देशभक्ती आणि देवभक्ती

धर्माचे कार्य शिरावर घेऊन आम्ही बाहेर निघतो तेव्हा आम्हांस नानाप्रकारची माणसे भेटतात. आणि त्यांच्याकडून आमच्यावर विविध प्रकारचे व केव्हा केव्हा तर अगदी विलक्षण आक्षेप घेण्यात येत असतात. त्यांपैकी असा एक आक्षेप
ब-याच वेळा अगदी स्पष्टपणे करण्यात आला आहे की, “काय हो तुम्हांला ही दुर्बुद्धी सुचली ! हल्लीचा काळ कोण चणचणीचा, चहूंकडे क्रांती किती झपाट्याने चालली आहे. इतर देश मी पुढे की तू पुढे अशी धूम ठोकीत आहेत, त्यात आमची कशी पिछेहाट होत आहे, अशात तुम्ही काय ह्या हरी भजनाच्या नेभळ्या गोष्टी सांगावयास निघाला आहा ! अहो, ही शांतीच्या वेळची कामे. तळीराम गार असल्यासच हे विचार सुचावेत, पण तुमचा तरी काय इलाज ! बुडत्याचा पाय खोलातच जावयाचा !!” सभाजनहो ! रामाची थोरवी गाण्याकरिता जसे रावणाच्या सामर्थ्याचे बळेच अवडंबर माजवावे, तद्वत केवळ हाणून पाडण्याच्या हेतूनेच मी हा वरील आक्षेप कल्पनेने आपल्यापुढे मांडिलेला आहे असे आपल्यापैकी साहजिक धार्मिक वृत्तीच्या ब-याच जणांना वाटण्याचा संभव आहे, पण तसा प्रकार नसून, खरोखरच असा आक्षेप अनेक वेळां आम्हांवर आला आहे. इतकेच नव्हे, तर तो इतक्या जोराने, उघडपणे व प्रामाणिकपणे आला आहे की, त्यावेळी आम्हांला केवळ नम्र होऊन ह्या आवेशाच्या लाटेला दूर जाऊ द्यावे लागले आहे. आता थोडासा विचार केल्यास दिसून येईल की, धर्माविषयी भलतेच ग्रह करून घेतल्यामुळे हा आक्षेप असा उपस्थित होत आहे. धर्मासंबंधी पहिली गैरसमजूत ही की, धर्म म्हणजे हल्ली जगात जे हजारो परस्परविरोधी पंथ माजले आहेत, त्यांतलाच एक कोणता तरी आपला म्हणून घेतलेला पंथ. इतकेच नव्हे तर त्या पंथात चालू असलेली अनेक बाह्यकर्मे आचार इत्यादी. दुसरी गैरसमजूत मोठा तात्विक विचार करूनही होण्यासारखी आहे ती ही की, धर्म म्हणजे केवळ निवृत्ती, (फुट नोट – सोलापूर येथील रिपन हॉलमध्ये युवराजांच्या सन्मानार्थ ता. ११-१०-१९०५ रोजी झालेल्या रोषणाईच्या वेळी दिलेले व्याख्यान.) जगत् सर्व मिथ्या आहे, आपली इंद्रिये ही भामट्याप्रमाणे आम्हांला फूस लावून भलत्याच मार्गाने ओढीत असतात. शहाण्यांनी ह्यांचा नाद सोडून अगदी स्वस्थ राहण्यास शिकावे, हाच अखेरचा पुरुषार्थ. ह्याप्रकारे व्यवहाराच्या बाजूने शुष्क कर्मठपणाचा व विचाराच्या बाजूने उदासीन निष्क्रियतेचा आरोप धर्मावर झाल्यास वरील विलक्षण आक्षेप निघावा ह्यात नवल ते काय ? कर्मठपणा व निष्क्रियता ह्या दोहोंच्या दरम्यान असणारा, आमच्या सर्वमान्य भगवद्गीतेत ठामपणे प्रतिपादिलेला कर्मयोग म्हणजेच धर्म, असे विरळा समजून येते. आणि हा कर्मयोग काही केवळ ज्ञानाने साधत नाही. आधुनिक शोधांच्या द्वारे विश्वाविषयी कितीही सम्यक् ज्ञान झाले, जड सृष्टीत नियमांचे कसे अबाधित साम्राज्य चालू आहे व तीच नियामक शक्ती जीवनसृष्टीचाही हळूहळू कसा विकास करीत आहे, प्रबुद्ध जीवात्म्यास तीच शक्ती कसे स्वातंत्र्य देते, पुन्हा त्याच स्वातंत्र्याचा बली ह्या विश्वयज्ञात अर्पण करण्यास म्हणजे विश्वातील भौतिक आणि नैतिक नियम हेच विश्वनियंत्याच्या ज्या इच्छा त्यांना केवळ अनुसरूनच जीवांनी आपल्या सर्व इच्छा दाखवाव्यात असाही शेवटी उपदेश अंतःकरणात त्याच आदिशक्तीकडून कसा होतो इत्यादी जरी निर्भ्रांत ज्ञान झाले, तरी वर सांगितलेला कर्मयोग साधत नाही. तो साधावयास ह्या आदिशक्तीचे अधिष्ठान जो ईश्वर त्याचे ठायीच केवळ भक्ती बाणली पाहिजे, म्हणून देवभक्ती हा विषय आजच्या व्याख्यानात येणार आहे.

पण आजचा प्रत्यक्ष प्रसंग काही देवभक्तीचा नव्हे, तर देशभक्तीचा होय. आम्ही जे येथे आज जमलो आहो, ते ईश्वरोपासनेकरिता नव्हे तर आमच्या ऐहिक स्वामीच्या सत्कारार्थ. चोहींकडे प्रकाशाचा लखलखाट करून ही जी आम्ही आरती ओवाळीत आहो ती देवाजीस नव्हे तर आमच्या भावी देशपतीस; अर्थात आमच्या देशकल्याणाची ही आरती आहे. युवराज हा आमच्या अदृश्य देशकल्याणाची दृश्यमूर्ती होय. त्याच्या जिवास अपाय किंवा बुद्धीस भंग झाल्यास आमच्या देशकल्याणास धोका आहे. युवराज जर आमचा देशपती नसता तर तो आला काय गेला काय आम्ही आज येथे मुळीच जमलो नसतो. पण तो आमचा स्वामी असल्याने त्याचा सत्कार करणे ही आमच्या देशाची एक सेवा आहे. तेव्हा अशा शुभप्रसंगी देशसेवेचा उत्तम मार्ग कोणता व त्याचा देशसेवेशी काय संबंध आहे हे पाहणे अत्यंत उचित आहे.

प्रथम हल्ली आपली देशस्थिती कशी आहे ती पहावी. प्लेग, दुष्काळ इत्यादी ज्या आधिभौतिक व आधिदैविक अनिष्ट परंपरा आम्हांवर ओढवत आहेत, तीविषयी येथे विचार करावयास नको. कारण ही अनिष्टे काही कायमची नाहीत. पण आमच्यातील आध्यात्मिक उणीव मात्र आम्ही सतत लक्षात बाळगली पाहिजे. इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, अमेरिका इ. जे पुढारलेले देश आहेत, त्यांच्यात राष्ट्रीय ऐक्य कसे अपूर्व दिसून येत आहे व तेच त्यांच्या सुसंपन्नेचा भक्कम पाया आहे. पण आमचा देश अद्यापि राष्ट्र ह्या नावालाही योग्य झाला नाही. जरी हळूहळू राष्ट्रीयत्व येथे बनत चालले आहे, तरी इतरांच्या मानाने ते फारच अपूर्ण आहे. सुखदुःखाच्या प्रसंगी युरोपातील काही राष्ट्रांचे वर्तन जणू एकाद्या व्यक्तीच्याच वर्तनासारखे एक धोरणाने झालेले माझ्या स्वतःच्या नजरेस आले आहे. प्रसंगास सहाध्याय, सहानुभूती व सहकार्य ही तिन्ही पूर्णपणे त्यांच्यात दिसून येतात. पूर्वी भरतभूमीत नवीन वसाहत करणा-या आर्य राष्ट्रांचीही हीच स्थिती असावी असे दिसते. तैत्तिरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्लीच्या व भृगुवल्लीच्या प्रारंभी व समाप्तीस –
सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु माविद्विषावहै ।।

हे वचन आढळते, ते त्या काळचे ब्रीदवाक्यच असावे असे दिसते. “आम्ही परस्परांचे संरक्षण करू, सहभोजन करू, मिळून वीरश्री संपादू, तेजस्वी असे अध्ययन करू आणि कोणाचाही द्वेष करणार नाही” असा ह्या उदात्त ब्रीदाचा अर्थ आहे. पण हल्ली ह्या ब्रीदाच्या व आमच्यामध्ये जमीनअस्मानाचे अंतर पडले आहे. तर अशा स्थितीत आमचे देशसेवेचे आद्य कर्तव्य म्हणजे राष्ट्रीय ऐक्य वाढविणे हे होय. पुढील सर्व कर्तव्यांचा हा पाया आहे. तो नीट न घातल्यास पुढील इमारत उठणारच नाही, किंवा कदाचित उठल्यास फार वेळ टिकणार नाही.

आता ही गोष्ट किती असामान्य आहे बरे ? एवढ्या मोठ्या देशाचे किंबहुना खंडाचे एकराष्ट्र बनणे व त्याचा एकजीव होणे म्हणजे सर्व मानवी इतिहासातील एक अपूर्व प्रसंग होय. ह्याच देशात नव्हे तर दुसरीकडे कोठेही व कधीही एवढ्या मोठ्या जनसमूहाचा व इतक्या विविध व विचित्र प्रकृतीचा एकजीव झालेला आढळत नाही. तर आपण पूर्वी कधी ह्या राष्ट्रीय दृष्टीने एका उच्च पदावर होतो व आता खाली आलो आहो अशी खोटी समजूत करून घेऊन आहे तोही उत्साह घालविण्याची ही वेळ नव्हे, तर मानवजातीच्या समष्टिजीवनाची एक नवीनच व उच्च पायरी आम्ही भारतीयांनी चढावी अशी नारायणाने योजना रचली आहे, तिला आम्ही आनंदाने व धैर्याने साधनीभूत झाले पाहिजे. ह्या कामी केवळ मानवी बुद्धीचे बळ अपुरे होत आहे. देवभक्तीचाच जोराने उदय झाला पाहिजे. जणू काय एका नवीन धर्माचीच स्थापना झाली पाहिजे. एवढे मोठे देशकार्य जर खरोखरीच व्हावयाचे असेल, तर त्यात ते पुढारी झाले असतील व होणारे असतील त्यांच्यात काही अपूर्व गोष्टींचा संचार व्हावयास पाहिजे. जे देवऋषी ह्या महायज्ञाचे अध्वर्युस्थान पत्करणार असतील त्यांचा –
उंची देवाचे चरण । तेथे झाले अधिष्ठान ।।
येथूनिया ठाव । अवघे लक्षायाचे भाव ।।

असा उदात्त भाव झाला पाहिजे; तरच हा विशाल कर्मयोग सिद्धीस जाणार आहे. एरवी कोत्या दृष्टीच्या व हलक्या वृत्तीच्या माणसांनी कितीही ओरड केली किंवा आपल्याच केवळ बुद्धिसामर्थ्यावर उद्दामपणे अवलंबून राहणा-या शूर पण श्रद्धाशून्य पुरुषांनी, किंवा ज्यांच्या अंतःकरणात आशेचा जिवंत झरा वाहत नसून बाहेरून येणा-या असंख्य विघ्नांना एकाद्या पर्वताप्रमाणे जे पाठ देऊन आहेत, अशा धीर वीरांनी किती जरी बाह्य प्रयत्न केले, तरी ह्या महाराष्ट्राची उभारणी होणे दुरापस्त आहे. देशभक्त होणारांनी देवभक्तच आधी झाले पाहिजे—नव्हे असले पाहिजे.

अशा प्रकारची देशसेवा आमच्या देशपतीलाही मान्य आहे व व्हावयाला पाहिजे. ती न करिता आम्ही जर नुसते आमच्या युवराजासमोर तेलवातीचे दिवे ओवाळिले, तर ही एक अत्यंत ग्राम्य मूर्तिपूजाच होणार आहे. धार्मिक मूर्तिपूजेने आमचे झाले आहे तितके नुकसान पूरे आहे. त्यात राजकीय मूर्तिपूजेची भर घालावयास नको. ह्या प्रकारे आम्ही सर्व भारतवासी एक होऊन एकमनाने, एकदिलाने आणि अनन्य भावाने युवराजास सामोरे जाऊन त्याचे स्वागत करू आणि म्हणू की, हे आर्यपुत्र, तू ईश्वराने पाठविलेला आमचा नायक आहेस; आमचा भूदेव आहेस; तुझ्या छत्राखाली आम्ही सर्व एक झालो आहो; ही आमची एकी तू राख आणि पुढील दैवी कार्यात तूच आमचे नायकत्व पत्कर. चिरायू हो, चिरस्मरणीय हो, तू ज्या सर्व कर्माध्यक्ष ईश्वराचा ऐहिक प्रतिनिधी आहेस त्याचा जयजयकार असो ! तरच ह्या आमच्या स्वामीचे खरे स्वागत. नाही तर केवळ अंधपरंपरा अथवा जुलमाचा रामराम !