निवेदन

विसाव्या शतकातील श्रेष्ठ धर्मचिंतक व समाजसुधारक महर्षी वि. रा. शिंदे यांचे जीवनचरित्र वाचकांना अर्पण करताना विशेष आनंद होत आहे. मराठीतील प्रगतिशील विचाराचे लेखक गो. मा. पवार यांनी 'यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान'तर्फे मिळालेल्या अभ्यासवृत्तीतून महर्षी शिंदे यांच्या जीवन व कार्याचा सखोल अभ्यास केला व त्यातून हे चरित्र सिद्ध झाले आहे.

महर्षी शिंदे यांचे अस्पृश्योद्धाराच्या क्षेत्रातील कार्य व त्यांनी मांडलेला धर्मविचार अजोड आहे; मात्र महाराष्ट्राने आजवर त्यांच्या या योगदानाची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही, अशी खंत गेली अनेक वर्षे काही संवेदनशील समाजचिंतक व्यक्त करत आहेत. 'लोकवाङ्मय गृहा'ने मात्र प्रथमपासूनच महर्षी शिंद्यांविषयीची 'विठ्ठल रामजी शिंदे : शापित महात्मा', 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांचे आर्थिक आणि सांस्कृतिक विचार', 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी', 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांचे बहुजनवादी राजकारण' आणि 'म. विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार' ही आमची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज महर्षी शिंद्यांचे हे विस्तृत व प्रदीर्घ असे जीवनचरित्र प्रकाशित करताना त्यांना न्याय देण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाल्याचे समाधान आम्हाला आहे.

प्रस्तुत ग्रंथाच्या निर्मितिखर्चाचा वाटा काही प्रमाणात उचलण्याचे मौलिक कार्य 'समाजसुधारक आगरकर विचार व्यासपीठा'ने केले आहे. त्यांच्या या सहकार्यामुळेच गंभीर ग्रंथांविषयी मोठ्या प्रमाणावर अनास्थेचे वातावरण असण्याच्या सध्याच्या काळात आकाराने एवढा मोठा ग्रंथ प्रकाशित करण्याचे धाडस आम्ही करू शकलो व ग्रंथाची किंमतही तुलनेने कमी ठेवणे शक्य झाले. 'आगरकर व्यासपीठा'चे आम्ही आभारी आहोत.

एवढ्या प्रदीर्घ ग्रंथांची सूची वेळेत पूर्ण करण्याचे क्लिष्ट काम प्रा. शैलेश औटी यांनी केले. तसेच सुबक असे मुखपृष्ठ श्री. बाळ ठाकूर यांनी करून दिले. याबद्दल त्यांचेही आभार.

- प्रकाशक