कोणत्याहि एका मोठया समाज सुधारणेचें व्यापक कार्य हातीं घेतल्यावर कार्यपध्दतीचे ढोबळ दृष्टया दोन भिन्न प्रकार पडतात. विवक्षित आणि मर्यादित क्षेत्र घेऊन पध्दतीचें केंद्रीकरण आणि संघटन ही पहिली पध्दत. अमर्याद लोकसमाजाचें मत आणि वळण बदलणें व त्यासाठीं प्रचारकार्य करणें ही दुसरी पध्दत. पहिलीला सुवर्णकार पध्दति आणि दुसरीला मेघवृष्टि पध्दति असें संबोधितात. उदाहरणार्थ, सोनें, मोतीं, हिरे वगैरे अशोधित धातु घेऊन सुवर्णकार आपल्या कलाकुसरीनें त्यांचे अखेरीस उत्तम नग बनवितो तर दुस-या पध्दतींत अमर्याद क्षेत्रावर मेघानें वर्षाव केल्यामुळें अखेरीस उत्तम पीक येतें. हा पध्दतीचा भेद केवळ आधुनिक आहे असें म्हणतां येणार नाहीं. पुरातन काळीं मोठमोठे धर्मप्रसार झाले, धर्मबुध्दीच्या घटना झाल्या, सुधारणा झाल्या, त्यांच्या चालकांना या दोन्ही पध्दती स्वीकाराव्या लागल्या; ठिकठिकाणीं गुरुकुलें स्थापून आचार्यांच्या द्वारा धर्मबुध्दीची शिकवण दिली, पुरोहित नेमून धर्माचीं अनुष्ठानें, गृह्य अथवा सामाजिक संस्कार यांच्या द्वारें धर्माची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली ही पहिली पध्दत. निःसंग परिवाट, सतत संचार करणारे परमहंस संन्यासी नेमून त्यांच्या द्वारा वेळोवेळीं झोंपी जाणा-या लहानथोर जनतेला जागें करणें आणि कार्यप्रवण राखणें ही दुसरी.
अस्पृश्यतानिवारण हें मोठें जागतिक कार्य! खंडवजा भारतासारख्या विभूतिवाद देशसमूहावर ह्या कार्याचा प्रयोग करणें हें कांहीं लहानसहान कृत्य नव्हे, कार्य मोठें पण कार्यवाह लहान. पण विभूतीची वाट पहात बसण्याला अवसर कोठून आणणार. विभूतीची वाट पाहण्यांत बराच काळ अगोदरच लोटून गेला होता. लोकोत्तर विभूती आणि सामान्य माणसांची घटना ह्या दोहोंचें समाजशास्त्रदृष्टया विद्यार्थीदशेंत मीं थोडेबहुत आकलन केलें होतें. म्हणून विभूतिवादावरील माझा विश्वास किंचित् कमी होऊन सामान्य माणसांच्या घटनात्मक प्रयत्नाकडे माझा कल विद्यार्थीदशेंतच होऊं लागला होता. थॉमस कार्लाईलचा विभूतिवाद आणि हर्बर्ट स्पेन्सरचा सामान्य माणसांचा घटनात्मक प्रयत्नवाद ह्या दोहोंची तुलनात्मक मीमांसा मीं तरुणपणींच केलेली होती. म्हणून अस्पृश्यता निवारणाचे कामीं आधुनिक काळांत कोणी विभूति पुढें येत नाहीं आणि मी तर स्वतः अत्यंत सामान्य माणूस ही वस्तुस्थिति पाहून मी हताश झालों नाहीं. श्रध्देनें पर्वत हलतात ह्या ख्रिस्तोक्तीची प्रचिती पाहण्याची वेळ आली होती. श्रध्दा मग ती एखाद्या विभूतीची असो वा सामान्य माणसाची असो श्रध्दा ती श्रध्दाचा. तिनें ते पर्वत हललेच पाहिजेत. मात्र सामान्य माणसांची तशी घटना झाली पाहिजे. अपेक्षेप्रमाणें थोडाबहुत पैशाचा निधि जमल्यावर कामासाठीं योग्य माणसें जमा करूं लागलों. निधि जमवणें हें माणसाचें काम. पण माणसें मिळणें ही ईश्वरी देणगी. ह्या कामाला स्वार्थत्यागपूर्वक वाहून घेऊन काम करणारीं माणसें मिळणें कठीण जाऊं लागलें. वेतनाकडे लक्ष्य न देतां केवळ कार्यावर श्रध्दा ठेवून काम करणारीं माणसें पाहिजे होतीं.
अशा माणसांचेहि दोन प्रकार पडतात. सर्वसंगपरित्यागी हा संन्यासाचा पहिला प्रकार घरादारांची जबाबदारी असलेलीं, अरण्यांत जाण्यापेक्षां समाजांतच राहून गृहस्थाश्रम चालविणारीं, सामान्य माणसें हा दुसरा प्रकार. संन्यासी कामाला मिळाले असते तरी ते शिस्तींत बसणारे व चालणारे नसतात. ज्यांना घर करण्याचा अनुभव नाहीं त्यांना समाज वळविण्याचा अनुभव कोठून येणार ? तो अनुभव असला तरी तसले अनुभवी संन्यासी कोठून आणावयाचे ? असल्या संन्याशांची गांठ पडली नाहीं हेंच मी माझें नशीब समजतों. प्रार्थनासमाजाचें प्रचारकार्य करीत असतां मला असले एक संन्यासी मिळाले होते. त्यांचें नांव स्वामी स्वात्मानंदजी. मेघवृष्टीनें उपदेश आणि प्रवचनें करण्यांत त्यांचा मला मोठा लाभहि झाला होता. त्यांतहि केव्हां केव्हां मतभेद झाल्यास स्वामीजी दंडा घेऊन उठत, हा अनुभव मला आलेला होता. म्हणून अशा संन्याशांची मला फार हळहळ लागली नाहीं. त्यांत मी स्वतः पडलों अगदीं सामान्य माणूस ! माझ्याबरोबर काम करण्याला असामान्य माणूस कशाला येईल ! नुसती बी. ए., एम. ए. आणि परदेशविद्याभूषित माणसेंसुध्दां माझ्या भेदरट मनाला असामान्य दिसूं लागलीं. अशीं माणसें थोडा वेळ स्वार्थत्याग करतील पण तीं अखेरपर्यंत मिशनची शिस्त पाळतील याची खातरजमा कोणा देणार ? मिळालींच असतीं तर मिशननें त्यांना टाकलें असतें असा प्रकार नाहीं. पण मिळालीं नाहींत; म्हणून मला तरी कधीं वाईट वाटलें नाहीं. “श्रध्दावान लभते ज्ञानं” अशी म्हण आहे. ‘ज्ञानवान लभते श्रध्दां’ अशी म्हण नाहीं. म्हणून फारशी इंग्रजी विद्या
न मिळवलेलीं, गरजेमुळें व कामापुरतें आधुनिक विद्येचें चांगलें ज्ञान असलेलीं अशीं माणसें क्रमाक्रमानें मिळालीं त्यांनाच ह्या मिशनचें सारें श्रेय आहे.
मिशनच्या कामाची खालीलप्रमाणें मांडणी करण्यांत आली. एक मध्यर्ती शाखा ठरवावयाची. तिचा हेतू आणि रचनेसंबंधीं जरूर तितकेच नियम करावयाचे. अशी मातृसंस्था मुंबई शहरांत स्थापण्यांत आली. प्राथमिक अथवा दुय्यम शिक्षणाची शाळा, उद्योगशाळा, विद्यार्थी वसतिगृहें, फुकट दवाखाना, धर्म आणि नीति शिक्षणाच्या साप्ताहिक शाळा, केवळ सार्वत्रिक धर्माला अनुसरून म्हणजे जातिभेद आणि मूर्तिपूजेला फाटा देऊन चालविण्यांत येणारीं उपासनालयें एवढीं तरी निदान ह्या मध्यवर्ती संस्थेचीं अंगें ठरलीं. ह्यासाठीं एक आश्रम स्थापण्यांत येऊन त्याची सर्व जवाबदारी अंगावर घेणा-या कुलगुरुची आवश्यकता भासली. ह्या मध्यवर्ती आश्रमाची नीट घडी बसल्यावर पुढें जसजसा अनुभव येईल तसतशा भाषावार निरनिराळया प्रांतांतून प्रांतिक शाखा आणि त्यांच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय पोट संस्था स्थापण्याचा विचार ठरला. सुवर्णकार पध्दतीनें हीं कामें चालूं असतां मेघवृष्टीचें काम म्हणजे जाहीर व्याख्यानांच्या द्वारें परिषदा, प्रदर्शनें, प्रात्यक्षिकें, मिरवणुकी वगैरे साधनांच्या द्वारें लोकमत तयार करणें हें काम, आवश्यक होतें. ह्या दोन्ही पध्दतीचीं कामें परस्परावलंबी होतीं. ठिकठिकाणच्या केंद्रीकृत संस्था नसत्या आणि नुसतें प्रचाराचेंच काम चाललें असतें तर लोकमत कसें बनणार आणि मेघवृष्टिप्रचाराचें काम न चालवतां नुसत्या स्थानिक संस्थांना द्रव्याचें व सहानुभूतीचें सहाय्य तरी कसें मिळणार? म्हणून ह्या दोन पध्दतींचीं कामें मीं एकमेकांपासून भिन्न पण परस्परपोषक अशीं प्रथमपासून ठरविलीं होतीं दुसरें काम म्हणजे प्रचाराचें काम मीं स्वतः अंगावर घेऊन करण्यासारखें होतें. पण पहिल्या कामासाठीं मात्र तज्ज्ञ आणि अधिकारी माणसें पाहिजे होतीं. ही तज्ज्ञता आणि अधिकार तरी काम करण्याच्या अनुभवानेंच मिळणार होता.
मिशनचें काम म्हणजे असस्ल धर्मयुध्दचें काम होतें. नुसती मुलुखगिरी केल्यानें युध्दांत जय मिळत नाहीं. मिळाला तरी तो टिकत नाहीं. मिळालेल्या मुलखांत कोटकिल्ले स्थापणें आणि ते शिस्तीनें व बंदोबस्तानें टिकविणें ह्यावरच अखेरचा जय अवलंबून असतो. आणि ह्या दोन्ही कामाची रित्र्कूटभरती देखील तीं तीं कामें करतां करतांच मिळवावयाची असते.
कामासाठीं माणसें मिळविण्याचा प्रयोग स्वतःच्या घरापासून केला. कारण बोलून चालून मी वेडापीर ठरलों तर घराबाहेरच्या लोकांनीं मजवर विश्वास कसा ठेवावा. यशानेंच यश मिळतें. घरच्या लोकांना घेऊन थोडेसें काम करून दाखविल्यावर प्रार्थना समाज हें जें माझें अध्यात्मिक घर, त्यांतूनच माणसें मिळतील अशी मला बळकट श्रध्दा होती. मध्यवर्ती शाखेची मागें दिलेली जी समिति आहे ती सर्व प्रार्थनासमाजिस्टांचीच आहे. अध्यक्ष-सर नारायणराव चंदावरकर, उपाध्यक्ष-शेठ दामोदारदास सुखडवाला, खजिनदार नारायणराव पंडित, सुपरेंटेंडंट डॉ. लाड, जनरल सेक्रेटरी मी स्वतः हे अनुक्रमें प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद आणि प्रचारक होतों. त्याच नात्यानें पुढील कार्यवाहकहि मला प्रथम माझ्या लहानशा घरांतून आणि पुढें माझ्या प्रार्थनासमाजाच्या अध्यात्मिक गृहांतून मिळवायाचे होते. म्हणून प्रथम माझी भगिनी श्रीमती जनाबाई, मातोश्री सौ. यमुनाबाई, पिताजी ती. रामजीबुवा त्यांना कार्यास बोलाविलें. जनाबाई पनवेलीस म्युनिसिपालिटीच्या मुलींच्या शाळेंत मुख्याध्यापिका होत्या. मॅट्रिकपर्यंत त्यांचें इंग्रजी शिक्षण झालें होतें. उपासनेच्या वेळीं भजन करणें प्रसंगविशेषी गोरगरिबांचा समाचार घेणें वगैरे प्रार्थनासमाजाच्या कामीं मला त्या अगोदरच मदत करीत होत्या. तेंच काम ह्या मिशनमध्यें वाहून घेऊन करण्यासाठीं मीं त्यांना आपल्या कायमच्या नोकरीचा राजीनामा देण्याची विनंती केली. आणि ती त्यांनीं मान्य केली. ज्यांच्या कृपेनें व आशीर्वादानें मला ह्या सार्वजनिक कामाची प्रेरणा झाली ते माझ्या विनंतीची वाट कोठून पाहणार ! जिथें मुलें तिथें आम्ही ह्या अस्सल हिंदु नियमाप्रमाणें माझे आईबाप माझ्या मागें आले. आम्ही सांगूं तें काम, ठेवूं तें स्थळ असा त्यांचा निर्धार झाला. आमच्या घरोब्याचे सय्यद अबदुल कादर या नांवाचे तरुण सद्गृहस्थ होते. तेही मॅट्रीक पास झालेले होते. मुंबईंतील इस्लामिया स्कूलमध्यें त्यांना शिक्षकाची नोकरी होती. आमच्याप्रमाणेंच त्यांनींहि प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली होती. आमचें उदाहरण पाहून त्यांनींही आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मिशनचे स्वार्थत्यागी कार्यवाहक बनले. हें दिव्य पाहून प्रार्थना समाजाचे दुसरे एक सभासद रा. वामनराव सदाशिवराव सोहोनी यांनाही ह्या अध्यात्मिक सांथीनें गांठले. मुंबईतील विल्सन हायस्कूलमध्यें ते एक प्रसिध्द नामांकित शिक्षक होते. वामन आबाजी मोडक ह्या प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञाच्या तालमींत शिकून ते त्या शास्त्रांत आणि कार्यांत चांगले तरबेज झाले होते. ते आम्हास येऊन मिळाल्यावर स्वीकृत कार्यांत परमेश्वराचा हात आहे असा जणूं साक्षात्कारच आम्हाला झाला. आणि अशारीतीनें आमचा आत्मविश्वास वाढला. या प्रकारें मुंबईंतील मध्यर्ती आश्रमाची व गुरुकुलाची तयारी झाली. “सर्वारंभास्तंडुला: प्रस्थमूलः” अर्थांत् जरूर त्या पैशाच्या कामीं मी लागलों.