मुंबई प्रार्थनासमाजाच्या कामामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. शिंदे स्वतः समाजाच्या कामात रंगून गेले होते. मात्र त्यांच्या घरच्या मंडळींची अवस्था समाधानकारक नव्हती. त्यांना जमखंडीसारख्या खुल्या हवेची सवय होती. मुंबईची कोंदट हवा त्यांना मानवेना. शिंदे यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांना १९०४च्या ऑक्टोबरमध्ये तिसरा मुलगा विश्वास झाला. त्या बाळंतपणापासून त्यांची प्रकृती खालावली. तशात शिंदे यांची बहीण चंद्राक्का हिला क्षयाची भावना जडली. १९०१ साली शिंदे यांचे मित्र वासुदेवराव सुखटणकर यांची बहीण शांताबाई हिला क्षयाची बाधा झाली होती म्हणून तिला शिंदे यांच्या घरी जमखंडीस हवापालटासाठी नेण्यात आले होते. चंद्राबाई ही नेहमी तिच्या सहवासात असल्यामुळे व नेहमी शुश्रूशेत असल्यामुळे क्षयरोगाच्या जंतूंनी तिच्या शरीरात प्रवेश केला व मुंबईच्या कोंदट हवेचा प्रतिकूल परिणाम झाल्याने चंद्राबाईला तोच रोग जडला. शिंदे यांच्या वृद्ध आई-वडिलांना ही एक नवीन चिंता निर्माण झाली.
१९०५च्या उन्हाळ्याच्या आरंभी शिंदे यांचे वडील चंद्राबाईला घेऊन खंडाळ्याला हवाबदलासाठी राहू लागले. तेथून त्यांनी पुण्यास राहावयाचे ठरविले व वेताळपेठेतील भाजेकरांच्या वाड्यात बि-हाड केले. विठ्ठल रामजी शिंदे हे मुंबईस येऊन-जाऊन पुण्यास राहत होते. या वर्षी शिंदे हे पुण्यातच जास्त वास्तव्य करून पुणे येथील प्रार्थनासमाजाच्या कामात साह्य करू लागले.
पुणे येथील या मुक्कामात शिंदे यांनी एक महत्त्वाचे कार्य केले. ते १८९८ मध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. तेव्हाच त्यांना आपण अस्पृश्यवर्गासाठी काही कार्य करावे अशी तळमळ राहून राहून लागली होती. मुंबई प्रार्थनासमाजाने काहीएक बोभाटा ना करता अस्पृश्यवर्गीयांना रात्रीच्या शाळांमध्ये शिक्षण द्यावयास आरंभ केला होता. प्रार्थनासमाजाच्या कार्याचा एक भाग म्हणून अस्पृश्यवर्गासाठी आपण शाळा उगडून काम करू शकतो हे शिंदे यांना स्वाभाविकपणे जाणवले. म्हणून १९०५ सालच्या रामनवमीच्या दिवशी मीठगंज पेठेत अस्पृश्यांसाठी एक रात्रीची शाळा शिंदे यांनी उघडली. मीठगंज पेठ हे महात्मा जोतीबा फुले यांच्या वास्तव्याचे ठिकाण. त्याच पेठेमध्ये शिंदे यांनी ही शाळा उघडावी ही घटना फुले यांचे खंडित झालेले कार्य शिंदे यांनी नव्या जोमाने सुरू करावयाचे ठरविले याची द्योतक म्हणावी लागेल.
ही शाळा उघडण्याच्या सुमारास हुजूरपागेतील ब-याच मैत्रिणी हजर होत्या. भिजवलेली डाळ व उसाच रस वाटण्यात आला. हा समारंभ भाजेकरांच्या वाड्यातच करण्यात आला. ही शाळा पुढे प्रार्थनासमाजाच्या स्वाधीन करण्यात आली आणि अखेरीस शिंदे यांनी पुढे काढलेल्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्या संस्थेमध्ये सामील करण्यात आली.
शिंदे ह्यांचे पुण्यात बरेच वास्तव्य घडू लागल्याने त्यांना प्रार्थनासमाजाच्या पुणे येथील कामाला चालना देणे शक्य झाले. सुबोधपत्रिकेच्या इंग्रजी बाजूमध्ये शिंदे यांच्या विविध कार्याची माहिती आली आहे. तीमध्ये म्हटले आहे, श्री. वि. रा. शिंदे यांच्या येथील वास्तव्यामुळे पुणे प्रार्थनासमाजात नवे चैतन्य येऊ लागले आहे. आपल्या येथील थोड्या दिवसाच्या वास्तव्यामध्येच त्यांनी संगतसभा सुरू केली असून दर बुधवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये ती भरते. ते स्वतः उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग दर शुक्रवारी सायंकाळी भरवितात व सध्या आर्मस्ट्राँग यांचे देव आणि आत्मा हे पुस्तक ते विद्यार्थ्यांसमवेत वाचतात. या वर्गाला फर्ग्युसन, डेक्कन आणि सायन्स कॉलेजमधून सुमारे सोळा विद्यार्थी उपस्थित राहिले. शिंदे यांनी अशाच प्रकारचे वाचनवर्ग फर्ग्युसन व डेक्कन कॉलेजातही सुरू केले आहेत. या कामाशिवाय त्यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून ‘तुकाराम सोसायटी’ च्या बैठका डॉ. भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली नियमित भरू लागल्या आहेत.१
शिंदे यांची कामाची तळमळ, कामाचा झपाटा, त्यांचे संघटनाकौशल्य ह्यांचा लाभ पुणे प्रार्थनासमाजास निश्चितपणे झाला.
ह्या अवधीत शिंदे यांच्या कौटुंबिक विवंचना संपुष्टात आल्या नाहीत; उलट त्यांच्या विवंचनेत नव्याने भरच पडू लागली. चंद्राबाईच्या प्रकृतीला काही केल्या उतार पडेना, म्हणून तिला अहमदनगरच्या कोरड्या हवेत न्यावे लागले. तिच्याबरोबर त्यांचे वृद्ध आई-वडील होतेच. मुंबईत त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांची तब्येत जास्तच बिघडत चालली. तशात त्यांना झालेला तिसरा मुलगा विश्वास हा ऑक्टोबर महिन्यात वारला. म्हणून जनाक्काला मुंबईस मदतीसाठी जावे लागले. दुर्दैवाने तिलाही त्याचवेळी प्लुरसीची व्यथा जडली.
कौटुंबिक काळजीने शिंदे यांचे मन उद्विग्न असताना त्यामध्ये आणखी एका मनस्तापाची भर पडली. शिंदे यांच्या प्रचारकार्यावर नियंत्रण पडावे म्हणून एक स्वतंत्र नियमांची रचना करण्याचे घाटू लागले. त्याच्यासाठी एक पोट कमिटी नेमून प्रचारकाने तिच्या तंत्राने वागावे अशी वाटाघाट सुरू झाली. शिंदे यांच्या स्वतंत्र प्रकृतीला ते पटेना. आधी काम करावे, अनुभव घ्यावा आणि मग योग्यवेळी नियम करावे असा स्वाभाविक क्रम असणे त्यांना युक्त वाटत होते. शिंदे यांना प्रार्थनासमाजाच्या कार्याच्या व्याप्तीचा अंदाज अद्यापि नीट आलेला नव्हता. पैशाची पुरेशी तरतूद नाही. अशा परिस्थितीत शाब्दिक नियमांची गडबड करणे शिंदे यांना अस्थानी वाटत होते. त्यांनी आपल्या कामाची डायरी ठेवावी, वरचेवर अहवाल द्यावा वगैरे पिरपीर सुरू झाली. शिंदे कामाच्या ओघात ही कामे स्वयंस्फूर्तीने प्रथमपासून करीतच होते; पण अमक्याच वेळी व अमक्याच पद्धतीने ती व्हावीत अशा प्रकारचा नियमाचा काच त्यांना नकोसा वाटू लागला.
शिंदे यांचे मन चिरंजीव विश्वास ह्या मुलाच्या मृत्यूने उद्विग्न झाले होते. तेव्हा त्या वातावरणातून बाहेर पडावे व मनःशांती मिळवावी यासाठी त्यांनी महाराष्ट्रात व कर्नाटकात दौरा काढला.
संदर्भ
१. सुबोधपत्रिका, १९ मार्च १९०५.