनीत भावाने सादर केले आहे. तरीसुद्धा ही प्रस्तावना प्राधान्येकरून वर्णनात्मक आहे; विश्लेषणात्मक नाही याची नोंद वाचकांनी कृपया घ्यावी. डॉ. पवार यांनी महर्षींचे जीवन कसकसे, कोणत्या सूत्रांनुसार आणि कोणत्या पद्धतीने उलगडून दाखविले आहे हे बहुतांशी त्यांच्याच शब्दांत मी स्पष्ट केले आहे. एवढ्या मोठ्या समाजधुरिणाच्या एवढ्या मोठ्या चरित्राचा आशय थोडक्यात सादर करण्यात जर मी थोडाफार यशस्वी झालो तर बहुसंख्य आणि त्यातही नव्या पिढीच्या वाचकांना ती गोष्ट सोयीची होईल याच आशेने मी हे लिखाण करत आहे.
१
गेल्या दोन दशकांमधील महाराष्ट्राचा साक्षेपी वेध घेणा-या अभ्यासकांमध्ये एका गोष्टीविषयी एकवाक्यता आढळते. ती म्हणजे महर्षी रामजी शिंदे यांच्या असाधारण अशा सर्वगामी कार्याची आपण आजवर केलेली उपेक्षा. याचा उलगडा करण्याचा यत्न जाणत्यांनी वेळोवेळी केला आहे. उदाहणार्थ, डॉ. वि. भि. कोलते ह्यांच्या मते या उपेक्षेची मीमांसा अनेक दृष्टींनी करता येईल. “ज्या मराठा समाजात ते जन्मले तो त्यांच्याविषयी उदासीन आहे. ज्या दलित समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले त्याला त्याचे महत्त्व कळत नाही आणि राजकारणात ब्राह्मणेतर पक्षाशी सूत न ठेवता ज्या राष्ट्रीय पक्षाला ते मिळाले त्यांच्या महाराष्ट्रीय वारसदारांनी सोयिस्कर रीतीने त्यांची उपेक्षा चालविली आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रात अण्णासाहेबांची कामगिरी अगदीच उपेक्षणीय आहे असे नाही, पण खास पुण्यात भरणा-या साहित्य संमेलनांच्या व्यासपिठावरून जेथे अतिसामान्य व्यक्तिंच्या चोपड्यांचा आवर्जून गौरव केला जातो तेथे आण्णासाहेबांच्या किंवा त्यांच्या वाङ्मयीन कामगिरीचा नुसता उल्लेखही होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव आहे.” अण्णासाहेबांचे अस्पृश्योद्धाराचे कार्य स्पृश्य आणि त्यातूनही वरिष्ठ वर्णांना मनापासून रुचण्यासारखे होते असे नाही तर अस्पृश्यांमध्ये राजकारणाचे नवीन वारे शिरल्याने तेही शिंद्यांची उपेक्षा करू लागले अशी डॉ. कोलते यांची मीमांसा आहे. (कोलते, पृ. २-३).
डॉ. ध. रा. गाडगीळ यांच्या मते कर्मवीरांचे ‘ब-याच अंशी विस्मरण’ झाल्याची कारणे धर्मकारण, संशोधन, अस्पृश्यतानिवारण आणि राजकारण या चारही क्षेत्रांत पुढीलप्रमाणे आहेत. त्यांच्या मते, “आपल्या आयुष्यात कोणत्याच प्रचलित विचारात अथवा कार्यप्रवाहात कर्मवीर शिंदे पूर्णपणे समरस झालेले दिसत नाहीत.” धर्मकार्यात महाराष्ट्रात ब्राह्मोसमाज राहोच, पण त्याची विशिष्ट मराठी आवृत्ती प्रार्थनासमाज यासही कधी महत्त्व प्राप्त झाले नाही. इतिहास व भाषाशास्त्र या दोन्ही क्षेत्रांत कर्मवीर शिंदे यांच्या चिकित्सक, सखोल व स्वतंत्र विद्वतेची खोली व बुद्धीची चमक आपल्याला जाणवते. पण त्यांचे हे लेखन “प्रसंगोपात, वेळात वेळ काढून केलेले... मधून मधून कोठेतरी प्रकाशित झाले असल्यामुळे” त्याचे वजन पडले नाही. डॉ. गाडगीळांच्या मते, “त्या वेळचे मान्यवर संशोधक व विचारांची रूढ दिशा याबाबतचे बरेचसे लिखाण टीकात्मक असल्यामुळे त्याची उपेक्षा झाली हेही घडले असावे.” कर्मवीरांच्या कार्याचा अस्पृश्यतानिवारण हा गाभा होता. पण “त्यांच्या या कार्याच्या पूर्वार्धात स्पृश्य समाजाची फारशी सहानुभूती व मदत त्यांस मिळाली नाही. पुनरुज्जीवित सत्यशोधक समाजाची दृष्टी ब्राम्हणांवरील हल्ल्यात केंद्रित झाली व महात्मा जोतीबांच्या कार्याच्या या दुस-या बाजूकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. पुढील काळात स्पृश्यांची वृत्ती व त्यांच्या कार्याची गतिमानता यांबद्दल अधिकाधिक निराशा उत्पन्न झाल्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील अस्पृश्यांनी चढाऊ धोरण व स्वावलंबी मार्ग पत्करला आणि शिंदे साहजिकच बाजूला पडले. राजकरणातही तीच गत झाली.
“कर्मवीर शिंदे यांचा पिंड राजकरणी दिसत नाही. ....परंतु ब्राह्मणेतरांचा सवतासुभा ज्यायोगे होईल असे काही करू नये, असे म्हणणा-याला त्या वेळेस मान्यता न मिळणे साहजिक होते आणि जे तरुण त्यांच्या विचाराशी सहमत होते त्यांचा कल मार्क्सवादाकडे वळल्यामुळे श्री. शिंदे यांच्या व्यापक भूमिका त्यांस पटणे शक्य नव्हते.’’ (मंगुडकर; १९६३, पृ. ७-८). ही झाली कर्मवीर का उपेक्षित राहिले याची डॉ. धनंजयराव गाडगीळ यांची मीमांसा. (गाडगीळ, पृ. ७-१०).
कर्मवीर शिंदे यांच्या जीवनाचे मर्म व वर्म उलगडताना श्री. रा. ना. चव्हाण यांच्या मते कर्मवीर उपेक्षित राहिले याचे कारण म्हणजे त्यांनी “कोणालाच सर्वांशी प्रमाण किंवा सर्वांशी अप्रमाण मुळीच मानले नाही..... सत्य हे बहुमतमान्य व लोकमान्य नसते, तरी त्याची साधना त्यांनी सोडली नाही. सत्यासाठी ते एकाकी (अलग-अस्पृश्य!) देखील होत.... विग्रह घेण्याच्या मागे त्यांची जी मौलिक दृष्टी व स्वतंत्र वागणूक झाली, हीच महत्त्वाची ठरते..... तटस्थतेत व त्रयस्थतेत त्यांनी विषाद मानिला नाही. व लोकरंजन व लोकाराधना केली नाही. प्रामाणिक मतभेद झाल्यामुळे व स्वशोधित स्वत:चे पण तात्त्विक सत्यच महत्त्वाचे मानण्याची आग्रही, हट्टी म्हणजे अशा स्वरूपाची सत्याग्रही प्रवृत्ती त्यांच्यात असल्यामुळे मतभेद विकोपाला जाऊन त्यांना जीवनात जबर किमती द्याव्या लागल्या व त्यांनी त्या दिल्या. हेच त्यांच्या जीवनाचे मर्म व वर्म होय, एवढेच नव्हे तर तत्त्वप्रधान मतभेद हाच पाया व शिखर ठरले. ...यामुळेच त्यांचे सारेच जीवन गतिमान व क्रांतिकारक झालेले आढळते..... (त्यांचे विग्रह व तटस्थता) ही सर्व त्यांचा मनोनिग्रह व त्याग दाखवते व ‘ग्यानबाची मेख’ या त्यांच्या हट्टी (!) व आनुष्ठानिक आग्रही स्वभावातच शोधता येते व शोधिली पाहिजे. त्यांची उपेक्षा म्हणजे भारतीय जटिल अस्पृश्यतेच्या चिवट प्रश्नाची व समस्येची उपेक्षा ठरते.” (चव्हाण, पृ. ३०-५६).
न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या मते “महर्षी फार पूर्वी जन्माला आले. ते द्रष्टे सेनानी होते. परंतु त्यांच्या विचारांची आणि तत्वज्ञानाची झेप फार उंच आणि लांब पल्ल्याची होती. ती समाजाला त्या काळी पेलण्यासारखी नव्हती. समाजाचे नेतृत्व करणा-या माणसाने समाजापुढे नेहमीच असले पाहिजे. परंतु त्यानं किती पुढे असावे, याला मर्यादा असते. तो समाजाचा वाटाड्या असावा. त्याने दृष्टिक्षेपापलीकडे जाता कामा नये. तो तसा गेला तर मार्गदर्शनाचे कार्यच संपुष्टात येते. शिंद्यांचे जवळ जवळ असेच झाले.’’ (सावंत, पृ. ६-८).
महर्षी शिंदे हे उपेक्षित महात्मा का राहिले ह्याची अगदी अलीकडील भेदक व विचारदर्शक मांडणी भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी केली आहे. त्यांच्या विवेचनानुसार महर्षींनी “त्यांनी ऐतिहासिक कार्य केलं, तथापि आपण इतके कर्मदरिद्री व करंटे ठरलो की त्यांच्या क्रांतिकारक सामाजिक विचाराचा आणि आचाराचा आशयच आपण ओळखू शकलो नाही. मराठा समाज त्यांच्याबाबतीत इतका अनुदार आणि असहिष्णू वृत्तीने वागला की त्याने त्यांना ‘महार शिंदे’च मानलं आणि त्या वेळी अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणा-या ज्या समाजासाठी त्यांनी आयुष्याची अक्षरशः बाजी लावली व आई, वडील, पत्नी, बहिणी व मुलेबाळे घेऊन महारवाड्यात आपले बि-हाड केले त्या समाजाला त्यांच्या रक्तामांसाचे नेतृत्व मिळाल्यानंतर त्या वर्गाने अण्णासाहेबांचा दुस्वास करायला सुरुवात केली. तशातच ज्या जाणत्या वर्गाला अण्णासाहेबांच्या कार्याचं महत्त्व समजत होतं, त्या वर्गाला त्यांचं कार्य नको होतं.” (पाटील, पृ. ४).
खुद्द प्रस्तुत चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार महर्षी कोणत्याच मतांशी, पक्षांशी, चळवळींशी तादात्म्य पावले नाहीत. “कारण अशा तादात्म्यामुळे स्वतःच्या मतांना मुरड घालण्याची पाळी येते. शिंदे यांच्या भूमिकेत ही गोष्ट बसणारी नव्हती.’’ (पृ. २६८). म्हणूनच, “ज्या ज्या कामामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणतीही लौकिक स्पृहा मनात न ठेवता स्वतःला समर्पित केले त्या संस्थेमधून बाहेर पडण्याचे, तिच्याशी फारकत घेण्याचे दुर्धर, शोकात्म प्रसंग शिंदे यांच्या आयुष्यात येत राहिले.’’
ब्राह्मणेतर समाजातर्फे २३ एप्रिल १९२५ रोजी महर्षींना पुण्यामध्ये मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी उत्तरादाखल बोलताना स्वतः श्री. शिंदे यांनी “मी माझ्या मुख्य किंवा आनुषंगिक कार्यामध्ये कोणत्याही एका पक्षाच्या अथवा पंथाच्या अधीन झालो नाही. माझा पक्ष केवळ परमेश्वराचा आणि माझी सदसद्विवेकबुद्धी माझा प्रतोद. मला माहीत आहे, की अशा प्रकारचा मनुष्य कोणालाही खूष ठेवू शकत नाही’’ असे उद्गार काढले होते हे आपण विसरता कामा नये.
माझ्या मते तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात इतरांनीही आपापल्या भूमिका, कार्यक्रम व हितसंबंध यांच्याविषयी आग्रही राहून आपापल्या अग्रक्रमांनुसार कर्मवीरांशी त्या त्या वेळी फारकत घेतली तर ऐतिहासिक विकासक्रमाच्या गतिशास्त्राप्रमाणे समजूनही घेता येते. पण त्या त्या स्थळकाळाचे संदर्भ ओसरल्यानंतरही पुढच्या पुढच्या पिढ्यांनी महर्षी शिंदे यांच्याविषयीचे पूर्वग्रह, किंतू, दुरावा व उपेक्षा सोडू नये यात मात्र ऐतिहासिक दृष्टीचा आपल्याकडे सर्रास आढळणारा अभावच दिसून येतो. आपापल्या जन्मजात जातवर्गाच्या अहंकारातून व हितसंबंधांतून मुक्त होऊन ऐतिहासिक सत्य व सामाजिक वास्तव यांना मुक्तिशील लोकहितपर भूमिकेतून सामोरे जाणे हे किती अवघड असते हीच गोष्ट या उदाहरणाने स्पष्ट होते. आपण जोवर सर्वांगीण सम्यक व सत्यनिष्ठ मुक्तीची दृष्टी स्वीकारणार नाही तोवर कर्मवीर शिंदे यांच्यासारखा महात्मा व महापुरुष उपेक्षेच्याच कक्षेत वारंवार ढकलला जाईल असेच चित्र आज तरी दिसते.
महर्षींचे विस्तृत असे चरित्र आजवर सिद्ध होऊ शकले नाही याचे कारण कोणत्या परिस्थितीत दडलेले असावे एवढ्याकरिता त्यांना भोगाव्या लागलेल्या उपेक्षेची त्रोटक का होईना एवढी मांडणी करावी लागली.
२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनाविषयी तसेच विचारधनाविषयी आजवर उल्लेखनीय असे काहीच लिहीले गेले नव्हते असा मात्र उपरोक्त प्रतिपादनाचा अर्थ नाही. प्रस्तुत प्रस्तावनेच्या म्हणजेच कर्मवीरांचे जीवन, व्यक्तिमत्त्व व कार्य यांच्याचपुरत्या मर्यादित संदर्भात बोलावयाचे म्हटले तर १९३० पासून ते थेट आजवर त्यांची अनेक छोटी-मोठी चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. कृष्णराव भाऊराव बाबर (१९३०), डॉ. गंगाधर मोरजे (१९७३), प्रा. संभाजीराव पाटणे (१९७६), डॉ. मा. प. मंगुडकर (१९७६), डॉ. ह. कि. तोडमल (१९८६), डॉ. भि. ना. दहातोंडे (१९९५), श्री. ए. के. घोरपडे गुरुजी (१९९८) व अगदी अलीकडे श्री. अनंतराव पाटील (१९९९) आणि ऍड. पी. के. चौगुले (१९९९) आदींनी महर्षींच्या चरित्र व कार्याचा लक्षणीय परामर्श घेतलेला आहे. १९९० साली प्रा. एम्. एस्. गोरे यांनी कर्मवीरांच्या कार्याचा परिचय एका इंग्रजी ग्रंथातही सादर केला आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखक डॉ. गो. मा. पवार यांनीच १९९० साली नॅशनल बुक ट्रस्टकरिता अठ्ठावन्न पानांची एक पुस्तिका लिहिली होती. तिचा इंग्रजी अनुवादही (२०००) उपलब्ध आहे.
इतके असूनही महर्षींचे अगदी सविस्तर, सर्वगामी, सखोल व चिकित्सक असे चरित्र आजवर उपलब्ध नव्हते. ही उणीव सामान्य वाचक, कार्यकर्ते आणि विचारवंत यांना चांगलीच खटकत होती. ही मोठी उणीव डॉ. गो. मा. पवार यांच्या प्रस्तुत ग्रंथाने फार जिव्हाळ्याने, कसोशीने आणि व्यासंगनिष्ठ पद्धतीने दूर केलेली आहे. कर्मवीरांचे हे चरित्र विस्तृत, अस्सल साधनांवर आधारलेले व विचारप्रवर्तक आहे, याविषयी दुमत होण्याची शक्यता मला तरी फार दिसत नाही.
या चरित्राचे दोन विशेष प्रकर्षाने जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही चरित्रकाराला भेडसावणा-या एका पेचातून डॉ. पवार यांनी अगदी स्पष्ट भूमिका घेऊन चांगलीच वाट काढली आहे. पेच असा की, त्या त्या स्थलकालाचा यथासांग तपशील न देता नुसताच चरित्रपट रेखाटला तर मांडणी सूत्रमय दिसते व ग्रंथ आटोपशीर होतो. पण यातली अडचण अशी असते की तत्कालीन इतिहासाचे ज्ञान असलेला जाणता अभ्यासवर्ग सोडला तर इतरांना असा ग्रंथ रोचक वाटला तरी दुर्बोध ठरतो. मुख्य म्हणजे त्यामुळे चरित्रव्यक्तीची त्या त्या वेळची विवक्षित निवड व वर्तन यांचे मर्म सामान्य वाचकाच्या आटोक्यात येत नाही. याउलट चरित्रव्यक्तीच्या जीवनक्रमाचा उलगडा तत्कालीन स्थलकालाच्या दमदार चित्रणातून करावयाचा म्हटला तर ग्रंथाची गुणवत्ता वाढते पण त्याचा विस्तार घसघशीत आकार घेतो. यामुळे जाणत्या अभ्यासकांना या सर्वपरिचित (!) गोष्टींचा एवढा प्रपंच का मांडला गेला आहे, असे वाटू लागते. तर दुसरीकडे एवढा मोठा ग्रंथविस्तार नव्याने विषयप्रवेश करणा-यांचा हिरमोडही करू शकतो.
डॉ. पवार यांनी यांपैकी दुसरा पर्याय डोळसपणे पण निर्धाराने स्वीकारला आहे. तरुण पिढीतील सामान्य वाचक व कार्यकर्ते या निवडीचे स्वागतच करतील, याविषयी मला शंका नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसारखी मातब्बर संस्था पाठीशी असल्यामुळेच डॉ. पवार यांना असले धाडस जमले असेल. त्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानावेत तेवढे अपुरेच ठरतील. पण त्याच वेळी असा ग्रंथविस्तार फापटपसारा ठरणार नाही, याकरिता लेखकापाशी सम्यक दृष्टी, विकारनिरपेक्ष तटस्थता, अस्सल साधनांवर आधारलेला निखळ व्यासंग आणि रसाळ व चित्रमय निवेदनशैली हवी. डॉ. पवार याबाबतीत उणे पडत नसल्याने हे चरित्र एकाच वेळी मनोवेधक तसेच विचारप्रवर्तक असे ठरणार आहे.
दुसरा विशेष म्हणजे डॉ. पवार यांनी महर्षींच्या अतिशय समृद्ध व बहुआयामी विचारधनाची त्यांच्या चरित्राइतकीच विस्तृत व चिकित्सक मांडणी करण्याचा मोह या ग्रंथात टाळला आहे. ही पण एक पेचाचीच बाब होती. पुढच्या अनेक पिढ्यांना वारंवार दखल घ्यावी लागेल एवढा संपन्न वैचारिक वारसा श्री. शिंदे यांच्या विविध लिखाणांत उपलब्ध आहे. तो बाजूस ठेवला तर कर्मवीरांच्या महत्तेचे पूर्ण स्वरूप आपल्याला उमजणार नाही. पण त्यांच्याविषयीच्या विस्तृत चरित्राची उणीव प्रथमतःच भरून काढावयाची ठरविल्यावर डॉ. पवार यांना त्यासाठी दुस-या खंडाची जोड द्यावी लागली असती. हे कार्य स्वत: डॉ. पवार यांना किंवा अन्य कोणाला केव्हातरी करावेच लागेल. पण प्राप्त परिस्थितीत डॉ. पवार यांनी श्री. शिंदे यांच्या लिखाणाचा चिकित्सक परामर्श प्रस्तुत ग्रंथात घेतला नाही, ही गोष्ट मला तरी समर्थनीय वाटते.
चरित्रलेखनाविषयी डॉ. पवार यांनी घेतलेले परिश्रम आपल्याला लगेच जाणवतात. कर्मवीरांसंबधीच्या हस्तलिखित सामग्रीचा धांडोळा त्यांनी चिकाटीने घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील मँचेस्टर कॉलेजमधील ग्रंथालयात श्री. शिंदे यांच्या कॉलेजप्रवेशाच्या तारखेची नोंद व सही असलेले रजिस्टर, श्री. शिंदे यांनी पाठविलेली डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माहितीसंबंधीची पुस्तिका, त्यांचे गुरू प्रो. कार्पेंटर यांच्याशी श्री. शिंदे यांचा झालेला पत्रव्यवहार, पॉझ व मार्टिनो क्लब या वादविवादसंस्थांची वृत्तान्त पुस्तके व त्यामुळेच “धर्मप्रसाराच्या कार्यात स्त्रियांना सहभागी करून घेतले तर ते काम अधिक जोमाने चालेल’’, असा श्री. शिंदे यांनी पॉझ क्लबमध्ये मांडलेला ठराव आणि त्या कॉलेजमधील प्रथेप्रमाणे श्री. शिंदे यांच्यावरील कविता व त्यांचे एका समकालीनाने ‘कॉलेज ब्यूटी’ या नावाने काढलेले व्यंगचित्र हस्तगत करू शकले.
समकालीन इंग्रजीच नव्हे तर आपल्या हितचिंतकांच्या साहाय्यामुळे डॉ. पवार यांनी फ्रेंच व डच वृत्तपत्रे, नियतकालिके व ग्रंथ यांचाही अस्सल चरित्रलेखनाकरिता चांगलाच तलास घेतला आहे. त्यामुळेच इंग्लंडमधील युनिटेरिअन चर्चमध्ये श्री. शिंदे यांनी चालविलेल्या उपासना व केलेली भाषणे, कर्मवीरांनी हिंदू गृहस्थितीबद्दल दिलेले व्याख्यान व सादर केलेला नाट्यप्रयोग, ऍमस्टरडॅममधील १९०३ च्या युनिटेरिअन जागतिक त्रैवार्षिक परिषदेत श्री. शिंदे यांनी केलेल्या प्रभावशाली भाषणाचे वृत्तान्त, त्या संदर्भात शिंदे यांच्या फोटोसह डच वृत्तपत्रात आलेली माहिती, तसेच ३० ते ३२ इंग्रजी ग्रंथालयांतून श्री. शिंदे यांनी उल्लेखिलेल्या युनिटेरिअन धर्मपुरुष व संस्था यांच्याबद्दलची माहिती प्रस्तुत चरित्रात प्रतिबिंबित होऊ शकली.
विशेष म्हणजे श्री. शिंदे इंग्लंडमधील एकूण सतरा शहरी आणि त्याच्याच जोडीला ऍमस्टरडॅम, पॅरिस, रोम व पाँपी या नगरात जिथे जिथे गेले तिथे तिथे (म्हणजे विद्यापीठीय व महाविद्यालयीन ग्रंथालये, सार्वजनिक वाचनालये, वस्तुसंग्रहालये व प्राणिसंग्रहालये, वने, उपवने, उपहारगृह, इतकेच नव्हे तर पॅरिसमधील ‘पेर ला शाज’ ही स्मशानभूमी व अन्य प्रेक्षणीय स्थळे) डॉ. पवार आवर्जून जाऊन आले. मुळात डॉ. पवार साहित्याचे रसिक व व्यासंगी प्राध्यापक व समीक्षक, रसाळ लेखक व त्यातही वरील खटाटोप. त्यामुळे कर्मवीर शिंदे यांच्या इंग्लंडमधील वास्तव्याचे व युरोपमधील प्रवासाचे प्रत्ययकारक, चित्रमय व लोभस असे रूप या चरित्रग्रंथातून आपल्यापुढे साकार होते.
महर्षींच्या प्रदीर्घ चरित्रलेखनाचे शिवधनुष्य डॉ. पवार यांनी सहजपणे पेलले आहे. त्याचे त्यांच्या उपरोक्त परिश्रमाच्या जोडीला आणखी एक कारण आहे. डॉ. पवार हे कर्मवीरांच्या जीवनाचा व विचारधनाचा गेली अनेक दशके मागोवा घेत आलेले आहेत. महर्षींचे चिरंजीव श्री. प्रतापराव शिंदे हे डॉ. पवार यांचे सासरे. श्री. प्रतापरावांच्या संग्रहात असलेल्या मोठ्या रोजनिशांचे साक्षेपी व काटेकोर असे संपादन डॉ. पवारांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी या नावाने १९७९ च्या प्रारंभीच ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले होते. महर्षी शिंदे यांच्या “असाधारण व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारी ही रोजनिशी’’ डॉ. पवार यांच्या ४७ पानी प्रस्तावनेमुळे अधिकच खुललेली आहे. डॉ. पवारांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या रोजनिशीचे वाङ्मयीन मूल्यही तिच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांच्याच जोडीला वाचकांच्या प्रत्ययाला येत असते. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महर्षी वि. रा. शिंदे जन्मशताब्दी समारोह समितीने श्री. शिंदे यांच्या ग्रंथसंपादनाचे कार्य ज्या संपादक मंडळावर सोपविले त्याचे डॉ. पवार हेही एक घटक होते. याच मंडळाने १९७६ च्या एप्रिलमध्ये कर्मवीरांच्या भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा व १९७९ च्या फेब्रुवारीमध्ये धर्म, जीवन व तत्त्वज्ञान हा असे दोन ग्रंथ संपादून प्रसिद्ध केले. यानंतर मागेच नमूद केल्याप्रमाणे डॉ. पवार यांनी नॅशनल बुक ट्रस्टकरिता विठ्ठल रामजी शिंदे यांचे ट्रस्टच्या याबाबतीतील रिवाजाप्रमाणे ५८ पानांचे एक छोटेखानी पण फार मार्मिक व सुबोध असे चरित्र लिहिले. केवळ सात प्रकरणात महर्षींच्या जीवनकार्याचे रेखीव चित्रण केल्यानंतर आठव्या प्रकरणात केवळ सहा पानात महर्षींच्या ‘संशोधनकार्य आणि साहित्यसेवा’ या क्षेत्रातील असाधारण गुणवत्तेवर त्यांनी अचूक बोट ठेवले आहे. अशा प्रकारे चरित्रलेखनाकरिता घेतलेल्या परिश्रमाला एवढ्या प्रदीर्घ आणि आस्थापूर्ण अभ्यासाची जोड लाभल्याने प्रस्तुत चरित्राला चांगलेच वजन लाभले आहे.
३
डॉ. पवार यांनी या चरित्राचा पोत मोठ्या कुशलतेने गुंफला आहे. महर्षी शिंदे यांचा जीवनपट एकूण पाच परिवर्तनांतून उलगडत गेला, असे त्यामागचे सूत्र आहे. डॉ. पवार यांच्या मांडणीनुसार कर्मवीरांच्या आयुष्याचे पाच कालखंड असे :
१. १८७३ ते १८९३ हा कर्मवीरांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेईपर्यंतचा आयुष्यातील पहिल्या वीस वर्षांचा कालखंड;
२. १८९३-१९०३ हा कर्मवीर ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजमधून आपला अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परततात तोपर्यंतचा दुसरा कालखंड;
३. १९०३-१९१२ हा कर्मवीर मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून धर्मप्रचारकार्याला प्रारंभ करून १९१० साली मुंबई प्रार्थनासमाजाच्या धुरिणांशी मतभेद झाल्याने प्रार्थनासमाजाचा संबंध सोडतात आणि १९१२ साली भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे मुंबई येथील ठाणे पुण्यास हालवितात तोपर्यंतचा तिसरा कालखंड;
४. १९१२-१९२३ हा कर्मवीर उपरोक्त मंडळ अस्पृश्यवर्गाच्या हाती सुपूर्द करून बाहेर पडतात तोपर्यंतचा कालखंड; आणि
५. १९२३-१९४४ हा महर्षींचे देहावसान होते तोपर्यंतचा अंतिम कालखंड.
कर्मवीरांच्या आयुष्यातील या पाच परिवर्तनांना केंद्रस्थानी मानून ही कहाणी मग आपल्या आंतरिक सुसंगतीने पुढे पुढे विनासायास सरकत जाते.
डॉ. पवार हे साहित्याचे अभ्यासक असल्याने ते एकदम पहिल्या कालखंडाकडे वळत नाहीत. श्री. शिंदे यांच्या जीवनाला वळण देणा-या दोन उत्कट, हृदयस्पर्शी आणि सारभूत घटना सादर करीत डॉ. पवार महर्षींच्या जीवनाची गुरुकिल्लीच सर्वप्रथम वाचकाच्या हातात देतात.
अन्नाची भ्रांत पडावी एवढे दारिद्र्य लहानपणी वाट्याला आलेले असताना आणि आपला बुद्धिमान व कर्तबगार मुलगा आपल्याला सुखाचे आणि समृद्धीचे दिवस दाखविणार अशी आस लागलेल्या वृद्ध आई-वडिलांना धक्का देणारा आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडे पाठ फिरवून आयुष्यभर फकिरी पत्करणारा एक निर्णय महर्षींनी १९०० च्या सप्टेंबर महिन्यात पुणे येथे घेतला. कायद्याची शेवटची परीक्षा अखेरच्या टप्प्यामध्ये आली असताना आणि घेतलेल्या निर्णयापोटी इंग्लंडला धर्मशिक्षणाला जाण्यासंबंधीच्या अटी बिकट असताना तो घेतला हे त्याहूनही विशेष. ऑक्सफर्ड येथील मॅंचेस्टर कॉलेजमध्ये दोन वर्षांच्या धर्मशिक्षणासाठी ब्राह्म व प्रार्थनासमाजांनी निवड केलेल्या श्री. मोतीबुलासा यांचे विलायतच्या वाटेवरच पोर्टसय्यद येथे अकस्मात देहावसान झाले. त्या संदर्भात उपरोक्त महिन्यात पुणे येथे शोकसभा झाली. त्या सभेचा व विशेषत: डॉ. रा. गो. भांडारकर यांच्या व्याकूळ भाववृत्तीचा परिणाम म्हणून ‘अंत:प्रेरणेच्या एका प्रबळ क्षणी‘ शिंदे यांनी आयुष्याला कलाटणी देणारा व आयुष्याचे ध्येय निश्चित करणारा निर्णय घेतला.
या घटनेसारखीच दुसरीही एक निर्णायक घटना कर्मवीरांच्या आयुष्यात ‘अशाच एका अंत:प्रेरणेच्या क्षणी‘ घडली. ती म्हणजे प्रार्थनासमाजाच्या प्रचारकपदाची जबाबदारी सांभाळत असताना २८ ऑक्टोबर १९०५ च्या मध्यरात्री भिंगार येथील अस्पृश्यवर्गाचे शिष्टमंडळ त्यांच्या जाहीर सभेसाठी श्री. शिंदे यांनी यावे म्हणून त्यांना भेटले. महारवाड्यातील सभेमुळे भारलेल्या, त्यांच्या आत्यंतिक गरिबीमुळे हळूवार झालेल्या आणि या लोकांची हजारो वर्षांची कहाणी अभ्यासून मन कातर झालेल्या कर्मवीरांनी अस्पृश्यांच्या उद्धाराच्या कामाला वेळ न दवडिता लागण्याचा संकल्प त्याच रात्री केला. त्यानुसार १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी ही संस्थाही पुढे स्थापन केली. वरील दोन्ही निर्णयाच्या मुळाशी विशिष्ट संस्कारामुळे झालेली कर्मवीरांची घडणच कारणीभूत होती, असे सांगून मगच डॉ. पवार श्री. शिंदे यांच्या मनाची घडण कशी झाली, हे समजावून घेण्यासाठी कर्मवीरांच्या आयुष्याच्या पहिल्या कालखंडाकडे वळतात.
या कालखंडाच्या सुमारे ३५ पानांच्या चित्रणाच्या अखेरीस डॉ. पवार याबाबतचे आपले निष्कर्ष ठामपणे आपल्यापुढे मांडतात. धार्मिक, सामाजिक सुधारणेसाठी आपले आयुष्य वाहून, फकिरी पत्करून एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर कार्य केले हे उदाहरण एक विठ्ठल रामजी सोडता निदान अन्य कुणाही मराठी माणसामध्ये दिसून येत नाही, असे डॉ. पवारांना वाटते. विठ्ठल रामजींच्या हातून भावी आयुष्यात जे अपवादात्मक वाटावे, असे मौलिक स्वरूपाचे कार्य घडले त्याची तयारी त्यांच्या कौटुंबिक वातावरणात झाली होती. त्यालाही त्यांच्या आई-बाबांचा धर्म आणि शील हीच कारणीभूत होती.
आपली भावी सामाजिक सुधारणा बाबांच्या भागवत धर्मातून उदय पावली असे विठ्ठल रामजी शिंदे यांना वाटे. त्यामध्ये ब्राह्मसमाजाचे ते प्रचारक झाल्यानंतरही विशेष भर पडली, असे त्यांना वाटत नव्हते. प्रार्थना अथवा ब्राह्मसमाजांचा मराठ्यांवरच नव्हे तर इतरही महाराष्ट्रीयांवर फारसा परिणाम झालेला नसताना विठ्ठल रामजी मात्र त्याचे आजीव प्रचारक झाले. ह्याचे श्रेय समाजापेक्षाही त्यांच्या वडिलांनी घालून दिलेल्या आचरणाच्या धड्याकडेच जास्त जाते.
विठ्ठल रामजींच्या मातापित्यांच्या घरात पडदानशीनपणा नव्हता की सोवळेपणा राखून जातिभेदाला थारा देणे त्यांना माहीत नव्हते. रामजीबाबांची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना मुलगा-मुलगी असा भेद न करता शिक्षण देण्यात उत्साह दाखविला होता. ही त्या काळाच्या मानाने व मराठा समाजाच्या बाबतीत अपवादात्मक गोष्ट म्हणावी लागेल. जमखंडीत पहिल्या प्रथम मुलींची शाळा स्थापन करण्यात रामजीबाबांनी सुमारे १८७० मध्येच पुढाकार घेतला होता. ब्राह्मण-लिंगायतांसारख्या ज्या जाती मराठ्यांकडे जेवत नाहीत, त्या जातीची माणसे रामजीबाबांच्या विश्वकुटुंबी घरात जेवत. न्हावी, धोबी वगैरे तसेच मुसलमानांसारख्या परधर्मींयांकडे मराठे जेवत नसत. त्या जातींच्या लोकांशीही त्यांच्या घरी पंक्तिभेद कधी घडत नसे. त्यांच्या व एका सय्यद मुसलमानाच्या दोन कुटुंबांत मोठीच समरसता निर्माण झालेली होती.
अंत:करणाचा जिव्हाळा, हेतूचा शुद्धपणा आणि अकृत्रिम प्रेम हा सर्व सुधारणांचा अटळ पाया असतो; देवाणघेवाणीच्या व्यापारी तत्त्वाने अथवा आधुनिक सुधारकाच्या शुद्ध बुद्धिवादाने ख-याखु-या सुधारणा घडत नसतात अशी विठ्ठल रामजींच्या मनाची जी धारणा पुढील काळात प्रकट होत राहिली त्याचा वस्तुपाठ त्यांना बालपणीच घरच्या घरी गिरवावयास मिळाला होता. स्वातंत्र्याची आवड, नव्या जीवनाची स्पृहा आणि सत्याचा छडा लावण्याची हौस ही विठ्ठल रामजींच्या स्वभावाची मुख्य लक्षणे लहानपणापासूनच दिसून येत होती. त्याला आळा घालण्याचा प्रयत्न विठूच्या लहानपणी आई-बाबांनी कधी केला नाही. या निष्कर्षांच्या संदर्भात “आधुनिक सुधारकाप्रमाणे जातिभेद मोडण्याची उठाठेव करण्याची आम्हांवर कधी पाळीच येत नसे. कारण तो जातिभेदाचा संस्कारच आम्हांवर घडला नव्हता’’ हे महर्षी शिंदे यांचे विधान डॉ. पवार आवर्जून आणि मोठ्या औचित्याने नमूद करतात.
श्री. शिंदे यांच्या पहिल्या कालखंडाच्या संदर्भात जमखंडीचे वातावरण, कर्मवीरांच्या दोन्ही बाजूंकडील आज्या व आजोबा, आई-वडील आणि घर इत्यादींच्या संदर्भात डॉ. पवार यांनी वेळोवेळी चित्रमय व मार्मिक रेखाटने केली आहेत. जमखंडीच्या ब्राह्मणी संस्थानामध्ये शिक्षणाला अनुकूल असलेले वातावरण, त्यांच्या एका आजोबांचा दरबारी मराठेशाही खानदानीपणा, आजोबांतली मराठ्यांची व आजीतील कर्नाटक्यांची लक्षणे, आईवर या वैष्णव ब्राह्मण संस्काराचा असलेला प्रभाव, तरी तिच्यात धर्मभोळेपणा व कर्मठपणा या दोघांचाही असलेला पूर्ण अभाव, शिंद्यांच्या दोन्ही बाजूंकडील घराण्यांचे ब्राह्मणी वळण, त्यांच्या आईवडिलांची संतोषी वृत्ती, रामजीबाबांची फार रागीट स्वाभिमानी वृत्ती तसेच त्यांच्या अकृत्रिम, साध्या व जोमदार रसवंतीचा विठ्ठल रामजींवर झालेला संस्कार इत्यादी गोष्टी डॉ. पवार बारकाईने टिपतात.
“श्री. शिंदे यांची कुलदेवता अंबाबाई, माहेरकडील आजीची कुलदेवता यल्लमा. धर्माचे पहिले संस्कार माझ्या कोमल मेंदूवर आजीच्या त्या द्राविडी देवतेने उठवले” हे त्यांचे विधान डॉ. पवार आवर्जून नोंदवतात. इतकेच नव्हे तर मोठेपणी द्राविड संस्कृतीबद्दल अनुकूल ग्रह निर्माण व्हायला त्या बालपणातील संस्काराची मदत झाली असणार असा सूचक निष्कर्ष पुढच्याच पानावर नोंदवितात.
याच्याच जोडीला रामजीबाबा वारकरी संप्रदायाशी समरस झाले होते. विठ्ठल रामजींच्या धार्मिक विकासावर त्यांचा मोठा परिणाम झाला. पण मध्यंतरी बबलादीच्या लिंगायत स्वामींचे प्रस्थ व देवधर्माचे कर्मकांड फार वाढले. विविध पंथांच्या अतिथी-अभ्यागतांच्या ‘टोळधाडी‘ मुळेच मिळकत सुटलेली म्हणून सुखवस्तूपणा जाऊन रामजीबाबांच्या हाती भयंकर दारिद्र्य आले. पण घरच्या शेतकरी पेशाकडे न जाता कारकुनी शिक्षण घेऊन प्रथम शिक्षक व नंतर संस्थानी कारभारात भाग घेतलेल्या रामजीबाबांनी आपला प्रतिष्ठितपणा शाबूत ठेवला होता. त्यामुळे ह्या दारिद्र्याचे सावट विठ्ठल रामजींच्या बाल्यावर पडले नाही, याची सर्व हकिगत डॉ. पवार सादर करतात.
सासूसासरे असेपर्यंत त्यांच्या आईला स्वातंत्र्य म्हणजे काय हेही माहीत न करू देणारा जाचक सासुरवास आणि वीस बाळंतपणे, मुलांचे आजार किंवा मृत्यू यामुळे आईची खचलेली शक्ती यांची आठवण डॉ. पवार जागी ठेवतात, एवढेच नव्हे तर “या सर्व करुणरसाने भरलेल्या नाटकात मुख्य नायिकेचे पात्र माझी आई साध्वी यमुनाबाई ही होय. तिची आनंदी आणि विनोदी वृत्ती हीच आमची विश्रांती होती. एकंदर आईच आमची खेळगडी होती. माझ्यामध्ये पुढे पुढे जे स्त्रीदाक्षिण्य आणि हिंदू विवाहपद्धतीसंबंधी कायमची तेढ उत्पन्न झाली, तिचे पहिले बीज ह्या आईच्या खडतर सासुरवासातच आहे. निसर्गाच्याही आधी आपण पहिले हृदयदान दिले ते आईला” , अशी विठ्ठल रामजींनी स्वत:च प्रकट केलेली निरीक्षणेही डॉ. पवार योग्य त्या जागी वेळोवेळी नोंदवून ठेवतात. स्त्रीची महती विठ्ठल रामजींना जाणवली ती आपल्या आईमुळेच असे ते साररूपाने सांगतातही.
तिस-या प्रकरणात विठूच्या आयुष्यातील १८८५ ते १८९१ अखेरच्या आयुष्यातील काळातील सात वर्षांचा समाचार डॉ. पवार घेतात. वडीलभावाच्या अकाली मृत्यूमुळे अकराव्या वर्षीच विठ्ठलाचा बनलेला गंभीर, विचारी व अभ्यासी स्वभाव, त्याची तीव्र ग्रहणशीलता आणि तरल संवेदनशीलता, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा आणि साहित्याचा झालेला उत्तम परिचय इत्यादी गोष्टींचा निर्देश यात येऊन जातो. “आपण जातीने मराठा म्हणून शास्त्रीबुवांनी (श्री. गणेशशास्त्री जोशी) कधीही भेदभाव दाखविला नाही, असे विठ्ठल रामजींनी आवर्जून नमूद केले आहे” हीही गोष्ट डॉ. पवार आपल्यापुढे ठेवतात.
हायस्कूलमध्ये विठ्ठल रामजींनी अभ्यासात जी गती दाखविली तिचे श्रेय त्यांनी आपल्या रसिकतेला दिले आहे; बुद्धिमत्तेला नव्हे. त्यांनीच म्हटले आहे की, “(नानाविध विषयांत) माझी गती सारखीच अकुंठितपणे चाले. सर्व हायस्कूलच्या अभ्यासक्रमात मला अभ्यासाचे श्रम म्हणून कधी भासलेच नाहीत. ह्याचे कारण माझ्या बुद्धीचे तेज नसून (मी बुद्धीने साधारण आहे) केवळ माझ्या हृदयाची निर्मळ रसिकताच होय, हे येथे मला नमूद करावयाचे आहे. ही रसिकता मला शाळेपेक्षा घरातच अधिक, गुरूपेक्षा माझ्या आई-बापांकडूनच जास्त मिळाली हे खास. माझ्या घरी जातिभेद नव्हता, तसा माझ्या हृदयात संस्कृतिभेदाचा किंवा पक्षपाताचा कृत्रिमपणाही नव्हता. सौंदर्य जेथे भेटेल तेथे ऊर्ध्वहस्ताने स्वीकारण्यास मी लहानपणापासूनच एका पायावर तयार आहे. मग ते इंग्लंडातले असो, शहरातले असो की, खेड्यातील असो, संस्कृत असो की प्राकृत असो, ते सहज व स्वाभाविक असले की पुरे. मी त्याला बिलगलोच म्हणून समजावे.” उतारा मोठा अतीव नितळ व मनोज्ञ आहे.
“तिस-या इयत्तेपासून सातवीअखेर पाच वर्षापर्यंत त्यांचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार वसतिगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना होता“ हे कर्मवीरांनी स्वत:च केलेले वर्णन उदधृत केल्यावर डॉ. पवार हे विठ्ठलच्या खेळगड्यांत सर्व जातींचे विद्यीर्थी असत, जातिभेद त्यांच्या गावी नव्हता, सोवळी पोरे ह्या कंपूच्या वा-यालाही उभी राहत नसत, विठ्ठल रामजींच्या भावी चरित्राची, समाजसुधारणेची ही पूर्वचिन्हेच होती, त्यांचे चरित्र असे अंगणातल्या जिवंत धांगडधिंग्यात आणि समानशील सवंगडयांच्या धसमुसळेपणाच्या जिव्हाळ्यात जन्म पावत होते, असा निष्कर्ष आपल्या हातात देतात. त्याच वेळी लहान विठ्ठलाच्या वर्तनातील वेगळेपणा, धाडशीपणा, विक्षिप्तपणा, कधी कधी ‘अर्कटपणा,’ काही अतिरेक आणि व्यक्तिगत व सामुदायिक खेळांचे आणि व्रात्यपणाचे कितीतरी प्रकार यांचा उल्लेखही टाळत नाहीत.’ ही स्पार्टन सहिष्णुता आपाल्यात जन्मजात नसून ती मानीपणाने आणल्याचे’ कर्मवीरांनी नमूद केले असून पुढे इंग्लंडमधील मुक्कामातही धाडसाची आणि विक्षिप्तपणाची लकेर त्यांच्या पुढच्या आयुष्यातही अनेकदा चमकून जाताना दिसते, असे डॉ. पवार सांगतात.
पण याही वयात एकाकीपणे निसर्गात रममाण होण्याची व स्वत:मध्येच गुंग होऊन जाण्याची विठ्ठलाची वृत्ती दिसून येत असे. त्याच्या कल्पनाशील व भावनामय वृत्तीला चौफेर व विपुल अशा अवांतर वाचनाची जोड मिळाली. त्यामुळे त्यांच्या मराठी व कानडी भाषेच्या अभ्यासालाही मोठी मदत झाली. निसर्गाच्या विविध विभ्रमात रंगून जाता जाताच इंग्रजी तिस-या-चौथ्या इयत्तेत असताना वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी आपल्या भावनाशील अंत:करणात स्पष्टरूपाने भक्तिभावनेचा उद्रेक झाल्याचे विठ्ठल रामजींना जाणवले. श्री. शिंदे स्वत:च लिहितात की, “ आईच्याच पुण्यप्रभावाने माझ्या हृदयाचा परिपाक प्रथम धर्माच्या भक्तिरसात व नंतर तत्वज्ञानाच्या शांतरसात झाला.” अर्थातच हा काल व वय यांचा प्रारंभ. आई-बाबांच्या साध्या, सहज आणि निर्हेतुक धर्मभावनांमध्ये आपल्या भावी धर्माचा आणि सामाजिक सुधारणांचा उगम असल्याचे त्यांना जाणवले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंतचा काळ अशा प्रकारे कर्नाटकामध्ये गेला. कर्नाटकाशी असलेले संबंध पुढील काळातही अखंड, घनिष्ठ व जिव्हाळ्याचेच राहिले. या संदर्भात मला स्वत:ला एक गोष्ट येथे नमूद कराविशी वाटते. कन्नड संस्कृतीचा खोल ठसा शिंदे यांच्या विचारांवर झाला यात शंकाच नाही आणि हा प्रभाव आपणा सर्वांनाच यापुढेही सतत विचारप्रवर्तक व उपकारक ठरणार आहे.
भारतीय इतिहास व संस्कृती आणि त्या चौकोटीत महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व भाषाव्यवहार यांची निकोप, समतोल व अभिनव (ओरिजिनल) मांडणी करण्याच्या दृष्टीने शिंद्यांना संस्कारक्षम वयातील कन्नड संस्कारांचा लाभ तर झालाच पण ह्या विचारांच्या अभ्यासकांनाही अप्रत्यक्षपणे का होईना, यापुढेही सतत होत राहील.
हा कालखंड वैचारिक दृष्टिकोणांच्या संदर्भात प्रामुख्याने प्राचीवादाचा होता. बहुतेक सर्व पंडितांची दृष्टी विविध योग्यायोग्य कारणांमुळे उत्तरेभोवती, आर्यांना केंद्रस्थानी मानणारी आणि संस्कृत भाषासाधनांवरच खिळलेली होती. अशा काळात उपजत व सहजी प्राप्त झालेल्या संस्कारामुळे आणि नंतर त्यात प्रथम कन्नड व पुढे पाली भाषांच्या अभ्यासाची जोड मिळाल्याने विठ्ठल रामजींचे पुढच्या काळातील चिंतन आणि धर्मशास्त्रीय व समाजशास्त्रीय लेखन यामध्ये सतत दक्षिणेचा, आर्येतर समूहांचा आणि द्राविड परंपराचा पोत जिव्हाळ्याने व प्रगल्भपणे गुंफला गेला. त्यांनी आपल्याकडील विविध भाषिकसंबंधांची जी मांडणी केली त्यावरही याचा ठसा चांगलाच उमटला गेला आहे.”मराठीचा जन्म व तान्हेपण कोठे आणि कसेही होऊन गेले असो, तिचे सर्व वर्धन, शील, कौमार्य... खास कर्नाटकांतच बनले” असे त्यांचे मत झाले होते. (शिंदे लेखसंग्रह, संपा. मंगुडकर, पृ. १६७). विविध धार्मिक, सांस्कृतिक संप्रदाय तसेच जातिसंस्था व जाती यांची मांडणी करतानाही शिंद्यांना वरील वारशाचा लाभ झाला. ”मी स्वत: जरी मराठाच असलो तरी कानडीचे उपकार झाले आहेत ते महाराष्ट्राने विसरावेत असे मला कधीही वाटणार नाही” असे उद्गार त्यांनी स्वत:च नोंदविलेले आहेत. (उपरोक्त, पृ. १६९). गेल्या वीसएक वर्षांत भारतीय इतिहास, संस्कृती आणि भाषाव्यवहार यांविषयी जी मौलिक मांडणी बिगर भारतीय आणि भारतीय विद्वान करीत आहेत, ती विठ्ठल रामजींच्या संबंधित मांडणीला पुष्टी देणारीच ठरत आहे.
श्री. शिंदे मॅट्रिक परीक्षा पुणे केंद्रात बसून १८९१ मध्ये अठरा वर्षांचे असताना पास झाले. त्यानंतर जमखंडी येथे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून एक वर्षभर काम केल्यावर १८९३ मध्ये ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसनमध्ये दाखल झाले. येथून त्यांच्या शैक्षणिक जीवनाचा दुसरा कालखंड सुरू होतो.
घरच्या वातावरणाचे संस्कार, वाङ्मय व शास्त्र यांच्या अभ्यासामुळे त्यांच्यात निर्माण झालेला सुसंस्कृतपणा यामुळे त्यांच्या ठिकाणी उच्चतर आकांक्षा निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यामुळे ‘मला जनावरांचा डॉक्टर व्हावयाचे नाही. आटर्स कॉलेजमधील स्कॉलरशिप दिल्यास जावयास तयार आहे’, असे बाणेदार उत्तर जमखंडी संस्थानिकांना दिल्यामुळे स्कॉलरशिपही गेली, नोकरीही गेली व दीपवाळीचा पगारही गेला. हायस्कूलमधील शिक्षकी पेशाची अशी समाप्ती झाल्यावर कुणाच्या ओळखीपाळखीचा आधार नाही, अशा स्थितीत ते पुण्यासारख्या विस्तीर्ण शहरात येऊन पोहोचले.
या संदर्भात श्री. गंगाराम भाऊ म्हस्के यांची पाश्चात्त्य धर्तीची व सुधारकी वळणाची राहणी, वृत्ती व वर्तन तसेच श्री.गोपाळ आगरकरांचे त्यांच्या सुधारक प्रतिमेशी न जुळणारे दर्शन व त्यांनी दिलेले तुटक, तडकाफडकी उत्तर यांची डॉ. पवार यांनी नोंद घेतली आहे. डॉ. शेळके यांनी तर “मराठयाच्या कुळात जन्मून असे हे भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसे नसल्यास गुरे राखावीत. कशास शिकावे?’’ वगैरे आयुष्यभर लक्षात राहील अशी तासडणूक केली.
त्यांना साहाय्य झाले ते श्री. गोविंदराव सासने या कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचे व तेरदाळचे बालमित्र विष्णुपंत देशपांडे यांच्या कुटूंबाचे. त्यांच्या पत्नीने भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले वीस रूपये विष्णुपंतांमार्फत विठ्ठलरावांना पोहोचवले. प्रीव्हियस परीक्षेसाठी मुंबईच्या खर्चाचा प्रश्न असा सुटला.
कॉलेजचे वातावरण व शिक्षणपद्धती बघितल्यावर विठ्ठलरावांचा हिरमोड झाला. त्याचा त्यांच्या मनावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यांना गांजवणा-या आर्थिक अडचणी, एक प्रकारचा लाजाळूपणा, संकोचीपणा व धीटपणा अभाव आणि कॉलेज विदयार्थ्यांमधील आपण ‘सभ्य गृहस्थ ‘ झालो असल्याची आढयता व स्वयंमन्यता यामुळे ठरीव अभ्यासावरून मनही उडू लागले. प्रीव्हियसच्या परीक्षेच्या निमित्ताने विठ्ठलरावांना मुंबईचेही प्रथम दर्शन अनुकूल झाले नाही. एकीकडे खुद्द पुण्याचा म्हणता येईल, अशा एकही विदयार्थ्याने विठ्ठलरावांच्या बाबतीत अंगाशी लावून घेतले नव्हते. तर मुंबईकरांचा स्वभाव त्यांना आत्मशून्य व वरपांगी वाटला.
त्यांची परिस्थिती एवढी बेताची होती की शिक्षणाच्या काळात सुट्टीच्या दिवसात बैलगाडीच्या प्रवासाचे चारआठ आणे वाचवण्याकरिता कुडची स्टेशन ते जमखंडी असा तेहतीस मैलांचा प्रवास ते पायी करत असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत व औपचारिक कॉलेज शिक्षणाबद्दल दुरावा निर्माण झाल्याने इंटरमीजिएट परिक्षेत त्यांना अपयश आले. पण “स्वत:बद्दलच्या एका खोलवर आत्मविश्वासामुळे सगळा दोष स्वत:कडे घ्यायला त्यांचे मन होत नसावे” असे रास्त मूल्यमापन डॉ. पवार यांनी केले आहे.
मुख्य म्हणजे एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही विठ्ठलरावांच्या मनाचा व बुद्धीचा विकास थांबला नाही. अभ्यासक्रमाबाहेरील तात्त्विक महत्वाची पुस्तके त्यांनी पचवली. आगरकर, मिल्, स्पेन्सर वाचून ते स्वत:च्याच शब्दांत ‘पुण्यातल्या विद्यार्थ्यांत एक पठ्ठ्या नास्तिक’ बनले. या काळात त्यांनी पुण्याला एक छोटेखानी चर्चामंडळही स्थापन केले.
१८९५ च्या दुस-या टर्ममध्ये विठ्ठलराव पुण्यास आले ते त्यांची मातोश्री आणि बहीण जनाबाई यांना बरोबर घेऊनच. मात्र पुण्यात बि-हाड करण्याचे स्वत:च्या घरचे जेवण व त्यामुळे होणारी काटकसर हे कारण नसून घरातील स्त्री-नातलगांना स्त्री-शिक्षण व प्रवासाचा लाभ देण्याचा सुधारकी हेतूही त्यांच्या मनात निर्माण झाला होता. हा प्रत्यक्ष परिणाम हरी नारायण आपटे यांच्या कादंब-यांचा असे विधान डॉ. पवार ‘जनाबाई शिंदे : स्मृतिचित्रे,’ तरूण महाराष्ट्र या लेखाच्या आधाराने करतात. १८९६ मध्ये पत्नीलाही त्यांनी पुण्यात आणून बहिणीबरोबर शाळेत घातले.
या टप्प्यावर डॉ. पवार आपल्या निवेदनाच्या संदर्भात एक वळण घेतात. पुढच्या तीन प्रकरणांत त्यांनी विठ्ठ्लरावांची पाठोपाठची बहीण जनाबाई ऊर्फ जनाक्का आणि त्यांच्या मित्रवर्गापैकी कोल्हापूरचे श्री. वासुदेवराव सुखटणकर या अत्यंत गरीब गृहस्थाची बहीण शांता यांची करूण सांगितली आहे.
आईला सोसाव्या लागणा-या दु:खाप्रमाणे श्री. शिंद्यांनी जनाक्काचे सासरचे दु:खही अनुभवले. त्यातून त्यांचा स्त्रीविषयक सहानुभूतीचा, समानतेचा आणि सुसंस्कृतपणाचा दृष्टिकोण तयार झाला असे सार्थ प्रतिपादन डॉ. पवार याबाबतीत करतात. जनाक्काला माहेरी परत आणण्याचा आग्रह धरून ते तिला पुण्याला आईबरोबर घेऊनच परतले. पुढील काळात जनाबाईंनी शिंदे यांच्या उन्नत धर्मप्रसार आणि अस्पृश्यतानिवारण या दोन्ही कार्यांत आयुष्यभर समर्थ साथ दिली. त्याला पोषक अशा व्यक्तिमत्वाची जनाबाईंची जडणघडण पुण्यालाच होऊ शकली. या संदर्भात अमेरिकन ख्रिस्ती मिशनशाळा, पंडिता रमाबाई व प्रो. अण्णासाहेब कर्वे यांच्या कार्याच्या विविध त-हा डॉ. पवार यांनी पेश केल्या आहेत. कर्व्यांनी “ब्राह्मणेतरांच्या मुलींना घेण्याचा हा काळ नाही” असे विठ्ठलरावांना सांगितले. ”कर्वे यांच्या धोरणाबद्दल अतिशय संयमाने विठ्ठल रामजी शिंदे यांनी अभिप्रायकथन केले” असे यथार्थपणे सांगितल्यावर डॉ. पवार श्री. शिंदे यांचा “तत्कालीन महाराष्ट्रात एक सुधारणा करताना दुस-या सुधारणेला कसा अडथळा येई, ह्याचे हे उदाहरणच आहे,” हा अभिप्राय मार्मिक दृष्टीने नोंदवितात.
हुजूरपागा शाळेत जाताना पुण्यात वाट्याला आलेल्या असभ्य कुचाळीचा उल्लेख करून डॉ. पवार स्पष्टपणे म्हणतात की, महात्मा जोतीबा फुले यांनी स्त्री-शिक्षणाला प्रारंभ करून जवळ जवळ पन्नास वर्षे झाली होती. परंतु पुण्यातील सांस्कृतिक वातावरणात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फारशी सुधारणा झाली नव्हती.
इंटरमीजिएटच्याच वर्गात १८९५ साली विठ्ठलराव राष्ट्रीय पक्षाचे झाले. त्यासाठी राष्ट्रीय सभेच्या पुण्यातील अधिवेशनाचे ते स्वयंसेवक बनले. हा राष्ट्रीय बाणा आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या ठिकाणी उत्कटत्वाने वास करीत राहिला, असा संपूर्ण सत्यनिष्ठ असा अभिप्राय डॉ. पवार येथे नोंदवून ठेवतात. पुण्यातल्या सनातनी मंडळींनी सामाजिक परिषदेच्या मंडपाचे निमित्त करून घातलेला गोंधळही विठ्ठलरावांना आपोआपच पाहावयास मिळाला. याच सुमारास अमेरिकन युनिटेरिअन असोसिएशनच्या डॉ. जे. टी. संडरलॅंड यांच्या भेटीत विठ्ठलरावांनी पुण्याला त्यांच्याशी विचारविनिमय केला. पुढे इंग्लंडला जाण्याच्या दृष्टीने त्याचा मोठा उपयोग झाला. याच कालावधीत सयाजीराव महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रूपये स्कॉलरशिप दिली. या दोन्ही कहाण्या डॉ. पवार तपशिलाने मांडतात.
पुढच्या प्रकरणात डॉ. पवारांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पुण्याचे वर्णन श्री. शिंदे यांच्या दृष्टिकोणातून अचूकपणे रंगविले आहे. विठ्ठलरावांच्या आयुष्यावर अनुकूल परिणाम करणा-या महत्वाच्या घटना पुण्यामध्ये घडल्या. ही वस्तुस्थिती असली तरी पुण्यामध्ये विठ्ठलरावांचे व्यक्तिमत्व घडण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. किंबहुना ते पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाशी कधी समरस होऊ शकले नाहीत. पुण्यामध्ये ते सदैव परकेच राहिले. त्यांचा सामाजिक, सांस्कृतिक एवढेच नव्हे तर धार्मिक बाबतीतही दृष्टिकोण पुणेरी मंडळींच्या भूमिकेच्या विरूद्ध स्वरूपाचा होता, असे जाणवते. त्या वेळचा पुण्यातील सर्वसामान्य सुशिक्षित समाज राष्ट्रवादी झाला होता खरा, परंतु सामाजिक बाबतीत सुधारणाविरोधी, प्रतिगामी, रूढ धर्माचे म्हणजे एक प्रकारे सनातन रूढीचेच गोडवे गाणारा होता. व्यापक, उन्नत धर्मकल्पना फारशी लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. बहुजन समाजाचे हित आणि सुधारणा यांकडे फारसे कुणाचेच लक्ष नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांची त्यांना जाणीवही दिसत नव्हती, असे सडेतोड चित्रण डॉ. पवार यथार्थपणे सादर करतात. स्वत: श्री. शिंदे मोठ्या समजल्या जाणा-या माणसांचेही स्वतंत्रपणे मूल्यमापन करतात आणि त्यांचा हा स्वतंत्रपणा आपल्याला जाणवत राहतो, असेही ते रास्तपणे सांगतात. या काळात सोशॅलिझमची बाजू सर्वांनी उचलून धरली पाहिजे, असे विठ्ठलरावांना वाटू लागले होते, याचीही नोंद डॉ. पवार घेतात.
व्यावहारिक कारणांमुळे बी.ए.ला आवडीचे विषय सोडून इतिहास आणि कायदा हे ऐच्छिक विषय श्री. शिंदे यांना घ्यावे लागले. पण एव्हाना जीवनाच्या सगळ्या अंगांकडे विठ्ठल रामजी शिंदे यांचा ओढा होता. राजकारण व राष्ट्रकार्य, स्वार्थत्यागपूर्वक समाजसुधारणेचे कार्य व उन्नत स्वरूपाचे धर्मकार्य यांत विरोध आहे, असे त्यांना वाटत नव्हतेच. उलट या गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये एकमेळ होऊन गेला होता, असे त्यांचे यथार्थ चित्र डॉ. पवार या संदर्भात रेखाटतात.
१८९८ चे वर्ष विठ्ठलरावांच्या दृष्टीने अंत:स्थ कोलाहलाचे गेले. धर्मविषयक विचार व व्यक्तिगत भावनिक पातळी या दोन्ही दृष्टीने श्री. शिंदे यांच्या आत्म्याची भूक शमविण्याची शक्ती नास्तिकपणाच्या वाळवंटात नव्हती. म्हणून शिंदे आगरकर, मिल, स्पेन्सर यांच्या वलयातून बाहेर पडले. पाश्चात्य युनिटेरिअन धर्मपंथाच्या विचारांची रीत, मॅक्सम्युसरचे ग्रंथ, पुण्यातील प्रार्थनासमाजातील वातावरण व उपासना यांचा प्रभाव सरस ठरला. प्रार्थनासमाजाच्या उपासनेमध्ये त्यांना हिंदू धर्माचे निर्मळ आणि उज्ज्वल स्वरूप दिसले. प्रपंच साधून परमार्थ कसा करावा, ह्याचे विवरण त्यांना चित्तवेधक आणि पटण्यासारखे वाटले. वारकरी पंथाच्या आचारविचारांना जुळणारीच ही भूमिका आहे, असे त्यांना वाटले असणार. त्याच्याच जोडीला या कालावधीत श्री. रामचंद्र अण्णाजी कळसकर यांच्यासारख्या उदारमनस्क कर्त्या पुरूषाचा सहवास त्यांना लाभला. महात्मा जोतिबा फुल्यांनंतर अस्पृश्यासंबंधी स्वार्थत्यागपूर्वक काम करणारे कळसकर हे एकमेव गृहस्थच एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस दिसतात, असे डॉ. पवार यांचे याबाबतचे निदान आहे. तेही कार्य करावे, अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
मध्यंतरी प्रतापचंद्र मुजुमदार यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या केशवचंद्र सेन यांच्या चरित्राचे व विशेषत: त्याला जोडलेल्या केशवचंद्रांच्या आत्मचरित्राचे व त्यातही त्यातील ‘अग्निस्नान’ हे प्रकरण वाचून प्रार्थनासमाजाचे केवळ सभसदच नव्हे तर आजन्म प्रचारक व्हावे, अशी अनिवार ओढ त्यांना लागून राहिली. परिणामी त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली व ते रीतसर ब्राम्ह्यसमाजाचे अनुयायी बनले. शिंद्यांनी पुणे प्रार्थनासमाजात आपली पहिली उपासना त्याच साली सादर केली. आपला मुलगा प्रार्थनासमाजाचा सभासद झाला हे रामजीबाबांना आणि यमुनाबाईंना फार आवडले. प्रार्थनासमाज म्हणजे आपल्या भागवत धर्माचीच सुधारलेली आवृत्ती आहे, असे त्यांना वाटू लागले, असा अभिप्राय डॉ. पवार येथे जाणीवपूर्वक नोंदवून ठेवतात. डॉ. पवारांनी वरील सर्व वाटचाल सांगोपांग वर्णन केली आहे. इतकी की उपरोक्त ‘अग्निस्नान’ चे भाषांतरही त्यांनी या संदर्भात आपल्याला सादर केलेले आहे. तसेच पूर्ण प्रकरणात हिंदुस्थानातील व बाहेरील उन्नत स्वरूपाच्या एकेश्वरी धर्मपंथांच्या कार्याचे अत्यंत तपशीलवार वर्णन, कर्मवीरांचा त्यांच्याशी राहिलेला आयुष्यभरचा अतूट संबंध लक्षात घेऊन, रेखाटले आहे. बहुतेक वाचकांना ही मोलाचीच सोय झाली आहे, असे वाटते.
अंत:स्थ भावजीवनातील खळबळ या सहा पानी प्रकरणात डॉ. गो. मा. पवार यांनी एका अत्यंत नाजूक, संवेदनक्षम अशा विषयाला हात घातला आहे. असा विषय न टाळता डॉ. पवार यांनी त्याची मांडणी प्रगल्भ, समंजस आणि प्रांजळ अशी केली आहे. आपल्याकडचे बहुतेक चरित्रकार- आजमितीलासुद्धा-थोर स्त्री-पुरूषांविषयी लिहिताना अशा बाबतीत असमर्थनीय मौन बाळगतात. या तुलनेत त्यांच्या प्रस्तुत चरित्राचा एक मानबिंदू ठरावा, असे हे प्रकरण पवारांनी लिहिले आहे.
तत्कालीन प्रथेप्रमाणे विठ्ठलरावांचा विवाह त्यांच्या बालपणी वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे १८८२ मध्ये झाला होता. दोघांच्या वयामध्ये सुमारे साडेआठ वर्षांचे अंतर होते. त्यांच्या पत्नीचा जन्म ऑक्टोबर १८८१ चा. १८९८-९९ मध्ये शिंदे पंचवीस वर्षांचे व त्यांच्या पत्नीचे वय सतरा वर्षांचे होते. या वर्षातील श्री. शिंदे यांच्या वैवाहिक जीवनातील शारीरिक व भावनिक अस्वस्थता व खळबळ यांचे संयमित चित्रण या प्रकरणात आहे. डॉ. पवारांच्या शब्दांत “शारीर विकाराचा उपशम न झाल्यामुळे शरीराची होणारी हानी, एकाकी अवस्थेत होणारे भावनिक व शारीरिक हाल संपण्याची आणि सुंदर, आल्हाददायक वैवाहिक जीवन नव्या संबंधाने निर्माण करण्याची उद्भवलेली आशा व अखेरीस त्याबाबतीतही झालेली निराशा असा हा विठ्ठलरावांच्या भावनिक अस्वस्थतेचा ढोबळ आलेख आहे.”
पत्नीच्या बाबतीतही शारीरिक व मानसिक संवादाची अशी दुहेरी निराशा वाटयाला आल्यामुळे प्रागतिक, नागर व सुसंस्कृत वातावरण असलेल्या कोल्हापूरच्या केळवकर कुटुंबातील तीन बहिणींपैकी बहुधा कृष्णाबाई जीवनाची सहचारिणी व्हावी याबाबत श्री. शिंदे यांनी अत्यंत मर्यादशील पद्धतीने केलेल्या अयशस्वी प्रयत्नाचा निर्देश या प्रकरणात केला आहे. पण पुढच्या दोन-अडीच वर्षांत पत्नीच्या वाढत्या वयानुसार दोघांच्यातील सामंजस्याची भावना क्रमश: वाढत गेलेली दिसते. त्याचे मधुर व मंगल फळ म्हणजे त्यांचे पहिले अपत्य प्रताप याचा ९ सप्टेंबर १९०१ रोजी जन्म झाला. पत्नीच्या विसाव्या व विठ्ठलरावांच्या अठ्ठाविसाव्या वर्षी. ”विठ्ठलरावांचे वैवाहिक जीवन निर्वेधपणे सुरू झाले” असा समारोप करून डॉ. पवार हे प्रकरण पूर्ण करतात.
२१ सप्टेंबर १९०१ रोजी विठ्ठल रामजी शिंदे बोटीने इंग्लंडला प्रयाण करतात.” आज आपल्या कृत्यात्मक अथवा कार्यकारी जीवनाचा आरंभ झाला इत्यादी विचार त्यांच्या मनात येत होते.” याविषयी स्वत: श्री. शिंदे यांचेच उद्गार उपलब्ध आहेत. सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठलरावांना इंग्लंडचा प्रवासखर्च तर मंजूर केलाच. त्याशिवाय बी. ए. व एल्. एल्. बी. यांच्या खर्चासाठी मिळालेल्या स्कॉलरशिपच्या बदल्यात संस्थानामध्ये नोकरी करण्याच्या अटीतूनही मुक्तता केली. सयाजीरावांची दूरदर्शक, विधायक, पुरोगामी बांधिलकी इतर अनेक उदाहरणांप्रमाणे याही बाबतीत स्पष्टपणे दिसून येते. इंग्लंडला धर्मशिक्षणासाठी जाण्याच्या आधी लोकमान्य टिळकांचे दर्शन घेण्याकरिता शिंदे त्यांना भेटले. त्यांच्या प्रत्यक्ष भेटीने टिळकांच्या स्वभावाचा “मोकळा दिलदारपणा व दृष्टिकोणाचा उदारपणा “ शिंद्यांना जाणवला असणार. म्हणून पुढच्या काळात शिंद्यांनी लो. टिळकांचे सहकार्य “नि:शंकपणे” मागितलेले दिसते वा सहकार्य केलेले दिसते असा अभिप्राय डॉ. पवार या संदर्भात नमूद करतात. अर्थात कर्मवीर शिंदे हे, त्यापुढच्या काळात टिळकांनी सार्वजनिक जीवनात ज्या ज्या वेळी प्रतिगामी व कचखाऊ भूमिका घेतली त्या त्या वेळी टिळकांवर कठोर टीका करण्याबाबत हयगय करीत नाहीत हेही आपण ध्यानात ठेवले पाहिजे.
प्रवासाला निघताना आपल्या सामानामध्ये विठ्ठलरावांनी आवर्जुन घेतलेला एकतारा, वाटेत मार्सेयचे नॉटर डेम द ला गार्डचे मेरीचे देऊळ पाहिल्यावर “ सौंदर्यशास्त्री आणि नीतिशास्त्री ह्यांच्या सल्याने” चित्रकार व शिल्पकार यांना धर्मसाधनेच्या बाबतीत मदत झाल्यास “आमच्या देवळांच्या सौंदर्यात व पावित्र्यात किती भर पडेल बरे” हे शिंदे यांचे चिंतन, सुधारकी धर्मविचाराचे सबंध युरेपात असले एकच मॅंचेस्टर कॉलेज व त्याचे “सत्य, स्वातंत्र्य व धर्म “हे ब्रीद यांचे सुरेख चित्रण डॉ. पवार करतात. ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे, कलात्मक सौंदर्य याबद्दल शिंद्यांना उत्कट ओढ होती. पण कोणत्याही कलाकृतीत आध्यात्मिक स्वरूपाचा आनंद देण्याची क्षमता असेल तरच ती त्यांना खरोखरी सुंदर वाटत असे हा अभिप्रायही डॉ. पवार नोंदवून ठेवतात.
त्या वर्षीची नाताळची सुट्टी विठ्ठलरावांनी लंडनला घालविली. याबाबत डॉ. पवार “आधुनिक सुधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगात कोठे नाही” हे शिंद्यांचे सूक्ष्म व सखोल वचन उद्धृत करण्यास विसरत नाहीत. लंडनच्या मुक्कामात श्री. शिंदे यांच्या मनावर खोल परिणाम करणा-या दोन गोष्टी घडल्या. २२ डिसेंबर १९०१ च्या रविवारी रेव्हरंड हेन्री वुडस् पेरिस यांचे ‘शांती’ या विषयावरील व्याख्यान त्यांनी एकले. युनिटेरिअन देवळातील व्यासपीठावरून चालू विषयांचा ऊहापोह होतो ही बाब त्यांना विशेष वाटली. उन्नत पातळीवरून केलेले लौकिकातील कार्य व धर्म, नीती आणि धर्म यांना एकरूप मानण्याची विठ्ठल रामजी शिंदे यांची त्यांच्या पुढील आयुष्यातील कृतीतून आणि विचारातून जी भूमिका दिसून येते ती घडण्यामध्ये पेरीस यांच्या ह्या उद्गाराचा मोठाच प्रभाव पडला असावा असे डॉ. पवार यांना वाटते.
३० डिसेंबर १९०१ रोजी शिंद्यांनी डोमेस्टिक मिशनपैकी रेव्ह. समर्स यांचे ‘जॉर्जेस रो’ मधील गरिबांचे दुख: दूर करण्याचे काम अत्यंत सेवाभावी आणि समर्पणशीलवृत्तीने पाहिले. डॉ. पवारांच्या प्रतिपादनानुसार अस्पृश्य मानलेल्या लोकांसाठी ह्या मिशनच्या धर्तीवर संस्था स्थापन करून काम करावे असा विचार शिंद्याच्या मनात आला. ही भेट त्यांच्या आयुष्यातील महत्वाची ठरली.
विठ्ठलरावांचे एक समर्पक निरीक्षण ह्या संदर्भात डॉ. पवार आपल्या नजरेस आणून देतात. श्री. शिंदे म्हणतात की, ”पाश्चात्य सुधारणेचे धर्मरहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे. पण पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता इथेच स्वर्ग उतरविण्याची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थ साधल्यावर परमार्थास ते कसे लागतात हे आम्हांस समजून घेणे आहे.” इंग्लंडमधल्याच पुढील काळातील एका उपासनेत शिंदे यांनी केशवचंद्राचे एक मननशील विधान सांगितले. ’’मी इंग्लंडमध्ये ख्रिस्त शोधण्यासाठी आलो नाही. ही परमेश्वराची कृपा आहे की, माझा ख्रिस्त माझ्याजवळ आहे.” विशेष म्हणजे १९०२ च्या ३० मे रोजी विठ्ठलरावांनी एका अनुभवाची नोंद आपल्या छोट्या रोजनिशीत केली. तीव्र स्वरूपाच्या आध्यात्मिक तळमळीचा परिणाम असेल, परमेश्वराचा आपल्याला साक्षात्कार झाल्याची अनुभूती त्यांना आल्यासारखी वाटली. लवकरच दुसरा असाच एक अनिर्वचनीय आनंदाचा आध्यात्मिक अनुभव सरोवर प्रांतात प्रो. कार्पेंटर यांच्याकडे ते मुक्कामाला असताना आला. जुलै महिन्यात बॉरोडेल दरीमध्ये शतपावली करताना व ऑगस्ट महिन्यात स्कॉटलंडमधील बेन लोमंड डोंगराच्या शिखरावर व पुढे भारताच्या परतीच्या मार्गावर बोटीत त्यांना असेच खाजगी आध्यात्मिक अनुभव आले. ”आध्यात्मिक अनुभव मिळविण्याची किंवा देव पाहण्याची किंवा अनंताचे भान म्हणजेच साक्षात्कार घडण्याची साधने सौंदर्य, सत्त्व, सत्य ही असून देव कारणरूपाने अथवा प्रेमरूपाने व नीतिरूपाने प्रकट होतो” असे श्री. शिंदे यांना वाटे. ”वाचकास ही आत्मप्रौढी आहे असे वाटेल” असे ते म्हणतात. पण विठ्ठलरावांचा एक मनोज्ञ गुणविशेष असा की गूढत्वाचे व व्यक्तिस्तोमाचे अवडंबर न माजवता ते मोकळेपणाने ही गोष्ट स्पष्ट करतात की, “पण खरा प्रकार तसा नाही.” या प्रकाराचा आध्यात्मिक अनुभव हा ह्या जगात काही योग्य अधिकारी धर्मपुरुषास येणारा अनुभव आहे असे नव्हे, तर सर्वच माणसांना हा अनुभव येऊ शकतो अथवा येत असतो” असे सांगून केवळ वृत्तिभिन्नत्वामुळे काहीजण त्या अनुभवाकडे लक्ष पुरवितात, काहीजण पुरवीत नाहीत. मात्र आपल्याला येणा-या अनुभवाचे स्वरुप हे सारखेच असते,” अशी श्री. शिंदे यांची धारणा दिसते असा अभिप्रात्र डॉ. पवार या संदर्भात प्रकट करतात. इंग्लंडमधील व स्कॉटलंडमधील काही अनुभवांती जी आध्यात्मिक तळमळ शिंद्यांना लागून राहिली होती ती शांत झाली असे दिसते असेही डॉ. पवार म्हणतात.
मला तर महर्षी शिंदे यांची याबाबतची भूमिका तुकारामांचीच आठवण करून देते. ‘मेघवृष्टीने करावा उपदेश परि गुरुने न करावा शिष्य |’ अशी उन्नत दृष्टी तुकारामांनी जोपासली होती. शिंद्यांना आपल्या मातापित्यांकडून वारकरी पंथाचा जो समताशील साधनेचा वारसा लाभला होता त्याचाच या संदर्भातील शिंद्यांची भूमिका हा परिपाक असावा. निसर्गसौंदर्यातून मानवतावादी आध्यात्मिक विकास व अनुभव साधण्याच्या संदर्भात येथे आपल्याला श्री. रवींद्रनाथ ठाकूर यांचीही आठवण येईल. महर्षीची सौंदर्यदृष्टी ठाकूरांइतकीच तरल होती. पण गुरूदेवांच्या अध्यात्मपर सौंदर्यानुभवात डोकावणारी व्यक्तिकेंद्रितता महर्षीच्या अनुभवात आपल्याला तिळमात्र आढळणार नाही.
“(निसर्गसुंदर) उच्च वातावरणात उदात्त व पवित्र विचार सुचणे फार सोपे आहे. अशा एकांतवासात मन शुद्ध राखणे व तत्त्वज्ञानी होणे साहजिक आहे. पण जनसमूहात मिसळून जीवनकलहात गुंतलो असता मनाची अशी स्थिती ठेवणे मात्र अत्यंत कठीण. थोर पुरूषांस ते साधते” अशी शिंदे यांची एक मननीय नोंद लक्षात ठेवण्यासारखी आहे. (शिंदे, १९७९, पृ. १२६). ”पर्वतशिखरांच्या वाटेने येताना अंधारात व आडवळणीस कित्येक प्रेमी जोडपी प्रियाराधनात गर्क झालेली दिसली. हे मानवी संसारातील अत्यंत गोड पवित्र चित्र मला येथे वारंवार दिसते.” हा शिंद्यांचा अनुभव उद्धृत करण्यात डॉ. पवार यांनी चांगलीच सूक्ष्म दृष्टी व औचित्य दाखवले आहे. डॉ. पवार यांनी याच संदर्भात शिंद्यांचे दुसरेही एक निरीक्षण अगत्यपूर्वक नोंदवले आहे ते असे की, ’’मानवी प्रेमाचे हे स्वाभाविक प्रदर्शन पाहून ज्यास विषाद वाटेल तो खरा हतभागी, करंटा, खोट्या तत्त्वज्ञानाने बिघडलेला, खोट्या नीतीच्या कल्पनांनी कुजलेला म्हणावयाचा.” विठ्ठलराव पुढे असेही म्हणतात की, ’’आम्हा पौरस्त्यांना ह्या सर्व प्रकारांत केवळ अनीतीच दिसण्याचा संभव आहे. पण दिसणे व असणे ह्यात दोहोंपक्षी पुष्कळ वेळा कितीतरी फरक दिसतो.” (शिंदे, १९७९, पृ. ११९). ”जीवनातील सारभूत वस्तू प्रेम ही असून ह्या प्रेमावीण जीवन जीवनालाच मुकते आणि मागे नुसते अस्तित्वच उरते” असे विठ्ठलरावांनी महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर यांच्या मृत्यूनंतर केलेल्या उपदेशसमयी तीनएक वर्षांनंतर म्हटले होते. या गोष्टीचीही आवर्जून दखल घ्यावयास डॉ. पवार विसरत नाहीत.
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कामजीवनाविषयीच्या उपरोक्त मतांमुळे ज्यांना ते जन्मभर फार श्रेष्ठ कोटीचे मानव मानत त्या महात्मा गांधींच्या एतद्विषयक मतांचीही आठवण आपल्याला होणे स्वाभाविक आहे. स्त्री-पुरुष संबंधाविषयी व कामजीवनाबद्दल गांधींनी जेवढा मूलगामी, सर्वांगीण विचार आयुष्यभर केला तेवढा कोणत्याच राष्ट्रपुरुषाने केला नसेल. दुर्दैवाने त्यांच्या या संदर्भातील विचारांची व प्रयोगांची सवंग व उथळ पद्धतीने नेहमी टिंगल किंवा संवेदनशून्य मांडणी होत असते. आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावून गांधीजी ब्रम्ह्यचर्याचे प्रयोग नोआखालीत का करीत राहिले याचा मागोवा घेण्याची तसदीसुद्धा सहसा घेतली जात नाही. अर्थात याबद्दल मतमतांतरे होतच राहणार अशी मान्यता स्वत: गांधींनीच दिली असती. पण गांधीच्या या महान प्रयोगांचे असाधारण महत्त्व गृहीत धरूनही त्यांच्या तुलनेत मला स्वत:ला विठ्ठल रामजींची कामविषयक भूमिका जास्त मोकळी, निकोप, स्वाभाविक आणि भारतीय परंपरांमध्ये मुरलेली दिसते. गांधी लैंगिक जीवनाविषयीची ख्रिश्चन व व्हिक्टोरिअन अपराधी भावना कधीच पूर्णपणे झटकून टाकू शकले नाहीत. याउलट इंग्रज आणि पाश्चात्य मिशन यांच्यात गांधींएवढ्याच सहजपणे वावरलेल्या विठ्ठल रामजींच्या भूमिकेत पाश्चात्य कामजीवनाच्या मोकळ्याढाकळ्या अविष्काराबद्दल कौतुक आहे. पण त्याच वेळी त्याविषयी असणारी ख्रिश्चन धर्मशास्त्रीय अढी मात्र त्यांनी दूर ठेवली. 'अलौकिका न होये लोकांप्रती' असा समरस भाव त्यांच्या जीवनाचा स्थायीभावच दिसतो.
या निसर्गाच्या भटकंतीत विठ्ठल रामजी शिंदे यांची चिकित्सक व समाजशास्त्रीय दृष्टी जागीच होती. १९०२ च्या जुलैमधील केसिक कन्व्हेनशनच्या संदर्भात “आमच्याकडे जशा वार्षिक क्षेत्राच्या ठिकाणी यात्रा जमतात तसेच हे कन्व्हेनशन मला दिसले. पण आध्यात्मिक दृष्टीने दोहोंत फारच मोठा फरक आहे. आमच्या ज्या कर्मठ यात्रा (काशी, रामेश्वर इत्यादी उच्च वर्गाच्या आणि जोतिबा, जेजुरी, सौंदत्ती इत्यादी खालच्या जातीच्या,) (आणि) भक्तीच्या म्हणजे पंढरपूर, आळंदी वगैरेच्या अशा दोन प्रकारच्या यात्रा आहेत. (त्यामध्ये) केसिकची दुस-यांत गणना होईल. सुधारणेला अनुरूप अशा समाजावर जोराचा व काही अंशी इष्ट परिणाम होतो. तितका आमच्याकडे हा परिणाम होत नाही” असे श्री. शिंदे सांगतात.
त्याचप्रमाणे 'लेक डिस्ट्रिक्ट्स'च्या वाटेवर असता कारखान्यांनी गजबजलेल्या प्रदूषणयुक्त प्रदेशातून जाताना “प्रगतीची ही काळी खरखरीत बाजू जाणवून श्री. शिंदे अंतर्मुख झाले. सुधारणेच्या बाह्म भपक्यामागे तिचे हे कष्ट, घामाच्या धारा कशा असतात हे त्यांना जाणवले” याही गोष्टीची नोंद घ्यावयास डॉ. पवार विसरत नाहीत.
या “संपूर्ण प्रवासात आणि युरोपमधील (पुढील) वास्तव्यात (शिंद्यांच्या) ठिकाणी सामान्यत: भारतीय प्रवाशाची त्या काळात दिसून येणारी न्यूनगंडाची भावना यत्किंचितही दिसून येत नाही. धर्मविषयक आणि संस्कृतीविषयक विचारावर दुरभिमान किंवा न्यूनगंड यांचा प्रभाव पडलेला जाणवत नाही. त्यांची भूमिका सदैव निरामय सत्यनिष्ठतेचीच प्रकट होताना दिसते” असा रास्त निर्णय डॉ. पवार या सर्व नोंदीतून काढतात.
विठ्ठलरावांच्या ऑक्सफर्ड येथील वास्तव्याच्या अखेरच्या दिवसांत त्यांनी तेथील युनिटेरियन समाजाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात हिंदुस्थानातील गृहस्थिती व समाजस्थिती या विषयावर एक व्याख्यान दिले. जोडीला मध्यम स्थितीतील कुटुंबाचे नाट्यरूप देखावेही त्यांनी सादर केले. चोविसाव्या प्रकरणात डॉ. पवारांनी सादर केलेले हे व्याख्यान व तो प्रसंग हा विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या जीवनातील एक अतिमहत्त्वाची घटना होती, असे आपल्याला नि:शंकपणे म्हणता येते. हे व्याख्यान अजूनही त्याच्या मौलिक ताजेपणाने आणि अचूक व संवेदनक्षम समाजशास्त्रीय मांडणीमुळे आपल्याला प्रभावित करते. एकेश्वरी धर्माच्या उदात्त, व्यापक अशा आध्यात्मिक जाणिवेने प्रगल्भ बनलेल्या भूमिकेतूनच विठ्ठलरावांनी संपूर्ण जगाच्या इतिहासाचे व संस्कृतीचे भान ठेवत पण त्याच वेळी डोळस राष्ट्रीय आत्मविश्वासाने ही मांडणी केली आहे, असे या संदर्भात डो. गो. मा. पवार म्हणतात. त्यांचे हे विधान योग्य व तरलस्पर्शी असेच आहे.
यानंतर ऍमस्टरडॅम येथील सप्टेंबर १९०३ च्या आंतरराष्ट्रीय धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या संदर्भात शिंद्यांनी केलेल्या कामगिरीचे यथार्थ वर्णन करण्याच्या बाबतीत डॉ. पवार यांनी घेतलेले कष्ट व दक्षता उल्लेखनीय आहे. डॉ. पवार यांनी दोन गोष्टी साक्षेपाने नोंदविल्या आहेत. “हिंदू धर्माची तत्त्वे आणि आदर्श पाश्चात्त्य विद्वानांनी जितक्या मानाने समजून घेतली आहेत त्या मानाने पाश्चात्त्य देशातील धर्मशास्त्रवेत्यांनी घेतली नाहीत” हे शिंदे यांचे एक निरीक्षण तसेच “हिंदू धर्म म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे व हल्ली त्याचे शासन आणि नियमन असंख्य जातींचा जो एक मोठा व्यूह बनलेला आहे त्याचे द्वारा होत आहे आणि त्याचा पाया आध्यात्मिक तत्त्वावर रचलेला नसून सामाजिक आणि कौटुंबिक हितसंबंधावर रचला आहे. हिंदुस्थानमध्ये ज्याचे खरे जुलमी साम्राज्य चालू आहे तो आचार्य, उपाध्याय किंवा धर्मग्रंथ ह्यांच्यापैकी कोणी नसून चालू वहिवाट हीच होय” असे श्री. शिंदे यांचे दुसरे विधान. या दोन्ही गोष्टी निश्चितच मननीय आहेत.
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या परदेशातील वास्तव्यात प्रकट झालेली आध्यात्मिक साधना, सामान्यजन व समता याबद्दलची कळकळ, सौंदर्यबुद्धी, समाजशास्त्रीय दृष्टिकोण, मनोरम्य वङमयीन शैली तसेच शिंद्यांचे छाप टाकणारे व्यक्तिमत्त्व, शालीनता, प्रगल्भता व रसिक विनोदबुद्धी, मुख्य म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल त्यांनी दाखविलेली विशेष आस्था या सर्वांचीच दखल जागोजागी डॉ. पवारांनी कुशलतेने घेतलेली आहे. म्हणूनच ऑक्सफर्ड सारख्या कर्मठ विद्यापीठाने स्त्रियांना पदवी देण्याची तयारी दाखविल्यावर पुरुष विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ आणि केलेला दंगा याविषयी शिंद्यांनी केलेल्या विधानांचाही ते रास्त उल्लेख करतात.
विठ्ठलरावांच्या जीवनाच्या दुस-या कालखंडाचा समारोप करताना डॉ. पवार सांगतात की, “इंग्लंडमधून परत येत असताना एक प्रकारची सफलतेची जाणीव ते (शिंदे) अनुभवीत होते. वृत्ती शांत, अधिक प्रगल्भ झाल्या होत्या. मन व्यासंगाने, चिंतनाने, अनुभवाने अधिक अध्यात्मप्रवण बनले होते.” अशा प्रकारे शिंदे ६ ऑक्टोबर १९०३ रोजी मुंबईत परत पोहोचले.