आज आमच्या प्रार्थनासमाजाची स्थापना होऊन ४७ वर्षे पुरी झाली. तेवढ्या अवधीत समाजाने आपल्या शक्तिनुसार अल्पस्वल्प धर्मप्रसाराचे काम केले आहे. समाजाने स्वीकारलेल्या सर्वमान्य सनातन धर्मतत्त्वांचा प्रसार हल्लीपेक्षा अधिक जारीने कसा व्हावा ह्या गोष्टीकडे आमच्या सर्व प्रमुख समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. बंगाल्यात एका मोठ्या फंडाची स्थापना होऊन त्याचा काही भागही जमला आहे. पंजाबात ब्राह्ममिशनच्या स्थापनेचा उपक्रम आज दोन वर्षे चालू आहे. दक्षिणेत विशेषत: मद्रास इलाख्यातील नार्दन सरकारमध्ये असेच प्रयत्न चाललेले आहेत. मुंबईच्या समाजामध्ये मिशन कमिटीची स्थापना होऊन नवीन प्रयत्नास आरंभ होत आहे. अशावेळी धर्मप्रसाराचे मुख्य अंग कोणते ह्याचा विचार करणे इष्ट आहे.
समाजाने चालविलेल्या ह्या कार्यासंबंधाने समाजाच्याबाहेर पाहू गेल्यास विद्वान आणि देशाभिमानी म्हणविणा-या लोकांमध्ये विशेष सहानुभूती आहे, असे म्हणण्याचे धाडस करवत नाही. नुकतेच श्रुतिबोध नामक एका सन्मान्य मासिकाच्या संक्रांतीला तीळगूळ ह्या नावाखाली जादा अंक निघालेला आहे. त्यात सर्व धर्मांवरील परिषद ह्या नावाखाली निरनिराळ्या धर्मांच्या अभिमान्यांचे लेख आले आहेत. निरनिराळ्या धर्मांचे लेख एकत्र करणे ही कल्पना देखील समाजाच्या तत्त्वांना पोषकच आहे. परंतु त्यात हिंदुस्थानच्या एका जाज्वल्य अभिमान्याने भक्तिमार्गाविषयी जी विधाने करण्याचे उघड उघड धाडस केले आहे त्यावरून धर्मसाधनाविषयी विद्वान म्हणविणा-यांमध्ये अद्यापि तुकारामाने म्हटल्याप्रमाणे ब्रह्मज्ञान्याघरी भक्तीचा दुष्काळ व शब्दांच्या सुकाळाचा खटाटोप असाच प्रकार दिसून येत आहे. वरील लेखकाने असा उघड शेरा ठोकून दिलेला आहे की, भक्तिमार्ग म्हणजे हा केवळ शूद्रांसाठी आहे. ज्याच्या अंगात ज्ञान मिळविण्याचे सामर्थ्य नाही किंवा कर्म आचरण्याची कर्तबगारी नाही अशा शूद्रादी हीन वर्गासाठीच हा मार्ग प्रचारात आणला गेला आहे. अशी ह्या विद्वानाची मीमांसा आहे. हिंदुधर्माचा अभिमान बाळगून त्याची मीमांसा करतेवेळी भक्तिमार्गाचा असा विपर्यास करण्याची आवश्यकता हे असे आम्हास कधी वाटले नव्हते. ज्ञान, भक्ती, कर्म आणि वैराग्य ह्या आध्यात्मिक स्थिती जरी वरवर पहाता भिन्न भिन्न दिसतात तरी थोडास खोल विचार केल्यावर धर्ममार्गामध्ये खरोखर प्रविष्ट झालेल्या ह्या आत्म्याच्या सर्व स्थिती एकामागून एक किंवा सर्व एकाच वेळी होतात. ख-या धार्मिक स्थितीत मानवी ज्ञानाची किंबहुना वीर्याची मोठी प्रौढी नाही असे पाहून मनुष्याचे मन जेव्हा नम्र होते आणि विश्वामध्ये नांदत असणा-या सामर्थ्यवान शुभ शक्तींचा त्याला शरणागत स्थितीमध्ये साक्षात्कार होतो तेव्हा जी मनुष्याची भावना होते, तिचेच नाव भक्ती. अशी भक्ती केवळ शूद्रांसाठीच आहे असे म्हणणे हा त्या भक्तीचा अत्यंत विपर्यास होय.
आजपर्यंत जगामध्ये जे मोठमोठे भक्तिशाली संत होऊन गेले त्यांनी आपली गणना मोठ्या आनंदाने शूद्रादी हीन वर्गातच करून घेतली आहे. ‘भला देवा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो’ हा उद्गार एका तुकारामाचाच नव्हे तर सर्वकालीन, सर्व दर्जाच्या आणि जातींच्या संतांचा आहे. संतांचे स्वत:विषयी मत आणि वरील आमच्या हिंदुधर्माभिमानी विद्वानाने भक्तिमार्गाविषयी दिलेले मत ह्यांमध्ये केवळ शाब्दिक साम्य दिसून येत आहे.
परंतु ह्या दोघांच्या भावनाकडे पाहिले असता जमीन अस्मानाचा फरक दिसून येतो. भक्तीची खरी भावना अंत:करणात वीरश्रीच्या गोष्टी सांगण्याप्रमाणेच व्यर्थ आहे. ती भावना म्हणजे स्वत:च्या दुर्बलतेविषयी येणारे साक्षात अनुभव. विश्वामध्ये नांदणा-या सनातन शक्तीचा साक्षात्कार आणि त्यामुळे उत्पन्न होणारी मनाची प्रसन्नता ह्या सर्वांना आमच्या जुन्या संतांनी ‘स्वानुभव’ हे नाव दिलेले आहे. आणि तो स्वानुभव हेच धर्मप्रचाराचे मुख्य अंग आहे.
व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीचा स्वानुभव हा एक मुख्य भाग आहे. इतकेच नव्हे तर त्याचा प्राण आहे. पण जनतेमध्ये सद्धर्माचा प्रसार करावयाचे झाल्यास मोठमोठे द्रव्यसंचय जमविणे, तरूण धर्मप्रसारकांची योजना करणे, पुस्तके आणि मासिके काढणे, जाहिराती काढणे हे प्रकार अगदी अर्वाचीन होत. प्राचीन प्रकार ह्याहून निराळे होते. कोणातरी एका मोठ्या अधिकारी सत्पुरूषाला वर सांगितलेला स्वानुभव पूर्ण येऊन त्याच्या अंत:करणामध्ये सर्व मंगलमय भावनाचे पूर्ण साम्राज्य स्थापित होत असे. त्याच्या समागमामध्ये जी माणसे येत त्यांच्यावर त्या सत्पुरूषाचा पगडा बसत असे आणि मग अशा रीतीने अंत:करणामध्ये पालट झालेल्या त्याच्या शिष्याकडून धर्माचा प्रसार होत असे. ख्रिस्त, बुद्ध आणि महंमद ह्यांनी चालू केलेल्या संस्कृत धर्माचा प्रसार ह्याच तत्त्वावर झालेला आहे. त्याच्या पूर्वीपासून चालत आलेल्या इतर प्राकृत धर्माचा प्रसार कोणत्या तत्त्वावर झाला त्याची चर्चा करण्याची ही वेळ आहे. सारांशात मनुष्याच्या मनाला नैसर्गिक स्थितीतून आध्यात्मिक स्थितीत उन्नत करण्यासाठी ज्या सात्विक प्रकाराची आवश्यकता आहे त्यात धर्मप्रसारकाच्या अंगामध्ये मोठा स्वानुभव पाहिजे ही प्रमुख व आवश्यक गोष्ट होय. व्याख्याने, परिषदा, द्रव्यसंचय आणि जाहिराती ह्या एकाहून एक खालच्या दर्जाच्या गौण गोष्टी आहेत. प्रधान तत्त्व जो स्वानुभव त्याचा जर अभाव असेल तर ह्या गौण गोष्टीमुळे धर्माचा प्रसार न होता कलह मात्र वाढतो हे इतिहासावरून प्रसिद्ध आहे.
ह्यावरून अर्वाचीन प्रसारपद्धतीचा कोणी पुरस्कर्ता असे म्हणेल की, काय हो आमच्या अंगामध्ये तुम्ही म्हणता असा मोठा स्वानुभव नसला तरी आम्ही धर्मप्रसाराचे काम मनोभावाने करू लागलो तर अहित होईल काय? आम्ही स्वत: ख्रिस्त किंवा बुद्ध झाल्याशिवाय खोलीच्या बाहेर पडू नये असे तुम्हांस वाटते काय? दुष्काळग्रस्तास मदत करणे, अशिक्षितासाठी शाळा काढणे, अस्वच्छ लोकांना गरम पाण्याचे स्नान घालणे व सर्वसाधारण सामाजिक जुलुमाखाली चिरडून गेलेल्या लोकांची सहानुभूतीने शुश्रूषा करणे इ. इ. हा सामाजिक सेवेचा एक प्रकार झाला. बहुजन समाजामध्ये आध्यात्मिक भावनांचा प्रसार होईल अशी व्याख्याने देणे, क्षणमात्र तरी सांसारिक गोष्टीवरून मन उडून ते शाश्वत सुखाकडे लागेल अशी श्रद्धायुक्त संभाषणे करणे, अशा व्याख्यानांनी आणि संभाषणांनी ज्या व्यक्तीची आणि कुटुंबाची मने शुद्ध आणि उदार धर्माकडे वळतील अशाच समाज स्थापणे आणि अशा नवीन स्थापलेल्या समाजाचा धार्मिक बाबतीत पुरस्कार ककरणे हा समाजसेवेचा दुसरा प्रकार होय. ह्या दोन प्रकारांपैकी दुसरा पहिल्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचा असे तुम्हाला वाटत नाही काय? पहिल्या प्रकाराची सेवा करावयास लागलो असता जर तुम्ही आपल्या अधिकाराकडे पाहत नाही तर दुस-या प्रकारच्याच सेवेला आम्ही लागलो असता तुम्ही ही वरील स्वानुभवरूपी अधिकाराची अट का घालिता? असो नसो भाव| आलो तुझ्या पाया|| ह्या नम्र भावनेने जर आम्ही धर्मकार्यास लागलो तर त्यात काय वावगे झाले?
आधुनिक प्रसारपद्धतीच्या पुरस्कर्त्यांचा वरील कोटिक्रम खरोखरीच वंदनीय आहे. मानवी समाजाची उत्तरोत्तर जसजशी संकीर्णावस्था होत जाईल तसतशी प्रसाराची प्राचीन पद्धती मागे पडून वर सांगितलेलीच अर्वाचीन पद्धती जोमात येणे हे समाजशास्त्रातील काही नैसर्गिक कारणांवरून स्वाभाविक आहे हेही आम्हांस मान्य आहे. धर्मप्रसाराच्या कामात कोणी पडावे आणि कोणी पडू नये असा निर्बंध करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांच्या अंगी प्रामाणिकता आणि नम्रता हे गुण वास करतात त्या सर्वांना धर्मकार्यास मदत करण्याचा अधिकार आहे व त्यांच्या मगदुराप्रमाणे त्यास यशही खास येईल. पण आम्हांस आज एवढेच सांगायचे आहे की, ज्या मानाने धर्मप्रचार करू इच्छिणा-या व्यक्तीचे ठायी मग ती व्यक्ती प्रचारक म्हणविली जात असो किंवा नसो...वर निर्दिष्ट केलेला स्वानुभव जास्त त्या मानाने त्याच्या कार्यात यश अधिक येण्याचा संभव आहे. त्याच्या अभावी केवळ विद्वत्ता, सामाजिक दर्जा, द्रव्यसंचय हे किंवा इतर असेच गुण आणि उपाय ह्यांच्या जोरावरच प्रसार करू पाहणा-यास धर्म बाबतीत खरे यश येण्याचा संभव कमी आहे.
स्वानुभव अंगी आल्याची लक्षणे म्हणजे श्रीमान गौतम बुद्धाने वर्णिलेल्या चार भावना होत. करूणा, मुदिता, मैत्री आणि अपेक्षा. भौतिक अथवा आध्यात्मिक दु:खाने पीडिलेल्या जीवाविषयी अनुकंपा बाळगणे ह्याचे नाव करूणा. अशा करूणेने प्रेरित झाल्यावरही आपल्या मनाची सुप्रसन्नता आणि समता ही भंग होऊ न देणे ह्याचे नाव मुदिता. ह्या मोदविशिष्ट करूणेने प्रेरित होऊन सर्व जीवांची प्रेमयुक्त सेवा करणे ह्याचे नाव मैत्री. आपण काही उपाय न केले तरी कमी न होणारे असे बरेचसे अशुभ जगतामध्ये आहे, पुन्हा पुन्हा कमी करण्याचा प्रयत्न करूनही ते कमी होत नाही किंबहुना आपल्या सामर्थ्याने ते कमी होण्यासारखेच नाही असे दिसून आल्यावर त्याचे विषयी उदासीन राहणे, जणू काही ते जगतामध्ये नाहीच असे समजून आपली मुदिता कायम राखणे आणि मैत्रीचा व्यवहार चालू ठेवणे ह्याचेच नाव उपेक्षा.
भगवान गौतम बुद्धाने वर्णलेल्या ह्या चार वृत्तींचा जोम ज्या सत्पुरूषाचे अंगी प्रत्यक्ष दिसून येईल त्याला धर्माबाबतीत यक्तिंचित तरी स्वानुभव आला असे म्हणण्यात येईल. ज्यांच्यामागे ह्या वृत्तीचा विकास झालेला नाही अशा व्यक्तींनी किंवा व्यक्तिसमूहांनी कोणत्याही धर्ममतांचा जरी स्वीकार केला असला तरी त्यांच्या हातून मोठेसे कार्य होईल असे थोडेच आहे. ह्यावरून धार्मिक अनुभव आणि धार्मिक मते ह्यांमध्ये केवढे महदंतर आहे हे दिसून येईल. धार्मिक मते ही धार्मिक अनुभवांचा केवळ वरवरचा पृष्ठभाग असे म्हटले असता चालेल. ज्या धार्मिक मतांना भावाचा खोल आणि खंबीर पाठिंबा नाही अशा केवळ पोकळ मतांचाच आश्रय करून आम्ही ह्या संकीर्ण लोकव्यवहारात वावरू लागलो तर ती कशी लटपटतात ह्याचा अनुभव ज्याचा त्यास यावयाला पाहिजे. त्याविषयी वाच्यता करून फारसा फायदा नाही.
वर सांगितलेल्या स्वानुभवाची जितकी आवश्यकता व्यक्तीच्या धर्मसाधनार्थ आहे तितकी किंबहुना जास्तच अशा स्वानुभवसंपन्न व्यक्तींची आवश्यकता समाजाकडून होणा-या धर्मप्रसारार्थ आहे.