1. मुख्यपान
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी

विठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके

  • धर्म, जीवन व तत्त्वज्ञान
  • माझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३
  • कर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र
  • शिंदे लेखसंग्रह
  • माझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • लेख, व्याख्याने आणि उपदेश
  • THE THEISTIC DIRECTORY..

गो.मा.पवार यांची पुस्तके

  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय

धर्मसंघाची आवश्यकता

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ|
-तुकाराम

चालू साली आमच्या समाजातून दोन मोहरे गेले. ते प. लो. वा. सदाशिवराव केळकर आणि नुकतेच गेलेले वासुदेवराव नवरंगे हे होत. सत्यवक्तेपणा, स्पष्टवक्तेपणा, स्वार्थत्याग, उद्योग, साधेपणा, धार्मिक वृत्ती इत्यादि अनेक गुम ह्या दोघांच्याही अंगी होते, पण ते त्यांचे विशेष गुण नव्हते, पासरीभर मतांची आणि प्रतिज्ञांची किंमत ज्या कृतीच्या एका तोळ्याइतकीही भरत नाही अशी भरीव कृती आमच्यापैकी ज्या थोड्या पुरूषांनी अगदी मरेपर्यंत अनेक अडचणी आणि संकटे सोसून साधली आणि आपल्या करारीपणामुळे प्रार्थनासमाजाला हल्लीचे जे संघस्वरूप दिले त्यांच्यापैकी हे दोघे होते. तो कृतीचा करारीपणाच ह्यांचा विशेष गुण होय. म्हणून अशा प्रसंगी-

(१) मनुष्य जातीचे जे विस्तृत जीवन आहे त्यात अशा धर्मसंघाचे कोणते महत्त्व व कशी आवश्यकता आहे?
(२) अशा संघाचा पाया कोणत्या तत्त्वांवर घालावा?
(३) त्या पायावर संघाची वरील उभारणी कशी करावी?

ह्या तीन महत्त्वाच्या मुद्यांवर ह्या पवित्र पीठावरून निरनिराळ्या वेळी सविस्तर प्रवचन व्हावयाला पाहिजे आहे. ते हल्लीच्या काळाला व प्रस्तुत देशस्थितीला अनुसरूनच असले पाहिजे. केवळ तात्त्विकदृष्ट्या पाहता सामान्यत: अशा संघाची आवश्यकता नाही. कारण पुरातन काळापासून निरनिराळ्या वेळी सर्वत्र धर्मसंघ स्थापन होत आलेले आहेत व त्याचे अवशेष अद्यापि मागे उरले आहेत.

तथापि हल्ली आमच्या देशात कसा विपरीत प्रकार चालला आहे पहा. चांगले शिकलेले, काही पुढारीदेखील खासगी संभाषणात उघडपणे म्हणतात की, हल्ली चहूंकडे राष्ट्रांराष्ट्रांमध्ये किती झटापट चालली आहे, बलवान दुर्बळाला कसा खाली रगडीत आहे, अशा वेळी धर्माच्या आणि सामान्य बंधुत्वाच्य गोष्टी सांगत बसणे योग्य नव्हे. निदान आमच्यासारख्या मागासलेल्या देशाने तरी केवळ सात्विकपणा स्वीकारणे शहाणपणाचे होणार नाही. आम्ही आधी राजसी गुणच वाढवून इतरांनी बरोबरी केली पाहिजे. म्हणजे नंतर समानतेच्या गोष्टी सांगितल्यास काहीतरी शोभेलच. असे प्रतिपादणारे धर्माचा आणि सात्विकपणाचा काही भलताच अर्थ समजत असतात. त्यांच्या मते शौर्य, धैर्य, वीर्य इ. गुण म्हणजे जणू सात्विक नव्हतेच. सात्विकपणा म्हणजे नुसते नेहमी सहन करून असणे असा केवळ निषेधार्थी अर्थ समजला जातो. पण वस्तुत: पाहता सत्त्व म्हणजे तर शुद्ध शक्ती असा आहे. विशेषेकरून वरील विचार करणारे जेव्हा जपानचे सुप्रसिद्ध व सर्वमान्य उदाहरण पुढे आणून आपले राजसी मत जोराने प्रतिपादतात तेव्हा तर धार्मिक प्रयत्न करणा-यांचे तोंड अगदी बंदच होते की काय अशी भीती पडते. जपानचे लोकांनी जी ही अकल्पित सरशी केली त्याचेपूर्वी त्याने कधी व कोणता धर्मसंघ स्थापला होता? उलट हिंदुस्थानाने आज गेली पाऊणशे वर्षे ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज इ. कित्येक संघ रचून काय दिवे लावले आहेत?

जपानच काय पण हल्लीचे बहुतेक सर्वच पुढे आलेले देश धर्मबाबतीत अगदी उदासीन आणि जडवादी होत चालले नाहीत काय? मग आम्हीच हा कोरडा काथ्याकूट का करावा इ. अनेक आक्षेप वरील मंडळीचे निघतात. धर्मसंघ म्हणजे मतांची कोरडी काथ्याकूट करणारी मंडळीच एवढा अर्थ असेल तर वरील युक्तिवाद्यांशी निदान ब्राह्म आणि प्रार्थनासमाजिकांची बरीच सहानुभूती जमेल पण संघाचा अर्थ अगदी उलट आहे. म्हणून वरील प्रश्नात उत्तरादाखल उलट थोडक्यात एवढा प्रश्न केल्यास पुरे आहे. तो हा की, जपानात आणि इतर पुढे सरसावलेल्या देशांत धर्मबाबतीत लोकांना जे झपाट्याने स्वातंत्र्य मिळत चालले आहे. आणि त्यामुळे व्यक्तीचे व राष्ट्राचे शील वाढत चालले आहे, त्याचे खरे कारण तेथील धर्मविषयक औदासीन्य की धर्मविषयक विचार? आणि उलट पक्षी आमच्या देशात धर्माच्या नावाने आचारविचाराचे जे पुरातन पारतंत्र्य साम्राज्य चालू आहे आणि त्यामुळे शीलाची हानी होते तिचे खरे कारण आमची धर्मप्रवृत्ती की धर्मविषयक औदासीन्य बरे! ह्या दृष्टीने पहाता जपानात जरी ब्राह्म प्रार्थनासमाजाप्रमाणे धर्मसंघ स्थापण्यात आले नसतील तरी ब्राह्म प्रार्थनासमाजाचे कार्य जे उदार आत्मिक प्रवृत्तीचा देशात प्रसार करण्याचे ते जपानात खास होत असले पाहिजे. त्याशिवाय सर्व जगात थक्क करून सोडणारे इतके राष्ट्रीय तेज व नैतिक बळ एकाएकी उत्पन्न होणे शक्य नाही.

हे नि:संशयच आहे. तसेच पण हेही नि:संशय आहे की हा जो जपानातील आत्मिक व नैतिक बळाचा झरा आपल्या भोवती साचलेले जड आच्छादन फोडून वर वर पाहणा-यास जणू अकस्मात आणि यदृच्छेनेच बाहेर आला आहे असे वाटले त्या झ-यावर जर वेळीच चोहोकडून योग्य बांध पडले नाहीत आणि त्याचे प्रगतीवर धर्मसंघ बनले नाहीत, तर हा वर आलेला पूर केव्हाच ओसरून जाईल आणि पुन: जपान जे आज जगाच्या आनंदाला व आश्चर्याला पात्र झाले आहे ते पुढे अनुकंपेला पात्र होईल. इतकेच नव्हे तर हल्ली कित्येक खोल दृष्टीचे प्रवासी जपानच्या उथळपणाविषयी प्रसंगवशात इषारा देत आहेतच.

एकंदरीत पुढारलेले चिमुकले जपान काय किंवा मागासलेले अवाढव्य हिंदुस्थान काय दोहोंपक्षी धर्मसंघाची सारखीच आवश्यकता आहे. अवर्षण पडले असता खोल विहिरी खणून पाणी काढणे किंवा अतिवृष्टीमुळे पूर आला असता जागजागी बांध घालून पामी साठवणे ह्या दोन्ही गोष्टी जशा शहाण्या बागवानाच्या दृष्टीने सारख्याच महत्त्वाच्या व जरूरीच्या आहेत तद्वतच जपानातल्यासारखा साहजिक उद्रेक झाला काय किंवा हिन्दुस्थानातल्याप्रमाणे कितीही खडक फोडला तरी ठणठणीतपणाचा देखावा दिसला काय, सूज्ञ, दूरदर्शी व लोकिहतकारी जे ऋषी आहेत त्यांना धर्मसंघाची आवश्यकता दोन्ही प्रसंगी सारखीच भासेल.जगाच्या एका कोप-यात एकदा असा स्फोट झाला म्हणून सात्विक प्रयत्नाची कधीही व कोठेही जरूरी नव्हती, किंवा निदान हल्ली आमच्या देशात तर हमरीतुमरी आणि मारामारीसंबंधी नुसता बोलण्याचा सुकाळ केला की सर्व इतिकर्तव्यता झाली असे समजणे म्हणजे ह्या विपरीतपणाला सीमाच नाही म्हणावयाची.

ह्या जगात मनुष्य मनुष्यावर आजपर्यंत अनेक कारणांवरून अथवा सबबीवरून जी सत्ता चालवीत आला आहे ती चार प्रकारची आहे. (१) राजकीय, (२) धार्मिक, (३) सामाजिक, (४) औद्योगिक. ह्या चार सत्तांना अनुक्रमे (१) सरकार, (२) संघ, (अथवा अलीकडे समाज हे नाव अधिक प्रचारात येऊ लागले आहे.) (३) रूढी आणि (४) पत किंवा व्यवहार अशी नावे आहेत. ह्यांपैकी पहिल्या दोन म्हणजे राजकीय आणि धार्मिक सत्तांची पुरातन कालापासून सर्व देशांत सुव्यवस्थित रीतीने घटना होऊन चुकल्यामुळे ह्या दोन्ही चांगल्या नावारूपास आल्या आहेत. म्हणजे अधिकाराचे मूळ, अधिकारी पुरूष, अधिकारासंबंधी नियम व त्याची अंमलबजावणी ही सर्व ठरलेली आहेत. अधिकाराची स्थाने व पद्धती कदाचित देशकालाच्या मानाप्रमाणे बदलली तरी सर्व अधिकार नष्ट होऊन अजीबात सत्ताच बंद पडली असे होणे शक्य नाही. शेवटच्या दोन सत्ता, रूढी आणि व्यवहार ह्यांचे मात्र कार्य वरील दोन सत्तांच्याप्रमाणे व्यवस्थेने चालत नाही. कारण नियम, अधिकार आणि त्यांची स्थाने ही ठरणे शक्य नसल्यामुळे ह्या दोन सत्तांचे असे दृश्यरूप दिसून येत नाही. तथापि त्या निराकारपणे अस्तित्वात आहेतच. वर सांगितल्याप्रमाणे मानवी समाजात (१) सरकार, (२) संघ, (३) रूढी, (४) पत अशा चार प्रकारच्या सत्ता चालू आहेत. ह्यांपैकी पहिल्या दोन साकार रूपाने व दुस-या दोन निराकार रूपाने चालू आहेत. म्हणून पहिल्या दोन्हीसंबंधी ज्या जुन्या संस्था बनून चुकल्या आहेत त्यांच्यात कालमानाप्रमाणे डागडुजी किंवा तोडजोड करणे अथवा नवीन संस्थांची भर घालणे हे त्यांच्या चालकांना शक्य आहे. असे करणे त्या त्या नेमलेल्या अधिका-यांचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी बजावले नाही किंवा बजावण्यात कसूर केली तर त्यांच्याकडून ते कर्तव्य करविण्याचा उपजत हक्क सर्व जनतेस आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, हल्ली आमच्या देशात जो तो राजकीय सत्तेसंबंधी आपला हक्क शाबीत करीत सुटला आहे, पण धर्मसत्तेच्या बाबतीतही प्रत्येक व्यक्तीस तितकाच उपजत हक्क आहे आणि धर्माचे अधिकारीही कालमानाकडे दृष्टी देऊन आपली जबाबदारी पाळतात की नाहीत हे पाहण्याचे काम धर्मसंघाला घटक ह्या नात्याने प्रत्यक व्यक्तीचे असून तिकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. मिळण्यासारखे असो किंवा नसो आम्ही राजकीय स्वराज्य मागू लागलो आहो. पण धार्मिक स्वराज्य आमचे आम्हांला आहेच. तिकडे लक्ष देतो कोण? आमचे धर्मगुरू मोठ्या मोठ्या संस्थानाचे मालक बनून बसले आहेत. वर्षात दोन चारदा हत्ती, घोडे, उंट इ. बड्य लव्याजम्यानिशी ते भिक्षेला निघतात त्यावेळी आम्ही त्याजपाशी स्वराज्य मागतो काय? मागे दिलेल्या कराचा हिशोब मागतो काय? सालोसाल राष्ट्रीय सभेमध्ये जशी आम्हांला पाहिजे त्या सुधारणांची एक यादी करून राजाकडे पाठवितो तशी धर्मबाबतीतही ठराव पास करून धर्मगुरूकडे पाठवितो काय? राजकीय बाबतीत अंतिम सत्ता लोकांची आहे, राजा केवळ त्यांनी नेमलेला अधिकारी आहे हे तत्त्व आम्ही राजाला शिकवू लागलो आहो तसे धर्मगुरूलाही तेच तत्त्व लागू करतो काय? आमच्या देशात किती तरी देवळांना सोन्याचे दरवाजे व रूप्याचे खांब आहेत आणि मूर्तीवर किती जडजवाहीर आहे, किती मौल्यवान देणग्या व मातबर वतने चालू आहेत आणि एकंदरीत धर्माच्या नावाने किती अवाढव्य खर्च बेदाद चालला आहे, आमच्या तत्त्वज्ञानावर किती शतकांचा गंज चढलेला आहे, आमच्या धार्मिक वाड्मयावर किती भलत्याच आगंतुक विचारांची कोळिष्टके आणि जळमटे वाढली आहेत, धर्माच्या नावाने शेखी मिरविणारे आम्ही सर्व जगाचे धर्मबाबतीत स्वत:स गुरू समजणारे स्वत: आमच्याच देशात धर्मशिक्षण कसे अजीबात बंद पडत चालले आहे, ह्या आणि अशा अनेक धर्मसंघाच्या बाबतीतील आमच्या हलगर्जीपणाकडे आमचे लक्ष जाते काय? पाश्चात्यांचे इतिहास व पाश्चात्यांच्या चळवळी पाहून राजकीय हक्क मागण्याचे कामी मात्र आम्ही त्यांचे अनुकरण करतो. पण धर्मसंघाचे बाबतीत पाश्चात्यांनी आपल्या देशात व जगभर जे भगीरथ प्रयत्न चालविले आहेतत्याचे अनुकरण तर राहोच पण नुसते अवलोकन तरी करतो काय? पाश्चात्य लोक राजकीय कर देताना आपल्या राजाशी प्रत्येक पेनीबद्दलही भांडण्यास मागे घेत नाहीत तेच आपल्या डोईजड धर्मगुरूच्या जुलमी सत्तेस आळा घालून आधुनिक समजुतीस शोभेल असे नवीन धर्मपंथ कसे काढीत आहेत व आपल्या ह्या नवीन धर्माचा, आपल्या जिवंत नीतीचा, आपल्या शीलाचा प्रसार आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या ओसाड आणि जंगली देशांतही करण्याकडे कसा लक्षावधी रूपयांचा दरसाल खर्च करीत आहेत; लहान मुलांकरिता आदित्यवारच्या धर्मशिक्षणाच्या शाळा, गरीब बायका आणि विधवांकरिता उपयुक्त घरगुती कला शिकविण्याच्या संस्था, काम न मिळाल्यामुळे लफंगे आणि बदमाश बनलेल्या तरूणांना ताळ्यावर आणण्याकरिता सायंकाळची क्रीडाभुवने अथाथ व उनाड मुलांना एकत्र करून त्यांना शेतकी, सुतारी व विणण्याचे वगैरे धंदे शिकवून व उत्तर अमेरिकेसारख्या देशात पाठवून तेथे वसविलेल्या वसाहती, नवीन शिक्षणामुळे तरूणांनी भडकून जाऊ नये म्हणून अगदी आधुनिक वाड्मयातूनच उदार आणि आध्यात्मिक विचार त्यांचे मनात बिंबविण्याकरिता व्याख्यानमाला आणि सर्वसाधारण लोकांकरिता सर्व ललितकलांचा विकास ज्या ठिकाणी पहावयास मिळेल अशी भव्य व मोहक उपासना मंदिरे, अशा कितीतरी गोष्टीत पाश्चात्य धर्मसंघाचे लक्ष्य गुंतलेले आहे, ते आमच्या तिकडे गेलेल्या प्रवाशाच्या नजरेत भरते तरी काय ? हे होत नसून जर आम्ही नुसते राजकीय स्वराज्यच मागत असलो तर मिळत नसलेल्या वस्तूबद्दल हट्ट व मिळालेल्या वस्तूबद्दल हेळसांड करणे हा केवळ आम्ही पोरकटपणा करतो असे वाटून कोणीही आमच्या मागण्यांचा आदर करणार नाही.

आपल्यातील कित्येक जुन्याचे अभिमानी विद्वान आपल्यास नेहमी असे भासवीत आहेत की, सुधारलेल्या देशात ख्रिस्ती धर्माची मते अगदी ढासळत आहेत आणि तेणेकरून तिकडील धर्मसंघाचे वजन बहुजनसमाजावरून पार उडत चालले आहे. आधुनिक ज्ञानाचा प्रकाश चोहीकडे फैलावत असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचीच काय पण जेथे जेथे हा प्रकाश पोहोचला आहे तेथील सर्वांची बनावट मते आणि भाकडकथा लयास जाऊ लागल्या आहेत. पण पाश्चात्य देशांतील आणि त्यातल्या त्यात आंग्लो-सॅक्शन लोकांचा विशेष हा की, त्यांच्यामध्ये संघशक्ती, प्रसंगावधान, व्यवहारचातुर्य आणि संसाराविषयी आदर इ. गुण उत्कृष्ट रीतीने वसत असल्यामुळे, त्यांनी सोकावलेल्या धर्माधिका-यांचे उद्दाम चोचले चालू न देता व ख्रिस्तानंतर तीनचार शतकांनी बनविलेल्या ३९ मतांची पर्वा फारशी न बाळगता, खुद्द ख्रिस्ताच्या सांगण्यात जो काही शाश्वत नीतीचा आणि आध्यात्मिक हिताचा मुख्य भाग होता, त्यावरच आपली सर्व मदार ठेवून आणि ख्रिस्ती धर्माचे मुख्य आणि विशेष असे जे तत्त्व स्वर्गीय राज्य पृथ्वीवर आणण्याचे ते बळकट ध्यानात ठेवून सर्व देशोदेशी, शहरोशहरी, गल्लोगल्लीतून स्वतंत्रपणे, धर्माधिका-यांच्या शिव्याशापास न जुमानता आणि प्रत्यक्ष राजाचाही प्राणांत छळ सोसून नवीन नवीन धर्मसंघाची संस्थापना केली. आधी रोमच्या शिरजोर मठाधिका-यास रजा दिली. पुढे जेव्हा चर्च ऑफ इंग्लंड म्हणजे इंग्रजांचा राष्ट्रीय अथवा सरकारी धर्मसंघ इंग्लंडच्या राजाने बळकावला व नुसत्या विधिसंस्काराचेच अवडंबर माजून ख-या व स्वतंत्र धर्मसाधनांत व्यत्यय येऊ लागला, तेव्हा ह्या मजबूत हाडांच्या लोकांनी आपल्या आवडत्या राष्ट्रीय संघालाही रामराम ठोकला आणि नॉनकनफॉर्मिस्ट म्हणजे विभक्त समाज स्थापिले, तेथेही जेव्हा प्रेसबिटर्स म्हणजे अधिकारारूढ वडील माणसांनी धुमाकूळ माजविला, तेव्हा ह्यांनी काँग्निगेशनेलिस्ट लोकसत्तात्मक समाज स्थापिले. त्यातही मताचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेना म्हणून युनिटेरिअन अथवा एकेश्वरी समाज निघाला. त्यातही जेव्हा जेव्हा मताविषयी किंचित दुराग्रह दिसतो तेव्हा प्रसिद्ध माहितीप्रमाणे फ्री ख्रिश्चन्स म्हणजे केवळ स्वतंत्र ख्रिस्तानुयायी म्हणविणारे निघतात आणि शेवटी रेव्ह. चार्लस व्हायसे हे तर आपल्यास नुसते ईश्वराचा अनुयायी म्हणवून एक निराला केवळ थिईस्टिक चर्च म्हणजे ब्राह्मसमाज चालवीत आहेत. असो. ह्याप्रमाणे कॅथोलिकापासून ब्राह्मसमाजापर्यंत परंपरा येऊन पोहोचली तरी नव्य जुन्या संघांतून जे कार्य होत आहे ते वर सांगितल्याप्रमाणे लोकशिक्षणाचे, लोकसंग्रहाचे, संसारिक फायद्याचे आणि तद्वारा आत्मिक संतोषाचेच होत आहे. केवळ तर्कवितर्क, कर्मठपणा किंवा जातीजातींनी परस्परावर आपली श्रेष्ठता शाबीत करण्याचे ओंगळ प्रकार फार कमी होतात. प्रख्यात मुक्तिफौजेच्या संघाची नुसती मते जर पाहू गेले तर ती जुनी आणि टाकाऊ दिसतील. त्यांतील काही भाविक सेवेक-यांच्या विश्वासाची मजल केव्हा इतकी पोहोचते की, उद्या सकाळी खात्रीने योहानाच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे येशू आपले स्वर्गीय राजदंड घेऊन खाली उतरणार असे मानून बिचारी झोपी जातात. ह्या विश्वासाची किंमत काही असो, मुक्तिफौजेचा संघ जे लोकसेवेचे कार्य दरोबस्त पृथ्वीवर रात्रंदिवस करीत आहे, त्याचा मासला आम्हांला तुकारामाच्या नुसत्या शब्दांत मात्र आढळतो.

जे का रंजले गांजले| त्यासि म्हणे जो आपुले||
ज्यासि आपंगिता नाही| त्यासि धरी जो हृदयी||

असो, ह्याप्रमाणे पाश्चात्य देशांतील जुने नवे धर्मसंघ कार्य करीत आहेत म्हणून त्यांचे लोकांवरचे वजन मुळीच कमी न होता उलट वाढत आहे आणि ह्याचा पुरावा इतकाच बस्स आहे की ह्या संघांना लोकांकडून पैशाची व अंगमेहनतीची जितकी विपुल व जशी खुशीने मदत मिळत आहे, तशी बोअर युद्धात ब्रिटिश सरकारला पैसे देऊ करूनही मिळाली नाही! तात्पर्य इतेकच की, धर्मसंघच इतर सर्व संघांना पोसणारा आहे. राष्ट्राचे भावी मुत्सद्दी, भावी वीर, भावी कवी, आणि इतर महात्मे ह्यांच्या शीलाचा विकास बाळपणी धर्मसंघातच होतो. ज्या देशात धर्मसंघ मृतप्राय झालेले आहेत किंवा जे शिल्लक उरलेले आहेत, त्याची सर्व करामत भोळ्या भाबड्यांची माया परोपरी जळवाप्रमाणे शोषून घेण्यातच खर्चत आहे, त्या देशात वीर पुरूष निर्माण होत नाहीत आणि झाले तरी राष्ट्रामद्ये मुळी शीलाचीच वाण असल्यामुळे, त्यांना जोमाचा अनुयायीगण मिळत नाही. त्यांच्या ईर्षा आणि मनोरथ जागच्या जागी निवतात व त्यांची वाढ खुंटते. शेवटी ते उरी फुटून अकाली लय पावतात आणि त्यांच्या हातून जे मोडके तोडके कार्य झाले असेल, त्याचे योग्य स्मारक करण्याचाही जोम पुढच्या पिढीत राहत नाही. बंधूंनो, ह्यासाठी धर्मसंघाची अगदी आवश्यकता आहे.

धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार

“सर्व भूतांतरी सारिखाचि ईश
सांगा मग अस्पृश्य कोण आहे.”
-ज्ञानगिरीबुवा

अलीकडे शिक्षणात मागासलेल्या ज्ञातीमध्ये आपआपल्या ज्ञातीची उन्नती व्हावी ह्या हेतूने बरीचशी चळवळ सर्वत्र चालू असल्याने आढळून येते. निरनिराळ्या जातींच्या परिषदा, त्यात होणारी भाषणे, तरूणांच्या आकांक्षा ह्या सर्वांचा विचार केला म्हणजे आमच्या वरील उद्गाराची सत्यता पटल्यावाचून राहणार नाही. ‘आणखी प्रस्तुत ब्राह्मणेतर वर्ग जागृत झालेले पाहून ज्याला आनंद होणार नाही तो मुळी मनुष्यच नव्हे’ हे एका ब्राह्मण नटाचे उद्गार वाचले म्हणजे या जागृतीबद्दल सर्वत्र कमी सहानुभूती उदित होत आहे हे आमच्या वाचकांच्या लक्षात येईल.

परंतु मागे पडलेल्या जातींविषयी उच्च वर्णामध्ये जी सहानुभूती आज आढळून येत आहे तिजपेक्षा अस्पृश्य मानलेल्या जातींच्या उन्नत्तीकडे आज सुशिक्षित लोकांचे अधिक प्रमाणाने लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी शेट दामोदरदास गोवर्धनदास ह्यांनी एक हजार रूपयांची प्रथम देणगी दिल्यामुळे निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या कामास जेव्हा प्रारंभ झाला, तिच्या उत्साही सेक्रेटरीने हे मोठ्या जबाबदारीने कार्य जेव्हा शिरावर घेतले त्यावेळी सर्व हिंदुस्थानभर ह्या विषयाची चर्चा होऊ लागेल. सर्व देशभर अस्पृश्य मानलेल्या लोकांविषयी कळवळा उत्पन्न होईल, राजे महाराजे, शेटसावकार, सुधारक व पुराणमतवादी सर्वच ह्या कार्यास हातभार लावावयास जरी सिद्ध झाले नाहीत. तरी प्रसिद्धपणे आपली सहानुभूति व्यक्त करू लागतील. असे वाटले नव्हते. परंतु ज हे सर्व होऊनही एका अनपेक्षित बाजूने ह्या कार्यासंबंधाने मोठी जागृती झाल्याची चिन्हे दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी आमच्या सुशिक्षितांचे ह्या विषयाकडे बिलकूल लक्ष नव्हते. नीच मानलेल्या जातींना अस्पृश्य मानणे म्हणजे आपण मोठा अन्याय करणे होय असे कबूल करावयास कोणी सिद्ध नव्हते आणि ज अंत्यजोद्धार करणे हेच खरे धर्मरहस्य आहे असे प्रतिपादन करणारे नाटक  तयार होते, त्याचा प्रयोग येथे एक नावाजलेली मंडळी करते, सर्व नाटकगृह प्रेक्षक समुदायाने गच्च भरून जाते व लोकसमुदाय नाटक चालू असता तल्लीन होऊन वारंवार अनुमतीदर्शक टाळ्यांचा गजर करीत जातो.

वरील उदगार रा. रा. दामोदर विश्वनाथ नेवाळकर यांनी ‘धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार’ या नावाचे जे नाटक रचले आहे त्यास उद्देशून आहेत हे नाटक आम्ही फार काळजीपूर्वक वाचून पाहिले. ह्या जागोजागी रा. नेवाळकरांनी जा स्पष्टोक्ती आपल्या पात्राच्या तोंडी घातली आहे. तितकी स्पष्टोक्ती अंत्यजोद्धारासंबंधाने होणा-या जाहीर व्याख्यानामध्येही आढळणे शक्य नाही. आणखी ह्या नाटकामध्ये केवळ स्पष्टोक्तीच आहे असे मात्र नव्हे. ह्यातील युक्तीवादही मोठा प्रशंसनीय आहे. न्हाव्यासारखी जात महाराला अति नीच समजते. आणि ब्राह्मणेतर आपल्या श्रेष्ठत्वाच्या अभिमानात सदा गर्क असतो. परंतु खरे पहाता महाराचे रक्त हिरवे नाही, न्हाव्याचे रक्त पिवळे नाही आणि ब्राह्मणाचे रक्त पांढरे नाही. असे असून उच्चनीचपणा संबंधाचा झगडा मात्र मोठ्या निकराने चाललेला पाहून प्रस्तुत नाटकातील ‘वेडापीर’ नामक प्रमुख पात्राने पुढील उदगार काढले आहेत.’ आमच्या हाडामांसात खिळलेले हे जातिद्वेषाचे जालीम विष कधी नाहीसे होईल ते होवो पण आमच्या राष्ट्राला ही एक भयंकर कीड लागलेली आहे ही गोष्ट काही खोटी नाही. एकाच देशात राहणारे एका मातृभूमीची लेकरे सख्खी भावंडे ह्यांनी एकमेकांना कट्ट्या दुष्मनाप्रमाणे लेखावे ही किती शोचनीय गोष्ट आहे? ह्याबद्दल आमची आम्हाला शरम वाटली पाहिजे.”

अस्पृश्य जातीला आम्ही दूर सारले, परधर्मीयापेक्षाही त्यास आम्ही नीच ठरविले, त्यांच्या धर्मीयांपेक्षाही त्यास आम्ही नीच ठरविले, त्यांच्या सावलीसही आम्ही उभे रहातनासे झालो, म्हणून त्या भयंकर निकृष्टावस्थेला जाऊन पोहोचल्या. ह्याचा दोष सर्व समंजस लोक सर्व वर्णांत श्रेष्ठ म्हणविणा-या आम्हा ब्राह्मण वर्गाच्याच माथी मारणार” असे या नाटकातील दादासाहेबांनी निक्षून सांगितले आहे.

अस्पृश्य व इतर जाती शिक्षित झाल्या, लोकांची मने उदार झाली. उदात्त विचार त्यांच्या मनात घोळू लागले, आपली उन्नत्ती व्हावी अशी त्यांच्यात चिंता उत्पन्न झाली. त्यांच्यात शुचिर्भूतपणा आला, म्हणजे त्यास ब्राह्मण व्हावयास हरकत नसावी.” ब्राह्मणत्वाला शोभणारे विचार जर शूद्राच्या अंत:करणात घोळू लागले आणि जर त्यांच्या हातून तसे आचार होऊ लागले म्हणजे हस्तपादादिक अवयवांच्या कृतीमध्येच ते निमग्न झाले किंवा शुष्क वैदिकांच्या भोव-यात पडून, निरर्थक तंटे उपस्थित करण्यात आले तर मात्र अंत्यजास ब्राह्मण होता यावयाचे नाही. “संध्यातर्पण आणि वेदपठण” हे काही ब्राह्मणाचे खरे लक्षण नव्हे. या बाहेरच्या गोष्टी कोणीही करू शकेल. विचाराने ज्याने आपले मन शुद्ध केले आहे, निष्पाप केले आहे, तोच खरा ब्राह्मण” असा सिद्धांत या नाटकामध्ये ठरविला आहे.

आता एकीकडे वरिष्ठ समाजाने लाथाडून दूर फेकल्यामुळे सर्वतोपरी हताश झालेली आणि दुसरीकडे दारिद्र्य, दुष्काळ आणि साथीचे रोग इ. तापत्रयींनी होरपळून गेल्यामुळे अगदी टेकीस आलेली जी अस्पृश्य मंडळी त्यांच्यातील पुष्कळ लोक परधर्माचा स्वीकार करतात त्यासही पुन्हा स्वधर्मात घेण्यास हरकत नाही हे शामाबाईच्या पत्रावरून धर्मसहस्यात दाखविले आहे.

अस्पृश्य जातींना अस्पृश्य मानण्यात येऊ नये, त्यांचा विटाळ मानू नये, व्यवहारात साळी, कोष्टी, माळी, कुणबी ह्यांना आपण जितक्या जवळच्या नात्याने वागवितो तितक्याच जवळच्या नात्याने अंत्यजांना वागवावे. अंत्यजांच्या मुलांना आपल्या (ब्राह्मणांच्या) मुलांबरोबर एका वर्गात बसून शिकायला प्रतिबंध नसावा ह्या शंकराचार्यानी घालून दिलेल्या तिन्ही अटी, न्हावी, धोबी, मजूर ह्यांनी बहिष्कार घालताच व ह्या बहिष्कारामुळे सबंध महिन्यात एक कपर्दिका मिळाली असेल तर शपथ असा अनुभव येताच भिक्षुक वर्गाने पटापट कबूल केल्या आहेत.

अशा रीतीने अंत्यजांच्या उन्नतीचा प्रश्न रा. नेवाळकरांनी सोडविला असून धर्मविषयक बाजूही त्यांनी प्रागितक धोरण लक्षात ठेवून पुढे आणली आहे. ख्रिस्ताला आपला तारक असे मान्य केले की, आत्म्याला शांती मिळते, पापापासून मुक्तता होते असे वारंवार सांगण्यात येते. परंतु मनुष्य स्वभावाचा विचार केला तर हे खरे नाही असाच प्रत्यय येतो.

केवळ कोणत्या तरी एका देवतेच्या नावाचा जप करीत बसल्याने धर्मसाधन होते, देवाची प्राप्ती होते असे नाही. शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध मन पाहिजे. आणि एकनिष्ठेने देवास शरण गेले पाहिजे असे आम्ही म्हणतो. “रामराम म्हटल्याने जर रामाचा अनुभव येतो तर साखर साखर म्हटल्याने साखरेचा, विस्तव विस्तव म्हटल्याने विस्तवाचाही अनुभव आलाचा पाहिजे. आणि तसा अनुभव जर येत नसेल तर रामाचे भजन करण्याची पद्धत याहीपेक्षा काही निराळीच असली पाहिजे. शांतीचा भंग करणारे कामक्रोधादि मनोविकारांचे झटके आवरण्याचा प्रयत्न केल्याशिवाय असल्या प्रार्थनेतल्या शब्दांनी शांती कशी प्राप्त होणार? सर्व धर्मांना सारखे लागू असणारे अस धर्माचे खरे तत्त्व हेच एक आहे.” आणि एके ठिकाणी बेड्या पिरानेच असे स्पष्टपणे म्हटले आहे की, सर्वांना निर्माण करणारा कोणीतरी एकच देव असला पाहिजे.

येथपर्यंतच्या वतरणावरून व आमच्या विवेचनावरून रा. नेवाळकरांच्या मते धर्मरहस्य कशात आहे व ते काय आहे हे वाचकाच्या लक्षात येईल.

धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता

आज आमच्या प्रार्थनासमाजाची स्थापना होऊन ४७ वर्षे पुरी झाली. तेवढ्या अवधीत समाजाने आपल्या शक्तिनुसार अल्पस्वल्प धर्मप्रसाराचे काम केले आहे. समाजाने स्वीकारलेल्या सर्वमान्य सनातन धर्मतत्त्वांचा प्रसार हल्लीपेक्षा अधिक जारीने कसा व्हावा ह्या गोष्टीकडे आमच्या सर्व प्रमुख समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. बंगाल्यात एका मोठ्या फंडाची स्थापना होऊन त्याचा काही भागही जमला आहे. पंजाबात ब्राह्ममिशनच्या स्थापनेचा उपक्रम आज दोन वर्षे चालू आहे. दक्षिणेत विशेषत: मद्रास इलाख्यातील नार्दन सरकारमध्ये असेच प्रयत्न चाललेले आहेत. मुंबईच्या समाजामध्ये मिशन कमिटीची स्थापना होऊन नवीन प्रयत्नास आरंभ होत आहे. अशावेळी धर्मप्रसाराचे मुख्य अंग कोणते ह्याचा विचार करणे इष्ट आहे.

समाजाने चालविलेल्या ह्या कार्यासंबंधाने समाजाच्याबाहेर पाहू गेल्यास विद्वान आणि देशाभिमानी म्हणविणा-या लोकांमध्ये विशेष सहानुभूती आहे, असे म्हणण्याचे धाडस करवत नाही. नुकतेच श्रुतिबोध नामक एका सन्मान्य मासिकाच्या संक्रांतीला तीळगूळ ह्या नावाखाली जादा अंक निघालेला आहे. त्यात सर्व धर्मांवरील परिषद ह्या नावाखाली निरनिराळ्या धर्मांच्या अभिमान्यांचे लेख आले आहेत. निरनिराळ्या धर्मांचे लेख एकत्र करणे ही कल्पना देखील समाजाच्या तत्त्वांना पोषकच आहे. परंतु त्यात हिंदुस्थानच्या एका जाज्वल्य अभिमान्याने भक्तिमार्गाविषयी जी विधाने करण्याचे उघड उघड धाडस केले आहे त्यावरून धर्मसाधनाविषयी विद्वान म्हणविणा-यांमध्ये अद्यापि तुकारामाने म्हटल्याप्रमाणे ब्रह्मज्ञान्याघरी भक्तीचा दुष्काळ व शब्दांच्या सुकाळाचा खटाटोप असाच प्रकार दिसून येत आहे. वरील लेखकाने असा उघड शेरा ठोकून दिलेला आहे की, भक्तिमार्ग म्हणजे हा केवळ शूद्रांसाठी आहे. ज्याच्या अंगात ज्ञान मिळविण्याचे सामर्थ्य नाही किंवा कर्म आचरण्याची कर्तबगारी नाही अशा शूद्रादी हीन वर्गासाठीच हा मार्ग प्रचारात आणला गेला आहे. अशी ह्या विद्वानाची मीमांसा आहे. हिंदुधर्माचा अभिमान बाळगून त्याची मीमांसा करतेवेळी भक्तिमार्गाचा असा विपर्यास करण्याची आवश्यकता हे असे आम्हास कधी वाटले नव्हते. ज्ञान, भक्ती, कर्म आणि वैराग्य ह्या आध्यात्मिक स्थिती जरी वरवर पहाता भिन्न भिन्न दिसतात तरी थोडास खोल विचार केल्यावर धर्ममार्गामध्ये खरोखर प्रविष्ट झालेल्या ह्या आत्म्याच्या सर्व स्थिती एकामागून एक किंवा सर्व एकाच वेळी होतात. ख-या धार्मिक स्थितीत मानवी ज्ञानाची किंबहुना वीर्याची मोठी प्रौढी नाही असे पाहून मनुष्याचे मन जेव्हा नम्र होते आणि विश्वामध्ये नांदत असणा-या सामर्थ्यवान शुभ शक्तींचा त्याला शरणागत स्थितीमध्ये साक्षात्कार होतो तेव्हा जी मनुष्याची भावना होते, तिचेच नाव भक्ती. अशी भक्ती केवळ शूद्रांसाठीच आहे असे म्हणणे हा त्या भक्तीचा अत्यंत विपर्यास होय.

आजपर्यंत जगामध्ये जे मोठमोठे भक्तिशाली संत होऊन गेले त्यांनी आपली गणना मोठ्या आनंदाने शूद्रादी हीन वर्गातच करून घेतली आहे. ‘भला देवा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो’ हा उद्गार एका तुकारामाचाच नव्हे तर सर्वकालीन, सर्व दर्जाच्या आणि जातींच्या संतांचा आहे. संतांचे स्वत:विषयी मत आणि वरील आमच्या हिंदुधर्माभिमानी विद्वानाने भक्तिमार्गाविषयी दिलेले मत ह्यांमध्ये केवळ शाब्दिक साम्य दिसून येत आहे.

परंतु ह्या दोघांच्या भावनाकडे पाहिले असता जमीन अस्मानाचा फरक दिसून येतो. भक्तीची खरी भावना अंत:करणात वीरश्रीच्या गोष्टी सांगण्याप्रमाणेच व्यर्थ आहे. ती भावना म्हणजे स्वत:च्या दुर्बलतेविषयी येणारे साक्षात अनुभव. विश्वामध्ये नांदणा-या सनातन शक्तीचा साक्षात्कार आणि त्यामुळे उत्पन्न होणारी मनाची प्रसन्नता ह्या सर्वांना आमच्या जुन्या संतांनी ‘स्वानुभव’ हे नाव दिलेले आहे. आणि तो स्वानुभव हेच धर्मप्रचाराचे मुख्य अंग आहे.

व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीचा स्वानुभव हा एक मुख्य भाग आहे. इतकेच नव्हे तर त्याचा प्राण आहे. पण जनतेमध्ये सद्धर्माचा प्रसार करावयाचे झाल्यास मोठमोठे द्रव्यसंचय जमविणे, तरूण धर्मप्रसारकांची योजना करणे, पुस्तके आणि मासिके काढणे, जाहिराती काढणे हे प्रकार अगदी अर्वाचीन होत. प्राचीन प्रकार ह्याहून निराळे होते. कोणातरी एका मोठ्या अधिकारी सत्पुरूषाला वर सांगितलेला स्वानुभव पूर्ण येऊन त्याच्या अंत:करणामध्ये सर्व मंगलमय भावनाचे पूर्ण साम्राज्य स्थापित होत असे. त्याच्या समागमामध्ये जी माणसे येत त्यांच्यावर त्या सत्पुरूषाचा पगडा बसत असे आणि मग अशा रीतीने अंत:करणामध्ये पालट झालेल्या त्याच्या शिष्याकडून धर्माचा प्रसार होत असे. ख्रिस्त, बुद्ध आणि महंमद ह्यांनी चालू केलेल्या संस्कृत धर्माचा प्रसार ह्याच तत्त्वावर झालेला आहे. त्याच्या पूर्वीपासून चालत आलेल्या इतर प्राकृत धर्माचा प्रसार कोणत्या तत्त्वावर झाला त्याची चर्चा करण्याची ही वेळ आहे. सारांशात मनुष्याच्या मनाला नैसर्गिक स्थितीतून आध्यात्मिक स्थितीत उन्नत करण्यासाठी ज्या सात्विक प्रकाराची आवश्यकता आहे त्यात धर्मप्रसारकाच्या अंगामध्ये मोठा स्वानुभव पाहिजे ही प्रमुख व आवश्यक गोष्ट होय. व्याख्याने, परिषदा, द्रव्यसंचय आणि जाहिराती ह्या एकाहून एक खालच्या दर्जाच्या गौण गोष्टी आहेत. प्रधान तत्त्व जो स्वानुभव त्याचा जर अभाव असेल तर ह्या गौण गोष्टीमुळे धर्माचा प्रसार न होता कलह मात्र वाढतो हे इतिहासावरून प्रसिद्ध आहे.

ह्यावरून अर्वाचीन प्रसारपद्धतीचा कोणी पुरस्कर्ता असे म्हणेल की, काय हो आमच्या अंगामध्ये तुम्ही म्हणता असा मोठा स्वानुभव नसला तरी आम्ही धर्मप्रसाराचे काम मनोभावाने करू लागलो तर अहित होईल काय? आम्ही स्वत: ख्रिस्त किंवा बुद्ध झाल्याशिवाय खोलीच्या बाहेर पडू नये असे तुम्हांस वाटते काय? दुष्काळग्रस्तास मदत करणे, अशिक्षितासाठी शाळा काढणे, अस्वच्छ लोकांना गरम पाण्याचे स्नान घालणे व सर्वसाधारण सामाजिक जुलुमाखाली चिरडून गेलेल्या लोकांची सहानुभूतीने शुश्रूषा करणे इ. इ. हा सामाजिक सेवेचा एक प्रकार झाला. बहुजन समाजामध्ये आध्यात्मिक भावनांचा प्रसार होईल अशी व्याख्याने देणे, क्षणमात्र तरी सांसारिक गोष्टीवरून मन उडून ते शाश्वत सुखाकडे लागेल अशी श्रद्धायुक्त संभाषणे करणे, अशा व्याख्यानांनी आणि संभाषणांनी ज्या व्यक्तीची आणि कुटुंबाची मने शुद्ध आणि उदार धर्माकडे वळतील अशाच समाज स्थापणे आणि अशा नवीन स्थापलेल्या समाजाचा धार्मिक बाबतीत पुरस्कार ककरणे हा समाजसेवेचा दुसरा प्रकार होय. ह्या दोन प्रकारांपैकी दुसरा पहिल्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा असे तुम्हाला वाटत नाही काय? पहिल्या प्रकाराची सेवा करावयास लागलो असता जर तुम्ही आपल्या अधिकाराकडे पाहत नाही तर दुस-या प्रकारच्याच सेवेला आम्ही लागलो असता तुम्ही ही वरील स्वानुभवरूपी अधिकाराची अट का घालिता? असो नसो भाव| आलो तुझ्या पाया|| ह्या नम्र भावनेने जर आम्ही धर्मकार्यास लागलो तर त्यात काय वावगे झाले?

आधुनिक प्रसारपद्धतीच्या पुरस्कर्त्यांचा वरील कोटिक्रम खरोखरीच वंदनीय आहे. मानवी समाजाची उत्तरोत्तर जसजशी संकीर्णावस्था होत जाईल तसतशी प्रसाराची प्राचीन पद्धती मागे पडून वर सांगितलेलीच अर्वाचीन पद्धती जोमात येणे हे समाजशास्त्रातील काही नैसर्गिक कारणांवरून स्वाभाविक आहे हेही आम्हांस मान्य आहे. धर्मप्रसाराच्या कामात कोणी पडावे आणि कोणी पडू नये असा निर्बंध करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांच्या अंगी प्रामाणिकता आणि नम्रता हे गुण वास करतात त्या सर्वांना धर्मकार्यास मदत करण्याचा अधिकार आहे व त्यांच्या मगदुराप्रमाणे त्यास यशही खास येईल. पण आम्हांस आज एवढेच सांगायचे आहे की, ज्या मानाने धर्मप्रचार करू इच्छिणा-या व्यक्तीचे ठायी मग ती व्यक्ती प्रचारक म्हणविली जात असो किंवा नसो...वर निर्दिष्ट केलेला स्वानुभव जास्त त्या मानाने त्याच्या कार्यात यश अधिक येण्याचा संभव आहे. त्याच्या अभावी केवळ विद्वत्ता, सामाजिक दर्जा, द्रव्यसंचय हे किंवा इतर असेच गुण आणि उपाय ह्यांच्या जोरावरच प्रसार करू पाहणा-यास धर्म बाबतीत खरे यश येण्याचा संभव कमी आहे.

स्वानुभव अंगी आल्याची लक्षणे म्हणजे श्रीमान गौतम बुद्धाने वर्णिलेल्या चार भावना होत. करूणा, मुदिता, मैत्री आणि अपेक्षा. भौतिक अथवा आध्यात्मिक दु:खाने पीडिलेल्या जीवाविषयी अनुकंपा बाळगणे ह्याचे नाव करूणा. अशा करूणेने प्रेरित झाल्यावरही आपल्या मनाची सुप्रसन्नता आणि समता ही भंग होऊ न देणे ह्याचे नाव मुदिता. ह्या मोदविशिष्ट करूणेने प्रेरित होऊन सर्व जीवांची प्रेमयुक्त सेवा करणे ह्याचे नाव मैत्री. आपण काही उपाय न केले तरी कमी न होणारे असे बरेचसे अशुभ जगतामध्ये आहे, पुन्हा पुन्हा कमी करण्याचा प्रयत्न करूनही ते कमी होत नाही किंबहुना आपल्या सामर्थ्याने ते कमी होण्यासारखेच नाही असे दिसून आल्यावर त्याचे विषयी उदासीन राहणे, जणू काही ते जगतामध्ये नाहीच असे समजून आपली मुदिता कायम राखणे आणि मैत्रीचा व्यवहार चालू ठेवणे ह्याचेच नाव उपेक्षा.

भगवान गौतम बुद्धाने वर्णलेल्या ह्या चार वृत्तींचा जोम ज्या सत्पुरूषाचे अंगी प्रत्यक्ष दिसून येईल त्याला धर्माबाबतीत यक्तिंचित तरी स्वानुभव आला असे म्हणण्यात येईल. ज्यांच्यामागे ह्या वृत्तीचा विकास झालेला नाही अशा व्यक्तींनी किंवा व्यक्तिसमूहांनी कोणत्याही धर्ममतांचा जरी स्वीकार केला असला तरी त्यांच्या हातून मोठेसे कार्य होईल असे थोडेच आहे. ह्यावरून धार्मिक अनुभव आणि धार्मिक मते ह्यांमध्ये केवढे महदंतर आहे हे दिसून येईल. धार्मिक मते ही धार्मिक अनुभवांचा केवळ वरवरचा पृष्ठभाग असे म्हटले असता चालेल. ज्या धार्मिक मतांना भावाचा खोल आणि खंबीर पाठिंबा नाही अशा केवळ पोकळ मतांचाच आश्रय करून आम्ही ह्या संकीर्ण लोकव्यवहारात वावरू लागलो तर ती कशी लटपटतात ह्याचा अनुभव ज्याचा त्यास यावयाला पाहिजे. त्याविषयी वाच्यता करून फारसा फायदा नाही.

वर सांगितलेल्या स्वानुभवाची जितकी आवश्यकता व्यक्तीच्या धर्मसाधनार्थ आहे तितकी किंबहुना जास्तच अशा स्वानुभवसंपन्न व्यक्तींची आवश्यकता समाजाकडून होणा-या धर्मप्रसारार्थ आहे.

धर्मजागृती

[*सातारा येथील मित्रसंमेलनाकरिता रा.रा.वि.रा. शिंदे हे तेथे गेले असता समेलनासंबंधी त्यांचे “सामाजिक सुधारणा आणि हिंदी राष्ट्रीयत्व” ह्या विषयावर एक व्याख्यान झाले. त्याचा बराचसा सारांश तेथील प्रकाश पत्रात आला आहे. रा. शिंदे ह्यांची गावात आणखी काही धर्मासंबंधी   व्याख्याने व्हावयाची होती. पण नुकतीच व्याख्याने फार झाली असल्यामुळे तूर्त तो बेत तहकूब करावा लागला. तथापि तेथील छावणीतील लष्करी लोकांकरिता सदरबाजारात ता. २५ मे १९०५ रोजी संध्याकाळी वरील विषयावर रा. शिंदे ह्यांचे व्याख्यान झाले. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या व्याख्यानाकरिता मंडळी जमविणे, खुर्च्या, बाके, दिवाबत्ती वगैरेंची व्यवस्था राखण्याचे सर्व श्रेय एका मुसलमान पेन्शनर सदगृहस्थाने व त्याच्या काही सजातीय मित्रांनीच संपादिले. दुसरी गोष्ट ही की व्याख्यानाला जागा नेमिली होती ती बाजारातील एका मुख्य चव्हाट्याच्या कोप-यावरील पोलीसचौकीत पोलीसच्या अगदी खुशीनेच मिळाली होती व बाहेर रस्त्यापर्यंत बाके मांडली होती. चौकीचे खांब वेलीफुलांनी सुशोभित केले होते. मराठा लाईट इन्फंट्रीतील डॉक्टर, सुभेदार, जमादार वगैरे अमलदार शिपाई, मुसलमान, पार्शि व इतर लोक ऐकण्यास आले होते.]

धर्मावर भाषण करण्याचे मला जरी वारंवार प्रसंग येतात. तरी बहुतेक ते सावलीत, सुखाने बसून विद्याव्यासंग करणा-या पांढरपेशांमध्येच असतात. आज मला देशसंरक्षणाचे पवित्र पण कठीण ब्रीद बाळगणा-या तुम्हा क्षत्रियांपुढे बोलावयाचे आहे म्हणून आनंद होत आहे. धर्माची जागृती म्हणजे काय व ती कशी ठेवावी हे सांगण्यापूर्वी मुळी धर्म म्हणजेच काय हे सांगणे अवश्य आहे. कित्येकांचे म्हणणे असते की, धर्मतत्त्वे ही समजण्यास अत्यंत गूढ, वेद वगैरे जुन्या ग्रंथासही त्यांचा पार लागला नाही, व अलीकडच्या शहाण्या लोकांनी ह्याबाबतीत ज्ञान होणे अशक्य आहे, असा शेरा दिला आहे, म्हणून ह्या भानगडीत मुळी पडूच नये हे बरे. उलटपक्षी यात्रा, पूजा, नवस केले, कित्येक पिढ्या चालत आलेले बरेवाईट कुळाचार निमूटपणे चालविले आणि भटभिक्षुक आणि नातलग व शेजारी ह्यांची समजूत केली की झाला सर्व धर्म. ह्यात जर का कोठे कसूर झाली तर इहलोकी आपण नास्तिक ठरू, वाळीत पडू व परलोकी नरक भोगू अशी भीती पुष्कळांस पडते. पण थोडा विचार केल्यास वरील दोन्ही प्रकार असमंजसपणाचे आहेत असे दिसून येईल. धर्माचे व्यवहारापुरते ज्ञान कोणासही होमे केवळ अशक्य आहे असे नाही आणि त्याचे खरे आचरण ठेवणेही वरप्रमाणे केवळ वरपंगी नाही. तर आपण धर्म म्हणजे काय हे अगदी सोप्या दृष्टीने पाहू या. पतिव्रतेचा धर्म काय, पतीची आज्ञा पाळणे व सुख साधणे, विस्तवाचा धर्म काय, जाळणे. काचेचा धर्म काय, तर पलीकडचे दिसणे. ही मजपुढे दिव्यावर जी काच बसविली आहे, तिच्यातून जर दिवा दिसला नाही, स्वत: काचच दिसू लागली, तर ती काच नव्हे. आपण त्याला दगड म्हणून हात लावल्याबरोबर थंडगार लागू लागला तर त्यास विस्तव न म्हणता बर्फ म्हणू. म्हणजे काय की, काचेने व विस्तवाने आपापला धर्म म्हणजे अंगचा अवश्य गुण सोडला असे होय.

ह्याप्रमाणे व्यवहारात ‘धर्म’ शब्दाचा आम्ही अर्थ समजतो. हाच अर्थ आम्ही नेहमी ध्यानात धरला तर धर्माचा व्यर्थ वाढलेला कठीणपणा कमी होईल. इतर पदार्थांत व प्राण्यांत जसे त्यांच्या अंगचे अवश्य गुण आहेत, तसेच मनुष्यप्राण्यांतही जो गुण आहे त्यास आम्ही धर्म म्हणतो, तो गुण हा की, मनुष्य आदिकरून निरनिराळ्या ठिकाणी जे धर्म आढळतात, त्या सर्वांचा उगम जो ईश्वर त्याचे ज्ञान करून घेमे, त्यासच शरण जाणे व त्याने लावून दिलेली सेवा सांभाळणे, हा गुण इतर प्राण्यांत आढळत नाही आणि जर कदाचित काही माणसांतही हा गुण आढळला नाही तर त्याची वाढ अद्यापि मनुष्यदशेपर्यंत झाली नाही असे समजून त्यास खुशाल खालील प्राण्यांत गणण्यास काही हरकत नाही. म्हटले आहे:
आहार-निद्रा-भय-मैथुनानि|
समानमेतानि पशुभिर्नराणाम्||
ज्ञानं ही तेषामधिको विशेष:|
ज्ञानेनहीना: पशुभि: समाना: ||

ह्या ठिकाणी ज्ञान म्हणजे वर सांगितलेला गुणच होय, केवळ खाण्यापिण्याचे ज्ञान नव्हे. ह्याचेच नाव धर्म.

हा धर्म म्हणजे अर्थात एकच असणार. त्याची अनेक रूपे जरी जगात अनेक कारणांनी आढळत असली तरी त्या सर्वांचे मूळ स्वरूप वर सांगितलेले एकच असणार. ही सर्व रूपे ईश्वरास सारखीच प्रिय असली पाहिजेत. आम्ही मात्र त्याचे मूळ स्वरूप विसरू नये. ईश्वराचे राज्यात हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती असा खात्रीने भेद होणार नाही.

हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा भेद पाळण्यात येत नाही, तर ईश्वराचे राज्य जे खात्रीने अधिक पवित्र असणार त्यात कसा पाळण्यात येईल! इंग्रजसरकार स्वत: ख्रिस्तीधर्माचे आहे. आपल्या धर्माची किंमत ते जाणत नाहीत असे नाही. पण आजपर्यंतच्या अनुभवाने ते जर, केवळ धर्म निराळा म्हणूनच एकाद्यास आपल्या दरबारात निराळी जागा न देण्याइतके शहाणे झाले आहे, तर देव काय त्यापेक्षा कमी शहाणा असेल की त्याच्या दरबारात असा भेद होईल! मग स्वत: देवच जर धर्मभेद पाळीत नाही तर मनुष्याने तो पाळणे किती सत्यास धरून होईल बरे? हे सत्य व धर्माचे मूळ स्वरूप लक्षात सतत बाळगणे म्हणजे धर्मजागृती, अथवा धर्म जागा राखणे असे होईल.

पण अलीकडे धर्मजागृती करणे याचा भलताच अर्थ होऊन बसला आहे. हिंदूने म्हणावे की, आमचाच धर्म सर्वात जुना, श्रेष्ठ आणि पवित्र म्हणून त्याचे जे हल्ली आचार आहेत त्यांचाच वरचष्मा राखू, मुसलमानांनी ह्याच्या उलट प्रयत्न करावे, व ख्रिस्त्यांनी तर ह्या दोघांनाही पुढे नरकवासच आहे असे भाकीत करावे, असा प्रकार चालला आहे. असे होता होता परधर्माची खूप निंदा करणे, त्यातील असतील नसतील ते सर्व दोष बाहेर काढणे व प्रसंगी दंगा माजविणे हेच धर्मजागृतीचे लक्षण झाले आहे. अशाने आम्ही कधी देवाकडे जाऊ? आम्ही येथे ह्या पोलिसचौकीत आहो ते जर समजुतीच्या चार गोष्टी बोलून एकमेकांचे हृदगत जाणू तर ठीक. पण जर का दंडेली करून एकमेकांतला नीच भाव वाढवू लागू, तर तत्काल हे पोलीसदादा आम्हा सर्वांस बाहेर घालवितील. असे आहे तर जन्मभर धर्माच्या नावाने वाद माजवून व तंटे वाढवून शेवटी ईश्वराकडे गेलो तर तो कसा आम्हांस आत घेईल बरे?

ब्राह्मसमाज अगर प्रार्थनासमाज जी धर्मजागृती करीत आहे ती अशाप्रकारची नव्हे, किंवा हल्ली चालू असलेल्या सर्वच धर्मपंथांत थोडे बहुत दोष आहेत म्हणून तेवढे दोषच दाखविण्याचेही काम समाज करीत नाही. तर सर्व पंथांत भरून असलेले मूळ स्वरूप उघडकीस आणून हल्ली सर्वांचा समेट करण्याचा व अखेरीस काच, अग्नी इत्यादिकांस वर सांगितल्याप्रमाणे जसा एकच धर्म, तसा मानवी अंत:करणाचीही ईश्वराकडे ओढ घेणे हा एकच धर्म आहे, असे सिद्ध करण्याचा समाजाचा प्रयत्न आहे. ह्या सातारा गावीही रा.रा.काळे, जव्हेरे वगैरे मंडळी हाच प्रयत्न करीत आहेत. धर्म जागा ठेवणे असल्यास तुम्ही सर्वांनीही त्यास मदत करणे जरूर आहे.

धर्म-२

धर्माचा संबंध विशिष्ट व्यक्तिपुरताच न राहता तो संबंध सर्वाशी पोचणे आवश्यक आहे ही गोष्ट आम्ही क्षणमात्र विसरलो नाही. इतकेच नव्हे तर मनुष्यमात्रामध्ये एक प्रकारचे ऐक्य जुळवून आणल्याशिवाय धर्माला खरे सामर्थ्य प्राप्त व्हावयाचे नाही हेही आम्ही जाणून आहो.

जे अनुभव सार्वत्रिक आहेत, ज्यांचा आमच्या जीविताशी संबंध पोचतो आणि ज्यांचा साक्षात्कार आम्हांपैकी प्रत्येकास प्रत्यक्ष रीतीने येण्याचा संभव आहे, असेच अनुभव हे धर्माचे विषय होत. धर्माचा विषय प्रतिपादण्यास केवळ तार्किक मीमांसेचे अवलंबन केल्यास धर्मविषयही एक मानवी मनाचे बाहेरील बाब आहे असे समजल्यास ती केवळ काल्पनिक आणि मनोवृत्तिजन्य आहे, अशा आक्षेपास पात्र होईल. अशा ह्या दोन्ही परस्परविरोधी आपत्ती टाळावयाच्या असतील तर ब्रह्मवादाचाच आधार घेतला पाहिजे. ह्या ग्रंथामध्ये ज्याचे विस्तारपूर्वक विवरम झाले आहे, आणि ज्याचा आमच्या अंत:करणात साक्षात्कार पटतो असे स्वयंभू आध्यात्मिक जीवन ह्यालाच आम्ही ब्रह्मवाद हे नाव दिले आहे. आणि त्याचेचमुळे वर सांगितलेल्या दोन्ही आपत्ती टळून धर्मविषयाचा सार्वत्रिक अनुभव घेण्याची पात्रता आमच्यामध्ये येण्यासारखी आहे. ह्या स्वयंभू आध्यात्मिक जीवनाचा अंत:करणामध्ये साक्षात्कार झाल्यावर ह्या संसारातील मनुष्याची सारी धडपड अपुरी, भ्रांतिमूलक आणि व्यर्थ आहे असे कळून आल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत ही धडपड केवळ व्यक्तिपुरतीच असते तोपर्यंत तिची भ्रांतिमूलकता स्पष्ट दिसून येत नाही., परंतु समष्टीच्या दृष्टीने ह्या मानवी धडपडीचे अवलोकन केल्यास खालील प्रकारचा स्यादवाद आपल्यापुढे दत्त म्हणून उभा राहतो. एकतर मनुष्याच्या अंत:करणामध्ये ह्या नवीन जीवनाचा प्रादुर्भाव होऊन तो अंतर्बाह्य समर्थ होतो, नाही तर आध्यात्मिक दृष्टीने मनुष्य केवळ नष्टप्राय होऊन जातो. मनुष्य म्हणजे केवळ एक मोठा भ्रांतिकृत चमत्कार होय! ह्याहून तिसरा पक्ष संभवतच नाही.

आजपर्यंत मानवी इतिहासामध्ये जे जे विशिष्ट धर्म प्रचलित झाले आहेत त्या सर्वाला वरील स्यादवादाची कसोटी लावून पाहता सर्वांमध्ये ख्रिस्तीधर्म श्रेष्ठ आहे असे दिसून येते. आध्यात्मिक जीवनाच्या कसोटीस एक ख्रिस्तीधर्मच उतरतो. आणि ज्या अंशाने तो ह्या कसोटीस उतरतो, तेवढ्याच पुरते त्याचे सत्य निर्भ्रांत आहे. एरवी त्याची जी ऐतिहासिक परंपरा चालून आली हे तिच्यामध्ये असे निर्भ्रांत सत्य आहे असे म्हणवत नाही.

ख्रिस्तीधर्म हा उद्धाराचा धर्म आहे. जुन्या जगातून निघून नवीन जगाचा स्वीकार करावा असे त्याचे सांगणे आहे आणि ह्या कल्पनेचा किंचित अधिक विचार करणे जूर आहे. जगामध्ये जे अशुभ किंवा वाईट आहे, ते हिंदुधर्मात सांगितल्याप्रमाणे माया किंवा आभास आहे, असे नव्हे तर तो नैतिक गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे जगामध्ये अव्यवस्था होत आहे; असे ज्याअर्थी आहे त्याअर्थी सगळे जगच असत्य आहे म्हणून त्याचा त्याग करावयाचा नाही; तर जगाविषयीची आपली जी एक विशेष चुकीची भावना आहे तिचा त्याग करावयाचा आहे आणि ह्यावरून मानवी जीविताचे काही आध्यात्मिक स्वरूप असावयाचा संभव दिसून येत आहे आणि हा हेतू केवळ ज्ञानाच्या प्रबोधनाने साध्य होण्यासारखा नाही तर ह्यासाठी आपली आमूलात नैतिक पुनर्घटनाच व्हावयास पाहिजे.

प्रेमप्रसाद आणि आदरभाव ह्यांनी युक्त अशा जगताप्रत आपली उन्नती व्हावयास पाहिजे. ख्रिस्तीधर्माच्या मते ह्या उत्क्रमणामध्ये मानवी जीविताचा पाया रोवला आहे कारण देवाचा मनुष्यास साक्षात्कार होऊन राहत नाही तर देव आणि मनुष्य ह्यांमध्ये पूर्ण ऐक्य आहे आणि ते ऐक्य मानवी जीवितामध्ये दिसून येत आहे अशी ह्या धर्माची श्रद्धा आहे. ह्या मूळ सत्याचे स्वरूप ख्रिस्त हा देवमाणूस आहे अशा कोत्या मतामध्ये दिसून येत आहे. तरी ह्या मताच्या सदोषत्वामुळे त्या मूळ सत्याचा प्रभाव नाहीसा होत नाही.

देव आणि मनुष्य ह्यांच्यामध्ये सायज्य आहे अशा कल्पनेनेच धर्माला शुद्ध आणि पूर्ण आधअयात्मिकता प्राप्त होण्याचा संभव आहे. नाही तर देव आणि मनुष्य ह्यांच्यामधील संबंध केवळ बाह्यसंबंध होईल. ख्रिस्ताचे चरित्र आणि त्याच्यामागून झालेल्या त्याच्या अनेक अनुयायांचे परिश्रम, मोठमोठी राष्ट्रे आणि थोर थोर पुरूष ह्यांनी केलेली जगाची श्रेष्ठतम सेवा ह्या सर्वांमध्ये ख्रिस्ती जीवनाचा विकास कसा होत आला आहे ह्याचा विस्तार करून विचार करण्याचे हे स्थळ नव्हे. आम्हाला इथे एवढेच सांगता येईल की, ही सर्व कामगिरी अमुक एका विशेष काळी घडून आलेली नसून ती सर्व युगामध्ये सारखे विकसत आलेले एक सत्कार्य होय आणि सर्व कालातील जी मूळ जीवनशक्ती तिचा जो निश्चित आणि उच्च आदर्श त्याच्या कसोटीला निरनिराळ्या काळी घडलेली कामगिरी लावून पाहावयाचे आहे. निरनिराळ्या युगांमध्ये संस्कृतीची स्वरूपे जरी बदलत जात आहेत तरी वर सांगितलेल्या मूळ जीविताचा उच्च आदर्श कायम ठेवणे धर्माला भाग आहे हे जरी एकपक्षी खरे आहे तथापि दुसरेपक्षी त्या आदर्शाची अंमलबजावणी निरनिराळ्या संस्कृतीवर, कार्यावर आणि मदतीवरच अवलंबून आहे हेही खरे आहे.

हल्लीचे काळी धर्माचे काम अत्यंत कठीण झाले आहे. धर्माशी आधुनिक संस्कृतीचा घोर विरोध येऊ लागला आहे आणि तिच्याशी झगडताना धर्माला आपले वर्चस्व परिश्रमाने राखावे लागत आहे. धर्म आणि आधुनिक संस्कृती ह्यांच्यामध्ये मोठा लढा पडला आहे ही गोष्ट नाकारून किंवा तिच्याकडे डोळेझाक करून चालावयाचे नाही. एकपक्षी आपल्याकडे शुद्ध अंतरिक आणि नैतिक जीविताचा आदर्श आहे तर इतरपक्षी शक्तीचा आदर्श आहे. पहिला आदर्श पौरूषेय जीविताचा तर दुसरा अपौरूषेय जीविताचा आहे. ह्या दोन परस्परविरूद्ध आदर्शामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ वरपांगीपणा आणि गोंधळ माजविणे होय. कारण खरे पाहता ह्या दोहोंतून कोणातरी एकालाच पूर्ण स्वामित्व मिळाले पाहिजे.

परंतु ज्या आदर्शाचा पक्ष ख्रिस्तीधर्माने स्वीकारला आहे त्याचे स्वरूप अखिल मनुष्यजातीचा अनुभव आणि हल्लीच्या काळची परिणत आध्यात्मिक स्थिती ह्यांच्याशी अनुकूल झाल्याशिवाय त्याचे वर्चस्व कायम राहणार नाही. आधुनिक प्रणित आकांक्षांचे समाधान ख्रिस्तीधर्माच्या केवळ परंपरागत बाह्य गोष्टींनी होणे शक्य नाही.

ह्या दृष्टीने पाहता सध्याचे काळी ख्रिस्तीधर्मामध्ये तीन प्रकारांनी बदल झाला पाहिजे:- (१) जुन्या ख्रिस्तीधर्मात वर्णिलेली जगाची कल्पना आता बिलकूल निराधार ठरली आहे, ह्या बाबतीत जुन्या-नव्याची तडजोड करण्याचा नाद सोडून देऊन नव्यामध्ये जे सत्य आहे त्याचा आम्ही निर्भयपणे पूर्ण स्वीकार करावयास पाहिजे आणि ह्यासाठी आमच्या धर्मविषयीच्या कल्पनेतच फरक पडला पाहिजे आणि ह्या पुनर्घटनेचे सामर्थ्य आणि धैर्य आम्ही आमच्यामध्ये आणल्याशिवाय गत्यंतर नाही. (२) जुन्या काळच्या प्रगतीमुळे सांप्रदायिक धर्माची विधाने आम्हांला अगदी क्षुद्र आणि आकुंचित वाटू लागली आहेत. त्या विधानांवरच अवलंबून राहिल्याने आमची अवनती होण्याची भीती आहे. विशेषकरून “आध्यात्म”, “पौरूष” आणि “नीती” ह्या तिन्हींचे स्वरूप अधिक विस्तृत आणि खोलदृष्टीने ओळखावयास पाहिजे. आध्यात्मिक जीविताचा पाया स्वानुभवावर रचला पाहिजे. (३) जुन्या ख्रिस्तीधर्माचे स्वरूप हे एका थकून हतवीर्य झालेल्या युगाचे कार्य होते म्हणून त्याचे मूळ धोरण विशेषत: निवृत्तीपर आणि निषेधात्मक असे होते. मनुष्यस्वभावाची खरी थोरवी न ओळखल्यामुळे त्याचा उद्धार सर्वस्वी ईश्वरी कृपेवर अवलंबून ठेवण्यात आला. पापापासून मुक्ती मिळावी ह्याच गोष्टीकडे जुन्या ख्रिस्तीधर्माचे सर्व लक्ष वेधून गेल्यामुळे मनुष्यस्वभावाची शुभाप्रत कशी उन्नती होत चालली आहे हे त्याच्या लक्षात येण्याचा मार्ग राहिला नाही व आनंदवादाचा त्याला पूर्ण स्वाद मिळेना. अवनती आणि दुरास्थिती ह्यातून मनुष्याची सुटका झाली तरी त्यास स्वतंत्र आणि स्वयंप्रेरित नवीन कर्तृत्वशक्तीची जोड मिळवून देण्यास जुना ख्रिस्तीधर्म असमर्थ आहे. हल्ली जी पूर्ण प्रकारे पुनर्घटना व्हावयास पाहिजे ती ही की, तिच्याद्वारे केवळ अंध शक्तीच्या पायावर रचलेली नैसर्गिक नीती तिच्याशी कोणत्याही अंशाने विरोध कमी न होता कर्तृत्वशक्ती आणि आनंदवाद ह्यांचे महत्त्व पूर्णपणे समजून येईल.

थोडक्यात सांगावयाचे म्हटले तर ख्रिस्तीधर्माला अगदी नवीन स्वरूप प्राप्त व्हावयास पाहिजे. दुर्बलतेची बाजू सोडून ख्रिस्तीधर्माने आध्यात्मिक जीवनाचा पक्ष पूर्णपणे स्वीकारला पाहिजे आणि ज्या जीर्ण झालेल्या अनावश्यक गोष्टींचा त्याला प्रगतीच्या मार्गात अडथळा येतो त्याचा त्याने निश्चयाने त्याग केला पाहिजे. त्याच्या स्वरूपाची जी सार्वत्रिक आणि सनातन अंगे असतील त्यासच प्राधान्य देऊन जीविताचा प्रामाणिकपणा त्याने शाबूत राखला पाहिजे. धार्मिक पायावर मनुष्याची एकी एकदम होईल अशी आमची अटकळ नाही, परंतु आमच्या मार्गामध्ये काय अडथळे आहेत ह्याची आम्हांस योग्य कल्पना झाली तरी मोठा कार्यभाग होणार आहे. धार्मिक बाबतीतील सर्व अप्रामाणिकपणा नष्ट करून आम्हांला आध्यात्मिक निरामय साधावयाचे असेल तर ह्या प्रकारच्या सम्यक् ज्ञानाची जरूरी आहे.

  1. धर्म, समाज आणि परिषद
  2. धर्म आणि व्यवहार
  3. देशभक्ती आणि देवभक्ती
  4. दास्यभक्तीची ध्वजा
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
Page 25 of 145
Copyright © 2022. All rights reserved @virashinde.com. (यशवंतराव चव्हाण सेंटर) Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
  • मुख्यपान
  • महर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी
  • छायाचित्र गॅलरी