'आठवणी'-साठी

‘आठवणी’- साठीं
सुमारें ४ वर्षांपूर्वी वत्सला साहित्य प्रकाशन मालेचें सहावें पुष्प म्हणून “माझ्या आठवणी व अनुभव” हें महर्षि कर्मवीर वि. रा. शिंदे यांचें आत्मचरित्र भाग पहिला या रूपानें मीं प्रसिध्द केलें होतें. कर्मवीरांचा त्याग व कार्य उज्ज्वल असल्यानें सदर पुस्तकाचा बोलबाला बराच झाला. याच पुस्तकाचा पुढील संपूर्ण भाग तयार व्हावा, म्हणून माझे परम स्नेही व कर्मवीरांचे द्वितीय चिरंजीव श्री. रवींद्रराव यांनीं स्वतः बरीच खटपट करून आत्मचरित्र पुरें केलें.

मृत्यूपूर्वी ३|४ वर्षें कर्मवीर अर्धांगवायूनें अंथरुणाला खिळूनच होते. हात कंपवातानें लिहिण्याच्या परिस्थितींत नव्हते. अर्धा-पाऊण तास शांत मनानें एखादा मजकूर सांगेन म्हटलें तर तें त्यांना प्रकृतिक्षीणतेमुळें शक्य नव्हतें. मजकुराची जुळवाजुळव करतांना अवश्य असणारें वाचन अंधतेमुळें झालें नाहीं. अर्थातच कर्मवीरांना आपली सारी भिस्त स्मृतीवर ठेवावी लागली. कर्मवीरांची स्मृति वृध्दापकाळांतील दारुण स्थितींतही भयंकर जागृत असलेली पाहून मात्र मोठा आचंबा वाटतो. स्मृतीनें बाजू राखली म्हणून तर आज ‘आठवणी’हातीं लागल्या. नाहींतर एवढया मोठया स्वार्थत्यागी देशसेवकाचें आत्मचरित्र आमच्या देशबांधवांच्या वाचनांत कसें आलें असतें ?

वास्तविक पाहातां कर्मवीरांचीं लहानमोठीं अनेक चरित्रें प्रसिध्द व्हावयास पाहिजे होतीं. ज्या दलित बांधवांसाठीं कर्मवीरांनीं आपलें संपूर्ण आयुष्य खर्ची पाडलें त्यांपैकीं एकाही सुशिक्षित बांधवाच्याकडून हें कार्य या वेळेपावेतों झालें नाहीं. ज्या समाजांत कर्मवीरांचा जन्म झाला त्या मराठा समाजानें मृत्यूनंतर त्यांचे गोडवे स्मशानभूमींतच तारस्वरानें गायले. ज्या पुढारलेल्या जातीशीं कर्मवीरांनी सुरवातीपासूनच प्रेमळ घरोबा ठेवला होता त्यांनीं त्यांचें चरित्र लिहिण्याचें पवित्र कार्य अद्यापि मनावर घेतल्याचें दिसत नाहीं. ज्या कालांत बुद्रुक व्यक्तींचीं भरमसाट चरित्रें लठ्ठलठ्ठ पुस्तकरूपानें प्रतिदिनीं प्रसिध्द होतात त्याच कालांत एका महान् व्यक्तीचें साधेंसुधें चरित्र एकाही व्यक्तीनें प्रकाशित करूं नये या घटनेला काय म्हणावें हेंच समजत नाहीं. स्वावलंबनाचा धडा चरित्राचे बाबतींतही कर्मवीरांनाच घालून द्यावा लागावा ना!

अत्यंत बिकट परिस्थितीमध्यें सदर आत्मचरित्र श्री. रवींद्रराव शिंदे यांनीं तीर्थरूपांकडून लिहवून घेतलें. ज्या दिवशीं आत्मचरित्र पुरें झालें त्या दिवशीं कर्मवीर कित्येक तास बेशुध्द व निपचित पडले होते. केवढा तरी मानसकि त्रास त्यांना तें संपूर्ण लिखाण होईपर्यंत सहन करावा लागला आणि तरीही शेवटीं तें त्यांनीं पुरें केलेंच. “मी एका मोठया जबाबदारींतून मुक्त झालों” असें कर्मवीर आत्मचरित्राचें शेवटचें वाक्य सांगत असतांना उद्गारले.

 - आणि एवढया मोठया व्यक्तीचें आत्मचरित्र इतक्या प्रतिकूल परिस्थितींत पूर्ण झालें असतां दुर्दैवानें संपूर्णतः वाचकांना तें देतां येत नाहीं. कागदाची टंचाई, महर्गता यामुळें ग्रंथप्रकाशन किती कष्टप्रद झालें आहे याची कल्पना आज सर्वांना आहेच. आत्मचरित्राचा उर्वरित भाग सुमारें ५०० पानांचा झाला असता. या भागाच्या छपाईस लागणारी रक्कम कर्मवीरांच्या चहात्यांकडून अंशतः मिळावी म्हणून सर्व नियतकालिकांतून तशी जाहीर विनंति केली. पण कर्मवीरांचीं स्तुतिस्तोत्रें त्यांच्या मृत्यूनंतर गाणा-या महाराष्ट्रांतील वाचीवीरांना मदत करणें शक्य झालेलें दिसत नाहींसें वाटतें. कर्मवीरांना आपलें आत्मचरित्र आपल्या हयातींत प्रसिध्द झाल्याचें पाहणें नशिबीं नव्हतें. मृत्यूनंतर तरी ती गोष्ट त्वरित व्हावी या एकाच प्रेरणेनें ऐपत नसतांनाही व्यक्ती या नात्यानें मीं हें कार्य हातीं घेतलें, तों कागद काटकसर हुकूमनामा पुढें दत्त! तेव्हां जेवढीं पानें छापलीं तेवढयाचा हा ‘भाग दुसरा’म्हणून प्रसिध्द करणें भाग पडलें.

परिस्थिति सुधारतांच व पैशाची योग्य ती मदत मिळतांच कर्मवीरांच्या आत्मचरित्राचा तिसरा भाग प्रसिध्द करीनच. पण त्याहीबरोबर कर्मवीरांचें इतर वाङमय खंडरूपानें प्रसिध्द करीन हें आश्वासन मी देत आहें. कर्मवीरांचें कृपाछत्र मजवर असतांना या कामीं परमेश्वर मला साहाय्य करणार नाहीं असें होणारच नाहीं. कर्मवीरांच्या पवित्र आत्म्याला प्रणाम करून तूर्त रजा घेतों.

- ज. बा. जगताप.

यापुढें वाटेंत कोठेंहि न थांबतां मी मुंबईस आलों. अनुभवानें मन इतकें भरलें कीं, सर्व भारताची यात्रा होतां होईल तों लवकर आटोपण्याचा मीं निश्चय केला.