प्रकरण १०. विविध प्रयत्न (2)

१९०३ सालच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्यें मी विलायतेहून परत आल्याबरोबर महाराजसाहेबांनीं मला आपणांस भेटावयास बोलाविलें, आणि बडोदें शहरांतील चार शाळा तपासण्यास सांगितल्या वगैरे मजकूर मागें आलाच आहे. एकंदरींत ह्या थोर पुरुषाच्या अंतःकरणांत ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता; हें माझ्या ध्यानांत तेव्हांच येऊन चुकलें. इतकेंच नव्हे तर ह्या महत्वाच्या विषयासंबंधीं माझ्या स्वतःच्या विचाराला नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्म समाजाच्या अखिल भारतांतील माझ्या प्रचारकार्याबरोबर ह्या लोकांची निरनिराळया प्रांतांतील स्थिति स्वतः डोळयांनीं नीट निरखून अजमाविण्याची मलाहि प्रेरणा झाली. १९०४ सालीं मुंबई येथें राष्ट्रीय परिषदेच्या अधिवेशनाबरोबर सामाजिक परिषदेचें अधिवेशन झालें. त्यावेळी एकेश्वरी परिषद भरून राममोहन आश्रमांत श्रीमंत महाराजांनीं प्रीतिभोजनांत भाग घेऊन आमच्याशीं सहकार्य केलें, हें मागें सांगितलें आहे. या सामाजिक परिषदेचा महाराष्ट्रावर व विशेषतः पुण्यांतील कार्यकारी पुढा-यांवर जसा शुभ परिणाम झाला तसाच महाराजांच्या उत्साहशक्तिवरहि झालेला दिसतो. लगेच दोन तीन वर्षांत पुणें, मुंबई येथें सर्व्हंट्स् ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हिस लीग, सेवासदन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सारख्या अखिल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनावर परिणाम करणा-या संस्थांचा उद्भव झाला. उलट पक्षीं याच सुमारास श्रीमंत महाराजांनींहि आपल्या राज्यांत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास करून राष्ट्रीय शिक्षणाचा धडा इतर लहान मोठया संस्थानांसच नव्हे तर प्रत्यक्ष इंग्रज सरकारासहि घालून दिला. बडोद्याच्या इतिहासांत हें साल सोन्याच्या अक्षरांत लिहिलें जाईल. बडोद्यांत सक्तीच्या शिक्षणाचें प्रस्थान मांडल्यावर उसळीसरशी अंत्यज शाळांची संख्या १८ ची २४७ आणि विद्यार्थ्यांची संख्या २००० ची ९२६९ झाली. बंद केलेल्या वसतिगृहांची पुन्हा गरज भासूं लागली. लौकरच अंत्यजांच्या सुदैवानें आर्यसमाजी पं. आत्माराम ह्या तरबेज आणि वाहूक घेतलेल्या कार्यवाहकाची जोड मिळाली. १९०७-८ च्या सुमारास हल्लींचें नांवाजलेलें बडोद्याचें अंत्यज विद्यार्थी वसतिगृह उघडण्यांत आलें. पंडितजींना त्याचे सुपरिंटेंडेंट व बडोदें राज्यांतील अंत्यजांच्या शिक्षणाचे इन्स्पेक्टर नेमण्यांत आले. याच सुमारास महाराजांनीं मला बडोद्यास पुन्हा बोलाविलें. न्यायमंदिराच्या भव्य दिवाणखान्यांत एक जंगी दरबारवजा जाहीर सभा बोलावून महाराजांनीं स्वतःच्या अध्यक्षत्वाखालीं माझें “अस्पृश्योद्वार” ह्या विषयावर व्याख्यान करविलें. हेंच व्याख्यान मला पुरें लिहून काढावयास सांगून ‘बहिष्कृत भारत’ या नांवानें तें प्रसिध्द झाल्यावर त्याच्या १०००
प्रती बडोदें दरबारनें विकत घेतल्या. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम बडोद्याच्या कार्यावर होऊन पंडित आत्मारामांच्या देखरेखीखालीं त्याला मोठा जोर आला.

डॉ. आंबेडकर ह्या अस्पृश्य वर्गाच्या प्रसिध्द पुढा-याला महाराजांचा मोठा आश्रय होता. बडोदा कॉलेजांतून ते बी. ए. झाल्यावर महाराजांनीं त्यांना अमेरिकेंत दरबारच्या खर्चानें कित्येक वर्षें ठेवून पीएच्. डी. करवून आणले. बडोदें शहरांतील चार वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊनच न थांबता त्यांच्या धार्मिक शिक्षणाचीहि उत्तम सोय करण्यांत आली आहे. गुजराथेंतील अंत्यज वर्ग आपापलीं धार्मिक गृहकृत्यें आपल्याच जातीच्या पुरोहिताकडून करवून घेत असतात. यांना गरोडा म्हणतात. या गरोडयाकडून धर्मकृत्यें योग्य रीतीनें व्हावींत म्हणून त्यांच्यासाठीं एक संस्कृत शाळा काढण्यांत आली आहे. आणि त्यांत २५ गरोडा विद्यार्थ्यांना दरमहा ८ रुपये शिष्यवृत्या देऊन तयार करण्यांत आलें. वसतिगृहांतील सर्व विद्यार्थ्यांना वेदमंत्रासह नित्याची उपासना करण्यास शिकविण्यांत येतें. शिवाय त्यांचीं दोन बालवीर पथकें आहेत.

पुढें दुमदुमत राहिलेल्या मंदिरप्रवेशाच्या दंगलींतहि ह्या पतितपावन महाराजांनीं आघाडी मारून सरशी मिळविली आहे. मंदिरप्रवेशाची चळवळ सुरू होण्यापूर्वीच महाराजांनीं आपलें खंडेराव मंदिर अस्पृश्यांस खुलें केलें आणि ही चळवळ सुरू झाल्यावर १९३२ च्या ऑक्टोबर महिन्यांत सर्व हिंदुधर्मियांस जातगोत मनांत न आणतां सरकारी देवळांत प्रवेश करूं द्यावा व तसें करण्यास खाजगी देवळांच्या मालकांचीं मनें वळवावीं, अशा आशयाचा महाराजांनीं युरोपांतील लोझानहून तारेनें हुकूम पाठविला. संकटें हीं कार्यसिध्दीचीं मापेंच होत अशी खूणगांठ मनांत बांधून समाजधुरीणांनीं सतत वागलें पाहिजे. महाराजांनीं असें केलें म्हणूनच त्यांना अपूर्व यश लाभले.

कर्नल ऑल्कॉट, थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष, यांनीं अस्पृश्यता निवारणाचा उत्तम उपाय म्हणून मद्रास शहरीं आपली पहिली शाळा १८९४ सालीं एका झोंपडींत काढली. दुसरी १८९८ त व तिसरी १८९९ त उघडली. या सर्व शाळांतून मिळून ३८४ मुलगे व १५० मुली आणि १६ शिक्षक होते. चवथ्या इयत्तेपर्यंत तालीम, हिशेब, व्यावहारिक इंग्रजी हे विषय शिकविण्यांत येत. त्यांच्या धर्मांत मुळींच हात घालण्यांत येत नसे. १९०३ सालीं मीं स्वतः मद्रास शहरीं सोसायटीच्या ४ शाळा पाहिल्या. तेथें किंडरगार्टन पध्दतीचें नमुनेदार शिक्षण मीं पाहिलें. एक तज्ज्ञ स्विस बाई फारस कळकळीनें देखरेखीचें काम खुशीनें करीत होती.

मद्रास इलाख्यांत विशेषतः पश्चिम किना-यावर मलाबारांत अस्पृश्यांचे हाल कल्पनातीत आहेत. अस्पृश्यतेची गोष्ट राहोच पण वरिष्ठ जातींच्या व्याक्तिंपासून ६०-७० फुटाच्या अंतरावर येण्यास अद्यापि मनाई आहे. म्हणून ह्या प्रांतीं सर्वांच्या मागून ह्या कामास सुरुवात झाली. मंगळूर ब्राह्मसमाजाचे चिटणीस रा. सा. के. रंगराव यांनीं मंगळूर येथें आपली पहिली शाळा १८९७ सालीं काढली. त्यापूर्वीं लोकमत तयार करण्यासाठीं “पंचम लोकांची गा-हाणीं” (Wrongs of The Panchamas) ही लहानशी चोपडी इंग्रजींत त्यांनीं प्रसिध्द केली. तींत त्यांनीं ह्या लोकांचीं हृदयद्रावक दुःखे वर्णिलीं आहेत. ह्या कामीं रंगरावांना आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांकडून अनन्वित छळ सोसावा लागला. रंगराव हे स्वतः सारस्वत जातीचे असून त्यांच्या कुटुंबाला कुटाळ लोक “पंचमती” असें उल्लेखित. ह्या छळाला न जुमानतां १० वर्षांत त्यांनीं बरीच प्रगति केली. सरकारच्या मदतीनें त्यांना ह्या अवधींत ह्या संस्थेसाठीं विस्तीर्ण जागा व इमारत, उद्योग शाळा आणि वसाहतीसाठीं सुमारें २० एकर शेतकीची जागा इतकी सामुग्री संपादन करतां आली. १९०७ च्या सुमारास मी मंगळुरास ब्राह्म समाजाच्या कामासाठीं गेलों तेव्हां मीं ही मंगळुरची संस्था आमच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळींत शाखा म्हणून संलग्न करून घेतली. तेव्हांपासून पुढें तिची बरीच भरभराट आणि विशेष प्रसिध्दि झाली.

ब्रिटिश सरकार व ख्रिस्ती मिशनें यांनीं अस्पृश्यांची स्थिति सुधारण्यासाठीं जे कांहीं प्रयत्न केले ते प्रसिध्दच आहेत. यांच्या मार्गांत अडथळा काय तो नोकरशाहीची नबाबी पध्दति आणि मिशन-यांचें धर्मांतराचें वेड एवढाच होता. बाकीं साधनें भरपूर होतीं. हे अडथळे नसते तर दोघांच्या हातून निदान हिंदुस्थान सरकारच्या एकाच्या हातून तरी हा अस्पृश्यतेचा प्रश्न लवकर सुटला असता. मद्रासेकडील ख्रिस्ती मिशनांच्या विशेषतः रोमन कॅथॉलिक पंथांच्या पध्दतींत तर उघड उघड अक्षम्य दोष मला दिसले. ते हे कीं, जातिभेदाचें निर्मूलन करण्याचें त्यांचें धर्मांत सांगितलें असूनहि केवळ आपली संख्या वाढावी ह्या कावेबाज हेतूनें त्या लोकांना ख्रिश्चन धर्मांत घेऊन पुन्हां त्यांना अति नीच अवस्थेंतच ठेवण्यांत आलें आहे. त्यामुळें त्यांना हिंदु धर्मास पारखे होऊन जातिभेदाचें व अस्पृश्यतेचें दुस्सह्य जुलूम सोसावे लागतात. ब्राह्मण ख्रिस्ती लोकांशीं मिसळून वागतां येत नाहीं. उपासनेसाठीं ख्रिस्ती देवळांतहि जाण्यास त्यांना मज्जाव आहे. मेरी माता, ख्रिस्त इत्यादि मूर्तीची पूजा अस्पृश्य वाडयांत सर्रास चालू आहे. त्याचे पुरावे मीं स्वतः दक्षिण देशीं त्रिचनापल्ली वगैरे ठिकाणीं हिंडत असतां पाहिले. ख्रिस्ती लोकांत हल्लीं जी राष्ट्रीय चळवळ चालू आहे ती कायम राहिली आणि हिंदुमहासभेसारखी चळवळ शब्दापलिकडे जाऊन कृतींत उतरली तर लवकरच हे ख्रिस्ती अस्पृश्य पुन्हां धर्मांतर करून हिंदु धर्मांत येतील असें वाटतें.

इंग्रज सरकारनें सक्तीचें शिक्षण देऊन शिकलेल्यांना मोठमोठया जागा देऊन ह्या लोकांना वर आणण्यांत आजवर जी अक्षम्य ढिलाई केली आहे ती केली नसती तर अस्पृश्यतेला ताबडतोब ओहोटी लागली असती. तथापि अशा बाबतींत परकीय नोकरशाही आणि परधर्मी कावेबाजी यांना पोकळ नांवें ठेवण्यापेक्षां सर्व दोन स्वकीयांनींच पत्करावा हें योग्य आहे.

आर्य समाज, ब्राह्म समाज, हिंदु समाज ह्यांतील कित्येक उदार गृहस्थांनीं अस्पृश्यता निवारण्याचे लहानमोठया ब-याच संस्था काढून ह्या कामीं पुष्कळ स्तुत्य प्रयत्न केले. म्हैसूर, निजाम, हैद्राबाद आणि इंदूर वगैरे मोठमोठया संस्थानांनीं आपल्या विद्याखात्यामार्फत अस्पृश्य वर्गाची शिक्षणविषयक तरतूद पुष्कळ केली. पण हे सर्व प्रयत्न भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे कामाचा बोलबाला झाल्यानंतर जी सहानुभूतीची व जागृतीची लाट देशावर पसरली, तिच्यामुळें झाले म्हणून त्यांचे उल्लेख पुढें योग्य स्थळीं करणें बरें.