परिशिष्टे १, २ आणि ३

लोकमान्य टिळकांचे शिंदे यांना पत्र (PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

परिशिष्ट  १/२

 

जाहीरनामा
श्री
बहुजनपक्ष

येत्या नवंबर महिन्यामध्यें हिंदुस्थानांत नवीन राज्यपद्धतीची प्राणप्रतिष्ठा व्हावयाची आहे. हा मुहुर्तकाल खास महत्त्वाचा आहे. ह्या काळानंतर हल्लींची पक्षघटना, हल्लींच्या राज्यपद्धतीबरोबर लयास जाऊन नवीन परिस्थितीला अनुसरून नवीन राजकीय पक्ष रचिले जाणार, हें भाकित कित्येक राज्यधुरंधर पुरूषांनी केलें आहे, तें खरें होणार. हल्लींचे “जहाल” अथवा “मवाळ”  किंवा “राष्टीय” व “प्रागतिक” हे नांवाचे मुख्य भेद केवळ पद्धतिदृष्टया पडले आहेत. तत्त्वदृष्ट्या नव्हेत. निरनिराळ्या दृष्टीनें पहातां दोन्ही पक्ष राष्ट्रीय किंवा प्रागतिक आहेत असें दिसून येईल. इतकेंच नव्हें, तर हल्ली “राष्ट्रीय’’ हाणविणारा पक्ष सामाजिक बाबतींत जितका व जसा मवाळ आहे, तितका व तसाच “प्रागतिक” हाणविणारा पक्ष सामाजिक बाबतींत जहाल आहे. तात्पर्य इतकेंच कीं, हे पक्ष केवळ कार्यपद्धतीच्या पायावर उभे झाले आहेत. तत्त्वभेदांवर उभे नाहींत. त्यामुळे पुष्कळ वेळां एकाच भूमिकेवर येऊन आपल्या सामान्य तत्त्वांना न सोडतां एक होऊन ह्या दोहों पक्षांना काम करतां येतें. उलटपक्षीं जेव्हां हे पक्ष परस्पर विरूद्ध झगडत असतात तेव्हां तेव्हां ते आपल्या कार्यपद्धतींना अघिक महत्त्व देत असतात किंवा ह्याहूनही कमी दर्जाचीं अशीं कांहीं व्यत्त्किविषयक कारणें घडल्यामुळें त्यांना तात्पुर्ते नसतें महत्त्व येऊन ते भांडत राहतात. अशा दुस-या प्रसंगीं त्या दोघांनाही प्रिय असलेलें जें सामान्य राष्ट्रहित त्यालाही बाधा येते, हें दोघांनाही कळत असतें. असो.


आमच्या भावी राजकारणांत ज्या नवीन नवीन पक्षांच्या पुनर्घटना होत जाण्याचा आज उद्यां संभव आहे, त्यांपैकीं ज्या एका नवीन पक्षाचा आह्यीं वरील मथळ्यांत उल्लेख केला आहे तो पक्ष उभारण्याची शक्यताच नव्हे तर इष्टता, किंबहुना आवश्यकता आहे, असें आमचे नम्र मत झालें आहे. हें मत आमच्या पुष्कळ दिवसांच्या अनुभवानें व निदिध्यासानें झालें आहे. ह्मणून आह्यीं तें जनतेपुढें प्रांजलपणानें आणि निश्चयानें ठेवीत आहों. ह्यावर आमच्या पुष्कळ मित्रांचाही मतभेद होण्याचा पूर्ण संभव आहे. इतरांची तर गोष्टच वेगळी. आमच्याशीं प्रामाणिक मतभेद असलेल्या मित्रांनी जर ह्या मतावर टीका केली तर तिच्यापासून आह्यांला जी शिकवण मिळेल व फायदा होईल, तो आह्यीं अवश्य करून घेऊंच घेऊं. परंतु ह्या आमच्या मतावर वादविवाद करण्याची मात्र आमची इच्छा नाहीं. ज्या अर्थी हें मत आह्यीं जनतेपुढें केवळ पूर्वपक्ष ह्मणून ठेवीत नाहीं, त्या अर्थी त्याला उत्तरपक्ष ह्मणून कसल्याही वादाचा अथवा मताचा स्वीकार करण्याची आह्यांला जरूरी दिसत नाहीं.


व्याप्ति : हिंदुस्थांनातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीय दृष्टया दोन मुख्य व स्पष्ट भाग पडत आहे ते हे कीं, एक, विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलानें पुढारलेला वर्ग आणि दुसरा ह्यांतील कोणतेंच बल अंगी नसल्यामुळें व नाइलाजामुळें मागासलेला वर्ग, किंवा बहुजनसमाज. ह्या दुस-या वर्गांतच अगदीं तिरस्कृत अशा “ अस्पृश्य” वर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लींच्या राजकीय सुधारणेचा नुसता अरूणोदय होतो व होतो तोंच ह्या दोन भागांमध्यें मोठा विराध भासूं लागला. आणि ह्या विराधानुसारें बहुजनसमाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक आतां जवळ जवळ नवीन पक्षच होऊन चुकला आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. ह्यालाच केव्हां केव्हां ब्राह्मणेतर पक्ष असेंही नांव दिलें जातें; पण नाइलाज आणि बलहीनता हीं जीं मागासलेल्या वर्गांचीं मुख्य लक्षणें, तीं ह्या वर्गाच्या पक्षास “ब्राह्मणेतर पक्ष” असें केवळ जातिविशिष्ट नांव दिल्यानें अगदीं काटेकोर रीतीनें सार्थ होत नाहीं. ह्मणूनच ह्या नवीन पक्षास “बहुजनपक्ष” अथवा “जनपदपक्ष” अशीं अगदीं सार्थ आणि निर्विकल्प नांवे दिल्यानें ह्यावर कसलेही आक्षेप आणणारास जागा उरणार नाहीं. जाती. धर्म अथवा सामाजिक डामडौल इत्यादि जे केवळ भावनात्मक विषय असतात, त्यांचा राजकारणांतील व्यवहारांशीं किंवा पक्षांशीं प्रत्यक्ष रीतीनें संबंध पोहोंचत नाहीं. ह्मणून अशा विषयांच्या पायावर किंवा सबबीवर राजकीय पक्षाची उभारणी करणें इष्ट होणार नाहीं, किंबहुना शक्यही नाहीं, असा इतिहासाचा अनुभव आहे. ह्यासाठीं आमच्या ह्या “बहुजनपक्षा” शीं देखील ह्या किंवा असल्या इतर आगंतुक विषयांचा तत्त्वत: संबंध नाहीं, हें निराळें सांगावयास नकोच. कारण, आमचा हा पक्ष केवळ ऐहिक हितसंबंधाच्या भरीव पायावर रचिलेला आहे. जात, धर्म अथवा देश एतदविषयक द्वेषाच्या किंबहुना प्रेमाच्या पोकळ भावनात्मक पायावर नव्हे. व्यत्त्कि किंवा व्यत्त्किसमूह कोणत्याही जातीचा अथवा कोणत्याहि धर्माचा अथवा देशाचा असो किंवा नसो, ते सर्व ह्या नवीन पक्षांत सामील होऊं शकतात. मात्र त्यांचा हितसंबंध आणि आमचा हितसंबंध एक असले पाहिजेत. इतकेंच नव्हे तर अशी त्यांनीं उघड उघड कबुली देऊन एकनिष्ठेची प्रतिज्ञा केली पाहिजे.


कार्यपद्धति : मुसलमान, ख्रिस्ती, शीख, यूरोपियन इत्यादिकांना स्वतंत्र मतदारसंघाचे सवलतीचे हक्क मिळाले आहेत. परंतु त्या हक्कांच्या बळावर हे वर्गही डोईजड होण्याचा संभव मात्र निःसंशय आहे. खरोखरच ते डोईजड होतील तर त्यांच्या आणि बहुजनसमाजाच्या हितसंबंधांत परस्पर विरोध उत्पन्न होणार. ज्या अर्थी अशा विरोधामुळेंच हिंदु समाजांतील पुढारलेल्या वर्गांशीं वेगळें होऊन, स्वतंत्रपणानें हा नवीन पक्ष उभा करावा लागत आहे, त्या अर्थी, वरील परदेशी किंवा परधर्मी लोक जर डोईजड होऊन आमच्या हितसंबंधांच्या आड येतील तर त्यांच्याशींही अगदीं स्वतंत्र बहाण्यानें ह्या पक्षाला वागावें लागेल, हें उघड आहे. तथापि ही महत्त्वाची गोष्ट देखील सर्वांनीं ध्यानांत ठेवणें जरूर आहे कीं, हा नवीन पक्ष जरी इतरांशीं स्वतंत्रपणानें वागणार आहे तरी जेथें जेथें त्याच्या हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील, तेथें तेथें त्याचा समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यत्त्कि असो अथवा पक्ष असो, त्याला सक्रीय साह्म करावयास तयार असेल, त्याच्याशीं तेवढ्यापुरतें सहकार्य करावयाला हा पक्षही तयार राहील. कारण ह्या पक्षाच्या पायाखाली केवळ पोकळ मनोभावना नसून, भरीव हितसंबंध आहेत. त्यांची राखण आणि पुरस्कार करण्याचें निस्पृह काम ह्या पक्षाला आपल्याच पायांवर उभा राहून व आपल्याच हातांनीं करावयाचें आहे. आमचे सहकारी ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असोत, मवाळ कीं जहाल असोत, किंबहुना स्वकीय असोत कीं परकीय असोत, त्यांनी कोणतींही नांवें, रूपें किंवा मतें स्वीकारिलीं असोत, फार तर काय त्यांचा पूर्वेतिहास कसाही असो, जोंपर्यंत आपल्या हितसंबंधांचा पुरस्कार प्रामाणिकपणानें आणि जोरानें त्यांच्या हातून होईल अशी आमची खातरजमा कायम राहील, तोंपर्यंतच आह्यी त्यांच्याशीं व तेवढ्यापुरतेंच सहकार्य करावयास मोकळे राहूं. एरवीं त्यांना आमचा रामराम. थोडक्यांत सांगावयाचें झाल्यास आह्यी आमच्या दोस्तांशीं समान दर्जानें केव्हांही करण्यास तयार, पण त्यांच्यांत सामील होण्यास तयार नाही; आणि जर कोणी आमचे दुष्मन असतीलच तर त्यांनाही पण आमचा दुरूनच रामराम! पण त्यांचाही द्वेष करण्यास आह्यीं तयार नाहीं. कारण द्वेषावर आमचा मुळी भरंवसाच नाहीं. आमचे कोणी हितशत्रु आह्यांला हे द्वेषाचें शुभवर्तमान शिकविण्यास आलेच तर त्याप्रसंगीं परमेश्वरच आमचें रक्षण करील.


हितसंबंध : आमची व्याप्ति व पद्धति वर सांगितली. पण आमची मुख्य मदार आमच्या विशिष्ट हितसंबंधांवरच आहे. हे हितसंबंध केवळ मनोभावनांवर किंवा एकाद्या तात्त्विक सामान्य सिध्दांतावर अवलंबून नाहींत. ते नित्याच्या व्यवहारांशी व ऐहिक नफ्यातोट्यांशी निगडीत आहेत. असे हे विशिष्ट हितसंबंध अर्थांतच असंख्य असल्यामुळें, त्यांची पूर्ण यादी तयार करणें हें कांहीं सोपें काम नाहीं व त्याची आज व्यावहारिक जरूरीही पण नाहीं. सामान्य स्वरूपानें त्यांतील कांहींचा येथे निर्देश करणें जरूर आहे. तथापि ही गोष्ट सर्वांनींच ध्यानांत ठेवणें अवश्य आहे. कीं, धर्म अथवा तत्त्वज्ञान ह्यांतील विषय किंवा मुद्दे ज्या प्रकारे त्रिकालाबाधित व शाश्वत स्वरूपाचे असतात, तसा राजकारणाचा प्रकार मुळींच नाहीं. बुद्धीबळांतील मोह-यांप्रमाणें राजकाराणांतील मुद्यांचा रोखच नव्हें तर ठावठिकाणही बदलणें भागच पडतें. राजकारण हें व्यवहारशास्त्र आहे. त्याचेहि नियम आहेत. पण त्या नियमांचे कायमचे साचे बनवितां येत नाहींत. आपल्या अंतिम ध्येयाला बाधा न आणतां आपले स्थान बदलणें, आपलें धोरण बळकट राखूनही आपला दर्शनी रोंख बदलणें, इत्यादि डावपेच राजकारणांत जो खेळेल तोच टिकेल. आणि अशा डावपेंचांत जो निर्भ्रांत प्रामाणिकपणा राखील, वाटेंत कोणत्याहि मोहाला वश होणार नाहीं, संकटाला जुमानणार नाहीं, कीं कपटाला बळी पडणार नाहीं तोच ह्या खेळांत अखेरी मारील. ह्मणूनच राजकारणाचा जरी कोत्या दृष्टीच्या कांहीं लोकांनीं एकाद्या वेश्येप्रमाणें धिःकार केला आहे, तरी जे खरे दूरदर्शी आहेत त्यांनी ह्याची अत्युच्च कर्मयोगांत गणना केली आहे. ही दूरदृष्टि शाबूत ठेवूनच खालील हितसंबंधांचे निदर्शन करण्यांत आलें आहे.

 

१ शेतकरी वर्ग - ह्यांत डोईजड जमीनदारांचा अथवा पिढीजाद जहागीरदारांचा समावेश मुळींच होऊं शकत नाहीं. जो आपल्या मालकीचें अथवा कौलाचें शेत आपणच वाहतो, आणि त्या कामासाठीं पुरेशा मजूरदारांना समान दर्जानें योग्य वेतन देऊन सांभाळतो. तोच शेतकरी जाणावा पाश्चात्य देशांत अशालाच “पेझंट प्रोप्रायटर” हाणतात. तो जरी स्वतंत्र असला तरी, त्याला कोठेंही धन, विद्या अथवा अधिकार नसल्यामुळें, अद्यापि तो सर्वत्र मागसलेला राहिला आहे.


२ शिपाईवर्ग - ह्यांत सरदारांची गणना मुळींच नाहीं. कारण अधिकारबलामुळें त्यांचा समावेश पुढारलेल्या वर्गांत करणें योग्य आहे. हितसंबंधांच्या विरोधामुळें बहुजनपक्षांत हे सामील न होणे साहजिकच आहे. पण सामान्य शिपायांचे हितसंबंध आमच्या पक्षानेंच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेलेच आहेत. कुणबी हा सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमिनदार अथवा जहागिरदार हें केवळ त्याचे पोष्य होत! तसेंच हातावर शीर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय होय. तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे. त्याच्या बळावर किताब मिळविणारे व पिढीजाद पेन्शनें झोडणारे सरदार हे जातीनें क्षत्रिय असले तरी ते मागसलेले नसतात ह्मणूनच त्यांच्या हितसंबंधांची काळजी आमच्या पक्षाला वाहाण्याचें कारण नाहीं. पण शिपाईगिरी मात्र आह्यीं राखलीच पाहिजे. ती आह्यी आनंदानें राखूं.


३ शिक्षक वर्ग -  ह्यांत सोंवळेंशास्त्री, हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी हे असल्या इतर ऐतखाऊंची गणना करतां येत नाहीं. वाड्मयाचें किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत, आणि जे आपल्या वृत्तीचा पिढीजाद हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणें चालू वेतन घेण्यास तयार आहेत, त्यांची जात, धर्म, देश कांहीं असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षानें राखणें जरूर आहे. कारण तेही मागासलेलेच आहेत व त्यांचे हितसंबंध हे राष्ट्रीय आहेत.


४ उद्यमी - सुतार, सोनार, साळी, शिंपी, गवळी, माळी, तेली, तांबोळी, इत्यादी दिसण्यांत लहानसान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित आणि अनधिकारी वर्ग आहेत, हेही राष्ट्राचे धारक असून ह्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई  यांच्यापेक्षां रतीभरही कमी नाहीं ते मागसलेले आहेत. नाटकवाले, गोंधळी, शकून सांगणारे जोशी आणि पोवाडे गाणारे शाहीर, फार तर काय पण वैदू आणि पोरक्या मुलांना पाजणा-या दायांचीही जरूरीं प्रसंग विशेषीं ह्या बहुजन-समाजरूपी बळीराजाला लागते. तर मग त्यांच्या हिताचा विसर त्याला कसा पडेल?


५ दुकानदार - ह्यांत व्याज देऊन दुस-यांचे भांडवल वळवून आणून त्यावर गब्बर होणारे पेढीवाले वर्ज्य आहेत, असें समजावें. परंतु उद्यमी लोकांच्या व मजुरांच्या साह्याने जी राष्ट्रीय संपत्ति शेतक-यांनें निर्माण केली व शिपायानें राखिली तिची देशभर वांटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांचीही तितकीच जरूरी आहे. तोही जोंवर मागसलेला राहील, आणि डोइजड होऊन बहुजनसमाजाचें रक्त बिन हक्क शोषणार नाही तोंवर त्यालाही पुढें आणण्यासाठीं आमच्या पक्षानें झटणें अवश्य आहे.


६ मजूरवर्ग - ह्यांत बाजारभावाप्रमाणें वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हें तर बुद्धिचातुर्य लढविणारे वकील, डॉक्टर ह्यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबलामुळें आपल्या गरजेपेक्षां ज्यास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही जाऊन सहज बसतो. इतकेंच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजनसमाजाचेंही पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वांट्याला येंते. आणि मग सगळीच कालवाकालव होऊं लागते. असे लोक तत्त्वतः मजूर असले तरी वस्तुतः मागसलेले नसल्यामुळें, त्यांच्या हितसंबंधाची जोपासना करण्याची जबाबदारी दुर्बळ जन-पद-पक्षावर न ठेवतां, त्यांच्या स्वतःवरच ठेवणें अधिक योग्य होईल. बाकी उरलेल्या ख-या आणि अंगमेहनती मजुरांची दाद तर आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेंच लागणें शक्य नाहीं. बाजारभावाप्रमाणे आपल्या मजुरीचे दर, कामाची वेळ, विश्रांतीच्या अटी, बाळपण, आजारीपण, ह्यातारपण, कौटुंबिक आणि स्त्रीपणाच्या आपत्ति इत्यादि कारणांवरून उद्भवणारे हक्क वगैरेंची मागणी करण्यास हा वर्ग मोकळा आहे, ह्याविषयीं तर प्रश्नच नाहीं. पण ही मागणी राष्ट्राचें समवाय-हित सांभाळून, ती पूर्ण रीतीनें वसूल करून घेण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगी येईल अशी संघशक्ति त्यांच्यामध्यें आणणें हें ह्या पक्षाचें अत्यंत महत्त्वाचें, जरूरीचें आणि कठिण असें कर्तव्य आहे. तथापि हा पक्ष ह्मणजे केवळ मजूरपक्षच नव्हे. तो जनपदपक्ष असल्यामुळें सर्व राष्ट्राचा पक्ष आहे. मजूर डोईजड झाल्यास त्याची समजूत करण्याचाही अधिकार सर्वांपेक्षां ह्या पक्षालाच जास्त आहे.


७ अस्पृश्यवर्ग - अस्पृश्यपणामुळें हा वर्ग मागसलेला आहे, इतकेंच नव्हें तर चिरडला आहे. धर्माची, परंपरेचीं, रूढींचीं, अगर दुसरीं कोणतींही खरीं खोटीं कारणें सांगत न बसतां ह्या वर्गाची अस्पृश्यता व असाह्मता पूर्णपणें नष्ट करून त्यांना अगदीं समानदर्जानें बहुजनसमाजांत एकजीव करणें हें ह्या पक्षाचें केवळ पवित्र काम आहे. तें तातडीनें केलें तर धडगत आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादांत, ढोंगी ठरावांत आणि मतलबी सहानुभूतींत अगोदरच दवडली गेली असल्यामुळें, ह्या  वर्गांतील कांहीं व्यक्तींना साहाजिकपणें भलतेंच  वळणही लागून चुकलें आहे. ही ठेंच खाऊनही आमच्या पक्षाचे डोळे उघडले नाहींत तर ते कायमचे झांकलेले बरे, असें ह्मणण्याची पाळी जवळ येऊन ठेपली आहे!


८ स्त्रीवर्ग - चालूं राज्यक्रांतींत आमच्या देशांतील स्त्रीवर्गाचे हातीं कांहींच लाभलें नाही ह्मणून आमच्या पक्षानें हताश होण्याचें कारण नाहीं. उलटपक्षीं, आमचा पक्ष विद्वानांचा नाहीं, वतयांचा नाहीं, ह्मणून तो स्त्रीवर्गाला विसरणारांचा आहे असें थोडेंच होणार आहे! स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा! त्यांची हयगय करूं तर पाळण्यांतच आमचे थडगें डोलूं लागेल हे आह्यीं पूर्ण जाणून आहों. ह्याची साक्षही आह्यी थोडी बहुत पटवून दिली असतांही नामधारी “राष्ट्रीय’’ आमच्यावर रागावतात आणि “प्रागतिक”’ ही आयत्या वेळेस आमच्यावर रुसतात. पण आज नाहीं उद्यां तरी जागरूक स्त्रियांच्या ध्यानांत खरा प्रकार आल्याशिवाय राहणार नाहीं.


येथवर आह्यीं केवळ वर्गवारीनें हितसंबंधांचें निरीक्षण केलें. पण ज्यांची अशी वर्गवारी मुळींच करतां येत नाहीं असे पुष्कळ हितसंबंध आहेत. त्यांचा पुरस्कार करण्याची जरूरी पुढारलेल्या पेक्षांही मागसलेल्यांसच जास्त आहे, हें बारकाईनें विचार केल्याशिवाय स्पष्ट दिसणार नाहीं. उदाहरणार्थ सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधि आणि सामाजिक परंपरा पाळण्याचे बाबतींत स्वयंनिर्णयाचा, इत्यादि कोणताही प्रश्न घ्या.


हे सर्व राष्ट्रीय असूनही, स्वत:स “राष्ट्रीय” म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हां त्यांच्या आड येतो आणि “प्रागतिक” म्हणवून घेणारा पक्षही आपले हात टेंकतो तेव्हां बहुजनसमाजास जागें करून त्याला स्वत:च्याच पायावर उभें करण्याचें कठीण काम करण्यासाठीं आमच्यासारख्या एकाद्या नवीन आणि स्वतंत्र पक्षाला पुढें यावें लागतें, ह्यांत आमचा नाइलाज आहे. निदान आमची प्रौढी तरी खास नाहीं. इतकेच नव्हें तर ह्या पूर्वीच हा पक्ष निर्माण झाला नाहीं आणि पुढें तरी ह्याचे हातून काय होणार, याची खातरजमा नाहीं, तोंपर्यंत ह्या विषयावर अधिक विचक्षणा करण्याचें देखील आम्हांला धैर्य येत नाहीं. राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल, ज्याचे हितांचा आमच्याशीं विरोध नसेल, ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साह्म तरी करतीलच. इतर वावदूकांच्या वाटेला जाण्याला आम्हांला वेळ नाहीं. त्यांच्या उपटसूळ वादांवर आमचा विश्वासच नाहीं, ह्यांत आमचा तरी काय इलाज?


वरील विवेचन आम्हीं केवळ आमच्या अनुभवानें केलें आहे. तें निर्भ्रांत आहे, असा आमचा भ्रम झालेला नाहीं, एवढी तरी आमच्यामध्यें जागृति आहे. वरील विवेचनांत चूक असेलच तर ती जोंपर्यंत आम्हांला दिसत नाहीं, तोंपर्यंत आम्हीं उगाच खोळंबून राहावें हें आम्हांस आत्मघातकी व देशघातकीपणाचें वाटत आहे. पक्षाची रचना किंवा घटना व्हावयाची आहे. हा लेख त्याची जाहीर प्रस्तावना एवढ्याच भावनेनें प्रसिद्ध करण्यांत येत आहे. पुढील कार्य ईश्वरी संकेतावरच अवलंबून आहे.

 

विठ्ठल रामजी शिंदे.
नानाची पेठ, भोकरवाडी,
पुणे, ता. १ सप्टेंबर १९२०