दुस-या वर्षातील ईस्टरची सुटी पारीस पाहण्यात घालवावी असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ठरविले होते. त्याप्रमाणे ते पारीसला जाण्यासाठी १३ मार्च १९०३ रोजी रात्री साडेदहा वाजता बोटीने न्यू हेव्हन येथून निघाले. समुद्र शांत व चांदणे स्वच्छ असल्याने प्रवास सुखाचा झाला. पारीस येथे सकाळी सात वाजता ते पोहोचले व शाब्रॉल् हॉटेलमध्ये मुक्काम केला.
पारीसच्या मुक्कामात शक्य तेवढ्या ऐतिहासिक वास्तू, प्रेक्षणीय स्थळे, उत्तमोत्तम शिल्पे पाहावी; धार्मिक, सामाजिक स्थितीचे निरीक्षण करावे व विद्वानांच्या भेटी घेऊन माहिती मिळवावी, चर्चा करावी असा त्यांचा उद्देश होता. लुक्षंबर्ग राजवाडा, पँथिऑन व सोबान अथवा पारीस युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली. पँथिऑनची इमारत बघितल्यावर फ्रेंचांची कला, कल्पना आणि कारागिरी तसेच सौंदर्याची रुची ग्रीकांप्रमाणेच आहे असे त्यांना जाणवले. ट्रायंफल आर्क, प्लेस डी कंकॉर्ड, पेती पॅलेस, त्रकोदेरो पॅलेस इत्यादी भव्य इमारती व प्रेक्षणीय स्थळे त्यांनी पाहिली. ‘म्युजी दि गिमे’ नावाची धर्माची म्युझियम त्यांनी पाहिली. नॉत्र दाम ह्या पारीस येथील अतिभव्य देवळामध्ये ते उपासनेस गेले. हे देवालय सुमारे वीस हजार लोक मावतील एवढे विशाल आहे. सां. व्हिनसां द पाल, मा दिलेन चर्च, सां रोक चर्च इत्यादी देवळांमध्येही ते उपासनेसाठी गेले.
२४ मार्च रोजी शिंदे यांचे बोटीवरील मुंबईचे पार्शी मित्र मि. कोतवाल यांची अचानक भेट झाली. त्यांनी शिंदे यांना शहराबाहेर बो द बलोन हे उपवन पाहावयास नेले. अत्यंत आखीव, रेखीव रूप दिलेले हे उपवन शिंदे यांना फारसे आवडले नाही. “एखाद्या सिंहाचे दात व नखे उपटून काढावीत व त्यास मिंधे करून एखाद्या श्रीमंताच्या लाडक्या पोरास खेळावयास द्यावे तशीच गत ह्या पारीसजवळच्या उपवनाची झाली आहे. झाडे दुकानात ठेवल्याप्रमाणे एकाच नमुन्याची. एकंदर देखावा इतका माणसाळलेला की ह्यास उपवन म्हणण्यापेक्षा अरण्याचे प्रदर्शन म्हणणे अधिक शोभते.” शिंदे यांना पारीस येथील उपवन जसे आवडले नाही त्याचप्रमाणे पारीस येथील करमणुकीची ठिकाणे व तेथे येणा-या लोकांचा वर्तनव्यवहारही रुचला नाही.
२६ मार्चला रात्रौ कोतवाल यांच्याबरोबर ते ‘ऑलिंपिया’ नावाच्या उत्तम गणल्या गेलेल्या म्युझिक हॉलमध्ये गेले. ‘नव्याचा पाश्चात्त्य अतिशोष पडल्यामुळे येथील लोकांची रुची बिघडत चालली आहे.’ असे त्यांना वाटले. तरुण मुलींना तंग पोशाख देऊन त्यांच्याकडून निरनिराळे ढंग करविणे हा येथील लोकांचा करमणुकीचा प्रकारही त्यांना फारसा भावला नाही. ह्या म्युझिक हॉलमधील लोकांचे ते निरीक्षण करीत होते. नाटकगृहात पुष्कळ वारयोषिता राजरोस विचारीत हिंडत होत्या. अशा बायका आपल्या धंद्यासाठी नाटक पाहावयास येतात. त्यांच्याशी बोलण्यात, हिंडण्यात कुणालाही संकोच वाटत नाही, असे शिंदे यांना दिसले. नाटक संपल्यावर नाटकगृहाखाली असलेल्या विस्तीर्ण उपाहारगृहामध्ये अशा बायकांची व पुरुषांची गर्दी जमते आणि ते यथेच्छ स्वैर वर्तन करतात. हे स्थळ दाखविल्यानंतर कोतवाल शिंदे यांना ‘मॅक्झिमस’ नावाच्या श्रीमंत थाटाच्या बदफैली उपाहारगृहामध्ये घेऊन गेले. शिंदे तेथे फार वेळ राहिले नाहीत. रात्री दोन-चार वाजेपर्यंत येथे रंग उडतो. प्रत्यक्ष अशा ठिकाणी कसलेही अपकृत्य होत नाही. तथापि स्वैराचारी स्त्री-पुरुष येथे एकत्र बसतात, उठतात, हिंडतात. काही स्त्रिया फार सुंदर आणि श्रीमंत दिसल्या. रात्री पत घरी येताना भेटणा-या सर्व स्त्रिया कुमार्गी आढळतात. असा हा पारीस येथे नित्य घडत असलेले प्रकार पाहून शिंदे यांचे डोके विचाराने भणभणले. नीतीसंबंधी एकंदर प्रश्न बिकट असला तरी त्याचा विचार वा उल्लेख होत नाही, किंबहुना वैवाहिक नीतीचा लोक अद्याप अनुभवपद्धतीने विचार करीत नाहीत याचे त्यांना आश्चर्य वाटते. ‘नीतिशास्त्र्यांनी पारीस येथील व्यवहार अवश्य निरीक्षावेत व त्यावरून वैवाहिक नीतीचे लक्षण बांधावे आणि समाजशास्त्राचेही धोरण राखावे’ इत्यादी विचार त्यांच्या मनामध्ये येऊन गेले.
दुस-या दिवशी रात्री कोतवाल ह्यांनी शिंदे यांना ‘बॉई बॉला’ नावाच्या सार्वजनिक नाचाचे ठिकाण दाखवावयास नेले. एक फ्रँक देऊन पाहिजे तेव्हा आत करमणुकीसाठी जावे. व्हायलीनवाल्याचा मनोहर बँड येथे वेळोवेळी सुरू होतो, तेव्हा वाटेल त्याने वाटेल तिच्याबरोबर नाचून लागावे, क्रीडावे, हिंडावे, बोलावे, उपाहार घ्यावा, किंवा संकेत करावा अशी येथील रीत त्यांना दिसली. येथेही रंगेल स्त्रिया अगदी उघड उघड येऊन विचारीत. सुमारे एक हजार माणसे येथे उल्हास करीत होती.
आजचे हे दृश्य बघितल्यानंतर शिंदे यांचा विचाराचा कल आदल्या दिवसाहून वेगळा झाला. त्यांचे मन क्षमाशील झाले. इतकेच नव्हे तर ह्या परिस्थितीबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती उत्पन्न होऊ लागली. त्यांच्या मनात आले, ‘हल्लीच्या उद्योगाच्या झटापटीत मनुष्यास कसल्या तरी करमणुकीची आवश्यकता आहे. धर्माधिका-यांनी शुद्ध करमणुकी जर पुरविल्या नाहीत तर इथल्याप्रमाणे अशुद्ध व केव्हा केव्हा मोठ्या घातुक करमणुकी आत शिरतात.’ इंग्लंडात हल्ली धर्माच्या बाबतीत खटपट करणारे मिशनरी शुद्ध करमणुकी पुरवून कामगारवर्गाचे मन धर्माकडे वळविण्याचा प्रयत्न करतात, ह्याबद्दल शिंदे यांचे फारसे अनुकूल मत नव्हते. ख-या धर्मप्रवृत्तीला निवृत्ती आवश्यक असते. निदान समाधान पाहिजे असते. धर्मप्रवृत्तीला करमणुकीमुळे अडथळा येतो असे त्यांना पूर्वी वाटत होते. आजही त्यांच्या ह्या मतामध्ये फारसा बदल करावासा वाटला नाही. तरी त्यांच्या मनाची एवढी निश्चिती झाली की, ‘शुद्ध करमणुकी पुरविल्या नाही आणि कॅथॉलिक धर्माप्रमाणे फाजील सोवळेपणाचा दंभ माजविला तर पारीससारखे मासले दिसणारच.’१
विठ्ठल रामजी शिंदे यांनी पारीसमध्ये बघितलेल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी वैशिष्ट्यपूर्ण स्थळे म्हणजे तेथील स्मशानभूमी होय. मों मांट ह्या नावाची स्मशानभूमी त्यांनी २७ मार्चला पाहिली. ५ एप्रिलला मों पार्नार्द बंद असल्यामुळे ती त्यांना पाहता आली नाही. मात्र दुपारून ‘पेर ला शाज’ ही सर्वात मोठी स्मशानवाटिका त्यांनी बघितली. तेथे प्रथम गेल्याबरोबर ज्यांच्यासाठी कबरस्थान नाही अशा सर्वच माणासांसाठी जे एक मोठे स्मारक भिंतीत कोरलेले आढळले, ते त्यांना मोठे वेधक वाटले. “मृत नवरा-बायको भिंतीतल्या दाराशी अज्ञेय प्रदेशाकडे जात आहेत. दोहीकडून कित्येक मृत विन्मुखपणे त्याच्यामागून चालले आहेत. खाली तेच जोडपे अखेर निद्रेत उघडे पडले आहेत. त्यावर त्यांचे अर्भक पालथे पडले आहे. आशादेवीने थडग्यावरील उचलून धरली आहे.” हे शिल्प त्यांना फारच परिणामकारी वाटले.
एकंदर स्मशानवाटिका त्यांना फार प्रेक्षणीय वाटली. पुष्कळ थडगी म्हणजे लहान लहान देवळेच आहेत... “स्मशानात स्वच्छ व सुंदर सडका. दोही बाजूंनी उंच झाडी. त्यांच्या खालीही एकाला एक चिकटून असलेली थडग्यावरची देवळे, असा एकंदर देखावा पाहून आपण पाताळ लोकांत मृतांच्या स्तब्ध शहरातच आहोत असे वाटते. येथील करुणरसपर शिल्पकारागिरीही पाहण्यासारखी आहे. कवी, वक्ते, योद्धे, मुत्सद्दी, चित्रकार, गायक ह्या सर्वांची माती येथे मातीत मिसळली आहे. अशा देवळात एकेका कुटुंबातील सर्व माणसे” पुरलेली असतात. कुटुंबीयांनी भेट दिल्यावर तेथे बसून प्रार्थना करण्यासाठी खुर्च्यांची वगैरे व्यवस्था असते. मृतांची रक्षा ठेवण्यासाठी एक गॅलरी बांधलेली असते, त्यामध्ये राख ठेवून वर तावदान अगर संगमरवरी दगड बसवलेला असतो. मृताचा फोटो अगर लहानसा मुखवटा वर बसिवतात, वगैरे बाबींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. सुमारे दोन हजार अशी लहान लहान स्मारके असल्याचे त्यांनी नोंदविले आहे. तीस लाख प्रेते जिथे पुरली आहेत अशी ही अतिविस्तीर्ण स्मशानवाटिका पाहून व तेथील वातावरण अनुभवून शिंदे यांची वृत्ती अंतर्मुख झाली. ते लिहितात, “फुलामाळांचे निर्माल्य येथे बरेच साचलेले असते. जळक्या राखेवरही मागच्याची माया कशी लोलुप होते हे पाहून मन द्रवते. तसेच अशा प्रकारे स्मारक करण्याची चाल अगदी रानटी अवस्थेपासून युरोपच्या हल्लीच्या सुधारलेल्या काळापर्यंत कशी अखंड चालू आहे हे पाहून मनात ऐतिहासिक विस्मयही दाटतो. एकंदरीत तत्त्वज्ञान, नीती, काव्य व धर्म इत्यादी अनेक गहन विषयांवर गंभीर चिंतन करण्यासा ही पारीस येथील कॅथॉलिक स्मशानस्थळे अत्यंत अनुकूल आहेत.२
हल्ली या स्थळाला भेट दिली असता संपूर्ण स्मशानवाटिकेच नकाशा मिळू शकतो. ह्या नकाशामध्ये स्मशानवाटिकेतील सर्व रस्ते व पुरलेल्या प्रमुख व्यक्तींची देवळे निर्देशिलेली आढळतात. ऑगस्ट डी कोम्त, राफेल, मोलियर, बालझॅक इत्यादी फ्रान्समधील नामवंतांच्या समाधी ह्या स्मशानवाटिकेमध्ये आहेत.३
पारीस येथील प्रेक्षणीय स्थळे पाहावीत त्याचप्रमाणे येथील विद्वान लोकांच्या भेटी घेऊन धार्मिक, सामाजिक परिस्थितीचे आकलन करून घ्यावे असाही शिंदे यांचा दुसरा एक महत्त्वाचा उद्देश होता. या हेतूने त्यांनी पारीस युनिव्हर्सिटीच्या काही विद्वानांना व इतर उदार धर्मानुयायांना त्यांचे गुरू डॉ. कार्पेंटर यांच्याकडून ओळखीची शिफारसपत्रे घेतली होती. त्यानुसार ते प्रथम बॉनेमोरी या वृद्ध प्रोफेसरास भेटले. ते त्यांना डॉ.भांडारकरांसारखे किंचित कडक व उग्र दिसले. शिंदे हे ऑक्सफर्ड कॉलेजातील ब्राह्मसमाजाचे एक प्रतिनिधी आहेत व प्रो. कार्पेंटर यांनी त्यांना शिफारशीचे पत्र दिले ते पाहून शिंदे यांच्याबद्दल त्यांचे अनुकूल मत झाले. प्रोफेसरसाहेबांनी त्यांना सल्ला दिला की, तुम्हाला पारीस खरे पाहावयाचे असल्यास येथील नटव्या इमारती पाहून न भुलता त्यांच्या माळयावरील गाळ्यात शिरून डोकावून पाहा. तेथील कंगाल, चोरटे व गुंड लोक बिळातल्या उंदराप्रमाणे चोरून रात्री आश्रयाला राहतात त्याची कारणेही शोधा.
प्रो. जाँ रेव्हील हे विद्यापीठात आधुनिक धर्माच्या इतिहासाचे अध्यापक होते. शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व फ्रान्समधील धार्मिक परिस्थितीची माहिती करून घेतली. १७८९ पर्यंत म्हणजे राज्यक्रांतीपर्यंत प्रोटेस्टंटास धर्मस्वातंत्र्य मिळत नव्हते. आता कॅथॉलिक, प्रोटेस्टंट व यहुदी अशा तीनही संघांना सारखाच आश्रय मिळू लागला आहे. सोशालिझमची सामाजिक चळवळ जोराने चालू असली तरी सोशालिस्ट लोक हे धर्मांच्या बाबतीत नास्तिक मताचे लोक आहेत. कॅथॉलिक मताच्या जुलमास कंटाळून हे सर्व धर्माविरुद्ध बंडास प्रवृत्त झालेले आहेत. ह्याप्रमाणे एकीकडे कॅथॉलिक धर्माचा अढाणीपणा, धर्मवेड व जुलूम तर दुसरीकडे सुधारकांचा बुद्धिअंधपणा, औदासीन्य आणि बंडखोरपणा ह्यामध्ये उदार धर्मांचे काम कठीण झाले आहे अशी वस्तुस्थिती प्रो. जाँ रेव्हील ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या ध्यानात आली. शिंदे नमूद करतात की, पारीस येथे धर्माचे नाव काढल्यास कित्येकांस हासे येते.
विठ्ठल रामजी शिंदे यांचे इंग्लंडमध्ये तसेच अन्य युरोपीय देशातील कुटुंबामध्ये स्वागत होत असे. अनेक गृहस्थ मंडळी बोलवीत असत असे दिसते. इंग्लंड, युरोपमध्ये अशी वागणूक एखाद्या भारतीयाल मिळणे ही बाब दुर्मीळच म्हणावी लागेल. शिंदे यांचे अशा प्रकारचे आतिथ्य होत होते याचे एकक कारण म्हणजे ते धर्मोपदेशकाचे शिक्षण घेत होते व या वर्गातील लोकांना तेथे मोठा मान मिळत आलेला आहे. दुसरे कारण, शिंदे यांचे छाप टाकणारे व्यक्तिमत्त्व व त्यांच्या स्वभावातील शालीनता व वागण्या-बोलण्यातील प्रगल्भपणा हे असणार.
२१ मार्च रोजी शिंदे यांनी प्रोफेसर जाँ रेव्हील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. ३० मार्च रोजी रात्रीच्या जेवणासाठी प्रो. रेव्हील यांनी शिंदे यांना बोलावले होते. एकंदर बरीच सभ्य स्त्री-पुरुष पाहुणे मंडळी जेवणासाठी त्यांनी निमंत्रित केली होती. याप्रसंगी शिंदे यांना एक विशेष प्रकार पाहावयास मिळाला. दिवाणखान्यातून जेवणाच्या टेबलाकडे जाण्यापूर्वी रेव्हील बाईंनी पाहुण्याचे एकेक जोडपे तयार केले. त्यात एकीचा नवरा व दुस-याची बायको अशा जोड्या तयार करून दिल्या. अशी जोडपी हातातहात घालून टेबलाजवळ गेली. अशी जोडपी करण्यात पाहुण्यांमध्ये समभाव व स्नेह वाढावा, जेवताना संभाषण चांगले व्हावे, अपरिचितांचा चांगला परिचय व्हावा असे अनेक चांगले उद्देश असल्याचे त्यांना प्रतीत झाले.
मोस्यू रोज यांनी शिंदे यांना २५ मार्च १९०३ रोजी जेवणासाठी निमंत्रित केले होते. शिंदे येणार म्हणून मादाम रोजच्या आईबापांना व बहिणींनाही जेवणासाठी त्यांनी बोलाविले. मादाम रोजबद्दल त्यांचे फार अनुकूल मत झाले. ती त्यांना ‘गोड’ व ‘कुशल’ बाई वाटली. ती इंग्रजी शिकत होती याचे त्यांनी मजेदार वर्णन केले आहे. इंग्रजीत विचारले की मादामची कासावीस होई, ती आतुर नजरेने नव-याकडे पाही, याचे शिंदे यांना फार कौतुक वाटे. फ्रेंच तरुणीस इंग्रजी तरुणीइतकी स्वतंत्रता नाही हे त्यांना बोलण्यातून समजले. विवाह मुलीच्या संमतीने आई-बापच लावतात. अलीकडील दहा वर्षांत स्त्री-शिक्षणाची अधिक सोय व प्रवृत्ती होत आहे. स्त्रियांच्या प्रगतीच्या बाबतीत इंग्रजांचेच येथे अनुकरण सुरू झाले आहे हे नमूद करून फ्रेंच आणि इंग्रच यांच्या संबंधाबद्दल ते आपले निरीक्षण नोंदवितात, “इंग्रजांचा संसारी शहाणपणा फ्रेंच शिकतात व आपली च्छानी म्हणजे फॅशन त्यांना शिकवितात.” इंग्रजापेक्षा फ्रेंच त्यांना अधिक मोकळ्या मनाचे वाटले.
मोस्यू रोज ही पारीसपासून आठ मैल दूर असलेल्या सोक नावाच्या खेड्यात राहावयास गेली असता फ्रान्समधील खेडे पाहावे या हेतूने शिंदे हे त्यांच्याकडे ७ एप्रिल रोजी गेले. दुपारच्या भोजनानंतर कुटुंबाच्या परिवारासह रानात फिरावयास गेले. हा पारीसचा भोवतालचा भागही पारीसला शोभेल असा त्यांना वाटला. प्रत्येक लहान गावातही एक प्लास अथवा पार्क म्हणजे फिरण्यासाठी मोकळी जागा असते. त्यात चौफेर सारख्या साच्याची झाडे असतात. ती पाने व फांद्या तोडून सारखी ठेवलेली आढळली. नंतर सर्व मंडळी रॉबिन्सन या ठिकाणी गेली. तेथे नुसती चाळीस-पन्नास विश्रामालये (म्हणजे रेस्टॉरंटच) होती. करमणुकीखातर रविवारी चार-पाच हजार लोक त्या ठिकाणी जमत. जुन्या झाडाच्या फांद्यांवर दोन अथवा चार मजली घरे केली होती आणि खाण्यापिण्याचे पदार्थ खालून वर चाकावरून ओढून घेत असत. सुमारे साठ वर्षांपूर्वी एका धोरणी पुरुषाने येथे प्रथम एक विश्रामालय उघडले तेव्हा तो रॉबिन्सन क्रूसोप्रमाणे जंगलात एकटाच येऊन राहिला होता म्हणून या ठिकाणास रॉबिन्सन हे नाव पडले. ह्या किफायतशीर उद्योगाचे अनुकरण होऊन सध्या ते मोठेच करमणुकीचे स्थान बनले. मोठमोठ्या जत्रा आणि क्षेत्रे कशी बनतात ह्याचे हे एक उदाहरण आहे असे शिंदे यांना वाटले. फ्रेंचांच्या सामाजिक वागणुकीचा, त्यांच्या हौशी वृत्तीचा हा नमुनाच त्यांना पाहावयास मिळाला.
पारीसच्या वास्तव्यातील आणखी एक महत्त्वाची भेट म्हणजे, मॅडेमोझील् (कुमारी) दुगार ह्या बाईची १ एप्रिल १९०३ रोजी झालेली भेट. त्या कॉलेज मोलिएर ह्या स्त्रियांच्या कॉलेजात वाङ्मय व तत्त्वज्ञान विषयाच्या अध्यापिका होत्या. पारीस येथील स्त्री-शिक्षणाविषयी माहिती मिळविण्यासाठी शिंदे यांनी ह्या बाईची भेट घेतली. त्यांना ह्या बाई अत्यंत गरीब, सभ्य व साध्या वाटल्या. त्यांच्याबद्दचा शिंदे यांचा अभिप्राय मोठा मार्मिक आहे. “हिचा पोशाख व वागणूक इतकी साधी दिसली, (की) ही पारीस नगरीत राहण्यास जवळ जवळ अयोग्यच दिसली.” स्त्रियांच्या प्राथमिक आणि द्वितीय शिक्षणासंबंधी शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक, साधार उत्तरे दिली. दोघांचेही संभाषण मनमोकळेपणाने झाले. हिंदुस्थानचे लोक म्हणजे गहन विषयात गुंतलेले, वैराग्य वृत्तीचेच असावयाचे असा तिचा समज होता. शिंदे यांची प्रवृत्तिपर, प्रगमनशील, शुद्ध बुद्धिवादी सुधारकी मते पाहून तिला आश्चर्य वाटले व तसे बोलून दाखविल्याबद्दल तिने माफी मागितली. शिंदे यांना तिचे भाषण व वर्तणूक फार आवडली. दुस-या दिवशी बाईंनी शिंदे यांना जेवणास बोलावले.
दुस-या दिवशीच्या भेटीत ते उच्च शिक्षणाविषयी बोलले. फ्रेंच विवाहपद्धतीसंबंधी त्यांचे मोठे मौजेचे बोलणे झाले. इंग्रजांप्रमाणे येथेही स्वयंवराची चाल हळूहळू पडू लागली होती. फ्रान्समध्ये तरुण मुलीस इंग्रज मुलीप्रमाणे स्वातंत्र्य नसे. पारीसच्या नीतीसंबंधाने बाईंनी मोकळेपणाने आपली माहिती व विचार सांगितले. ब्रिटिशांपेक्षा फ्रेंच लोकांत वैवाहिक नीती कमी असल्याचे मतही तिने बोलून दाखविले. नीती बिघडण्याचे एक कारण म्हणजे तरुण मुलांनी एकवीस वर्षांनंतर दोन वर्षे लष्करात नोकरी केली पाहिजे असा तेथे असलेला सक्तीच कायदा. शिवाय पारीस हे जगातले करमणुकीचे स्थान असल्याने परकीय चैनी लोकांचे येथे चाळे फार चालतात हेही एक कारण. शिंदे यांना एकंदरीतच स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल विशेष आस्था वाटत असे. स्त्रियांना पुरुषांच्याबरोबरीने स्थान मिळाले पाहिजे अशी त्यांना कळकळ होती. यासंबंधीही त्यांनी दुगारबाईंना विचारले. उच्च शिक्षणात स्त्रियांचा थोडा थोडा शिरकाव होत आहे व चळवळीचे काम स्त्रिया अंगावर घेत आहेत हे त्यांनी सांगितले. एकंदरीत स्त्रियांच्या बाबतीत फ्रान्स हा अमेरिका व इंग्लंडच्या मागे आहे हे बाईंनी मान्य केले. स्त्री-शिक्षणाच्या कामी कॅथॉलिक धर्माकडून कसा अडथळा येतो हे बाईंनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितले.
दुगारबाईंसमवेत दोन दिवसांच्या संभाषणानंतर स्त्रियांच्या उन्नतीविषयी झटून यत्न करणा-या या विद्वान बाईबद्दल शिंदे यांना फार आदर व प्रेम वाटू लागले. बाईंनाही शिंदे यांच्याबद्दल व त्यांच्या धर्माबद्दल आस्था उत्पन्न झाली. भेटीची आठवण म्हणून शिंदे यांना त्यांनी इमर्सनविषयी एक पुस्तक दिले. दुगारबाईंच्या भेटीचा, त्यांच्या सहवासाचा शिंदे यांच्या मनावर अत्यंत अनुकूल परिणाम झाला. त्यांचा निरोप घेऊन निघाल्यानंतर आपल्या मनाची वृत्ती कशी झाली हे त्यांनी हृदयंगमपणे प्रकट केले आहे. “११ वाजता मी घरी परत निघालो. ट्राममधून सेन नदीचे काठाने येताना तो रात्रीचा देखावा पाहात, नुकत्याच घडलेल्या शुद्ध सहवासाविषयी माझे मनात अनेक गोड विचारतरंग येऊ लागले. आत्मा आत्म्यावर लुब्ध झाला होता. म्हणून वियोग झाल्यावरही सुखच होत होते. शरीराची सर्वच सुखे दुःखपर्यवसायी आहेत. आत्म्याला पर्यवसानच नाही. कारण आत्मा अनंत आहे, म्हणून वृत्ती अखंडित राहते.”४
मॅडमोझील् दुगार ह्या बाई १९३१ साली निधन पावल्या. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या सहका-यांनी एक छोटीशी पुस्तिका काढली. पारीसमध्ये स्त्री-शिक्षणाच्या हेतूने निघालेले हे कॉलेज अद्यापही अस्तित्वात आहे.५
पारीस येथील महिन्याभराच्या मुक्कामात शिंदे यांनी पाहिलेले अखेरचे महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे पारीसपासून सुमारे चौदा मैल अंतरावर असलेला व्हर्साय येथील १४व्या लुईचा प्रचंड आणि श्रीमंत राजवाडा. १२ एप्रिल १९०३च्या दोन प्रहरी तेथे पोहोचले. राजवाड्याच्या चौकात १४व्या लुईचा घोड्यावर बसलेला मोठा धातूचा पुतळा आहे. ह्या ठिकाणी ऐतिहासिक चित्रांचा आणि पुतळ्यांचा अपूर्व संग्रह आहे. फ्रेंच इतिहासातील प्रसंगावर नामांकित चित्रकारांनी काढलेली चित्रे आहेत. अलीकडील काळात शिंदे यांनी इतकी उत्तमोत्तम चित्रे पाहिली होती की, नव्याने बघितलेल्या चित्रांमध्ये त्यांचे लक्ष लागत नसे. तरीही शार्लमेन, सां लुई ह्यांची चित्रे त्यांना बघावीशी वाटली. क्रुसेड्ससंबंधीची चित्रे एका स्वतंत्र हॉलमध्ये लावलेली होती. दुस-या मजल्यावरील गॅलरीत १७९७ पासून १८३५ पर्यंतची नेपोलियनचा पराक्रम रेखाटणारी अनेक चित्रे त्यांना वीर व करुण रसाची महती मनावर बिंबवणारी वाटली.
निरनिराळ्या दिवाणखान्यातील संपत्तीची परमावधी पाहून ते आश्चर्यचकित झाले. वेळ कमी असल्याने सर्व राजवाडा पाहणे त्यांना शक्य झाले नाही. वाड्याच्या खिडक्यांतून सुंदर बागेची व उपवनाची दिसणारी शोभा त्यांना अनुपम वाटली. बागेत आल्यावर उंच झाडे, वीथिका, पुष्पवाटिका, गुंफा, तडाग, लहानमोठे कारंजे, वाड्यापासून उतरत जाणारी सपाटी, पुढे दूरवर दिसणारा रुंद व प्रशस्त कालवा, त्यावरील क्रीडानौका असा देखावा पाहून त्यांच्या मनाला समाधान वाटले. ईस्टरचा सण असल्यामुळे हजारो स्त्री-पुरुष व लहान मुले विहरण्यासाठी तेथे आली होती. एक सभ्य बाई, तिचा भाऊ व लहानगा भाचा ह्या कुटुंबासमवेत शिंदे फिरत होते. संध्याकाळचे सहा वाजल्यावर ही सर्व मंडळी परत गेली. ते मात्र एकटेच कालव्याच्या काठाने उपवनात हिंडू लागले. येथील देखाव्याने त्यांचे मन वेधून घेतले होते. त्या वेळच्या मनःस्थितीचे त्यांनी वर्णन केले आहे, “सुमारे आठ वाजता उपवन बंद होण्याची वेळ झाली तरी मला बाहेर जावनेना. वाड्याचे पुढे पाय-यावर, मागे वाडा, पुढे उद्यान, भोवती क्षितिजापर्यंत पसरलेली वनराई पहात मी चित्रासारखा एवढा वेळ अगदी एकटाच उभा होतो. पौर्णिमेचा चंद्र स्वच्छ आकाशात वर येत होता. वाड्यापुढची बाजू (१३६० फूट लांब) रंगीत फोटोसारखी सुबक व प्रमाणबद्ध नजरेत भरली. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्याच्या व सुधारणेच्या वातावरणात असे एकवटलेले माझ्या पाहण्यात तर अद्यापि कोठे आले नाही व पुढेही येईलसे दिसत नाही. म्हणून आठचे सुमारास बाहेर पडताना थोडे अवघड वाटले.”६
१४ मार्च १९०३ पासून सुमारे महिनाभर शिंदे यांनी पारीस येथे वास्तव्य केले. जगातील एका सुधारलेल्या व सुसंस्कृत समजल्या जाणा-या फ्रान्स ह्या देशाचे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी महिनाभराच्या वास्तव्यामध्ये केला. स्थापत्यकलेचे अद्भुत आणि भव्य नमुने, अप्रतिम शिल्पे, श्रेष्ठ दर्जाच्या चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे त्यांनी मन लावून निरखली. नृत्यगायनाचे ढंगही बघितले. अति भव्य ख्रिस्ती देवळे जशी त्यांनी पाहिली त्याचप्रमाणे नाचगाण्याचे रंग उडविणारी बदफैली उपाहारगृहेदेखील पाहिली व तेथील लोकांचे निरीक्षण केले. एकंदरीत फ्रान्समध्ये कॅथॉलिक धर्माचा पगडा जाणवत असला तरी आधुनिक फॅशनचे माहेरघर असणा-या, युरोपमधील ह्या महत्त्वाच्या शहरामध्ये धर्माची पीछेहाट होत असून बहुतेकांना सुखासीन जीवनाची ओढ लागली आहे, असे आधुनिक जगाचे प्रतीकरूप चित्र त्यांना येथे पाहावयास मिळाले. मात्र ह्या वातावरणातही निष्ठावंतपणे अध्ययन करणारी बॉन मोरी, जाँ रेव्हील यांच्यासारखे प्राध्यापक त्यांना आढळले. फॅशनच्या गजबजाटातही अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत करणारी, नैतिक निष्ठेतून स्त्री-शिक्षणासाठी झटणारी मॅडेमोझील् दुगार हिच्यासारखी एखादी स्त्री आढळली. यामध्येच शिंदे यांच्या मनाला काही दिलासा प्राप्त झाला असणार.
संदर्भ
१. वि. रा. शिंदे, रोजनिशी, पृ. १४०-४१.
२. तत्रैव, पृ. १४२-४३.
३. प्रस्तुत लेखकाला पेर ला शाज येथील स्मशानवाटिकेचा तेथेच उपलब्ध झालेला नकाशा.
४. वि. रा, शिंदे, रोजनिशी, पृ. १४५-४७.
५. मिस्स मारी क्लॉद महियास, पारीस यांनी ३० जुलै १९८३ रोजी प्रस्तुत लेखकास लिहिलेले पत्र.
६. वि. रा. शिंद, रोजनिशी, पृ. १४८.