कौटुंबिक वातावरण

विठ्ठल रामजी शिंदे यांचे तत्त्वज्ञानात्मक स्वरुपाचे अथवा ललित स्वरुपाचे लेखन वाचले असता आपल्या मनावर ठसा उमटतो, तो त्यांच्या प्रेममय वृत्तीचा. 'मरण म्हणजे काय?' या प्रवचनामध्ये त्यांनी जगण्यासासखी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रेम होय असे सांगून जीवनात असणा-या प्रेम ह्या तत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. त्यांचे अंत:करण प्रेमपूरित होते. कौटुंबिक जीवनातही त्यांच्या प्रेममय वागण्याचा सातत्याने आविष्कार होत आलेला आहे. त्यांच्या या प्रेममय मनोवृत्तीमुळे त्यांच्या स्वत:च्या कौटुंबिक जीवनात प्रेमाचा सतत आविष्कार होत असे एव्हढेच नव्हे तर त्यांच्या इतरांशी होणा-या वर्तनातून त्यांची प्रेममय भावनिक वृत्तीच प्रकट होत असे.


त्यांच्या प्रेमाचा आविष्कार लहान मुलांबाबत तसाच वृद्धांबाबत, पुरुषांबाबत त्याचप्रमाणे स्त्रियांबाबत सातत्याने होत राहिला. त्यांची प्रेमभावना ही केवळ व्यक्तीपुरती कधीच मर्यादित राहिली नाही. त्यांच्या प्रेमभावनेला आविष्कार कौटुंबिक प्रेमभावना ही केवळ व्यक्तीपुरती कधीच मर्यादित राहिली नाही. त्यांच्या प्रेमभावनेला आविष्कार कौटुंबिक पातळीवर सातत्याने होत राहिला. तो कोणाही एका व्यक्तीचा, पुरुषाचा विचार करीत नसत. त्याच्या जोडीने त्याच्या पत्नीचा आणि अन्य कुटुंबीयांचा विचार करीत असत.

व्यक्तीचा विचार करीत नसत. त्याच्या जोडीने त्याच्या पत्नीचा आणि अन्य कुटुंबियांचा विचार करीत असत. व्यक्तीचा विचार करीत असतानाही तिच्या कुटुंबाचे पूर्वापार असलेले संबंध त्यांच्या मनात सहजच येत असत. नवा परिचय घडला की त्या परिचयाला ते कौटुंबिक स्नेहाचे स्वरुप प्राप्त करुन देत असत. प्रेमाचा व्यापक आविष्कार हा त्यांचा सहज स्वभाव होता.


विद्यार्थीदशेत जुळलेले स्नेहबंध हे विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी आयुष्यभर केवळ संभाळले एवढेच नव्हे तर ते जपले व अधिकाधिक उत्कट केले. तेरदाळचे विष्णु अण्णा देशपांडे हे त्यांचे लहानपणाचे जिवलग मित्र पुढील आयुष्याभरात जिवलग मित्रच राहिले आणि ही मैत्री केवळ या दोघांमधील नव्हती तर शिंदे व देशपांडे या कुटुंबांमधील होती. या मैत्रीची उत्कटता एवढी तीव्र होती की अत्यंत जिवलग नातलगाप्रमाणे विठ्ठल रामजी व विष्णुपंत यांच्यानतंरच्या पिढ्यांतही टिकून राहिली. विष्णुपंत देशपांडे यांच्या कन्या श्रीमती शकुंतलाबाई जगदग्नी ह्यांना भेटले असता ह्म दोन मित्रांमधील आणि दोन कुटुंबांमधील प्रेमाचे अत्यंत हृदयंगम वर्णन ऐकायला मिळत असे. शिंदे यांच्या प्रेमवृत्तीला तेरदाळकर देशपांडे कुटुंबीयांचा अनुरुप असा प्रतिसाद सदैव मिळत राहिला.


सार्वजनिक जीवनात व राजकीय कार्यामध्ये विष्णु अण्णा देशपांडे व विठ्ठल रामजी शिंदे यांचे सहकार्य कोणत्या प्रकारचे होते; तेरदाळ येथील संस्थांनी शेतकी परिषद ह्या दोघांच्या नेतृत्वाने कसी यशस्वीपणे पार पाडली; ह्यावरुन त्या दोघांच्या सार्वजनिक कार्यातील सहकार्याचे सोज्वळ स्वरुप आपण मागील एका प्रकरणात पाहिले आहेच. शिंदे व देशपांडे ह्या दोन कुटुंबाचे कौटुंबिक पातळीवर किती प्रेममय संबंध होते, याची कल्पना श्रीमती शकुंतलाबाई जगदग्नी यांच्या प्रांजळ निवेदनावरुन येऊ शकते. १९०१ ते १९०३ ह्या काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदे हे इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेले होते. ह्या काळामध्ये सौ. रखमाबाईकाकींनी फार हाल सोसले याचे वर्णन शकुंतलाबाई करतात. कधी कधी प्रतापला दूध मिळत नसे. घरात वरचेवर गृहकलह होऊ लागे. त्यावेळी रखमाबाई विष्णुअण्णांच्या घरी येऊन राहत. शकुंतलाबाईंनी लिहिले आहे, "आमच्या आईने चार गोष्टी सांगून उपमन्यूलादेखील दूध मिळाले नाही. पीठ, पाणी मिसळून आई देत असे. विठू अण्णाचे कार्य फार मोठे आहे. श्रीरामचंद्राप्रमाणे कष्टी जीवन आहे. त्यांना साथ देऊन संसार करावा. त्यांचे तुमच्यावर फार फार प्रेम आहे. पण जनसेवेचे कंकण बांधले आहे. विश्वाचा संसार तोच त्यांचा संसार आहे. परदेशाला जाताना त्यांनी एक काव्य केले होते. त्यातच तुमच्यावरच्या प्रेमाचा अर्थ आहे. प्रथम तीव्रतेने त्यांना आपली आठवण झाली. 'तरुण भार्या तान्हे बालक, वृद्धही मातापिता, अनाथ भगिनी, बंधु धाकुटा, आश्रित बांधव सारे.' तरी आपण जगाचा संसार करावा. लगेच विठूअण्णा यावयाचे. सौ. रखमाबाई सासरी जावयाच्या."


विष्णुपंत देशपांड्यांची मोठी मुलगी म्हणजेच शकुंतलाबाईंची थोरली बहीण जमखंडीस शिनाप्पा नाईक अनिखिंडी यांचे थोरले चिरंजीव व्यंकटराव यांना दिली होती. प्लेगच्या दिवसांमध्ये माळावर झोपड्या बांधून राहिले असता एक वेळ अण्णासाहेब शिंदे माळावर त्यांच्याकडे राहावयास गेले होते. शकुंतलाबाईंची आई त्यांना सांगत असे की, शिंदेंना सकाळी न्याहरीला बाजरीची भाकरी, लसणीची चटणी, कांद्याचे पिठले लागत असे. सौ. बहिणाबाईंनी (विष्णुपंतांच्या पत्नी ) गरम भाकरी करुन देताच विठ्ठल रामजी विनोदाने म्हणत असत, "आधी पोटोबा मग विटोबा ही म्हण कोणी केली समजत नाही. वहिनी मात्र उलटे करते. आधी विठोबा मग सर्वांचा पोटोबा."


विष्णुपंत देशपांडे यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना जेवढी कळकळ व काळजी वाटत होती तेवढीच अण्णासाहेब शिंदे यांना वाटत होती. याबद्दलची एक उदबोधक आठवण दत्तो वामन पोतदार यांनी सांगितली आहे. ते म्हणतात, "विठ्ठलराव एवढे सुधारक ! पण एके दिवशी सकाळीच येऊन मला म्हणाले, " पोतदार, माझ्या एका मित्राच्या (विष्णुपंत देशपांडे) मुलीचे लग्न करावयाचे आहे, ऋग्वेदी ब्राह्मणातील एखादा चांगला मुलगा सांगा." जातिभेद न मानणारे, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वाहून ह्या कामासाठी त्या वर्गातच जाऊन राहणारे विठ्ठल रामजी शिंदे यांचे हे म्हणणे ऐकून दत्तो वामन पोतदार विलक्षण प्रभावित झाले. त्यांनी पुढे लिहिले आहे, "त्यांची ही निष्कपट मैत्री आणि मानसिक औदार्य पाहून मी स्तंभित झालो."


विष्णुपंत देशपांडे व विठ्ठल रामजी यांच्यामध्ये कोणत्या पातळीवरील समरसता होती ह्याची कल्पना एका विशेष प्रसंगाने येते. शेतक-यांवर होणा-या अन्यायाविरुद्ध अण्णासाहेब शिंदे, विष्णुपंत देशपांडे यांनी जोरदार मोहीम उघडली होती. १९३२ साली तेरदाळला सांगली संस्थान परिषदेचे अधिवेशनही बोलाविले. १९३० सालापासून शेतक-यांबद्दलचे त्यांचे प्रचारकार्य चालूच होते. "जमखंडीस हे प्रचारकार्य संपवून विठूअण्णा अनिखिंडी यांच्या घरी बारा वाजता आले. पाने वाढली. अण्णासाहेब आले म्हणून मेजवानीचा बेत होता.

 

विठूअण्णा व सर्व मंडळी पानावर जाऊन बसले. जेवावयास सुरुवात करणार तेवढ्यात विठूअण्णांनी चौकशी केली. विष्णू कोठे आहे? विष्णुअण्णांनी स्पष्टपणे सांगितले. सौ. पद्मावतीला मुलगा झाल्याशिवाय अनिखिंडी केली. विष्णू कोठे आहे? विष्णुअण्णांनी स्पष्टपणे सांगितले. सौ. पद्मावतीला मुलगा झाल्याशिवाय अनिखिंडी यांच्या घरी पाणी पिणार नाही" विठूअण्णाही पानावरुन ताडकन उठले. " अरे ! तुझी मुलगी पद्मावती माझी कुणीच नाही का? मी पण तिला मुलगा झाल्याशिवाय अनिखिंडी यांच्या घरी पाणी पिणार नाही." त्या वेळी तिच्या सासुबाईंनी करुणवाणीने पदर पसरुन एक घास तरी खाऊन जावा म्हणून विनवणी केली. "नाही म्हणजे नाही. नातू झाल्यानंतर येईन." असे वचन देऊन आम्ही सर्व मंडळी तेरदाळला आलो. सौ. रखमाबाईंना हकिकत सांगताच त्या म्हणाल्या. "बडोदेकर संस्थानात दिवाणाची नोकरी असताना नको म्हणून अन्नावर (जन्माच्या) लाथ मारली. एक दिवसाच्या जेवणाचे काय घेऊन बसलात. असेच हट्टी आहेत." वगैरे बोलून सौ. रखमाबाईकाकी गप्पा बसल्या. मग हळूच शिंदे आत येऊन बोलत, "बोलून झाले ना. आपण आता दुस-या विषयावर बोलूया."


विष्णुपंत देशपांडे व विठ्ठल रामजी यांनी १९३२ साली दक्षिणी शेतकरी परिषद तेरदाळला भरवून शेतक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृत केली. "कर्मवीर शिंदे अध्यक्ष व विष्णुअण्णा स्वागताध्यक्ष होते. हरिहराची जोडी आम्ही नयनांनी पाहिली. डोळ्याचे पारणे फिटले." ह्या शब्दांतून शकुंतलाबाईंनी त्या दोघांबद्दल असलेली देवस्वरुप आदराची भावना प्रकट होते.


१९३१ साली म्हणजे लग्न झाल्यापासून १७-१८ वर्षांनी विष्णुपंतांची अनिखिंडीकडे दिलेली थोरली मुलगी पद्मावती ही प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले. शिनाप्पा नाईक अनिखिंडी यांनी बारशाच्या निमित्ताने मोठा उत्सव केला. अण्णासाहेब शिंदे यांना मुद्दाम बोलावून घेतले होते. पद्मावतीच्या सासुबाई लक्षुंबाई ऊर्फ अव्वा वाढत होत्या. अण्णासाहेबांना वाढीत असताना त्या म्हणाल्या, "ऋषीमुनीसारखा आशीर्वाद दिला. नातू झाला. आपण आमचे घरी जेवावयास आलात. आनांद झाला." शकुंतलाबाई सांगतात, "त्यावर आमची आई म्हणाली, "ते साधे ऋषीमुनी नसून महर्षी आहेत. तेव्हापासून आम्ही कर्मवीरांना महर्षी म्हणू लागलो." ह्म दोन कुटुंबांमधील सहवासात आनंदाचे कितीतरी प्रसंग येऊन गेले.

देशपांडे कुटुंबीयांना अण्णासाहेबांच्या ऋषितुल्य प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल किती आदर होता याची कल्पना एका दु:खद प्रसंगाने येऊ शकते. १९४८ साली महात्मा गांधीच्या खुनानंतर तेरदाळला भयंकर जाळपोळ झाली. ब्राह्मणांची घरे जाळली. सर्व ह्यात विष्णुअण्णांनी जनसेवेत घालवली. पण त्या दिवशी लोक फार बेफाम झाले होते. एका घरात सहा माणसे जिवंत जाळली गेली. पंधरा-सोळा वाडे पेटलेले जळत होते. विष्णुअण्णा जळणा-या माणसांना वाचवतो म्हणून सैरावैरा धावू लागले. 'जगाच्या महात्म्याला-गांधीना-मारले. माझ्या जीवाची काय किंमत,' असे ते म्हणत होते. ह्या दिवशी त्यांच्या मनावर जो परिणाम झाला तो वर्षभर तसाच राहिला. १९४९ साली मे महिन्याच्या १६ तारखेस विष्णुअण्णांनी इहलोकाची यात्रा संपविली. विष्णुअण्णांच्या पत्नी बहिणाबाई यांना अतीव दु:ख झाले. त्या म्हणत, "विठूअण्णा असते तर असा प्रकार घडलाच नसता. ते धावून आले असते. जनमनाचा क्षोभ शमविला असता." दोन कुटुंबांत अपवादानेच आढळावा असा मित्रभाव शिंदे व देशपांडे कुटुंबात होता.


विठ्ठल रामजी शिंदे यांना लहान मुलांची अतिशय आवड होती. त्यांना मांडीवर खेळविणे, फिरायला घेऊन जाणे, त्यांच्याशी हास्यविनोद करणे ह्यांमध्ये ते फार रमत. लहान मुलाच्या वयानुरुप त्याला ते रमवीत असत सुलोचनाबाई सोमण ह्यांनी आपल्या 'अनुभव' या आत्मकथानामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्याला शाळकरी मूल असताना कसे मांडीवर घेतलं हे नमूद केले आहे. १९०३ साली ब्रिडपोर्ट येथे युनिटेरियन चर्चमध्ये उपासना चालविण्यास ते गेले होते. रेव्हरंड बेसिल शॉर्ट यांच्या सासुबाईंना शिंदे यांच्या भेटीची आठवण होती. त्यावेळी त्या अगदी लहान वयाच्या होत्या. शिंदे हे या वेळी चर्चमध्ये त्यांना भेटलो असता त्यांनी सांगितली.


अण्णासाहेबांना भारतामध्ये सतत प्रवास करावा लागत असे. प्रवासामध्ये आपल्या कुटुंबीयांची आठवण सदैव त्यांच्या मनात असे. प्रवासामध्य असताना ते कधी आपल्या वडिलांना, कधी पत्नी रुक्मिणीबाईंना. तर कधी भगिनी जनाबाईंना पत्रे पाठवीत असत. त्यांचे अंत:करणच कौटुंबिक जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले असे. पुतणी, मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या मनोविनोदनार्थ त्याचप्रमाणे त्यांना नवी माहिती मिळावी, त्यांच्यावर संस्कार व्हावेत या प्रकारचा हेतू ठेवून ते पत्रे लिहीत असत. ह्या पत्रातूनही त्यांचा विनोदी स्वभाव प्रकट होत असे. ह्या विनोदाच्या द्वारा जणू ते या लहान मुलांशी क्रीडा करीत असत. ब्राह्मसमाजाच्या शतसांवत्सरिक कार्यक्रमानिमित्त ते कलकत्त्यास गेले असता त्यांनी आपला मुलगा रवींद्र व पुतणीला - बंधू एकनाथरावांची कन्या छबू हिला - पत्र लिहिले ते असे.


गुरुवार तारीख २३ ऑगस्ट १९२८
२१०-६, कॉर्नवॉलीस स्ट्रीट, कलकत्ता


प्रिय रवींद्र
आशीर्वाद
तारीख १६ रोजी मी येथे पोहोचलो. त्याच दिवशी मी प्रतापच्या नावे एक सविस्तर पत्र लिहिले. रा. सासने मजबरोबर आहेत. पण ते आजारी आहेत. त्यांना थोडे डहाळ जुलाब होतात. मला दोन दिवसांपूर्वी थोडी कणकण वाटली. पण आता मी अगदी बरा आहे.


काल उत्सवाचा मुख्य दिवस होता. सकाळी उपासना प्रसिद्ध कविवर्य डॉ. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी चालविली. त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते एक तास उशिरा आले. मी त्यांना प्रथमच पाहिले. ह्यांना नोबल प्राइज मिळवून ह्यांची चोहोकडे कीर्ती गाजत असता तू जन्मलास म्हणून तुझे नाव रविंद्र असे ठेवले. हे फार सुंदर गंभीर आणि भव्य आहेत. नाक सरळ, डोळे कमळासारखे पाणीदार आहेत, केस विपुल व दाढी शुभ्र आहे. दर्शनीय आहेत. ह्यांचे भाषण एक तास झाले. समाज अफाट जमला होता. पण चित्रासारखा तटस्थ होता. आवाज अलगुजासारखा मधुर कोमल आहे. भाषण झाल्यावर ह्यांनी थोडे गाऊन दाखवावे अशी नम्र विनंती करण्यात आली. किंचित मधूर स्मित करुन ही विनंती ह्यांनी मान्य केली व एक अतिगोड, स्वकृतपद म्हणून दाखविले. हे प्रसिद्ध गाणारे तज्ज्ञ आहेत. प्राचीन ऋषी किंबहुना एका देवतेप्रमाणे ह्यांचा देखावा प्रेरणा करणारा होता.


अंघोळीस वगैरे पाण्याची टंचाई आहे. हेमचंद्र अशक्त असूनही हिंडतात, फिरतातही. कोणीतरी हात धरून न्यावे लागते. शकुंतला दोन दिवस तापाने आजारी आहे. डोके, अंग दुखते तरी तशीच सर्व काम करीत आहे. मागे मी जेथे गेलो होतो, तेथील मरिहाटी व मशीहाटी येथील नामशूद्र मंडळी आली आहेत. ते तुझी व अक्काची फार आठवण करीत आहेत.


तुझा व छबूचा अभ्यास कसा आहे, ते दोघांनी स्वत: पत्रे लिहून कळवावे. माझी पत्रे असल्यास पाठवावीत. प्रतापने पाठविलेली तीनही पत्रे पोहचली. अक्काला घरी मदत करा. अभ्यास करा.
तुझा अण्णा.


प्रिय बाळ, प्रताप लिहितो की तू अभ्यास करीत नाही. स्वत: प्रतापने योग्य वेळी अभ्यास केला नाहीच म्हणून आता त्याला फार त्रास होत आहे. तूही तोच प्रकार चालविला आहे. पुढे पश्चाताप करण्यापेक्षा आताच अभ्यास कर.
तुझा अण्णा
छबूला पत्र वाचावयास दे. हे पत्र प्रतापास व त्यांचे त्यास ताबडतोब दे. अक्काला वाचून दाखीव.


३१ ऑगस्ट १९२८
२१०/६, कॉर्नवॉलीस स्ट्रीट, कलकत्ता


प्रिय रवींद्र व प्रिय छबू
आशीर्वाद
तेथील उत्सव आटपून चार दिवस झाले. उत्सवात गर्दी फार होती. पण कलकत्त्यास पाण्याचा तुटवडा आल्याने अंघोळीची व धुण्याची फार आबाळ झाली. खादीचे कपडे काळे होतात. साबण होता पण पाणी नव्हते. दोन दिवसांनी एकदा सा-या दोन बारड्या मला मिळत. तेही मी एका मोठा प्रचारक म्हणून. एका बारडीत धोतर, सदरे धुवावे लागत व दुस-यात स्नान करावे लागत असे. पण जपून केल्यास मला एवढे पाणी पुरत असे व माझे कपडे स्वच्छ आहेत. तुला सनाळची पुढची कृष्णा नदीही पुरत नाही. बबन तर गंगा नदीवर बसून अंघोळ करणार नाही. मी अर्ध्या बारडीत कपडे धुतो व बाकीचे अर्ध्या बारडीत ते स्वच्छ खळबळून बारडीतच पिळतो. ते पाणी फार घाण नसते म्हणून त्यातच बेंबीपासून खालच्या अंगाचा खालचा भाग प्रथम धुतो नंतर दुसरी स्वच्छ बारडी मला चांगली पुरते. काटकसर केल्यास केव्हाही वाण पडत नाही. धन मिळविण्यात सुख नसून ते फार जपून खर्च करण्यात आहे. लोक चिक्कू म्हणाल्यास त्यात पुन्हा करमणूक आहेच.


माझे डोक्यावर घेण्याचे दोन्ही रुमाल मधे फाटले आहेत इतकी भगदाडे पडली आहेत की त्यातून तू सहज छत्री घेऊन जाशील. ह्या भगदाडामुळे माझी मोठी सोय झाली आहे ! त्या भगदाडात माझा उजवा हात घालून रुमाल खांद्यावर घेतला की अंग चांगले झाकले व उजवा हा मोकळा राहतो. रुमाल फाटले नसते तर माझी ही सोय झाली नसती. कसलीही आपत्ती आली तर तिच्यातून सुखच बाहेर निघते. मात्र पाहणा-यास तशी दृष्टी पाहिजे. मी माझ्या फाटक्या रुमालाची सोय येथील मित्राला समजावून सांगितल्यावर सर्वत्र आनंदाचे हासे उचंबळले.


मला म्हणून दिलेल्या खोलीत एका मागून एक चार अधिक पाहुणे घुसले. सगळे रा. सासन्यासारखे जवळचे नको कसे म्हणावे, पण झाडणारा मी एकटाच. डॉ. खांडवाला वृद्ध सज्जन; परंतु बूट घालून सतरंजीवर फिरे. पुन्हा विसरे, इशारा दिला की भला गृहस्थ माफी मागे. मी झाडू कुठे व तुम्हाला माफी कुठे करु म्हटल्यावर सर्वत्र हाशा पिके. उत्सव संपल्यावर आमच्या खोलीतील मोठी सतरंजी भाड्याने आणलेली परत नेण्यास बाबू सतीशचंद्र चक्रवर्ती आले व मोठ्या मिनतवारीने नेण्याबद्दल क्षमा मागू लागले. मी म्हटलें, "अहो ही सतरंजी नेण्याबद्दल मीच तुमचे आभार मानितो. ज्याने त्याने बूट-जोडे घालून फिरावे व नंतर प्रार्थनेस जाऊन बसावे. मी मात्र सतरंजी झाडीतच मागे राहावे. आता पुन्हा न आणाल तर मला प्रार्थनेला वेळ मिळेल."


बंगाली लोक उपासनेला बसले तर इतका वेळ बसतात की इतकेड एकदा जन्मून मेला तरी त्यांना खबर नसते. अशा उपासना रोज दोन-तीन होतात. मध्यंतरी भजन चालते. असा आठ दिवस उत्सव चालला. मी ह्यातून जगून वाचून राहिलो म्हणून ईश्वराचे आभार मानण्यासाठी एक विशेष प्रार्थना करुन तिला सर्व बंगाल्यांना बोलावणार आहे. अक्का आली नाही तरी तू ये.
तुझा अण्णा


ह्याच दिवशी चिरंजीव छबूला अण्णासाहेबांनी आपल्या प्रवासाची कल्पना देणारे दुसरे पत्र लिहिले. अर्थात छबूला लिहिले असले तरी ते पत्र आपल्या प्रवासाची माहिती सगळ्याच कुटुंबाला व्हावी या हेतूने लिहिले आहे.


ब्राह्मसमाज २१०-६, कलकत्ता
३१ ऑगस्ट, १९२८.


चि. छबू
मागील बाजूवरील नकाशात मी ज्या ज्या शहरी जाणार आहे ती शहरे दिली आहेत. आणखीही ठिकाणी जाणार आहे. नकाशावर तुझ्या ही सर्व ठिकाणे पहा. म्हणजे तुझा भूगोल चांगला होईल. चितागॉंगकडे पूर्व किना-याकडे मी कदाचित जाणार नाही. बिहार आणि संयुक्त प्रांत पंजाबात जाईन. ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू तीन नद्या ओलांडीन. त्यात स्नानपान करीन. दार्जिलिंग, डेहराडून, रावळपिंडी ह्या तीन ठिकाणी हिमालयाचे दर्शन होईल. बंगाली, हिंदी व पंजाबी ह्या तीन भाषा ऐकेन. बोलपूर ( शांतिनिकेतन), बुद्धगया, काशी, प्रयाग, अमृतसर ही क्षेत्रे पाहीन व सर्व ठिकाणी ब्राह्मधर्माचा प्रचार करीन.


बबनला व अक्काला ही सर्व ठिकाणे दाखीव. हे व दुसरे पत्र वाचून झाल्यावर जनाक्काकडे पाठवून दे. मला बबनचे व तुझे उत्तर अद्यापि आले नाही. तुझे स्कॉलरशिपचे काय झाले ते कळले नाही. तुम्ही दोघे अभ्यास कसा करिता तो कळवा. इकडे पाऊस पडत आहे. हिमालयातील थंडी मला कशी सोसणार हे पहावे. हे सर्व आपटून डिसेंबरच्या मधे नाताळाचे अगोदर पुण्यास येण्याचा विचार आहे. त्या वेळी कौटुंबिक उपासनामंडळाचा उत्सव करावा असे वाटते. प्रकृती बरी आहे.


अण्णासाहेबांना नातवंडे झाल्यावर तर त्यांच्या कौटुंबिक जीवात आनंदाचे नवे निधान निर्माण झाले. १९३० साली ते येरवड्याच्या तुरुंगात असताना त्यांच्या मोठ्या सुनेला मुलगी झाली. ते तुरुंगात असताना जन्मली म्हणून त्यांनी तुरुंगी असे टोपणनाव बहाल केले होते. ह्या लहानग्या उर्मिलाचे ते परोपरीने लाड करीत. खेळवत, तिच्यावर कविता करण्याची ऊर्मीसुद्धा त्यांना येत असे. तशाच प्रकारची एक कविता त्यांनी केली आहे. ह्या कवितेत संदर्भ आहे तो सदाशिवराव केळकरांचे चिरंजीव डॉ. माधव यांचा. हे माधवराव निसर्गोपचाराचे कट्टर पुरस्कर्ते होते. एनिमा देणे व अंगाला बर्फ चोळणे याचा त्यांच्या उपचारात प्रमुख भाग असे. ( महात्मा गांधी आजारी असताना ह्याच माधवराव केळकरांनी त्यांच्यावर निसर्गोपचार केले होते व त्यांच्या उपचाराचा थोडासा लाभही आपल्याला झाला असे म. गांधीनी नमूद केले आहे. केळकरांच्या भेटीबद्दल म. गांधीनी असे लिहून ठेवले आहे की, "हे भेटताक्षणीच माझी खात्री पटली की, हे गृहस्थही माझ्यासारखेच विक्षिप्त आहेत.) लहानग्या उर्मिलावरची कविता
 

 

लेकी उर्मिला बाई !
परसाकडं पिवळी होई !
इथं काई कमोड न्हाई !
आता काय करुं बाई माधव आला ||

एनिमा घ्यायला उशीर झाला ||


लेकी उर्मिला बाई |
बाहिर गेली गं माई |
आजिबाई जवळी न्हाई |
आता काय करुं बाई माधव आला |
बरफ चोळायला उशीर झाला ||2||


लेकी उर्मिला बाई |
पोटात खडा होई |
तोंडात वकीर येई |
आता काय करुं बाई माधव आला |
फद्कन जुलाब झाला || 3||


उर्मिलाचे जसे त्यांना कौतुक होते तसेच तिसरी नात सुजाता हिचेही त्यांना कौतुक वाटत असे. एका खाजगी पत्रात ते लिहितात, "सुजाताचे डोळे मला निववितात."


बहुतेक नातवंडांची नावे ही अण्णासाहेबांनी सुचविलेल्याप्रमाणेच ठेवली गेली. ही बहुतेक महाभारत, बोद्ध धर्मग्रंथ अथवा ब्राह्मसमाज याशी संबंधित अशी उर्मिला, दमयंती, सुजाता, अशोक, दिलीप, नवीनचंद्र अशी होती. नातवंडांसमवेत खेळण्यामध्ये त्यांना आनंद वाटत असे. अगदी लहान नातवंडाला पाठीमागच्या झोळीत घालून ते चालू शकणा-याला बरोबर घेऊन ते भांबुडर्यातील काँग्रेसभवनाच्या पिछाडीस असलेल्या आपल्या घरातून फगर्युसन कॉलेजच्या टेकडीवर फिरायला जात. नातवंडांना खेळायला मोकळे सोडून ते निवांतपणे एखाद्या वडाच्या झाडाखाली बसत. वाटेत त्यांना भेटणारे लोक बरेच असत. भेटणा-या प्रत्येकाशी थोडा थोडा वेळ बोलण्यात गेल्यामुळे घरी पोहोचेपर्यंत बराच वेळ निघून जाई.


पुण्यामधील वास्तव्यात ज्या कुटुंबाशी त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता, ते म्हणजे गणपतराव शिंदे व अहल्याबाई शिंदे यांचे कुटुंब. ह्या दोघांबद्दल शिंदे यांनी किती जिव्हाळा वाटत होता याचे हृदयंगम व काव्यपूर्ण वर्णन त्यांनी आपल्या येरवड्याच्या रोजनिशीत केले आहे.


अण्णासाहेबांना व्यक्ती नव्हे तर कुटुंब हेच प्रेमाचे एकक वाटत होते. कोणाही व्यक्तीचा विचार जे कुटुंबविरहित उपेक्षा येत असते तिचाही अण्णासाहेबांच्या मनावर परिणाम झाला असला पाहिजे. त्याच्या आईचे उदाहरण तर त्यांच्या अंतःकरणात लहानपणापासून बाणासारखे घुसले होते. कदाचित ह्याचा परिणाम म्हणूनही स्त्रीचा विचार त्यांच्या मनामध्ये सदैव असे. त्यांच्या ठिकाणी असणा-या कुटुंबविषयक वृत्तीमुळे व जाणिवेमुळे ज्या वेळेला उपासनामंडळ स्थापन करण्याचा विचार त्यांच्या मनात आला, त्या वेळी त्यांनी त्याचे स्वरुप कौटुंबिक उपासनामंडळ असेच ठेवले. कुटुंब हेच प्रेमाचे केंद्र होय, अशी त्यांची केवळ बौद्धिक धारणा होती असे नव्हे, तर त्यांच्या मनाची स्वाभाविक वृत्ती बनून गेली होती. म्हणून कौटुंबिक उपासना मंडळाच्या द्वारा पुण्यामधील कितीतरी कुटुंबे एकमेकांशी प्रेमाच्या धाग्याने जोडली गेली. वाईमधील ब्राह्मसमाजाची घडण करीत असताना व तेथील कार्याला चालना देत असताना अण्णासाहेबांनी विविध कुटुंबे एकत्र आणली, साप्ताहिक उपासना, वनोपासना यांसारख्या उपक्रमांच्या द्वारा अनेक कुटुंबांमध्ये परस्परांबद्दल त्यांनी प्रेम वृद्धिगत केले. अशा प्रकारच्या कौटुंबिक प्रेमामध्ये रममाण होण्यात अण्णासाहेब शिंदे यांना आंतरिक समाधान लाभत असे.


विद्यार्थिदशेत असल्यापासून जातिधर्माची बंधने ओलांडून त्यांचा सय्यद कुटुंबाशी स्नेहभाव जुळलेला होता. खरे तर सय्यदांचे वडील हेच प्रथमत: विठ्ठल रामजी शिंदे यांचे स्नेही बनले. त्या दोघांच्य वयातील अंतर ह्या स्नेहामध्ये आड आले नाही. त्यांच्या कुटुंबात जाणेयेणे, खाणेपिणे ते सहजपणे करीत होते.  ह्या सय्यद कुटुंबाचा स्नेह पुढील काळातही आयुष्यभर टिकला. सय्यद हे अण्णासाहेबांपेक्षा वयाने थोडेसेच लहान होते. परंतु ते त्यांच्या वडिलांचे स्नेही असल्यामुळे सय्यदांकडे ते मुलाप्रमाणेच पाहत होते. सय्यद व कल्याणी यांच्या विवाहप्रसंगी प्रार्थनासमाजाला अनुसरुन त्यांनी पौरोहित्यही केले. सय्यदांचे कुटुंब हा शिंदे कुटुंबाचाच भाग बनलेला होता.


विठ्ठल रामजी शिंदे प्रार्थनासमाजेचे प्रचारक झाल्यानंतर मुंबईत राममोहन आश्रमात त्यांनी बि-हाड केले. शिंदे यांच्या प्रेमपूर्ण वृत्तीचा आविष्कार त्यांच्या आतिथ्य़शीलतेत होणे ही अत्यंत स्वाभाविक अशा प्रकारची गोष्ट होती. हे आतिथ्य करताना जात, धर्म ह्या गोष्टी त्यांच्याबाबतीत आड येण्याचा प्रश्नच नव्हता. भगवंतराव पाळेकर (जागृतीकार) हे बडोदा सोडून १९०५ साली मुंबईस आले होते. तेथे गेल्यानंतर ते प्रार्थनासमाजाचे सभासद झाले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आतिथ्यशीलतेचा त्यांना कसा अनुभव आला यासंबंधी त्यांनी स्वत:च लिहिले आहे, "१९०५ साली प्रसिद्ध अस्पृश्योद्धारक विठ्ठल रामजी शिंदे त्या वेळी प्रार्थनासमाजाच्या राममोहन रॉय आश्रमात राहत होते. त्यांचा माझा परिचय झाला. एकेवेळी त्यांचेकडे नागपूरचे अस्पृश्य समाजातील मुख्य कार्यकर्ते रा. किसन फागुजी बनसोडे, गणेश आकाजी गवई वगैरे मंडळी जेवावयास होती. श्री. शिंदे यांनी मला व माझ्या पत्नीला जेवणाचे आमंत्रण दिले. १९०६ सालची ही गोष्ट. पुरणपोळी आणि पायरीच्या आंब्यांच्या रसाचे जेवण होते. माझ्या पत्नीला इतक्या जुन्या काळीही अस्पृश्यांच्या पंगतीस जेवण्यात आपण अधर्मांचरण करीत आहे असे वाटले नाही. खुद्द शिंदे यांनाही आम्हा दोघांविषयी मोठा आदर वाटला.


प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून १९१० पर्यंत विठ्ठल रामजी शिंदे यांचे वास्तव्य राममोहन आश्रमात होते. वस्तुतः प्रचारक म्हणून मिळणारा त्यांचा पगार रुपये ६० एवढा तुटपुंजा होता. त्यातूनच त्यांना स्वतःच्या कामानिमित्त करावयाचा प्रवासखर्चही भागवावा लागे. मुंबई हे भारतातील ब्राह्मसमाजाचे तर केंद्र होतेच त्याशिवाय अन्य सांस्कृतिक कारणांनीही महत्त्वाचे शहर होते. त्यामुळे बंगाल, मद्रास वगैरे प्रांतांतून ब्राह्मसमाजी मंडळी वेगवेगळ्या निमित्ताने मुंबईस येत असत व त्यांचा मुक्काम राममोहन आश्रमात असे. ह्या बड्या मंडळींचे आतिथ्यही विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या आत्मीयतेने करीत असत.


अण्णासाहेब शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आतिथ्याची परंपरा पुढील काळात पुणे येथील वास्तव्यातही मोठ्या आनंदाने सांभाळलेली दिसून येते.


भाई माधवराव बागल यांनी विठ्ठल रामजी शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून त्यांना मिळालेल्या प्रेमळ वागणुकीचे वर्णन केले आहे. प्रजापरिषदेच्या चळवळीमुळे माधवरावांवर कोल्हापूर संस्थानातून हद्दपार होण्याची पाळी आली होती. पुण्यास एका जवळच्या नातेवाईकाकडे आसरा मिळेल ह्या हिशेबाने ते पुण्यास आले. परंतु त्यांची अपेक्षा सफळ होईल असे त्यांना वाटले नाही. मुंबईस कोठेतरी हॉटेलमध्ये जाऊन राहावे असा त्यांनी विचार केला. मुंबईस जाण्यापूर्वी विठ्ठल रामजींचे दर्शन घ्यावे म्हणून त्यांच्या भेटीस ते गेले.


आपली सगळी हकिकत त्यांनी सांगितली. विठ्ठल रामजी शिंदे ही हकिकत समजताच त्यांनी माधवराव बागल व त्यांच्या पत्नी ह्या दोघांनाही आपल्या घरी राहण्यासाठी अगत्यपूर्वक निमंत्रण दिले. त्यांनाही असा आधार आणि आसरा हवा होता. अशा थोर पुरुषाच्या संगतीचा लाभ आपल्याला मिळणार म्हणून माधवरावांनाही आनंद वाटला. ते आपले सामानसुमान घेऊन विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी पत्नीसह येऊन राहिले. अण्णासाहेबांनी दाखविलेला हा घरोबा आणि आत्मीयता ही त्यांना आपल्या आयुष्यातील अभिमानास्पद बाब वाटत होती. त्यांच्या घरी ना नोकर ना स्वयंपाकी. जनाबाई अगत्याने पाहुणचार करीत होत्या.


केरो रावजी भोसले यांचे चिरंजीव अनंतराव यांनाही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्नेहमय वृत्तीचा अनुभव आला. केरो रावजी भोसले हे विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्रार्थनासमाजातील सहकारी. १९०६ सालापासून ते १९२० साली मृत्यू होईपर्यंत पंढरपूर येथे नवरंगे अनाथाश्रमाचे ते चालक होते. त्यांनी हे अनाथाश्रम अतिशय उत्तम त-हेने चालविले होते. ह्या अनाथ बालकांचा कपडालत्ता, अन्न वगैरे गरज भागणे एकवेळ शक्य असते. उदार दाते मिळाल्यावर ते घडूही शकते. परंतु सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे आईबापांशिवाय असलेल्या ह्या बालकांना प्रेमाची वागणूक मिळणे. केरो रावजी भोसले हे अनाथाश्रमातील मुलांशी अत्यंत प्रेमळपणे वागत असत. परिणामत: ही मुले आईच्या मागे असावीत व तिच्या अंगाला झटावीत त्याप्रमाणे केरो रावजींशी लडिवाळपणाने वागत. अशा केरो रावजींबद्दल विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना फार प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यू १९२० साली झाला. केरो रावजींचे चिरंजीव अनंत हे तरुणपणी देशकार्यात पडले. १२ जानेवारी १९३३ रोजी त्यांनी पंढरपूर येथे सत्याग्रहात भाग घेतला. परदेशी कापडाची होळी करणे असे या सत्याग्रहाचे स्वरुप होते. या सत्याग्रहात सत्याग्रहींवर लाठीमार झाला. भोगले हे जखमी झाले. त्यानंतर झालेल्या धरपकडीत त्यांना पकडण्यात आले व दीड वर्षाची शिक्षा झाली. येरवड्याच्या तुरुंगात ही शिक्षा त्यांनी भोगली. तुरुंगातून सुटल्यानंतर ते पुण्यास आले व विठ्ठल रामजी शिंदे यांना भेटले. केरोपंत भोसले यांचा मुलगा आपल्याला भेटला, त्याच्या ठिकाणी देशभक्तीची ज्वलंत भावना आहे हे समजून त्यांना आनंद वाटला. वर्तमानपत्रात त्याचे नाव वाचल्याचेही त्यांनी सांगितले व त्यांना अगत्याने आपल्या घरी ठेवून घेतले. पुढे काय करणार असा अण्णासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला. आपण देशकार्य करणार असे उत्तर ह्या तरुण अनंताने त्यांना दिले. वास्तव जीवनाची कठोरता अनुभवलेल्या अण्णासाहेबांनी अनंताला विचारले, "पण दुपारची सोय काय?" हा प्रश्न विचारुन त्यांनी उदरनिर्वाहाच्या बिकट समस्येची अनंताला जाणीव करुन दिली. अनंताजवळ कोणतेच उत्तर नव्हते.

 

कोणते कौशल्य नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अण्णासाहेबांनी अनंताला सल्ला दिला की, "तू टेलरिंगचे शिक्षण घे.' पुण्यामध्ये जाधव टेलरिंग कॉलेज हा शिवणकाम शिकविणारा वर्ग होता. अण्णासाहेबांनी अनंताची सोय तेथे केली. अनंताला वस्तुत: हे काम आवडणारे नव्हते. परंतु अण्णासाहेबांनी सांगितलेले असल्यामुळे निष्ठावंतपणे दीडके वर्ष शिवणकामाचे शिक्षण घेऊन हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. आयुष्यातील अत्यंत बिकट काळात अण्णासाहेबांचे प्रेम, साहाय्य व मार्गदर्शन मिळाले, ह्याबद्दल भाई अनंत केरु भोसले यांना अजूनही अण्णासाहेबांबद्दल कृतज्ञता वाटते.