धर्मसंघाची आवश्यकता

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ|
-तुकाराम

चालू साली आमच्या समाजातून दोन मोहरे गेले. ते प. लो. वा. सदाशिवराव केळकर आणि नुकतेच गेलेले वासुदेवराव नवरंगे हे होत. सत्यवक्तेपणा, स्पष्टवक्तेपणा, स्वार्थत्याग, उद्योग, साधेपणा, धार्मिक वृत्ती इत्यादि अनेक गुम ह्या दोघांच्याही अंगी होते, पण ते त्यांचे विशेष गुण नव्हते, पासरीभर मतांची आणि प्रतिज्ञांची किंमत ज्या कृतीच्या एका तोळ्याइतकीही भरत नाही अशी भरीव कृती आमच्यापैकी ज्या थोड्या पुरूषांनी अगदी मरेपर्यंत अनेक अडचणी आणि संकटे सोसून साधली आणि आपल्या करारीपणामुळे प्रार्थनासमाजाला हल्लीचे जे संघस्वरूप दिले त्यांच्यापैकी हे दोघे होते. तो कृतीचा करारीपणाच ह्यांचा विशेष गुण होय. म्हणून अशा प्रसंगी-

(१) मनुष्य जातीचे जे विस्तृत जीवन आहे त्यात अशा धर्मसंघाचे कोणते महत्त्व व कशी आवश्यकता आहे?
(२) अशा संघाचा पाया कोणत्या तत्त्वांवर घालावा?
(३) त्या पायावर संघाची वरील उभारणी कशी करावी?

ह्या तीन महत्त्वाच्या मुद्यांवर ह्या पवित्र पीठावरून निरनिराळ्या वेळी सविस्तर प्रवचन व्हावयाला पाहिजे आहे. ते हल्लीच्या काळाला व प्रस्तुत देशस्थितीला अनुसरूनच असले पाहिजे. केवळ तात्त्विकदृष्ट्या पाहता सामान्यत: अशा संघाची आवश्यकता नाही. कारण पुरातन काळापासून निरनिराळ्या वेळी सर्वत्र धर्मसंघ स्थापन होत आलेले आहेत व त्याचे अवशेष अद्यापि मागे उरले आहेत.

तथापि हल्ली आमच्या देशात कसा विपरीत प्रकार चालला आहे पहा. चांगले शिकलेले, काही पुढारीदेखील खासगी संभाषणात उघडपणे म्हणतात की, हल्ली चहूंकडे राष्ट्रांराष्ट्रांमध्ये किती झटापट चालली आहे, बलवान दुर्बळाला कसा खाली रगडीत आहे, अशा वेळी धर्माच्या आणि सामान्य बंधुत्वाच्य गोष्टी सांगत बसणे योग्य नव्हे. निदान आमच्यासारख्या मागासलेल्या देशाने तरी केवळ सात्विकपणा स्वीकारणे शहाणपणाचे होणार नाही. आम्ही आधी राजसी गुणच वाढवून इतरांनी बरोबरी केली पाहिजे. म्हणजे नंतर समानतेच्या गोष्टी सांगितल्यास काहीतरी शोभेलच. असे प्रतिपादणारे धर्माचा आणि सात्विकपणाचा काही भलताच अर्थ समजत असतात. त्यांच्या मते शौर्य, धैर्य, वीर्य इ. गुण म्हणजे जणू सात्विक नव्हतेच. सात्विकपणा म्हणजे नुसते नेहमी सहन करून असणे असा केवळ निषेधार्थी अर्थ समजला जातो. पण वस्तुत: पाहता सत्त्व म्हणजे तर शुद्ध शक्ती असा आहे. विशेषेकरून वरील विचार करणारे जेव्हा जपानचे सुप्रसिद्ध व सर्वमान्य उदाहरण पुढे आणून आपले राजसी मत जोराने प्रतिपादतात तेव्हा तर धार्मिक प्रयत्न करणा-यांचे तोंड अगदी बंदच होते की काय अशी भीती पडते. जपानचे लोकांनी जी ही अकल्पित सरशी केली त्याचेपूर्वी त्याने कधी व कोणता धर्मसंघ स्थापला होता? उलट हिंदुस्थानाने आज गेली पाऊणशे वर्षे ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज, आर्यसमाज इ. कित्येक संघ रचून काय दिवे लावले आहेत?

जपानच काय पण हल्लीचे बहुतेक सर्वच पुढे आलेले देश धर्मबाबतीत अगदी उदासीन आणि जडवादी होत चालले नाहीत काय? मग आम्हीच हा कोरडा काथ्याकूट का करावा इ. अनेक आक्षेप वरील मंडळीचे निघतात. धर्मसंघ म्हणजे मतांची कोरडी काथ्याकूट करणारी मंडळीच एवढा अर्थ असेल तर वरील युक्तिवाद्यांशी निदान ब्राह्म आणि प्रार्थनासमाजिकांची बरीच सहानुभूती जमेल पण संघाचा अर्थ अगदी उलट आहे. म्हणून वरील प्रश्नात उत्तरादाखल उलट थोडक्यात एवढा प्रश्न केल्यास पुरे आहे. तो हा की, जपानात आणि इतर पुढे सरसावलेल्या देशांत धर्मबाबतीत लोकांना जे झपाट्याने स्वातंत्र्य मिळत चालले आहे. आणि त्यामुळे व्यक्तीचे व राष्ट्राचे शील वाढत चालले आहे, त्याचे खरे कारण तेथील धर्मविषयक औदासीन्य की धर्मविषयक विचार? आणि उलट पक्षी आमच्या देशात धर्माच्या नावाने आचारविचाराचे जे पुरातन पारतंत्र्य साम्राज्य चालू आहे आणि त्यामुळे शीलाची हानी होते तिचे खरे कारण आमची धर्मप्रवृत्ती की धर्मविषयक औदासीन्य बरे! ह्या दृष्टीने पहाता जपानात जरी ब्राह्म प्रार्थनासमाजाप्रमाणे धर्मसंघ स्थापण्यात आले नसतील तरी ब्राह्म प्रार्थनासमाजाचे कार्य जे उदार आत्मिक प्रवृत्तीचा देशात प्रसार करण्याचे ते जपानात खास होत असले पाहिजे. त्याशिवाय सर्व जगात थक्क करून सोडणारे इतके राष्ट्रीय तेज व नैतिक बळ एकाएकी उत्पन्न होणे शक्य नाही.

हे नि:संशयच आहे. तसेच पण हेही नि:संशय आहे की हा जो जपानातील आत्मिक व नैतिक बळाचा झरा आपल्या भोवती साचलेले जड आच्छादन फोडून वर वर पाहणा-यास जणू अकस्मात आणि यदृच्छेनेच बाहेर आला आहे असे वाटले त्या झ-यावर जर वेळीच चोहोकडून योग्य बांध पडले नाहीत आणि त्याचे प्रगतीवर धर्मसंघ बनले नाहीत, तर हा वर आलेला पूर केव्हाच ओसरून जाईल आणि पुन: जपान जे आज जगाच्या आनंदाला व आश्चर्याला पात्र झाले आहे ते पुढे अनुकंपेला पात्र होईल. इतकेच नव्हे तर हल्ली कित्येक खोल दृष्टीचे प्रवासी जपानच्या उथळपणाविषयी प्रसंगवशात इषारा देत आहेतच.

एकंदरीत पुढारलेले चिमुकले जपान काय किंवा मागासलेले अवाढव्य हिंदुस्थान काय दोहोंपक्षी धर्मसंघाची सारखीच आवश्यकता आहे. अवर्षण पडले असता खोल विहिरी खणून पाणी काढणे किंवा अतिवृष्टीमुळे पूर आला असता जागजागी बांध घालून पामी साठवणे ह्या दोन्ही गोष्टी जशा शहाण्या बागवानाच्या दृष्टीने सारख्याच महत्त्वाच्या व जरूरीच्या आहेत तद्वतच जपानातल्यासारखा साहजिक उद्रेक झाला काय किंवा हिन्दुस्थानातल्याप्रमाणे कितीही खडक फोडला तरी ठणठणीतपणाचा देखावा दिसला काय, सूज्ञ, दूरदर्शी व लोकिहतकारी जे ऋषी आहेत त्यांना धर्मसंघाची आवश्यकता दोन्ही प्रसंगी सारखीच भासेल.जगाच्या एका कोप-यात एकदा असा स्फोट झाला म्हणून सात्विक प्रयत्नाची कधीही व कोठेही जरूरी नव्हती, किंवा निदान हल्ली आमच्या देशात तर हमरीतुमरी आणि मारामारीसंबंधी नुसता बोलण्याचा सुकाळ केला की सर्व इतिकर्तव्यता झाली असे समजणे म्हणजे ह्या विपरीतपणाला सीमाच नाही म्हणावयाची.

ह्या जगात मनुष्य मनुष्यावर आजपर्यंत अनेक कारणांवरून अथवा सबबीवरून जी सत्ता चालवीत आला आहे ती चार प्रकारची आहे. (१) राजकीय, (२) धार्मिक, (३) सामाजिक, (४) औद्योगिक. ह्या चार सत्तांना अनुक्रमे (१) सरकार, (२) संघ, (अथवा अलीकडे समाज हे नाव अधिक प्रचारात येऊ लागले आहे.) (३) रूढी आणि (४) पत किंवा व्यवहार अशी नावे आहेत. ह्यांपैकी पहिल्या दोन म्हणजे राजकीय आणि धार्मिक सत्तांची पुरातन कालापासून सर्व देशांत सुव्यवस्थित रीतीने घटना होऊन चुकल्यामुळे ह्या दोन्ही चांगल्या नावारूपास आल्या आहेत. म्हणजे अधिकाराचे मूळ, अधिकारी पुरूष, अधिकारासंबंधी नियम व त्याची अंमलबजावणी ही सर्व ठरलेली आहेत. अधिकाराची स्थाने व पद्धती कदाचित देशकालाच्या मानाप्रमाणे बदलली तरी सर्व अधिकार नष्ट होऊन अजीबात सत्ताच बंद पडली असे होणे शक्य नाही. शेवटच्या दोन सत्ता, रूढी आणि व्यवहार ह्यांचे मात्र कार्य वरील दोन सत्तांच्याप्रमाणे व्यवस्थेने चालत नाही. कारण नियम, अधिकार आणि त्यांची स्थाने ही ठरणे शक्य नसल्यामुळे ह्या दोन सत्तांचे असे दृश्यरूप दिसून येत नाही. तथापि त्या निराकारपणे अस्तित्वात आहेतच. वर सांगितल्याप्रमाणे मानवी समाजात (१) सरकार, (२) संघ, (३) रूढी, (४) पत अशा चार प्रकारच्या सत्ता चालू आहेत. ह्यांपैकी पहिल्या दोन साकार रूपाने व दुस-या दोन निराकार रूपाने चालू आहेत. म्हणून पहिल्या दोन्हीसंबंधी ज्या जुन्या संस्था बनून चुकल्या आहेत त्यांच्यात कालमानाप्रमाणे डागडुजी किंवा तोडजोड करणे अथवा नवीन संस्थांची भर घालणे हे त्यांच्या चालकांना शक्य आहे. असे करणे त्या त्या नेमलेल्या अधिका-यांचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी बजावले नाही किंवा बजावण्यात कसूर केली तर त्यांच्याकडून ते कर्तव्य करविण्याचा उपजत हक्क सर्व जनतेस आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, हल्ली आमच्या देशात जो तो राजकीय सत्तेसंबंधी आपला हक्क शाबीत करीत सुटला आहे, पण धर्मसत्तेच्या बाबतीतही प्रत्येक व्यक्तीस तितकाच उपजत हक्क आहे आणि धर्माचे अधिकारीही कालमानाकडे दृष्टी देऊन आपली जबाबदारी पाळतात की नाहीत हे पाहण्याचे काम धर्मसंघाला घटक ह्या नात्याने प्रत्यक व्यक्तीचे असून तिकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. मिळण्यासारखे असो किंवा नसो आम्ही राजकीय स्वराज्य मागू लागलो आहो. पण धार्मिक स्वराज्य आमचे आम्हांला आहेच. तिकडे लक्ष देतो कोण? आमचे धर्मगुरू मोठ्या मोठ्या संस्थानाचे मालक बनून बसले आहेत. वर्षात दोन चारदा हत्ती, घोडे, उंट इ. बड्य लव्याजम्यानिशी ते भिक्षेला निघतात त्यावेळी आम्ही त्याजपाशी स्वराज्य मागतो काय? मागे दिलेल्या कराचा हिशोब मागतो काय? सालोसाल राष्ट्रीय सभेमध्ये जशी आम्हांला पाहिजे त्या सुधारणांची एक यादी करून राजाकडे पाठवितो तशी धर्मबाबतीतही ठराव पास करून धर्मगुरूकडे पाठवितो काय? राजकीय बाबतीत अंतिम सत्ता लोकांची आहे, राजा केवळ त्यांनी नेमलेला अधिकारी आहे हे तत्त्व आम्ही राजाला शिकवू लागलो आहो तसे धर्मगुरूलाही तेच तत्त्व लागू करतो काय? आमच्या देशात किती तरी देवळांना सोन्याचे दरवाजे व रूप्याचे खांब आहेत आणि मूर्तीवर किती जडजवाहीर आहे, किती मौल्यवान देणग्या व मातबर वतने चालू आहेत आणि एकंदरीत धर्माच्या नावाने किती अवाढव्य खर्च बेदाद चालला आहे, आमच्या तत्त्वज्ञानावर किती शतकांचा गंज चढलेला आहे, आमच्या धार्मिक वाड्मयावर किती भलत्याच आगंतुक विचारांची कोळिष्टके आणि जळमटे वाढली आहेत, धर्माच्या नावाने शेखी मिरविणारे आम्ही सर्व जगाचे धर्मबाबतीत स्वत:स गुरू समजणारे स्वत: आमच्याच देशात धर्मशिक्षण कसे अजीबात बंद पडत चालले आहे, ह्या आणि अशा अनेक धर्मसंघाच्या बाबतीतील आमच्या हलगर्जीपणाकडे आमचे लक्ष जाते काय? पाश्चात्यांचे इतिहास व पाश्चात्यांच्या चळवळी पाहून राजकीय हक्क मागण्याचे कामी मात्र आम्ही त्यांचे अनुकरण करतो. पण धर्मसंघाचे बाबतीत पाश्चात्यांनी आपल्या देशात व जगभर जे भगीरथ प्रयत्न चालविले आहेतत्याचे अनुकरण तर राहोच पण नुसते अवलोकन तरी करतो काय? पाश्चात्य लोक राजकीय कर देताना आपल्या राजाशी प्रत्येक पेनीबद्दलही भांडण्यास मागे घेत नाहीत तेच आपल्या डोईजड धर्मगुरूच्या जुलमी सत्तेस आळा घालून आधुनिक समजुतीस शोभेल असे नवीन धर्मपंथ कसे काढीत आहेत व आपल्या ह्या नवीन धर्माचा, आपल्या जिवंत नीतीचा, आपल्या शीलाचा प्रसार आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या ओसाड आणि जंगली देशांतही करण्याकडे कसा लक्षावधी रूपयांचा दरसाल खर्च करीत आहेत; लहान मुलांकरिता आदित्यवारच्या धर्मशिक्षणाच्या शाळा, गरीब बायका आणि विधवांकरिता उपयुक्त घरगुती कला शिकविण्याच्या संस्था, काम न मिळाल्यामुळे लफंगे आणि बदमाश बनलेल्या तरूणांना ताळ्यावर आणण्याकरिता सायंकाळची क्रीडाभुवने अथाथ व उनाड मुलांना एकत्र करून त्यांना शेतकी, सुतारी व विणण्याचे वगैरे धंदे शिकवून व उत्तर अमेरिकेसारख्या देशात पाठवून तेथे वसविलेल्या वसाहती, नवीन शिक्षणामुळे तरूणांनी भडकून जाऊ नये म्हणून अगदी आधुनिक वाड्मयातूनच उदार आणि आध्यात्मिक विचार त्यांचे मनात बिंबविण्याकरिता व्याख्यानमाला आणि सर्वसाधारण लोकांकरिता सर्व ललितकलांचा विकास ज्या ठिकाणी पहावयास मिळेल अशी भव्य व मोहक उपासना मंदिरे, अशा कितीतरी गोष्टीत पाश्चात्य धर्मसंघाचे लक्ष्य गुंतलेले आहे, ते आमच्या तिकडे गेलेल्या प्रवाशाच्या नजरेत भरते तरी काय ? हे होत नसून जर आम्ही नुसते राजकीय स्वराज्यच मागत असलो तर मिळत नसलेल्या वस्तूबद्दल हट्ट व मिळालेल्या वस्तूबद्दल हेळसांड करणे हा केवळ आम्ही पोरकटपणा करतो असे वाटून कोणीही आमच्या मागण्यांचा आदर करणार नाही.

आपल्यातील कित्येक जुन्याचे अभिमानी विद्वान आपल्यास नेहमी असे भासवीत आहेत की, सुधारलेल्या देशात ख्रिस्ती धर्माची मते अगदी ढासळत आहेत आणि तेणेकरून तिकडील धर्मसंघाचे वजन बहुजनसमाजावरून पार उडत चालले आहे. आधुनिक ज्ञानाचा प्रकाश चोहीकडे फैलावत असल्यामुळे ख्रिस्ती धर्माचीच काय पण जेथे जेथे हा प्रकाश पोहोचला आहे तेथील सर्वांची बनावट मते आणि भाकडकथा लयास जाऊ लागल्या आहेत. पण पाश्चात्य देशांतील आणि त्यातल्या त्यात आंग्लो-सॅक्शन लोकांचा विशेष हा की, त्यांच्यामध्ये संघशक्ती, प्रसंगावधान, व्यवहारचातुर्य आणि संसाराविषयी आदर इ. गुण उत्कृष्ट रीतीने वसत असल्यामुळे, त्यांनी सोकावलेल्या धर्माधिका-यांचे उद्दाम चोचले चालू न देता व ख्रिस्तानंतर तीनचार शतकांनी बनविलेल्या ३९ मतांची पर्वा फारशी न बाळगता, खुद्द ख्रिस्ताच्या सांगण्यात जो काही शाश्वत नीतीचा आणि आध्यात्मिक हिताचा मुख्य भाग होता, त्यावरच आपली सर्व मदार ठेवून आणि ख्रिस्ती धर्माचे मुख्य आणि विशेष असे जे तत्त्व स्वर्गीय राज्य पृथ्वीवर आणण्याचे ते बळकट ध्यानात ठेवून सर्व देशोदेशी, शहरोशहरी, गल्लोगल्लीतून स्वतंत्रपणे, धर्माधिका-यांच्या शिव्याशापास न जुमानता आणि प्रत्यक्ष राजाचाही प्राणांत छळ सोसून नवीन नवीन धर्मसंघाची संस्थापना केली. आधी रोमच्या शिरजोर मठाधिका-यास रजा दिली. पुढे जेव्हा चर्च ऑफ इंग्लंड म्हणजे इंग्रजांचा राष्ट्रीय अथवा सरकारी धर्मसंघ इंग्लंडच्या राजाने बळकावला व नुसत्या विधिसंस्काराचेच अवडंबर माजून ख-या व स्वतंत्र धर्मसाधनांत व्यत्यय येऊ लागला, तेव्हा ह्या मजबूत हाडांच्या लोकांनी आपल्या आवडत्या राष्ट्रीय संघालाही रामराम ठोकला आणि नॉनकनफॉर्मिस्ट म्हणजे विभक्त समाज स्थापिले, तेथेही जेव्हा प्रेसबिटर्स म्हणजे अधिकारारूढ वडील माणसांनी धुमाकूळ माजविला, तेव्हा ह्यांनी काँग्निगेशनेलिस्ट लोकसत्तात्मक समाज स्थापिले. त्यातही मताचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेना म्हणून युनिटेरिअन अथवा एकेश्वरी समाज निघाला. त्यातही जेव्हा जेव्हा मताविषयी किंचित दुराग्रह दिसतो तेव्हा प्रसिद्ध माहितीप्रमाणे फ्री ख्रिश्चन्स म्हणजे केवळ स्वतंत्र ख्रिस्तानुयायी म्हणविणारे निघतात आणि शेवटी रेव्ह. चार्लस व्हायसे हे तर आपल्यास नुसते ईश्वराचा अनुयायी म्हणवून एक निराला केवळ थिईस्टिक चर्च म्हणजे ब्राह्मसमाज चालवीत आहेत. असो. ह्याप्रमाणे कॅथोलिकापासून ब्राह्मसमाजापर्यंत परंपरा येऊन पोहोचली तरी नव्य जुन्या संघांतून जे कार्य होत आहे ते वर सांगितल्याप्रमाणे लोकशिक्षणाचे, लोकसंग्रहाचे, संसारिक फायद्याचे आणि तद्वारा आत्मिक संतोषाचेच होत आहे. केवळ तर्कवितर्क, कर्मठपणा किंवा जातीजातींनी परस्परावर आपली श्रेष्ठता शाबीत करण्याचे ओंगळ प्रकार फार कमी होतात. प्रख्यात मुक्तिफौजेच्या संघाची नुसती मते जर पाहू गेले तर ती जुनी आणि टाकाऊ दिसतील. त्यांतील काही भाविक सेवेक-यांच्या विश्वासाची मजल केव्हा इतकी पोहोचते की, उद्या सकाळी खात्रीने योहानाच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे येशू आपले स्वर्गीय राजदंड घेऊन खाली उतरणार असे मानून बिचारी झोपी जातात. ह्या विश्वासाची किंमत काही असो, मुक्तिफौजेचा संघ जे लोकसेवेचे कार्य दरोबस्त पृथ्वीवर रात्रंदिवस करीत आहे, त्याचा मासला आम्हांला तुकारामाच्या नुसत्या शब्दांत मात्र आढळतो.

जे का रंजले गांजले| त्यासि म्हणे जो आपुले||
ज्यासि आपंगिता नाही| त्यासि धरी जो हृदयी||

असो, ह्याप्रमाणे पाश्चात्य देशांतील जुने नवे धर्मसंघ कार्य करीत आहेत म्हणून त्यांचे लोकांवरचे वजन मुळीच कमी न होता उलट वाढत आहे आणि ह्याचा पुरावा इतकाच बस्स आहे की ह्या संघांना लोकांकडून पैशाची व अंगमेहनतीची जितकी विपुल व जशी खुशीने मदत मिळत आहे, तशी बोअर युद्धात ब्रिटिश सरकारला पैसे देऊ करूनही मिळाली नाही! तात्पर्य इतेकच की, धर्मसंघच इतर सर्व संघांना पोसणारा आहे. राष्ट्राचे भावी मुत्सद्दी, भावी वीर, भावी कवी, आणि इतर महात्मे ह्यांच्या शीलाचा विकास बाळपणी धर्मसंघातच होतो. ज्या देशात धर्मसंघ मृतप्राय झालेले आहेत किंवा जे शिल्लक उरलेले आहेत, त्याची सर्व करामत भोळ्या भाबड्यांची माया परोपरी जळवाप्रमाणे शोषून घेण्यातच खर्चत आहे, त्या देशात वीर पुरूष निर्माण होत नाहीत आणि झाले तरी राष्ट्रामद्ये मुळी शीलाचीच वाण असल्यामुळे, त्यांना जोमाचा अनुयायीगण मिळत नाही. त्यांच्या ईर्षा आणि मनोरथ जागच्या जागी निवतात व त्यांची वाढ खुंटते. शेवटी ते उरी फुटून अकाली लय पावतात आणि त्यांच्या हातून जे मोडके तोडके कार्य झाले असेल, त्याचे योग्य स्मारक करण्याचाही जोम पुढच्या पिढीत राहत नाही. बंधूंनो, ह्यासाठी धर्मसंघाची अगदी आवश्यकता आहे.