प्रवासातील अनुभव

ब्राह्मधर्माचा प्रसार करणे आणि अस्पृश्यतानिवारण करून अस्पृश्य मानलेल्या वर्गाची सुधारणा करणे हे अण्णासाहेब शिंदे यांनी आपले जीवितध्येय मानले होते व एक प्रकारच्या निर्वाणीने ते या कामाला लागले होते. या दोन्ही कामाचे स्वरूपच असे होते की, त्यांना सतत प्रवास करणे भाग होते. प्रचारक म्हणून दरमहा रुपये साठ एवढा तुटपुंजा पगार त्यांना मिळत होता. ह्या पगारतच प्रचारकाने आपला प्रवासखर्चही भागवावा अशी अपेक्षा होती. निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे काम तर त्यांनी स्वतः अंतःप्रेरणेचा कौल मानून सुरू केलेले. त्यातील पद स्वीकारले होते ते बिनपगारी सन्माननीय जनरल सेक्रेटरीचे. कुटुंबाचा खर्च मोठा. असे असले तरी अंगीकृत कार्यासाठी खर्चाची तमा न बाळगता ते सतत प्रवास करीत असत.  त्यांनीच स्वतः म्हटल्याप्रमाणे, “तत्त्वाने बेहोष झालेल्याला तपशिलाची कदर नसते. अशातला मी एक.”१ म्हणून त्यांचा प्रवास नेहमी रेल्वेच्या तिस-या वर्गानेच व्हायचा. हॉटेलमध्ये उतरण्याची चैन परवडण्याजोगी नव्हती. म्हणून ज्या गावी जायचे तिथे ओळख काढून कोणाच्या तरी घरी राहाण्या-जेवण्याची व्यवस्था करून घ्यायची. कधी कधी सर नारायण चंदावरकरांचे हुबळी येथील व्याही श्रीयुत सिरूर, बडोद्यातील डॉ. रा. गो. भांडारकरांचे हायकोर्ट जज्ज असलेले बंधु वासुदेव गोपाळ भांडारकर, अथवा काठेवाडीतील मियागावचे ठाकूरसाहेब यांच्यासारख्या बड्या यजमानांकडे थाटाचा पाहुणचार होत असे. तर कधी खाण्यापिण्याचे अत्यंत हाल होऊन उपासमारीची पाळी येत असे. एवढेच नव्हे, तर अनेकदा अपमानाचे प्रसंगही वाट्याला येत. ह्या दोन्ही प्रकाराकडे समभावाने बघण्याची वृत्ती त्यांच्या ठिकाणी बाणली होती. अपमानाच्या, फजितीच्या अनुभवाकडे समंजसपणे, खेळकरपणाने बघण्याची विनोदात्म वृत्ती त्यांच्या ठिकाणी होती. म्हणूनच ते अंगीकृत कार्यासाठी आयुष्यभर अशा प्रकारची भ्रमंती करू शकले.

१९०३ साली युरोपातून परत आल्यावर लगेच डिसेंबरात सामाजिक परिषदेसाठी आणि ब्राह्मसमाजाच्या एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी मद्रासला जायला निघाले. तिखट मसाल्याची सवय राहिली नसल्याने दक्षिण प्रांतातल्या तिखटाच्या मा-याने त्यांची तारांबळ उडू लागली. “प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी बिनतिखटाचा स्वयंपाक करा असे पत्येक गृहिणीला बजावले तरी तिखटाशिवाय स्वयंपाक करणे म्हणजे जन्मात अपकीर्तीच करून घेणे,” असे तिला वाटून तिच्या दृष्टीने घातलेले अत्यंत थोडे तिखट हेही अण्णासाहेबांना सात दिवस पुरेल इतके असे. त्यामुळे दक्षिणेतील मुक्कामात त्यांना नेहमी अर्धपोटीच राहावे लागे. ह्या प्रवासात दुसरी एक आपत्ती त्यांना सहन करावी लागली. मद्रासकडील हिवाळा हा युरोपातल्या उन्हाळ्यापेक्षाही त्यांना कडक भासत होता. परंतु युरोपातून परत आल्यावर स्वदेशाला चालतील असे नवीन कपडे तयार करण्याचेही आर्थिक बळ त्यांच्यात नव्हते. म्हणून तेच युरोपियन कपडे त्यांना काही काळ वापरावे लागले. आपल्या या अवस्थेचे त्यांनी वर्णन केले आहे, “वरून जरी मी साहेब दिसत असलो तरी आतून नेहमी पुढच्या प्रवासखर्चाची व प्रकृतीला न मानवणा-या अन्नाची धास्ती बाळगणारा एक कंगाल फकीर होतो.”२

विठ्ठल रामजी शिंदे हे १९०४च्या उन्हाळ्यात काठेवाडच्या दौ-यावर गेले होते. जुनागड येथे दिवाणांच्या कोठीत बडोदे सरकारचे मंडलीक मियागावचे ठाकूर यांची भेट झाली. ठाकूरसाहेबांनी प्रार्थनासमाजाच्या कार्याबद्दल आस्था दाखविली व मियागाव ह्या आपल्या जहागिरीच्या गावी दोन दिवस राहून जावे यासाठी मोठ्या आग्रहाने निमंत्रण दिले. त्यानुसार विठ्ठल रामजी शिंदे बी. बी. सी. आय. रेल्वेवरील मियागाव स्टेशनवर उतरले. वेळ दुपारी भर बाराची. गाडी पकडण्याच्या नादात आदल्या दिवशी त्यांना उपवास पडला होता. त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले कोणतेही वाहन दिसेना. गाडी गेल्यावर दोन-चार मिनिटांतच सर्वत्र सामसूम झाले. स्टेशनमास्तर, पोर्टर हे कोठे गेले ते कळले नाही. दीड दिवसाच्या उपोषणाने त्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. ट्रंक व बिस्तरा प्लॅटर्फार्मवर टाकून अन्नाच्या शोधात ते निघाले. अर्ध्या मैलावर एक कुग्राम होते. फारशी माणसे दिसत नव्हती. ते एका ब्राह्मणाच्या घरी शिरले. त्यांच्या घरी श्राद्ध होते असे कळले. दोन प्रहर उलटून गेले तरी हा गृहस्थ नुकताच हजामतील बसला होता. “जेवणाची सोय होईल का?” असे शिंदे यांनी विचारताच “तुम्ही ब्राह्मण आहात का?” असे त्यांनी विचारले. शिंदे यांनी नाही म्हणताच त्याने चक्क बाहेर जाण्यास सांगितले. शेवटी हताश होऊन ते एका शिंप्याच्या दुकानावर आले व त्याला आपली कठीण अवस्था सांगितली. शिंप्याला त्यांची दया आली. त्याची बायको तळ्यावर पाणी आणावयास गेली होती. ती आल्यावर काही उरलेसुरले असेल ते मिळे का पाहू असा दिलासा त्या शिंप्याने दिला. शेवाळलेला घाणेरडा पाण्याचा घडा डोकीवर घेऊन बाई परत आली. तिने एका पितळीत आदल्या दिवशीचा भात व त्याहून शिळी कढी एका वाडग्यात वाढली. विठ्ठल रामजींनी पाहिले तो कढीत चार-पाच माशा पडलेल्या होत्या. मुकाट्याने त्या वेचून टाकून त्यांनी ते अन्न अधाशासारखे खाल्ले. पण त्यांना पाणी काही पिववले नाही. कसेबसे आचवून ते बाहेर ओट्यावर शिंप्याजवळ येऊन एका चटईवर बसून ते पाणी प्याले. त्यांच्याजवळ त्याच चटईवर एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याची काही फिकीर न करता हा पाहुणा पाणी पितो हे बघून शिंपी भलताच रागावला. त्याने काहीच मुर्वत न ठेवता शिंदे यांना दुकानातून खाली उतरण्यास सांगितले. यात मुसलमाचा अपमान होऊन तोही खाली उतला. तो पोलीस शिपाई होता. त्याने शिंदे यांना सगळी माहिती विचारून घेतली. “मी जात न पाळणारा एक मराठा आहे” अशी माहिती त्यांच्याकडून ऐकताच त्या भल्या शिपायाने तेथे एक मराठाच फौजदारसाहेब आहे म्हणून त्यांच्या ठाण्यावर पोहोचवले व सामानही आणून दिले. ते फौजदार शिंदे कोल्हापूरचेच व शिंदे यांच्या परिचयाचे निघाले. त्यामुळे चित्र पालटले. त्यांच्याकडे उत्तम सोय झाली. पोलीसाकरवी ठाकूरांस त्यांनी निरोप दिला. त्यांनी शिंदे यांना घेऊन जाण्यासाठी सुंदर गाडी पाठविली. नानालाल कवींनी पाठविलेल्या पत्रात गफलतीने येण्याची वेळ एक दिवस उशिराची कळविल्याने हा घोटाळा झाल्याचे सांगितले व शिंदे यांना त्रास पडल्याबद्दल ठाकूरजींनी माफी मागिलती. त्यांच्याकडे एक दिवस थाटाचा पाहुणचार घेऊन ते मुंबईस परत आले.

१९०५च्या उन्हाळ्यात विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराष्ट्रात व कर्नाटकात दौरा काढला होता. त्यांच्यासोबत स्वामी स्वात्मानंदजी व डॉ. रुबेन हेही होते. नाशिक येथील काम त्यांनी आटोपले. श्री. नीळकंठराव पाटणकर वकील यांच्या ओळखीचे आसवले या गावी कोणी एक अस्पृश्यवर्गातले श्रीमंत पुढारी होते. पाटणकर यांनी सूचना केल्यावरून ते तिघेजण त्यांच्या भेटीस आसवले येथे गेले. पण या तिघांचा विचित्र वेष त्या अस्पृश्य गृहस्थाने बघितला. शिंदे दाढीवाले, स्वामी, रुबेन हातात एकतारी घेतलेले. ह्या तिघांचा असा विचित्र बेष पाहून हे काहीतरी मागायला भिकारबैरागीच आले असावेत अशी समजूत करून घेऊन मुख्य मालक त्यांना घराबाहेर भेटावयास गेले नाहीत. शेवटी कंटाळून त्यांनी नदीवर स्नान वगैरे उरकले. शिंदे लिहितात, “खावयास आमच्याजवळ उन्हाशिवाय काहीच नव्हते.” मुकाट्याने त्यांनी पुढच्या गावाची वाट धरली.

१९१० सालच्या नाताळात अलाहाबाद येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन होणार होते. त्याचवेळी भरणा-या भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेसाठी विठ्ठल रामजी शिंदे हे अलाहाबादला मध्यरात्री पोहोचले. नाताळचे थंडीचे दिवस होते. ते प्रो. बाबू रामानंद चटर्जी यांच्याकडे उतरणार होते. पण गाडीवाल्याला ते ठिकाण माहीत नव्हते. तास दोन तास अपरात्री इकडे तिकडे भटकल्यावर नाइलाज होऊन त्याने विठ्ठल रामजींचे सामान म्यूर कॉलेजच्या विस्तीर्ण पटांगणावर टाकले व तो निघून गेला. थंडी भयंकर पडली होती. अण्णासाहबे शिंदे यांना सामानाला डोके टेकवून त्या माळरानावर थंडीची ती रात्र काढावी लागली.

सततच्या अशा दगदगीच्या प्रवासातही विठ्ठल रामजी शिंदे हे घरच्या मंडळींना-कधी बाबांना, कधी पत्नीला, तर कधी जनाबाईंना-कटाक्षाने पत्रे लिहीत असत व आपली हालहवाल कळवीत व त्यांची विचारीत असत. उत्तरासाठी पुढच्या सोयिस्कर अशा मुक्कामाचा पत्ता देत असत. पुढे दिलेले कार्ड त्यांनी आपल्या बहिणीला लिहिले आहे.२

जयपूर
ता. १९ दि.१९०९
प्रिय जनाक्का,
काल रात्री १२ वाजता स्टेशनावर पोहोचलो. पण हे पडले त्रैतायुगातील. रात्री ९ वाजताच सर्व वेशीचे दरवाजे बंद होतात. झाले, वेटिंग रुममध्यमेच आम्ही निजलो. आणखी चार युरोपियन उतारू, आम्ही दोघे व एक कोणी बडा अंमलदार अशी ७ बहिष्कृत माणसे ह्या खोलीत घोरत पडलो. पण झोप कोणास लागली कोणास माहीत.

जयपूर फार सुंदर, स्वच्छ व जुने शहर आहे. आम्ही ज्यांचे घरी उतरलो आहो ते फार जुने सोवळे आहेत. त्यांनी मला मोरीजवळ जेवायला वाढले. मी खप्पी जेवलो. उद्या आग्र्याला जाऊन ताज पाहीन.
आ.
विठ्ठल

त्यांच्या ठिकाणी वरच्या पातळीवरचा समंजसपणा व विनोदबुद्धी होती. म्हणूनच मोरीजवळ बसून जेवण करण्याचा खप्पीपणा ते दाखवू शकत होते. शिवाय जेवण करीत असताना दुस-या दिवशी बघावयाच्या ताजमहालाचे आगामी सुख त्यांच्या डोळ्यांसमोर होतेच.

वेषादिकामुळे आसवले गावी अण्णासाहेब शिंदे यांच्यावर जसा चमत्कारिक प्रसंग ओढवला होता तसाच प्रकार १९११ साली बेळगावला त्यांना अनुभवावा लागला. हुबळी येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची कनार्टक शाखा उघडण्यात आलेली होती. त्या शाखेसाठी फंड जमा करण्याकरिता ते आपले सहायक सय्यद यांच्यासह बेळगावला गेले होते. सय्यद त्यांना कुटुंबातल्याप्रमाणे जिव्हाळ्याचे होते. अण्णासाहेबांच्या प्रभावामुळे ते उर्दू हायस्कूलमधील नोकरीचा राजीनामा देऊन मिशनमध्ये आजीव सेवक म्हणून रुजू झाले होते. ते दाढी ठेवीत नसत. मात्र १९०० सालापासून अण्णासाहेब शिंदे यांनी दाढी राखली होती.

बेळगावला राहत असलेल्या एका परिचित सारस्वत गृहस्थाला त्यांनी आपण येणार असल्याचे कळविले होते व त्याचेही आपल्याकडेच उतरावे असे उत्तर आले होते. शिंदे सय्यदांना आपल्याबरोबर घेऊन बेळगावास पोहोचले. ती दुपारची बाराची वेळ होती. त्या सारस्वत गृहस्थाच्या घरी जाऊन त्यांनी विचारणा केली असता घरातील बायकामंडळींनी नोकराकरवी मालक महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचे कळविले. त्यावर अण्णासाहेबांनी आपण येणार असल्याचे मालकांना सांगितले होते व त्यांनी आपल्याकडे उतरावे असे कळविले असल्याचे सांगितले. अण्णासाहेबांच्या दाढीकडे पाहून त्या बायकामंडळींचा हे मुसलमान गृहस्थ असावेत असा ग्रह झाला असावा. कारण त्यांना सामान ओसरीवरच ठेवण्यास सांगण्यात आले. दुपारची वेळ, भूक सापाटून लागलेली, त्यात प्रवासाचा शीण. मात्र बराच वेळ गेला तरी जेवणास बोलावण्याचे चन्ह दिसेना. तेव्हा जेवण नाही, निदान चहाची तरी कुठे सोय होते किंवा नाही ह्याचा सय्यदांनी तलास घेतला. घरासमोरच एक हॉटेल होते. तिथल्या पो-यास चहा पाठवून देण्यास सांगून सय्यद परत फिरले. पण बराच वेळ झाला तरी हॉटेलमधून चहा येण्याचे चिन्ह दिसेना. असे पाहून सय्यदांनी हॉटेलच्या पोरास चहा आणण्यास ओरडून सांगितले. पण तो मालकाच्या तोंडाकडे पहात उभा राहिला. तेव्हा मालक आपल्या पोरावर जोराने खेकसून म्हणाला, “अरे सांग ना, त्यात भ्यायचे काय? चटकन सांगून टाक.” तेव्हा पोरगा सय्यदजवळ येऊन म्हणाला, “साहेब, तुम्हाला चहा देण्याची आमची कोणतीच हरकत नाही.” पण चमत्कारिक नजरेने अण्णासाहेबांच्या दाढीकडे पाहत स्पष्टपणे सांगितले, “तुमच्याबरोबर आलेल्या मुसलमान गृहस्थास मात्र चहा देता येणार नाही. आम्ही फक्त हिंदूंनाच चहा-फराळ देत असतो.” सय्यदांच्या लक्षात सारा प्रकार आला. मालकाला ऐकू जाईल इतक्या बेताने ते म्हणाले, “अरे तुला ठाऊक नाही. हे तर हिंदू आहेत. केवळ दाढी राखली म्हणून काही ते मुसलमान होत नाहीत. त्यांचे नाव शिंदे असून ते मूळचे कर्नाटकातीलच रहिवासी आहेत.” हे ऐकताच मालक लगबगीने सय्यदांकडे आला व म्हणाला, “आम्हाला हो काय माहीत. आता खुशाल चहा घ्या.” शिंदे यांना चांगल्या प्रकारे कानडी भाषा अवगत आहे हे नंतर कळल्यावर तर मालक चांगलाच खजील झाला.३ बाह्य लक्षणावरून निदान करणे किती विपर्यास करणारे ठरते. एखाद्या नाटकातच शोभावी अशी ही घटना होती.

संदर्भ
१.    विठ्ठल रामजी शिंदे, माझ्या आठवणी व अनुभव, पृ. १५३.
२.    शिंदे यांचा पत्रव्यवहार.
३.    जनाबाई शिंदे, साप्ताहिक तरुण महाराष्ट्र, पुणे, ३१ डिसेंबर १९४८.
४.    तत्रैव, पृ. १५५.