धर्म आणि व्यवहार

केसी दिसो बरी| आम्ही आळविता हरि||१||
तुका म्हणे देवा-ऐसी झालो करिता सेवा||२||

सर्व विश्वातील व्यवहाराची मूळशक्ती जो परमेश्वर त्याला आळविल्याने म्हणजे त्याच्या धोरणाकडे लय लावल्याने आम्ही कशी उत्तम दिसू? फार काय पण, त्या शक्तीची सेवा करू तर-म्हणजे तिला अनुसरून आपले सर्व लहानसहान व्यवहार करू तर—आमच्यातील जी लहानशी प्राणशक्ती आहे ती ‘देवा-ऐशी’ म्हणजे त्या विश्वशक्तीप्रमाणेच मंगलकारक आणि समर्थ होईल? हा तुकारामांचा उद्गार आहे. तो आम्हांला किती पटतो ते पाहू.

वेळोवेळी आमच्या मनामध्ये उचंबळणा-या धार्मिक प्रवृत्ती आणि संसारामध्ये आमच्या हातून नित्यश: घडणारे व्यवहार ह्या दोन गोष्टी परस्परांपासून अगदी स्वतंत्र राखाव्या किंवा त्यांची भेसळ होऊ द्यावी ह्याविषयी पुष्कळांचा बराच मतभेद होतो. एक पक्ष म्हणतो आम्ही आपल्या धार्मिक प्रवृत्तींचा विकास स्वतंत्रपणे करून घ्यावा हे बरे. आपल्या धर्मसमजुती आम्ही आपल्याशीच ठेवाव्या फार तर आपल्या खासगी वर्तनाशी त्यांचा संबंध आणावा. पण आपल्या सार्वजनिक वर्तनाशी व कर्तव्याशी त्यांचा संबंध आणणे हे फार धोक्याचे व चुकीचे आहे. राजकारण, समाजबंधन, उद्योग,व्यापार, लोकशिक्षण इत्यादी मनुष्यांच्या सार्वजनिक व्यवहारांचे सुधारलेल्या देशांतून झपाट्याने बदलत चाललेले धोरण पाहिले असता सहज एक गोष्ट बिनचूक लक्षात येते, ती ही की, ह्या सर्व व्यवहारातून धर्मसंस्थांचा संबंध आणि धर्म समजुतींचा पगडा एकसारखा कमी कमी होत आहे. हा घटस्फोट कोठे कोठे जुलूमजबरीने, कोठे कोठे हाशीखुषीने तर कोठे कोठे अगदी नकळत आपोआप स्वाभाविक कारणांनीच होत चालला आहे. ह्यावरून हा पक्ष म्हणतो की, धर्मसंस्थांची आणि इतर संस्थांची फारकत होणे हेच इष्ट आणि अवश्य आहे. दुसरा पक्ष म्हणतो की, ह्या दोहोंमध्ये सांगड असावी. ह्या दोन्ही मतांचा इतिहास थोडक्यात असा आहे. धर्माच्या बाह्य आचारांचे प्राबल्य संसारातील सर्व व्यवहारावर वाजवीपेक्षा जास्त वाढून संसारात वेळोवेळी हरकती येऊ लागल्या आणि त्याची प्रगती खुंटली, ह्यामुळे वरील पहिला पक्ष अस्तित्वात आला. पण त्याचा अतिरेक दिसू लागल्यामुळे तडजोड करण्यासाठी हा दुसरा पक्ष उत्पन्न झाला. परंतु वस्तुत: पाहता धर्म आणइ व्यवहार ही स्वतंत्र ठेवावीत किंवा त्यांची सांगड घालावी असे म्हणणा-या दोहों पक्षांसही ह्या दोहींचा अर्थ नीट कळला नाही असे दिसते. ह्या दोहींची सांगड घालावयाची असे म्हणण्यामध्येही, ही दोन्ही स्वतंत्र ठेवावी असे म्हणण्याप्रमाणेच, ही दोन्ही परस्पर भिन्न आहेत, असा ध्वनी निघतो. ही दोन्ही तर मुळीच भिन्न नाहीत. जसे, निरनिराळ्या भोपळ्यांची त्यांना दोरीने एकत्र करून सांगड न घालता पोहणारा त्यांना घेऊन पोहू लागला तर ओघाबरोबर ते चोहीकडे वाहू लागून पोहणारा मध्येच बुडण्याचा संभव आहे, तसे धर्म आणि व्यवहार हे दोन भोपळे निराळे आहेत आणि त्यांना सांगड घालून एकत्र केल्याने आपल्याला सुरळीत पोहता येईल, अशातला प्रकार नाही. असे समजले म्हणजे आपल्या जीवनाची-राजकारण, समाजबंधन, उद्योग, व्यापार आणि लोकशिक्षण ही जशी निरनिराळी खाती आहेत त्यांतच धर्म हे एक वेगळे खाते आहे.

आणि त्यामध्ये काही विशेष जादू आहे, ती जादू त्या खात्याचा निरनिराळ्या खात्यांशी संबंध लावून दिल्याने त्या सर्वांमध्ये शिरून सर्व संसारयंत्र सुरळीत चालेल असे समजणे होय. पण हा भ्रम आहे. धर्म हे निराळे एक खाते मुळीच नसून व्यवहाराच्या निरनिराळ्या सर्व खात्यांच्या तळाशी, मध्ये आणि शेवटी व्यापून रहाणारी आपल्यामधील ही वृत्ती आहे. शरीरात सर्व अवयवांमध्ये प्राण जसा शिखाग्रापासून नखाग्रापर्यंत व्यापून राहतो—तो जसा एक निराळाच अवयव नाही किंवा त्याचे एक शरीरामध्ये विशिष्ट स्थान नाही-तद्वत आमच्या व्यवहारात सर्वत्र निरंतर व्यापून राहणारी एक वृत्ती आहे. हिचा जसजसा दर्जा आणि जितका जितका जोर असतो तसतसे आमच्या सर्व व्यवहारांचे रंगरूप बदलत जाते.

ही वृत्ती मनुष्याचेच तेवढे सर्व व्यापार व्यापून आहे. मी परवा आमच्या निराश्रित साहाय्यकारी मंडळीची मनमाड येथील शाळा पहावयास गेलो होतो. तेथे प्रात:काळी ईश्वरोपासनेचा प्रसंग आला. मुलांनी शाळेची झोपडी झाडून निटनेटकी केली होती. मध्यभागी एक लहानशी वेदी ठेवून तिच्यावर शुभ्र वस्त्र टाकले होते. झोपडीभोवतालच्या बागेतून रंगीबेरंगी ताजी फुले आणून वेदीवर पसरली होती. आमच्या उपासनेस सुरूवात झाली. माझे लक्ष वेदीवरील फुलांकडे गेले तो तेथे एक कोळी आपले जाळे विणीत होता असे दिसले. आमचे उद्वोधन, स्तवन आणि प्रार्थना संपून उपदेशाची वेळ येईतोपर्यंत कोळ्याने वेदीचा पृष्ठभाग उतरण आणि आसमंतातील भाग ह्यांवर पसरलेल्या सर्व फुलांवरून आपले विस्तीर्ण जाळे पसरून फुलांच्या वासाने येणा-या लहान माशा आणि चिलटे ह्यांची मार्गप्रतीक्षा करीत तो स्वस्थ बसला होता आणि मुले उपदेशाची वाट पहात बसली होती. आता ह्याहून उपदेशाला अधिक योग्य विषय तो कोणता असणार! आम्ही उपासना करीत असताना आमच्यासमोर प्रत्यक्ष आमच्या वेदीवर जाळे पसरणा-या कोळ्याच्या व्यवहाराला जी वृत्ती कारणीभूत झाली होती ती, त्याचा धर्म आणि उद्वोधन, स्तवन आणि प्रार्थना करून ईश्वराकडे लय लावणा-या आमच्या व्यवहाराला कारणीभूत झालेली उच्च वृत्ती ती आमचा धर्म. ह्याप्रमाणे सत्त्वानुसार अधिकाधिक भिन्नभिन्न उन्नत व्यवहाराला कारणीभूत होणारी अधिकाधिक निरनिराळी खोल आणि विकसित वृत्ती असते. हाच धर्माचा आणि व्यवहाराचा अर्थ व त्याचा परस्पर अभेद्य संबंध आहे, हा त्या कोळ्याच्या उदाहरणावरून वस्तुपाठ माझ्याभोवती आतुर होऊन बसलेल्या अर्थिकांना मी दिला.

ह्यावरून मनुष्यप्राण्यामध्ये इतर खालील सर्व प्राण्यांचे प्रतिबिंब प्रसंगवशात दिसून येत आहे. खालपासून वरपर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार तो निरनिराळ्या प्रसंगी करीत असतो. आणि त्या निरनिराळ्या व्यवहारांत त्याची निरनिराळी वृत्ती व्यापून असते. म्हणजे तितके उच्च-नीच धर्म प्रसंगवशात त्याच्यामध्ये वावरत असतात.

पण त्या उच्च-नीच धर्माचे तारतम्य जाणण्याचीही आमच्यामध्ये शक्ती असते. तिच्याद्वारे आमच्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये फरक पडत जाऊन हेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होणारे अनुसंधान आम्ही कायम राखल्यास शेवटी तुकारामाने म्हटल्याप्रमाणे “देवा-ऐशी झालो” असे आमच्या अनुभवास येईल.