लंडनहून ऑक्सफर्ड येथे परतल्यानंतर विठ्ठल रामजींनी सुबोधपत्रिकेसाठी लंडनचे वर्णन करणारा लेख लिहिला व १० तारखेस पाठवून दिला. त्यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ झाली होती. अशक्तपणा जाणवत होता. भूक लागेनाशी झाली. त्यांनी ११ नोव्हेंबरपासून म्हणजे दोन महिने मांसाहार आजिबात सोडला होता. लंडनहून मिटोज नावाचे पौष्टिक अन्न मागविले होते ते त्यांना रुचले नाही व पचलेही नाही. नाइलाजाने व अनिच्छेने त्यांनी मांसाहारी जेवण घ्यायला सुरुवात केली.१ त्यांची शरीरप्रकृती बरी नव्हती त्याचप्रमाणे त्यांच्या मनालाही स्वस्थता नव्हती. करमेनासे झाले. उदास वाटू लागले. कुटुंबियांवर उत्कटत्वाने प्रेम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. इंग्लंडला येण्याच्या वेळी मनाची जी अवस्था झाली होती तिचे वर्णन त्यांनी एका पदात केले होते.
“तरुण भार्या, तान्हे बालक
वृद्धही माता पितरे।
अनाथ भगिनी, बंधु धाकुटा।
आश्रित बांधव सारे।
आलो टाकुनिया पदरी। घेई दयामया।।२
घरच्या सगळ्या माणसांना ते नियमितपणाने पत्रे पाठवीत होते. आपल्या अंतःकरणातील भावना प्रकट करण्याचा तेवढाच एक मार्ग त्यांना उपलब्ध होता व त्यांच्याकडून येणारी घरच्यांची, मित्रमंडळींची पत्रे वाचणे हा त्यांच्या जिवाला मोठाच विरंगुळा होत. लंडनला पोहोचल्याबरोबर सगळ्या जवळच्या मुंबईकर प्रार्थनासमाजीय मित्रांना व कोरगावकरांसारख्या वडिलधा-यांना, तसेच घरी बाबांना, जनाबाईंना पत्रे लिहिली. त्यांचे जवळचे मित्र विष्णुपंत देशपांडे, सासने, केशवराव कानिटकर, ज. स. करंदीकर ह्यांना वेळोवेळी ते पत्रे लिहीत होते. नाताळची सुट्टी झाल्यावर त्यांनी आपली धाकटी बहीण मुक्ता, जमखंडीस त्यांचे घरी असलेली वासुदेवराव सुखटणकर यांची आजारी बहीण शांता हिला भेट म्हणून चित्रे पाठविली. आपली आई व पत्नी यांनाही ते पत्रे लिहीत होते आणि नवलाची गोष्ट अशी की, त्यांची वृद्ध आई व नव्यानेच लिहिणे-वाचणे शिकण्याचा प्रयत्न करणारी त्यांची पत्नी रुक्मिणीबाई ह्याही त्यांना पत्रे पाठवीत असत. जनाबाई विस्ताराने घराकडील वार्ता त्याचप्रमाणे स्वतःची मनःस्थिती कळवीत असत. त्यांच्या आईला आपल्या मुलाच्या कर्तृत्वाबद्दल फार अभिमान वाटत होता. तिचे पत्र पुढीप्रमाणे :
जमखंडी,
ता. २६/१/(०२)
चि. विठु बाळा यास अनेक आशीर्वाद,
तुझ्या लहानपणीच्या सर्व गोष्टी आठवतात. तू लहान होतास. तेव्हा एकदा जकनकमतच्या (जगन कामतच्या?) शेतास माझ्याबरोबर आला होतास. तुला (१) पैसा दिला होता. तो तुझ्या हातातून (को) ठेत (री) हरवला. तेव्हा मी तुला शेतापासुन घरी येईपर्यंत फार छळले आणि आता तुझी कीर्ती सर्व जगभर पसरेल. आता तु पुढे माझ्या भारोभार सोनेहि वाटशील. परंतु तेव्हा बोलल्याची आठवण होते; बाळा त्यावेळी (तुझ्या) योग्यतेची मला कल्पना तरी होती काय? आता पत्र पुरे करिते. माझा तुला पूर्ण आशीर्वाद.३
तुझी जननी
सौ. यमुना
विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पत्नी सौ. रुक्मिणीबाई यांचे स्वतःच्या हस्ताक्षरातील पत्र पुढीलप्रमाणे :
जमखंडी,
ता. २९/१/१९०२
जीवलग प्राणपती यांचे शेवसी
आता रोज दोन प्रहरच्या वेळी वनसंच्या पुढे वाचन लिहिणे करिते. त्या मला आता काही सोपी सांगितातली गाणी शिकवितात. मलाही थोडी शिकावयाची गोडी लागत चालली आहे. तेरदाळाहुन (बहिणाबाई) आल्या आहेत. त्यांनाहि काही शिकवण्यास वनस जातात. तेव्हा मी ही तेथेच जाईन. मला जोडी बरी झाली.
आपली रुक्मीणी
हेची पत्री ती. विठु आण्णा यांस साष्टांग दंडवत असे.४
आपली बहीन
मुक्ताबाई
वासुदेवराव सुखटणकरांची बहीण ह्या सुमारास विठ्ठल रामजींच्या कुटुंबात राहत होती. आजारपणामुळे तिची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. जनाबाईंनीच अर्धांगवायूच्या आजारपणात शांताची एक प्रकारे जबाबदारी घेतली होती व त्यांनी केलेल्या दक्षतापूर्वक व प्रेमळ शुश्रुषेने शांताच्या प्रकृतीत अल्पशी सुधारणा घडून आली होती. विठ्ठल रामजींनी इतर मुलांना नाताळची भेट म्हणून पाठविली. त्यात शांतालाही चित्राचे भेटकर्ड पाठविले होते. एक लहान मुलगी फुलपाखराला पकडू पाहते असे ते चित्र होते. तिच्या आजाराचे भयंकर स्वरूप, त्यामध्ये झालेली अल्पशी सुधारणा व जनाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिच्या ठिकाणी असणारी बुद्धिमत्ता आणि तरल संवेदनशीलता या सा-या गोष्टी ध्यानात येऊन तिचे पुढील पत्र हृदयद्रावक वाटते.
प्रिय विठू आण्णा,
आज तुम्ही आम्हा मुलांना नाताळची चित्रे पाठविलीत ती ज्याची त्याला अगदी योग्यच होती. पण मला जे दिले ते माझे मला अगदी योग्य आहे. मला योग्य असे शोधून काढणे व ते सापडणे हे काम मोठे कठीण आहे. असे योग्य चित्र शोधून काढण्यास सर्व विलायत पालथी केली असेल. पण मला पाखरू धरण्यापुरती आता शक्ती आली तेव्हा सौ. जनाक्कास आशा होती की आपले चित्र असेल. पण नाही असे समजले तेव्हा निराशा झाली.५
आ. ब. शांता
जनाबाईंची मनःस्थिती वेगळ्याच असाधारण कारणामुळे नाजूक झालेली होती. परित्यक्तेचे जिणे जगणे त्यांना भाग पडले होते. जनाबाईंच्या जिवाला तिच्या सासरी धोका असल्यामुळे तिला पाठवू नये हा विठ्ठल रामजींचाय निर्णय आईवडिलांनाही मानावा लागला होता. पण त्यामुळे जनाबाईंची सर्वतोपरी जबाबदारी विठ्ठल रामजींवर येऊन पडली होती व ती त्यांनी स्वेच्छेने पत्करली होती. तिच्या शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केली होती. तिच्या आध्यात्मिक उन्नतीची काळजी ते वाहत होते व व्यावहारिक शहाणपणाच्या गोष्टी सांगून तिची समज वाढवीत होते. जनाबाईही बुद्धीमान होत्या. साहित्य वाचण्याची त्यांना आवड होती. हरिभाऊ आपटे यांच्या सुधारणावादी कादंब-या दोघांनीही वाचल्या होत्या. म्हणून जनाबाईंच्या पत्रामध्ये स्वतःच्या मनःस्थितीचे तसेच इतरांचे वर्णन मार्मिकपणे येते. जानेवारी १९०२ रोजी जनाबाईंनी प्रिय विठूअण्णांना पत्र लिहिले. विष्णुपंत देशपांडे यांच्या भेटीचा वृत्तान्त या पत्रात निवेदन केला आहे. त्यांनी लिहिले, “बोलता, बोलता पुढे मला तुझी शांती ढळू देऊ नकोस” असे का म्हणाले असतील? अण्णांना माझ्या शांतीविषयी भीती आहे काय? अण्णा मी आजपर्यंत (ह्या पाच-सहा वर्षांत) तुझ्यापुढे किंवा कुणापुढे माझ्या आयुष्यासंबंधी गोष्ट काढून डोळ्यांतून पाणी काढले नव्हते. तुझ्यापुढे कधी काढिले होते का? मला वाटते कधीच नाही... तुझ्याच गोष्टी निघाल्या. पुढे पाच वाजले. सर्व लहानथोर मंडळींनी मिळून भजन केले. मग मला थोडे समाधान वाटले. आण्णा तुला नाही का रे माझ्या शांतीची भीती? तू जाताना एकदा मला उपदेश करशील अशी मला फार आशा होती. ती तुझ्या जाण्याच्या घाईमुळे राहिली. हल्ली मी तुझ्या जागी वासुआण्णालाच तूच असा मानिते बरे. तू येथे नाहीस तरी मी आण्णांच्या परवानगीशिवाय काही कमीजास्ती करणार नाही. वासुआण्णा दूरचा असा मुळीच वाटत नाही. बरे आता रात्र फार झाली. १२ वाजले. उद्या पहाटे मी मळलीस जाणार तर ह्या वेळेस तुझ्याबरोबर बाहेर फिरण्यास येणार नाही. तू वाट पाहशील म्हणूनच कळविले. पुढच्या खेपेस येते तेव्हा होडीत बसून टेम्स नदीत फिरू बरे! अरे आण्णा आधिच कळविले असते तर मी लंडनास आले नसते का? असो. मध्येच मी सांगते तूं मजविषयी कसलीच काळजी करू नकोस. आणि इकडे आईबाबांनाहि थोडे कळव. मी तरी किती म्हणून सांगू? नेहमी आईचें हेंच म्हणणे असते कीं, “माझ्या जनाक्काला पाहिल्याबरोबर मला कसेसेच होते.” असे म्हणून चट्दिशी उठून कोणीकडे तरी करत वेड्यासारखी फिरूं लागते. तेव्हां तिच्या पोटात आगच पडल्याप्रमाणेंच होते. मी कसें तिचे समाधान करूं? तूच कर. तिचें असें करणें पाहून मला तिजपुढे बसवत नाही. आईल असे का होत असेल?”६
पत्राच्या उत्तरार्धात विठ्ठल रामजींच्या साडेचार महिन्याचा मुलगा प्रताप ह्याच्याच अनेकविध बाळलीला मनोरंजकपणे त्यांनी लिहिल्या आहेत. जनाबाईंच्या वाट्याला आलेल्या ह्या दुर्दैवी परिस्थितीबद्दल सगळ्यांनाच कशी चिंता वाटत होती हेही या पत्रावरून जाणवते.
जनुभाऊ करंदीकरांनी मुधोळहून २७ नोव्हेंबर १९०१ रोजी विठ्ठल रामजी शिंदे यांना इंग्लंडला पहिले पत्र पाठविले ते कमालीचे प्रांजळ आहे. पत्र इंग्रजी भाषेत आणि वळणदार अक्षरात लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे.
“तुमचं पत्र वाचल्याबरोबर मनात पहिली भावना निर्माण झाली ती आनंदाची-आपला एक मित्र इंग्लंडमध्ये गेला आहे ह्या विचारामुळे. दुसरी भावना (ह्या पापी मनाला काय म्हणावे!) होती ती हेव्याची. हेवा अशासाठी की तुम्ही मार्सेय, पॅरिस, लंडन आणिक कितीतरी बघितलं याबद्दल. तिसरा विचार मनात आला की, आता तुम्ही हिंदुस्थानचा आणि जे जे हिंदुस्थानातील आहे त्याचा तिटकारा करायला लागला असाल. आपल्या संस्था, उद्योग आपली बौद्धिक, नैतिक आणि शारीरिक क्षमता ही तेथील बौद्धिक, सांपत्तिक आणि शारीरिक क्षमतेच्या बाबतीत तिकडील जायंटसच्या पुढे इकडील सर्व गोष्टी पिग्मी वाटायला लागल्या असतील. कदाचित तुमची कल्पना वेगळी असू शकेल. पण मला मात्र खात्री वाटते की, मी जर युरोपच्या किना-यावर पाय ठेवला तर आपण त्या भूमीत जन्मलो नाही याबाबत मला निश्चित पश्चात्ताप वाटेल. का गोष्टी दुरूनच मोठ्या वाटतात अशी वस्तुस्थिती आहे?
“तुमचा अभ्यासक्रम कसा चालला आहे? प्रगती कशी आहे? माझी अशी कल्पना आहे. तुम्हाला तेथे परकेपणा जाणवत नसेल.
“आपले मित्र सिनियर रँग्लर परांजपे यांना सेंट जेम्स कॉलेजची फेलोशिप मिळण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. ते इंग्लंड सोडण्यापूर्वी तुमची त्यांची भेट होण्याची शक्यता आहे काय?
“शेक्सपियर, बेकन, हॉवर्ड, मार्टिनो, ग्लॅड्स्टन इत्यादिकांची भूमी बघण्याचा कोण आनंद? या बाबतीतील तुमचा स्वार्थीपणा मी क्षम्य मानीत नाही. असे असूनही भारतीय डाक येण्याचा दिवस तुम्हाला अतिशय आनंददायक वाटत नाही काय? आम्ही सर्व क्षेम. तुमचे क्षेम चिंतितो.”७
तुमचा मित्र,
जनार्दन एस्. करंदीकर
जनुभाऊ करंदीकरांना वाटल्याप्रमाणे इंग्लंडबद्दल अतीव गौरवाची आणि भारताबद्दल तिटका-याची भावना विठ्ठल रामजींच्या मनामध्ये मुळीच निर्माण झालेली दिसत नाही. संपूर्ण प्रवासात आणि युरोपमधील वास्तव्यात त्यांच्या ठिकाणी सामान्यतः भारतीय प्रवाशाची त्या काळात दिसून येणारी न्यूनगंडाची भावना यत्किंचितही दिसून येत नाही. रावजी भवानराव पावगी यांना विलायतला जाताना आपल्या बोटीच्या प्रवासात युरोपियन माणसाकडून सेवा करून घेणे जड वाटत होते; कारण साहेब म्हटला की वरिष्ठ समजून त्याला मान देण्याचे मनाला वळण होते असे त्यांनी आपल्या प्रवासवर्णनात नमूद केले आहे. विठ्ठल रामजी मात्र बोटीवरील गोरे सेवक आणि काळे सेवक ह्यांच्या मनोवृत्तीतील फरक त्या दोघांना चाकर समजून वर्णन करतात. उपद्रव सोसूनही डोक्यावर रुमाल ठेवणे हा देशीपणाचा आग्रह शिंदे यांनी बिलकूल सोडला नाही. धर्मविषयक आणि संस्कृतीविषय त्यांच्या या बाबतीतील विचारात दुरभिमान किंवा न्यूनगंड अगदी सोडला नाही. त्यांची भूमिका सदैव निरामय, सत्यनिष्ठेचीच असल्याचे दिसते.
विठ्ठल राजमी शिंदे यांनी स्कॉटलंडमधील लॉखलोमंड हे सरोवर बघून तेथून लिहिलेल्या पत्राला जनुभाऊ करंदीकरांनी १० सप्टेंबर १९०२ रोजी उत्तर लिहिले आहे. त्यामध्ये प्रारंभी एक सखोल विचार प्रकट होत असला तरी एकंदरीत त्यांची व्यावहारिक दृष्टीच त्यामधून विशेषत्वाने प्रकट होताना दिसते. इंग्रजीत लिहिलेल्या ह्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, “तुमचे लॉखलोमंडवरून पाठविलेले पत्र वाचून अतिशय आनंद वाटला. तुमचे पत्र केवळ काव्यमय कल्पनांनी भरलेले आहे. दुस-या शब्दांत मी त्याचे वर्णनच करू शकत नाही. तुमचा सध्याचा मूड पाहून माझी खात्री झाली आहे की, उच्च धार्मिक विचार आणि कवीची उत्कट कल्पनाशीलता ह्या दोहोंमध्ये अपरिहार्य असे नाते असते आणि मला असेही वाटते की, कवी कधी नास्तिक असू शकत नाही.
“असो. तुमची सुटी पावन अशा सरोवर प्रांती घालवीत आहात याचा मला फार आनंद वाटतो. तुम्ही आपले पत्र व्यावहारिक पातळीनरून लिहून आतापर्यंतची अभ्यासक्रमातील प्रगती व पुढील वर्षांतील अभिप्रेत अभ्यासक्रम याबद्दलची माहिती कळविली असती तर मला तुमचे पत्र अधिकच आवडले असते.
“तुम्हाला अभ्यासक्रम सोपा वाटतो का? उदात्त वाटतो का? तुम्ही निवडलेल्या अभ्यासक्रमाने तुमच्या मनाला पूर्ण शांती मिळाली आहे का? हे आणि अशाच प्रकारचे प्रश्न मला आणि तुमच्या आईवडिलांना, मित्रांना सतावीत आहेत. ह्याचे निर्णायक होकारार्थी उत्तरच माझ्या मनाचे समाधान करू शकेल. तुमच्या सुखदायक अशा सुट्टीतील प्रवासाच्या वृत्तान्ताने समाधान होणार नाही. कारण मी व्यवहारी मनुष्य आहे आणि तुमचे नातेवाईक आणि मित्रही तसेच आहेत. तुम्ही अभ्यासक्रमासंबंधी यत्किंचितही लिहिले नाही.
“मी कायद्याच्या परीक्षेचा अभ्यास अद्याप पूर्ण केला नाही व चालू वर्षी परीक्षेला बसण्याचा माझा विचार नाही.
“१८९४ मध्ये इंटरमीजिएटच्या वर्गात असताना अर्नोल्डच्या वेच्यांतील सोहराब आणि रुस्तुम वाचीत असताना कुणाला स्वप्नात तरी वाटले होते का की, आठएक वर्षांनंतर मूळ हस्तलिखित पाहण्याचे भाग्य तुम्हाला लाभेल? अथवा त्याही मागे, १८९० मध्ये इंग्रजी सहावीत असताना ‘लेडी ऑफ द लेक’ हे काव्य वाचीत असताना कुणाला वाटले तरी होते का की, तुम्ही प्रत्यक्ष लॉख कॅट्रेन बघणार आहात? ज्याची कल्पनाही केलेली नसते अशा गोष्टी काळाच्या करामतीने घडतात !
“तुम्हांला नियमितपणे स्कॉलरशिप मिळत असेल व तुमची कोणतीही गैरसोय होत नसेल अशी आशा आहे.
“स्वीकृत कार्यात तुम्हाला यश मिळो ही अंतःकरणपूर्वक इच्छा प्रकट करून हे पत्र संपवितो.”८
तुमचा मित्र,
जनार्दन सखाराम करंदीकर
जनुभाऊ करंदीकरांच्या ह्या पत्रांवरून ह्या दोन मित्रांत कसे होते आणि दोघांच्या वृत्तीमध्ये विरोधही कसा होता याची कल्पना येते.
विठ्ठल रामजी शिंदे यांचे दुसरे मित्र केशव रामचंद्र कानिटकर यांनी त्यांना पत्र लिहून मुख्यतः फर्ग्युसन कॉलेजात रँग्लर परांजपे प्रिन्सिपॉल म्हणून आले ही गोष्ट व गॅदरिंगमध्ये ‘त्राटिका’ हे नाटक बसविले, या संबंधीची साद्यंत हकिकत पत्राद्वारे कळविली. सांस्कृतिकदृष्ट्याही कानिटकरांचे हे पत्र महत्त्वाचे आहे.९
मंबई
कुलाबा ऑब्झरव्हेटरी
२४/२/०२
सा. न. वि. वि.
फार दिवसात पत्रव्यवहार झाला नाही. आपण गेल्यावर मला पत्र पाठविले ते पोहोचले. पण त्यावर विशेष लिहिण्यासारखे नसल्याकारणाने इतके दिवस पत्र लिहिले नाही. आपले पत्र १०/१२ दिवसापूर्वी आले असे कळले. पण पत्र मिळाले नाही. चि. सौ. जनाबाई वगैरे यांच्या प्रकृती ठीक आहेत. यानंतर आपल्या कॉलेजची थोडी हकिकत लिहावी म्हणून हे पत्र हाती घेतले आहे. येथे रा. परांजपे आले. त्यांचा योग्य सन्मान झाला व रा. गोळे हे रजेवर असलेमुळे त्यांना अकटींग प्रिन्सिपॉल नेमिले. ते येथे ५/७ वर्षांपूर्वी जसे होते तसेच आहेत. त्यामुळे काहींना बरे वाटत आहे व काहींना वाईट वाटत आहे. यंदा प्लेग सुरू होता तरी कॉलेज जानेवारी ते एप्रिल अव्याहत चालले होते. रा. परांजपे यांनी कॉलेजात व्यवस्थिपणा आणण्याचा बराच प्रयत्न केला आहे. त्याप्रमाणे फल कसे काय येते ते पाहावयाचे आहे. यंदा कॉलेजमध्ये विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅदरिंग ही होय. त्याची सर्व व्यवस्था माझेकडेच होती. मागील जुने विद्यार्थ्यांना निमंत्रणपत्रिका पाठविल्या होत्या व विशेष जे आम्ही यंदा केले ते ‘त्राटिका’ नाटक बसविले हे होय. ‘त्राटिका’ नाटक म्हटल्याबरोबर आपणास कदाचित चांगले व वाईट एकदम वाटेल. आम्ही ‘स्टेज’ रेसिडन्सी चौकात तयार केले होते. त्याची लांबी रुंदी स्टेजपेक्षाही मोठी होती. या नाटकातील मंडळींत गावांतील विशेष हा होता की, एक-दोन स्त्रीपात्रे शिवाय करून सर्वजण Senior बी. ए. क्लासमधील विद्यार्थी होते. त्यामुळे नाटकातील सर्व खुब्या व रहस्य समजण्यास फारशी अडचण पडली नाही. नाटक बसविण्यात प्रो. भानू यांनी फार मेहनत घेतली. एक-दोन रंगीत तालमी झाल्यानंतर ता. २७ मार्च रोजी तयार केलेल्या रंगभूमीवर प्रयोग केला. त्या वेळेला प्रेक्षकसमूह सुमारे १००० होता. कारण गावातील मंडळींनाही आम्ही पासेस दिले होते. खेळ चांगलाच झाला व म्हणून आम्ही तो गावात करून दाखवावा अशा सूचना आल्या. होय-नाही म्हणता म्हणता करावयाचे ठरले. त्या वेळे मी धोमास गेलो होतो त्याचे कारण चि. बाबा-माझा धाकटा भाऊ - याचे लग्न होते. आपणास ठाऊक असेलच की त्याचे पहिले बायकोचे डोळे फार बिघडले व ती आता अगदी आंधळी झाली आहे. तेव्हा याचे दुसरे लग्न केले आहे. मुलगी १२/१३ची आहे वयाने. असो. याप्रमाणे कळल्यावर मी पुन्हा पुण्यास आलो व ता. १० एप्रिल रोजी तो प्रयोग करून आम्ही दाखविला. तो प्रयोग चांगलाच वठला. याबद्दल मते केसरी व सुधारक या पत्रामध्ये आली आहेत. त्याचे कपटे आपणाकडे सोबत पाठविले आहेत. त्या दिवशी आम्हाला ४०० रुपये उत्पन्न झाले. खर्च जाऊन बाकी कॉलेज जिमखान्याला द्यावयाची आहे. प्रो. गोखलेही त्या वेळेस हजर होते. त्यांना तर फारच आनंद झाला. प्रो. राजवाडे, पानसे हे तर अगदी खूष झाले. चौथा अंक संपल्याबरोबर गावातील एका गृहस्थानी आम्ही पुन्हा एक वेळ खेळ करावा असे सुचविले. पण ‘लोकाग्रहास्तव’ खेळ करण्याचे नादी न लागता आम्ही सर्वजण आपापले अभ्यासास लागलो आहोत. प्रो. गोखले यांनी तर सांगितले की, ‘प्रतापराव त्राटिका’ ही शाहू नगरवासी ना. मं. च्या इतकी वठली नाहीत खरी, तरी पण एकंदरीत खेळ त्याचेवर ताण झाला. कितीएक विद्यार्थी तर उद्गारले की या समयाला प्रो. केळकर हयात पाहिजे होते. प्रो. गोखल्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही एक हजार रुपये जमवावे व जिमखान्याचा फंड तयार करावा. जून-जुलैमध्ये ते आम्हाला खेळ करावयाला लावतील की काय अशी भीती वाटत आहे. तरी पण सर्व मंडळींनी असा निश्चिय केला आहे की डिसेंबरशिवाय काही करावयाचे नाही. या महिन्यात मात्र मुंबई, पुणे व कोल्हापूर या गावी जावयाचे. या नाटकात मीही पार्ट केला तो कोणता म्हणशील तर... संभाजीचा खोटा बाप. यावरून (त्यावरच्या सर्व हकिगतीवरून) तुला कळेल किती आम्ही खाली जात चाललो आहो? सर्व धंदे सोडून देऊन नाटके करीत आहोत. (?) आसो.
सध्या मी मुंबईत कुलाबा Observatoryत यंत्र पाहण्याकरिता ५/६ दिवस आलो आहे. गेले रविवारी आलो. बहुतेक काम झाले आहे. १/२ दिवसांनी पुन्हा पुण्यास परत जाईन तेव्हा माझा पत्ता कॉलेजचाच आहे.
केशव कानिटकर
संदर्भ
१. विठ्ठल रामजी शिंदे, रोजनिशी, पृ. ९०.
२. विठ्ठल रामजी शिंदे, ‘जलप्रवास’, लेख, व्याख्याने व उपदेश, पृ. १.
३. वि. रा. शिंदे यांचा पत्रसंग्रह.
४. तत्रैव.
५. तत्रैव.
६. तत्रैव.
७. तत्रैव.
८. तत्रैव.
९. तत्रैव.